सिगरेट- एक व्यसन –एके काळची फॅशन स्टेटमेंट

Submitted by रेव्यु on 4 May, 2025 - 09:11

सिगरेट- एक व्यसन –एके काळची फॅशन स्टेटमेंट
(एक स्टॅचुटरी चेतवणी: हा लेख कोणत्याही प्रकारे धूम्रपानाचे समर्थन करत नसून हे एक केवळ स्मरणरंजन आहे).
मी शाळेत जायला सुरुवात केली तेव्हा हिंदी चित्रपटांत नायकांची सिगरेट ओढतानाची एक वेगळीच स्टाईल असायची. ओठांच्या उजव्या बाजूला ती लटकवत डायलॉगबाजी. मग गोल वलये सोडत सोडलेला धूर. व्हिलन लोक तर हमखास सिगरेट ओढायचे आणि मन शत्रूच्या तोंडावर धूर फेकायचे. काही वेळा त्यांच्याकडे भलतेच आकर्षक लायटर असायचे. मला त्या ’हम दोनो’ मधील लायटरवर येणारी धून खूप आवडायची.
इंग्लिश चित्रपट पहायला सुरुवात केली तेव्हा प्रामुख्याने वेस्टर्न सिनेमात बुटाच्या टाचेवर काडी घासून ते ढांसू हिरो चिरुट पेटवायचे... लई स्टाईल वाटायची.
या शिवाय रजनीकांत सारख्या सुपरहिरोंची सिगरेट वर फेकून ओठात पकडणे व पेटवणे अशा स्टाइली देखील होत्या.
मी फॅक्टरीत लहान वयात अप्रेंटिस म्हणून लागलो. त्या काळात फॅक्टरीत कामाच्या जागी आणि ऑफिस मध्ये सुध्दा धूम्रपान निषिध्द नव्हते. बरेच लोक सिगरेट ओढायचे. चहा, जेवण या नंतर घोळक्याने सिगरेट ओढणारे असायचे. त्या काळात चारमिनार, पनामा या फिल्टर शिवाय आणि मग विल्स, विल्स फ्लेक या फिल्टरवाल्या आणि मग एकदम उच्चभ्रू म्हणजे फाय्फायफाय म्हणके स्टेट एक्स्प्रेस (अन त्यावर स्पेशली ब्लेंडेड फॉर हर मॅजेश्टी असे लिहिलेले असायचे-मग आमच्या डोळ्यासमोर एलिझाबेथ बाई सिगरेट ओढताना असा काही तरी कल्पना विलास असायचा). या शिवाय महाग ब्रॅन्ड म्हणजे डन्हिल. काही सिगरेटी आयात व्हायच्या... कॅमल, रॉथमन इ.
मी धूम्रपान एकदा दोनदाच केले. आवडले नाही.
चारमिनार हा अत्यंत स्ट्रॉन्ग ब्रॅन्ड समजला जायचा अन तो स्वस्त देखील होता. त्याची एका पाकिटाची किंमत चार आणे असायची
साधारण 1 रुपयात विल्स फिल्टरचे 10 चे पाकिट आणि काडेपेटी मिळत असे. आणखी एक गंमत म्हणजे पानाच्या दुकानावर एका गोल डब्यात सिगरेटच्या पुठ्ठ्याच्या डब्याच्या बारीक पट्ट्या कापून ठेवलेल्या असायच्या आणि त्या पुढे एक ढणढणती चिमणी असायची. अड्ड्यावर रात्रीच्या वेळी झुरका मारायला अनेक मित्र जमा व्हायचे.
या शिवाय काही जण स्वत:ची सिगरेट बनवायचे. त्यांच्या कडे त्या सिगरेटच्या तंबाखूची चपटी डबी आणि ते कागद वेगळे असायचे . मग ते स्टायलीत ती तंबाखू बारिक करून मग त्या कागदावर ठेवून सुरळी करायचे अन हातभर जीभ काढून त्या कडा चिकटवायचे अन मग आरामात झुरका ओढायचे.
विड्या सामान्यत: गरीब लोक ओढायचे. याला अपवाद म्हणजे हिप्पी जमात. यांनी विडी त्यांच्या जमातीत लोकप्रिय केली.
