भाग पहिला: https://www.maayboli.com/node/87035
भाग दुसरा: https://www.maayboli.com/node/87043
भाग तिसरा: https://www.maayboli.com/node/87056
हवामानाच्या अंदाजानुसार आजसुद्धा पाऊस असणार होता पण प्रत्यक्षात आकाश अगदी मोकळं होतं. नंतर दिवसभरही पावसाने विश्रांतीच घेतली होती. आजपासून आम्हाला यासिनचा ड्रायव्हर बशीर फिरवणार होता. तो अगदी वेळेत आला. त्याच्या चेहेऱ्यावर एवढे रागीट भाव होते की मला बी आर चोप्रांच्या महाभारतातल्या दुर्योधनाची आठवण आली. फारसं काही न बोलता त्याने गाडी सुरु केली. आज आम्ही खीरभवानी मंदिर, मानसबल सरोवर आणि वूलर सरोवर पाहणार होतो. यातलं खीरभवानी मंदिर सोडलं तर बाकी दोन्ही जागांना पर्यटक फारसे भेट देत नाहीत. सध्या ट्युलिपचा हंगाम असल्याने श्रीनगरच्या रस्त्यांवर ट्रॅफिक खूप होतं. बशीरने दुसऱ्या रस्त्याने गाडी बाहेर काढली. अक्ख्या जगाचा राग आलाय असा चेहरा करून तो गाडी चालवत होता. हा आम्हाला यासिनसारखं माहिती वगैरे सांगेल की नाही याची खात्री नव्हती. पण एकदा गाडी ट्रॅफिकमधून बाहेर काढल्यावर तो आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टीबद्दल व्यवस्थित बोलायला लागला.
गंदरबलला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी मोहरीची शेती
खीरभवानी मंदिर गंदरबल जिल्ह्यात तुलमुला गावात आहे. तासाभरात आम्ही तिथे पोहोचलो. इथे सैनिकांचा कडक बंदोबस्त होता. हे मंदीर काश्मीरमधल्या अगदी मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे अतिरेक्यांच्या धमक्या मिळूनही हिंदू पुजारी मंदिर सोडत नाहीत. इथल्या देवीचे स्थान एका चिंचोळ्या कुंडात आहे. मंदिराच्या चोहोबाजूने पाणी असते. या पाण्याचे रंग ऋतुमानानुसार बदलतात. पाणी काळसर झाले असता पुढे येणाऱ्या संकटांची नांदी मानली जाते. कुंडाच्या पाण्यात फुले आणि दूध अर्पून देवीची पूजा केली जाते. एकेकाळी काश्मीरमध्ये शाक्यपंथीयांचे प्राबल्य होते आणि ही त्यांची आराध्यदेवता होती. खीरभवानी मंदिराचे प्रवेशद्वार
खीरभवानी मंदिराचा प्रशस्त परिसर आणि त्यात असलेली हनुमान आणि शंकराची मंदिरे
चिनार वृक्षाची पाने
खीरभवानीचे मुख्य मंदिर आणि भोवताली असणारे रंग बदलणाऱ्या अद्भुत पाण्याचे कुंड
खीरभवानी (उजवीकडची)
या देवस्थानाबद्दल एक आख्यायिका आहे की देवी मूळची श्रीलंकेतली. रावणाचा निर्दयपणा आणि क्रूरता पाहून तिला तिथे राहायची इच्छा राहिली नाही. तेव्हा रामायणकाळात हनुमानाने तिला इथे काश्मीरमध्ये आणले. पुढे रावणाचा अंत झाला पण देवी काश्मीरमध्येच राहिली. स्वामी विवेकानंदानीही या मंदिराला भेट दिली होती. या मंदिराची अवस्था पाहून ते व्यथित झाले होते. असे म्हणतात तेव्हा देवीने त्यांना दृष्टांत दिला होता की अशा जीर्ण मंदिरात राहण्याचीच तिची इच्छा आहे. तिची इच्छा असेल तर ती स्वतःसाठी सुवर्णजडित सातमजली मंदिरही बनवू शकते.
