विपश्यना - काही प्रश्न

Submitted by विजय देशमुख on 28 January, 2014 - 20:35

विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्‍याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.

१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्‍या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...
४. ज्यांना रोज काही औषधे घ्यावी लागतात (उदा. रक्तदाब, डायबेटिस, इ.) त्यांच्यासाठी काही विशेष सुचना.
५. या शिबिरातुन कोणत्या अपेक्षा असाव्या/ असू नयेत.
६. इतर काही माहीती.

येत्या मार्च महिन्यात १० दिवसांच्या कोर्सला जायचे ठरतेय. बघुया, कसं जमते ते.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>आणि उलट ज्यांना यातुन पुढे जाऊन मनोविकार दूर करायचे असतील तर 'अरे पूर्वी किती त्रास, ताण, दुःख असेल लोकांना तुला तर चांगला पगार मते तुला कसला डोंबलाचा त्रास/ताण /दुःख रे? चल आर्ट ऑफ लिव्हिंग बेसिक कोर्स किंवा ते इनर इंजिनिअरिंग कर तेवढं पुरेसं आहे तुला' असं सांगितले तर काय फायदा?

हे वाचून खूप हसू आले. असे चिंतातुर जंतू असतात आणि त्यांबद्दलच गडकरी म्हणतात -

"निजले जग; का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला |
काय म्हणावे त्या देवाला – "वर जाउनि म्हण जा त्याला" || १ ||
.
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" || २ ||
.
"हिरवी पाने उगाच केली झाडांवर इतकी का ही |
मातित त्यांचे काय होतसे?" "मातिस मिळुनी जा पाहीं!" || ३ ||
.
"पुराबरोबर फुकटावारी पाणी हे वाहुनि जात |
काय करावे जीव तळमळे" "उडी टाक त्या पूरात" || ४ ||
.
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी जास्त" || ५ ||
.
देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी |
ह्या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ति द्या परी ! || ६ || ......................... Lol Lol Lol
.
- गोविन्दाग्रज (कवि रा. ग. गडकरी).

.
गडकर्‍यांच्या कविता भयंकर आवडतात. आज वाग्वैजयंती वाचेन.

हा वाद निरर्थक आहे -

एका शून्य जगी दिसे, तरी दिसे शून्यात अन्या जग
हे मी नाही गोविंदाग्रज म्हणतात. Happy

<<<< हा वाद निरर्थक आहे - >>>>

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म न्याय नीति सारा खेळ कल्पनेचा

- वसंत कानेटकर

इथे आणि इतरत्र डूआयडीने कधी वेगवेगळ्या विरोधी पोस्ट्स, तर कधी धागा वरती आणायला आपल्याच धाग्यावर दुसऱ्या आयडीने पोस्ट्स टाकणाऱ्यांसारखेच

>> त्यात रानभूली यांचे मन वळवण्याचा प्रयत्न होता असे वाटत नाही.
धन्यवाद मानव!

कोणाचेही मन वळवण्याचा प्रयत्न करणं हे एकंदरीतच पॉइंटलेस किंवा Futile काम आहे. स्वतःच्या मनाच्या धारणा बदलणं हे अत्यंत कठीण काम फक्त स्वतः त्या व्यक्तीच्याच हाती असतं. त्यामुळे माझ्या प्रतिसादांमध्ये कोणाचेही मन वाळविण्याचा प्रयत्न नव्हता/नाहीयेय.

भारतात, थेरवाद परंपरेतील विपश्यना गोयंकाजींनी आणली आणि भारतात फक्त तीच प्रचलित असावी असा माझा समज होता. वज्रयान परंपरेतील (तिबेटन) विपश्यनाही भारतात प्रचलित आहे ह्याबद्दल मला माहिती नव्हती, जी रानभुली यांच्या प्रतिसादातून कळली.

विपश्यना ही त्रिपिटकातल्या ‘संयुक्त निकाय’ ग्रंथात, महासतीपठ्ठान सुत्तात, बुद्धाच्या प्रवचनांनुसार डॉक्युमेंट केलेली आहे. माझे प्रतीसाद महासतीपठ्ठान सुत्तात विषद केलेल्या ध्यानप्रणाली वर बेस्ड आहेत. विपश्यनेबाबत चुकीच्या माहितीमुळे, काही गैरसमज असू नयेत त्याअनुषंगानेच माझे प्रतिसाद देत होतो/आहे.

