प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* अप्रकाशित चित्रे सुद्धा भारी >>> शक्य आहे.
एक-दोन मुखपृष्ठ चित्रकारांना मी जवळून पाहिले आहे. ते प्रकाशकाला चित्राचे तीन कच्चे नमुने आहे काढून देत आणि त्याचे ठराविक शुल्क सांगत. त्यातील जे पसंत पडेल त्याचे पक्के चित्र केले जाई आणि मग त्याचे शुल्क अर्थातच वेगळे आणि अधिक असायचे.
. . .
* चर्चिल यांना नागव्याने अंघोळ करून .. >>> भारी किस्सा.

चर्चिल हे फर्डे वक्ते होते. ते आपल्या भाषणांची तयारी अंघोळीच्या वेळी मोठ्याने बोलून करीत असत. ते स्नानगृहात गेले की त्यांचे टंकलेखक हातात कागद घेऊन दरवाज्याच्या बाहेर उभे रहात. एखादे चांगलं वाक्य सुचले की चर्चिल ते आतून ओरडून सांगत आणि टंकलेखक लिहून घेत.

विनोद हा एकंदरीत किती दुर्मिळ असतो या संदर्भात आचार्य अत्रे यांचे विवेचन मार्मिक आहे. ते म्हणाले होते,

“देवांदिकांनी समुद्रमंथन केले आणि त्यातून १४ रत्ने काढली परंतु त्यात विनोद नावाचे १५ वे रत्न काही सापडले नाही. विनोद शोधण्यासाठी संसारातील अनुभवाचेच मंथन करावे लागते. ते काम विनोदी लेखक आणि हास्यचित्रकारांनी केलेले आहे”.

आजच हा धागा वाचतो आहे.
वर मीरा यांचा एका राष्ट्रीय कीर्तनकाराचा किस्सा आलेला आहे. हा कीर्तनकार त्याच्या काळात कीर्तनात वाह्यात बोलण्या बद्दल प्रसिद्ध होता. चिरंजीव ही त्याच वळणावर गेले. त्या चिरंजीवांचा
(जो नंतर कीर्तनकार,आणि नट झाला) किस्सा
एका संस्थानी तालुक्याच्या गावात,(ज्या संस्थानिकांचे आडनावात नाईक हा शब्द होता),त्याने बोलता बोलता नायकीण या शब्दावर कोटी केली....

आम्ही त्याला मार खाता खाता वाचवला.....

आपल्या लेखनात विरामचिन्हांच्या वापराबाबत विविध लेखकांच्या नाना तऱ्हा दिसून येतात.

पौराणिक कहाण्यांमध्ये पूर्णविराम किंवा दंड एवढेच वापरलेले दिसतात. संवाद असले तरीही अवतरण चिन्ह वापरलेले नसायचे.

मराठी साहित्यात काही बंडखोर लेखकांनी देखील पूर्णविराम वगळता बाकी सर्व चिन्हांची ऐशी की तैशी करून टाकली ( उदाहरणार्थ कोसला).
उद्गारवाचक चिन्हाच्या वापराबाबत मराठी व इंग्लिश लेखनात मूलभूत फरक आहे. मराठीत ती सढळपणे वापरतात परंतु इंग्लिशमध्ये मात्र अत्यंत काटकसरीने. दोन्ही भाषांत अर्धविरामाचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये बराच कमी होताना दिसतो.

G V Carey यांनी Mind the stop या नावाचे एक पुस्तक लिहिले असून त्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात की, विरामचिन्हे वापरताना मी दोन तृतीयांश प्रमाणात नियमांचे पालन करतो आणि एक तृतीयांश मात्र माझ्या व्यक्तिगत आवडीनुसारच ठरवतो.

