सिगरेट- एक व्यसन –एके काळची फॅशन स्टेटमेंट

Submitted by रेव्यु on 4 May, 2025 - 09:11

सिगरेट- एक व्यसन –एके काळची फॅशन स्टेटमेंट
(एक स्टॅचुटरी चेतवणी: हा लेख कोणत्याही प्रकारे धूम्रपानाचे समर्थन करत नसून हे एक केवळ स्मरणरंजन आहे).
मी शाळेत जायला सुरुवात केली तेव्हा हिंदी चित्रपटांत नायकांची सिगरेट ओढतानाची एक वेगळीच स्टाईल असायची. ओठांच्या उजव्या बाजूला ती लटकवत डायलॉगबाजी. मग गोल वलये सोडत सोडलेला धूर. व्हिलन लोक तर हमखास सिगरेट ओढायचे आणि मन शत्रूच्या तोंडावर धूर फेकायचे. काही वेळा त्यांच्याकडे भलतेच आकर्षक लायटर असायचे. मला त्या ’हम दोनो’ मधील लायटरवर येणारी धून खूप आवडायची.
इंग्लिश चित्रपट पहायला सुरुवात केली तेव्हा प्रामुख्याने वेस्टर्न सिनेमात बुटाच्या टाचेवर काडी घासून ते ढांसू हिरो चिरुट पेटवायचे... लई स्टाईल वाटायची.
या शिवाय रजनीकांत सारख्या सुपरहिरोंची सिगरेट वर फेकून ओठात पकडणे व पेटवणे अशा स्टाइली देखील होत्या.
मी फॅक्टरीत लहान वयात अप्रेंटिस म्हणून लागलो. त्या काळात फॅक्टरीत कामाच्या जागी आणि ऑफिस मध्ये सुध्दा धूम्रपान निषिध्द नव्हते. बरेच लोक सिगरेट ओढायचे. चहा, जेवण या नंतर घोळक्याने सिगरेट ओढणारे असायचे. त्या काळात चारमिनार, पनामा या फिल्टर शिवाय आणि मग विल्स, विल्स फ्लेक या फिल्टरवाल्या आणि मग एकदम उच्चभ्रू म्हणजे फाय्फायफाय म्हणके स्टेट एक्स्प्रेस (अन त्यावर स्पेशली ब्लेंडेड फॉर हर मॅजेश्टी असे लिहिलेले असायचे-मग आमच्या डोळ्यासमोर एलिझाबेथ बाई सिगरेट ओढताना असा काही तरी कल्पना विलास असायचा). या शिवाय महाग ब्रॅन्ड म्हणजे डन्हिल. काही सिगरेटी आयात व्हायच्या... कॅमल, रॉथमन इ.
मी धूम्रपान एकदा दोनदाच केले. आवडले नाही.
चारमिनार हा अत्यंत स्ट्रॉन्ग ब्रॅन्ड समजला जायचा अन तो स्वस्त देखील होता. त्याची एका पाकिटाची किंमत चार आणे असायची
साधारण 1 रुपयात विल्स फिल्टरचे 10 चे पाकिट आणि काडेपेटी मिळत असे. आणखी एक गंमत म्हणजे पानाच्या दुकानावर एका गोल डब्यात सिगरेटच्या पुठ्ठ्याच्या डब्याच्या बारीक पट्ट्या कापून ठेवलेल्या असायच्या आणि त्या पुढे एक ढणढणती चिमणी असायची. अड्ड्यावर रात्रीच्या वेळी झुरका मारायला अनेक मित्र जमा व्हायचे.
या शिवाय काही जण स्वत:ची सिगरेट बनवायचे. त्यांच्या कडे त्या सिगरेटच्या तंबाखूची चपटी डबी आणि ते कागद वेगळे असायचे . मग ते स्टायलीत ती तंबाखू बारिक करून मग त्या कागदावर ठेवून सुरळी करायचे अन हातभर जीभ काढून त्या कडा चिकटवायचे अन मग आरामात झुरका ओढायचे.
विड्या सामान्यत: गरीब लोक ओढायचे. याला अपवाद म्हणजे हिप्पी जमात. यांनी विडी त्यांच्या जमातीत लोकप्रिय केली.
