सिगरेट- एक व्यसन –एके काळची फॅशन स्टेटमेंट

Submitted by रेव्यु on 4 May, 2025 - 09:11

सिगरेट- एक व्यसन –एके काळची फॅशन स्टेटमेंट
(एक स्टॅचुटरी चेतवणी: हा लेख कोणत्याही प्रकारे धूम्रपानाचे समर्थन करत नसून हे एक केवळ स्मरणरंजन आहे).
मी शाळेत जायला सुरुवात केली तेव्हा हिंदी चित्रपटांत नायकांची सिगरेट ओढतानाची एक वेगळीच स्टाईल असायची. ओठांच्या उजव्या बाजूला ती लटकवत डायलॉगबाजी. मग गोल वलये सोडत सोडलेला धूर. व्हिलन लोक तर हमखास सिगरेट ओढायचे आणि मन शत्रूच्या तोंडावर धूर फेकायचे. काही वेळा त्यांच्याकडे भलतेच आकर्षक लायटर असायचे. मला त्या ’हम दोनो’ मधील लायटरवर येणारी धून खूप आवडायची.
इंग्लिश चित्रपट पहायला सुरुवात केली तेव्हा प्रामुख्याने वेस्टर्न सिनेमात बुटाच्या टाचेवर काडी घासून ते ढांसू हिरो चिरुट पेटवायचे... लई स्टाईल वाटायची.
या शिवाय रजनीकांत सारख्या सुपरहिरोंची सिगरेट वर फेकून ओठात पकडणे व पेटवणे अशा स्टाइली देखील होत्या.
मी फॅक्टरीत लहान वयात अप्रेंटिस म्हणून लागलो. त्या काळात फॅक्टरीत कामाच्या जागी आणि ऑफिस मध्ये सुध्दा धूम्रपान निषिध्द नव्हते. बरेच लोक सिगरेट ओढायचे. चहा, जेवण या नंतर घोळक्याने सिगरेट ओढणारे असायचे. त्या काळात चारमिनार, पनामा या फिल्टर शिवाय आणि मग विल्स, विल्स फ्लेक या फिल्टरवाल्या आणि मग एकदम उच्चभ्रू म्हणजे फाय्फायफाय म्हणके स्टेट एक्स्प्रेस (अन त्यावर स्पेशली ब्लेंडेड फॉर हर मॅजेश्टी असे लिहिलेले असायचे-मग आमच्या डोळ्यासमोर एलिझाबेथ बाई सिगरेट ओढताना असा काही तरी कल्पना विलास असायचा). या शिवाय महाग ब्रॅन्ड म्हणजे डन्हिल. काही सिगरेटी आयात व्हायच्या... कॅमल, रॉथमन इ.
मी धूम्रपान एकदा दोनदाच केले. आवडले नाही.
चारमिनार हा अत्यंत स्ट्रॉन्ग ब्रॅन्ड समजला जायचा अन तो स्वस्त देखील होता. त्याची एका पाकिटाची किंमत चार आणे असायची
साधारण 1 रुपयात विल्स फिल्टरचे 10 चे पाकिट आणि काडेपेटी मिळत असे. आणखी एक गंमत म्हणजे पानाच्या दुकानावर एका गोल डब्यात सिगरेटच्या पुठ्ठ्याच्या डब्याच्या बारीक पट्ट्या कापून ठेवलेल्या असायच्या आणि त्या पुढे एक ढणढणती चिमणी असायची. अड्ड्यावर रात्रीच्या वेळी झुरका मारायला अनेक मित्र जमा व्हायचे.
या शिवाय काही जण स्वत:ची सिगरेट बनवायचे. त्यांच्या कडे त्या सिगरेटच्या तंबाखूची चपटी डबी आणि ते कागद वेगळे असायचे . मग ते स्टायलीत ती तंबाखू बारिक करून मग त्या कागदावर ठेवून सुरळी करायचे अन हातभर जीभ काढून त्या कडा चिकटवायचे अन मग आरामात झुरका ओढायचे.
विड्या सामान्यत: गरीब लोक ओढायचे. याला अपवाद म्हणजे हिप्पी जमात. यांनी विडी त्यांच्या जमातीत लोकप्रिय केली.
