२६ जुलै २००५, मुंबई,
त्या दिवशी आई आणि काकू, दोघी जणी, सकाळी अकराच्या दरम्यान काळबादेवीला निघाल्या. त्यावेळी पावसाचं नामोनिशाण नव्हत. पोहोचायला त्यांना साधारण दीड तास लागला.
मार्केटमध्ये त्यांना पावसाची, ट्रेन उशिरा सोडत असल्याची कुणकुण लागली. तशी लगेच त्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला आल्या. तोपर्यंत मध्य रेल्वेच्या लोकल्स बंद झालेल्या आणि (कधी नव्हे ते) हार्बर गाड्या चालू होत्या. काकूंचे नातेवाईक हार्बरला राहत होते तेव्हा अडकल्यास त्यांच्याकडे जाता येईल ह्या विचाराने त्यांनी हार्बरची गाडी पकडली.
मानखुर्द जवळ गाडी थांबली. एव्हाना ट्रॅकवर पाणी जमायला लागलं होतं. एक तास झाला, दोन तास झाले गाडी पुढे सरकेना. पाऊस तर पडतचं होता.
ज्यांना सहा-सात फुट खोल असलेल्या पण पाण्याखाली गेलेल्या रुळांवर उदड्या टाकण्याचा धीर होता, अशी काही तरुण मंडळी गाडीतून उड्या टाकून तसेच पाण्यातून ट्रॅक क्रॉस करीत निघाले.
तर काही या दोघींसारखे तसेच गाडीत बसून राहिले. अंधार पडायला लागल्यावर आता पूर्ण रात्र गाडीतच काढावी लागणार हे त्यांना कळून चुकलं. आजूबाजूला राहणारी काही मुलं त्या तशा पाण्यातूनही चालत पुढे पुढे जात होती. जातांना ह्या अडकलेल्या लोकांना धीर देत होती, अन्नाची पाकिटे, बिस्किटांचे पुडे, पाणी काही बाही वाटत होती, तसेच रात्र होत असल्यामुळे डब्याचे दरवाजे बंद करायलाही बजावून सांगत होती.
डब्यातल्या एकीकडे एक मोबाईल फोन होता. तोच संपूर्ण डब्यात फिरला. जसे जमेल तसे दोघी - चौघीत मिळून आपापल्या घरी निरोप ठेवण्यापुरता कॉल केला - त्याकाळी इनकमिन्ग आणि आऊटगोइंग दोन्हीला पैसे पडत, तसेच ते आता येव्हढे स्वस्त नव्हते.
मिट्ट काळोख, बाहेर पडणारा धोधो पाऊस, घोंघावणारा वारा, मध्येच धाड धाड वाजणारा बंद दरवाजा! त्या चढणाऱ्या रात्री बरोबर पाण्याची पातळीही झपाझप वाढत चाललेली. एका क्षणी सीटवर बसलेल्या त्यांची पाऊले पाण्यात बुडायला लागली. तशी त्या बसायच्या बाकावर उभ्या राहिल्या. येव्हढे झपाट्याने चढणारे पाणी बघून त्यांच्या तोंडाचे पाणी पळाले. ही काळरात्र आपल्याने निभावेल का हा प्रश्न प्रत्येकीच्या मनाला छळू लागला. त्यातूनच सुरु झाली सामूहिक स्तोत्रे, आरत्या …
रात्री कधीतरी पावासाचे थैमान थांबल. पण सकाळ झाली तरी पाणी काही ओसरल नव्हतं. जस जशी उन्ह चढायला लागली तस पाणी थोडं फार ओसरू लागलं.
आता तरुणांची एक फळी दोरखंड बांधून सुसज्ज होऊन आली. त्यांनी त्या महिला वर्गाला आधार देत हळू हळू एकेकीला बाहेर काढलं आणि रस्त्याच्या कडेला सोडलं.
तोवर बेस्ट बसेस चालू झाल्या होत्या. अशाच एका बसमध्ये त्यांना बसवून दिले आणि अखेर त्या दोघी दुसऱ्या दिवशी दुपारी ( चारच्या दरम्यान )घरी पोहोचल्या.