या व्यतिरिक्त पाईप ओढणार्‍यांचा रुबाब वेगळा असायचा. मला या लोकांबद्दल खूप कुतुहल असायचे. पहिले म्हणजे माझा गोड (गैर)समज होता की पाईप ओढणारे सैन्यात कर्नल ब्रिगेडियर वगैरे, फॅक्टरीत केबिन मध्ये बसणारे खूप उच्च स्तराचे --- व्हीपी इ.- बॉस लोक, स्पेशॅलिस्ट डॉक्टर किंवा चित्रपटातील व्हिलन असतात.... हा गोड गैरसमज अजूनही आहे. अशोककुमार तर मला वाटायचा की पाईपबरोबरच जन्माला आला होता .
य़ा पाईपवाल्यांकडे स्वत:चे टूलकिट असायचे. त्यात ती पाईपची वाटी खरवडायला एक दाभण वजा काडी, तंबाखू भरल्यावर ती दाबायला एक औजार आणि एक लायटर असायचा. ही मंडळी हा समारंभ करताना अत्यंत मग्न व्हायची अन एक झुरका झाल्यावरच पुढील संभाषण सुरू व्हायचे. माझा एक बॉस तर एसी ऑन करून, खिडक्या उघडून हे उपद्वयाप करायचा.
या बहुतेक व्यसनी मंडळीचे ओठ काळपट आणि बोटांची टोके पिवळसर असायची.
या शिवाय एकच सिगरेट दोघांनी आळीपाळीने ओढून सिगरेटद्वारे प्रेम शेअर करणार्‍यांची जमात वेगळी असायची.
आजही विमानतळावर त्या पिंजर्‍यात जाऊन घोळक्याने , ... अन घाईघाईने सिगरेट ओढून बाहेर येणार्‍यांना पाहून मला गंमत वाटते.
माझे काही कंजूष मित्र, सिगरेट अर्धी ओढून विझवत आणि पुन्हा डबीत ठेवत. पुढच्या खेपेस ती पुन्हा काढून पेटवत तेव्हा त्यांच्या पेक्षा मलाच कसेसे होत असे ( काहीही कारण नसताना!).
काही जणांकडे हस्तीदंती वगैरे सिगरेट होल्डर असायचा. काही जणांकडे चपट्या डब्या असायच्या. त्यावर नक्षी असायची. त्यातून ही मंडळी स्टाइलीत एकच सिगरेट काढायचे अन फट्ट असा आवाज करत ती डबी खटक्यात बंद करायचे. काही जणांकडे कंपनीचा 25 वा 50 सिगरेटींचा डबा असायचा.
परदेशातील माझ्या भेटीत जपानी, चिनी आणि कोरियन मंडळी सर्वात जास्त धूम्रपान करणारी मला भेटली.
सिगरेटच्या पाकिटांचा संग्रह करणारे देखील असायचे. या शिवाय कोणी फॉरेनला गेले की दर्दी लोक स्टेट एक्स्प्रेस इ. चे अख्खे कार्टन मागवायचे. उदारीकरणानंतर अशा गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत.
हल्ली धूम्रपान हे स्टाईल स्टेटमेंट मानले जात नाही. त्याशिवाय त्याच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांची जागतूकता बरीच आहे. किंबहुना जगभरात धूम्रपानाचे प्रमाण कमी होत चालले आहे.
पण ते एक वेगळे विश्व होते हे मात्र नक्की!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे विचारतात???
>>>
वि मु, तुम्ही मुंबईचेच आहात ना. किती नॉर्मल गोष्ट आहे ही. आणि त्यावेळी माचिस नसेल तर लोकं आपली तोंडातली जळती विडी, सिगारेट सुद्धा समोरच्याला त्याची पेटवण्यासाठी देतात.

