भाग पहिला: https://www.maayboli.com/node/87035
भाग दुसरा: https://www.maayboli.com/node/87043
भाग तिसरा: https://www.maayboli.com/node/87056
भाग चौथा: https://www.maayboli.com/node/87065
भाग पाचवा: https://www.maayboli.com/node/87106
आजचा दौरा सुरु होणार होता शंकराचार्य मंदिरापासून. काल बशीरला विचारलं होतं की कुठल्या वेळेला गेलो तर बरं पडेल? तर तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "अरे ऐसा भगवान के दरवाजे के लिये जाने के लिए कोई टाइम थोडी होता हैं. कभी भी जा सकते है". त्याला म्हटलं," भावा, गर्दी कमी कधी असेल ते सांग." तर बशीरभाऊ म्हणाले की सकाळी लवकर गेलो तर गर्दी जरा कमी असेल. त्याप्रमाणे सकाळी लवकर शंकराचार्यांच्या टेकडीवर पोहोचलो. प्रसादला कॉन्फरन्सच्या तिसऱ्या दिवशी त्याचा पेपर सादर करायचा असल्यामुळे आज त्याच्याकडे फिरायला मोकळा वेळ होता.
शंकराचार्य मंदिर जिथे आहे त्या पर्वताला गोपाद्री पर्वत म्हणतात. तो सुमारे हजार फूट उंच असून मोटारींसाठी पक्का रस्ता वरपर्यंत गेला आहे. तिथून अडीचशे दगडी पायऱ्यांचा मंदिराकडे जाणारा मार्ग आहे. मंदिर फार जुने म्हणजे इसवी सन पूर्व २०० पासून आहे असे सांगितले जाते तर काही अभ्यासकांच्या मतानुसार आदि शंकराचार्यांच्या भेटीनंतर बहुधा जहांगीर बादशहाच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाले असावे. हे काश्मीरमधले सर्वात जुने मंदिर मानले जाते. सुरुवातीला सम्राट अशोकाचा पुत्र जालुका याने इथे बांधकाम केले व नंतर राजा गोपादित्य याने येथे जेष्ठेश्वराचे मंदिर उभारले असे म्हणतात.
आम्ही वर पोहोचल्यावर बशीरने एके ठिकाणी गाडी थांबवली. पर्यटक यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे गाड्या पार्क करण्यासाठी फारशी जागा नव्हती. आम्हाला पायऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत थोडं चालावं लागणार होतं. वाटेत एक रिक्षा मिळाली तिने आम्हाला पायऱ्यांपर्यंत सोडले. सासूबाई आणि मावशी दोघींनाही गुडघेदुखीमुळे चढायला झेपलं नसतं त्यामुळे त्या खालीच थांबणार होत्या. आम्ही वर चढायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे मराठी पर्यटकांची गर्दी जास्त होती.
शंकराचार्य मंदिर परिसरातून दिसणारे श्रीनगरचे विहंगम दृश्य
मध्ये नागमोडी वळणांची झेलम (स्थानिक उच्चार - जेहलम) नदी
मंदिराचा कळस
मंदिराच्या भिंतींच्या फटींमध्ये भाविक नाणी खोचून ठेवतात
आम्ही दर्शन घेऊन खाली आल्यानंतर गर्दी दुप्पट झाली होती. पण आजूबाजूचे वातावरण इतके सुंदर होते की त्या गर्दीतही कंटाळा येत नव्हता.
आदि शंकराचार्यांची मूर्ती
दगडी पायऱ्यांचा मार्ग
शंकराचार्य टेकडीवरचे जंगल
दर्शन घेऊन आल्यावर शंकराचार्यांनी तपश्चर्या केली होती ती गुहा पाहायला गेलो. आत त्यांची प्रतिमा ठेवली आहे. आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. आत गेलेले पर्यटक रेंगाळत होते आणि बाहेर यायला खूप वेळ लावत होते. ड्युटीवर असणारा सैनिक वैतागला होता. जोरजोरात ओरडून आत गेलेल्या लोकांना बाहेर यायला सांगत होता. "देखिये गुफा में ऑक्सिजन लेवल कम होता है. इसलिये वहा पे ज्यादा देर मत रुकीये. आप बेहोष हो सकते है."