रानभुली,
सौम्य विपश्यना अशी काही ध्यानप्रणाली महासतीपठ्ठान सुत्तात नाही. ‘आनापान-सती’ ही क्रिया विपश्यनेचा भाग आहे, जी मन एकाग्र आणि स्थिर करण्याची पहिली पायरी आहे. त्यालाच तुम्ही बहुदा सौम्य विपश्यना असं म्हणता आहात. त्याच्यापुढची पायरी किंवा क्रिया म्हणजे विपश्यना. ही विपश्यना, भिक्खू (संन्यासी) आणि सांसारिक व्यक्ती, ह्या दोघांसाठी सारखीच असते. ध्यानप्रणालीत काहीही फरक नाही. फक्त ‘शीला’साठीचे नियम भिक्खू (संन्यासी) यांच्यासाठी फार जास्त आणि कडक असतात; सांसारिक व्यक्तीसाठी फक्त पंचशील असते, संसारात राहून पालन करता येण्या इतके सोपे. तसंच, निब्बाणाला जायचे नसते, निब्बाण आपल्यातच असते.

रॉय
>> मन चंचल नसले असते तर माणूस इवॉल्वच होऊ शकला नसता.
हे नेमकं उलट नाहीये का? मन चंचल असतं म्हणूनच तर माणूस इवॉल्वच होऊ शकत नाही ना?

>> चंचल मनाच्या मूळ आयसोलेशन पातळीवर जाऊन एकाग्रचित्त होणे शक्य असावे मात्र ते शतकांत एखाद्याला साध्य होत असावे.
हे अनुमान वाचून परसेंटेज काढणाऱ्या पेस्तनजींची आठवण झाली Happy

@अतरंगी
>> विपश्यना आपल्याला एक मार्ग दाखवते, त्यावर चालणे न चालणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय.
चपखल, १००% सहमत!!

- (विपश्यना साधक) सोकाजी

सोकाजी,
तुमचा प्रतिसाद प्रामाणिक आणि संदर्भाधारित आहे, हे नक्कीच मान्य. कोणाचे मन वळवण्याचा हेतू नसून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आहे, हेही स्पष्ट दिसते.

तरी काही मुद्द्यांवर सौम्य मतभेद नोंदवावेसे वाटतात.

१) “सौम्य विपश्यना” ही संज्ञा पाली सुत्तांत थेट आढळत नाही, हे खरे आहे. पण महासतीपठ्ठान सुत्तात वापरलेले अनुपस्सी, पजानाति, विहरति हे शब्द निरीक्षणाच्या सौम्य, नैसर्गिक प्रक्रियेकडेच निर्देश करतात. त्यामुळे शब्द नसला तरी अर्थाच्या पातळीवर “सौम्य निरीक्षण” ही संकल्पना नाकारता येत नाही, असे मला वाटते.

२) आनापानसती = फक्त पहिली पायरी असे मांडणे थोडे मर्यादित ठरू शकते. आनापानसति सुत्तातच श्वासाच्या निरीक्षणातून काय, वेदना, चित्त आणि धम्म यांचे अवलोकन कसे विकसित होते हे सांगितले आहे. म्हणजेच, आनापानसती ही स्वतःही संपूर्ण विपश्यना मार्ग ठरू शकते.

३) विपश्यना भिक्खू आणि गृहस्थांसाठी तत्त्वतः समान - या मुद्द्याशी सहमत आहे. मात्र प्रत्यक्ष साधनेत भिक्खूंसाठी अपेक्षित असलेली समाधीची डेप्थ आणि गृहस्थांसाठी व्यवहार्य मर्यादा, हा फरक लक्षात घ्यावा लागतो असे वाटते.

४) “निब्बाण आपल्यातच असते” हे विधान मात्र पाली सुत्तांच्या भाषेशी थेट जुळत नाही. बुद्ध निब्बाणाबाबत “आत -बाहेर”, “असते -नसते” अशा चौकटी टाळतात; ते प्रामुख्याने दुःख-निरोधाच्या अनुभवाबद्दल बोलतात.

एकूणच, तुमचा दृष्टिकोन थेरवादाच्या प्रचलित टीकात्मक चौकटीत सुसंगत आहे. मात्र काही मुद्द्यांवर सुत्तांतील शब्दार्थ आणि नंतरच्या परंपरांतील मांडणी यांत फरक जाणवतो , तोच इथे नोंदवायचा हेतू आहे.
चर्चा उपयोगी आणि शांत राहावी, हीच अपेक्षा.

