२६ जुलै २००५, मुंबई.
दुपारच्या चहानंतर बातम्या येऊ लागल्या की कुठे कुठे पाणी भरतयं, लोकल्स उशिरा धावतायत (लोकल्स म्हणजे तेव्हा तरी मुंबईची जीवनवाहिनीच होती). तोवर दिवसभर आत एसीत बसून कॉम्पुटरमध्ये डोकं खुपसलेल्या आम्हाला बाहेर कोसळणाऱ्या पावसाची सुतराम कल्पना नव्हती. पटापट सगळं आवरून लॉग ऑफ करून खाली येऊन बघते तो, आज जो तो बस पकडण्याच्या घाईत होता. रस्ताभर कंपनी बसच्या मोठ्या रांगा लागलेल्या. मी ही माझी नेहेमीची बस हेरून सीट पटकावली. हां हां म्हणत काही मिनिटांतच बस भरून, निघाली सुद्धा.
एरव्ही सीपझ ते कांजूरमार्ग हे १५ मिनिटांचे अंतर कापायला संध्याकाळी रहदारीच्या वेळी चाळीस एक मिनिटे सहज लागत. आज तर पावसाचं निमित्त होतं त्यामुळे बस शनै चालली होती. उताराचा रस्ता असल्यामुळे दुतर्फा पाणी वाहत होते. त्या मुसळधार पावसाची वाऱ्याची तमा न बाळगता एक ट्राफिक पोलीस उभा राहून. पावसात सिग्नल्स बंद झाल्यामुळे, वाहतूक नियंत्रण करत होता. त्याला बघून क्षणभर चमकले आणि नंतर वरमले - रस्ते, रहदारी एकूणच सरकारी यंत्रणेला नाव ठेवणारे आम्ही घराकडे पळत होतो आणि तो ?
बसमध्ये कर्णोपकर्णी बातम्या पसरायाला लागल्या - ठाण्यापर्यंतच लोकल चालू आहेत, डोंबिवली -कल्याणपुढील गाड्या रद्द झाल्यात वगैरे वगैरे. आमची सॊफ्टवेअर कंपनी, त्यामुळे तेव्हातरी बसमध्ये मुलींची (महिलांची) संख्या अगदीच बोटावर मोजण्या एवढी. लांब राहणाऱ्या मुलांचं पुढे काय करायचं ह्याचं प्लॅनिंग चाललेलं.
माझ्या मागे बसलेली निशा उल्हासनगरची आहे ह्याची मला कल्पना असल्यामुळे काळजीपोटी मी तिला हटकलं.
“आगे की ट्रेन्स बंद है, तुम लोग क्या करनेवाले है?”. ती आणि आभा, तिची मैत्रीण, दोघीही जरा काळजीतच दिसल्या. मग मीच तिला सुचविलं ,
“आमच्याकडे चला, उद्या सकाळी पाणी ओसरलं की घरी जा.“
तशी आमची फक्त तोंडओळख होती. पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार!
बस थांब्यापाशी येईतो चांगलेच अंधारले होते. पावसाचा जोर काही अजूनही ओसरला नव्हता. आता रस्त्यावर अगदी तुरळक गाड्या दिसत होत्या. रिक्षा मिळायची शक्यता दिसत नव्हती. घर तसं लांब होतं पण तरी चार किमीच अंतर चालण्याच्या आवाक्यातले होते.
वाटेत आईच घर लागलं तेव्हा एकदा वाटलं मध्ये डोकवावं तिच्याकडे, पण त्या चिंब भिजलेल्या अवस्थेत, बरोबरच्या त्या दोघांना घेऊन जायचा विचार रद्द केला. उगाच तिची तारांबळ उडायची.
त्यात भर म्हणजे चालताना मध्येच डोक्यात एक कीडा सतावायला लागला, हे खराब पाणी/ जंतू जखमेतून आत शिरले तर? - त्याचं काय झालं होतं की २-३ आठवडयांआधी मला एक किरकोळ अपघात झाला होता. तेव्हा गुडघ्याला झालेली जखम आणि लिगामेंट इंजुरी अजून बरी झाली नव्हती. पण त्या रात्री तो लंगडणारा पाय निमूट सहकार्य करत होता.
तंगडतोड करून घरी पोहचलो तर पूर्ण अंधारच साम्राज्य, त्यातच फोन वाजत होता.
***
२००५ ला मोबाईल फोन सर्रास सगळ्याकडे नसत. अर्थात आतापर्यंत हे तुमच्या लक्षात आलं असेलचं. नवर्याकडे असणाऱ्या मोबाईलवरून तो घरी फोन करत होता. आम्ही निघाल्याच्यानंतर पाणी चढायला लागलं होतं त्यामुळे आमच्या नंतर निघालेल्या त्याला कांजूरपासून पायी यावं लागलं होतं.