रांगेत उभा असलेला एक उत्तर भारतीय माणूस अगदी लाडात आल्यासारखा त्याला म्हणाला," अगर कुछ हुआ तो आप हैं ना हमारी मदत के लिये."
आर्मीवाला अजून भडकला. त्याच्यावर खेकसला," देखिये हमसे जितना होगा उतना हम कर रहे है. आप इस गुफा मे आपकी जान चली जायेगी तो आपकी डेड बॉडी उठाने के लिये हेलिकॉप्टर बुलाना पडेगा."
उत्तर भारतीय माणूस अगदी गप झाला.
इथून पुढचा थांबा होता. इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन. पूर्वीची सिराज बाग. दल सरोवराच्या काठावर आशियातले हे सर्वात मोठे ट्युलिप गार्डन वसले आहे. ही बाग झबरवान रांगेच्या पायथ्याशी एकूण ७४ एकरवर पसरली आहे. ट्युलिपचा बहर महिनाभर असतो. त्याच दरम्यान ट्युलिप फेस्टिवलच्या तारखा घोषित करतात आणि या काळात काश्मीरमध्ये जास्त गर्दी असते. बशीर म्हणायचा की या महिन्यात त्याला दल रोडला यायची इच्छा नसते. फेस्टिव्हलमुळे पर्यटक वाढतात आणि त्याचबरोबर ट्रॅफिक. कॉन्फरन्सच्या निमित्ताने ही फुलं पाहायला मिळाली. नाहीतर एवढ्या गर्दीत आम्ही इथे यायचं टाळलं असतं.
ट्यूलिपचे वाफे आणि विपिंग विलोचे वृक्ष
ट्युलिप्सचे रांगोळी प्रदर्शन
......
.......
७५ पेक्षा जास्त जातींचे ट्युलिप या बागेत आहेत
ट्युलिपच्या रंगांमधले वैविध्य फोटोत मावत नाही.
वाट चुकलेला पाहुणा
या वर्षी ट्युलिपच्या हंगामात साडेआठ लाखापेक्षा जास्त पर्यटकांनी या उद्यानाला भेट दिली. पोहोचल्यावर तिथली अगदी चोख व्यवस्था पाहून चकित झालो. एवढी गर्दी असूनही फुलांचा आनंद घेता येत होता. अनेक शाळांच्या सहलीदेखील आल्या होत्या. लहान मुलं शिक्षकांसोबत ट्युलिप्स पाहायला आली होती. सासूबाई म्हणाल्या," इथल्या मुलांचे गाल अगदी सफरचंदांसारखेच आहेत."
ट्युलिप गार्डनच्या अगदी बाजूलाच जवाहरलाल नेहरू बोटॅनिकल गार्डन होते. आम्ही हे निवांत पाहू शकलो नाही कारण ऊन फारच वाढलं होतं. त्यामुळे घाईघाईत उद्यानाला एक फेरी मारली. १७ एकरवर पसरलेले हे उद्यान माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ निर्माण करण्यात आले आहे. या बोटॅनिकल गार्डनमध्ये दीड लाखांपेक्षाही जास्त शोभेची झाडे आणि वनस्पती आहेत.
