सिगरेट- एक व्यसन –एके काळची फॅशन स्टेटमेंट
(एक स्टॅचुटरी चेतवणी: हा लेख कोणत्याही प्रकारे धूम्रपानाचे समर्थन करत नसून हे एक केवळ स्मरणरंजन आहे).
मी शाळेत जायला सुरुवात केली तेव्हा हिंदी चित्रपटांत नायकांची सिगरेट ओढतानाची एक वेगळीच स्टाईल असायची. ओठांच्या उजव्या बाजूला ती लटकवत डायलॉगबाजी. मग गोल वलये सोडत सोडलेला धूर. व्हिलन लोक तर हमखास सिगरेट ओढायचे आणि मन शत्रूच्या तोंडावर धूर फेकायचे. काही वेळा त्यांच्याकडे भलतेच आकर्षक लायटर असायचे. मला त्या ’हम दोनो’ मधील लायटरवर येणारी धून खूप आवडायची.
इंग्लिश चित्रपट पहायला सुरुवात केली तेव्हा प्रामुख्याने वेस्टर्न सिनेमात बुटाच्या टाचेवर काडी घासून ते ढांसू हिरो चिरुट पेटवायचे... लई स्टाईल वाटायची.
या शिवाय रजनीकांत सारख्या सुपरहिरोंची सिगरेट वर फेकून ओठात पकडणे व पेटवणे अशा स्टाइली देखील होत्या.
मी फॅक्टरीत लहान वयात अप्रेंटिस म्हणून लागलो. त्या काळात फॅक्टरीत कामाच्या जागी आणि ऑफिस मध्ये सुध्दा धूम्रपान निषिध्द नव्हते. बरेच लोक सिगरेट ओढायचे. चहा, जेवण या नंतर घोळक्याने सिगरेट ओढणारे असायचे. त्या काळात चारमिनार, पनामा या फिल्टर शिवाय आणि मग विल्स, विल्स फ्लेक या फिल्टरवाल्या आणि मग एकदम उच्चभ्रू म्हणजे फाय्फायफाय म्हणके स्टेट एक्स्प्रेस (अन त्यावर स्पेशली ब्लेंडेड फॉर हर मॅजेश्टी असे लिहिलेले असायचे-मग आमच्या डोळ्यासमोर एलिझाबेथ बाई सिगरेट ओढताना असा काही तरी कल्पना विलास असायचा). या शिवाय महाग ब्रॅन्ड म्हणजे डन्हिल. काही सिगरेटी आयात व्हायच्या... कॅमल, रॉथमन इ.
मी धूम्रपान एकदा दोनदाच केले. आवडले नाही.
चारमिनार हा अत्यंत स्ट्रॉन्ग ब्रॅन्ड समजला जायचा अन तो स्वस्त देखील होता. त्याची एका पाकिटाची किंमत चार आणे असायची
साधारण 1 रुपयात विल्स फिल्टरचे 10 चे पाकिट आणि काडेपेटी मिळत असे. आणखी एक गंमत म्हणजे पानाच्या दुकानावर एका गोल डब्यात सिगरेटच्या पुठ्ठ्याच्या डब्याच्या बारीक पट्ट्या कापून ठेवलेल्या असायच्या आणि त्या पुढे एक ढणढणती चिमणी असायची. अड्ड्यावर रात्रीच्या वेळी झुरका मारायला अनेक मित्र जमा व्हायचे.
या शिवाय काही जण स्वत:ची सिगरेट बनवायचे. त्यांच्या कडे त्या सिगरेटच्या तंबाखूची चपटी डबी आणि ते कागद वेगळे असायचे . मग ते स्टायलीत ती तंबाखू बारिक करून मग त्या कागदावर ठेवून सुरळी करायचे अन हातभर जीभ काढून त्या कडा चिकटवायचे अन मग आरामात झुरका ओढायचे.