अवांतर - बुद्धाच्या चरित्रात अनेक ठिकाणी संवाद आहेत. या संवादातून काही काही गोष्ट स्पष्ट होत जातात*. फक्त सूत्तांवर विसंबून राहणे हे ग्रंथप्रामाण्य ठरते. बुद्धाने हठयोग नाकारला. त्याने अनेक वर्षे हठयोग करूनही त्याला ज्ञानप्राप्ती झाली नाही. पण ज्या वेळी वेगवेगळ्या प्रयोगातून ध्यान जमले तेव्हां ज्ञानप्राप्ती झाली. हठयोगाची वर्णने बुद्धाच्या चरित्रात सापडतील.

वेदना देणे , तासन तास शिस्त पाळणे हे बुद्धाने कुठेच सांगितलेले नाही. वेदना झाली तरी दुर्लक्ष करा असा हठयोग नाकारणे म्हणजे सौम्य विपश्यना असे मला तरी वाटते. आधुनिक विपश्यना ही तंत्राकडे जास्त झुकलेली आहे. **

* , ** : - या खुणा केलेल्या मजकुरांसाठी पुस्तक घेऊन बसावे लागेल. इथे माझ्या मेमरीला अनुसरून + गुगलच्या मदतीने लिहीलेले आहे. संदर्भ हवेच असतील तर आता तरी देणे शक्य नाही. कारण अनेक गोष्टीत बिझी आहे. हा धागा अधून मधून वाचक मोड मधे वाचत होतो. इथे न राहवून प्रतिसाद दिला आहे. फ्री झाल्यानंतर संदर्भ हुडकून अधिक स्पष्ट करू शकेन.

राज,
मतभेद असलेलं चांगलं, त्यामुळे चर्चा घडून चर्चेतून नविन पैलू समजून घेता येतात. (अर्थात चर्चा वैयक्तिक न होता मुद्द्याला धरून असली पाहिजे Happy )

तुम्ही मांडलेले मुद्दे सकस चर्चेसाठी खुपच रास्त आणि मस्त आहेत, ते मांडल्याबद्दल धन्यवाद.

१.
>> अनुपस्सी, पजानाति, विहरति हे शब्द निरीक्षणाच्या सौम्य, नैसर्गिक प्रक्रियेकडेच निर्देश करतात

सतीपठ्ठाणातील ध्यानाची संपूर्ण प्रक्रिया अशी उलगडते:
विहरती - जागरूक अवस्थेत स्थिर राहणे
अनुपस्सती - सतत, निर्विकार निरीक्षण
पजानाती - स्पष्ट समज / प्रज्ञा

म्हणजे:
साधक जागरूकतेत राहतो (विहरती),
जे घडतंय ते शांतपणे पाहतो (अनुपस्सती),
आणि त्याचा खरा स्वभाव ओळखतो (पजानाती).

उदाहरणार्थ (श्वासावर ध्यान):
श्वासावर लक्ष टिकवतो - विहरती
येणारा-जाणारा श्वास पाहतो - अनुपस्सती
“हा श्वास अनित्य आहे” हे उमगतं - पजानाती

४ अनुपस्सना आहेत, कायानुपस्यना, वेदनानुपस्यना, चित्तानुपश्यना आणि धम्मानुपस्यना. आनापान सतीने समाधी स्ट्रॉन्ग झाल्यावरच्या ह्या अनुपस्सना म्हणजे विपश्यना ध्यान.

जे 'सौम्य विपश्यना' रानभुली म्हणताहेत ते, 'जे घडतंय ते शांतपणे पाहतो (अनुपस्सती)' ह्यापेक्षा वेगळं आहे. त्यांना चौकटीबद्ध, अधिष्ठान असलेलं ध्यान नको आहे हे माझं आकलन, त्यांचे प्रतिसाद वाचून.

तुमच्या 'सौम्य निरीक्षण' म्हणण्यात 'जे घडतंय ते शांतपणे पाहणे' हे अधोरेखित असेल तर अंशतः सहमत आहे.

२.
>> आनापानसती ही स्वतःही संपूर्ण विपश्यना मार्ग ठरू शकते.

विपश्यना हे संवेदनांचे तटस्थ निरिक्षण आहे. काया, वेदना, चित्त आणि चित्ताच्या अवस्था (धम्म) ह्यांच निरीक्षण ही विपश्यना. नुसत्या आनापानसतीने ह्या ४ अनुपस्सना नाही करता येणार. अर्थात आनापानसती स्वतः एक संपूर्ण ध्यानप्रणाली असू शकते जी मनाची एकाग्रता आणि शान्ततेसासाठी केली जाते.

