प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन व त्याचे कुटुंब यांना मी माझ्या लहानपणीपासून ओळखतो >>> मला कळेना की फा ने हे खरोखरचे लिहिले आहे की उपरोधाने. सचिन पिळगावकरबद्दल असते तर नक्कीच उपरोधीक आहे हे समजले असते, पण इथे कुंडलकर आहेत.

“ मला कळेना की फा ने हे खरोखरचे लिहिले आहे की उपरोधाने.” - प्रतिभावंतांच्या तर्हा Wink Happy

हे फा ने खरेच लिहिले आहे. मागे एकदा भरत यांच्या एका धाग्यावर कुंडलकरांविषयी चर्चा झाली होती तेव्हा त्याने मला दुसरीकडे सांगितले होते. मला वाटले "कुणीकडून याच्या नातलगांना नावे ठेवली.." Happy

Lol नाही खरोखरच लिहीले आहे. आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहीले आहे, माझ्या नाही. .

आणि त्याच्या लेखनाला, चित्रपटाला नावे ठेवलीत तर ती "त्याला" होत नाहीत. तेव्हा बिनधास्त. मलाही त्याचे लेखन, पिक्चर झेपत नाहीत.

तू तेव्हाही हेच सांगितले होतेस, म्हणून मग मी नंतरही कोबाल्ट ब्लू आणि अय्याचा विषय निघाला की ठेवत राहिले. Lol

बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो !
कित्येक वर्षांपासून अमेरिका हा वैज्ञानिक प्रतिभेचा स्वर्ग मानला जातो. परंतु सध्याची परिस्थिती तशी नाही. अमेरिकेतील कित्येक प्रतिभावंत संशोधक सध्या अमेरिका सोडून युरोप किंवा आशियात जात आहेत. अमेरिकेतील संशोधन निधीमध्ये अचानक घट झाल्यामुळे अनेक प्रकल्प बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

https://www.lokmat.com/editorial/american-association-for-advancement-of...

https://www.nature.com/articles/d41586-025-00938-y

https://insightintoacademia.com/us-faces-brain-drain/

प्रसिद्ध भारतीय इंग्रजी साहित्यिक रस्किन बाँड हे नुकतेच 91वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,
“मी रोज सकाळी उठतो ते व्यायाम करण्यासाठी नाही तर लेखन आणि वाचनासाठी !”

वाचनाचा मजकूर आता अगदी नाकाजवळ धरावा लागतो तरी पण ते आवडीने वाचतात. ‘She sells sea shells by the seashore’, यासारखी वाक्ये पटकन म्हणणे हा त्यांचा छंद असून अजूनही ते न अडखळता म्हणू शकतात.

सचिन कुंडलकर मुलाखत छान आहे.>>> +११
<‘She sells sea shells by the seashore’, यासारखी वाक्ये>> छान ! कॉलेजात असताना हा खेळ बऱ्याच वेळेला खेळलो आहे

Shakespeare
ही व्यक्ती नक्की कोण होती याबद्दल जसे प्रवाद आहेत तसेच खुद्द या नावाचे स्पेलिंगचीही 'बहुरूपी' आहे.
शेक्सपियर जिवंत असताना देखील त्याच्यासह अनेकांनी हे स्पेलिंग भिन्न प्रकारे लिहिलेले आढळले होते.

David Kathman या लेखकाने थोडेफार संशोधन करून या विभिन्न स्पेलिंगचा (Shakespere, Shakespear, Shakspeare, इ.) विदा देखील गोळा केलेला आहे.
(https://en.wikipedia.org/wiki/Spelling_of_Shakespeare%27s_name)

अरुण टिकेकर यांच्या ‘कालांतर’ पुस्तकात असे म्हटले आहे,
“शेक्सपियर हा शब्द सुद्धा किमान 4000 प्रकारे लिहिलेला आढळतो, असे म्हणतात”.

या संदर्भात एकेकाळी Bernard Shawनी तर विनोदाने असे म्हटले आहे,
“शेक्सपियरने स्वतःचे 11 अक्षरी नाव जर 7 अक्षरात लिहिले असते, तर आयुष्यभरात त्याच्या हातून दोन-तीन नाटके अधिक लिहिली गेली असती !

