काश्मीर सफरनामा: निशात, शालिमार बाग आणि सर प्रतापसिंह वस्तुसंग्रहालय

Submitted by pratidnya on 28 August, 2025 - 13:34

भाग पहिला: https://www.maayboli.com/node/87035
भाग दुसरा: https://www.maayboli.com/node/87043
भाग तिसरा: https://www.maayboli.com/node/87056
भाग चौथा: https://www.maayboli.com/node/87065

आजपासून डॉक्टरांची कॉन्फरन्स सुरु व्हायची होती. प्रसाद आवरून शेर-ए- काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरला गेला. नोंदणी करून आणि महत्त्वाचे काही सत्रे आटोपून तो आम्हाला मुघल बागांमध्ये येऊन येऊन भेटणार होता. त्यामुळे आज लांबचा दौरा न आखता फक्त श्रीनगर पाहायचं असं ठरवलं होतं.
PSX_20250826_152016.jpg शेर-ए- काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर आणि IAPSMCON २०२५

PSX_20250826_151747.jpg शेर-ए- काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर - मुख्य सभागृह

सर्वात पहिला थांबा होता निशात बाग. काश्मीरमधल्या मुघल बागांमध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे उद्यान आहे. १६ व्या शतकात बेगम नूरजहानचा भाऊ आणि शाहजहानचा सासरा असिफ खान याने या बागेची निर्मिती केली होती. याच्या नावाचा अर्थसुद्धा गार्डन ऑफ जॉय किंवा आनंदाचे उद्यान असा होता. इथल्या बऱ्याच उद्यानांची रचना ही डोंगर उताराच्या पायऱ्यापायऱ्यांवर केली आहे. निशात बागेच्या पार्श्वभूमीला झबरवान डोंगररांगेचे मनोहरी दृश्य दिसते. उद्यान्याच्या मध्यातून पाण्याचा खळाळता प्रवाह टप्प्याटप्प्याने खाली उतरत येतो.
20250410-IMG_9729 (2).jpg झबरवान डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेली निशात बाग

20250410-IMG_9742 (2).jpg चेरीच्या झाडाखाली फॅमिली फोटो

20250410-IMG_9754 (2).jpg आनंदाची "निशात" बाग

20250410-IMG_9764 (2).jpg हिरव्या चिनारांच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी चेरी ब्लॉसम

20250410-IMG_9767 (2).jpg दलच्या बाजूला असलेले निशातचे प्रवेशद्वार

20250410-IMG_9768 (2).jpg जवळपास तीसेक पायऱ्या चढून गेल्यावर निशातचे खरे सौंदर्य दिसते

20250410-IMG_9774 (2).jpg मुघल बागेचे एक वैशिष्ट्य - चादर इफेक्ट

या जागेबद्दल एक कथा अशी आहे की बागेचे काम पूर्ण झाले तेव्हा त्या वेळचा मुघल बादशाह शाहजहानने आपल्या सासऱ्याकडे या बागेचे तीनदा तोंडभरून कौतुक केले. बिचाऱ्याला आशा होती की आपला सासरा बाग आपल्याला देऊन टाकेल. जेव्हा सासऱ्याने तसा काही विषय काढला नाही तेव्हा त्याला राग आला आणि त्याने बागेचा पाणीपुरवठा बंद करायचा आदेश दिला आणि बाग ओसाड झाली. बिचाऱ्या असिफ खानचे लक्ष कशातही लागेना. एकदा त्याला असं उदास झाडाखाली बसलेले पाहून त्याच्या एका नोकराने बागेचा पाणीपुरवठा पुन्हा सुरु केला. ते पाहून असिफ खान घाबरला त्याने पाणी बंद करायला सांगितले. जावई असलेल्या बादशहाची आज्ञा मोडून पाणी पुन्हा सुरु केले तर तो जीव घेईल अशी त्याला भीती वाटली. पण शाहजहानच्या कानावर ही गोष्ट जाताच त्याला आपल्या मालकाबद्दल काळजी असणाऱ्या नोकराचे कौतुक वाटले आणि त्याने बागेचा पाणीपुरवठा पुर्ववत करण्याचा आदेश दिला.

आम्ही बागेमध्ये फिरायला सुरुवात केली तेव्हा बर्फ नुकताच कमी झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी फुलांचे नवीन ताटवे लावण्याचे काम सुरु होते. तिथले माळी फुलांच्या बिया विकत घेण्यासाठी गळ घालत होते. मी एक पाकीट घेतले खरे पण ते बॅगेच्या चोर कप्प्यात पडून राहिले आणि अजूनपर्यंत त्या बिया लावण्याचे काम माझ्या हातून झाले नाही. तशाही त्या बिया आपल्याकडे रुजणार नाही असे मला कुणीतरी आधी सांगितले होते. पण तरीही प्रयोग करायची माझी प्रचंड इच्छा होतीच. बाग अर्धी फिरून होईपर्यंत प्रसादचीही महत्वाची सत्रं आटोपली होती. तो आम्हाला बागेत येऊन भेटला.