विड्या सामान्यत: गरीब लोक ओढायचे. याला अपवाद म्हणजे हिप्पी जमात. यांनी विडी त्यांच्या जमातीत लोकप्रिय केली.
या व्यतिरिक्त पाईप ओढणार्यांचा रुबाब वेगळा असायचा. मला या लोकांबद्दल खूप कुतुहल असायचे. पहिले म्हणजे माझा गोड (गैर)समज होता की पाईप ओढणारे सैन्यात कर्नल ब्रिगेडियर वगैरे, फॅक्टरीत केबिन मध्ये बसणारे खूप उच्च स्तराचे --- व्हीपी इ.- बॉस लोक, स्पेशॅलिस्ट डॉक्टर किंवा चित्रपटातील व्हिलन असतात.... हा गोड गैरसमज अजूनही आहे. अशोककुमार तर मला वाटायचा की पाईपबरोबरच जन्माला आला होता .
य़ा पाईपवाल्यांकडे स्वत:चे टूलकिट असायचे. त्यात ती पाईपची वाटी खरवडायला एक दाभण वजा काडी, तंबाखू भरल्यावर ती दाबायला एक औजार आणि एक लायटर असायचा. ही मंडळी हा समारंभ करताना अत्यंत मग्न व्हायची अन एक झुरका झाल्यावरच पुढील संभाषण सुरू व्हायचे. माझा एक बॉस तर एसी ऑन करून, खिडक्या उघडून हे उपद्वयाप करायचा.
या बहुतेक व्यसनी मंडळीचे ओठ काळपट आणि बोटांची टोके पिवळसर असायची.
या शिवाय एकच सिगरेट दोघांनी आळीपाळीने ओढून सिगरेटद्वारे प्रेम शेअर करणार्यांची जमात वेगळी असायची.
आजही विमानतळावर त्या पिंजर्यात जाऊन घोळक्याने , ... अन घाईघाईने सिगरेट ओढून बाहेर येणार्यांना पाहून मला गंमत वाटते.
माझे काही कंजूष मित्र, सिगरेट अर्धी ओढून विझवत आणि पुन्हा डबीत ठेवत. पुढच्या खेपेस ती पुन्हा काढून पेटवत तेव्हा त्यांच्या पेक्षा मलाच कसेसे होत असे ( काहीही कारण नसताना!).
काही जणांकडे हस्तीदंती वगैरे सिगरेट होल्डर असायचा. काही जणांकडे चपट्या डब्या असायच्या. त्यावर नक्षी असायची. त्यातून ही मंडळी स्टाइलीत एकच सिगरेट काढायचे अन फट्ट असा आवाज करत ती डबी खटक्यात बंद करायचे. काही जणांकडे कंपनीचा 25 वा 50 सिगरेटींचा डबा असायचा.
परदेशातील माझ्या भेटीत जपानी, चिनी आणि कोरियन मंडळी सर्वात जास्त धूम्रपान करणारी मला भेटली.
सिगरेटच्या पाकिटांचा संग्रह करणारे देखील असायचे. या शिवाय कोणी फॉरेनला गेले की दर्दी लोक स्टेट एक्स्प्रेस इ. चे अख्खे कार्टन मागवायचे. उदारीकरणानंतर अशा गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत.
हल्ली धूम्रपान हे स्टाईल स्टेटमेंट मानले जात नाही. त्याशिवाय त्याच्या आरोग्यावर होणार्या परिणामांची जागतूकता बरीच आहे. किंबहुना जगभरात धूम्रपानाचे प्रमाण कमी होत चालले आहे.
पण ते एक वेगळे विश्व होते हे मात्र नक्की!
