विपश्यना - काही प्रश्न

Submitted by विजय देशमुख on 28 January, 2014 - 20:35

विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्‍याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.

१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्‍या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...
४. ज्यांना रोज काही औषधे घ्यावी लागतात (उदा. रक्तदाब, डायबेटिस, इ.) त्यांच्यासाठी काही विशेष सुचना.
५. या शिबिरातुन कोणत्या अपेक्षा असाव्या/ असू नयेत.
६. इतर काही माहीती.

येत्या मार्च महिन्यात १० दिवसांच्या कोर्सला जायचे ठरतेय. बघुया, कसं जमते ते.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरी, लिम्बुटिम्बु, आतिवास, प्रकाश तुमचे अभिप्राय आवडले. प्रकाश, तुम्ही दिलेल्या लिंक्स खूप वाचनीय आहेत. ही गोष्ट अनेकदा जाणवते कि ध्यान धारणेचे बाजारी करण केले जाते, जसे अनेक इतर उत्पादनांचे केले जाते आणि त्या साठी शास्त्रीय द्रुष्ट्या फोल दावे केले जातात. त्यामुळे या बाबतीत लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

हे सगळे खरे असले तरीही जेव्हा वैज्ञानिक पध्दती जेव्हा धर्म किंवा परंपरा या सारख्या मुख्यत्वाने मानवी भावनांशी निगडीत गोष्टींना लावल्या जातात तेव्हा अनेकदा विवेक जाऊन तर्ककर्कश्यता येते असे मला वाटते जे तुम्ही दिलेल्या लिक्स वाचून मला वाटते. जसे काही ध्यान पध्दतीं मध्ये काही काळ सर्व जगाचा किंवा बाह्य परिस्थीतीचा आहे तसा स्वीकार करा असे सांगतात तेव्हा बाह्य परिस्थीती म्हणजे काय आणि त्याचा स्विकार म्हणजे काय आणि त्या साठी वैज्ञानिक मोजमाप इत्यादी केले गेल्याचे लिहिले आहे. वस्तूतः तुमच्या आजू बाजूंच्या व्यक्तींचा त्या आहेत तसा स्विकार करा अशा प्रकारचे मत अनेक मानसोपचार तज्ञ नाते संबंध सुधारण्या साठी देतात. अशा वेळी अशा व्यक्तींचा आहे तसा स्विकार म्हणजे काय? अशा प्रकारचे वस्तुनिष्ट मोजमाप करायला जायचे का?

एखाद्या व्यक्तीला देवा समोर दिवा लावल्यावर शांत वाटते, एखाद्याला ध्यान केल्याने शांती मिळते, एखाद्याला सुर्यास्त पाहिल्याने मिळते, कोणाला चांगले चित्र पाहिल्याने किंवा गाणे ऐकल्याने मिळते. अशावेळी त्यांना शांती मिळते हे खरे का खोटे आणि त्या साठी वस्तुनिष्ट मोजमाप काय याची चिकित्सा करत बसायची का?

मी वर लिहिल्या प्रमाणे धर्म आणि काही प्रमाणात ध्यान याचे बाजारीकरण केले जाते आणि त्या साठी काही प्रमाणात फसवणूक होउ नये
यासाठी काळाजी घेणे आवश्यक आहे. त्या द्रुष्टीने पाहिल्यास आपण दिलेल्या लिंक्स खरोखर महत्वाच्या आहेत.

त्याच प्रमाणे ज्या गोष्टी व्यक्ती परत्वे बदलणार्या आणि मानवी भावनांशी निगडीत आहेत तेथे आत्यंतिक वैज्ञानिक चिकित्सा आणि जेथे चिकित्सक असणे गरजेचे आहे तेथे विश्वास अशा गोष्टी पण घडतात. माझा एक खूप वैज्ञानिक द्रुष्टीकोनाचा मित्र, ध्यान वगैरे ची भरपूर वैज्ञानिक द्रुष्टीकोनातून चिकित्सा करत असे, पण एका विशिष्ट कंपनीचा सेलफोन घेतल्याने लोकांचे वैवाहिक नाते सुधारते, किंवा काही विशिष्ट कंपनीचे शेअर घेतल्याने जीवनातले प्रोब्लेम्स कमी होतात अशा गोष्टींवर मात्र त्याची नितांत श्रध्दा होती (शेअर खरेदी करताना अर्थशास्त्रीय निकष वापरले जात नसत, फोन घेताना किंमत, वॉरंटी ईत्यादी निकष न लावता, ब्रँड नेम वगैरे पाहिले जात असे.).