बागेत फुललेली क्रॅब ॲपलची झाडे (गुगलचा अंदाज)
क्रॅब ॲपलची फुलं
त्यानंतर बशीर आम्हाला जेवायला राजा ढाबा नाव असलेल्या ठिकाणी घेऊन गेला. जेवणाचा दर्जा ठीकठाक होता. पण पर्यटकांची तुफान गर्दी आणि त्यामुळे वेटर्सना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. कसबसं जेवण आटपून दाचीगाम अभयारण्याची वाट धरली. श्रीनगर शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर दल सरोवराच्या पूर्वेला हे अभयारण्य आहे. दाचीगामचा अर्थ होता, दहा गावे. हे अभयारण्य बसवताना दहा गावे विस्थापित करण्यात आली होती. 'हंगूल' या काश्मिरी हरणांसाठी हे अभयारण्य सुरक्षित करण्यात आले आहे. हा काश्मीरचा राज्य प्राणी आहे. १९४० च्या दरम्यान ह्या हंगूल हरणांची संख्या ४०००-५००० च्या आसपास होती. २००४ च्या गणनेत फक्त १९७ हंगूल आढळले. शिकार, अधिवासाचा होणारा नाश, पाळीव गुरांमुळे होणारी अतिचराई यामुळे यांची संख्या कमी होत गेली. तसेच त्यांच्या प्रजननाची मुख्य जागा दाचीगामच्या वरच्या भागात आहे आणि त्या भागात बकरवाल गुराखी आणि त्यांचे कुत्रे उन्हाळ्यात तळ ठोकून असतात. तरीही वन्यखात्याच्या प्रयत्नामुळे २०२४च्या गणनेत हंगूलची संख्या २८९ पर्यंत वाढल्याचे दिसून आले.
दाचीगामचे प्रवेशद्वार
हंगूल (काश्मिरी स्टॅग) ..... फोटो आंतरजालावरून साभार
दाचीगाम प्रवेशद्वारावरून पलीकडच्या बाजूचे दिसणारे दृश्य
पूर्वी ब्रिटिश अधिकारी, राजेराजवाडे इथे शिकारीस येत असत. डोंगरउतारावर हे अभयारण्य पसरले असून थंडीच्या दिवसात हंगूल पायथ्याशी येतात. त्या वेळेस ती मोठ्या प्रमाणात पाहता येतात. आम्ही गेलो तेव्हा थंडी ओसरली असल्यामुळे की काय आम्हाला हंगूल काही दिसले नाहीत. पूर्वी इथे बॅटरीवर चालणाऱ्या गाडीने फिरायची सोय होती. आता ही सुविधा बंद असल्याचे कळले. जंगलातल्या पायवाटेवरून आम्ही थोडा वेळ फिरलो. जवळच ॲनिमल रेस्क्यू सेंटर होते. जखमी वन्यप्राणी आणि पक्ष्यांवर उपचार केले जातात आणि त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात येते. तिथे गेलो तर पिंजऱ्यात दोन बिबटे आणि हिमालयन काळे अस्वल पाहिले. इथे यायच्या आधी दाचीगामचे गूगलवर फोटो पाहताना त्यात स्नो लेपर्ड (बर्फाळ प्रदेशातला बिबट्या) पाहिला होता. हा दुर्मिळ आणि लाजाळू प्राणी आहे. असे वाटले की हा इथे दिसला तर किती छान होईल, आपण नैसर्गिक अधिवासात त्याला पाहायची शक्यता कमीच आहे. तेवढ्यात तिथे एक काश्मिरी तरुण आला, तो तिथेच काम करत असेल असा विचार करून मी त्याला स्नो लेपर्डबद्दल विचारलं. तो हसत म्हणाला," मॅडम झू नही, ये रेस्क्यू सेंटर हैं". मी म्हटलं," हो मला माहित आहे, मी सहज विचारतेय कारण तो दुर्मिळ प्राणी आहे म्हणून मला पाहायचा आहे ". मग तो म्हणाला की आधी इथे असलेल्या स्नो लेपर्डवर उपचार करून जंगलात सोडून देण्यात आले आहे. तो आम्हाला तिथे बाजूलाच ब्राउन बेअर असा फलक असणाऱ्या पिंजऱ्याकडे घेऊन गेला. तिथे तर कुणीच दिसत नव्हतं. पिंजरा अतिप्रचंड होता आणि त्यात बरीच झाडी वाढली होती. याला पण सोडून दिलं का असं विचारल्यावर तो तरुण म्हणाला, "नही. अभी मिलाता हूं आपसे." तो आम्हाला पिंजर्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्याने जोरात हाक मारली,"सेबास्टियन!" त्याबरोबर एक भल्या मोठ्या टेडी बेअरसारखे तपकिरी अस्वल दुडू दुडू धावत त्याच्याजवळ आले.