मंदिराच्या पटांगणात चिनार वृक्षांची झाडं आहेत. मंदिराचे पटांगणंही प्रशस्त आणि स्वच्छ आहे. देवीचे दर्शन घेतलं की पेलाभर तांदळाच्या खिरीचा प्रसाद मिळतो. काल युसमर्ग आणि चरर-ए- शरीफला स्थानिक लोक सोडून बाकी पर्यटक फारसे दिसत नव्हते. इथे मात्र मराठी आणि बंगाली पर्यटक खूप मोठ्या संख्येने होते. तांदळाची खीर (खीरभवानीचा प्रसाद)
मंदिरातून बाहेर आलो तर सासूबाईंना काश्मिरी वस्तूंचं दुकान दिसलं. त्यांनी स्वतःसाठी एक छोटी पर्स घेतली. ते पाहून बशीर म्हणाला की या दुकानांमध्ये दोन नंबरचा माल मिळतो. तुम्हाला अस्सल कलाकुसरीच्या वस्तू हव्या असतील तर मी तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईन. बशीरच्या बहिणीच्या नवऱ्याचा केरळला काश्मिरी कलाकुसरीच्या वस्तू विकायचा व्यवसाय आहे. पर्यटन बंद असते तेव्हा बशीर तिथे जाऊन त्याला मदत करतो.
इथून ५-६ किलोमीटर अंतरावर मानसबल सरोवर आहे. आम्ही पंधरा वीस मिनिटात तिथे पोहोचलो. आम्हाला तिथे सोडून बशीर गाडी पार्क करायला गेला. सरोवराच्या किनाऱ्याजवळच सुंदर बाग होती आणि अगदी समोर शिकाऱ्यांची रांग होती. इथे बोट राईड करूया का विचारल्यावर सगळे तयार झाले. आम्हाला शिकाऱ्यावाल्यांशी बोलताना पाहून बशीरने कॉल केला. तो म्हणाला," अरे आप यहापे शिकारा राइड मत करना. इससे अच्छा दल मे होता हैं." आम्ही त्याला म्हटलं," टेन्शन नही. इधर भी करेंगे और उधर भी."मानसबलच्या किनाऱ्याचे उद्यान
मानसबलचे शिकारे
इथल्या शिकाऱ्यांची रचना दलमध्ये असणाऱ्या शिकाऱ्यांपेक्षा वेगळी होती. दर ठरवल्यावर आम्ही शिकाऱ्यामध्ये बसलो. मानसबल दलपेक्षा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे ह्याचा तिथल्या लोकांना खूप अभिमान होता. तिथून हिमालयाच्या पर्वतरांगेचे सुंदर दर्शन होत होते. थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला झरोका मुघल बागेजवळ आणून सोडले. शिकारावाला म्हणाला," तुम्ही बागेत निवांत फिरून या. आम्ही इथेच तुमची वाट पाहत थांबतो." उतरल्यावर प्रसादला किनाऱ्याजवळ चतुर उडताना दिसले. त्याने आम्हाला पुढे जायला सांगितले आणि स्वतः फोटो काढायला सुरुवात केली. फक्त काश्मीर खोऱ्यात आढळणारी डॅम्सेलफ्लाय/टाचणी - काश्मीर डॅम्सेल
मानसबलच्या काठावर वसलेले काश्मिरी गाव
मानसबल किनाऱ्यावर राहण्याचा अनुभव काय विलक्षण असेल?
काश्मीरचे आरस्पानी सौंदर्य
या सरोवराचे पाणी इतके नितळ आहे की तळाशी असणाऱ्या पाणवनस्पती दिसतात
झरोका बाग मानसबल सरोवराच्या उत्तरेच्या काठावर वसली आहे. ही बाग मुघल सम्राट जहांगीरच्या पहिल्या पत्नी पत्नी नूरजहानसाठी बनवली गेली होती. एखाद्या झरोक्यातून पाहावे तसे इथून मानसबल सरोवराचे अत्यंत मनोहारी दर्शन घडते. मानसबल दर्शन - झरोका मुघल बागेतून
उत्तरेच्या काठावरचा विशाल चिनार
आम्ही पायऱ्या चढत बागेत जात असताना दोघेजण आमच्याकडे आले. त्यांनी विचारलं," मानसबल कि स्पेशल डिश है यहा के मछली का कटलेट. क्या आप खाओगे?" मी काही बोलणार त्या अगोदर त्याने मी मंदिरात कपाळावर लावलेला गंध पाहिला आणि म्हणाला," आप खीर भवानी होके आये हैं क्या? तो फिर फिश नही खायेंगे आप. फिर कहावा या चाय ही पी लिजिए." आम्ही होकार दिला. झरोका मुघल बाग