सिगरेट- एक व्यसन –एके काळची फॅशन स्टेटमेंट
Submitted by रेव्यु on 4 May, 2025 - 09:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदी चित्रपटांत नायकांची
हिंदी चित्रपटांत नायकांची सिगरेट ओढतानाची एक वेगळीच स्टाईल असायची >>> आणि कोणी क्लोज अप मधे सिगारेट तोंडात ठेवली, की हमखास कोणी सुंदर तरूणी येउन लायटर ऑन करत असे
किंवा हे असले खुन्नस सीन्स पब्लिकमधे प्रचंड लोकप्रिय होते
तेव्हा कॉलेज मधे एरव्हीची ममव पोरे बळंच सिगारेट ओढत व तोंडात कृत्रिमरीत्या आणलेल्या शिव्या देत एक पर्सोना तयार करत
मस्त लेख आहे!
बाकी हा अनेकांना रिलेट होणारा विषय असल्याने सिगारेट सोडण्याबद्दल प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. माबोवर इतक्या वर्षांत यावर फार काही आलेले नाही त्यामुळेही असेल.
रेव्ह यांना राग आल्या असल्यास
रेव्ह यांना राग आल्या असल्यास माझे प्रतिसाद उडविले जावे
बन्याबापू नाही हो राव
बन्याबापू
नाही हो राव
याच विश्वात आणखी काही
याच विश्वात आणखी काही मनोरंजक भर... आमचे नाशिक मधील मारवाडी शेजारी भिकुसा यमासा क्षत्रिय या विडी कंपनीत काम करायचे पण मुळीच विड्या काड्या वा सिगरेट बिगरेटच्या धंद्यात नव्हते... ते निपाणीला नियमित जायचे आणि चांगल्या प्रतीची विड्यांची तंबाखू आणायचे.
सिगरेटच्या पाकिटांचा संग्रह करणारे माझे मित्र होते... स्टेट एक्स्प्रेस आणि इंडिया किंग्ज या येकदम मर्सिडि़ बेंझच्या दर्ज्याच्या सिगरेटि होत्या. काही काम करवून घ्यायचे असले की मी माझ्या बॉसच्या केबिन मध्ये पोस्ट लंच जायचो कारण तो तेव्हा इंडिया किंग ओढत इंडिया किंग म्हणजे भारताचा सम्राट बनून मस्त मूड मध्ये असायचा. कामगार लोक चहा नंतर संडासा च्या बाहेरच्या हात धुवायच्या जागी जाऊन सिग्रेटी फुंकायचे.
मला आण्खी एक आठवते म्हणजे काही लोक ते चिरूटचा टोक तोडून मग शिल गवायचे. त्यात हवायन आणि क्युबन सिगार हा एक वेगळा प्रकार मला पत्रदेशात असताना कळ ला. गॉडफादर सिनेमात मार्लन ब्रॅन्डो एकदम रुबाबात्/चिंताग्रस्त होत ओढायचा.
त्या सिग्रेटच्या पाकिटातील चांदीच्या काही वस्तू रुखवतात मी पाहिल्या आहेत.
काही लोकांच्या सिग्रेट ओढायच्या लकबी देखील वेगवेगळ्या असायच्या. लहान बोट आणि तर्जनी मध्ये धरून तिरकस ओढायचे अन चुटकी मारत राख पाडायचे.
अशा काही लकबी, तर्हेवाईकपणा आठवत असेल तर सांगा इथे
धाग्याचा विषय खरंच महत्वाचा
धाग्याचा विषय खरंच महत्वाचा आहे, आणि त्याचा 'व्यसना'शी किंवा व्यसन लागून वाढण्याशी काही संबंध नाही. हे चुकीचं असेल तर धागाकर्त्याने करेक्ट करावं. वरच्या बर्याच प्रतिसादांत 'अॅडमिन माझा प्रतिसाद डिलीट करा' वगैरे वाचून हे लिहावंसं वाटलं. (तुम्हीच का डिलीट किंवा एडिट करत नाही? अच्छा, वेळ टळली असेल.)