या व्यतिरिक्त पाईप ओढणार्‍यांचा रुबाब वेगळा असायचा. मला या लोकांबद्दल खूप कुतुहल असायचे. पहिले म्हणजे माझा गोड (गैर)समज होता की पाईप ओढणारे सैन्यात कर्नल ब्रिगेडियर वगैरे, फॅक्टरीत केबिन मध्ये बसणारे खूप उच्च स्तराचे --- व्हीपी इ.- बॉस लोक, स्पेशॅलिस्ट डॉक्टर किंवा चित्रपटातील व्हिलन असतात.... हा गोड गैरसमज अजूनही आहे. अशोककुमार तर मला वाटायचा की पाईपबरोबरच जन्माला आला होता .
य़ा पाईपवाल्यांकडे स्वत:चे टूलकिट असायचे. त्यात ती पाईपची वाटी खरवडायला एक दाभण वजा काडी, तंबाखू भरल्यावर ती दाबायला एक औजार आणि एक लायटर असायचा. ही मंडळी हा समारंभ करताना अत्यंत मग्न व्हायची अन एक झुरका झाल्यावरच पुढील संभाषण सुरू व्हायचे. माझा एक बॉस तर एसी ऑन करून, खिडक्या उघडून हे उपद्वयाप करायचा.
या बहुतेक व्यसनी मंडळीचे ओठ काळपट आणि बोटांची टोके पिवळसर असायची.
या शिवाय एकच सिगरेट दोघांनी आळीपाळीने ओढून सिगरेटद्वारे प्रेम शेअर करणार्‍यांची जमात वेगळी असायची.
आजही विमानतळावर त्या पिंजर्‍यात जाऊन घोळक्याने , ... अन घाईघाईने सिगरेट ओढून बाहेर येणार्‍यांना पाहून मला गंमत वाटते.
माझे काही कंजूष मित्र, सिगरेट अर्धी ओढून विझवत आणि पुन्हा डबीत ठेवत. पुढच्या खेपेस ती पुन्हा काढून पेटवत तेव्हा त्यांच्या पेक्षा मलाच कसेसे होत असे ( काहीही कारण नसताना!).
काही जणांकडे हस्तीदंती वगैरे सिगरेट होल्डर असायचा. काही जणांकडे चपट्या डब्या असायच्या. त्यावर नक्षी असायची. त्यातून ही मंडळी स्टाइलीत एकच सिगरेट काढायचे अन फट्ट असा आवाज करत ती डबी खटक्यात बंद करायचे. काही जणांकडे कंपनीचा 25 वा 50 सिगरेटींचा डबा असायचा.
परदेशातील माझ्या भेटीत जपानी, चिनी आणि कोरियन मंडळी सर्वात जास्त धूम्रपान करणारी मला भेटली.
सिगरेटच्या पाकिटांचा संग्रह करणारे देखील असायचे. या शिवाय कोणी फॉरेनला गेले की दर्दी लोक स्टेट एक्स्प्रेस इ. चे अख्खे कार्टन मागवायचे. उदारीकरणानंतर अशा गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत.
हल्ली धूम्रपान हे स्टाईल स्टेटमेंट मानले जात नाही. त्याशिवाय त्याच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांची जागतूकता बरीच आहे. किंबहुना जगभरात धूम्रपानाचे प्रमाण कमी होत चालले आहे.
पण ते एक वेगळे विश्व होते हे मात्र नक्की!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bhari lekh, धूम्रपान करायची सवय 2012 च्या आसपास लागली, मग 2013 la हे उपद्व्याप सोडले, मग काही वर्षांनी पुन्हा 2021 la हळू हळू आठवड्याला एक सुरू झाली, 2024 ते 2025 ते प्रमाण पुन्हा रोज दोन वर आले , मग कुठेतरी धोक्याची घंटा जाणवली, आता गेले 15 दिवस एकही सिगारेट ओढलेली नाही आणि पुन्हा 100 दिवस ( पहिला टप्पा) ओढायची नाही असे ठरवले आहे

अशोककुमार तर मला वाटायचा की पाईपबरोबरच जन्माला आला होता .
>>> मला असं प्राणबद्दल वाटायचं

खुसखुशीत लेख.....

