श्रीमती कविता गाडगीळ यांनी भारतीयांना उद्देशून लिहिलेलं पत्र

Submitted by चिनूक्स on 28 April, 2025 - 00:27

२१ सप्टेंबर २००१ रोजी फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांचा मिग - २१ हे विमान चालवत असताना मृत्यू झाला. कॅप्टन अनिल आणि कविता गाडगीळ यांच्यासाठी हा मोठा आघात होता. सरकारनं अभिजीत गाडगीळ यांच्यावर अपघाताची जबाबदारी ढकलली. पुत्रवियोगाच्या दु:खात असूनही गाडगीळ दांपत्यानं तीन वर्षं सरकारशी लढा दिला. सरकारनं शेवटी मान्य केलं की चूक अभिजीत गाडगीळ यांची नसून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. ’रंग दे बसंती’ या चित्रपटाची ही प्रेरणा होती.

गाडगीळ दांपत्याचा लढा केवळ त्यांच्या मुलासाठी नसून मिग - २१ विमानांच्या अपघातात बळी गेलेल्या दोनशेहून अधिक वैमानिकांसाठी होता.

यापुढे अधिक बळी जाऊ नयेत, म्हणून गाडगीळ पतीपत्नी सरकारदरबारी खेटे घालत राहिले.

२००६ साली त्यांनी भारतातलं पहिलं एव्हिएशन सिम्यूलेटर खडकवासल्याजवळ सुरू केलं. त्या काळी या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च आला. हा बहुतेक सगळा खर्च गाडगीळ कुटुंबानं केला. अभिजीत यांचे बंधू केदार यांनी पंचवीस लाख रुपये दिले.

पण आत्ता मुद्दा हा नाही.

कॅप्टन अनिल भारतीय वायुसेनेत वीस वर्षं कार्यरत होते. त्यांनी बांगलादेशाच्या युद्धात भाग घेतला होता.

काही दिवसांपूर्वी पहलगाम इथे अतिरेक्यांनी केलेल्या नृशंस हत्याकांडानंतर देशभर पाकिस्तानाशी युद्ध करावं, ही मागणी जोर धरू लागली. मुसलमानांवर आर्थिक बहिष्काराची भाषा तर हल्ल्यानंतर पाचेक मिनिटांत सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर कविता गाडगीळ यांनी भारतीयांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं. तुमच्यापैकी अनेकांनी ते आतापावेतो इतरत्र वाचलंही असेल.

कविता यांनी सांगितल्यानुसार केदार यांनी ते इंग्रजीत लिहिलं. त्या पत्राचा अनुवाद भक्ती बिसुरे यांनी केला आहे.

हे पत्र मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करायला परवानगी दिल्याबद्दल भक्ती बिसुरे यांचे मन:पूर्वक आभार.

***

माझ्या प्रिय भारतीय बंधुभगिनींना,
सप्रेम नमस्कार!

आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. माझा मुलगा म्हणजे फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ! अभिजित आज असता तर ५१ वर्षांचा झाला असता… पण माझ्यासाठी मात्र तो २७ वर्षांचाच आहे अजूनही.

कुठल्याही आईसाठी तिचं मूल कितीही मोठं झालं तरी ते कायम लहानच असतं म्हणून नाही… पण अभिजित २७ वर्षांचा असताना घडलेल्या घटनेने जणू काळ गोठला आणि सगळं जिथल्या तिथे थांबलं.

२००१ मध्ये सप्टेंबरच्या त्या रात्री अभिजितने त्याच्या ‘मिग -21’ मधून टेकऑफ केलं. त्यानंतर अवघ्या ३३ सेकंदांमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं. अभिजितचं ‘मिग-21’ क्रॅश झालं. काही म्हणजे काही हाती लागलं नाही. फक्त रिकामं भकास आकाश आणि जीवघेणी शांतता तेवढी मागे राहिली…
त्या तसल्या जीवघेण्या शांततेचं ओझं अनेक वर्षं मनावर आहे, म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांशी बोलायचं ठरवलंय.