हे खरंच स्टाईल स्टेटमेंट होतं. ७०-८० च्या दशकापर्यंत हिरो व्हिलन आणि तमाम सारी मंडळी भकाभका धूर सोडताना दिसत होती. हे इतकं function at() { [native code] }इ व्हायचं की याचा नोशिया येई. रजनीगंधा सारखा सुंदर सिनेमाही याच कारणाने आता पुन्हा पाहावासा वाfunction at() { [native code] }टत नाही. तो किडमिड्या आणि बेतास बात दिसणारा दिनेश ठाकूर इतका धूर फेकतो की ते सारं नको होऊन जातं. आणि समोर कोण, तर 'रजनीगंधा, फूल तुम्हारे' वाली विद्या सिन्हा. तोंड काळं कर बाबा एकदाचं, कसला क्लासिक कल्ट सिनेमा नि काय.
हे फिल्म्स मध्ये सिग्रेटी फुंकणं इतकं इरिटेटिंग होतं, की कधी हा किंवा याची सिग्रेट बाजूला होते, असं होऊन जायचं. ५०-६० च्या दशकांत ते सतत ओझं घेऊन वावरल्यासारखं चिरूट घेऊन ओढत फिरणं बघताना आता फारच ऑकवर्ड होतं. नंतर त्याची जागा सिग्रेट्ने घेतली. ७० च्या दशकांतल्या अमिताभसकट सार्या हिरोंनी याचं ग्लोरिफिकेशन केलं. इतनी भी क्या मजबूरी है.. पण ते स्टाईल स्टेट्मेंट होतं हे खरंच. (आता बच्चन खर्या आयुष्यात सिग्रेट ओढायचा का? तर नसेल. (शोभा डेंना विचारलं तर त्या होही म्हणतील, आणि पुरावेही देतील. असो.).
मुख्य मुद्दा असा आहे, की धुम्रपानाचे दुष्परिणामच मला वाटतं ७०-८० नंतर प्रकाशात आले. (त्याआधी, आणि नंतर, नेहेरूंच्या सिग्रेंटींचं अय्याशी म्हणून ब्रँडिंग झालंच होतं. आजही आहे.) त्याआधी ते खरंच स्टाईल स्टेटमेंट होतं. आपल्याकडेच नाही, तर जगभरात. (अधिक माहितीवाल्यांनी करेक्ट करा).
आता आपल्याकडे फुंक्यांना ४०-५० वर्षांपुर्वी होती तेवढी प्रतिष्ठा किंवा ग्लॅमर नाही, हॉटेल्स आणि बार्समध्ये वाळीत टाकल्यासारखा फुंक्यांसाठी वेगळा सेक्शन असतो, किंवा जवळजवळ नसतो. सिनेम्यात उगाच फुंकत असल्याचे सीन्स एकतर दाखवले जात नाहीत, आणि दाखवले, तर कोपर्यात लगेच वॉर्निंग दाखवली जाते- 'इंज्युरियस टू हेल्द' वगैरे. तोही मूर्खपणा आहे, असं स्टेंटमेंट जाहीर करण्यासाठी अनुराग किंवा इतर काही फिल्ममेकर्स कॅरेक्टरच्या तोंडात नुसतीच न पेटवलेली सिग्रेट दाखवतात, कारण या अशा सेंसॉरशिपचा त्यांच्या मते function at() { [native code] }इरेक झाला आहे.
*
बाकी धागाकर्त्याने मेंशन केलेल्या 'स्मरणरंजन' या खात्यात असंख्य गोष्टी आहेत. त्या सावकाश लिहिन.
मस्त स्मरणरंजन.. तेव्हाचे
मस्त स्मरणरंजन.. तेव्हाचे ब्रँड्स अजुनही आहेत का देव जाणे. पुस्तकांमधुन पिवळा हत्ती व कॅमलचे डब्बे वाचले होते. कॅमलचे बहुधा टिनचे डब्बे होते. एका शेजार्यांचा मुलगा गोव्यात कामाला होता त्यण्च्याकडे हे डबे असत.