स्मरणरंजन आवडले. आमच्या कॉलेज मध्ये हे वेड चालू होतेच. बहुतेक डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयर ला आलेली मुले जास्ती ओढायची असे वाटते. मग प्रमाण कमी कमी होत गेले. पण कंपनी मध्ये काही काही लोक बॉस बरोबर खाली टपरीवर जाऊन चहा सिगारेट करायचे ते उगीच प्रेफरन्स त्यांना मिळतो असे वाटायचे.

तुमचे चिनी, कोरियन लोकांबद्दलचे निरीक्षण बरोबर वाटते.

आता इथे तर त्या व्हेपिंग चे फॅड वाढते आहे. कॉलेज मधली किंवा त्याहून लहान मुले पण ते व्हेप करत असतात. त्यांना सिगारेट वाईट हे कळत असते पण व्हेपिंग पण वाईट आहे हे समजत नाही किंवा त्या वेगवेगळ्या फ्लेवर्स चे आकर्षण वाटते आणि मग सोडवत नाही.

छान लेख!

माझे बहुतांश मित्र सिगारेट ओढणे म्हणजे एक स्टाईल याच विचारांनी त्या नादाला लागले होते.
आता तसा समज राहिला नसेल तर चांगलीच गोष्ट आहे.

सिगारेटचे आकर्षण चित्रपटामुळे आले हे खरे असावे.
अशोककुमार, अजित, प्राण किंवा एखादा व्हीलन जे पाईप किंवा मोठी सिगार ओढायचे त्याचे आकर्षण कितपत असावे कल्पना नाही. पण अँग्री यंग मॅन अमिताभ ज्या स्टाईलने सिगारेट ओढायची त्याची क्रेझ कोणालाही लागावी असे प्रकरण होते.

पर्सनली मला आमच्या पिढीत कोणा हिरोला सिगारेट ओढताना बघून आकर्षण वाटले नाही. पण मित्रांना सोबत म्हणून म्हणा की आणखी काही कारण असेल, आम्ही दोघातिघांनी इतर सिगारेट ओढणाऱ्या मित्रांसोबत गुडंगगरम ट्राय केली होती काही वेळा. सुदैवाने मला त्यात मजा वाटली नाही म्हणून वाचलो. एकजण अडकला ते कायमचा.

आमच्यावेळी हुक्का प्यायचे फॅड सुद्धा नव्यानेच आले होते. महागडे प्रकरण होते, पण पोरे पैश्याचा जुगाड करून जायचे. मी नव्हतो कधी गेलो.

पण आता आमच्या शाळेतल्या मित्रांची पिकनिक जाते तेव्हा वेगवेगळ्या फ्लेवरचा हुक्का हा डीजे आणि दारूसारखाच अनिवार्य आयटम झाला आहे.
पण मी कुतूहल म्हणून सुद्धा त्या वाटेला जात नाही. कारण अश्या बाबतीत काय आवडेल, आणि कुठून सुरुवात होत आपण कुठे खेचलो जाऊ याची कधीच खात्री देता येत नाही.

*कारण अश्या बाबतीत काय आवडेल, आणि कुठून सुरुवात होत आपण कुठे खेचलो जाऊ याची कधीच खात्री देता येत नाही.* - केवळ ह्या एकाच मौलिक विचारामुळे मी इतर व्यसनांच्या वाटेलाच गेलो नाही; सिगारेटची मात्र मी मजा चाखली व दुष्परिणामही भोगले आहेत !
(लीन युटांग हा अमेरिकन साहित्यिक व चिनी संस्कृतीचा अभ्यासक. चीनच्या संस्कृतीच्या विविध पैलूंवर त्याचं एक छान वाचनीय पुस्तक आहे. ( The importance of living ).. त्यात सिगारेट या विषयावर एक पूर्ण प्रकरणच आहे. तो या व्यसनाला लेडी निकोटीनची पूजाच म्हणतो ! Wink )