३.
>> प्रत्यक्ष साधनेत भिक्खूंसाठी अपेक्षित असलेली समाधीची डेप्थ आणि गृहस्थांसाठी व्यवहार्य मर्यादा, हा फरक लक्षात घ्यावा लागतो असे वाटते

मान्य, तो फरक असणारच कारण भिक्खूंनी २४ तास ध्यानात असणं अपेक्षीत आहे. पण २०, ३०, ४५ आणि ६० दिवसांच्या शिबीरात मिळणारी समाधीची डेप्थ गृहस्थांसाठी बरीच खोल असते हे मी माझ्या २० दिवसांच्या शिबीराच्या अनुभवावरून म्हणू शकतो.

४. निब्बाणाबाबत सहमत, बुद्ध जो स्टॅन्ड घेतात तोच योग आहे.

>> आधुनिक विपश्यना ही तंत्राकडे जास्त झुकलेली आहे.
ह्याबाबत अजून डिटेल्स मिळाले की पुढे चर्चा करत येइल, सध्या सौम्य असहमती नोंदवून ठेवतो.

- (अभ्यासू) सोकाजी

काड्या चालणाऱ्या आयडींना नम्र विनंती - तुमचे ड्युआयडी ओळखण्याचे खेळ दुसर्‍या धाग्यावर खेळावेत. इथे रसभंग होतो. काड्या कोण चालतंय हे ओळखण्यात अजिबात इंटरेस्ट नाही.

एखादी पोस्ट गमतीत लिहीली तर भसकन अंगावर येणाऱ्या हिंसक ड्युआयड्यांना हे चालते तर चालू द्या. पण इथे नको.

मी वाचलेल्या आनापानसती मध्ये ज्ञानप्राप्ती (enlightenment) वगळता बाकी अवस्था - दुःखमुक्ती - पर्यँत पोचता येते असे सांगितले होते.
त्यात काया म्हणजे फक्त भौतिक शरीर नव्हे तर रूप आणि नाम(मन) दोन्ही असे सांगितले आहे. (मी वाचलेय ते इंग्रजी पुस्तक होते, ठराविक पाली शब्द रोमन लिपीत लिहिले होते. पालीत कायाचा बहुतेक 'काय' असा उच्चार असावा जसा राजअ यांनी लिहिलाय). नाम म्हणजे मन, चित्त, मनाच्या संवेदना सगळे त्यात अभिप्रेत आहे, आणि रूप म्हणजे श्वास, शरीर व बाह्य भौतिक जगत.
त्यात सामान्य श्वास, लघु श्वास, दीर्घ झालेला सामान्य श्वास, मग काया (रूप - नाम दोन्ही) श्वास घेत आहे अशी विविध टप्प्यांतील सजगता वगैरे सुरवात आणि नंतर श्वास आत घेताना व बाहेर सोडताना होणारा आनंद, चित्तावस्था वगैरे बऱ्याच पायऱ्या होत्या.

हे सगळं फक्त मन एकाग्र, स्थिर करण्याच्या पहिल्या पायरीपेक्षा वेगळे वाटले म्हणुन हा प्रतिसाद.

आधी आनापान हे अष्टांगयोगातील प्रत्याहारासारखे काम करते असे वाटायचे, पण आनापानसतीचे हे पुस्तक वाचल्यावर धारणा - ध्यान पर्यँत तरी त्याची व्याप्ती असावी असे वाटले.

मानव,

ज्या महासतीपठ्ठाणसुत्तात विपश्यना विषद केली आहे त्याच्या मुळ पुस्तकात काय स्पष्टीकरण दिलं आहे हे बघणं रोचक असेल.

पर्यत्ती बुक शेल्फ - मधलं महासतीपठ्ठाण हे पुस्तक आणि त्यातल्या कायानुपस्सना (The observation of body) ह्या प्रकरणातलं आनापानपब्बम (Section on Respiration) हे सेक्शन (२.अ) वाचायची विनंती करतो.

- (अभ्यासू) सोकाजी

मानव, बरोबर.

सोकाजीराव त्रिलोकेकर,
मी या धाग्यावरून सध्या निवृत्त होत आहे. याचे कारण म्हणजे विपश्यनेकडे बघण्याचे भिन्न दृष्टीकोण. या दृष्टीकोणातून योग्य कय हे ठरवण्याची पात्रता माझ्याकडे नाही. कारण या सर्व पंथांचे ज्ञान नसताना मी तुलना करण्यास असमर्थ आहे. बुद्धाने विपश्यना हे अंतिम ध्येय बनवले नाही. ते साधन आहे. विस्ताराने लिहीत नाही.

