
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
* सांद्र >>> मस्त आहे शब्द !
* सांद्र >>> मस्त आहे शब्द ! आठवला.
मऊ; कोमल; अनुकूल
हे त्याचे दाते कोशातले अर्थ.
. . .
* अंगावर दुसरा काटा यायचा >>>
. . .
* हाय फ्रिक्वेन्सी वगळल्यामुळे तो मंदपणा अधिक; चहूकडून >>>छान माहिती !
अभिनेत्री रेणुका शहाणे या
अभिनेत्री रेणुका शहाणे या हिंदी भाषक अभिनेता आशुतोष राणांची पत्नी आहेत. त्यांची एक मनमोकळी मुलाखत इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=DgE9b8H_Pp0
त्यात त्यांना विचारण्यात आले की तुम्ही दोघेही भिन्नप्रांतीय असल्याने तुम्ही एकमेकांकडून कोणता गुण घेतलाय ? त्यावर त्यांनी छान उत्तर दिलय. रेणुका आशुतोष यांच्या कुटुंबाकडून दिलखुलास कौतुक कसे करावे हे शिकल्यात. एकूणच मराठी समाजात याबाबत कंजुषी असते. त्यांचे सासर हे अतिशय रसाळ असल्याचे त्या म्हणतात.
या उलट आशुतोष यांनी रेणुकांकडून शिस्त हा गुण घेतला आहे. त्यामध्ये चित्रीकरणासाठी ठरलेल्या वेळेवर पोचणे ही महत्त्वाची बाब ते पाळू लागले.
चतुरस्त्र अभिनेत्री असलेल्या रेणुकांनी अनेक चित्र/दृश्य माध्यमांत काम केलेले असले तरी रंगमंचावरील व्यावसायिक नाटकात काम केलेले नाही हे वैशिष्ट्य. . याला अपवाद एकच - शांतता ! कोर्ट चालू आहे या व्हिडिओ चित्रीकरण झालेल्या नाटकात त्यांची प्रमुख भूमिका आहे.
>>>>सासर हे अतिशय रसाळ
>>>>सासर हे अतिशय रसाळ
मी फक्त आंब्यास हे विशेषण ऐकले होते.
बरोबर !
बरोबर !
तसं रसाळ हे एक मराठी आडनाव पण आहे . . .
राजकारणी आणि प्रतिभावंत ही
राजकारणी आणि प्रतिभावंत ही दोन्ही विशेषणे ज्यांना लागू पडतील अशी माणसे खूप कमी असतात. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे त्यांच्यापैकी एक.
1996 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मधु दंडवतेंचा पराभव केला होता. परंतु ही गोष्ट त्यांना मनोमन लागली होती. त्या संदर्भात त्यांनी आपले मनोगत इथल्या मुलाखतीत विस्तृतपणे व्यक्त केले आहे :
https://www.aksharnama.com/client/article_detail/7463
त्यातील हे निवडक :
“. . . जर त्या निवडणुकीमध्ये माझ्याऐवजी नाना (दंडवते) निवडून आले असते, तर देशाचे पंतप्रधान देवेगौडा नाही, तर मधू दंडवते झाले असते. पण त्यांचा पराभव ही माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”
वाचनीय मुलाखत.
मधु दंडवते उत्तम पंतप्रधान
मधु दंडवते उत्तम पंतप्रधान झाले असते, रिस्पेक्ट. त्यावेळी आधी गुजराल मग देवेगौडा झाले का, काहीतरी आठवतंय. अर्थात मधु दंडवते यांना पंतप्रधान करुन राज्यसभेवरही निवडून आणता आलं असतं.
मला मधु दंडवते, प्रमिला दंडवते आणि मधु लिमये यांच्याबद्द्ल प्रचंड आदर आहे, आमच्या घरात यांच्याबद्द्ल पुर्ण आदर होता, बाबा समाजवादी नव्हते तरीही. खूप साधी आणि गुणी माणसं ही. कोकणाने खूपदा साथ दिली मात्र दंडवते यांना.
ते तिसरे डिटेक्टिव्ह कॅरॅक्टर
ते तिसरे डिटेक्टिव्ह कॅरॅक्टर म्हणजे प्रोफेसर शोन्कू
* प्रोफेसर शोन्कू >>> वा !
* प्रोफेसर शोन्कू >>> वा ! धन्स !