या व्यतिरिक्त पाईप ओढणार्‍यांचा रुबाब वेगळा असायचा. मला या लोकांबद्दल खूप कुतुहल असायचे. पहिले म्हणजे माझा गोड (गैर)समज होता की पाईप ओढणारे सैन्यात कर्नल ब्रिगेडियर वगैरे, फॅक्टरीत केबिन मध्ये बसणारे खूप उच्च स्तराचे --- व्हीपी इ.- बॉस लोक, स्पेशॅलिस्ट डॉक्टर किंवा चित्रपटातील व्हिलन असतात.... हा गोड गैरसमज अजूनही आहे. अशोककुमार तर मला वाटायचा की पाईपबरोबरच जन्माला आला होता .
य़ा पाईपवाल्यांकडे स्वत:चे टूलकिट असायचे. त्यात ती पाईपची वाटी खरवडायला एक दाभण वजा काडी, तंबाखू भरल्यावर ती दाबायला एक औजार आणि एक लायटर असायचा. ही मंडळी हा समारंभ करताना अत्यंत मग्न व्हायची अन एक झुरका झाल्यावरच पुढील संभाषण सुरू व्हायचे. माझा एक बॉस तर एसी ऑन करून, खिडक्या उघडून हे उपद्वयाप करायचा.
या बहुतेक व्यसनी मंडळीचे ओठ काळपट आणि बोटांची टोके पिवळसर असायची.
या शिवाय एकच सिगरेट दोघांनी आळीपाळीने ओढून सिगरेटद्वारे प्रेम शेअर करणार्‍यांची जमात वेगळी असायची.
आजही विमानतळावर त्या पिंजर्‍यात जाऊन घोळक्याने , ... अन घाईघाईने सिगरेट ओढून बाहेर येणार्‍यांना पाहून मला गंमत वाटते.
माझे काही कंजूष मित्र, सिगरेट अर्धी ओढून विझवत आणि पुन्हा डबीत ठेवत. पुढच्या खेपेस ती पुन्हा काढून पेटवत तेव्हा त्यांच्या पेक्षा मलाच कसेसे होत असे ( काहीही कारण नसताना!).
काही जणांकडे हस्तीदंती वगैरे सिगरेट होल्डर असायचा. काही जणांकडे चपट्या डब्या असायच्या. त्यावर नक्षी असायची. त्यातून ही मंडळी स्टाइलीत एकच सिगरेट काढायचे अन फट्ट असा आवाज करत ती डबी खटक्यात बंद करायचे. काही जणांकडे कंपनीचा 25 वा 50 सिगरेटींचा डबा असायचा.
परदेशातील माझ्या भेटीत जपानी, चिनी आणि कोरियन मंडळी सर्वात जास्त धूम्रपान करणारी मला भेटली.
सिगरेटच्या पाकिटांचा संग्रह करणारे देखील असायचे. या शिवाय कोणी फॉरेनला गेले की दर्दी लोक स्टेट एक्स्प्रेस इ. चे अख्खे कार्टन मागवायचे. उदारीकरणानंतर अशा गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत.
हल्ली धूम्रपान हे स्टाईल स्टेटमेंट मानले जात नाही. त्याशिवाय त्याच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांची जागतूकता बरीच आहे. किंबहुना जगभरात धूम्रपानाचे प्रमाण कमी होत चालले आहे.
पण ते एक वेगळे विश्व होते हे मात्र नक्की!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

20191230_121542_0_2.jpgत्या सिगरेटवाल्याकडे एकही पाकीट आज दिसता नये, याची जबाबदारी तुमची एकट्याची नाही; त्याच्याकडून इतरांनाही कांहीं सिगरेट पाकीटं घेवून तंबाखू निषिद्ध दिवस साजरा करुंदे !!

Pages