प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by हेमंतकुमार on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतकार नीरज यांना एका मुलाखतीत असा प्रश्न विचारला गेला की कविता आणि चित्रपट गीत या दोन्हीमध्ये काय लिहिणे अधिक अवघड आहे? त्यावर नीरजनी उत्तर दिले की चित्रपट गीत आणि पुढे त्यांनी त्याची तब्बल नऊ कारणे सांगितली.

गीतकाराला गाणे लिहिताना मुख्यतः खालील गोष्टींचा विचार करावा लागतो :

  • गाण्याची चित्रपटातील पार्श्वभूमी
  • कोणत्या पात्रावर ते चित्रित केले आहे त्यानुसार गीताची भाषा
  • गीताचा मीटर सांभाळणे
  • संगीतकाराच्या आवडीचा विचार
  • संबंधित अभिनेत्याचे मत आणि सर्वात महत्त्वाचे, दिग्दर्शकाचे मत
  • आणि
  • वरील सर्वांचा विचार करता करता आपली स्वतःची शैली देखील गीतातून उमटली पाहिजे याचे अवधान असणे.

आम्ही मुंबईकर असल्याने शाल अंगावर पांघरून फिरू शकत नाही. त्याचा विचार करून आमच्यासारख्या पुरुषांना पोशाखाचा प्रकार भेट देण्यात यावा >>>>
प्रशांत दामले यांना सदरा भेट दिला हे संयोजकांचे मोठेपण आहे. अन्य प्रतिष्ठीत पुरस्कार किंवा तत्सम सोहळ्यात मोने असं बोलले तरी त्यांना मनावर घेतील का ? औचित्यभंगाची चर्चा रंगली नसती का ?

अनेक टीव्ही मालिकांचे प्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांनी सांगितलेला हा किस्सा.
ते जेव्हा नव्याने या क्षेत्रात आले तेव्हा त्यांनी एका वरिष्ठ लेखकांना विचारले की सासु-सुनेच्या मालिकेत सून आदर्श तर सासू नेहमी कजाग असते. त्यानुसार अनेक सुना मालिकेतल्या सुनेमध्ये स्वतःला बघतात आणि त्यांना ते आवडते. परंतु सासवा सुद्धा अशा मालिका आवडीने का पाहतात? त्या तर खलनायिका म्हणून रंगवलेल्या असतात ना?

त्यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिले ते असे,
"मालिका बघणारी सासू मालिकेतील आदर्श सुनेच्याच जागीच स्वतःला पाहते आणि मालिकेतल्या सासूच्या जागी स्वतःची सासू आहे असे समजते !!"

अशा तऱ्हेने मालिकेला प्रत्यक्षातल्या सासू आणि सुना असा दोन्ही प्रेक्षक वर्ग मिळतो. . . म्हणून अशा मालिका जोरात चालतात.

लाटकर पुढे म्हणाले की भारतीय टीव्ही-प्रेक्षकांचा ‘डीएनए’ दशकानुदशके बदललेला नाही. त्यामुळे ज्या मालिकांना समाजमाध्यमांमधून शिव्या पडतात त्या मालिकांचे टीव्हीवर हजाराच्या वर भाग होतात; या उलट ज्या मालिकांचे कलात्मक म्हणून कौतुक होते आणि त्यांना पुरस्कार मिळतात, त्या १५०- २०० भागांमध्येच गुंडाळाव्या लागतात.

योगी धन्यवाद !
तो उडलेला संवाद लिहिला आहे

“ . . . पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर”
वरील कवितेची ओळ कोणत्या कवितेची आहे हे बहुतेकांनी ओळखले असेलच.
अर्थात, बालकवींची ‘औदुंबर’ !