ध्यान धारणा असो किंवा वैज्ञानिक द्रुष्टीकोन असो, या सगळ्या विवेकाने, तारतम्याने घेण्याच्या गोष्टी आहेत.

ध्यान धारणा असो किंवा वैज्ञानिक द्रुष्टीकोन असो, या सगळ्या विवेकाने, तारतम्याने घेण्याच्या गोष्टी आहेत. >> +१

माझ्या मते विपश्यना, ध्यान यांच्या कडे आपण फॅड, टूम म्हणून जात असाल तर जाऊ नये. तुमच्या मनात प्रश्न असतील तर त्यांची उत्तरे मिळवून्च जावे. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. काही अनुभवातूनच मिळतात. पण ध्यान धारणा, विपश्यना याकडे मला का जायचेय हे आधी स्पष्ट असले पाहीजे. तोंडओळख असायला पाहीजे. नाहीतर शिबीरात गेल्यानंतर आपण हे का करतोय असे प्रश्न पडू शकतात.

कुठे केलं पाहीजे हा चांगला प्रश्न आहे. कारण हल्ली फ्रॉड पण बरेच आहेत. तर काही ठिकाणी आडगावी उभारलेल्या हॉटेल्सचा व्यवसाय वाढावा म्हणून ध्यान शिबीरे, योग शिबीरे, विपश्यना वगैरे आयोजित केले जातात. ऑडीयन्स टार्गेट करून त्याप्रमाणे कार्यक्रम अरेंज केले जातात. मी गेलेल्या ठिकाणी कॉन्सर्ट पण होता. खेळ होते. हे कर्मर्शियल होतं. अधून मधून ध्यान धारणा होती. हे म्हणजे ओम शांती ओम पिक्चरसारखं झालं. फाईव्ह स्टार डिश.

तुम्हाला योग्य गुरू भेटला तर शिबीरात जाणे गरजेचे नाही इथपर्यंत माझे मत झाले आहे. युट्यूबवरून अनेक व्हिडीओज पाहिले. त्यातून चांगले वक्ते समजले. पन यातले काही आता या जगात नाहीत तर काही फक्त युट्यूबवरून प्रवचन देतात. ते फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष काहीही सांगत नाहीत. शिबीर घेत नाहीत. गुरू हा संन्यासीच असाला पाहीजे असं काहीही नाही.

काही दिवसांपासून पुस्तक वाचताना मन लागत नाही हा अनुभव आला. मग हळूहळू मला वेबसिरीज, चित्रपट पूर्ण वेळ एका जागी बघून बसता येत नाही हे लक्षात आलं. अजून अनेक ठिकाणी त्याचा फटका बसू लागला. मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना विचारलं. ते म्हणाले स्क्रीन टाईम कमी / बंद कर. एव्हढ्याशा साठी कुणा एक्सपर्ट कडे किंवा सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जायची गरज नाही. स्क्रीन टाईम कमी करता येत नसेल तर ध्यान कर. कॉन्सन्ट्रेशन वाढेल. तरी वाटलं कि व्हिटॅमिन्स ची कमतरता, हार्मोन्स यामुळे होत असेल तर औषधोपचार करावा. पण एका क्षणी वाटल कि आधी ध्यान तर अनुभवून बघू. मग वाटलं तर पुढची ट्रीटमेण्ट ठरवू.

पहिल्यांदा मला सगळं अनावश्यक वाटलं. ति शिबीर कडक शिस्तीचं होतं. ते मला अतिरेकी वाटलं. पण थोडा फायदा झाला. असं वाटलं कि जर मी आधी नीट माहीती घेतली असती तर सगळं स्मूथ झालं असतं. दुसरं शिबीर अगदीच छाछू वाटलं. पण अगदीच वाया गेलं नाही. आधीच रिफ्रेशिंग कोर्स असल्यासारखं झालं.

एव्हढा अनुभव घेतल्यानंतर वाटतं कि एकदा सिलॅबस जाणून घेतला कि आपण घरी सुद्धा करू शकतो. पण हे होत नाही हे पण तितकंच खरं.