बागेमध्ये फेरफटका मारून होईपर्यंत त्या माणसाने कहावा आणि चहा आणून दिला. कहावा पिऊन झाल्यानंतर शिकारा आम्हाला घेऊन पुन्हा किनाऱ्यावर आला. भूक लागली होती. इथे खाण्यापिण्याच्या फार सोयी नव्हत्याच. एक स्टॉल दिसला. त्याच्याकडे शाकाहारी पदार्थ फार कमी होते. त्याने आम्हाला त्यांच्याकडचा पिझ्झा खाऊन बघायला सांगितलं आणि खरंच अगदी अप्रतिम चव होती त्याची. कहावा
पाणथळ पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी मानसबल एक उत्तम ठिकाण आहे. इथल्या सरोवरात वाढणाऱ्या कमळांचे कंद हा स्थानिक लोकांच्या उत्पन्नाचा एक स्रोत आहे. ते याची विक्री करतात तसेच या कंदाची भाजीही केली जाते. पक्षीनिरीक्षणासाठी ठाण मांडून बसायला उत्तम जागा
सरोवराच्या किनाऱ्यावर एक प्राचीन मंदिर होते. खाऊपिऊ झाल्यांनतर आम्ही तिथे गेलो. खीरभवानी प्रमाणेच हे मंदिर देखील कुंडात होते. एक मुस्लिम व्यक्ती त्या मंदिराची देखरेख करत होती. आम्हाला येताना पाहून त्याने आपल्या डोक्यावरची टोपी काढून बाजूला ठेवली. मंदिराबद्दल माहिती सांगितली. आम्हाला माशांना घालण्यासाठी काही खाऊही दिला. आम्ही त्याला काही पैसे दिले, ते त्याने घेतले. इथे लावलेल्या माहिती फलकानुसार इसवी सन ८००-९०० च्या दरम्यान या मंदिराचे बांधकाम राजा अवंतिवर्मन किंवा शंकरवर्मनच्या कारकिर्दीत करण्यात आले असावे. बराच काळ या मंदिराचा खालचा अर्धा भाग जमिनीत गाडला गेला होता. मंदिराकडे जाणारा रस्ता
पाण्यातील मंदिर
प्रसाद आणि मी
कळसाच्या दर्शनी भागात दिसणारा गणपती
आता संध्याकाळ होत आली होती. म्हणून वुलर सरोवराला जायची घाई केली. हे आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे. याचे जुने नाव आहे, महापद्मसर. भारतात ज्या पाणथळ जागांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाला आहे, त्यापैकी हे एक सरोवर आहे. पण हा दर्जा मिळूनसुद्धा ह्या सरोवराची दुर्दशा थांबली नाही. अजूनही सरोवरावर चहुबाजूने शेतीसाठी अतिक्रमण होत आहे. कचरा टाकणे, स्थलांतरित पक्ष्यांची शिकार हे नित्याचेच आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर - वुलर
आम्ही ऐकले होते की इथे दुपारनंतर वाऱ्याचे वादळ उठण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे बोटींग करताना सरोवराच्या मध्यभागी नेत नाहीत. सरोवराच्या काठाकाठाने फिरवून आणतात. वुलरमधून नौका चालवणारा काश्मिरी गावकरी
वुलरच्या काठावर वुलर वँटेज पार्क हे एक सुंदर उद्यान आहे. इथून सरोवराचे काही सुंदर फोटो काढता आले. इथून सूर्यास्त फार छान दिसतो असं म्हणतात. पण आम्हाला अंधार पडेपर्यंत तिथे थांबायचं नव्हतं. त्यामुळे एका सुंदर अनुभवाला मुकलो. वुलर वँटेज पार्क
वुलरवरून दिसणारी संध्याकाळ आणि उरीपासून गुरेझपर्यंत दिसणारा परिसर
वुलरवरून दिसणारे प्रत्येक दृश्य हे स्वप्नवत होते
वँटेज पार्कात दिसलेला हुदहुद पक्षी