‘आवाजाचे जादूगार’ डबिंग
‘आवाजाचे जादूगार’ डबिंग कलाकार किशोर पूरकर
त्यांचा या तंत्राचा गाढा अभ्यास असून त्यांनी अनेक मराठी व हिंदी कलाकारांना आपला ‘आवाज’ दिलेला आहे. पंतप्रधान मोदींच्या मूळ भाषणाला दिलेला मराठी आवाज देखील त्यांचाच आहे. आतापर्यंत पूरकरांनी मोदींच्या शंभर भाषणांना असा आवाज दिलेला आहे. या कामासाठी अनेक जणांतून त्यांची निवड कशी झाली याचे त्यांनी स्पष्टीकरण इथे दिलेले आहे :
https://www.youtube.com/watch?v=GZ90TTbGwHA
त्यात ते म्हणतात,
“या चाचणीसाठी अनेक जण आलेले होते. चाचणी दरम्यान बहुतेकांनी मूळ आवाजाच्या जवळ जाणारा आवाज काढून दाखवला परंतु मी तसे केले नाही. मी मूळ भाषणाचा गाभा लक्षात घेतला आणि त्यातून व्यक्त होणारी अंतरीची कळकळ माझ्या आवाजातून व्यक्त केली. बहुदा त्यामुळे या प्रतिष्ठेच्या कामासाठी माझी निवड झाली असावी”.
@ कुमार सर, तुम्ही हॉटेल च्या
@ कुमार सर, तुम्ही हॉटेल च्या पार्श्वसंगीताचा जो प्रतिसाद दिला आहे, तो मलाही चांगला आठवतोय. तो किस्सा प्रभाकर पेठकर यांनी लिहिलेला स्मरतो आहे. ते लिहित नाही आताशा काही.
*प्रभाकर पेठकर
*प्रभाकर पेठकर
>>> होय !
आता आठवले. धन्यवाद
बऱ्याच दिवसांनी आता
बऱ्याच दिवसांनी आता डॉक्टरांबद्दल काही . . .
*
डॉक्टर व नर्स यांचे प्रेमसंबंध हा वैद्यकीय विश्वात बऱ्यापैकी चघळला जाणारा विषय. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील एका रुग्णालयात घडलेली अशी प्रेमकहाणी मोठी रोचक आहे. तिथल्या वैद्यकीय नोंदणीनुसार डॉक्टर व नर्स यांच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर झालेले हे पहिले उदाहरण आहे.
डॉक्टर William Halsted हे एका रुग्णालयातील नामांकित सर्जन तर Caroline Hampton या त्यांच्या मदतनीस नर्स. कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाच्या शरीराला जंतुनाशक लावण्याचे काम नर्सेस करीत. त्यासाठी त्या हातात कापसाचा बोळा घेऊन ते द्रावण लावत. परंतु Caroline यांच्या बाबतीत एक विचित्र प्रकार घडला. या जंतुनाशकाने त्यांना भयंकर ऍलर्जी आणि पुढे त्वचारोग झाला. तेव्हा दुसरे जंतुनाशक काही उपलब्ध नव्हते. मग त्या डॉक्टरांनी यावर खोलवर विचार केला आणि ‘गुडइयर’ कंपनीला अशी विनंती केली की हातांच्या संरक्षणासाठी काहीतरी चांगले आवरण त्यांनी तयार करावे.

त्यातूनच त्या कंपनीने शस्त्रक्रियेचा पहिला हातमोजा तयार केला. तो फताडा आणि जाडाभरडा होता.
पुढे त्यात अधिक संशोधन झाले आणि तलम मोजे उपलब्ध झाले. शस्त्रक्रिया करताना ते वापरणे जगन्मान्य झाले. तसेच निर्जंतुक केलेले मोजे वापरणे हे रुग्णहिताचे देखील ठरले.
आणि. . .
या मूलभूत संशोधनास कारणीभूत ठरलेल्या या डॉक्टर व नर्सचे यथावकाश प्रेमलग्न देखील झाले !
(चित्रसौजन्य : Johns Hopkins Medical Institutions)
छान किस्से. वाचतोय.
छान किस्से. वाचतोय.
<शस्त्रक्रियेचा पहिला हातमोजा> भारी आहे.
तेव्हा कोणते जंतुनाशक वापरायचे?