मुंबई, प्रत्येकाला आपल्यात सामावते, आसरा देते, घास देते, स्वप्न दाखवते, उर्मी देते - तेही अविरत.
कधीही न थांबणारी, घड्याळाच्या काट्यावर चालणारी ही मुंबई आणि सेकंदाच्या काट्यावर पळणारे ते मुंबईकर! वेळ पडल्यास जात, धर्म, भाषा, प्रांत, आर्थिक स्थिती ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीला जागणारं ते मुंबई स्पिरीट!
नैसर्गिक आपत्ती - पूर, महापूर, पाशवी हल्ले - बॉम्बस्फोट, २६/११ यांसारखे कित्येक आघात मुंबईवर झालेले पाहिलेत तसेच त्या आघातानंतर हात पाय गाळून बसून न राहता पूर्वीसारखी परत दिमाखात उभी राहिलेली झळाळती मुंबई सुद्धा पाहिलीये.
चहाच्या टपरीवर, वडापावच्या गाडीवर, लोकलच्या डब्यात, बेस्टच्या लाईनीत चांगल्या वाईटाच्या सरमिसळीत लखलखतं हे मुंबई स्पिरिट! हॅट्स ऑफ टू दॅट स्पिरिट ! सलाम मुंबई!!
*...मुंबई स्पिरिट! हॅट्स ऑफ
*...मुंबई स्पिरिट! हॅट्स ऑफ टू दॅट स्पिरिट ! सलाम मुंबई!!*,- +१. अख्खा जन्मच मुंबईत गेला त्यामुळे अगणित वेळा हे स्पिरीट अनुभवलंय !!!
बापरे ट्रेनमध्ये आत पाणी
बापरे ट्रेनमध्ये आत पाणी शिरलेले.. पाऊस कसला मुंबईच्या मिठी आणि इतर नद्या नाल्यांना आलेला पूरच होता तो..
मी तेव्हा कॉलेजला होतो. माझा अनुभव वेगळाच होता. मला घरी जाणे शक्य असून सुद्धा मी मित्र मैत्रीणीना सोबत म्हणून थांबलो होतो. कॉलेजमध्ये मुले मुली एकत्र, त्या दिवशी हे सारे थ्रिल वाटले होते कारण आम्ही सुरक्षित होतो आणि बाहेर जगात काय चालू आहे याची कल्पना नव्हती. म्हणजे कुठे किती पाणी तुंबले आहे हे समजत होते आणि ते ऐकायला रोचक वाटत होते कारण त्यात लोकांनी आपले जीव गमावले आहेत याची तेव्हा कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी एकेक बातम्या कानावर आदळू लागल्या तसे हादरून गेलो होतो. अपराधी देखील वाटले होते.
थरारक . . . सलाम मुंबई!
थरारक . . .
सलाम मुंबई!
थरारक अनुभव.
थरारक अनुभव.
मी दुसऱ्या लेखाखालच्या प्रतिसादात लिहिलंय की माझी मामेबहीण किती तरी किलोमीटर चालत अंधेरीला नातेवाईकांकडे पोचली. तिनेही नंतर हेच सांगितलं, लोक एकमेकांना खूप मदत करत होते, बिस्किटं, पाणी वगैरे वाटत होते.
मुंबई स्पिरिट! हॅट्स ऑफ टू
मुंबई स्पिरिट! हॅट्स ऑफ टू दॅट स्पिरिट ! सलाम मुंबई!!*,- +1
लोकांनी आपले जीव गमावले आहेत
लोकांनी आपले जीव गमावले आहेत याची तेव्हा कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी एकेक बातम्या कानावर आदळू लागल्या तसे हादरून गेलो होतो.>> खर आहे. जेव्हा ते घडत होतं तेव्हा त्याची भीषणता पूर्ण लक्षात आली नव्हती.
२-३ दिवसांत सर्व एकेक कळत गेले.
भाऊ नमसकर, मंजूताई, कुमार१,
भाऊ नमसकर, मंजूताई, कुमार१, वावे, ऋन्मेऽऽष धन्यवाद!