एका ठिकाणी काश्मिरी पोशाखावर फोटो काढून देत होते. दोन्ही सासूबाईंना विचारले, "तुम्हाला फोटो काढायचे आहेत का?" आम्हाला वाटलं त्यांना हे फोटो वगैरे काढून घेणं त्यांना काही आवडणार नाही पण सासूबाईंनी अगदी आनंदाने होकार दिला. आम्हाला बरे वाटले. दोघीनी स्वतःचे फोटो काढलेच पण आम्हा तिघांनाही फोटो काढायला लावले. एक वर्षाच्या मुलीच्या मापाचेही कपडे होते त्यांच्याकडे. शांभवीचे फोटो भलतेच क्युट आलेत. पूर्ण गोंधळलेला भाव आहे फोटोमध्ये.

इथून मग चार किलोमीटरवर असणाऱ्या शालिमार बागेत गेलो. आज जरी या जागेला मुघल गार्डन म्हणत असले आणि जहांगीर बादशहाने ही बाग त्याच्या बेगम नूरजहानसाठी निर्माण केली असे म्हणत असले तरी सर्वप्रथम राजा प्रवरसेन द्वितीय याने स्वतःसाठी इथे उद्यानगृह वसवले होते. जहांगीराने या बागेचे रूपांतर राज उद्यानात केले आणि त्याला 'फराह बक्ष' (आनंददायक) असे नाव दिले. ही बाग तीन सज्जांमध्ये विभागली गेली आहे. पहिला सज्जा म्हणजे दिवाण-ए-आम, दुसरा दिवाण-ए- खास आणि तिसरा जनाना बाग. बागेच्या मधोमध कालवा वाहतो आणि कालव्याच्या दुतर्फा चिनार वृक्षांची रांग आहे.

20250410-IMG_9780 (2).jpg शालिमारमध्ये प्रवेश केल्यावर

20250410-IMG_9793 (2).jpg शालिमारमध्येही फुलांचे ताटवे लावण्याचे काम सुरु होते

20250410-IMG_9795 (2).jpg दिवाण-ए-आम (पब्लिक गार्डन)कडे जाताना

20250410-IMG_9805 (2).jpg बागेतला हा कालवा पुढे जाऊन दलला मिळतो

20250410-IMG_9809 (2)_0.jpg बागेमधील मुघलकालीन बांधकाम

20250410-IMG_9812 (2).jpg बांधकामाभोवती असणारी शेकडो कारंजी

20250410-IMG_9826 (2).jpg20250410-IMG_9827 (2).jpg मुघलकालीन चित्रकला

20250410-IMG_9835 (2).jpg बागेतील मुख्य आकर्षण

20250411-DSC_8402 (2).jpg चेरी ब्लॉसम

20250411-DSC_8408 (2).jpg पॅन्सीची फुलं

20250411-DSC_8416 (2).jpg बागेतून दिसणारी मशीद - जणू परिकथेतील किल्ला

शालिमार बागेतून बाहेर पडतानाच पाऊस सुरु झाला. लगेच बाहेर आलो. बशीरने जेवणासाठी एका ढाब्याकडे गाडी नेली. जेवण ठीकठाक होते. केसरी टूर्सची बरीच मंडळी इथे जेवायला थांबली होती.

जेवण आटोपले तरी पाऊस सुरूच होता. या पावसात उरलेल्या बागा आणि बाकीची स्थळं पाहणं शक्यच नव्हतं म्हणून आम्ही सर प्रतापसिंग वस्तुसंग्रहालयात गेलो. हे संग्रहालय श्रीनगरच्या वजीर भागात आहे . १८८९ मध्ये याची स्थापन झाली. पूर्वी हे संग्रहालय काश्मीरी राजांच्या उन्हाळी सुट्टीच्या राजवाड्यात होते. २०१७ पासून ते बाजूच्याच नवीन इमारतीत हलवण्यात आले आहे. मला वाटलं होतं त्यापेक्षा हे संग्रहालय बरेच मोठे होते. ८०००० पेक्षाही जास्त वस्तू या संग्रहालयात मांडल्या आहेत. यात पुरातत्त्व, वाद्य, हस्तलिखित, धातूंच्या वस्तू, वस्त्र, काश्मिरी हस्तकला, नाणी, नैसर्गिक इतिहास असे बरेच विभाग आहेत. पण आम्हाला पोहोचायलाच उशीर झाल्याने आम्ही फक्त पुरातत्व, इतिहास, नाणी आणि जैवविविधता असे चारच विभाग पाहू शकलो. संग्रहालय बंद व्हायला पाऊण एक तास असताना वीज गेली आणि आम्हाला नाईलाजाने बाहेर पडावे लागले. संग्रहालयात काश्मीरचा इतिहास अगदी अश्मयुगीन काळातल्या हत्यारांपासून ते बौद्ध, हिंदू, मुघल ते स्वातंत्रपूर्व काळापर्यंत मांडला आहे.