नि.३,
नि.३,
तेव्हा mercuric chloride (sulema) हे जंतुनाशक वापरत होते. त्या काळी सिफिलिस या गुप्तरोगावर देखील त्याचा उपयोग केला जाई.
त्याची घातकता बघता कालांतराने ते वैद्यकीय उपयोगासाठी कालबाह्य ठरले.
रोचक माहिती. हे कोणत्या
रोचक माहिती. हे कोणत्या काळात झालं याबद्दल शोधताना Caroline Hampton बद्दलची रोचक माहिती मिळाली. त्यांचे वडील व काका हे अमेरिकेतले बडे लोक होते (अमेरिकन सिव्हिल वॉरच्या काळातली मंडळी). नातलगांच्या विरोधात जाऊन त्या नर्सिंग शिकल्या
एखाद्या नाटकाचा लेखक व त्याचा
एखाद्या नाटकाचा लेखक व त्याचा दिग्दर्शक यांच्यात मतभिन्नता कशी असते याचे दोन इरसाल नमुने :
(अमोल पालेकर यांच्या “ऐवज” पुस्तकातून)
१.
‘पार्टी’ या नाटकात बदल केल्याने एलकुंचवार म्हणतात, ‘असे बदल करायचे तर दिग्दर्शकाने स्वतःच नाटक लिहावे’. त्यावर दिग्दर्शक ( पालेकर)त्यांना म्हणतात,
‘कंसातल्या रंगसूचनेप्रमाणे नाटक बसवावे, असे अपेक्षित असेल, तर लेखकाने स्वतःच ते दिग्दर्शित करावे.’
. .
२.
बादल सरकार पालेकरना संहितेत बदल करण्याला मान्यता देतात, पण त्याच वेळी म्हणतात,
‘दिग्दर्शक म्हणून करायचे ते तू कर, पण मला ते आवडले नाही, तर ‘माझ्या नाटकाचा तू खून केलास’, असे मत जाहीरपणे व्यक्त करायचा अधिकार मात्र मी माझ्याकडे ठेवीन.’
https://www.aksharnama.com/client/article_detail/7473
'झेंडूची फुले’ची शताब्दी !
'झेंडूची फुले’ची शताब्दी !
रविकिरण मंडळा'तील कवींच्या फारसी आणि संस्कृतप्रचुर शैलीची आणि कृत्रिम कल्पनारम्यतेची चेष्टामस्करी करण्याकरिता आचार्य अत्र्यांनी 'केशवकुमार' या टोपण नावाने धडाधड विडंबने लिहिली.
त्यातून पुढे १९२५ साली 'झेंडूची फुले' हा अत्र्यांचा विडंबन काव्यांचा संग्रह प्रसिद्ध झाला, त्याला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
अभिनेत्री गिरीजा ओक यांनी
अभिनेत्री गिरीजा ओक यांनी मराठी वगळता गुजराती रंगभूमीवर देखील भरपूर काम केलेले आहे. त्यांना गुजराती भाषा उत्तम अवगत आहे. एखादी भाषा बोलण्यात आपण पारंगत कधी झालो याबद्दल त्यांनी छानसे मत व्यक्त केले आहे.
त्या म्हणतात,
“जेव्हा तुम्ही त्या भाषेतून दुसऱ्याशी समरसून भांडण करू शकता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला ती भाषा अवगत झाली. मी गुजरातीतून चांगल्यापैकी भांडू शकते !”
yhttps://www.youtube.com/watch?v=sPTzL4kDBnY&t=2945s
आमने सामने या मराठी नाटकाचा
आमने सामने या मराठी नाटकाचा 350वा प्रयोग नुकताच मुंबईतल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाला. या प्रयोगाच्या दिवशी नाटकातील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लीना भागवत यांच्या घशाला तीव्र त्रास झाला आणि हा प्रयोग होईल का नाही अशी भीती वाटू लागली.
मग भागवतांनी स्टेरॉईड औषधे घेऊन त्यावर तात्पुरती मात केली आणि प्रयोग यशस्वीरित्या तडीस नेला. प्रयोग झाल्यानंतर पत्रकारांना ही गोष्ट कोणाच्यातरी बोलण्यातून समजली. जर ती सांगितली गेली नसती तर असे काही झाल्याचे कुणाला कळलेही नसते.