अतिशय चित्रदर्शी लिखाण. त्या
अतिशय चित्रदर्शी लिखाण. त्या दिवसाच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
फार हॉरिबल होता तो दिवस. मी वाशीत हॉस्टेलला होते. तिथे फार त्रास झाला नाही पण हॉस्टेलची लाईट गेली तरी मेसच्या काकूंनी एवढ्या अंधारात ४-५०० मुलींसाठी खिचडी बनवून वाढली.
माझी एक मैत्रिण बेलापूरमधे काम करत होती. तिला ऑफिसची बस म्हणून आम्हांला टेन्शन नव्हतं. पण ती रात्री पोहोचली नाही, ना तिचा फोन लागत होता. मग मात्र काही सुचेना. झालं असं की ती शेवटी उतरणारी. वाटेत पाणी लागलं तर एकटी काय करणार म्हणून तिच्या मैत्रिणीने तिला स्वतःच्या घरी नेलं. पण त्या बैठ्या घरात तळमजला पूर्ण छाती भर पाण्यात होता. या मुलींनी जमेल तेवढी कागदपत्रं, धान्य वगैरे घेऊन कुडकुडत पहिल्या मजल्यावर रात्र काढली. कपाट वगैरे जड सामान मात्र पूर्ण भिजलं. दुसऱ्या दिवशी पहाटे ती मैत्रिणीचा गाऊन घालून आली तेव्हा आम्हांला जो धक्का बसलेला.
दुसरी मैत्रिण मार्केटींगमध्ये. ती नेमकी कुठे असणार त्याचा पत्ता कुणालाच नसायचा. त्या रात्री ती गांधी मार्केटजवळ कुठेतरी होती. तिथे पटापट पाणी वाढत होतं. काही तरुणांनी जमेल त्या सर्व लोकांना तिथे उभा असलेल्या सर्वांना कंटेनर ट्रकवर चढवलं नी यांचा जीव वाचला. कुर्ला, घाटकोपर, गांधी मार्केट भागात त्या रात्री एक मजला बुडेल एवढं पाणी होतं.
मी मावशीला फोन केला आणि समजलं की दुसरी मावशी आणि एक मावस भाऊ खरेदीला दादरला गेलेत. त्यांच्याकडे मोबाईल नव्हता. ती निघाली तेव्हा दहीसरला पाऊस नव्हता. पण दादरचा पावसाचा रंग बघून मावशीने लवकर खरेदी आटपली. ती परत निघाली. पण बांद्र्याला येऊन ट्रेन बंद झाली. हे लोक ३ तास ट्रेनमध्ये होते शेवटी पावलांजवळ पाणी आलं तसं उतरून कसाबसा हायवे गाठला. हायवेवरून चालत सांताक्रुझपर्यंत पोचल्यावर एका बेस्टबसमध्ये उभं रहायची जागा मिळाली. बसमध्ये एका भल्या माणसाने ज्यांच्याकडे फोन नव्हते त्या सर्वांना आपापल्या घरी फोन करू दिला. पण दूर्दैवाने मावशीच्या घरी फोन लागत नव्हता. थोड्या वेळाने तिने दुसऱ्या मावशीकडे फोन करून सुखरुप असल्याचा निरोप दिला. इकडे मावशीची बस मिलन सबवे परीसरात पोहोचली आणि ब्रिजच्या खाली कंबरभर पाणी. बस ड्रायव्हरने सांगितले की पाणी उतरलं की पुढे जाऊ. रात्रभर हे लोक बसमध्ये. पहाटे कधीतरी आजूबाजूच्या चाळींतल्या मुलांनी बिस्कीटाचे छोटे छोटे पुडे आणि गरम चहा आणून दिला. बस पुढे निघाली. बस अंधेरीपर्यंत होती. तिथे उतरून परत कांदिवलीपर्यंत पायपीट. नंतर रिक्षा मिळाली.
तुमच्या लेखाच्या निमीत्ताने माझ्या मैत्रिणींना व मावशीला व इतर अनेकांना निस्वार्थी मदत करणाऱ्या त्या अनामिकांचे मी इथे आभार मानते.
कुठल्याही अस्मानी संकटात जेव्हा सगळेच हात टेकतात तेव्हा कुणाला न विचारता, कुणावर विसंबून राहता आपापला खारीचा वाटा उचलणारी वृत्ती हेच खरं मुंबई स्पिरीट!!
, खरं आहे!
, खरं आहे!
