कृष्णलीला..

Submitted by _आदित्य_ on 29 November, 2025 - 22:06

कृष्णलीला...

तो मना मोहवी, रंग त्याचा निळा,
तोच आकाश, मेघापरी सावळा !

लख्ख आभा निळी, वाजवे बासरी..
मंत्रमुग्धा जणू मंद आसावरी!

झूल केसातली मोरपंखी निळी..
शीत काया, तनु सौम्य पुष्पाकळी !

गोड जेव्हा हसे, गोड जेव्हा रुसे..
रोज त्याचीच मी, गोडवी गातसे !

पीत वस्त्रे, ललाटावरी चंद्रमा..
सूर्य गालावरीचा असे रक्तिमा !

शारदा कंठ, ओठात मृदुला स्वरा..
आरसा अंतरी, सोवळा चेहरा !

रंजते केशरी सांज देहावरी..
शुभ्र वाळा करि, चंदनाचा हरी..

मन्मनी हे निळे शब्द येती कसे?
कृष्णलीलाच ही, काव्य माझे नसे !

आदित्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.