लीना भागवत यांचे अभिनंदन !
https://www.lokmat.com/editorial/special-article-is-it-better-to-get-mar...
. . .
यानिमित्ताने 43 वर्षांपूर्वीची आमच्या कॉलेजमधील घटना आठवली. स्नेहसंमेलनातील एका नाटकात नायकाची भूमिका करणाऱ्या आमच्या नाट्यनिपुण मित्राला अशीच समस्या उद्भवली होती. त्यानेही स्टेरॉइड्सचा आधार घेऊन प्रयोग पार पडला होता. त्यावेळेस स्टेरॉईडच्या अति मात्रेचा असा तात्पुरता उपयोग कसा केला जातो हे सर्वांसाठी ज्ञानात भर टाकणारे होते. आमचा तो डॉक्टर मित्र आज संगीत नाटकांमधील एक उत्तम नट म्हणून देखील नावारूपास आलेला आहे.
छान किस्से. वाचतोय.
छान किस्से. वाचतोय.
<त्या भाषेतून दुसऱ्याशी समरसून भांडण करू शकता> +१. पटेश
स्वातंत्र्यपूर्व भारतात हिंदी
स्वातंत्र्यपूर्व भारतात हिंदी चित्रपटातील नायक स्वतःच त्यातली स्वतःची गाणी म्हणत. फाळणीच्या सुमारास प्रदर्शित झालेल्या साजन या चित्रपटापासून या प्रकाराला कलाटणी मिळाली त्याचा किस्सा रोचक आहे.
साजनचे नायक होते अशोककुमार आणि संगीतकार सी. रामचंद्र. अशोककुमार स्वतःच गाणी म्हणणार होते आणि ते फिल्मिस्तानच्या मालकांपैकी एक होते. त्यामुळे रामचंद्र यांच्यापुढे पेच पडला होता कारण त्यांना मनातून मोहम्मद रफी हे गायक म्हणून हवे होते. ज्या दिवशी चित्रपटाचे पहिले गाणे ध्वनिमुद्रित होणार होते तेव्हा शहरात दंगे चालू असल्याने अशोक कुमार स्टुडिओत येऊ शकले नाहीत परंतु रफी मात्र आधीच येऊन बसले होते. मग रामचंद्र यांनी रफींच्या आवाजात गाणे ध्वनीमुद्रित केले व दुसऱ्या दिवशी ते अशोक कुमारना ऐकवले. त्यावर ते चक्क खुश झाले आणि म्हणाले,
“बरे झाले, तुम्ही माझी पार्श्वगायनाच्या तापातून मुक्तता केलीत”
या प्रसंगापासून स्वतःची गाणी स्वतःच म्हणणाऱ्या हिंदी नायकांचा जमाना संपला.
https://www.weeklysadhana.in/view_article/vijay-padlakar-hindi-cinema-sa...
यावरुन आठवले अशोक कुमार यांनी
यावरुन आठवले अशोक कुमार यांनी 'रेल गाडी रेल गाडी झुक झुक्झ झुक ....' गाणे गायलेले आहे.
होय ! खूप छान आहे ते गाणे.
होय ! खूप छान आहे ते गाणे.
या लेखातली माहिती बिनचूक वाटत
या लेखातली माहिती बिनचूक वाटत नाही. लेखाचा फोकस फाळणीमुळे पार्श्वगायन क्षेत्रात झालेले बदल असा आहे. अशोक कुमारना पार्श्वगायक मिळायला ते निमित्त झाले असेल.
दिलीपकुमारचा पहिला चित्रपट ज्वार भाटा १९४४ मध्ये आला आणि त्याला पार्श्वगायक होते.
मुकेशने १९४५ मध्ये अभिनेता मोतीलाल यांच्यासाठी दिल जलता है तो जलने दे हे गाणं गायलं. चित्रपट पहली नजर.
रफीने फाळणीपूर्वी प्रदर्शित झालेल्या जुगनू चित्रपटात दिलीपकुमारसाठी पार्श्वगायन केले.
मन्ना डेंनी पार्श्वगायनाची सुरुवात १९४२-४३ पासून केली.
नूर जहाँच्या माजी नवर्याने लिहिलेले तिचे चरित्र मी वाचले आहे. त्यात लिहिले आहे की ती मूळची लाहोरची. फाळणीनंतर तिने तिच्या मूळ गावी जाणे पसंत गेले.