20250411-IMG_9928 (2).jpg सर प्रतापसिंहाचा राजवाडा - संग्रहालयाची जुनी जागा

20250411-IMG_9844 (2).jpg संग्रहालयाची नवी इमारत

WhatsApp Image 2025-08-28 at 6.50.45 PM.jpeg काश्मीरच्या विविध भागात उत्खननातून मिळालेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती (गणपती, काली, नरसिंह, विष्णू इत्यादी)

WhatsApp Image 2025-08-28 at 6.50.44 PM.jpeg श्रीनगरमध्ये हारवन इथल्या २००० वर्षे जुन्या बौद्ध मठातील टेराकोटा फरशा. यावर् खरोष्ठी लिपीत अंक कोरले आहेत.

20250411-IMG_9889 (2).jpg काश्मीर देवसर काझीगुंड इथे मिळालेले शिवलिंग

20250411-IMG_9847 (2).jpg अवंतिपूर इथे सापडलेली नवव्या शतकातील हत्यारे

20250411-IMG_9854 (2).jpg कधीकाळी काश्मीर हे प्राचीन संस्कृतीने बहरले होते याची साक्ष देणारी पुरातन भांडी

20250411-IMG_9865 (2).jpg काश्मिरी पद्धतीचे जुने मंदिर

20250411-IMG_9881 (2).jpg काही मूर्तींमध्ये असलेले चौथे मुख पाहण्यासाठी संग्रहालयात मागच्या बाजूला आरशाची व्यवस्था केली आहे

20250411-IMG_9919 (2).jpg नॅचरल हिस्टरी विभागात काढलेला एकमेव फोटो! वूली मॅमथची कवटी. कधीकाळी हा जीव काश्मीरमध्ये वावरत असेल याचा पुरावा.

20250411-IMG_9922 (2).jpg जम्मू काश्मीरमधील पहिले कागदी चलन (वर्ष १८७६)

इथून बशीर आदल्यादिवशी म्हणाला होता त्याप्रमाणे आम्हाला खरेदीसाठी घेऊन गेला. इथे अगदी अस्सल वस्तू मिळतात असं बशीरचे म्हणणे होते. तिथल्या दुकानदारांनी काश्मिरी कशिद्याचे, भरतकामाचे वेगवेगळे नमुने दाखवले. सासूबाईंनी एक-दोन ड्रेस घेतले. गालिच्यांचा, लाकडी नक्षीकामाचा विभाग सुरेखच होता.तिथल्या दुकानदारानी काही मराठी शब्द आणि वाक्यं शिकून घेतली आहे. (हे काश्मीरमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसलं.) या ताई. हे आवडेल तुम्हाला. हे घ्या. वगैरे वगैरे. मी बहिणीसाठी किरकोळ खरेदी केली आणि इक्राम इनमध्ये परतलो.

20250411-DSC_8427 (2).jpg इक्राम इनच्या खिडकीमधून दिसणारे शंकराचार्य मंदिर. आमच्या पुढच्या प्रवासाचा आरंभबिंदू.

पुढील भाग - https://www.maayboli.com/node/87196

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन.. सासुबाई भारी हौशी आहेत Happy

आम्हाला एकही बाग बघ़याइतपत वेळ मिळाला नाही. ट्युलिप्स सुद्धा नशिबाने मिळाले. आम्ही भेट दिली तेव्हाही पाऊस होताच, त्या रात्री खुप पाऊस झाला व खुप ट्युलिपांचे नुकसान झाले असे नंतर ऐकले.

काश्मिरात रस्त्यावरही इतके सुंदर गुलाब फुलले होते की परत बागा करुन त्यात का फुले लावावीत असे वाटले होते Happy काश्मिर खरेच फार सुरेख आहे, परत परत जावेसे वाटायला लागणारे.

आमचाही पाऊस व ट्रफिकमुळे खुप वेळ फुकट गेला. दाल सरोवरासमोरचा रस्ता तर गर्दीने खुपच ओसंडतो. आणि ट्युलिप पासुन सर्व महत्वाच्या बागांसाठी तिथुन जावे लागते.

खरेतर रस्ते वगैरे खुप चांगले आहेत, खड्डे फारसे नव्हते पण शहराचा जितका जिव आहे त्या मानाने टुरिस्ट खुपच जास्त येतात. ह्या वाढीव गर्दीला सामावुन घेणे कठिण जातेय असे मला वाटते.

हल्ली सगळीकडेच टुरिस्ट ओघ वाढलाय. साउथचे काही माहित नाही पण नोर्थ इन्डिया हा इतका ओघ सहन करु शकत नाहीय असे वाटतेय. हिमाचल व उत्तराखंड धुवुन निघाले या वर्षी.