मिले धूर मेरा तुम्हारा तो धूर बने हमारा! पगार झाल्यावर
पहिला आठवडा- अवंती, 555
दुसरा आठवडा- 4 स्क्वेअर,विल्स नेव्हीकट,
तिसरा आठवडा -सिलेक्ट, नाउ,
चौथा आठवडा- कैची बिडी
गेले ते दिन गेले

छान लेख. लेख आणि त्यात दिलेल्या बारकाव्यांनी मला भूतकाळांत नेले. Happy

रजनीकांतची स्टाईल आवडायची.

छान लेख
मला वाटतंय 85 ते 90 सालात सिगारेट स्वस्त होत्या आणि फॅशन होती, style वाटे. तेव्हा त्याचे दुष्परिणाम फारसे माहीत नसावेत.
नंतर ही फॅशन कमी झाली.
तंबाखू खाणारे प्रमाण मात्र भरपूर
हल्ली त्या गुटख्या मागे असलेले फार आहेत

*नंतर ही फॅशन कमी झाली.* - सिगरेट ओढणाऱ्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही अपाय होतो ( passive smoking), ही भावना जोर धरू लागली म्हणून सर्वत्र " धूम्रपान बंदी आली व ह्या फॅशन/ व्यसनाला आळा बसला असावा.

आजूबाजूच्या लोकांनाही अपाय होतो......
>>>>
याने ऑफिसमध्ये सुद्धा smoking zone तयार झाले. तिथे जाऊन फुकणारे नजरेत येऊ लागले. स्टाईल राहिली बाजूला उलट बदनाम होऊ लागले.

मी हल्ली मुली सिगारेट ओढताना सर्रास पाहतो. मी भेदभाव म्हणून म्हणत नाही पण समाज घडणीमुळे मुली धूम्रपानापासून लांब असत हे चांगले होते. हा बदल चांगला नाही आणि याबाबत जागरूकता प्रयत्न पण दिसत नाहीत.

Congrants! Now you have become a non-smoker physically.

आता निकोटिन हा पदार्थ तुम्हाला कसलेही withdrawl symptoms देणार नाही.
पण त्याचं मानसिक व्यसन मात्र देऊ शकेल. तेव्हा तुम्ही आता मनाने नॉन स्मोकर झाले पाहिजे. जशी कुठलीही निकोटिन व्यसन नसलेली व्यक्ती आहे तसा मी आहे असे मनात ठसवा. आणि सिगरेटचा शून्य फायदा होता, सिगरेट ओढण्याने मिळणारे रिलीफ पूर्णतः फसवे होते हे लक्षात घ्या. समजा तुम्ही पायात खूप घट्ट बूट घातले. अर्ध्या तासात तुम्हाला त्याचा एवढा त्रास होईल रक्त प्रवाह कमी झाल्याने/ स्नायु, जॉईंट्स वरील दाबाने की तुम्ही मग एका ठिकाणी बसून पाय बुटातून काढाल आणि इतके मस्त वाटेल!
हे असे पाय बुटातून काढुन रिलीफ मिळणे म्हणजेच तल्लफ पुढे ताणता येत नाही म्हणुन सिगरेट ओढणे आहे.
ही तुम्हाला आता रिलीफ देतेय. पण ती ओढून झाली की परत तुम्ही ते घट्ट शूज पायात घातले आहेत. अर्ध्या / पाऊण / एक तासात परत तुम्हाला ते शूज सैल करून रिलीफ मिळवावा लागेल. हे घट्ट शूज घालत रहाणे म्हणजे निकोटिनचे लागलेले व्यसन. त्यातून मध्येच शूज काढुन बसणे म्हणजे रिलीफ मिळवणे पण त्याच बरोबर परत शूज घट्ट करण्याची प्रोसेस करणे दोन्ही आहे. त्यामुळे सिगरेट ओढण्याचा रिलीफ त्यावेळी वाटतो तो खरा असला तरी मुळात तो illusionary आहे. कारण जर टाईट शूज घालण्याची सवय लावून घेतली तरच शूज मध्येच सैल केल्याने रिलीफ मिळतो. ज्यांनी नेहमीचे कम्फर्ट नशूज घातलेत त्यांना नाही मिळत.