कुठल्यातरी एका चित्रपटात, बहुतेक कब क्यु और कहामध्ये, प्राण ओठाच्या एका कोपर्यात सिगरेट ठेऊन ती सहज घोळवत दुसर्या कोपर्यात न्यायची जादु करताना दिसतो. मी ओठात पेन्सिल ठेऊन तसा प्रयत्न करण्यात तासनतास घालवले होते
शेवटी जमले नाहीच.
आमच्या चाळीत दोन खतरोके
आमच्या चाळीत दोन खतरोके खिलाडी होते. दारू सिगारेट चरस गांजा वगैरे. ते दोघे सिगारेट आणि बिडी दातात धरून उलटी फिरवायचे आणि जळता भाग तोंडांत घ्यायचे. म्हणजे पूर्ण सिगारेट तोंडांत गायब. जणू खाऊन टाकली आहे. थोड्यावेळाने तशीच पलटी मारून स्टाईलमध्ये बाहेर काढायचे.
दोघे गेले देवबाप्पाकडे वयाच्या पस्तीशीत. पण याला कारणीभूत हि स्टाईल नाही. तर एकूणच व्यसने होती.
पण यासारखाच आम्ही सुद्धा एक आयटम करायचो. ते म्हणजे पेटलेली अगरबत्ती तोंडांत धरून तिचा धूर तोंडांत जमा करायचो. आणि सिगारेट सारखा फुंकायचो. पुढे अक्कल आली तेव्हा यातली गंमत संपली. म्हणून ती लवकरात लवकर येणे गरजेचे.
सिगरेट पिण्याचा अनुभव नाही पण
सिगरेट पिण्याचा अनुभव नाही पण माझे निरीक्षण.
(१) बैठकीत एक जण सिगरेट शिलगवणार आणि पुढे तीन लोक त्याच जळत्या काडीने स्वत: ची सिगरेट पेटवणार किंवा सिगरेटसे सेगरेट जलाते चलो, तेव्हढीच नवी मैत्री / नेटवर्क वाढते, असलेली घट्ट होते.
(२) अस्सल पिणारा रस्त्यात कुणा अनोळखी व्यक्तीला पण "माचिस है क्या ? " किंवा " माचिस मिलेगी क्या ? " असे न कचरता विचारणार. समोरच्या व्यक्तीला आपण आज एक प्रकारची समाजसेवा करत असल्याचे समाधान मिळते.
(३) बाहेर तुफान वारा सुरु असतांनाही आपली सिगरेट त्या वार्यात यशस्वीपणे पेटविण्यासाठी एक स्किल लागते. वार्याकडे पाठ करायची, सिगरेट तोंडांत धरायची आणि दोन्ही तळहात घट्टपणे जवळ आणून , हवेशी सामना करत , सिगरेट पेटवणे येर्यागबाळ्याचे काम नाही. प्रयत्न अयशस्वी झाला तर एक शिवी हासडायची आणि पुन्हा प्रयत्नाला लागायचे..
(४) काही लोक काटकसर म्हणून अर्ध्या सिगारेटचा आनंद लुटतात. मग व्यावस्थित विझवतात ( याचे पण विविध प्रकार आहेत ) पुन्हा पाकिटांत ठेवतात आणि पुढे केव्हातरी वापरतात.
(५) काही लोकांचे एक तत्व असते. ते सिगरेट व्यसनाच्या आहारी जात नाही. पण फुकट मिळत असेल तर हसर्या चेहेर्याने कायम तयारीत असतात . मित्राच्या आग्रहाला नाही म्हणणे त्यांच्या तत्वात बसत नाही.
(६) नवहौशी, पैशाची चण चण असणारे किशोर वयीन (बेकार मुलांचे ) टोळके रस्त्यावरचे, कचरा कुंडीतले थोडके शोधून त्यावर आपली तहान भागवतात.