>>>>>>>कवितानागेश यान्चीही एक खुसखुशीत भाषेत लेखमालिका आहे यावर, मिपावर
कविताची लेखमालिका वाचली. आवडली.

विजय देशमुख एव्हाना जाऊन आले असतील त्यांचा न जाणे निर्णय झाला असेल.
विपश्यना मी केलेली नाही, इथल्या केंद्राला एकदा भेट देऊन आलोय. जाईन कांअथवा केव्हा जाईन माहीत नाही.
त्यांचे देशभरात १४० व महाराष्ट्रात ३८ केंद्र आहेत.
देश व राज्यानुसार यादी खालील दुव्यावर बघता येईल.
https://www.dhamma.org/en/locations/directory#ma-in

ध्यान धारणा, विपश्यना याकडे मला का जायचेय हे आधी स्पष्ट असले पाहीजे.

सहमत.

तर काही ठिकाणी आडगावी उभारलेल्या हॉटेल्सचा व्यवसाय वाढावा म्हणून ध्यान शिबीरे, योग शिबीरे, विपश्यना वगैरे आयोजित केले जातात

तुम्ही नेमक्या कोणत्या ध्यान शिबीराला गेला होतात हे स्पष्ट नाहीयेय प्रतिसादात. विपश्यनेची शिबीरं विपश्यना केंद्रातच आयोजित केली जातात, आडगावी उभारलेल्या हॉटेल्समधे नाही.

ऑडीयन्स टार्गेट करून त्याप्रमाणे कार्यक्रम अरेंज केले जातात. मी गेलेल्या ठिकाणी कॉन्सर्ट पण होता. खेळ होते. हे कर्मर्शियल होतं. अधून मधून ध्यान धारणा होती. हे म्हणजे ओम शांती ओम पिक्चरसारखं झालं. फाईव्ह स्टार डिश.

ह्यावरून तुम्ही नक्कीच विपश्यनेच्या ध्यानशिबीराला गेला नव्हता असे दिसतेय. विपश्यनेच्या दहा दिवसांच्या शिबीराचे खालील वेळापत्रक जगभरच्या केंद्रांवर एकसारखे असते.

तुम्हाला योग्य गुरू भेटला तर शिबीरात जाणे गरजेचे नाही इथपर्यंत माझे मत झाले आहे.

विपश्यनेच्या शिबीराला गेल्यावर आणि साधनेचे तंत्र जर योग्यप्रकारे कळले तर, गुरूची गरज नसते, 'तूच आहे तुझ्या जीवनचा शिल्पकार' हे कळून येते. बुद्ध म्हणतो, "अप्पो दीप भवं (अपना दीपक स्वयं बनो)". विपश्यनेच्या शिबीराला जाणे गरजेचे असते, त्याची कारणं १० दिवसांचे शिबीर केल्यावर व्यवस्थित कळतात. विपश्यना ध्यानाचा गाभा हा 'मनातील विकारांचे निर्मूलन' हा आहे. त्यासाठी मनाच्या तळाशी खोलवर जावे लागते. खोलवर जाण्यासाठी मनाची प्रचंड एकग्रता लागते त्याला समाधी म्हणतात. त्या एकाग्रतेने मिळणारी मनाच्या तळाची खोली गाठणं फक्त विपश्यना शिबीरात शक्य असते. घरी ती खोली गाठणं शक्य नसते त्यासठी शिबीरात जाणे आवश्यक असते.

दुसरं शिबीर अगदीच छाछू वाटलं

ह्या बद्दल जरा डिटेलमधे सांगाल का? म्हणजे नेमकं काय छाछू होतं? (हे तुम्ही विपश्यना शिबीराला गेला असाल हे गृहीत धरून आहे)

विपश्यनेवरील माझा एक लेख 'विपश्यना' - ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग', इथे बघू शकाल.

- (विपश्यना साधक) सोकाजी

धनश्री, धन्यवाद लिंक साठी. बघेन निवांत झाले की.

सोत्रि , बाप रे ! पोलीस चौकशी सुरू झाली असं वाटलं. Happy

तुम्हाला पोलीस चौकशी सुरू झाली असं वाटलं असेल तर ती माझी लेखनमर्यादा! Sad
पण दुसरं शिबीर अगदीच छाछू का वाटलं हा प्रश्न प्रामाणिक होता/आहे.