एखाद्या हिंसक प्रसंगानंतर येणारी शांतता मोठी भीषण असते. भूतकाळातली सुखदुःखं, श्वास, जगणं हे सगळं नाहीसं झाल्यामुळे निर्माण झालेली ती एक पोकळी असते. ही पोकळी उरावर घेऊन जगण्याच्या यातनांची कल्पनाच न केलेली बरी…

ती तसली भीषण पोकळी आता मला परत जाणवू लागली आहे… आणि त्यातच युद्ध हवं म्हणणाऱ्या आवाजांचे सूरही टिपेला पोहोचले आहेत.

मी १२ वर्षांची होते तेव्हा १९६२चं युद्ध झालं. आमच्या जगण्यातलं सगळं निरागसपण त्या युद्धानं हिरावून घेतलं.

आपली तरणीताठी मुलं गमावलेल्या, मोडून पडलेल्या आयांना बघत मी लहानाची मोठी झाले. नुकतंच लग्न झालेल्या आणि नवरा युद्धात कामी आल्यावर सर्वस्व गमावलेल्या कितीतरी तरुण मुली पाहिल्या आहेत मी. पुढे माझंच लग्न हवाईदलातल्या एका धडाडीच्या अधिकाऱ्याशी झालं. त्यानंतरची किती तरी युद्धं आम्ही दोघांनी एकत्र पाहिली.

१९७१चा तो कडाक्याचा हिवाळा मी फक्त हेडलाईन्समधून बघितलेला नाही, तर प्रत्यक्ष अनुभवलाय. माझा नवरा तेव्हा जोरहाटवरुन सतत मोहिमांवर जात असे. कधी युद्धभूमीवर लढणाऱ्यांसाठी राशन पोहोचवायचं म्हणून, तर कधी पूर्व पाकिस्तानातून जखमी किंवा मृत सैनिकांना परत आणायचं म्हणून त्याच्या अविश्रांत फेऱ्या सुरु असत. जीव धोक्यात घालणाऱ्या मोहिमांसाठी तो टेकऑफ करायचा तेव्हा मागे एकाकी धावपट्टीवर उभी राहून कित्येकदा मी त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केलीये. युद्धासारखी वाटणारी शांतता आणि शांतता ढवळून टाकणारी युद्ध हे सगळं मी जवळून पाहिलंय.

ज्यांनी कधी ना कधी युद्धावर गेलेल्या कुणाच्या तरी वाटेकडे डोळे लावून बसणं काय असतं हे अनुभवलंय, त्यांनाच युद्ध हे कुठल्याही समस्येवरचं उत्तर नाही याची जाणीव असते, याची मला पुरेपूर कल्पना आहे.

युद्ध म्हणजे विनाश. युद्ध म्हणजे नांदत्या कुटुंबांचे लचके तोडणं. युद्ध हा त्याग आहे, आणि त्या त्यागाची अपेक्षाही सहसा अशाच लोकांकडून केली जाते, ज्यांच्याकडे मुळातच फार काही नसतंच…

युद्धात बहुतेकवेळा सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, नोकरदारांची आणि शिक्षकांची मुलंच कामी येतात. श्रीमंतांची मुलं तिथपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. त्यामुळेच कर्त्यासवरत्या मुलाच्या बदल्यात मिळणारा तिरंगाही सर्वसामान्य आयांच्याच वाट्याला येतो.
युद्धाची खरी किंमत नेहमी बायकांनाच मोजावी लागते. ती किंमत काय असते? आपली तरुण मुलं गमावल्यावर त्यांच्या मागे कुढत जगत राहणं, नवरा गमावल्यावर आपलं दुःख बाजूला ठेवून एकटीने मुलांना वाढवणं, युद्धात भाऊ गेल्यानंतर उरलेलं आयुष्य भावाची उणीव घेऊन सैरभर जगत राहणं…

परवा पहलगाममध्ये जे झालं त्यानंतर देशात उफाळून आलेला संताप मला दिसतो आहे. मला तो कळतोही आहे. पण म्हणूनच मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, आपल्या तरुण तडफदार मुलांना वृथा अभिमान आणि सूडाच्या तोंडी देण्यापूर्वी थांबा आणि सारासार विचार करा. मोठमोठ्या व्यासपीठांवर, न्यूज चॅनल्सच्या चर्चांमध्ये किंवा अगदी सोशल मीडियावरच्या चर्चेत ‘युद्ध हाच उपाय’ म्हणून कंठशोष करणाऱ्यांना युद्धाची किंमत मोजायची नाहीये, नसते. वेळ आलीच तर तुमचीआमची मुलं, विद्यार्थी, शेजारी, प्रियजन - पर्यायाने तुम्हीआम्ही त्या युद्धाची किंमत मोजतो. आणि किंमत म्हणजे फक्त तिरंग्यात लपेटून आलेले आपल्या माणसांचे मृतदेह नव्हे… युद्धात झालेली सर्व प्रकारची हानी भरुन यायला कितीतरी वर्ष जावी लागतात. कितीतरी पिढ्या मातीमोल होतात तरी युद्धाच्या जखमा भरत नाहीत आणि भविष्य म्हणजे फक्त अंधकार असतो!

अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमधल्या युद्धाचा अर्थ, त्याची भीषणता, गांभीर्य आपल्यापैकी किती लोकांना कळतं मला माहिती नाही. पाकिस्तान अत्यंत अस्थिर आणि आततायी देश आहे. ‘नो फर्स्ट यूझ’ हे धोरण त्या देशाला मान्य नाही. अण्वस्त्राचा वापर झाला तर अवघ्या काही तासांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय (आणि पाकिस्तानीही!) नागरिक मरतील. आपल्या जमिनी आणि नद्या तहहयात विषारी होतील. साडेतीन कोटी लोक आयुष्यभर ‘मरण आलं असतं तर बरं’ अशा वेदना घेऊन जगतील आणि त्या वेदनांवर कुठलीही औषधं कधीही पुरे पडणार नाहीत.

तुम्हाला माहितीये, ८० कोटी भारतीय रेशनच्या धान्यावर जगतात. तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. भारतीय सैन्यदलांच्या धाडसाबद्दल दुमत नाही, पण आपल्याकडे एक लाख सैनिक आणि १२,००० अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. आपल्या हवाईदलाला ४२ स्क्वाड्रन्सची गरज आहे, पण आपल्याकडे आहेत कशाबशा ३१, त्यातलीही बहुतेक विमानं आता खूप जुनी आहेत. नौदलाकडे १५ पेक्षा कमी पाणबुड्या काम करण्याच्या अवस्थेत आहेत आणि चीनकडे मात्र सुमारे ७० पाणबुड्यांचा ताफा आहे… उद्या खरंच युद्ध सुरु झालं तर आपण कसेबसे दोन आठवडे लढू शकू, याची कल्पना आहे आपल्याला?

सैनिकांचे बूट, जॅकेट्स, रेडिओ, रायफल्स, टेंट्स, औषधं… आणि माफ करा, मला हा शब्द लिहिणंही जड जातंय, पण अगदी शवपेट्यांसाठीही आपण इतरांवर अवलंबून आहोत हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? आणि आपण युद्धाचे मनोरथ रचत असताना तिकडे चीन मात्र अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम आणि आपल्या हातून निसटू शकेल असं सगळं सगळं गिळंकृत करायला बसलाय, हे दिसतंय का कुणाला? अमेरिका आपल्याला सहानुभूती देईल, भाषणं देईल, महागडा शस्त्रसाठा देईल, पण त्यांची मुलंबाळं आपल्याला देणार नाही, हे लक्षात असुदे ‘युद्ध हवं’ म्हणणाऱ्या सगळ्यांच्याच.

आपल्यावर झालेल्या अन्यायाला पोटात घ्या, असं मी अजिबात म्हणत नाही. पहलगामचा बदला घ्यायला हवाच. या सगळ्याला जबाबदार असलेल्यांना सुळावर चढवून आपल्याला न्याय मिळायलाच हवा. आपल्या इंटेलिजन्सचा दर्जा सुधारायला हवा. संरक्षण अधिक काटेकोर हवं. अपयश समोर यायला हवं आणि त्याची दुरुस्तीही व्हायला हवी. वरपासून खालपर्यंत जे जे दोषी आहेत त्यांची गच्छंतीही व्हायलाच हवी.