(७) अडचणीच्या वेळी खर्या मित्राची ओळख होते. एखादी व्यक्ती दिवसाला चार पाकिट सिगरेट पिणारा असतो ( चेन स्मोकरच म्हणायचे). आता महिना अखेरीस आर्थिक अडचणींशी सामना करत एक एक तास ढकलणे सुरु असते. अशा वेळी होणारी अस्वस्थता जवळचा मित्रच टिपू शकतो आणि मागितले नसतांनाही पैसे देतो किंवा काही काळासाठी स्टॉक देतो. केलेल्या मदतीची वाच्यता करु नाही हे तत्व पाळतो. हे अन्य व्यसनांच्या बाबतही लागू असेल.
(८) काहींना हात वारे करत बोलायची सवय असते. ( भांडतांना ) राग/ संताप आल्यावर हातांच्या हालचाली वेगवान होतात. अशा वेळी दोन बोटांत पेटवलेली सिगरेट असेल तर नयनरम्य सोहळा बघायला मिळतो.
(दोन्ही हात कामांत आहेत, सिगरेट खाली ठेवणे हा ऑप्शन नाही आहे) सिगरेट तोंडांत असतांना बोलणे पण एकायला मजेशीर असते.
(९) oops moment - सिगरेट पेटवलेली आहे. एक झुरका घेत शेजारी अॅशट्रेवर ठेवली. पुढे कामातली मग्नता वाढली आणि संपूर्ण सिगरेट जळून वाया गेली. किती दु :ख होत असेल.
(१०) लहान असतांना आम्ही सिगरेटची रिकामे पाकिटे गोळा करायच... त्यांचा बंगला, उंच मनोरा असे बनवायचो. पाकिटाच्या बाह्य आवरणाच्या ४-५ चकत्या / सिलेंडर बनवून त्याच्यावर पालथ्या हाने मारल्यास ( compressed air) आवाज येतो. सिलेंडरची उंची, आणि आवरणाची जाडी, हाताची चपळता यावर आवाज मोठा/ लहान/ फुसका अवलंबून आहे.
पाकिटाच्या आंतमधे असणार्या inner liner कागदाबद्दलही आकर्षण होते.
एका काडीने ३ सिगारेटस्
एका काडीने ३ सिगारेटस् पेटवायच्या नाहीत, ३ र्याला पेटवायची असेल तर त्याने दुसरी काडी पेटवायची. ही अंधश्रद्धा देखिल बरेच गटाने सिगारेट पिणारे पाळताना पाहिले आहेत.
म्हणजे पूर्ण सिगारेट तोंडांत
म्हणजे पूर्ण सिगारेट तोंडांत गायब. जणू खाऊन टाकली आहे. थोड्यावेळाने तशीच पलटी मारून स्टाईलमध्ये बाहेर काढायचे.>>> हे मी सुद्धा करायचो. आणि धूम्रवलये काढणे.
लहानपाणी वेगवेगळ्या सिगरेट पाकिट जमा करण्याबद्दल जे वर अनेकांनी लिहिले आहे त्यात भर: आमच्याकडे त्याचा एक खेळ असायचा. वेगवेगळ्या ब्रँडच्या पाकिटांवचे वरचे चौकोनी भाग कापून घ्यायचे. त्यांना आम्ही नोटा म्हणायचो.
मग एका वर्तुळात दोघांनी आपापल्या नोटा ठेवायच्या. आणि पाच सहा फूट लांबुन फरशीच्या तुकड्याची स्ट्राईकर करून तो फेकून त्याने नोटा बाहेर काढायच्या. एक किंवा अधिक नोट वर्तुळाच्या पूर्ण बाहेर आली की ती आपली आणि आपण परत स्ट्राईक करायचे.
गोट्या आणि कॅरम हे दोन खेळ
गोट्या आणि कॅरम हे दोन खेळ तुम्ही एकत्र केले
>>>>>>>व्यसनांच्या आहारी
>>>>>>>व्यसनांच्या आहारी जाणारे सारे आधी सूज्ञच असतात Happy
टाळ्या. मस्त वाक्य आहे.