दीड दोन तासांनी, ( २० किमी अंतर चालून ) तो घरी आला. तोपर्यंत आमच्या बिल्डिंगच्या खाली गुढघाभर पाणी झालं होतं. तो येताना ५ मिनिटांवर राहणाऱ्या सासूबाईंकडे जाऊन आला होता. त्यांची बिल्डिंग थोडी खालच्या अंगाला असल्यामुळे तेथे अजून जास्त पाणी साचले होतं. त्यामुळे तळमजल्यावरील मंडळी बाडबिस्तरा घेऊन वरती त्यांच्या घरी जमली होती. आईला सोबत मिळाल्यामुळे त्याला जरा हायसं वाटलेलं जाणवलं.
पण एक चिंतेची बाब होती ती म्हणजे - माझे सासरे, वय वर्षे ७०, जे (सांगली जवळील) गावाला गेले होते, त्यांचा दुपारी फोन येऊन गेला होता की त्यांच्या थोरल्या भावाला, वय वर्षे ९०, ह्यांना काही दुखापत झाल्यामुळे, ते दोघा गावाहून गाडीने निघणार होते. त्यांना संपर्क करून थांबवणे किंवा इकडची परिस्थिती सांगणे शक्य नव्हते.
पावसामुळे स्वयंपाकाच्या मावशींची दांडी झालेली त्यामुळे आम्हा चौघांच्या जेवणाची व्यवस्था बघायला हवी होती. अंधारात तसेच डाळ-तांदूळ धुतले, कुकर लावला. सगळे इतके दामले होते. तशीच जेवण उरकली.
बहीण पोहोचली का ते बघायला तिला फोन केला तेव्हा तिच्याकडून कळलं की आई आणि बिल्डिंग मधील एक काकू सकाळीच खरेदीसाठी काळबादेवीला (दक्षिण मुंबईला )गेल्या होत्या. त्या दोघी अजून घरी पोहोचल्या नव्हत्या म्हणजे नक्कीच कुठेतरी अडकल्या असाव्यात. दोघींकडेही मोबाईल नसल्यामुळे निश्चित काही कळायला मार्ग नव्हता. झालं अजून एक घोर वाढला!
सकाळी उठून बघतो तर, पाण्याची पातळी वाढतच चाललेली. मंदपणे चढणारे ते पाणी तळमजला गिळंकृत करत पहिल्या मजल्याकडे कूच करत होते. मला अजूनही आठवतय, दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून दिसणारे ते दृश्य पोटात खड्डा पडणारे होते. आम्ही त्या चढणाऱ्या पाण्याकडे हताशपणे बघत राहिलो.
भवतालचे चढते पाणी, प्रवासात असलेले वयस्कर सासरे - चुलत सासरे, अज्ञात ठिकाणी अडकलेली आई ह्या सगळ्या गंभीर समस्यांव्यतिरिक्त वीज नसल्यामुळे पाणी पुरवठाही बंद होणे, चौघांत मिळून फक्त एखाद पातेली पाणी असणे ह्या किरकोळ समस्याही होत्या. त्यावेळी मॅगी नामक देवी मदतीला धावून आली. घरात मॅगीची २-३ पाकीट सापडली, आहे त्यातील अर्धे पाणी वापरून मॅगी केली आणि त्यावरच चौघांचे उदरभरण झाले.
थोड्या वेळाने अचानक कोणीतरी जादू करावी तसं पाणी झरझर ओसरू लागलं - एक तर पाऊस थांबलेला , आणि बहुदा ओहोटी सुरु झाली असावी.
मध्यंतरीच्या काळात समजले की आई-काकू ट्रेनमध्ये अडकल्या आहेत, बिल्डिंगमधील दोघे तिघे त्या दोघींना हुडकायला बाहेर पडले आहेत. काही वेळाने वीज पुरवठा सुरु झाला. लोकलगाड्या सुरु झाल्याचं कळलं. आभा,निशा त्यांच्या घरी गेल्या. सासरे सुखरूप घरी पोहोचले तेही कुठल्याही पुरात न अडकता.
आई आणि काकू घरी पोहोचल्या. मुंबईच्या स्पिरिटचा प्रत्यय रात्रभर पावसापाण्यात अडकलेल्या आईने अगदी जवळून घेतला, तो “मुंबई स्पिरिट” या लेखात वाचायला मिळेल.
कालांतराने कळत गेले की, तोपर्यंतच्या जगाच्या इतिहासातील आठव्या क्रमांकावर नोंद होईल इतकी ( ३७. ७ इंच ) अत्युच्च पातळी गाठणाऱ्या पावसाने पश्चिम किनारपट्टीवरील मुंबई - कोकण ह्या भागाला झोडपून काढले.