मध्यंतरी एका काव्यवाचन कार्यक्रमात संबंधिताने या कवितेबद्दल काही माहिती दिली ती अशी :
1. कवितेच्या वरील ओळीतील ‘असला’ या शब्दावर आजही चर्चा होतात आणि अनेक अभ्यासक आपापल्या परीने त्या शब्दाचा वेगवेगळा अर्थ काढत असतात.
2. या कवितेवर आतापर्यंत मराठीत 27 जणांनी पीएचडी केलेली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या खालील कलाकारांच्या कारकिर्दीची सुरुवात बस कंडक्टरच्या नोकरीने झालेली आहे :
जॉनी वॉकर : बस स्टॉपचे नाव पुकारताना ते विनोदी पद्धतीने प्रवाशांना हसवत.

रजनीकांत : बंगलोर बस सेवा. त्यापूर्वी हमाली सुद्धा केली.

सुनील दत्त (BEST चा तंत्र विभाग) महिना शंभर रुपये पगार.

गीतकार हसरत जयपुरी : 1940मध्ये महिना अकरा रुपये पगार.

* १,२०० खाटांचे, पूर्णपणे मोफत रुग्णालय उभारण्यासाठी निधी
>>> वरील बातमीची सत्यता शंकास्पद असल्याने प्रतिसाद संपादित.
. . .
सेरेनाने केलेल्या अन्य सामाजिक उपक्रमाबद्दल ( उदा. युनिसेफच्या माध्यमातून) आदर आहे.
https://www.unicef.org/goodwill-ambassadors/serena-williams?utm_source=c...

लोकांसाठी १,२०० खाटांचे, पूर्णपणे मोफत रुग्णालय >> fake news असण्याची दाट शक्यता वाटत आहे. ११४ दिवस तंबूत राहिली असती तर एव्हाना बातमी कधीच पसरली असती.

करंडक वितळुन????????
फेक-चुडामणी वाटतेय.>>>>
बातमी बनवणारे अधिक प्रतिभावंत वाटतायंत...."इंन्शाल्ला, लडको ने अच्छा खेला!!" Wink
Add-a-subheading-22.png

कुमार सर, क्षमा असावी, तुमच्या धाग्यावर ही बातमी दिली.
बातमी वाचून शंका येण्याचं काहीही कारण वाटलं नाही. सॉरी.

हा भारी किस्सा आहे विन्स्टन चर्चिलचा.
सन 1896मध्ये ते भारतात बंगलोरला एक लष्करी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हा ते मद्यपानासाठी बंगलोर क्लबमध्ये जात असत. एकदा त्यांनी तिथे जे मद्यपान केले त्याची 13 रुपये थकबाकी त्यांच्या नावावर अजूनही आहे, जी कधीच फेडली गेली नाही ! अशा सर्व थकबाकीदारांची यादी येथील क्लबमध्ये लावलेली आहे

http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/8418330.stm#:~:text=BBC%20News%20%...'s%20unpaid%20India,Special%20Reports

एखाद्या नाटकाचा (किंवा अन्य कलेचा) रंगमंचावरील प्रयोग संपून पडदा पडल्यानंतर जर प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट चालूच ठेवला तर ती नाटकाला मिळालेली दाद समजून सर्व कलाकार पडद्यामागून पुन्हा एकदा रंगमंचावर येतात आणि प्रेक्षकांना अभिवादन करतात. या क्रियेसाठी 'Curtain Call' हा वैशिष्ट्यपूर्ण इंग्लिश शब्द आहे.

अलीकडे नाट्यदिग्दर्शकांमध्ये, कलाकारांनी या पद्धतीचे अभिवादन करावे किंवा नाही याबाबत मतभिन्नता आढळते. विशेषता जर नाटकाचा शेवट गंभीर किंवा विशेष नाट्यपूर्ण असेल तर प्रेक्षकांना त्या प्रभावाखालीच राहू द्यावे असे काही दिग्दर्शकांचे मत आहे.