>>>>>>>तो किडमिड्या आणि बेतास बात दिसणारा दिनेश ठाकूर इतका धूर फेकतो की ते सारं नको होऊन जातं.
अगदी बरोब्बर.
धूम्रपान विरोध मोहिमेतील
धूम्रपान विरोध मोहिमेतील पूर्वीची कांहिशी अशी एक जाहिरात आठवते - अँश ट्रेचं चुंबन कोण घेईल ?
सिगारेट ओढणाऱ्या स्टाईल
सिगारेट ओढणाऱ्या स्टाईल खलनायक प्राणने जेवढ्या हाताळल्या असतील तेवढ्या कोणीच नसाव्यात.
छान लेख आहे.
छान लेख आहे.
त्या काळी सिगरेटच्या जाहिरातीही असत. जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमारनेही या जाहिराती केल्यात.
धर्मयुग , मायापुरी अशा मासिकांत हम रेड अँड व्हाइट पीनेवालों की बात ही कुछ और हौ अशी कॅचलाइन असे.
खूप पूर्वी स्त्रियांनी धूम्रपान करावं यासाठी जाहिरात केली जायची असं वाचल्याचं आठवतं.
आणखी एक गंमत, मी आधी खूप
आणखी एक गंमत, मी आधी खूप पाकिस्तानी सिरियल्स पाहिल्या आहेत..... त्यातील नायक अति दु:खात असला की भसा बसा सिग्रेटी ओढाय्चा. आपल्या सिनेमात गंमत म्हणजे हिर्वाइन खूप लाडात आली अन तिला नायकाचे प्रणयाराध्नन कम प्रबोधन करायचे असायचे तेव्हा ती त्याच्या ओठातील सिग्रेट काढून " नाही नाही हं राजा" असा अंगुली निर्देश करत लटका राग दाखवायची. इंग्रजी चित्रपटात, विशेष तः युध्दपटात हिरो मरणारा असला की त्याच्या ओठात शेवटची इच्चा म्हणून त्याचा कलिग सिग्रेट पेठवून ठेवायचा.
आपल्या कडे संस्कारी मुलांचा एक प्रघात म्हणजे बापासमोर नाही ओढायची.... आईसमोर थोडी मुभा असायची.
कोणती सिग्रेट ओढतात हे दा़अवत क्लास डिफरन्स दाखवायचा एक सीन त्या कलियुग सिनेमात होता.
त्यात शशी कपूर स्टेट एक्स्प्रेस ऑफर करतो तेव्हा युनियन लिडर खिशातून आपली चारमिनार शिलगावतो.
खूप पूर्वी स्त्रियांनी
खूप पूर्वी स्त्रियांनी धूम्रपान करावं यासाठी जाहिरात केली जायची असं वाचल्याचं आठवतं.
>>>
व्हाय शूल्ड बॉईज हेव ऑल द फन
आपल्या कडे संस्कारी मुलांचा एक प्रघात म्हणजे बापासमोर नाही ओढायची.... आईसमोर थोडी मुभा असायची.