गावच्या गाव पाण्याखाली गेली, कित्येक जीव वाहून गेले. अनेक संसारांचे अक्षरशः चिखल झाले, हजारो गाड्या-वहाने-बसेस पाण्यात बुडाल्या, कार्यालये, कचेऱ्या, वाचनालये, दवाखाने सगळीकडे दैना उडालेली.
पण त्या परिस्थितीतही, “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा”, म्हणत माणसं उभी राहिली.
“कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे “,
ह्या कुसुमाग्रजांच्या उक्तीप्रमाणे लोक कामाला जुंपले. काही दिवसांत/ आठवड्यांत/महिन्यात एकमेकांच्या साथीने पुन्हा ती घरं, गावे पूर्ववत झाली.
****
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”
भगवद्गीतेतील कर्मयोग सांगतो, आपण निष्ठेने, सत्याचा मार्ग अनुसरून फक्त आपले काम करत राहावे, बदल्यात कोणत्याही फळाची अपेक्षा न करता.
ही शिकवण पारमार्थिक / वैचारिक संदर्भात कितीही पटली, ती अंगिकारायचा प्रयत्न केला तरी कधी कधी अशी परिस्थिती येते की तिच्यपुढे आपण हतबल होतो. अशावेळी मन व्यावहारिक आधार शोधायला लागत.
त्यावेळी माझीही काहीशी तशीच गत झाली होती- आम्ही घरात अडकलो होतो, आमच्या घरातील दोन ज्येष्ठ व्यक्तींचा ठावाठिकाणा नव्हता, पूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटत होती.
शेवटी मनातल्या मनात त्या कार्मिक शक्तीला शरण गेले.
म्हंटल मला जशा ह्या दोघी, निशा आणि आभा, अडचणीत आहेत हे जाणवले, त्यांना काडीचा आधार द्यायची सुबुद्धी झाली किंवा सासूबाईंच्या घरात तेथील रहिवाशांना तात्पुरता निवारा मिळाला, तसचं कोणीतरी/ काहीतरी त्याही दोघांना लाभो. तत्क्षणी माझ्या आवाक्यात तेव्हढच होतं.
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर (अनंत पाटील)
हा आशावाद म्हणजे सध्याच्या जगात निव्वळ भाबडेपणाच, हे माहित असूनही वेडं मन कुठेतरी आधार चाचपडत राहत बहुधा तसंच काहीसं झालं असावं!
****
त्या सर्व अपरिमित हानीमध्ये आमचा हा वीस वर्षांपूर्वीचा अनुभव तसा अगदीच मुंगीएव्हढा, पण तरी तो मनावर कोरला गेला.
तो दिवस अजूनही आठवत राहतो - ती पाण्याची वाढणारी पातळी, त्याचवेळी घरात वापरायला नसलेले पाणी, घरातील मंडळींच्या बाबतची अनिश्चितता, आणि
शेवटी कर्माचे फळ कुठेतरी पदरी पडावे ह्यासाठी आस लावून बसलेली अगतिक मी!
मलाही आज सकाळी २६ जुलै तारीख
मलाही आज सकाळी २६ जुलै तारीख बघून हीच आठवण झाली होती. तुमच्या आईंचा लेख आता वाचते. तुमच्या आठवणी वाचायला आवडल्या.
अनपेक्षितपणे जास्त दिवस रहायला मिळालं. तीन चार दिवस राहून, गाड्या सुरू झाल्याची खात्री करून मग निघालो. तरी गाड्या अनियमितच होत्या. प्रचंड गर्दी. मी तर जवळजवळ सगळा प्रवास उभ्यानेच केला. टप्प्याटप्प्याने एसटी बदलत, कधी सिक्स-सीटरने असा तो प्रवास झाला! एरवी तीनचार तासांचाच, पण त्या दिवशी मात्र लांबलचक आणि दमवणारा झाला.
मी आणि माझी आई त्या दिवशी अलिबागला, माझ्या मामाकडे होतो. (आमचं घर श्रीवर्धन तालुक्यात. आजीची तब्येत जरा नरम होती म्हणून तिला भेटायला तीनचार दिवस मामाकडे राहिलो होतो.) २६ जुलैला तिथेही दिवसभर पाऊस पडलाच. नेमकी माझी मामेबहीण, जी तेव्हा शाळकरी होती, तिच्या शिक्षक आणि शाळेतल्या काही मुलामुलींच्या बरोबर गाडीतून मुंबईला गेली होती शाळेच्या कसल्याशा कार्यक्रमाला. पण सुदैवाने ते लोक दुपारीच मुंबईतून बाहेर पडले आणि संध्याकाळी-रात्री अलिबागला पोचले. दुसऱ्या दिवशी हळूहळू मुंबईतल्या बातम्या समजल्या. मुंबईत राहणारी मामेबहीण असेच कित्येक किलोमीटर चालत जाऊन नातेवाईकांकडे जाऊन राहिली होती.