अनुमती’ आणि दाद !
अनुमती हा मराठी आणि द सिग्नेचर ही त्याची हिंदी आवृत्ती असे दोन्ही चित्रपट गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेत. हिंदी चित्रपटासाठी गजेंद्रनी कथा पुन्हा स्वतंत्रपणे लिहून काढली व त्यानंतर ते ऋषी कपूरना भूमिकेसाठी विचारायला गेले. त्यांनी कथा ऐकल्यावर लगेच होकार दिला. सर्व काही बोलणी पण झाली. जाताना गजेंद्रनी त्यांना मराठी अनुमतीची सीडी हातात ठेवली आणि बघायला सांगितले आणि गजेंद्र निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषी कपूर यांचा फोन आला की ते त्यात काम करू शकणार नाहीत. त्याचे आश्चर्य वाटून त्यांना गजेंद्रनी विचारले की असं का? त्यावर ते म्हणाले,
मी मराठी चित्रपट पाहिला. तो विक्रम गोखलेंनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की आता त्याला मी छेडू इच्छित नाही !”

एका बुजुर्ग हिंदी कलाकाराने श्रेष्ठ मराठी कलाकाराला दिलेली ही दाद नक्कीच कौतुकास्पद आहे.
( नंतर अनुपम खेरनी ती भूमिका केली).

स्वल्पविराम.
रोको, मत जाने दो.
रोको मत, जाने दो.

बऱ्याच पाश्चात्य लेखकांनी टोपणनावाने लेखन करणे पसंत केले होते आणि त्याची वेगवेगळी कारणे रोचक आहेत. काही महत्त्वाची उदाहरणे पाहू (खरे नाव, टोपण नाव आणि कारण या क्रमाने) :
Agatha Christie (Mary Westmacott) : प्रणयकथा लिहीण्यासाठी कंसातले वेगळे नाव

स्टीफन किंग (Richard Bachman या नावाने काही पुस्तके) : या यशस्वी लेखकाला जाणून घ्यायचे होते की आपले यश हे लेखन कौशल्यामुळे आहे की निव्वळ बाजारात मुद्रानाम झाल्यामुळे. तसेच एकाच नावाचा अतिरेक टाळणे हा पण हेतू होता.

Samuel Clemens (Mark Twain) पत्रकारिता, बोटीच्या पायलटची कारकीर्द आणि साहित्यलेखन वेगळ्या नावाने.
Charles Dodgson (Carol Lewis) : आपली शैक्षणिक कारकीर्द आणि काल्पनिक लेखन या गोष्टी वेगळ्या ठेवण्यासाठी

Isaac Asimov (Paul French) : प्रौढांसाठी आणि मुलांसाठी लिहिलेल्या विज्ञान काल्पनिका वेगळ्या नावाने लिहिल्या.
Mary Ann Evans (George Eliot) : ज्या काळात महिला लेखक उपेक्षित समजल्या जात तेव्हा आपल्या लेखनाकडे वाचकांनी महिला लेखक या पूर्वग्रहाने पाहू नये म्हणून.
आणि
या सर्वांवर कडी म्हणजे
François-Marie Arouet (Voltaire) : तब्बल 178 टोपणनावे !!
Arouet हे मूळ नाव खानदानी न वाटल्यामुळे आणि अजूनही काही कारणे आहेत. Voltaire या टोपणनावातून चापल्य (voltige) आणि धाडस प्रतित होते.

साहित्यिक मुख्यमंत्री
भारतातील सध्याच्या मुख्यमंत्र्यांपैकी काही मोजके जण साहित्यिक आहेत. त्यामध्ये ममता बॅनर्जी, पी. विजयन, हिमंत बी. सर्मा आणि भगवंत मान यांचा समावेश आहे.
या सर्वांमध्ये ममता बॅनर्जी यांनी आत्तापर्यंत एकूण 145 पुस्तके लिहून प्रकाशित केलेली असल्याने बहुधा त्या आघाडीवर असाव्यात.