विपश्यना ह्या अतिशय प्रभावी आणि परिणामकारक ध्यानप्रणालीबद्दल योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि गैरसमजूतीमुळे काही गोंधळ झाले असतील तर ते दूर व्ह्यावेत हाच प्रामाणिक हेतू आहे.

- (प्रामाणिक साधक) सोकाजी

सोकाजीराव, तुमच्या पोस्ट वरून विपश्यना कुठल्या तरी एका ग्रुपची खासगी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी वाटतेय. ध्यान धारणा हिंदू संस्कृती आणि विपश्यना बौद्ध संस्कृती मधे कुठल्या ग्रंथात असे टाईमटेबल दिले आहे ते सांगाल का?

आर्ट ऑफ लिविंग मधै ध्यान शिकवतात. ते ही अर्ध्या तासात. ट्रिपल एस योगी महेश यांच्या शिबिरात सुद्धा ध्यान शिकवतात. तुम्ही गोएंका गुरूजींच्या मालकीच्या केंद्रांबद्दल सांगितले आहे का?

>> विपश्यना कुठल्या तरी एका ग्रुपची खासगी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी वाटतेय
विपश्यना ही बुद्धाने त्रिपिटकातल्या महसतीपठ्ठाण सुत्तात विषद केली आहे. त्रिपिटक मुक्त आहे. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी असलीच तर ती बुद्धाची आहे आणि त्याने ती खासगी न ठेवता त्याच्या आयुष्याची ४५ वर्ष मुक्तपणे सर्वसामान्यांमधे वाटण्यात घालवली.

>> विपश्यना बौद्ध संस्कृती मधे कुठल्या ग्रंथात असे टाईमटेबल दिले आहे ते सांगाल का?
विपश्यना बौद्ध संस्कृती असं काही अस्तित्वात नाही. मी मागच्या प्रतिसादात दिलेले टाईमटेबल हे १० दिवसांच्या विपश्यना ध्यान केंद्र शिबीराचे टाईमटेबल आहे.

>> तुम्ही गोएंका गुरूजींच्या मालकीच्या केंद्रांबद्दल सांगितले आहे का?
होय, मी १० दिवसांचे जे शिबीर म्हणतो आहे ते गोएंका गुरूजींच्या परंपरेतल्या विपश्यना ध्यान केंद्रातल्या शिबीराचं आहे. विपश्यना ध्यान केंद्रं ही गोएंका गुरूजींच्या मालकीची किंबहुना कोणाच्याच मालकीची नाहीत. ती विपश्यना साधकांनी दिलेल्या दानावर, ट्रस्टींद्वारे चालवली जातात.

>> आर्ट ऑफ लिविंग मधै ध्यान शिकवतात. ते ही अर्ध्या तासात. ट्रिपल एस योगी महेश यांच्या शिबिरात सुद्धा ध्यान शिकवतात.
बरोबर, भारतात असंख्य ध्यानप्रणाली आहेत आणि बरेच आचार्य त्या-त्या ध्यानप्रणाली शिकवतात, बहुतेक आचार्य त्या पैसे घेऊन शिकवतात कारण त्यावर त्यांचा खासगी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी प्रताधिकार असतो.

बुद्धाच्या शिकवणीनुसार मुक्तीचा मार्ग अनमोल आहे आणि तो नैसर्गिक असल्याने सर्वसामान्यांसाठी मुक्तपणे उपलब्ध हवा. गोयंकाजींच्या परंपरेतली विपश्यना ध्यान केंद्रं ह्यानुसार फक्त दानावर चालतात.

- (साधक) सोकाजी

दान कंपल्सरी आहे का?
खासगी शिक्षण संस्थेत देणगी कंपल्सरी नाही. पण सांगितलेल्या दूरच्या बिल्डिंग मधे जाऊन पावती फाडून ती दाखवल्याशिवाय कॉलेजची फीस घेत नाहीत. तसं दान दिले तरच नंबर लागतो का?

कंप्ल्सरी असतं ते 'दान' नसतं Happy

१० दिवसांच शिबीर संपल्यानंतरच, जर आतून इच्छा झाली तरच दान द्यायचं. द्यायची सक्ती नाही.