होमस्टेमध्ये पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. इथे एक चांगलं होतं. अगदी खेळीमेळीचं वातावरण असायचं. इलहाम आणि त्याची आई मस्त गप्पा मारत बसायचे. इक्राममध्ये काम करणारे अमित आणि प्रिया हे जोडपं पश्चिम बंगालचं होतं. अमित बराचसा आमच्या घरी काम करणाऱ्या शंकर काकांसारखा दिसत होता म्हणून की काय शांभवीने लगेच त्याच्याशी मैत्री केली. वुलर पाहून आलो म्हटल्यावर इलहामने आम्हाला तिथून तीन तासाच्या अंतरावर असणारे गुरेझ व्हॅली हे ठिकाण सुचवलं. तो नुकताच तिथे जाऊन आला होता. त्या जागेबद्दल आणि तिथल्या स्थानिक लोकांबद्दल त्याने आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. वुलर सरोवराबद्दल बोलताना तो खूप हळहळला. त्याच्या चहुबाजूने अतिक्रमण होऊन वुलर आता मरणपंथाला लागलं आहे असं सांगत होता. नेहेमीप्रमाणे इलहामच्या बाबाने मात्र मानसबल मंदिराचे फोटो पाहिल्यावर त्याचं भाषण सुरु केलंच. "अरे ऐसे मंदिर तो आपको काश्मीर के हर एक गाव में दिखेंगे. आपने ऐसे सुना होगा की काश्मिरी मुसलमानोने मंदिर तोड दिये. पर ये सच बात नाही हैं."मंदिरोंमे पूजा करनेवाले लोग भी हर एक गाव में दिखेंगे क्या असं विचारायची खूप इच्छा होती. पण शिवशिवणाऱ्या जिभेला घातला आणि जेवण झाल्यावर आम्ही झोपायला गेलो. दुसऱ्या दिवसापासून प्रसादची कॉन्फरन्स सुरु होणार होती.
पुढील भाग - https://www.maayboli.com/node/87106
हा पण भाग मस्त! सगळे फोटो खूप
हा पण भाग मस्त! सगळे फोटो खूप सुंदर आले आहेत.
खीरभवानी परिसर खूप छान आहे. मला पण अर्धी वाटी खीर मिळाली होती.
मानसबल इतक्या जवळ होते तिथून! पण आम्हाला पुढे सोनमर्गला जायचे असल्याने ते जमलेही नसते.
काल परवाच वाचलं की वूलर जवळजवळ ३० वर्षांनी कमळाnनी भरून गेले आहे.
धन्यवाद. वुलर आणि मानसबल
धन्यवाद.
वुलर आणि मानसबल पाहण्यासारखे आहेच.
सुंदर भाग व फोटो.
सुंदर भाग व फोटो.
मानसबल परीसर व वुलर सरोवराचं चित्रण पाहून जायची इच्छा होते आहे.
वुलर सरोवराचा उल्लेख राजतरंगिणीतही येतो. ललितादित्याने तिबेटचा बीमोड करण्यासाठी चीनला महापद्मनाग सरोवराजवळ त्यांची सैनिकी छावणी उभारण्याची परवानगी दिली होती. पण चीनी सैन्याने त्याचा लाभ घेतला नाही.
खीरभवानी मंदीर परीसरात सीआरपीएफ कॅंप आहे का अजून? ९० च्या दशकातला हिंसाचार सुरू होण्याआधी काही वर्षं त्या कुंडातले पाणी लालभडक दिसायचे अशी दंतकथा आहे.
त्या प्रांगणात एका छोट्या हॉटेलमध्ये अप्रतिम दम आलू खाल्ला होता.
खरे तर वर वर गोड बोलणारे हे
खरे तर वर वर गोड बोलणारे हे कश्मिरी मुस** मनात द्वेष करत असतात. ( माझा हा अनुभव ३० वर्षापुर्वीचा आहे पण तेव्हा तश्याच तिथे ठिणग्या उडालेल्या होत्या.)
धंद्यासाठी फक्त हे आपल्याला सहन करतात असे वाटते खरे. असो. तुम्ही हुज्जत नाहि घातली हे बरं कारण हे पालथ्या घड्यावर पाणी प्रकरण असतं. पैदा होताच त्यांच्यात तशी समजूत(द्वेष?) भरली असते मनात.
छान झालाय भाग.
अप्रतिम आलेत फोटो
अप्रतिम आलेत फोटो
तुम्ही हुज्जत नाहि घातली हे
तुम्ही हुज्जत नाहि घातली हे बरं कारण हे पालथ्या घड्यावर पाणी प्रकरण असतं. >>> बरोबर. माझ्या बोलण्याने काही फ़रक पडणार नव्हता. उगाच भांडून का ट्रिप खराब करा.
९० च्या दशकातला हिंसाचार सुरू
९० च्या दशकातला हिंसाचार सुरू होण्याआधी काही वर्षं त्या कुंडातले पाणी लालभडक दिसायचे अशी दंतकथा आहे. >> हो. हे ऐकलं होतं.