प्रत्येक बुद्धीमान माणसाकडे प्रज्ञा असते. त्यामुळे त्याने जसेच्या तसे स्विकारावे असे मला वाटत नाही. त्याला बदल करावेसे वाटले तर त्याला तशी मुभा असायला हवी. पण अट एकच. त्याने ती स्वतःच्या नावाने चालवली पाहीजे. जर अशा ठिकाणी आमची पद्धती ही मूळ (बुद्धाच्या ) पद्धतीनुसार आहे असा क्लेम येऊ लागला तर मात्र त्याची चिकित्सा अनिवार्य होऊन बसते.

माझा फारसा अभ्यास नाही. पण जो काही आहे त्यावरून मी हे नक्की सांगू शकतो कि बुद्धाच्या धम्मात प्रचंड भेसळ झाल्याने तिसर्‍या धम्मसंगती मधे प्रचंड वाद झाले आणि वेगवेगळे पंथ उदयास आले. त्यानंतर ज्या ज्या देशात धम्म गेला तिथली संस्कृती, श्रद्धा, अंधश्रद्धा, चेटूक, जादू टोणे यानेही धम्मात प्रवेश केला. आज संस्कृती कोणती आणि धम्म कोणता हे वेगळा काढणे अशक्य होऊन बसले आहे. जसे तारा कल्ट. हा कल्ट जारण मारण साठी कुप्रसिद्ध आहे ( अशी गोष्ट असते कि नाही हा प्रश्न वेगळा).

त्यामुळे एक तर मला सविस्तर लेख लिहावा लागेल. त्यासाठी प्रत्येक पंथाची तुलना करावी लागेल. मला यासाठी डॉ. आंबेडकरांचे म्हणणे समजून घ्यावे लागेल. चिनी पद्धत समजून घ्यावी आगेल. हा विषय दिसतो तितका सोपा नाही हे ध्यानात आल्याने मी रजा घेतो.

सोकाजीराव, विपश्यना संशोधन केंद्रातील विपश्यनेत असलेले आनापान ही त्यात पहिली पायरी असेल याबाबत मला शंका वगैरे अजिबात नाही, तुम्ही केली आहे, करताय आणि सांगताय तेव्हा त्याबद्दल शंका नाहीच.

मी आनापानसती पुस्तकात काय वाचले त्याबद्दल लिहिले. तुम्ही दिलेल्या लिंकवरील तो भाग वाचला. त्यात जे ऑब्झर्विंग बॉडी इंटर्नली अँड एक्सटर्नली लिहिले आहे ते होतेच, पण तो पहिला टप्पा होता. या शिवाय पुढचे बरेच. त्यात mindfulness of body आणि mindfullness of breathing (आनापानसती) यांची तुलनाही होती, त्यातून काय काय साध्य होतं आणि काय नाही हे सांगितले होते. पाच सहा उद्दिष्टांपैकी दिव्यदृष्टी, दिव्यज्ञान प्राप्त होत नाही आणि दुःखापासून मुक्ती मिळण्यास त्याची गरजही नाही हे सांगितले होते. एकेक टप्पा ओलांडला की काय काय अनुभव व अडथळे येतात वगैरे सविस्तर पुस्तक होते.

हे सगळं मन एकाग्र व शांत करण्याच्या टप्प्या पलीकडचे वाटल्याने मी लिहिले हे वर नमूद केले आहेच. पण पलीकडचे नसुन पहिल्या टप्प्यात मोडत असेल तर मग माझी समजण्यात चूक झाली.

राज,
>> बुद्धाच्या धम्मात प्रचंड भेसळ झाल्याने तिसर्‍या धम्मसंगती मधे प्रचंड वाद झाले आणि वेगवेगळे पंथ उदयास आले
हे होण्याच कारण तुम्हीच दिलं आहे. "प्रत्येक बुद्धीमान माणसाकडे प्रज्ञा असते. त्यामुळे त्याने जसेच्या तसे स्विकारावे असे मला वाटत नाही. त्याला बदल करावेसे वाटले तर त्याला तशी मुभा असायला हवी."
अशी मुभा घेतल्यामुळेच मूळ शिकवण दूर राहून प्रचंड भेसळ झाली.

न्युटनचे ३ नियम आपण जसेच्या तसे स्विकरतो की त्यात बदल करतो, जस्ट, प्रज्ञा असल्याने जसेच्या तसे स्विकारायचे नाही म्हणून?

महसतीपठ्ठाण सुत्तात बुद्धाने काय सांगितले आहे त्यासाठी डॉ. आंबेडकरांचे म्हणणे का समजून घ्यावे लागेल, चिनी पद्धत का समजून घ्यावी आणि प्रत्येक पंथाची तुलना का करावी लागेल हे कळलं नाही.

तुम्ही ह्या धाग्यावरून निवृत्त होत आहात हे दुर्दैवी आहे, पण तुमच्या मताचा आदर आहे.