ती मागच्या पानावर सुरूवातीला दिलेली लिंक आहे तो माचिस मागण्याचा सीनच आहे.

रेव्यू यांनी व्हिलनने हीरोच्या तोंडावर धूर मारण्याचा उल्लेख केला आहे. इथे हीरोने व्हिलनकडे बघून तुच्छतापूर्वक सोडलेला धूर आहे.

सलीम-जावेद नी दीवार, त्रिशूल व काला पत्थर मधे बिडी/सिगरेट अ‍ॅक्शन सीन्स मधे प्रचंड वापरली आहे. इव्हन डॉन मधे अमिताभपुढे लायटर धरलेली झीनत - ती फ्रेम फेमस आहे.

वरती प्राणने सिगारेट ओढण्याच्या विविध पद्धती दाखवल्या आहेत असे भ्रमर यांनी लिहीले आहे त्याच्याशी टोटली सहमत. त्यातले बरेच बघितले आहे. कोणत्यातरी पिक्चर मधे तो चिलीम ओढल्यासारखा विडी ओढतो. हीरो लोकांपैकी गँबलिंग व सिगारेट/बिडी जितकी देव आनंद, अमिताभ व शत्रुघ्न ने "पुल ऑफ" केली तशी इतर कोणाची वाटली नाही.

माध्यमांनी सिगरेट प्रकरण बरंच ग्लॅमरस केलं होतं. त्यामुळे लहान मुलांनाही धुक्यात हवा सोडणे किंवा उदबत्तीचा धूर काढणे असे प्रकार करून त्या ग्लॅमरचा भाग होण्याची इच्छा होत असे. काही नाही तरी लॉलीपॉपची काडी तोंडात सिगरेटसारखी धरून लहान मुले मिरवत असत. अजूनही स्टाईल आयकॉन म्हणून अनेकांना तोंडात सिगरेट हवी असे वाटते.

लहानपणी पानाच्या ठेल्याबाहेर कचऱ्यातून सिगरेट पाकिटे उचलून त्याच्या चकत्या कापून चाके बनवणे, गाडी तयार करणे वगैरे प्रकार केले होते आणि घरच्यांचा ओरडा खाल्ला होता.

सिगारेटच्या कांडीसारखी एक गोळी सुद्धा मिळायची जी तोंडांत धरून चोखायची. चव ठिकठाक असली तरी ती त्या स्टाईलसाठीच घेतली जायची. सिगारेट बद्दल खरेच आकर्षण वाटावे अशी परिस्थिती होती.

भ्रमर ब्रँड तर आठवत नाही आता.. कारण त्याला म्हणायचो सिगारेटच Happy

फँटम सर्च केले आणि हे सापडले.
most sweet cigarettes (like the "Phantom" brand) are not vegetarian. They contain animal-derived ingredients like gelatin, which is derived from animal tissues. While some sweet cigarette candies, like those made with glucose or sugar, might be vegetarian, it's important to check the ingredients on the packaging to be sure.

भरत यांनी सिगरेटच्या जाहिरातींचा उल्लेख केला आहे. जॅकी श्रॉफ मला वाटतं चारमिनार च्या जाहिरातींमधूनच चित्रपटांमधे आला. हे इतर काही.

.

.


.

माझा एक कॅनेडियन मित्र आहे त्याला भारताच्या बिडी प्रकाराबद्दल आकर्षण असायचे. नेहेमी म्हणायचा " भारतातून येतांना माझ्यासाठी आण " Happy
बिडी स्वस्त असते पण सारखी विझत रहाते . बिडीचे (बाह्य आवरण) तेंदू पान हे सिगरेटच्या कागदाच्या तुलनेत कमी वेगांत जळते. सतत फुंकत बसावे लागते नाहीतर विझण्याची शक्यता जास्त - एका बिडीसाठी चार काड्या. कमी वेळांत पटापट झुरके घ्यावे लागतात.

आमच्या घरी विविध प्रकारचे, डिझाईनचे अ‍ॅशट्रे असायचे, पितळचे नक्षिदार, ग्लास किंवा सिरॅमिक... टेबलवर तसेच प्रत्येक खोलीत एक असायलाच हवा. रेल्वेच्या पहिल्यावर्गाच्या डब्यांतही अ‍ॅश ट्रे असायचे. ( लहान असतांना ) डब्यांत शिरल्यावर अ‍ॅश ट्रे गोल ३६० मधून फिरतो का हे बघण्याचा चाळा असायचा. कशासाठी ? Sad आता ( १९९० नंतर ) हे अ‍ॅश ट्रे गायब झाले आहेत आणि तो वर्गही नामषेश झाला आहे.

