भाग पहिला : https://www.maayboli.com/node/87035
आम्ही ८ एप्रिलला श्रीनगरला रात्री पोहोचणार होतो आणि १६ एप्रिलला परत येणार होतो. ११ ते १३ एप्रिल रोजी शेर-ए-काश्मीर कव्हेंशन सेंटरमध्ये प्रसादची कॉन्फरन्स होती. सासूबाई आणि मावशीचं असं म्हणणं होतं की आम्हाला झेपेल तेवढं आम्ही फिरू, एखाद्या ठिकाणी जमणार नाही असं वाटलं तर छोटीला आमच्याकडे द्या, आम्ही गाडीत बसू. तुम्ही दोघे निवांत हवं तेवढं फिरून या. दोघांनाही गुडघेदुखीचा त्रास होता. प्रसादच्या आईची गुडघेदुखी निघायच्या काही दिवस आधी बळावली. त्यांनी नियमितपणे फिजिओथेरपी चालू ठेवून प्रवासाच्या आधी ती पूर्ण बरी केली.
८ एप्रिलला प्रसादच्या मावसभावाने, कौस्तुभने आम्हाला गोवा (दाभोळी) विमानतळावर सोडलं. तिथून दुपारी दीड वाजता दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात बसलो. सासूबाई आणि मावशी यापूर्वी एक दोन वेळा विमानात बसल्या होत्या. शांभवीचा हा पहिला विमान प्रवास होता. ती कधी शहाण्या बाळासारख वागेल किंवा कधी वैतागेल असं काहीच सांगता येत नव्हतं. विमानात दोन वर्षापर्यंतच्या बाळाच्या आईवडिलांना हवाईसुंदरींकडून विशेष सूचना दिल्या जातात, बाळाला कानात दडे बसलं की काय करायचं किंवा डायपर कुठे बदलायचा. त्या सूचना हवाई सुंदरीने दिल्या आणि विमानाने उड्डाण सुरु करण्याआधीच शांभवी झोपून गेली ती विमान दिल्लीला उतरल्यावरच उठली.
दिल्लीला उतरल्यावर सासूबाई अगदी खूषच झाल्या. आम्ही तिथे थांबणार जरी नसलो तरी अगदी हसून मनापासून म्हणाल्या की तुमच्यामुळे दिल्लीला पाय लागले हो! तिथला ले ओव्हर अगदी थोडा होता. पोटात फार काही गेलं नव्हतं त्यामुळे विमानतळावर डोसा वगैरे खाऊन घेतलं. मग श्रीनगरला जाणाऱ्या विमानात बसलो. यावेळी शांभवी जागी होती. तिला विमानाची सुरक्षा पत्रकं, सीटच्या मागे लिहिलेल्या सूचना वगैरे दाखवून तासभर गुंतवून ठेवलं. बाजूच्याच रांगेत एक बंगाली कुटुंब बसलं होतं, त्यांची तीन-चार वर्षांची मुलगी सोबत होती. तिला बघत बघत शांभवीचा बाकीचा वेळ मजेत गेला. तिला असे लहान ताई आणि दादा लोक फार आवडतात.
आता दोन सूर्यास्ताची गंमत. दिल्लीला विमानतळावर आम्ही पहिला सूर्यास्त पाहिला आणि विमान दिल्लीवरून श्रीनगरला जात असताना अर्ध्या तासाने विमानातून पुन्हा सूर्यास्त पाहिला. विमान आकाशात उडाल्यावर मावळलेला सूर्य आम्हाला पुन्हा क्षितीजावर दिसला आणि दुसऱ्यांदा सूर्यास्त अनुभवता आला.
श्रीनगरला पोहोचेपर्यंत अंधार पडला होता, त्यामुळे विमान उतरताना दिसणारे हिमाच्छादित डोंगर वगैरे पाहायला मिळणार नव्हते. दिल्लीतल्या ले ओव्हरमध्येच यासिनला फोन करून कळवले असल्याने तो आम्हाला विमानतळावर घ्यायला येणार होता. त्याला विमानतळावर कॉल कसा करावा हा एक प्रश्नच होता. कारण काश्मीरमध्ये दुसऱ्या राज्यातले सिम चालत नाहीत. तुम्हाला पोस्टपेड किंवा लोकल नंबरचे प्रीपेड सिम घ्यावे लागते. यासिन एक्झिटच्या जवळच उभा असेल याची खात्री होती. सिम मिळेपर्यंत त्याला कॉल करता येणं शक्य नव्हतं. एक्झिट गेटजवळच आम्हाला सिम विकणारे एक छोटे शॉप दिसले. बरेच पर्यटक तिथून सिमकार्ड विकत घेत होते. मी आणि प्रसादने बाराशे रुपये देऊन दोन लोकल सिमकार्ड घेतली आणि लगेच यासिनला फोन लावला. तो अगदी गेट जवळच उभा होता. भर पावसातून आम्ही विमानतळाच्या बाहेर पडलो आणि त्याक्षणीच कुठून तरी प्रकट झाल्यासारखे तीन-चार लोक आमचे सामान घेण्यासाठी धावत आले. विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. यासिनला गाडी थोडी दूर लावावी लागली होती. त्या सर्वानी सामान गाडीत लावून दिल्यावर त्यांनी त्यांची वर्ल्ड फेमस ख़ुशी घेतली. पाचशे रुपये!! गाडीत बसण्यापूर्वी बाजूला पाहिलं तर एका कुंडीत चॉकलेटी आणि पांढऱ्या मिक्स रंगाचे ट्युलिप्स लावले होते. येह्ह्ह्हह्ह!! मी पाहिलेले पहिले ट्युलिप्स!!!!!!