Giovanni della Casa
हे 16 व्या शतकातील प्रसिद्ध इटालिय कवी, धर्मोपदेशक आणि मुत्सद्दी. त्यांनी Galateo या नावाचे एक 100 पानी पुस्तक लिहिले होते ते त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1558 साली प्रसिद्ध झाले. Galateoचा अर्थ ‘द रूल्स ऑफ पोलाइट बिहेवियर’ अर्थात, समाजात कसे वागावे आणि वागू नये. या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे.

मुळात पुस्तकाचे नाव हे त्यांच्या एका जिवलग मित्राचे नाव होते. हे पुस्तक युरोपात प्रचंड लोकप्रिय झाले व त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. युरोपातील प्रबोधनपर्वात या पुस्तकाचा प्रभाव संपूर्ण युरोपीय संस्कृतीवर पडला आणि त्यातूनच तिथे शिष्टाचाराला महत्त्व प्राप्त झाले.

कालांतराने त्या पुस्तकाचे विशेषनाम असलेले शीर्षक इटालिय भाषेत शिष्टाचारसंहिता या अर्थाने सामान्यनाम बनले. चालू शतकातही त्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत असतात.

https://en.wikipedia.org/wiki/Il_Galateo

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या हजरजबाबीपणाबद्दलचा हा किस्सा.
त्यांच्या एका समारंभात एक स्त्री त्यांच्याजवळ आली आणि स्वतःची ओळख करून देताना म्हणाली,
"माझे सासरे अमेरिकेच्या सैन्यात चीफ कमांडर होते. माझे पती कर्नल पदावरून निवृत्त झाले. आता माझा मुलगाही वयात आला आहे. त्याला एखादे पद देऊन देशसेवा करण्याची संधी द्या".

त्यावर लिंकन तिला पटकन म्हणाले,
" खूप देशसेवा केली की, आपल्या कुटुंबाने. आता देशसेवा करण्याची संधी इतरांनाही द्या !"

आणि हा एक किस्सा.
अब्राहम लिंकन चे चित्र तुम्ही पाहिले असेलच.
कुणीतरी त्यांची चेष्टा करण्यासासाठी विचारले ."माणसाचे पाय किती लांब असावेत ?"
लिंकननी ताबडतोब उत्तर दिले , "जमिनी पर्यंत पोहोचतील एव्हढे."

President Calvin Coolidge हे मितभाषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना cool cal असे म्हणत.
एका डिनर पार्टीच्या वेळी पत्रकाराने विचारले, "मिस्टर प्रेसिडेंट, मी माझ्या मित्रा बरोबर बेट घेतली आहे की मी तुमच्याकडून दोन शब्दांपेक्षा जास्त शब्द वदवीन. तेव्हा कृपा करून काहीतरी बोला."
तेव्हा उत्तर आले, "You lose."
तुम्ही जर नेट वर शोध घेतला तर ह्यावाद्दल तुम्हाला बरीच गमतीदार माहिती मिळू शकेल.

आशा भोसले यांनी गायलेली हिंदी चित्रपटातील बरीच बिनधास्त आणि कामुक गाणी खूप लोकप्रिय झालीत. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम” ही काही उदाहरणे. या संदर्भातील काही आठवणी त्यांनी सांगितल्यात.

एकेकाळी त्यांनी संगीतकार आर डी बर्मन यांच्याकडे तक्रार केली होती की ‘अशा’ प्रकारची सगळी गाणी तुम्ही नेहमी मला देता आणि ‘छान, चांगली’ वगैरे लताला देता. त्यांच्या काही गाण्यांवर रेडिओ व दूरदर्शनने देखील काही काळ बंदी घातलेली होती.

‘पिया तू . .’ गाण्याच्या निर्मितीवेळेसचा हा किस्सा :
हे गीत मजरुह सुलतानपुरीनी लिहिलंय. जेव्हा त्याचे ध्वनीमुद्रण चालू होते तेव्हा मजरुह स्टुडिओतून तडकाफडकी निघून गेले व जाताना ते आशांना म्हणाले,
“बेटी, मैने गंदा गाना लिखा है; माझ्या मुली जेव्हा वयात येतील आणि त्या हे गाणे म्हणतील तेव्हा काय वाटेल?”