मस्त फोटो व वर्णन… खीरभवानी
मस्त फोटो व वर्णन… खीरभवानी मंदिर आम्हीही पाहिले. अगदी छोटेसे मंदिर पण आजुबाजुचा परिसर मोठा. आमच्या लिस्टमध्ये नव्हते पण जायच्या वाटेवर होते म्हणुन ड्रायव्हरला तिथे न्यायला लावले.
देवीला पुढे काय होणार हे आधीच कळते तर अशा राक्षसी अत्याचारांपासुन निदान बायका व मुलांना तरी वाचवायचे होते. असो. बोलण्यासारखे काही नाही
सरोवरे खुपच सुंदर आहेत. फोटो पाहुन आमची चुकली याची हळहळ वाटली
. परत कधी गेले तर नक्कीच जाईन.
मी दोनदा श्रीनगरला गेलेय. तिथले लोक आपल्यासारखेच वाटले. आता जन्मापासुन भारतद्वेष शिकवलाय त्यांना त्याला ते तरी काय करणार. तिथे इन्डस्ट्रीज नाहीत त्यामुळे घाऊक रोजगार नाहीत. खाजगी बँका व सरकारी कार्यालये ह्याच नोकरीच्या संधी. त्यात सरकारी नोकर्या वशिल्यांच्या तट्टुंनी भरलेल्या. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही चांगली नोकरी मिळत नाही, इन्जीनियरीग करुनही ड्रायव्हर सारखी कामे करावी लागतात. आणि हे लोक बिहार/युपीकरांसारखे इतरत्र जाऊन स्थिरावत नाहीत. आम्हाला भेटलेले काश्मिरी अगदी गोव्यापर्यंत पोचले पण न आवडुन परत गेले. हवामानाचाही फरक पडतो. काश्मिरसारख्या स्वर्गात राहणारा माणुस इतरत्र रखरखाटात व प्रदुषणात कितपत जमवुन घेईल.
हे फ्रस्ट्रेशनही कुठेतरी बाहेर पडतेच ना. मागच्या सफरीतला ड्रायव्हर इन्जिनीयर झालेला होता. तो अगदी यंग अँग्री मॅन होता, म्हणे आमच्या जीवावर अख्खी इन्डिया चालते, आम्ही कमावतो. त्याच्याशी अजुन काय हुज्जत घालणार, तो स्वतःच पिडीत आहे बिचारा.
तरी २०१३ व २०२५ मधल्या काश्मिरीत खुप फरक जाणवला.
ललितादित्याने तिबेटचा बीमोड करण्यासाठी चीनला महापद्मनाग सरोवराजवळ त्यांची सैनिकी छावणी उभारण्याची परवानगी दिली होती. पण चीनी सैन्याने त्याचा लाभ घेतला नाही >>>>>
नशिब म्हणायचे. एकदा तळ ठोकला असता तर जीव गेला तरी तिथुन हलले नसते.
नशिब म्हणायचे. एकदा तळ ठोकला
नशिब म्हणायचे. एकदा तळ ठोकला असता तर जीव गेला तरी तिथुन हलले नसते.
>>>
नाही. त्यावेळी चीन वीक होते. तिबेटचा बीमोड कारण्यासाठी त्यांना ललितादित्याची मदत घ्यावी लागली होती.
देवीला पुढे काय होणार हे आधीच
देवीला पुढे काय होणार हे आधीच कळते तर अशा राक्षसी अत्याचारांपासुन निदान बायका व मुलांना तरी वाचवायचे होते. >> खरं आहे.
>>>>निदान बायका व मुलांना तरी
>>>>निदान बायका व मुलांना तरी वाचवायचे होते.
पुरुषांनीच काय घोडं मारलय?
अगं जीवावरचे संकट आले की आधी
अगं जीवावरचे संकट आले की आधी मुले व स्त्रिया यांना वाचवायचे असा संकेत आहे. त्यानंतर वेळ उरला तर पुरुष.
मुले पिढी पुढे नेतात आणि स्त्रिया त्यांचे पालनपोषण करतात. अशा तर्हेने पुर्ण नामशेष होण्यापासुन ती जमात/लायनेज वाचु शकते. आधी पुरुषांना वाचवले तर ते एकटेच त्यांची लायनेज कशी पुढे नेणार?