तेव्हा सिगरेट ओढण्याने कधीही खरा रिलीफ, शांत वाटणे, एकाग्रता वाढणे, ताण कमी होणे होत नव्हते. ते फक्त एक illusion होते. हे पक्के मनात बसले की तुम्हाला मानसिक तल्लफ येणार नाही.

तुम्ही आता नॉर्मल कम्फर्ट शूज घालणारे झाला आहात. तुम्ही पूर्णतः व्यसनमुक्त झाला आहात हे सिद्ध करून पहाण्याची तर काहीच आवश्यकता नाही. तुम्ही नॉन स्मोकर झाला आहात. कुठल्याही नॉन स्मोकरला असे काही सिद्ध करून पहाण्याची गरज पडते का की मी आता एक सिगरेट ओढून पहातो, मला मग परत तल्लफ आली नाही म्हणजे मी नॉन स्मोकर आहे? तुमच्या घरातील ओळखीत नॉन स्मोकर व्यक्ती करतात का असे सिद्ध? मग आता तुम्हीही ते अजिबात करायचे नाही.

सिगारेट सोबत भावना जोडून घेतल्या असतील, की बुवा मला माझ्या कठीण काळात तर सिगरेटने साथ दिली तर अत्यंत फालतु, बिनडोक, फसवा सायकॉलॉजिकल गेम आहे तो. एका क्षणात त्याला १००% फाट्यावर मारा.

माझ्या जुन्या जागा जिथे मी सिगरेट ओढायचो, आणि इतरही असायचे तिथे आता कसा जाऊ मी? असा प्रश्न पडत असेल तर आठवा. तुमच्या सोबत तिथे कुणी नॉन स्मोकर्स आले असतील. त्यांनी स्मोकिंग न करता त्या गप्पा तेवढ्याच एन्जॉय केल्या असतील. त्यासाठी त्यांनी सिगरेट ओढलीच पाहिजे असे त्यांना कधीच वाटले नाही.
आता तुम्ही नॉन स्मोकर झाला आहात तर तुम्हीही तेच करायचे. बिनधास्त तिथे जायचे त्यांच्या कंपनीत मिक्स व्हायचे. एखादाही झुरका मारण्याचे कुणाच्या आग्रहाला बळी पडण्याचे कारण नाही. कारण तुम्ही आता मनानेही पूर्ण नॉन स्मोकर झाला आहात आणि नॉन स्मोकर माणसं असच तर करतात. झालं.

फक्त एक होईल की अधुन मधून तुम्हाला स्वप्न पडेल दीर्घ मानसिक व्यसनामुळे की तुम्ही सिगरेट तर सोडली होती पण ओढताय आणि म्हणजे आपले व्यसन पूर्ण सुटलेच नाहीय वगैरे. किंवा अजून कसले तरी सिगरेटबद्दल स्वप्न. हे फक्त आपल्या सुप्त मनाचे खेळ आहेत. लगेच नॉस्टॅल्जिक होऊ नका. सिगरेट आणि भावना काडीचाही संबंध नाही. इतकी वर्षे बाळगलेल्या मानसिक व्यसनामुळे सुप्त मनात कुठेतरी सिगरेट म्हणजे खरंच रिलीफ हे illusion बसले आहे. त्याचे हे खेळ आहेत. हसून दुर्लक्ष करा आणि कामाला लागा.
मग असे स्वप्न कमी कमी होत बंद होतात आणि सुप्त मनातूनही ते illusion निघून जाते.

पर्फेक्ट मानव.

अजून एक महत्वाचे - मरे पर्यन्त मी सिगरेट वर विजय मिळवला आहे, मला आता भिती नाही या भ्रमात राहू नका. उतू नका मातू नका.