त्या तरुणाने आपले नाव शबीर सांगितले. शबीर गेली अनेक वर्षे दाचीगाममध्ये नॅच्युरलिस्ट म्हणून काम करतो. त्याने आम्हाला सेबॅस्टिअनची गोष्ट सांगितली. सेबास्टियन खूप लहान असताना त्याच्या आईचा गाडीच्या धडकेत मृत्यू झाला. तेव्हापासून तो दाचीगाममध्ये आहे. शबीर म्हणाला की याला आता पुन्हा जंगलात सोडणे शक्य नाही. तो लहानपणापासून इथेच वाढलाय.
शबीरने दाखवलेला ओढा
शबीर आणि आम्ही
सेबास्टियन (हिमालयन तपकिरी अस्वल IUCN श्रेणी - critically endangered)
आम्ही सर्वानी बऱ्याच गप्पा मारल्या. प्रसादने आणि मी आमच्या फुलपाखरांच्या, चतुरांच्या आवडीबद्दल सांगता त्याने सांगितले की दाचीगाममध्ये ऑगस्ट महिन्यात चतुर मोठ्या संख्येने पाहता येतील. त्यावेळी तुम्ही इथे या. आमच्या काही सामायिक ओळखीही निघाल्या. नंतर तो आम्हाला जवळच असणाऱ्या एका ओढ्याकडे घेऊन गेला म्हणाला," इस झरने का पानी पीके देखिये. आपने कभी इतना मीठा पानी पिया नही होगा." पाणी खरंच खूप गोड होते. त्यानंतर त्याने सेंटरची जागा आतून दाखवली. तिथे नुकतीच रेस्क्यु केलेली हिमालयन काळ्या अस्वलाची पिल्ले होती. प्राण्यांच्या खाण्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती दिली. तिथे करण्यात येणारे रेस्क्यू ऑपरेशन, संवर्धनाचे कार्यक्रम, लोकांमध्ये राबवण्यात येणारे वन्यजिवांबद्दल जागरूकता कार्यक्रम याबद्दल तो भरभरून बोलला. शांभवीला बघून त्याला त्याच्या लहान मुलीची आठवण झाली. तिचे फोटो मला दाखवले आणि म्हणाला, "बेटीया अल्ला की देन होती हैं." प्राण्यांच्या खाऊसाठी म्हणून आम्ही रेस्क्यू सेंटरला थोडी मदत केली.
इथून जवळच हारवन या गावात बौद्ध मठाचे अवशेष आहेत. बशीर इथे कधीही आला नव्हता. गुगलच्या मदतीने आणि स्थानिक लोकांना विचारून आम्ही ती जागा शोधली. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या वाटेवरून थोडं आत गेल्यावर मठाकडे जाणारा चढणीचा रस्ता सुरु होत होता. चढ असल्याने सासूबाई आणि मावशींनी दोघांनीही इथे यायचं टाळलं. आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत तुरळक स्थानिकांची घरं सुद्धा होती. पर्यटक नव्हतेच. अंदाजे रस्ता शोधत होतो. थोडं वर पोहोचलोच होतो की एका बाजूने वरून आवाज आला, "कॅमेरा बॅग मे रख दिजिये. यहा पे कॅमेरा फोटोग्राफी अलाऊड नही है." आम्ही गळ्यात लटकत असणारा कॅमेरा बॅगेत ठेवून दिला. थोडं अजून वर चढल्यावर मठाकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसायला लागल्या आणि तो ओरडणारा माणूस ही. तो भारतीय पुरातत्व खात्यातला होता. त्याचं नाव आता मी विसरले. त्याने या जागेची आणि इथल्या इतिहासाची व्यवस्थित माहिती दिली. आम्ही कोण कुठले विचारल्यावर म्हणाला की इथे भेट देणारे अर्ध्याहून जास्त पर्यटक महाराष्ट्रातले असतात.
