
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
साहित्य आणि पत्रकारिता यांची
साहित्य आणि पत्रकारिता यांची तुलना करणारी काही मार्मिक अवतरणे प्रसिद्ध आहेत. त्यापैकी विशेष भावलेली ही दोन :
१. पत्रकारिता म्हणजे घाईघाईत प्रसवलेले साहित्य
- Matthew Arnold (1822-88)
२. पत्रकारिता अ-वाचनीय असते तर साहित्य वाचले जात नाही.
- Oscar Wilde (1854-1900)
. . .
आता या शतकातले एक मराठी साहित्यिक पाहू :
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके दूरदर्शनवरील मुलाखतीत म्हणाले होते,
" वर्तमानपत्र हा माझा आवडता वाङमयप्रकार आहे; तो मी कधीही, कुठेही व कितीही वाचत असतो".
आता बोला !
किस्से छान.
किस्से छान.
>>पत्रकारिता अ-वाचनीय असते तर साहित्य वाचले जात नाही.>> हे भारी.
किस्से छान.
किस्से छान.
>>पत्रकारिता अ-वाचनीय असते तर साहित्य वाचले जात नाही.>> हे भारी.
रोचक किस्से.
रोचक किस्से.
पाणिनी म्हणजे तेच ऋषी ना, ज्यांना गुरूंनी (नाव नाही आठवत) सांगितले तू शिकणार नाहीस, विद्यारेषा नाही तुझ्या हातात, तेव्हा छोट्या पाणिनीने कुठल्यातरी हत्याराने ती रेषा हातावर काढली आणि शिकून महान झाले. स्वतःचं नशीब स्वतः घडवलं. लहानपणी वाचलंय हे, थोडं फार इकडे तिकडे झालं असेल.
* पाणिनी म्हणजे तेच ऋषी ना,
* पाणिनी म्हणजे तेच ऋषी ना, ज्यांना गुरूंनी (नाव नाही आठवत) सांगितले
>>>>
इथे https://www.wisdomlib.org/hinduism/compilation/puranic-encyclopaedia/d/d... अशी माहिती मिळाली :
आख्यायिका
पाटलीपुत्रात वर्ष नावाचा एक गुरु होता आणि पाणिनीने त्याच्याकडून शिक्षण घेतले. वर्षाने हळूहळू मोठ्या संख्येने शिष्य मिळवले आणि पाणिनी त्यांच्यापैकी सर्वात मंदबुद्धीचा होता. परंतु तो त्याच्या गुरूंवर खूप समर्पित होता आणि यामुळे गुरुच्या पत्नीला आनंद झाला आणि तिला पाणिनीमध्ये खूप रस होता. एके दिवशी तिने पाणिनीला आपल्या बाजूला बोलावले आणि त्याला हिमालयात जाऊन शिवाला ज्ञान मिळवण्यासाठी तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. पाणिनीने सूचनांचे पालन करून तपश्चर्या केली. शिव प्रसन्न झाला आणि त्याने त्याला एका नवीन व्याकरणाचे ज्ञान दिले. पाणिनी हिमालयातून त्याचे व्याकरण घेऊन परत आला तोपर्यंत वर्षाचा दुसरा शिष्य, वररुची नावाचा, इंद्राकडून व्याकरण घेऊन आला होता .
पाणिनीने वररुचीला वादविवादासाठी आव्हान दिले. त्याला आठ दिवस लागले आणि आठव्या दिवशी वररुचीने पाणिनीचा पराभव केला. अचानक आकाशातून एक मोठा गुणगुणण्याचा आवाज आला आणि वररुचीचा व्याकरणग्रंथ नष्ट झाला. त्यानंतर पाणिनीने वादविवादात आपल्या सर्व सहशिष्यांना पराभूत केले आणि जगातील सर्वात महान व्याकरणकार म्हणून उदयास आले.
(कथापीठलंबक, कथासरित्सागर , तरंग ४).
वा. हे रोचक आहे.
वा. हे रोचक आहे.
नृत्तावसाने नटराजराजो ननाद
नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम्।
उद्धर्तुकामः सनकादिसिद्धान् एतद्विमर्शे शिवसूत्रजालम् Il
माहेश्वर सूत्र:
अष्टाध्यायी या १४ सुत्रांवर रचला आहे असे म्हणतात.