- (साधक) सोकाजी

सोत्रि
तुम्ही मनाला लावून घेतलेलं दिसतंय. मी सोशल मीडीया टाईम कमी केल्याने अशा प्रस्नोत्तरात अडकणे मला परवडणारे नाही Happy
तुम्ही विचारलेल्या प्रश्नात जे कोट केले आहे ते एकसंध वाचलेत तर तुम्हाला वेगळे प्रश्न विचारण्याची गरजच पडली नसती. तुमचा वेळ वाचला असता.

मी विपश्यना कुठे केली हा प्रश्न इथे अस्थानी आहे. तुम्ही विचारताच आहात तर कार्ला परिसरात सात दिवसांचे शिबीर होते. तिबेटियन लामांच्या मार्गदर्शनात ते पार पडले. हा योग नेहमी नसल्याने मुद्दाम मेन्शन केले नव्हते. विपश्यना. ध्यान यापैकी कोणत्याही संप्रदायाचे मला वावडे नाही. पण इगतपुरीच्या शिबीराबद्दल काही रिव्ह्यूज नकारात्मक वाचनात आले. ( खूप जास्त अत्याचार - आवश्यकता नाही या अर्थाचे. तरीही अनुभव घ्यायला आवडेल. पण सध्या प्रायॉरिटी नाही.

समाधी हे बरोबर आहे. पूर्वी मी डोळ्यासमोर ज्योत आणून ही गोष्ट केली. आता श्वासाद्वारे कसं करावं हे समजलं आहे. विपश्यनेसाठी सौम्य विपश्यना मला पुरे आहे. ज्ञानी होण्यासाठी अवकाश आहे. मन स्थिर होणं एव्हढीच माझी सध्याची गरज आहे. सत्य काय आहे याबद्दल प्रवचनं ऐकून मग पुढचं पुढे.

मन स्थिर होणं एव्हढीच माझी सध्याची गरज आहे. >> मग मायबोलीवर येणे बंद करावे लागेल, आंतरजालावर घालवताय तो वेळ पण कमी करावा लागेल. Light 1

@रानभुली

‘मनाला काही लागू नये’ ह्यासाठीच तर हा ध्यानसाधनेचा सगळा अट्टाहास चालू आहे Happy

>> मी विपश्यना कुठे केली हा प्रश्न इथे अस्थानी आहे
धाग्याचं नाव ‘विपश्यना - काही प्रश्न’ असल्याने विपश्यनेसंबंधी प्रश्न अस्थानी असू नयेत. तसं गृहीत धरून फक्त एकच प्रश्न विचारला होता, “दुसरं शिबीर छाछू का वाटलं?”

पण असो, आता तुम्ही वेळेचा डीसक्लेमर लावल्याने, चर्चा ( प्रश्नावली) आवरती घेतो!

- (मनाला लावून न घेणारा) सोकाजी

विपश्यनेसाठी आता इगतपुरीला जायची गरज नाही. इतरत्र केंद्रे आहेत. मुंबईला गोराईला आहे असे आठवतेय.

नव्या मुंबईत बेलापुरच्या पारसिक हिलवर आहे. आम्हाला घराशेजारीच म्हणुन एक अनुभव घेऊया म्हणत माझ्या मुलीने तिथे १० दिवस राहुन विपश्यना केली होती. तिचा पुर्ण अनुभव आता आठवत नाहीय, १०-१२ वर्षे झाली असावीत. वेटिंग लिस्ट होती पण कुठेही पैसे भरावे लागले नाहीत. तिने नंतर दानही दिले नाही. नंतर काय करायचे हे बहुतेक तिकडे सांगितले होते पण स्वभावानुसार मुलीने दुर्लक्ष केले.

तिने मलाही तु कर म्हणुनसागितले होते त्यावरुन तिचा अनुभव बरा असावा. पण सुट्टी घेऊन १० दिवस केंद्रात घालवणे मला तितकेसे रुचणार नाही असे वाटुन तेव्हा मी दुर्लक्ष केले.

आता हा धागा पाहिल्यावर आठवले. कदाचित आता करेनही.

(मनाला लावून न घेणारा) सोकाजी - मिसळपाववर बरेच जण असे स्वतःचे बॅनर लावून फिरताना दिसतात. महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मायबोलीवर पण झलक दिसल्याने इथे ( आंतरजालीय / आंतर मराठी संस्थळीय) कसली निवडणूक आहे का हा प्रश्न पडलाय.