अर्थात या गाण्याच्या निर्मितीच्या वेळेसच आरडींनी खात्रीपूर्वक सांगितले होते की हे गाणे जबराट यशस्वी होणार आहे आणि तसेच झाले.
https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/i-wrote-a-dirt...

कुमार सरांच्या या पानावरच्या सर्वच पोस्ट्स माहितीपूर्ण आहेत.
रस्किन बाँड यांचं या वयातलं वाचन पाहून थक्क व्ह्यायला होतं.

बिलियर्ड मधे द मॅजिशियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या एफ्रेन रायन यांचे सुप्रसिद्ध जादूई शॉटस
https://www.youtube.com/watch?v=4L0cORiUmpk

मैत्र दोघांचे !
10 जुलै हा जी ए कुलकर्णी यांचा जन्मदिन तर जयवंत दळवी यांचा जन्मदिन १४ ऑगस्ट.

त्या दोघांची 35 वर्षे चांगली मैत्री होती आणि दोघे एकमेकाची खेचाखेची देखील भरपूर करायचे. परंतु जी ए यांच्या मृत्यूनंतर दळवींनी ललित मासिकातील लेखातून त्यांच्यावर बरेच शरसंधान केले होते. त्यातले काही मुद्दे :
1. जी ए भूमिगत असल्यासारखे वागायचे परंतु खरे तर हा त्यांच्या तर्कटी प्रतिमानिर्मितीचा एक भाग होता.

2. ते एका बाजूला प्रसिद्धीबद्दल तुच्छता दाखवायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यांना प्रसिद्धीचे आकर्षण होते.

3. अनेक प्रसंगी जी ए मुद्दामहून त्यांच्याशी खोटे बोललेले नंतर उघड झाले. हा खोटेपणा कित्येक वेळा प्रमाणाबाहेर गेल्याचे दिसले.

4. त्यांच्या सर्व कथांची भाषा जवळपास एकसुरी, काहीशी कृत्रिम आणि अवघड अलंकारांनी ठासून भरलेली असते.

आणीबाणी च्या काळात दुर्गा भागवतांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठा वरून जयप्रकाश नारायण ह्यांच्या प्रकृती साठी प्रार्थना केली होती. तेव्हा त्यांच्या बरोबर केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण हेही उपस्थित होते.

* जयप्रकाश नारायण ह्यांच्या प्रकृतीसाठी >>> अच्छा !

यावरून जेपींच्या प्रकृती संदर्भातील तेंडुलकरांनी त्यांच्या ‘हे सर्व कोठून येते?’ या पुस्तकात दिलेला एक प्रसंग आठवला. इंदिराबाईंनी आणीबाणी उठवली होती आणि त्यानंतर जेपी मात्र शरीराने पार थकले होते व घायाळ झालेले होते. तेव्हा त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल केले होते. तेंडुलकर त्यांना भेटायला गेले आणि त्याबद्दल ते असे लिहितात,
“ . . .जे पी आता पार खिळखिळे झालेले वाटत होते. चेहरा रक्तहीन, ओढला गेला होता. डोळे निर्जीव बघत होते. मला पण त्यांनी हात जोडले. . . त्यांच्या खोलीतली सत्यसाईबाबांची तसबीर तेवढी आता नीट आठवते. . .”

इथे तेंडुलकर वरील वर्णन करून थांबतात आणि तसबीरीवर काहीही टिप्पणी करत नाहीत हे विशेष आहे. तत्त्वनिष्ठ आणि विवेकवादी असलेल्या जेपींच्या तिथल्या खोलीत सत्यसाईबाबांची तसबीर कशी, हा प्रश्न वाचकांच्या मनात येतो आणि त्यावरील तर्कवितर्क तेंडुलकर वाचकांसाठी सोडून देतात !