आख्यायिका आणि श्लोक दोन्ही
आख्यायिका आणि श्लोक दोन्ही छान. माहितीत भर पडली.
https://sa.wikisource.org
https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A...
इथे ही चौदा सूत्रे दिली आहेत. आणि त्यांचा कसा वापर केला आहे त्याचे काही नमुनेही दिले आहेत. हे सगळे अलौकिक आहे.
अष्टाध्यायी या १४ सुत्रांवर रचला आहे असे म्हणत>>>> हो. ह्या चौदा सूत्रांवर संस्कृत व्याकरण आधारभूत आहे.
*अष्टाध्यायी >>> छान. माहितीत
*अष्टाध्यायी >>> छान. माहितीत भर पडली.
लॅटिन अमेरिकी
लॅटिन अमेरिकी साहित्यिकांपैकी एक ठळक नाव म्हणजे (1971 चे साहित्यातील नोबेल विजेते) चिलीचे पाब्लो नेरुदा. त्यांच्या एका मुलाखतीतील प्रश्नोत्तरे रोचक वाटली :
प्रश्न १ . तुमचा आवडता साहित्यप्रकार ?
उत्तर : रहस्यकथा
२. आवडता रहस्यकथा लेखक ?
उ : जेम्स हॅडले चेस. भीतीची, दहशतीची आणि विनाशाची जाणीव करून देणारा हा सर्वात अग्रेसर लेखक होय.
३. समजा तुमच्या घराला आग लागली तर तुमची स्वतःची कोणती पुस्तके पटापट हाती घेऊन तुम्ही बाहेर पडाल ?
उ : बहुधा माझे कुठलेच नाही. मला त्याची काय गरज ? उलट मी चांगल्या रहस्यकथा वाचवेन. माझ्या पुस्तकांपेक्षा त्या माझं चांगलं मनोरंजन करतील !
चांगली माहिती. रहस्यकथा
चांगली माहिती. रहस्यकथा माझ्या पण आवडीच्या. बाबुराव अर्नाळकर , झुंजार, काळापहाड, फ्यू मान च्यू, धनंजय माझे आवडते. लहानपणी वाचत असे अजूनही वाचतो.
मी गुरुनाथ नाईक यांची पुस्तके
मी गुरुनाथ नाईक यांची पुस्तके जास्त वाचली.
सर. तुम्ही एक तरी झुंजार कथा
सर. तुम्ही एक तरी झुंजार कथा वाचाच.
केकू
केकू
ती एक दोन पुस्तके वाचली असणार पण आता आठवत नाही.
काळापहाड प्रसिद्ध होताच.
रंजक माहिती. जेम्स हॅडले चेस
रंजक माहिती. जेम्स हॅडले चेस आणि अर्ल स्टॅन्ली गार्डनर हे दोन्ही माझे आवडते लेखक होते.
या महिन्यात आपण मभागौदिन
या महिन्यात आपण मभागौदिन साजरा करणार आहोत. मातृभाषेच्या संदर्भात दोन स्पॅनिश लेखकांचे विचार मननीय वाटले :
१. Luisa Valenzuela
या जन्माने अर्जेंटिनाच्या पण त्यांचं वास्तव्य बराच काळ न्यूयॉर्कमध्ये होतं. त्यांनी जेव्हा मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या म्हणाल्या,
“माझ्या जेव्हा लक्षात आलं की मी इंग्लिशमध्ये विचार करू लागलेय, स्वप्न पाहू लागलेय आणि स्वतःशी बोलतानाही इंग्लिशमध्ये बोलू लागलेय तेव्हा मी न्यूयॉर्क सोडलं. आपली भाषा म्हणजे आपलं घर असतं आणि मला या घराला मुकायचं नव्हतं”.
२. Carlos Fuentes
यांचा जन्म मेक्सिकोतील. त्यांनी काही काळ राजदूत म्हणून अन्य देशात काम केले होते. अनेक भाषांशी संबंध येऊनही ते कायम स्पॅनिशमध्येच लिहीत राहिले. त्याबद्दल ते म्हणतात,
“मी स्पॅनिश भाषेत स्वप्न बघतो, स्पॅनिशमध्येच प्रेम व स्त्रीसंग करतो. माझा कोणी दुसऱ्या एखाद्या भाषेत अपमान केला तर मला त्याचं काहीच वाटत नाही, पण स्पॅनिशमधला अपमान माझ्या जिव्हारी लागतो”.