माझेमन तुम्ही तुमच्या मैत्रिणीचे , मावशीचे अनुभव सांगितलेत _/\_
खूप छान लिहीलेले आहे. मला
खूप छान लिहीलेले आहे. मला आठवतो तो दिवस.
माझेमन,
माझेमन,
टँकर वर चढून रात्र काढली.. त्यावेळी चहूबाजूंनी पाणी चढत असणार... : |
धन्यवाद सामो
मला आठवतो तो भयंकर दिवस.. !
मला आठवतो तो भयंकर दिवस.. ! नंतर पेपरात येणाऱ्या पुराच्या बातम्या, एकेक कहाण्या वाचून सुन्न वाटलं होतं.
मी पालघर स्टेशनला होते. त्या दिवशी डहाणूला जाण्यासाठी विराररून गाड्या सुटल्या नव्हत्या. संध्याकाळी बराच वेळ स्टेशनवर ट्रेनची वाट पाहण्यात गेला होता. पालघरला राहणाऱ्या काकांकडे मुक्कामाला निघणार होतेच तेवढ्यात अनाउन्समेंट झाली की, विराररून ट्रेन डहाणूकरता येत आहे.. मला वाटलं खूप गर्दी असेल ट्रेनला पण बरीच रिकामी होती ट्रेन..!
दुसऱ्या दिवशी नेहमीच्या ट्रेन सुरळीत नव्हत्या म्हणून लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सगळ्या स्टेशनवर थांबा होता.. मी पण अश्याच एका गाडीने ऑफीस गाठलं होतं.
२६ जून २००२ ला असाच पूर डहाणू - पालघर मध्ये आला होता. लेखाने त्या आठवणी जाग्या झाल्या. आभाळ फाटल्यासारखा भयंकर पाऊस कोसळत होता त्यादिवशी. पश्चिम रेल्वेच्या बोईसर - पालघर रेल्वेमार्गावरचा पूल पुराने वाहून गेला होता. एका व्यक्तीच्या ते लक्षात आल्याने तिथून जाणाऱ्या ट्रेनचा अपघात होता - होता बचावला होता. तीन - चार दिवस सगळया ट्रेन ठप्प झाल्या होत्या. बरीच जिवितहानी झाली होती त्यावेळी.. निसर्ग आपलं रौद्ररूप कधीही दाखवू शकतो.. मनुष्याने त्याला कायम गृहित धरू नये .. असं वाटते.
. निसर्ग आपलं रौद्ररूप कधीही
. निसर्ग आपलं रौद्ररूप कधीही दाखवू शकतो.. मनुष्याने त्याला कायम गृहित धरू नये .. असं वाटते. >>> अगदी खरय !
छान लिहिले आहे. थरारक आणि
छान लिहिले आहे. थरारक आणि चित्रदर्शी. माझ्याही त्या दिवसाच्या थरारक आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद.
छान लिहिले आहे. थरारक आणि
छान लिहिले आहे. थरारक आणि चित्रदर्शी>> धन्यवाद!
न विसरण्यासारखीच तारीख आहे.
न विसरण्यासारखीच तारीख आहे.
आता बऱ्याचवेळा होते तसे फ्लश फ्लड किंवा अत्यंत कमी वेळात मुसळधार ढगफुटी पाउस होत नसे.
मी पुण्यात होतो.पिंपरी चिंचवड.
कोल्हापूर मध्ये आईवडील आणि भाउ.
हा सगळीकडे कोसळलेला पाउस होता.
पिंची मध्ये असे पाणी न भरल्याने आणि तेव्हाचे घर ते ऑफिस चालत 15 मिनिटात जात असल्याने ती चिंता नव्हती.
तेव्हा एक ट्रेनिंग होणार होते ऑफिसात 5 दिवसांचे.
पुणे शहर मधून येणारा ट्रेनर ह्या 5 पैकी 2 च दिवस आलेला.
कारण बरेच पूल पाण्याखाली असल्याने ये जा करायला लागणारा फार उशीर.
पुनयातून ऑफिसात येणारे बरेच जण सुट्टीवर जबरदस्ती च्या.
कोल्हापुरात इतका पाउस होउनही आता जसे निम्मे कोल्हापूर पाण्याखाली जाते तसे नव्हते झाले.