नुकत्याच वाचलेल्या इथल्या नाट्यपरीक्षण लेखाचा शेवट असा केलेला आहे :
“विशेष म्हणजे प्रयोग संपल्यावर कर्टन कॉल न घेतल्याबद्दल अभिजीतला धन्यवाद. त्यामुळे प्रयोगाचा प्रभाव प्रेक्षकांना स्वत:बरोबर नेता येतो”.
. .
काही अभिवादनांमध्ये नाट्य कलाकारांच्या जोडीने पडद्यामागील तंत्रज्ञांना देखील स्टेजवर बोलावले जाते. याबाबत देखील दिग्दर्शकांमध्ये मतभेद आहेत.

Submitted by कुमार१ on 24 December, 2025 - 07:42>> वेगळी नवीन माहिती , इंटरनेट वर अधिक माहिती घेतली असता Idiomatic Use मध्ये खालील प्रकारे हा शब्द वापरता येतो अशी देखील माहिती मिळाली.

It's about the final acknowledgment and applause at the conclusion of a significant performance, event, or phase, whether literal or figurative, representing honor, closure, or the end of a public role.

Examples:
"After scoring the winning goal, the star player took a curtain call, waving to the cheering fans".

"The legendary CEO's retirement speech felt like her final curtain call, marking the end of an industrial age".

"She took her curtain call with humility, thanking everyone involved in the project".

फा वि +१
मी पण ते एआयवर वाचले होते Happy
. .
नाटकाच्या बाबतीत काही दिग्दर्शकांच्या मते तो कॉल म्हणजे एक अर्थहीन सोपस्कार होऊन बसलेला आहे.
मध्यंतरी मी रंगमंदिरात दोन नाटके पाहिली तेव्हा वरचे म्हणणे काहीसे पटले, कारण तेव्हा काही टाळ्यांचा कडकडाट वगैरे झालेला नसतानाही पडदा न पाडताच कलाकार रंगमंचावर आले होते.
अलीकडे असे रंगमंचावर येणे वेगळ्या करण्यासाठी त्यांना गरजेचे वाटत असावे. आता नाट्यगृहांची गॅलरी तर रिकामीच असते आणि प्रेक्षागृहाचा खालचा भाग (नाटक चांगले असले असेल तर) दोन तृतीयांश भरतो; अपवाद सोडून.

वरील दोन्ही वेळी त्या कलाकारांनी त्यांच्या पुढच्या प्रयोगाची जाहिरात केली आणि,
"आपापल्या मित्र-मैत्रिणींना हे नाटक बघायला सांगा. नाटक ही कला टिकवण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करूया"
असे आवाहन त्यांना करावे लागलेले होते.

विशेष म्हणजे प्रयोग संपल्यावर कर्टन कॉल न घेतल्याबद्दल अभिजीतला धन्यवाद. त्यामुळे प्रयोगाचा प्रभाव प्रेक्षकांना स्वत:बरोबर नेता येतो”.
हे खरंच पटतंय,, असं गंभीर नाटकांबाबत खुप इम्पॅक्ट करणारं ठरेल.
सिनेमा म्हणाल तर असं खुपवेळा होतं,शेवट निदान एक दिवस तरी मनात रेंगाळत राहतो.
खुप छान माहिती कुमार १ Happy

भक्ती, धन्यवाद.

नाटकाच्या बाबतीत एक सुंदर वाक्य वाचले होते ते असे :
“चांगले नाटक कोणते, तर रंगमंचावरचे नाटक संपले, की जे प्रेक्षकाच्या मनाच्या रंगमंचावर दुसरे नाटक सुरू करून देते ते”.

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘जनस्थान’ हा साहित्यिकांसाठी आणि ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार हा अन्य सहा क्षेत्रातील नामवंतांना दिला जातो. हे दोन्ही पुरस्कार देताना एक अट घातलेली आहे. ज्यांना तो पुरस्कार देऊ केलेला आहे त्यांनी तो प्रतिष्ठानने ठरवलेल्या दिवशीच नाशिक येथे येऊन घ्यावा लागतो. त्यांना तसे येणे शक्य नसल्यास पुरस्कार दिला जात नाही.