फाळणीमुळे पाकिस्तानातून भारतात आलेल्या संगीतकारांत ओ पी नय्यर हे नाव आठवलं. ते लाहोरचे.
* पार्श्वगायक मिळायला ते
* पार्श्वगायक मिळायला ते निमित्त झाले असेल.
>>> अच्छा, समजले.
भारतीय सिनेमातलं पहिलं
भारतीय सिनेमातलं पहिलं प्लेबॅक गाणं रायचंद बोराल आणि पंकज मलिक ने कंपोज केलं होतं आणि उमादेवी, सुप्रव सरकार आणि पारूल घोष ह्यांनी गायलं होतं (धूप-छाँव - १९३५) असा उल्लेख अंबरीश मिश्र ह्यांच्या ‘शुभ्र काही जीवघेणे‘ ह्या पुस्तकात आहे. तो लेख पंकज मलिक ह्यांनीच लिहीलाय.
भारतात होणारे साहित्य संमेलन
भारतात होणारे साहित्य संमेलन मराठी असो अथवा इंग्लिशमधले, त्याबद्दल विविध मान्यवरांची आपापली तऱ्हेवाईक मते आहेत. मराठी साहित्य संमेलनातील राजकीय उठबस तर आपल्या पाचवीलाच पुजलेली आहे.
नमुना म्हणून दोन प्रतिभावंतांची ही मते पहा :
शांता गोखले :
"इंग्लिशमध्ये होणारे लिटररी फेस्टिव्हल्स आणि आपली साहित्य संमेलनं ही दोन विभिन्न जाणिवांची उदाहरणं नसून, ती दोन प्रकारच्या तमाशांची उदाहरणं आहेत. एकात व्यावसायिक हितसंबंध आहेत तर दुसऱ्यात काही प्रमाणात राजकीय हितसंबंध आहेत. मी कधी साहित्य संमेलनांना गेले नाही, श्रोता म्हणून नाही आणि लेखक म्हणून तर नाहीच नाही".
. . .
अमिताव घोष :
"मी जयपूर लिटररी फेस्टिव्हलला कधी गेलो नाही. ह्याचं कारण बहुतांशी (पूर्णतः नाही) मला तमाशे आवडत नाहीत हे आहे".
https://www.weeklysadhana.in/view_article/shanta-gokhale-interview-sadha...
ह्या वर्षीच्या साहित्य
ह्या वर्षीच्या साहित्य संमेलनातही अध्यक्षा भवाळकर बाई 'मराठी साहित्यजगताशी राजकारण्यांचा काय संबंध' असं काही तरी म्हणाल्या होत्या. समोर सगळे शरद पवार सहित मोठे मोठे राजकारणीच बसले होते. अगदी पटण्यासारखे आहे ते. पण नेतेमंडळींना सगळी पत्रकारिता, लेखन यावरचे आपले नियंत्रण जाऊ द्यायचे नसते. प्रतिमा जपण्यासाठी आणि अप्रत्यक्षपणे वर्चस्व ठेवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी- अशा अनेक हितसंबंधांसाठी लोकांसमोर कला व सांस्कृतिक गोष्टीत भाग घेणे हे सरळसरळ राजनैतिक धोरण आहे. चित्रपटांच्या पुरस्कार सोहळ्यात सुद्धा सहभागी होतात.
नियंत्रण वगैरे माहित नाही पण
नियंत्रण वगैरे माहित नाही पण हेच लोक त्यांना बोलावतात म्हणुन ते येतात. आल्यावर त्यांची बड्दास्त राखत न बसता त्यांना सामान्य रसिकासारखे वागवायला हवे तर हे लोक त्यांना विआयपी करतात. सासंला महाराष्त्र सरकार आर्थिक मदत देते ती नाकारा सरळ आणि ठेवा संमेलने राजकारणी मुक्त. कोणी अडवलेय?
* आर्थिक मदत देते ती नाकारा
* आर्थिक मदत देते ती नाकारा सरळ
>>>
मुद्दा बरोबर आहे. लेखक आणि वाचकांच्या वर्गणीतून संमेलन भरवावे अशी कल्पना काही वर्षापूर्वी मांडली गेली होती परंतु त्यावर काही विचार होताना दिसत नाही.
Pages