गुडांग गरम - जास्त वेळ चालणारी (स्वीट आफ्टरटेस्ट ) , कॅव्हेंडर्स , डेनिम , अझीझ गोल्ड (गोल्ड फ्लेक ची स्वस्त आवृत्ती ) , निर्दोष - तंबाखू विरहित

सिगारेट लवकर संपू नये म्हणुन तिला आपल्या लाळेने बऱ्यापैकी ओली करून मग पेटवणे असेही प्रकार कॉलेज मधे पाहिले आहेत

फॅशन स्टेटमेंट - सिगरेट ओढण्याची सुरवात फॅशन किंवा इतर कोणत्याही कारणाने झाली, तरीही नंतर मात्र ती सर्व कारणं सिगारेटच्या प्रभावाने गायब होतात ! उरते ती फक्त सिगारेटची तलफ !! इति स्वानुभव ( पूर्वीचा) !! Wink

सिगारेट लवकर संपू नये म्हणुन तिला आपल्या लाळेने बऱ्यापैकी ओली करून मग पेटवणे
>>>>>

जिभेवर फिरवताना पाहिले आहे..
ते लवकर संपू नये म्हणून असते का?
मला वाटले ती एक स्टाईल असेल किंवा त्यात सुद्धा किक बसत असेल..

*मला वाटले ती एक स्टाईल असेल किंवा त्यात सुद्धा किक बसत असेल..* - झुरका घेताना निकोटिन फिल्टर करण्याचा तो स्वतःला फसवण्याचा एक प्रयत्न असू शकतो.

समानशीले व्यसनेषु सख्यम!
सिगारेट पिणार्यांमध्ये लवकर मैत्री होते असे अनुभवले आहे.
एक शहरात एकदा पत्ता विचारत असताना एका दुकानदाराला विचारले तर त्याने माहीत नाही पुढे जा अशी भिकार्यासारखी वागणुक दिली होती. जळफळाट झाला होता. तेच एका पानटपरीवर (तेव्हा सिगारेट पित होतो) सिगारेट शिलगवाताना विचारपूस केली तर भरभरुन माहीती मिळाली.

दुकानात चौकशी करण्यापेक्षा पानटपरीवर केली तर चांगली, योग्य आणि भरभरून माहिती मिळते हा अनुभव आम्हा निर्व्यसनी लोकांना सुद्धा येतो.. किंबहुना लहानपणी सुद्धा मला कुठे एकटे पाठवताना तेच सांगायचे. पत्ता सापडला नाही किंवा पीसीओ, एटीएम वगैरे कुठलीही माहिती हवी असेल तर पानटपरीवर चौकशी करावी.

*भरभरून माहिती मिळते हा अनुभव आम्हा निर्व्यसनी लोकांना सुद्धा येतो.. * - व्यवहारात व्यसनी - निर्व्यसनी हा भेदभाव निर्व्यसनी लोक करतात; व्यसनाशी संबंधित लोक सहसा नाही करत !! Wink

>>>>>>त्याने माहीत नाही पुढे जा अशी भिकार्यासारखी वागणुक दिली होती. जळफळाट झाला होता.
काही लोकं खरच मॅनरलेस असतात.

“ व्यवहारात व्यसनी - निर्व्यसनी हा भेदभाव निर्व्यसनी लोक करतात; व्यसनाशी संबंधित लोक सहसा नाही करत” - Lol वा भाऊ!! हे म्हणजे व्हेज-नॉनव्हेज असा भेद व्हेजिटेरियन्स करतात, नॉन-व्हेजिटेरियन्सना फरक पडत नाही - असं झालं. Wink

* नॉन-व्हेजिटेरियन्सना फरक पडत नाही - असं झालं * - पत्ता विचारणं / सांगणं ह्यासारख्या साध्या व्यावहारिक बाबतीत फरक पडत नाहीं, ह्या संदर्भातला हा मुद्दा आहे !

“ साध्या व्यावहारिक बाबतीत फरक पडत नाहीं, ह्या संदर्भातला हा मुद्दा आहे” - आणि तो मी भरकटवला आहे - गिल्टी अ‍ॅज चार्ज्ड. Wink Happy

कृष्ण चालले वैकुंठाला
राधा विनवी पकडुनी बाही |
इथे तमाखु खाऊनी घे रे
तिथे कन्हैय्या तमाखु नाही ||

हे आठवलं !

Pages