( कुणी लावली असेल ती तसबीर ? हॉस्पिटलच्या व्यवस्थापनानेच की जेपींच्या हितचिंतकाने ? ती जेपींना खटकली कशी नाही ? . . वगैरे. वाचकांनी तर्क करत बसावेत किंवा सोडून द्यावे.) Wink

चित्रकार शिद फडणीस यांच्या शंभरीनिमित्त पुण्यात जो कार्यक्रम झाला त्याचे एकेक भाग आता युट्युबवर येत असून त्यातून काही छान किस्से ऐकायला मिळत आहेत.
मंगला गोडबोले यांनी सांगितलेला हा किस्सा :

गोडबोलेंनी पूर्वी असे विधान केले होते की, 1960 -70 च्या दशकात मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या रसिकतेसाठी फडणीस-वसंत सरवटे-पु.ल. हे ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत !”

तेव्हा काही लोकांनी या विधानाला झोडले देखील होते.

>>>>तेव्हा काही लोकांनी या विधानाला झोडले देखील होते.
कोणतेही विधान केले तरी काही लोक झोडतातच. Happy

शि द फडणीस सरांकडे बाबा शिकले. त्यांना त्या वेळी चांदेकर नावाचे पण सर होते. ते बहुधा नाटकात काम करायचे.
त्यांचे किस्से खूप ऐकलेत. फडणीस सरांची चित्रं मासिकात यायची. भेटता आलं नाही याची रूखरूख आहे.

*शि द फडणीस सरांकडे बाबा शिकले. >>> अरे वा ! छान योग
...
शिद जेव्हा ऐन तारुण्यात विविध प्रकाशनसाठी चित्रे काढत होते तेव्हा त्यांनी पाडलेला हा एक पायंडा :

त्यांनी केशवराव कोठावळे यांना काही चित्रे काढून दिली होती. त्यातली काही नापसंत ठरली होती. परंतु काही दिवसांनी फडणीसांनी नापसंत पडलेल्या 'रफ स्केचेस 'चे सुद्धा बिल कोठावळ्यांकडे पाठवले. कोठावळ्यांनी ते नाराजीने का होईना पण दिले.

श्रमांची किंमत हा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे..

आणीबाणी च्या काळात दुर्गा भागवतांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठा वरून जयप्रकाश नारायण ह्यांच्या प्रकृती साठी प्रार्थना केली होती. तेव्हा त्यांच्या बरोबर केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण हेही उपस्थित होते. >>> हे खरे म्हणजे नॉर्मल वागणे आहे. हे आता आवर्जून बातमीसारखे वाचले जाईल इतकी वाईट अवस्था आहे!

जयप्रकाश नारायण हे नास्तिक होते का? मला माहीत नाही. नास्तिक नसतील तर तस्वीर खटकण्याचे कारण नाही.

सरवट्यांची पुलंच्या पुस्तकातली चित्रे पाहिली आहेत. त्यावरून ती अप्रकाशित चित्रे सुद्धा भारी असतील असे वाटते.

अत्र्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलेला किस्सा आहे. विन्स्टन चर्चिल यांना नागव्याने अंघोळ करून तसेच बाहेर यायची सवय होती. एकदा सवयीने ते तसेच घरात फिरत होते, परंतु तिथे त्यांची वाट बघत रुझवेल्ट येऊन बसले होते. अचानक अमेरिकन अध्यक्षाच्या समोर हे दृश्य, त्यामुळे दोघेही थोडे अवघडले. पुढच्याच क्षणी चर्चिल म्हणाले, "The Prime Minister of Great Britain has nothing to conceal from the President of the United States".

हा किस्सा Churchill's Naked Encounter म्हणून प्रसिद्ध आहे. किस्सा बहुतेक अमेरिकेतच चर्चिलच्या भेटीदरम्यान घडला. Bath - म्हणजे त्याला हमामखाना म्हणता येईल - अशा ठिकाणातून नागवे बाहेर येऊन फिरणे common आहे. ही सवय अनेक गोऱ्यांना अजूनही आहे हे पाहिलं आहे swimming pool जवळचे शॉवर, gym changing room वगैरे ठिकाणी.

विन्स्टन चर्चिल यांना नागव्याने अंघोळ करून तसेच बाहेर यायची सवय होती. >>> म्हणजे पुलंनी आर्किमिडिज च्या "युरेका" ची कहाणी सांगितली ती खरीच असावी असे मला आता वाटत आहे Happy

Pages