घरी landline फोनवर बोलणं झालेलं तर आमच्या गल्लीत जेमतेम पायाचा घोटा बुडेल इतकेच पाणी आलेले.
मुंबईत उडालेली दैना नंतर न्यूजपेपर आणि नेट वर वाचून कळालेलं. माणुसकी आणि मुंबई स्पिरिट ची चर्चा झालेली बरीच.
2019 मध्ये ह्या पेक्षाही कमी पाउस पडून घरात 6 फूट पाणी आलेले पुराचे. त्याची कारणे मानवनिर्मित आहेत.
तुमचे अनुभव विस्तृत पणे
तुमचे अनुभव विस्तृत पणे सांगितल्या बद्दल धन्यवाद!
हे दोन दिवसही पावसाने धुमाकूळ घातल्याचे समजतंय.. :|
मुंबई स्पिरिट! हॅट्स ऑफ टू
मुंबई स्पिरिट! हॅट्स ऑफ टू दॅट स्पिरिट ! सलाम मुंबई!!*,- +१११
मला एकदा अनुभव आहे मुंबई पावसाचा. गांधीनगर ब्रीज खाली खूप पाणी साठलले (अगदी कंबरेपर्यंत किंवा जास्तच अजून) . ऑफीसमधे निघा म्हणून सांगितलेले. पण अनुभवी लोक थांबले होते. मला वाटले पाणी वाढले तर आपण अडकून पडू म्हणून ४ वाजताच निघाले आणि गांधीनगर ब्रीजला एवढे पाणी पाहून माझ्या तोंडचे पाणी पळाले. पण तिथे एवढ्यापाण्यातही लोकल मुले उभी होती, दोरी घेऊन. सगळ्यांना पाणी पार करायला त्यांनी मदत केली. नंतर बसेस बंद होत्या म्हणून मिळेल तसे थोडी रिक्षा, थोडे चालत (जवळपास चालतच) कोपरखैरणे गाठलेले. माझी ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे सवयीने रस्त्याच्या कडेने चाललेले. तेंव्हाही लोकं मधून चाला असे सांगून जात होती. खूप मदत करतात लोक. योग्य मार्गदर्शनही खूप गरजेचे असते अश्यावेळी. नाहीतर कदाचित एखाद्या मॅन होल मधे गेले असते. आता अनुभवाने कळते आहे, तेंव्हा निघायची घाई केलेली
या निमित्ताने तेंव्हाच्या मदतगारांची आठवण झाली.
हो, आहे तिथेच थांबणे किंवा
हो, आहे तिथेच थांबणे किंवा परत फिरणे केव्हाही चांगले.
अनुभवातून हे समजले तरी नेहमीच वापरले जात नाही.
गांधीनगर ब्रीज >>> हा कुठला?
गांधीनगर ब्रीज >> कांजूरमार्ग
गांधीनगर ब्रीज >> बहुदा कांजूरमार्ग
पवईवरून कांजूरमार्गे पूर्व
पवईवरून कांजूरमार्गे पूर्व द्रुतगती महामार्ग लागण्याआधी येतो तो गांधीनगर ब्रिज
बहुधा नाही कारण पुढे चालत
बहुधा नाही कारण पुढे चालत कोपरखैरणे गेल्याचे लिहिले आहे..
पवईवरून कांजूरमार्गे पूर्व
पवईवरून कांजूरमार्गे पूर्व द्रुतगती महामार्ग लागण्याआधी येतो तो गांधीनगर ब्रिज >>>
कारण पुढे चालत कोपरखैरणे गेल्याचे लिहिले आहे>>>. पुर्व द्रुतगती मार्गावरून, मुलुंड पूर्व वरून ऐरोली कडे जाणारा मार्ग आहे.. तेथून पुढे त्या कोपरखैरणे ला गेल्या असाव्यात..
माझी एक मैत्रीण त्या वेळी नवी मुंबई कडून (?) मुलुंड पश्चिम ला चालत गेली होती... असंच त्या पाण्यातून.. नंतर त्यांना मॅन होलस विषयी कळलेलं.. जाताना त्यांच्या डोक्यात ही ते काही नव्हतं..