रोचक किस्से. वाचतोय.
रोचक किस्से. वाचतोय.
रंजक माहिती.
रंजक माहिती.
<जेम्स हॅडले चेस> भारीच आवडता.
महाकवी कालिदासाच्या
महाकवी कालिदासाच्या विद्वत्तेसंदर्भात अनेक किसे प्रसिद्ध आहेत. त्यातला हा एक.
एकदा भोजराजाच्या दरबारात पंडितांची सभा भरली होती. राजाने सर्वांपुढे एक प्रश्न ठेवला :
“महाभारत, ऊस आणि चंद्र या तिघांचे वर्णन फक्त एकाच विशेषणाने करा”.
अनेक पंडितांनी खूप प्रयत्न केले परंतु शेवटी हात टेकले. एवढ्यात महाकवी कालिदासाचे तिथे आगमन झाले. राजाने त्यालाही तोच प्रश्न विचारला. त्यावर कालिदासाने तात्काळ उत्तर दिले,
“प्रतिपर्वरसावहम् !”
म्हणजे, या तिन्हींचा रस प्रतिपर्वी चढतो, वाढतो.
स्पष्टीकरण :
मातृभाषेच्या संदर्भात दोन
मातृभाषेच्या संदर्भात दोन स्पॅनिश लेखकांचे विचार मननीय वाटले.... _/\_
प्रतिपर्वरसावहम्>>>>> मस्तच
Umberto Eco हे प्रसिद्ध
Umberto Eco हे प्रसिद्ध इटालिय कादंबरीकार. त्यांच्या मोठ्या पुस्तकसंग्रहाचे एक वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये आजवरच्या इतिहासातल्या घोडचुका आणि मूर्खपणाविषयीच्या पुस्तकांचा मोठा वाटा आहे.
त्याविषयी ते म्हणतात,
“ माझ्या संग्रहात तुम्हाला टॉलेमींची पुस्तके दिसतील कारण त्यांचे अंदाज चुकले. गॅलिलिओ मात्र सापडणार नाही कारण त्यांचे संशोधन बरोबर ठरले. मानवी इतिहासाची अर्थपूर्णता त्याने कोणते ज्ञान मिळवलं किंवा काय शोधून काढलं यात नसून मानवाच्या हातून कोणत्या घोडचुका झाल्या, किंवा त्याने कोणत्या चुकीच्या कल्पना मांडल्या याचा विचार करण्यात आहे”.
नाटककार सतीश आळेकर अपघाताने
नाटककार सतीश आळेकर अपघाताने चित्रपट अभिनेता झाले तो किस्सा :
त्यांनी ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटाचे संवाद लिहिलेत. म्हणून ते सहज चित्रपटाचे चित्रीकरण बघायला गेले होते. त्यातली एक भूमिका जयंत सावरकर करणार होते परंतु ते काही अडचणीमुळे पोचू शकले नाहीत. मग दिग्दर्शकांनी सतीश आळेकरांनाच विनंती केली की तुम्ही त्यांची भूमिका करा. गमतीचा भाग म्हणजे या भूमिकेबद्दल आळेकरांना तेव्हाचे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले.
https://www.youtube.com/watch?v=DwohNxZ9sJg
वरील मुलाखतीत त्यांनी नाटककाराचा रियाज कसा असावा यावर भाष्य केले आहे. नाटककार होऊ इच्छिणाऱ्यांनी रोज काहीतरी लिहायची सवय ठेवली पाहिजे व दुसऱ्या लेखकांची नाटके आणि त्याच्या तालमी सुद्धा पाहिल्या पाहिजेत. तसेच आपल्याहून भिन्न विचारसरणी असलेल्या नाटककाराची नाटकेही आवर्जून बघावीत असे त्यांनी सुचवले आहे.
ह्याला जबाबदार कोण हे नाटक
-
-
-
डॉ. तारा भवाळकर यांची मुलाखत
डॉ. तारा भवाळकर यांची मुलाखत :
https://www.youtube.com/watch?v=IL5emTlLTJE
https://www.youtube.com/watch?v=P-yxiHIL2v8
वरील मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व प्रतिभेचे विविध पैलू दिसून येतात.