लोक विपश्यनेला का जातात ?
मला तरी असं वाटतं कि जसे गावात पंधरा दिवस रामायण महाभारत पठण असतं, वेगवेगळ्या कथांचे सप्ताह असतात तसलंच काही तरी म्हणून जाणारेच जास्त असावेत. हे काही तरी मोक्ष देणारं आहे म्हणून जात असतील. स्पिरिच्युअल किंवा दैवी म्हणून जात असतील. किंवा इतरांपेक्षा हाय लेव्हलचा धार्मिक विधी म्हणून जात असतील.

जसे नागा साधू किंवा अघोरी शरीराला पीडा देतात, हठयोग करतात म्हणजे ते भारी असे इतरांना वाटते तसेच अशा शिबीरात कडक बंधने घातली कि ते भारी असे वाटत असावे. साधकांना तरी ध्यान समजतं का याचा सर्व्हे व्हायला हवा. वरच्या काही प्रतिसादातून अमूक तमूक वेळापत्रक पाळलं तरच ध्यानाचा मार्ग प्रशस्त होतो असा अर्थ निघतो. तसे केले नाही तर तुम्ही ध्यानाच्या चुकीच्या मार्गावर आहात असे त्यांना वाटत असावे. हे एक प्रकारचे पंथच आहेत. पुढे यांचा वेगळा धर्म बनू शकेल.

जवळच्या व्यक्ती जाऊन आल्या त्यांच्या इंटेरोगेशन वरून एवढे कळले आहे:

विपश्यना हे ध्यान-मेडीटेशन शिकवण्याचे, एकत्र येऊन करण्याचे ध्यान-सत्संग केंद्र नव्हे.
तिथे एक प्रकारची साधना शिकवतात ज्याचा मार्ग ध्यानातून जातो. कुठलाही धार्मिक विधी शिबीरादरम्यान टाळायला सांगतात कायमस्वरूपी नाही.
कुतूहल म्हणुन किंवा "बोलावणे आले/बोलावणे येईल तेव्हा" वगैरे समजुतीतून जायचे असे करण्याची ही गोष्ट नव्हे. ध्यानापासुन सुरवात आणि मग पूर्ण शरीरात एक एक करत काय जाणीव होते असे निरीक्षण करत ध्यान करणे अशी सुरवात तिथे होते. त्यातील एकसंधता तुटायला नको म्हणुन दिवसातून शक्य तितक्या वेळा असे ध्यान करत रहाणे.

यातून स्वतःला काय अपेक्षित आहे, काय नाही हे पडताळून स्वतःचे स्वतः ठरवून, आणि परत आल्यावर ती ध्यानसाधना पुढे सुरू ठेवण्याची (दिवसातुन दोन की चार तास किमान) तयारी असेल तर शिबीराला जावे असे माझे मत बनले आहे.

दिवसभरातील मानसिक शीण घालवणे अथवा एकंदरीत मानसिक तणाव कमी करणे, यासाठी प्राणायाम-ध्यान वगैरे शिकणे ( आणि त्या स्वतःला शोधण्याचा खोलात न जाणे) वगैरे आपली धकाधकीच्या जिवनात गरज यासाठी अर्थात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Submitted by मानव पृथ्वीकर on 8 January, 2026 - 12:13 >>> मानव , तुमचा प्रतिसाद खूपदा खूप उशीरा येतो. Happy

या प्रतिसादातील शेवटचा परिच्छेदासाठी +१०० अनुमोदन, आणि पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, हे खूपदा विसरायला होतं. कारण फक्त विपश्यनेच्याच संदर्भात नाही तर कोणतेही साधन वापरण्याचा निर्णय घेताना सर्वात आधी विचारात घ्यावं असं मार्गदर्शक तत्व दडलेलं आहे त्यात.

@मानव पृथ्वीकर.

शेवटचे २ परिच्छेद एकदम चपखल! १००% सहमत!!

- (खोलात जाण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

ज्यांचा धागा आहे ते कुठे आहेत ? सध्या कुठल्या वेबसाईटवर शिफ्ट झालेत किंवा इथे सध्या कुठल्या नावाने आहेत ?
नसतील तर विपश्यना माबोशत्रू आहे. विपश्यनेचा असा प्रसार झाला तर आयडी न ऊडवताही लोक गायब होऊ लागतील.