पण सुडाच्या वारुवर उधळताना आपल्यातलं शहाणपण हरवतां नये. त्यातून आपला प्रवास विनाशाकडे होता नये. ते होऊ नये म्हणून, या देशावर जीवापाड प्रेम करणारी एक नागरिक म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हे कळकळीचं आवाहन करते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या रक्षणार्थ मी माझा मुलगा दिला आणि तो मला परत मिळाला नाही. एक वीरमाता म्हणून माझं तुम्हाला हे आवाहन आहे. भारताला आत्ता नेमक्या कशा नेतृत्वाची गरज आहे ते ओळखून तुम्ही वागावं, अशी माझी अपेक्षा आहे. क्रोधाचे ढग गडद होतात तेव्हा आरडाओरडा करणं म्हणजे ताकद नव्हे, तर स्थिर राहाणं ही ताकद आहे हे, तुम्ही सगळ्यांना दाखवून द्यावं, असं मला वाटतं. मृतांना न्याय मिळवून द्यायचा आहे, पण त्यासाठी हयात असलेल्यांच्या भविष्याशी खेळायचं नाही, हे तुम्ही जमवायला हवं. ‘स्टेट्समनशिप’ चा अर्थ तुम्ही इतरांना दाखवून देण्याची गरज आहे. या परिस्थितीत तुम्ही क्रोधाने नाही, तर सहानुभूतीने नेतृत्व कराल, अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे असलेल्या सैन्यदलांमधल्या माणसांची मोजदाद करताना ती फक्त एक माणसांची संख्या नाही तेवढ्या कुटुंबांची, स्वप्नांची आणि त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जगाची संख्या आहे, हे विसरु नका. या देशाचे प्रमुख म्हणून तुम्ही हे सगळं कसं जमवणार, याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत, आणि मुख्य म्हणजे आपल्या देशातली मुलंही मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे पहातायेत, हे लक्षात असू द्या. खरा नेता कसा असतो, कसा असायला हवा, हे त्यांना दाखवून द्या, प्लीज!

आणि आता पुन्हा जरा भारतीयांकडे वळते.

बंधूभगिनींनो, तुम्ही म्हणताय तसं, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना काही मूठभर स्थानिक काश्मिरींकडून मदत मिळते, आसरा दिला जातो, हे खरंच.
पण काश्मीरकडे पाठ फिरवणं, हा त्यावरचा उपाय नाही. उलट हीच वेळ आहे त्या मूठभर काश्मिरींकडे दुर्लक्ष करुन मोठ्या संख्येने शांतता हवी असलेल्या काश्मिरींसाठी आपला हात पुढे करण्याची. दहशतवाद हा तिरस्काराला खतपाणी घालतो. इतरांपासून तुटलेले, दुरावलेले, एकटे पडलेले किंवा पाडलेले यांना गाठून त्यांचे कान भरणं, त्यांना आपल्या बाजूला वळवणं दहशतवादाला सहज जमतं. काश्मीरच्या ट्रिप्स कॅन्सल करुन, तिथल्या व्यवसायांवर बहिष्कार घालून किंवा तिथल्या लोकांकडे पाठ फिरवून तुम्ही दहशतवाद्यांना अद्दल घडवत नसता, तर त्यांना बळ देत असता, हे लक्षात असूदे. एरवी ज्या तरुण मुलांनी शेती केली असती, लहानमोठा नोकरीधंदा केला असता, ते तरुण आपण काश्मीरकडे पाठ फिरवल्यामुळे हाताला काम नसलेले, अस्वस्थ, रिकामे बसणार आहेत. त्यामुळे त्यांची माथी भडकवून त्यांना आपल्याकडे खेचून घेणं दहशतवाद्यांना सोपं जाणार आहे.

काश्मीरबद्दल खरंच तुमच्या मनात प्रेम असेल, तो भारताचा अविभाज्य भाग आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काश्मिरी लोकांना परकं करुन चालणार नाही. तुम्हाला काश्मीरची जमीन हवी, निसर्ग हवा, पण तिथली माणसं नकोत हे कसं काय जमेल?

अर्थातच, काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणायला हवं. त्यांना न्याय मिळायला हवा. भूतकाळातल्या चुका सुधारायला हव्यात. लोकसंख्येचा समतोल साधायला हवा. पण हे सगळं स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या साथीने व्हायला हवं, त्यांना डावलून नाही! कारण सर्वसामान्य काश्मिरी लोक तुमच्याबरोबर असतील तर दहशतवादी काहीच करु शकणार नाहीत. कुठेही जरा खुट्ट झालं तरी स्थानिक काश्मिरींना त्याची जाणीव सगळ्यात आधी होते, हा इतिहास आहे. १९४७ला घुसखोरी झाली तेव्हा, नंतर कारगिल घडलं तेव्हाही काश्मिरी मेंढपाळ, गुज्जर, बकरवालांनीच त्याबद्दल सैन्यदलांना पहिली माहिती देत सावध केलं होतं, याची तुम्हाला कल्पना आहे का?