श्रीधर वेम्बू हे नाव चर्चेत आले आहे ते त्यांच्या झोहो कॉर्पोरेशन ने बनविलेल्या Apps मुळे. दोनेक वर्षांपूर्वी त्यांच्या वर एका इंग्रजी वृत्तपत्रात लेख आला होता. त्यावेळी त्यांनी बनवलेले Apps Amezon सारख्या अनेक जायंट कंपन्या वापरत होत्या. त्यांची वर्षाची कमाई 7000 कोटी एव्हढी होती. कंपनीचे व्हॅल्युएशन एक लाख कोटी रुपये एव्हढे होते. विशेष म्हणजे कंपनी बूटस्ट्रॅप स्टार्टअप होती.
त्यानी त्यांचे हेडक्वॉर्टर आंध्र प्रदेशातील एका लहानशा गावात बनवले आहे. (नंतर चेन्नईत एक शाखा उघडली). कंपनीत आजूबाजूच्या गावातील हुषार मुलं घेऊन त्यांना ट्रेन केलं जातं. बीई, बीटेक एमबीए अशा अटी नाहीत.

एव्हढे यशस्वी असून ते सायकलवर फिरतात. झाडाखाली बसून कामगरांसोबत जेवतात. घरची कामे स्वतः करतात.
हॅट्स ऑफ!

हेमा साने ह्या खऱ्या पर्यावरण रक्षण करणाऱ्या वनस्पती शास्त्रज्ञ ह्यांचे पुण्यात १९ सप्टेंबरला पुण्यात दुःखद निधन झाले. त्या गरवारे कॉलेजात वनस्पतीशास्त्राच्या प्रोफेसर होत्या. ह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या बुधवार पेठेतील त्यांच्या जुनाट पडक्या वाड्यात एका खोलीत विजेशिवाय फ्रीज फॅन टीवी शिवाय रहात होत्या. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ह्या गोष्टींचा त्यांनी जाणीवपूर्वक त्याग केला होता.
ह्या तपस्वी शास्त्रज्ञाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर
https://www.butlernature.com/2025/09/26/hema-sane-the-botanist-who-made-...
इथे माहिती मिळेल.
त्याना श्रद्धांजली.
हा प्रतीसाद मी आधी "पर्यावरणाची अवांतरे" वर लिहिला होता. तेथे अर्थातच कोणी वाचला नसणार. म्हणून येथे पुनः प्रदर्शित करतो आहे. बघुया कोणी दखल घेतेय का ते.

* श्रीधर वेम्बू >>> +१ .
काल लोकमतमध्ये वाचले होते.
. .
* हेमा साने >>> वंदन आणि आदरांजली !
मला इयत्ता बारावीच्या वर्षात त्या शिकवायला होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ चांगला झालेला आहे. जीवशास्त्रात त्यांनी शिकवलेल्या एक दोन युक्त्या आयुष्यभर स्मरणात राहिल्या आहेत.

पर्यावरणस्नेही जगणाऱ्या दोन व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या. त्यापैकी या एक आणि दुसरे म्हणजे कुडावळे (तालुका दापोली ) येथे राहणारे दिलीप कुलकर्णी. दोघांत काही साम्य आणि काही फरक आहे.
त्यातला एक महत्त्वाचा फरक असा दिलीप कुलकर्णी हे आतापर्यंतच्या आयुष्यात सायकलनिष्ठ आहेत तर सानेबाईंनी नोकरीच्या शेवटच्या दहा वर्षांमध्ये लुना वापरली होती. परंतु विजेच्या बाबतीत सानेबाई खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही राहिल्या !

कुलकर्णी यांनी सुरुवातीस त्यांची इच्छा नसताना देखील आई-वडिलांच्या इच्छेखातर खेड्यातील घरात वीज घेतली. अर्थात ती ते दिवा, रेडिओ आणि मोबाईल एवढ्यापुरतीच वापरतात. अगदी सुरुवातीस त्यांचा संगणक वापरायला देखील विरोध होता परंतु अलीकडे त्यांच्या मुलाखती आपल्याला युट्युबवर दिसू लागल्या आहेत !

कुठल्याही तत्त्वाला आयुष्यभर चिकटून राहणे हे वाटते तितके सोपे नसते.

मला इयत्ता बारावीच्या वर्षात त्या शिकवायला होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ चांगला झालेला आहे. जीवशास्त्रात त्यांनी शिकवलेल्या एक दोन युक्त्या आयुष्यभर स्मरणात राहिल्या आहेत. >> छान वाटलं.