खूप महिन्यांनी इथे आले आणि वरतीच हा धागा दिसला. तो वाचून मनातल्या मनात काही उत्तरे दिली गेली. पण ती इथे न लिहावी, आपला अनुभव आपल्यापाशी ठेवावा वादामध्ये न शिरावे हा विचारही मनात आला. विपश्यना कोर्स करण्यापूर्वीची मी असते तर कुठल्याही विषयावरचे मनात आलेले विचार धाडकन लिहून मोकळी झाली असते.

मग विचार केला की हाच धागा समोर येण्याचे कारण कदाचित हे असेल की मी याबद्दल लिहावे

2007 मध्ये विपश्यना कोर्स काय असतो हे माहित नसतानाही दोन वेळा application टाकले होते आणि ते reject झाले होते. नंतर 2010 मध्ये दोन वेळा, वेगळ्या परंपरेमधले ध्यान आणि सायलेन्स कॅम्प केले होते 3 3 दिवसांचे. त्यानंतर 2023 मध्ये अचानक एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर 10 दिवसाच्या विपश्यना camp ला जायचे ठरवले. मधल्या काळात जेव्हा इच्छा होईल त्याप्रमाणे पाच दहा मिनिटांचे ध्यान करणे चालू होते..

विपश्यना camp बद्दल अर्धवट माहिती मी सुद्धा ऐकली होती. सकाळी चार वाजता उठावे लागते, रात्री दहा वाजता झोपायला मिळते, सहा तासच झोप कशी पुरणार?? साडेसहा वाजता नाश्ता मिळतो अकरा वाजता जेवण मिळते. . त्यानंतर ध्याकाळी पाच वाजता नाश्ता मिळतो. त्यानंतर काहीच नाही... मला तर दर साडेतीन तासाने भूक लागते.. कसे जमणार मला..
पण एक नक्की की मला कोणाशीच बोलायचे नाही, अगदी खुणेने सुद्धा नाही हे कसे जमणार हे tension नव्हतेच कारण मुळात मी त्या शांततेसाठीच मौनासाठीच जात होते. आणि दहा दिवस घरच्यांपासून लांब राहायचे एकट्याने, काही संपर्क नाही, मोबाईल सुद्धा नाही... यासाठीही मी मनाने तयार होते

जमून गेले. लवकर झोपणे, कमी झोपणे, कमी वेळेला खाणे, संध्याकाळी पाच वाजता नाश्ता केल्यानंतर सकाळ पर्यंत भूक न लागणे. पहिले दोन दिवस शरीराला सवय नसल्याने त्रास झाला. पण त्यानंतर लक्षात आले की आपण जेव्हा या आर्य मौनात आहोत, म्हणजे बाहेरच्या जगाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संवाद नाहीच तेव्हा खाणे सुद्धा कमी होऊन गेले आहे. (हाच अनुभव 2010 च्या सायलेन्स कॅम्प मध्ये होता . तिथे चार वेळेला खायला मिळत असे पण ते कच्चे n शिजवलेले असे. इथे शिजवलेले सात्त्विक जेवण पोळी भाजी भात वरण असे जेवण)
ज्यांना डायबिटीस आहे किंवा इतर काही त्रास आहेत त्यांनी डॉक्टरचे प्रेस्क्रीप्शन दाखवल्यावर त्यांच्यासाठी रात्रीचे जेवण अरेंज केले जाते.

इथे एक गोष्ट नक्की नमूद करेन की काही दिवस आपल्याला हा अनुभव घ्यायचा आहे यांच्या सांगितल्यानुसार राहायचं आहे खायचे आहे हे एकदा मनाला समजावले की मग अरे बापरे किती हा अत्याचार असे वाटत नाही. कारण इथे जायचं निर्णय आपला आपण घेतलेला असतो आपल्या गळ्याची सुरात धरू किंवा डोक्यावर बंदूक ठेवून आपल्याला तिथे कोणी पाठवलेले नसते.