यासिनने हसून सर्वांचं स्वागत केलं आणि ओळख करून घेतली. माणूस दिसायला आणि बोलायला अगदी सौम्य वाटला. बोलता बोलता त्याने आमच्याबद्दल चौकशी केली. प्रसाद डॉक्टर आहे म्हटल्यानंतर त्याच्याशीच जास्त गप्पा सुरु झाल्या. अर्ध्या तासात राजबाग मध्ये आमच्या होमस्टे च्या ठिकाणी पोहोचलो. मालक म्हणाला होता त्याप्रमाणे गाडी अगदी आतमध्ये नेण्याची सोय होती. आमच्या रूम्स वरच्या मजल्यावर होते. पाऊस पडत असल्याने यासिनने मला शांभवीला वर घेऊन जायला मदत केली. आम्ही रूममध्ये सामान लावून ठेवले. अगदी व्यवस्थित आणि आटोपशीर रूम्स होत्या. स्वच्छता तर वाखाणण्यासारखी होती. खाली डायनिंग रूममध्ये काही लोक आधीच जेवत होते, त्यामुळे पुरेशी जागा नव्हती. म्हणून सासूबाईंना आणि मावशीला आधी खाली जेवायला पाठवले. होमस्टेच्या मालकाने सांगून ठेवलं होतं की जेवण इथे करणार असाल तर आधी कळवा. त्यामुळे सकाळी घरून निघतानाच त्याला रात्री जेवण तयार ठेवायला सांगितले होते. सासूबाई आणि मावशी जेवून आल्यावर म्हणाल्या, बडबडे आहेत हो हे लोक.
नंतर आम्ही तिघे जेवायला खाली आलो. अगदी घरगुती जेवण होतं. सासुबाईंनी इशारा दिल्याप्रमाणे सर्वजण अगदी बोलके निघाले. मालक इलहाम निळ्या डोळ्यांचा मुस्लिम धर्मगुरूंसारखी दाढी राखलेला होता. पस्तीशीच्या आसपास वय असेल. लग्न झालेलं होतं पण त्याची बायको क्वचितच बाहेर दिसायची. त्याची आई होमस्टे मधील जेवणाचं पाहत असे. तिला मराठी व्यवस्थित समजत होतं आणि काही प्रमाणात बोलताही येत होतं. कारण ऐंशीच्या दशकात एक गुप्ते नावाचे आर्किटेक्ट कुटुंबासोबत त्यांच्या घरी भाड्याने राहत होते. त्यांच्याशी ह्या कुटुंबियांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. इलहामचा बाबा सरकारी नोकरीतून इलेकट्रीकल इंजिनीअर म्हणून निवृत्त झाला होता. आम्ही जेवण होईपर्यंत त्यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या. नंतर रूम गरम ठेवण्याची सोय त्यांच्याकडून समजून घेतली आणि झोपायला रूमवर परत आलो. पाऊस अजूनही पडतच होता. दुसऱ्या दिवशी चरार-ए-शरीफ आणि युसमर्ग पाहायला जायचे होते.
आमच्या श्रीनगर मुक्कामाचे ठिकाण - इक्राम इन
इक्राम इनच्या समोरची बाग
इक्राम इनची परसबाग
भाग तिसरा: https://www.maayboli.com/node/87056
(क्रमश:)
मस्त
मस्त
छान झालेत दोन्ही भाग.
छान झालेत दोन्ही भाग. लिहिण्याची शैली छान आहे तुमची. पुभाप्र.
वाचतेय.
वाचतेय.
छान दिसतोय होमस्टे.
तुमच्या दोन्ही सासूबाईंनी मस्त enjoy केले असणार. Polite पण छान गप्पा मारतात ते लोक. आमचा ड्रायव्हर त्याच्या घरी घेवून गेला होता आम्हाला Mattan मध्ये.
जर ती All India Community Medicine conference असेल तर ती अकरा ते तेरा एप्रिलला होती. नीट आठवतंय कारण Conference संपल्या दिवशी मोकळे झाल्यावर डॉक्टरांनी dinner चे in advance आमंत्रण दिले होते. पण त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही पोहोचत असल्यामुळे आणि शेड्युल पॅक असल्यामुळे स्वीकारता आले नव्हते.
जर ती All India Community
जर ती All India Community Medicine conference असेल तर ती अकरा ते तेरा एप्रिलला होती. >>> अगदी बरोबर. टंकताना गडबड झालीय. चुक दुरुस्त केली आहे.
छान आहे वर्णन. दोन सूर्यास्त
छान आहे वर्णन. दोन सूर्यास्त च्या कुतुहलाने हा भाग आधी वाचला. आता बाकीचे वाचतो.
छान झालाय हा भाग सुद्धा.
छान झालाय हा भाग सुद्धा.
होम स्टे - इक्राम इन मस्तच आहे.