- (साशंक) सोकाजी

>> अशी मुभा घेतल्यामुळेच मूळ शिकवण दूर राहून प्रचंड भेसळ झाली. <<`
मूळ शिकवण काय होती हे त्या बुद्धालाच माहीत.

अगदी त्याच्या दुसऱ्या पिढीत देखील मूळ शिकवण मूळ राहील का याची कोणतीही गारंटी देता येत नाही कारण कोणताही असा डेटा इम्युटेबल करणे तेव्हा अजिबातच शक्य नव्हते. असे कोणतेही इंस्टिट्यूशन तेव्हा नव्हते की ज्याचे रेकॉर्ड कीपिंग अगदी गोल्ड स्टँडर्ड मानावयास हवेत.

नाहीतर आजही बुद्धाची नखे, त्याचे केस किंवा त्याची हाडे इकडून तिकडे श्रद्धेने नेली जातातच, ते खरेच बुद्धाचे आहे का वगैरे हा प्रश्न असतोच. ज्याचा बुद्धाच्या शिकवणीशी काडीचाही संबंध नाही अशा अनेक गोष्टी केल्या जातात, कोणत्याही धर्मा-परंपरांची हीच तर ब्यूटी आहे. की मूळ शिकवणीला व्यवस्थित फाट्यावर मारता येते. आणि स्वतःची वाट चालता येते किंवा स्वतःचे भले करून घेता येते. मूळ शिकवणीला चिकटून राहणारा कोणताही धर्म किंवा पंथ नष्टच होतो कारण मूळ शिकवण टाइमलेस असूच शकत नाही. नाहीतर जगणे मुशिकिल होते. उदा. आज दु:ख मुक्तीची लोकांना फारशी गरज नाही ना विरक्तीची आहे. उदास साधनांची तर नाहीच नाही. जगात सर्वच लोक enlightened झाले तर सगळेच जग एवढे भयानक बोअरिंग आणि uninteresting होऊन जाईल की विचारू नका.

जिथे आत्मभाव विरघळवणे महत्त्वाचे असते (सर्वच अशा साधनांमध्ये असते) तिथे कोणत्याही individuality ला नैसर्गिक रित्या नगण्य स्थान असते. असे जग हा एक भयंकर डिस्टॉपिया आहे.

नुकत्याच आलेल्या Pluribus या apple TV वरच्या सिरीज मधे असेच enlightened लोक दाखवले आहेत. जे सदा सर्वकाळ एकमेकांशी कनेक्टेड असतातच याचा अर्थ प्रत्येक जण प्रत्येकावर साक्षीभावाने नजर ठेवू शकतो त्याचीच सिद्धता म्हणजे कुणालाच आत्मभाव नाही.

सो, मूळ शिकवण इत्यादी गोष्टींना काहीही अर्थ नाही. जो म्हणतो आमचेच मूळ तर त्याचे म्हणणे फेस वॅल्यू ला मानायलाच पाहिजे की होय बाबा तुझेच बरोबर. हेच सौंदर्य आहे. आणि मूळ शिकवणीला जमेल तेवढे सतत फाट्यावर देखील मारता आले पाहिजे किंवा नव्यात ट्रांसफॉर्म देखील करता आले पाहिजे.

बुद्ध हा एकच व्यक्ती होता यालाही काहीही पुरावा नाही.

एक लेखक,

काड्या घालू नका.

धन्यवाद.

रॉय,

>> मूळ शिकवण काय होती हे त्या बुद्धालाच माहीत.

नक्कीच. आणि म्हणूनच बुद्ध म्हणतो, “अप्पो दीप भव”!

द ब्युटी इज़, बुद्ध स्वतःच म्हणतो की, तो जे काही सांगतोय त्यावर खुद्द बुद्ध म्हणतोय म्हणूनही विश्वास ठेवू नका. जो पर्यंत, जे सांगीतलंय ते तुमी स्वतः अनुभवत नाही, तुमच्या अनुभूतीच्या पातळीवर ते उतरत नाही (भावनामय प्रज्ञा) तोपर्यंत.

बुद्धाला जी बोधीप्राप्त झाली, ती कशी झाली, त्याचा मार्ग त्याने, स्टेप बाय स्टेप, त्यात येणाऱ्या मैलांच्या दगडांसकट, व्यवस्थित सूत्रबद्ध केला. तो बोधीप्राप्तीचा प्रॅक्टिकल मार्ग (विपस्सना ध्यानप्रणाली) त्याने सर्वसामान्य माणसालाही अनुसरता येईल इतका सोपा केला.