मला १६ वर्षे झाली सिगरेट सोडून , पण अजुनही कधीतरी विशेषतः कामाचे प्रेशर वगैरे असेल तेव्हा मला सिगरेटची आठवण येते. अध्ये मध्ये सिगरेटची स्वप्ने पडतात. वरती मानव यांनी लिहिले आहे तसे हे मनाचे - शरीराचे खेळ आहेत. त्याला बळी पडू नका.

“मी प्रयत्नाने सिगरेट सोडली आहे व ते प्रयत्न मी वाया जाऊ देणार नाही हे विसरू नका.” सिगरेट सोडून पुन्हा २० वर्षांनी सुरू केलेल्या एका सुर्‍हुदाने मला हे मी नुकतीच सिगरेट सोडली होती तेव्हा सांगितले होते. मी ते कधीच विसरलो नाहिये.

छान पोस्ट मानवमामा

रेव्यू तुम्ही अश्या पोस्टना लेखाची चिरफाड समजू नका. तो सर्वांनी वाचून एन्जॉय केला आहेच.
पण जर लेखाखालचे सारे प्रतिसाद त्या मूडनुसार गुडीगुडी आले तर सिगारेट म्हणजे काहीतरी कूल प्रकरण आहे असा पुन्हा चुकीचा संदेश त्यातून जाईल. जो तुमचाही हेतू नसावाच.

पूर्वीच्या काळी आपले देव सुद्धा सोमरस प्यायचे आताच उगाच दारूला नावे ठेवतात म्हणून लोकांना दारूचे समर्थन करताना आणि नवीन पोरांना असे संदर्भ देत त्या व्यसनाच्या नादाला लावताना पाहिले आहे.

सिगारेटच्या पाकिटावर सुद्धा वॉर्निंग असते तशीच वॉर्निंग या प्रतिसादांना समजा Happy

व्यसनांच्या आहारी जाणारे सारे आधी सूज्ञच असतात Happy

बाकी माझा येथील पहिला प्रतिसाद लेखावर आलेला आहेच. कोणी सिगारेटविरोधी प्रतिसाद दिला म्हणून तो येथील हलकीफुलकी चर्चा बिघडवतो आहे असे समजू नये इतकेच म्हणायचे होते.

मी हेच लिहिणार होतो की केशवकूल यांचा सुद्धा डिलिट व्हावा.. बन्या यांच्या खाली आलेले सगळे उडवा Happy

"एके काळची फॅशन स्टेटमेंट"
सर
माझा डिलिट करायच्या ( sic) आधी मी दिलेली यू ट्यूब ची लिंक अवश्य पहावी.

केशवकूल शीर्षक वाचून अंदाज घेतला.. पण अर्थात व्हिडिओ बघितला नसल्याने खात्री नसल्याने मी तुमचा प्रतिसाद उडवा असे म्हणालो नाहीच. जेव्हा तुम्ही स्वतः म्हणालात उडवा त्यानंतर मम म्हणालो इतकेच.

असो, ऍडमीन उडवतील न उडवतील. आपण हा विषय कोणाचेच वाद गैरसमज झाले नाहीत या चांगल्या नोटवर थांबवूया Happy

अरे, ही बोर्ड रूम सोडून बाकी ऑफिसमध्ये ' नो स्मोकिंग ' झालंय, म्हणून इथे हल्ली रोज मिटिंग व्हायला लागल्यात !! 20190103_090650_0.jpg

ठीक आहे, लेखच मुळात tongue in cheek आहे. त्यामुळे सिगारेट विरोधी प्रतिसाद आले तर त्यात वावगे नाही.
एकेकाळी सांगली मिरज कोल्हापूर मध्ये धुमाकूळ घालणार्‍या मटक्याबद्दल एखादा लेख मीही लिहेन , पण तो केवळ माहितीसाठीच असेल, मटका ( किंवा तीन पत्ती , ड्रीम ११ सारखा कोणताही जुगार ) घातकच आहे हे अध्याहृतच असेल.

Pages