१. त्या इयत्ता आठवीत शिकत असताना पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या शिकवणी घ्यायच्या आणि त्या मिळकतीतून त्यांचे पुढचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे शालेय शिक्षण मुला-मुलींच्या एकत्र असलेल्या शाळेत झाले आणि त्याबद्दल त्यांना अतिशय समाधान वाटते.
२. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्णतः बहिस्थ विद्यार्थी म्हणून घेतले. शिक्षक असूनही त्या बीएडच्या फंदात पडल्या नाहीत कारण त्यांना पठडीबद्ध शिक्षणपद्धती मंजूर नाही.
३. नाटकात त्यांना विलक्षण गती असून अनेक नाट्य पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत (बेणारे बाईंची भूमिका सुद्धा).
४. पुण्यापासून सांगलीपर्यंत अनेक ‘नदीगावां’मध्ये त्या राहिलेल्या आहेत आणि अशा गावांतले लोक उदारमनस्क असतात, हे त्यांचे मत !
अमोल पालेकरांच्या ‘ऐवज’
अमोल पालेकरांच्या ‘ऐवज’ पुस्तकातून :
'पालेकरांच्या ‘आक्रीत’ या चित्रपटाला परदेशी महोत्सवांमध्ये पाठवू नये, कारण त्यात आपल्याकडचं क्रौर्य आणि दारिद्र्य दिसतं,’ असा फतवा तत्कालीन केंद्रीय नभोवाणी मंत्री वसंत साठेंनी काढला होता.त्यावर दाद मागण्यासाठी पालेकरांनी एनसीपीएची मदत घेतली. अनेक नामवंत साहित्यिक व कलाकारांच्या पाठिंबाच्या सह्या असलेले पत्र घेऊन एनसीपीएचे संचालक पंतप्रधान इंदिरा गांधींकडे गेले.
इंदिराजींनी ते पत्र वाचले आणि लगेच साठे यांना फोन लावून त्यांची कानउघाडणी केली. परिणामी ‘आक्रीत’चा परदेशी जाण्याचा मार्ग खुला झाला. संबंधित पत्रावर पालेकरांसह ज्या सर्वांच्या सह्या होत्या त्या सर्वांनी आणीबाणीला उघड विरोध केलेला होता हेही एक विशेष.
. . .
‘ऐवज’ या तीनशे पानी पुस्तकाची मुद्रणप्रत स्वतः पालेकरांनी ५ महिन्यांत संपूर्ण हस्तलेखनात तयार केली.
"विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे, त्या सगळ्यांना"
अशी त्या पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे.
सत्यजीत रे यांच्या
सत्यजीत रे यांच्या चित्रपटांबद्दल नर्गिस यांनी असेच उद्गार काढले होते.
असे समीक्षक, असेही मंत्री !
असे समीक्षक, असेही मंत्री !
एखाद्या प्रतिभावंताने त्याला जाहीर झालेला पुरस्कार नाकारणे किंवा मिळालेला पुरस्कार नंतर परत करणे हे प्रकार अधूनमधून घडत असतात. मिळत असलेला पुरस्कार व्यासपीठावरच नाकारून लगेच थोड्या वेळातच तो स्वीकारल्याचा हा किस्सा रोचक आहे.
1984 मधील मुंबईतील हा प्रसंग. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभात केंद्रीय मंत्री वसंत साठे यांच्या हस्ते अनेकांना पुरस्कार दिले जाणार होते. समीक्षक पुष्पा भावे यांनाही पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु त्यांनी व्यासपीठावर येऊन, “कलाक्षेत्रात मंत्र्यांचा हस्तक्षेप गैर आहे”, असे सांगत तो नाकारला.
त्या तिथून परत जाऊ लागताच साठे यांनी लगेच ध्वनीक्षेपक हाती घेतला आणि ते म्हणाले,
“या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्योत्स्ना भोळे आहेत. त्या साहित्यिक आहेत आणि महिलादेखील. तुम्ही त्यांच्या हातून पुरस्कार घ्या”.
त्यावर पुष्पा भावे राजी झाल्या आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
(दै. ‘मटा’तून साभार !)
महाराष्ट्र टाइम्स मधला तो
महाराष्ट्र टाइम्स मधला तो लेख शोधून वाचला. वसंत साठेंबद्दल बरीच नवीन माहिती मिळाली.
पुष्पा भावेंबद्दल आही वाचलं आहे.
Pages