त्रिपिटकात जे काही डॉक्युमेंट केलं गेलंय ते त्याच्या निर्वाणाच्या नंतर त्याच्या शिष्यांनी डॉक्युमेंट केलेलं आहे. पण त्याने काही फरक पडत नाही कारण जे काही डॉक्युमेंट केलंय त्याची प्रत्यक्ष अनुभूतीच ध्यानात प्रत्येक साधकाला येते, स्टेप बाय स्टेप. त्यामुळे एकदा का विपस्सना ध्यानप्रणाली समजली की त्यानंतर पुढच्या साधनेसाठी कोणाचीच गरज नाही, ना बुद्धाची, ना त्रिपिटकाची ना कोणत्याही गुरूची कारण, अप्पो दीप भव!

तसंही, 'शील, समाधी आणि ज्ञान' फक्त हेच सार आहे बुद्धाच्या शिकवणीचं, त्याच्यापलीकडे काही नाही.

>> मूळ शिकवणीला चिकटून राहणारा कोणताही धर्म किंवा पंथ नष्टच होतो
इस्लाम अजूनही आहे आणि फोफावतोच आहे, सुन्नी आणि शिया असे गट पडूनही.

>> मूळ शिकवण टाइमलेस असूच शकत नाही.
आपण सगळेच टाइमलेस आहोत, त्यामुळे शिकवणही टाइमलेस असायला हावी. आपल्याला भौतिक जगाची अनुभूती ‘टाईम आणि स्पेस’ ह्या मितीत येत असते. त्या मितीच्या पलीकडे ‘टाइमलेस’ असणं आहे. बुद्धाचा बोधीप्राप्तीचा प्रॅक्टिकल मार्ग त्या ‘टाइमलेस’ अवस्थेकडे घेऊन जातो, खात्रीने. पण तो मार्ग प्रत्यक्ष अनुभूतीचा आहे (विपस्सना ध्यानप्रणाली), चर्चा-चिंतनाचा, वाचून धारणा बनविण्याचा नाही.

>> सो, मूळ शिकवण इत्यादी गोष्टींना काहीही अर्थ नाही
अगदी सहमत! प्रत्यक्ष अनुभूतीच्या मार्गावर मूळ शिकवण इत्यादी गोष्टींना काहीही अर्थ नाही!!

>> बुद्ध हा एकच व्यक्ती होता यालाही काहीही पुरावा नाही.
नसेनाका, काय गरज आहे पुराव्याची किंवा त्याच्या असण्याची? जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभूतीच्या मार्गावर चालताना डॉक्युमेंट केलेले मैलांचे दगड प्रत्यक्ष अनुभूतीस येताहेत तोपर्यंत कशाचीही गरज नाही कारण तेच, अप्पो दीप भव!

- (स्वतःचा दीप होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

मानव,

तुम्ही वाचलेल्या आनापानसती पुस्तकाचे डिटेल्स द्याल का ? मला त्या लेखकाचा दृष्टिकोन जाणून घ्यायला आवडेल. त्यातून काही नवीन समजले तर मलाही माझ्या चुकीच्या धारणा असतील त्या बदलण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

- (अभ्यासू) सोकाजी

>> जे सांगीतलंय ते तुमी स्वतः अनुभवत नाही, तुमच्या अनुभूतीच्या पातळीवर ते उतरत नाही (भावनामय प्रज्ञा) तोपर्यंत. <<

यातली अनुभूती म्हणजे काय आहे नेमकं?

बुद्धाला एका विवक्षित रटाळ साधनेचा अनुभव एवढेच अपेक्षित आहे का? का ही अनुभूती व्यापक म्हणजे आयुष्याच्या स्तरावरची आहे?

म्हणजे स्वतः यशोधरेला भेटायला जाणारा बुद्ध जेव्हा अनुभव हा शब्द उच्चारतो तेव्हा त्याला केवळ एखादी ध्यानप्रणाली अपेक्षित आहे असे मला तरी अजिबातच वाटत नाही. त्याचा स्केल तेवढाच मर्यादित का ठेवायचा?

विपस्सना ध्यानप्रणाली पुरता या 'अनुभूती' शब्दाचा अर्थ मर्यादित ठेवणे मला तरी अजिबात योग्य वाटत नाही. हा म्हणजे त्या वेन डायग्राम मधला अगदी बारकासा वर्तुळ निवडून बुद्धाच्या उक्तीचा अगदी सोयीस्कर अप्लाइड अर्थ काढणे झाले.

आयुष्याच्या व्यामिश्रतेला केवळ एका नॅनोस्कोपिक प्रक्रियेतून पाहणे हे स्ट्रिंग थिअरी ही कशी दुःखमुक्ती देऊ शकते असे सांगणे झाले.