मठात बौद्ध भिक्षु राहत असत त्या खोल्यांचे अवशेष
......
स्तूपाचे अवशेष
कुशाण सम्राट पहिल्या कनिष्काने बौद्ध धर्माची चौथी बौद्ध परिषद पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात कधीतरी या ठिकाणी आयोजित केली होती. बौद्ध धर्मातील महान गुरु नागार्जुन हे ही इथे बराच काळ राहिले होते. ह्या भागात बौद्ध धर्माचा सुरुवातीचा विकास झाला आणि इथूनच त्याचा प्रसार आशियाच्या इतर भागात झाला. हा मठ इथे कधी बांधला गेला यांची निश्चित माहिती उपलब्ध नाही. उत्खननातून मिळालेले पुरावे पहिल्या ते सहाव्या शतकातले आहेत. आठव्या शतकापर्यंत बौद्ध हा काश्मीरचा मुख्य धर्म होता. नंतर त्याची जागा हिंदू धर्माने घेतली. काही काळापर्यंत दोन्ही धर्म या भागात एकत्र नांदत होते. इस्लामी आक्रमणानंतर काश्मीरमधून बौद्ध धर्म आणि मठांचे अस्तित्व पुसले गेले. आज फारच थोडे पर्यटक इथे भेट देतात. या जागेवर पुरातत्वशास्त्रज्ञ पंडित रामचंद्र काक यांनी उत्खनन केले तेव्हा त्यांना इथे स्तूपाचे आणि बौद्ध भिक्षु राहत असत त्या जागांचे अवशेष मिळाले. उत्खननात मिळालेल्या फरशा व इतर वस्तू सर प्रतापसिंह वस्तुसंग्रहालयात हलवल्या आहेत.
पुन्हा खाली उतरून गाडीकडे आलो तर सासूबाई आणि मावशीचे चेहरे पडले होते आणि बशीर जोरजोरात हसत होता. झालं होतं काय की बशीरला पोटाचा काहीतरी त्रास होता आणि डॉक्टरने त्याला सोनोग्राफी करून घ्यायला सांगितले होते. गाडी चालवण्यातून त्याला वेळ मिळत नव्हता म्हणून आता आम्ही फिरून येईपर्यंत जवळच असणाऱ्या सेंटरवर त्याला सोनोग्राफी करू म्हणून तो गाडी सुरु करून निघाला. फक्त मला असं इथे जायचं आहे असं त्याने आम्हा दोघांना आणि सासूबाईंना सांगितलंच नाही. त्यामुळे हा आपल्याला किडनॅप वगैरे करतोय की काय या विचाराने दोघीही घाबरल्या आणि या आपल्याला किडनॅपर समजल्या या विचाराने बशीरला खूप गंमत वाटली म्हणून तो जोरात हसत होता. भाऊ तू खरोखरच किडनॅपर वाटतोस असं त्याला सांगायची मला खूप खूप इच्छा झाली होती पण मी आवर घातला.
पुन्हा श्रीनगरची वाट धरली. अजून अंधार पडायला बराच वेळ होता म्हणून दलमध्ये एक शिकारा राईड करूया का असं विचारलं तर सर्वजण तयार झाले. आम्ही एक शिकारा ठरवला. इकडच्या रितीरिवाजाप्रमाणे घासाघीस केली. त्यांच्या आणि आमच्या मनाला पटेल असा दर ठरल्यानंतर शिकारा सफरीला सुरुवात केली.