>>>>
कोणती आई असली मुभा देते
माझ्या पाहण्यातील अनुभव उलटा आहे. एखादी आपली वाईट सवय वडिलांना कळली तरी ठीक, आईला समजू नये. त्यानंतर आईच्या नजरेला नजर मिळवणे आणखी अवघड होते.. हा स्वतंत्र धाग्याचा विषय सुद्धा होऊ शकतो. विचार करतों
>>>> ऋन्मेऽऽष >> मुभा म्हणजे
>>>> ऋन्मेऽऽष >> मुभा म्हणजे पदराखाली घ्यायची,,,, मुस्काटीत पडण्यापासून वाचवायची
शेवटची इच्छा म्हणून एखाद
शेवटची इच्छा म्हणून एखाद सिगारेट पिन आता, तोवर no no no
रेव्यू ओके.. मग बरोबर आहे
रेव्यू ओके.. मग बरोबर आहे
आणखी एक्गैरसमज..... काळ्या
आणखी एक्गैरसमज..... काळ्या अगदीसडपातळ सिग्रेटि यायच्या ..... काही लोक धूर शुध्द करण्यासाठी पुढे लवंग लावून प्यायचे
हुक्का तर वेगळाच विषय अन भावनिक संबंधांशी निगडित देखील
काही आठवणी
काही आठवणी







(No subject)
काही आठवणी
काही आठवणी













विसकॉनसिनचे आमचे खुर्द गाव
विसकॉनसिनचे आमचे खुर्द गाव व्यसनां करताच कुख्यात होते. ई-स्मोकिंग सर्रास चाले.
सिगारेट ची विविघ पाकिटे जमवणे
सिगारेट ची विविघ पाकिटे जमवणे (पोस्ट तिकिटासारखी) हाही एक छन्द होता तेव्हा.
हनी ड्यू ला पिवळा हत्ती म्हणत.
सहा रिकामी पाकिटे वापरून षटकोनी डबा तयार करणे हेही असे.
महागड्या सिगारेट च्या पाकिटात हाय क्वालिटी अॅल्युमिनियम फॉइल असे. तिचे छोटे तुकडे करून लहान मुली नाकातली मोरणी, कानातले टॉप्स वगैरे करत.
आजकाल बहुदा भारतात सिंगल सिगारेट्स विकणे बंद आहे. ( चांगला निर्णय)
सुशींचा नायक ( बहुदा मंदार ) ओठांच्या एका कोपर्यात अलगद सिगारेट धरून मंद स्मित करत उभा असे व दोन गुंड चालून आले तरी शांत असे.
त्याच्या बुटात स्प्रिंग ने लावलले चाकू असत व टाचा दाबताच ते सू सू करत गुंडांच्या छातीत घुसत.
मी हैदराबाद मध्ये असताना अमेरिकेला जाऊन आलेले लोक्स ५५५ किंवा मार्लबोरो ची पाकिटे हमखास आणत असत.
<< अस्सल पिणारा रस्त्यात कुणा
<< अस्सल पिणारा रस्त्यात कुणा अनोळखी व्यक्तीला पण "माचिस है क्या ? " किंवा " माचिस मिलेगी क्या ? " असे न कचरता विचारणार. समोरच्या व्यक्तीला आपण आज एक प्रकारची समाजसेवा करत असल्याचे समाधान मिळते. >>
Three guys in a toilet हा व्हिडीओ बघा.
*"माचिस है क्या ? " किंवा "
*"माचिस है क्या ? " किंवा " माचिस मिलेगी क्या ? " असे न कचरता विचारणार. ...*- माचिस बाळगणारा सिगरेट बहाद्दर हे विचारण्याचीही वाट न पाहता, काडी पेटवून समोर धरणारच, हा माझा अनुभव !!!
अस्सल पिणारा रस्त्यात कुणा
अस्सल पिणारा रस्त्यात कुणा अनोळखी व्यक्तीला पण "माचिस है क्या ? " किंवा " माचिस मिलेगी क्या ? " असे न कचरता विचारणार....
असे विचारतात???
मला जर असे कोणी विचारले तर मी त्याचा जास्तीत जास्त पाणउतारा करून हाकलून लावेन!!!
Three guys in a toilet >>>
Three guys in a toilet >>> हा व्हिडिओ पाहिलेला.. ब्रो कोड है भाई
जोक्स द अपार्ट, कॉलेजला कधीच एकटे टॉयलेटला गेल्याचे आठवत नाही. नेहमी कोणीतरी मित्र सोबत असायचाच. हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.. नोंद करून ठेवतो. काढायला आवडेल.
Pages