ते अत्त दीप भव फारच क्लिशे आहे हो, एव्हाना ते कधीच चर्चेत येऊन जायला हवे होते ते तसे उशीराच आले.

त्यातही तू तुझे बेट हो की तू तुझा दिवा हो इथपासून वेगवेगळे अर्थ काढले जातात. आणि हे फार सोपं असतं सांगायला.

हा संदेश बुद्धाने सोडून इतर कुणी पाळलेला दिसत नाही. कुणीही स्वतःचा दीप स्वतः झालेला दिसत तरी नाही.

मेटाफिजिक्स चा वापर गोयंका गुरुजी देखील अतिशय शिताफीने करतात बरं का. म्हणजे क्वांटम फिसिजक्स च्या कल्पना देखील बुद्धाला अंतर्ज्ञानाने कळला होता असा काहीसा रोख असतो. शेवटच्या दिवसांमधले लेक्चरमधे सांगतात गुरुजी. तुम्हीही अगदी टाइम आणि स्पेस आणले म्हणून त्या उतारावर सगळी चर्चा आता घरंगळत जाईल.

तिथे काय प्रत्येकालाच सांख्यांचे तत्त्वज्ञान, भारतीय दर्शने अगदी विश्वनिर्मितीचे रहस्यच उलगडून दाखवतात. कृष्ण देखील मग एकदम हजारो गॅलक्स्या अर्जुनला दाखवतो आणि अर्जुनला आपल्या क्षुद्रतेची जाणीव होते. या टाइम आणि स्पेस ला दीपक चोप्रा पासून आपल्या सधगुरु पर्यंत जे काही पिळून काढतात त्याला तोड नाही. फाइनमन भी अपूनकाच. ओपेनहायमर भी अपुनकाच.

कुणीही स्वतःचा दीप स्वतः झालेला दिसत तरी नाही.>> बरोबर आहे. दिव्यज्ञान म्हणजे काय याची व्याख्या नाही. कोण कुठल्या अर्थाने वापरते हे सांगता येत नाही. विश्व कसे निर्माण झाले आणि, टाइम -स्पेस म्हणजे काय, आणि त्यापलीकडे , व पुढे जे काय नविन कळेल सगळे काही त्यात बसते.

मुक्ती म्हणजे काय याबाबतही असेच आहे. मायावी जगत् (मोह पाडणारे आणि त्यामुळे होणारे सुखदुःख) ओळखुन आयुष्य भर त्यात अडकून त्याच त्याच गोष्ट करत परत तेच ते अनुभव, हेवेदावे करत रहाणे या पासुन मुक्ती ते पुनर्जन्म असतो, मागच्या जन्माचे भोग असतात वगैरे त्या जन्मचक्रातून मुक्ती ते क्वांटम फिजिक्स मधील ऑब्झरवर्स म्हणजेच सजीवांचा कॉन्शस माईंड असे मानुन दिसणारे मायावी जगत् त्यापासुन मुक्ती.

नंतरच्या पोस्ट मध्ये मानव पृथ्वीकर आणि राज अज्ञानी यांच्या पोस्ट सेन्सिबल आहेत. पटलं नाही पटलं हा भाग वेगळा.
राज अज्ञानी यांनी निवृत होण्याचे कारण दिले आहे. त्यानंतर त्यांना प्रश्न विचारले तर हा निर्णय त्यांना मोडावा लागेल ज्यामुळे त्यांच्या निर्णयाचे गांभीर्य त्यांना नाही असा समज होईल. जसे रानभुलीच्या बाबत झाले. एकदा नाही म्हटले कि नाही.
सोत्रि यांचे प्रश्न चुकीचे नसतील पण पद्धत योग्य नाही.

सोकाजीराव पाली वजनाचा अर्थ सांगतात. तो बरोबर कि चूक हे तपासण्यासाठी काहीच सोय नाही. कारण हे संस्कृत मंत्रासारखेच झाले. काही जण संस्कृतमधे काहीही दडपून देतात. त्यामुळे संस्कृत न समजणारे PSPO इफेक्ट मुळे गप्प बसतात. यात संस्कृत सांगणारा ज्ञानी असल्याचा भ्रम होतो आणि चर्चेत त्या व्यक्तीला अधिकारपद मिळते. इथे तसेच होत आहे. शिवाय सोकाजीराव स्वतःहून प्रत्येकाला उत्तर देत असल्याने तो अधिकार त्यांना आहे असे वाटते.

प्रश्न ते सांगतात ते तपासून पाहण्याचा आहे.

Pages