हेमाताईची मुलाखत ६ वर्षांपूर्वी पाहिलेली आहे. मायबोलीवर त्या वेळी चर्चा झाल्या होत्या. त्या ही वाचल्या होत्या. त्यांचा वाडा जीर्ण झालेला आणि त्यात वनस्पती आणि झाडं उगवलेली होती. भर वस्तीत असं घर असेल असं वाटलंच नव्हतं.
https://www.youtube.com/watch?v=VVmjI5NpLVw&t=6s

वैद्यकशास्त्रातील ‘हिस्टोपॅथॉलॉजीची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. अनिता बोर्जेस यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा सल्ला हा कर्करोग निदानातील पॅथॉलॉजीचा अखेरचा शब्द मानला जाई.

त्यांच्या हजरजबाबीपणाचा हा एक किस्सा
एका वैद्यकीय चर्चासत्रात एक डॉक्टर म्हणाले की, सर्जन हे ऑर्केस्ट्रातील गायकासारखे असतात तर पॅथॉलॉजीस्ट हे तबलावादकासारखे दुय्यम. लोक गायकाला लक्षात ठेवतात पण तबलावादक कोणाला आठवतो?
यावर डॉ. अनिता ताबडतोब म्हणाल्या,
“तुम्ही झाकीर हुसेनना कसे विसरलात? त्यांच्यासारखे तबलावादक स्वतंत्र मैफिल आयोजित करतात आणि जगातले लाखो चाहते त्यांना दाद देतात !”

(२/१० च्या पुणे मटातील त्यांच्यावरील लेखातून साभार)

आदरांजली !

मनोहर भिडे हे SBI चे माजी अध्यक्ष. वयाच्या १९व्या वर्षी बँकेची परीक्षा पास झाल्यावर तिथे नोकरी करावी का नाही याबाबत त्यांनी धनंजयराव गाडगीळ यांचा सल्ला घेतला.
त्यावर गाडगीळ म्हणाले,
“अर्थशास्त्रात पीएचडी केलीस तर त्याचा अभ्यास होईल. पण बँकेत काम केलेस तर अर्थशास्त्र शिकायला मिळेल. आता केवळ अभ्यास करायचा की शिकायचे हे तू ठरव !”

(लोकसत्ता १२ ऑक्टोबर मधून)

अभिनेते-दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी स्वतःबद्दल सांगितलेला हा किस्सा :
त्यांना कानाचा काहीतरी अंतर्गत त्रास असल्यामुळे आसपास कुठेही सूक्ष्म ( हाय फ्रिक्वेन्सी) आवाज जरी झाले तरी ते ऐकू येतात आणि त्रास होतो. त्यामध्ये मोबाईल संदेशाच्या टोन्सचा पण समावेश आहे. नाट्य वा चित्रगृहात प्रेक्षकांतून असे आवाज येऊ लागले की त्यांची भयंकर चिडचिड होते. कधी कधी ते स्वताचे नाटक चालू असतानाही स्टेजवरूनच प्रेक्षकांना त्याबद्दल बोलतात.

तसेच ते स्वतः थेटरात जाऊन चित्रपट पाहणे टाळतात कारण आसपासचे लोक वेफर्स खाऊ लागले तर त्यांना तेही आवाज तीव्रतेने ऐकू येऊन त्रास होऊ लागतो.
https://www.youtube.com/watch?v=Bi-81RYhdlk

सुरुवातीस एक यशस्वी वृत्तनिवेदक म्हणून कारकीर्द घडलेल्या अभिजीत खांडकेकर या अभिनेत्याने व्यक्त केलेली खंत :
“ आपल्याकडे चांगलं बोलणाऱ्यांची वानवा आहे, त्याहून अधिक म्हणजे, चांगलं मराठी बोलणाऱ्यांची वानवा आहे आणि त्याहीपेक्षाही अधिक म्हणजे, चांगलं मराठी निवेदन करणाऱ्यांची तर अजूनच वानवा आहे !”