ही अट ठेवण्यामागे हेतू असा आहे की विविध क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त उत्तुंग व्यक्ती नाशिककरांना प्रत्यक्ष बघायला मिळाव्यात.

(विनायक रानडे यांच्या मुलाखतीतून https://www.youtube.com/watch?v=twjjhac7BWA)

वक्ता/ लेखकाला मार्गदर्शक ठरेल अशी एक सॉक्रेटिसची बोधकथा आहे.

अनेक लोक सॉक्रेटिसला भेटायला यायचे आणि त्यांना त्याला खूप काही सांगायची इच्छा असायची. मग सॉक्रेटिस म्हणायचा,
“तुम्ही जे मला सांगणार आहात ते खरं आहे का ?”
हे ऐकल्यावर त्यातली निम्मी माणसं निघून जायची.
उरलेल्या निम्म्यांना तो विचारायचा,
“तुम्ही जे सांगणार आहात त्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का?”
यावर पुन्हा एकदा निम्मी माणसं निघून जायची.

आता जी थोडीशी माणसे उरलेली असायची त्यांना सॉक्रेटिस विचारायचा,
“तुम्ही जे मला सांगणार आहात त्यात तुमचा किंवा माझा काही फायदा आहे का?”
त्यावर तीही गप्प व्हायची.

तात्पर्य : लेखकाने काही लिहिताना खरं लिहावं, त्याचा पुरावा त्याच्याजवळ असावा आणि त्या लेखनाचा लाभ वाचक व लेखक या दोघांनाही व्हावा.

तात्पर्य : लेखकाने काही लिहिताना खरं लिहावं, त्याचा पुरावा त्याच्याजवळ असावा आणि त्या लेखनाचा लाभ वाचक व लेखक या दोघांनाही व्हावा.>>>>अप्रतिम.. Happy

तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादाच्या "वक्ता/ लेखकाला मार्गदर्शक ठरेल अशी एक सॉक्रेटिसची बोधकथा आहे." या वाक्यात 'सॉक्रेटिसची' हा शब्द ठळक असण्या ऐवजी 'बोधकथा' हा शब्द ठळक असायला हवा होता. IYKYK.***

* 'बोधकथा' हा शब्द ठळक >>> अच्छा ! Happy
. .
लेखनाच्या संदर्भात प्रसिद्ध अमेरिकी लेखक जॉन स्टाईनबेक यांचे ‘उमेदवार लेखकांना जाहीर पत्र’ हा उतारा प्रसिद्ध असून त्याचा मराठी अनुवाद रवींद्र पिंगेंनी केलेला आहे. त्याचे सुरेख अभिवाचन इथे पाहता व ऐकता येईल :
https://www.youtube.com/watch?v=DAjiNMc5oF4
त्या पत्राचा आशय त्यातील शेवटच्या वाक्यातच येतो :
लेखन करणं सोपं नाही”.

स्वतःच्या लेखन अनुभवाविषयी जॉन म्हणतात,
“ इतकी वर्षे कथा लिहिल्यानंतर सुद्धा मला आजही नव्या कथेचा आरंभ लिहिताना दरदरून घाम फुटतो !”

गेल्या पंधरा-वीस वर्षांत जास्त खपणाऱ्या मराठी पुस्तकांमध्ये उपयुक्त पुस्तकांचा वाटा मोठा आहे. त्या तुलनेत काल्पनिक साहित्य आता काहीसे मागे पडले आहे.
यावरून एक लेखक एका प्रकाशकाला गमतीने म्हणाले,
"तुमचा सारा धंदा स्वयंपाकघर व शयनगृहावर चालला आहे. तुमची अन्नपूर्णा आणि पाकसिद्धीची पुस्तके धडाधड खपताहेत आणि त्याचबरोबर 'निरामय कामजीवन'सारखी पुस्तकेही चांगला पैसा कमावून देताहेत !"

( अशोक जैन यांच्या 'अत्तराचे थेंब' पुस्तकातून साभार !)

Pages