शिकारेवाले तुम्हाला काही ठराविक पॉईंट दाखवतात ज्यामध्ये तरंगते बेट, त्याच्या चार बाजूला असणारे चार चिनार, पाणथळ भागात केली जाणारी शेती, फ्लोटिंग मार्केट, हैदर चित्रपटात दाखवलेला पूल अशी वेगवेगळी ठिकाणे आहेत. सध्या सुमारे हजारापेक्षाही जास्त शिकारे आणि हाऊसबोटी या सरोवरात आहे. इतक्या वर्षांच्या पर्यटनाच्या वर्दळीमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दल सरोवरात भरपूर गाळ साचला आहे. सरोवराचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. संध्याकाळी शिकारा राईड केल्यामुळे भाजीपाला आणि इतर वस्तूंचा भरणारा 'तरंगता बाजार' काही आम्हाला पाहता आला नाही.

हैदर चित्रपटातला दाखवलेला पूल
शिकारा सफरीदरम्यान लांबून दिसलेला हरी पर्वतावरचा किल्ला
किल्ल्यावरची रोषणाई
.....
दलमधल्या हाऊसबोटी
तरंगता कापडबाजार
......
दलच्या पाणथळ भागात अनेक वर्षे शेती केली जाते. खत म्हणून तिथलाच गाळ वापरला जातो. हे सर्व पॉईंट दाखवल्यानंतर शिकारावाला आम्हाला फ्लोटिंग मार्केटमध्ये घेऊन गेला. इथे बरेच शिकारे थांबले होते. आमच्या बाजूच्या शिकाऱ्यामध्ये कुटुंब होते ते चक्क मावशीचे शेजारी निघाले. आम्ही दुकानांमध्ये एक चक्कर टाकली.
नेहमीप्रमाणे गोडगोड बोलून, मराठीमध्ये काही वाक्यं टाकून दुकानदारांनी वस्तू खरेदी करण्यासाठी गळ घातली. मैत्रिणीसाठी एक स्कार्फ आणि ड्रेसचं कापड घेऊन आम्ही बाहेर आलो. परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत चहा विकणाऱ्या शिकाऱ्यावाल्याकडे चहा आणि हॉट चॉकलेट घेतलं. आता शेवटचा थांबा होता तो म्हणजे दलमधल्या तरंगत्या बेटावर असणारे चार चिनार. यातला एक चिनार कोसळला आहे. त्याजागी नवीन चिनार वृक्ष लावण्यात आला आहे.
चार चिनार बेटावरून दिसणारे संध्याकाळचे दृश्य
शिकारा बाहेर येईपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. बशीरला टाटा करून इक्राममध्ये परतलो. उद्याचा मुक्काम हाऊसबोटमध्ये होता. त्यामुळे सामानाची आवराआवर करायची होती.
पुढील भाग: https://www.maayboli.com/node/87273
मस्त प्रवासवर्णन आणि फोटोज
मस्त प्रवासवर्णन आणि फोटोज
फोटो आणि लिखाण मस्त.
फोटो आणि लिखाण मस्त.
अगदी सुंदर.
अगदी सुंदर.
मस्त फोटो आणि वर्णन.
मस्त फोटो आणि वर्णन.
धन्यवाद!
धन्यवाद!
आज सगळे भाग वाचले. सुरेख
आज सगळे भाग वाचले. सुरेख लिहिलं आहे आणि फोटोही अप्रतिम आहेत. फुलांची तर लयलूट केली आहे. तुमची शैलीही छान आहे. मस्त सहल झाली.
सुंदर फोटोज्. ट्यूलिप्स तर ❤
सुंदर फोटोज्.
ट्यूलिप्स तर ❤