माझी जुनी फेसबुक पोस्ट :
---
चित्रकथा आणि विचित्रकथा- दोघांमध्येही हमखास येऊ शकणारं नाव- पाब्लो पिकासो. पिकासोच्या कथांचं आणि किश्श्यांचं पुस्तक तयार होईल इतका ऐवज हे साहेब आपल्यामागे सोडून गेले आहेत. पिकासोचा लहरीपणा, समकालीनांशी त्याची मैत्री आणि कडवटपणा, त्याच्या आयुष्यातल्या स्त्रिया याबाबत आजवर अनेक ठिकाणी भरभरून लिहिलं, बोललं गेलं आहे. पिकासोने चित्रकलेच्या अनेक शैली निर्माण केल्या, वाढवल्या आणि जगभर प्रसिद्ध केल्या. या थोर चित्रकाराला अफाट किर्ती आणि प्रसिद्धी मिळाली. विसाव्या शतकातला सर्वात जास्त चर्चा झालेला कलाकार म्हणजे पिकासो.

ओल्गा (Olga Khokhlova), मारी (Marie-Thérèse), डोरा (Dora Maar) अशा अनेकींसोबत पिकासो नांदला. या अशा अनेक स्त्रियांची त्याने अजरामर अशी चित्रंही काढली. अनेक वेळा लपून प्रकरणं केल्यानंतर मात्र त्याला कंटाळा आला, आणि जाब विचारला गेल्यावर सरळ हात उडवायचे प्रकार त्याने सुरू केले. डोरा आणि मारी एकदा समोरासमोर आल्यावर त्याने सरळ 'मारामारी करा!' असं सांगून टाकलं. इतकंच नव्हे तर साहेबांनी ही मारामारी अविस्मरणीय होती असं लिहिलं, शिवाय त्यावर 'बर्ड्स इन अ केज' नावाचं चित्रंही काढलं!

दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान पिकासोने कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्याचं हे 'कम्युनिस्ट' होणं हे सोय म्हणून, तत्त्वज्ञान पटले म्हणून, साम्राज्यवादाला विरोध म्हणून किंवा महायुद्धादरम्यान त्याच्यासारख्या अतिप्रसिद्ध व्यक्तीने काहीतरी बाजू घ्यायलाच हवी होती म्हणून- यापैकी काय खरं होतं- याचा कधीच अंदाज येऊ नये- अशी रीतसर व्यवस्था पिकासोनं केली. हे खरंतर त्याच्या स्वभावाला अनुसरूनच होतं. पिकासोची चित्रकला मात्र कम्युनिझमला उभे आडवे छेद देणारी होती. वास्तववादाचं वेड असलेल्या कम्युनिस्ट पक्षाने त्याच्या गर्निका (*Guernica* - 1937) सारख्या (दुसर्‍या महायुद्धाचा विध्वंस आणि त्याआधीची अंगावर येणारी अस्वस्थता दाखवणार्‍या) चित्राचं थंड स्वागत केलं. याउलट पिकासोच्या चाहत्यांना 'हा कम्युनिस्ट झाल्याने त्यानं पुरेशी प्रतीकं वापरली नाहीत, त्यामुळे ते तितकं विखारी झालं नाही..' असं वाटलं. काहींनी 'हे पिकासोचं काम वाटत नाही' असंही म्हटलं.

गंमत म्हणजे 'शांतीचं प्रतीक कबुतर' ही त्याची काहीशी स्वप्नवादी कल्पना मात्र कम्युनिस्टांसकट सार्‍या जगाने उचलून धरली. (याच कबुतर नावाच्या पक्षाची त्याने अनेक (सामान्यांना) विचित्र, कुरूप, बेढब वाटतील आणि अस्वस्थ करतील अशी चित्रं काढली आहेत. कबुतर हे 'क्रूर' असतं असं तो म्हणे!) स्टालिनचं निधन झाल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाने जेव्हा पिकासोकडे चित्र काढून द्यायची मागणी केली तव्हा पिकासोने विचित्र, बालिश वाटणारा स्टालिन काढून दिला. कम्युनिस्ट पक्षाने गडबडीने आणि तातडीने ते चित्र 'डिसओन' केलं तेव्हा पिकासो कडवटपणे म्हणाला- मला खरंतर नग्न स्टालिन काढायचा होता!