आम्ही दुसऱ्या दिवशी श्रीवर्धनला जायला म्हणून निघालो आणि मुंबई-गोवा रस्त्यावर वडखळला पोचल्यावर बघतो तर जिकडेतिकडे पाणी साठलेलं. एसटी तशीच मागे फिरून अलिबागला परत आली. आम्ही परत मामाच्या घरी.
वावे तुमच्या आठवणी सांगितल्या
वावे तुमच्या आठवणी सांगितल्या बद्दल धन्यवाद!
दुपारीच मुंबईतून बाहेर पडले>> थोडक्यात बचावले.
मुंबईत राहणारी मामेबहीण असेच कित्येक किलोमीटर चालत>> ही त्या वेळी बऱ्याच जणांना असेच चालत जावे लागले होते. ती सुखरूप पोहोचली ही महत्वाचे.
२६ जुलै. चा पावसाचा थरार
२६ जुलै. चा पावसाचा थरार अजुनही आठवतो. एक चांगले होते की. विज नसली तरी लँडलाईन चालु होते.
आमच्या कॉलनीमधली ८ वी तली मुलगी सोसायटीच्या गेट वरुन वाहात गेली होती.
८ वी तली मुलगी सोसायटीच्या
८ वी तली मुलगी सोसायटीच्या गेट वरुन वाहात गेली होती. >> भयानक!
त्यावेळी अशा बातम्या ऐकल्या होत्या... इतकं विदारक होत.
प्रत्येकाच काहींना काही नुकसान झालेलं, .. तरी लोकं एकमेकांना शक्य तेव्हढी मदत करत होते.
>>>>>>आमच्या कॉलनीमधली ८ वी
>>>>>>आमच्या कॉलनीमधली ८ वी तली मुलगी सोसायटीच्या गेट वरुन वाहात गेली होती.
भयंकर आहे हे.
व्हॉट्ट्ट!!!
१००० पेक्षा जास्त लोकं त्यात
१००० पेक्षा जास्त लोकं त्यात गेले होते.
Hmm..
Hmm..

फारच विदारक परिस्थिती होती.
फारच विदारक परिस्थिती होती. आमचे काही नातेवाईक गिरगावातच राहिल्याचे आठवतेय.
आमच्या कॉलनीमधली ८ वी तली मुलगी सोसायटीच्या गेट वरुन वाहात गेली होती. >> आई ग्ग
फारच वाईट
२६ जुलै. चा पावसाचा थरार
२६ जुलै. चा पावसाचा थरार अजुनही आठवतो. एक चांगले होते की. विज नसली तरी लँडलाईन चालु होते.
आमच्या कॉलनीमधली ८ वी तली मुलगी सोसायटीच्या गेट वरुन वाहात गेली होती.
नवीन Submitted by साहिल शहा on 30 July, 2025 - 08:44 >>>>>>>>> सापडली का हो मग ती ? विचारपूस केली होती का नंतर तिच्याबद्दल कोणी ?
आमच्या कॉलनीमधली ८ वी तली
आमच्या कॉलनीमधली ८ वी तली मुलगी सोसायटीच्या गेट वरुन वाहात गेली होती.>>> घराजवळच राहणारा माझा शालेय मित्र प्रितम शिंदे कुर्ला - सफेद पूल इथून वाहून गेलेला, चौथ्या दिवशी त्याचं प्रेत माहीमला सापडलेलं.... त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वापरलेल्या निलगिरीचा दर्प आजही त्याच घटनेशी संलग्नता राखून आहे.... 😢
बाप रे फाविदडि
बाप रे फाविदडि
सापडली का हो मग ती ? >>>
सापडली का हो मग ती ? >>> दुसर्या दिवशी. त्यापुढचे लिहवत नाही. एवढेच सांगु शकतो की त्या काळात आई वडिल कुर्ला - सफेद पूल पासु ३ किमी वर, डोंगराच्या पायथ्याशी राहात होतो आणि तुफान पावसामुळे डोंगरावरुन पाणी आमच्या घरापासुन सफेद पुल आणि मग मिठी नदीतुन समुद्रात जात होते. पाण्याला जबरदस्त प्रवाह होता.
फाविदडि, साहिल
फाविदडि, साहिल
पाण्याला जबरदस्त प्रवाह होता.
पाण्याला जबरदस्त प्रवाह होता.
>>>>
हि भीती मला माहीत आहे. मी अनुभवली आहे एकदा. समजू शकतो. पण शेवटी तुम्ही सुखरूप राहिलात हे चांगले झाले.
भयंकर
भयंकर