आता येते विपश्यना साधनेच्या मूळ मुद्द्यावर. दहा मधले पहिले तीन दिवस तिथे आपल्याला साधनेची आनापान प्रक्रिया शिकवतात. याबद्दलचे अनेक व्हिडिओ युट्युब वर अवेलेबल आहेत. चौथ्या दिवसापासून विपश्यना ही साधना शिकवतात. पश्य म्हणजे बघणे. काय बघायचे कसे बघायचे ते तिथे शिकवतात. त्याबद्दल मी सांगणे योग्य नाही. कारण मी ते शिकवणारी अधिकृत शिक्षिका नाही आणि हे प्रयोग कोणीही आपापल्या मर्जीने आपापल्या वेळेनुसार स्वतःच्याच गायडन्स खाली करू नयेत. विपश्यना साधना करताना जे इतर अनुभव येतात त्यासाठी समोर अधिकृत शिक्षकच हवा. कदाचित त्याचमुळे विपश्यना या साधनेचे कुठलेही व्हिडिओज किंवा इतर ठिकाणी अजून तरी माझ्या पाहण्यात आलेले नाहीत.

आनापान साधना हा साधनेचा बेसिक प्रकार आहे. आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या सोबत एकच गोष्ट कायम असते ती म्हणजे आपल्या श्वास. त्यात आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण ध्यान करायचे. हळूहळू प्रयत्न आणि आणि प्रॅक्टिस ने मनात कमीत कमी विचार येणे आणि सर्व लक्ष आपल्या श्वासा वरच लागणे शक्य होते. आणि मग तो दीड तास कसा उलटून जातो कळतही नाही. घरी आल्यावर मात्र तो दीड तास आपण खूप मिस करतो. कारण घरी आल्यावर असा दीड दीड तास ध्यान लावून साधना करण्याची वेळेची श्रीमंती आपल्याकडे नसते. (ज्यांच्याकडे ते आहे त्यांना सादर प्रणाम)

माझ्या माहितीप्रमाणे दहा दिवसाचा पहिला काम केल्यानंतर जसजसं तुम्ही अधिक वेळा कॅम्पला जाता तिथे तुम्हाला साधनेच्या अधिक काही प्रक्रिया शिकवल्या जातात.

नाम जप करणे, ओमकार साधना करणे एखाद्या दिव्याकडे बघत राहून त्राटक साधना करणे या साधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेतच आणि त्यांचे त्यांचे नक्कीच काही ना काही फायदे आहेत. पण म्हणून साधनेचे दोन प्रकार कम्पेअर करणे आणि माझी साधना पद्धती तुझ्या साधना पद्धतीपेक्षा चांगली आहे किंवा मीही करतो तर मला त्याची काय गरज आहे असे म्हणणे हे थोडे सफरचंद आणि संत्र याच्यात कम्पॅरिझन करून जास्त चांगले काय जास्त हेल्दी काय असा विचार करण्यासारखे आहे.

या दहा दिवसाच्या कॅम्पमध्ये तुम्हाला इतर कुठल्याही पद्धतीचे जप करणे किंवा कुठल्याही पद्धतीची उपासना करणे यास मनाई केली जाते. ती का केली जाते आणि ती कशी बरोबर आहे याचे उत्तर तुम्हाला या कॅम्पमध्ये मिळते. मलाही येथे आधी असे वाटले होते की याची कारणे आधी सांगायला हवीत. असा कसा फोर्स केला जातो.
पण जेव्हा कॅम्प मध्ये गेले आणि टप्प्याटप्प्याने गोष्टी शिकत गेले टप्प्याटप्प्याने माहिती मिळवत गेले तेव्हा त्यांची शिकवण्याची पद्धती आणि त्यांची हे करू नका ते करू नका सांगायची पद्धती त्या दहा दिवसांपूर्ती योग्य आहे हे पटले. ते असे कधीच सांगत नाहीत की तुम्ही हे सगळे कायमचे सोडा. त्यांचे एवढेच म्हणणे असते की या दहा दिवसापूर्वी तुम्ही एक्सक्लू ठेवली फक्त या पद्धतीच्या साधनेचा अनुभव घ्या. पुन्हा एकदा या सगळ्यांची माहिती त्यांच्या फॉर्मवर लिहिलेली असते आणि तुम्हाला ते मान्य असेल तरच तुम्हाला तिथे जायचे आहे तिथली कोणतीही व्यक्ती तुमच्यावर जबरदस्ती करत नाही की तुम्हाला आलेच पाहिजे.....

आता इतर कामे बोलवत आहेत त्यामुळे याबद्दल इथेच थांबते. अजून थोडे लिहायचे आहे ते लिहीनच लवकरच...

Pages