वरती "गर्निका (Guernica)" या चित्राचा उल्लेख आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान आणि आधी अमानुषतेचं आणि स्पेनमधल्या अस्वस्थतेचं विदारक दर्शन घडवणारं हे चित्र. सरकारला हे चित्र काय असंतोष माजवू शकेल याचा अंदाज आला. पोलिस पिकासोकडे आले आणि या चित्राबाबत जाब विचारू लागले. 'हे तुम्ही का केलंत?' असं पोलिसांनी विचारल्यावर पिकासो म्हणाला, "हे मी नाही, तुम्ही केलं आहे..!"

आणखी एक पोस्ट :
---
लंडनमध्ये १७७५ साली जन्मलेला जेएमडब्ल्यु टर्नर (Joseph Mallord William Turner) हा थोर चित्रकार अनेकांना माहिती असेल. निसर्गचित्रं काढून निसर्गाच्या किमयेला अमर करणारे अनेक चित्रकार होऊन गेले. टर्नरची पद्धत जरा वेगळी होती. त्याची चित्रं प्रामुख्याने समुद्र आणि जहाजं - या विषयांवर काढलेली आहेत. समुद्री लाटांचा जोर, वादळं, आणि त्यांची विध्वंसक शक्ती- हे टर्नरचे खास विषय. त्याची ही चित्र पाहून तो जोरकस टर्ब्युलन्स आपल्याला थेट भिडतो, इतकंच नव्हे, तर हादरवूनही टाकतो. ती भव्यता, अमानुष ताकद आणि समुळ नाश करण्याची शक्ती हे सारं तो त्याच्या खास लाल-केशरी-करड्या-निळ्या रंगांत आणि त्याच्या सिग्नेचर स्ट्रोक्समध्ये कसं दाखवतो हे बघण्यासाठी तरी टर्नरची चित्रं बघायलाच पाहिजेत.

सगळ्या प्रखर बुद्धीवंतांत आपल्यासारख्या सामान्यांना 'वेडसर' वाटेल अशी एक झाक असते, तशी टर्नरमध्येही होतीच. शिवाय हा गृहस्थ 'टिपिकल ब्रिटिश'! एकदा घरोघर जाऊन जनगणना करण्याचं काम नगरपालिकेने सुरू केलं तर टर्नर महाशय आपली सगळी घरं कुलुपबंद करून थेम्स नदीत एका बोटीत जाऊन बसले. शिरगणती पूर्ण होईतो हे साहेब नदीतच वल्हवत ये-जा करत राहिले. हेतू काय? तर- या मुर्खांमध्ये माझी गणना होता कामा नये!
('सवासो करोड देशवासियों'- ऐकू आल्या आल्या आमचे एक मित्र साहेब- 'मी नाही, मी नाही. एकशे चोवीस कोटी नव्व्याण्णव लाख नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णव म्हणा!'- असं ओरडायचा ते आता आठवलं. )

नुकताच प्रशांत दामले यांना (सपत्नीक) यशवंत वेणू पुरस्कार मिळाला. गतवर्षी या समारंभात जेव्हा संजय (व सुकन्या) मोने यांना शाल व श्रीफळ दिले होते तेव्हा ते म्हणाले होते,

"आम्ही मुंबईकर असल्याने शाल अंगावर पांघरून फिरू शकत नाही. त्याचा विचार करून आमच्यासारख्या पुरुषांना पोशाखाचा प्रकार भेट देण्यात यावा.

संयोजकांनी हे लक्षात ठेवून यंदा दामले यांना सदरा भेट दिलेला आहे. या कार्यक्रमात दामले यांनी तो उंच धरून सर्वांना दाखवला.

Pages