अगदी परवा पहलगाम झालं तेव्हाही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेत न जाऊ देणारे, त्यांना खाऊपिऊ घालणारे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीव देणारे तेच स्थानिक काश्मिरी होते हे आपण विसरुन चालणार नाही. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यांचा आदर करायला हवा. आपल्याला जर खरंच दहशतवादाचा बिमोड करायचा असेल, पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, संपूर्ण काश्मीर आपलं असावं-ते आपल्याला परत मिळावं असं वाटत असेल तर माझ्याकडे एक योजना आहे. त्या योजनेत बळाचा वापर करण्याची गरज नाही.

काश्मीरला जा. तिथल्या लोकांच्यात मिसळा. त्यांची हॉटेल्स, बागा, बाजार हे तुमच्या अस्तित्वाने भरून टाका. त्यांची सफरचंदं, त्यांचे जर्दाळू, केशर, गालिचे, शाली विकत घ्या. तिथे व्यवसाय सुरु करा. दुकानं उघडा. तिथे रेल्वे स्टेशन्स, विमानतळ येऊ देत. धरणं, पूल उभे राहूदेत. त्यासाठी तुमची मनं आणि तुमच्या खिशातला पैसा हे माध्यम होऊ द्या!

ही योजना राबवताना कुणाचे जीव जाणार नाहीत. विनाशही होणार नाही. युद्धापेक्षा हे बरंच नाही का?

काश्मीर हे भारताचं अविभाज्य, तेजस्वी अंग व्हावं पण ते तेज विश्वासाचं हवं… रणधुमाळीच्या आगीचं नाही. त्यासाठी आधी काश्मिरी लोक आपला अविभाज्य भाग असायला हवेत मात्र…

काश्मीरच्या गोष्टीचा उत्तरार्ध तिरस्काराने नाही, तर प्रेमाने लिहिला जाऊ शकतो हे जगाला दाखवून देण्याची ही वेळ आहे. हे घडलं तर पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरलाही फरक दिसेल, जाणवेल आणि तिथले लोक स्वतःच पाकिस्तानचं वर्चस्व नाकारतील!

बंदुकीची एक गोळीही न झाडता आपण काश्मीर राखू… पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीरही परत मिळेल. हे सगळं फक्त काश्मीर आणि काश्मिरींना आपलंसं केल्यामुळे साध्य होईल.

काश्मिरी लोकांनी आम्हाला वाचवलं, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत हे पहलगाममधला दहशतवादी हल्ला अनुभवलेले पर्यटक आपल्याला जीव तोडून सांगतायेत.. सर्वसामान्य काश्मिरी माणूस कष्टाळू आहे. कुटुंबवत्सल आहे. त्यांनाही वाटतं आपल्या मुलाबाळांनी शिकूनसवरुन, सर्वसामान्य भारतीयांसारखं शांत स्थिर आयुष्य जगावं…

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला नृशंस हिंसाचार पाहिलेली, अनुभवलेली, त्यातून स्वतःचं सर्वस्व गमावलेली माणसं मानवतेवर विश्वास ठेवू शकतात तर आपणही तो ठेवायला हवा.

लक्षात ठेवा, युद्ध सुरू करणं सोपं, पण ते संपवणं अशक्य असतं. तिरस्काराची आग शत्रुला भस्मसात करेलच, पण ती लावणाऱ्याला तरी ती कुठे मोकळं सोडणार आहे? फक्त सैन्यदलं ही भारताचं एकमेव बलस्थान नाहीत, न संपणारी स्वप्न, दुर्दम्य आशावाद आणि प्रेम या आपल्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. त्यांचा विसर पडू देऊ नका.

निवडण्याची वेळ येईल तेव्हा प्रेम निवडा. धैर्य निवडा. बुद्धीमत्ता निवडा. भारतमातेला निवडा.

माझ्या बोलण्याचा विचार करा.

दुःखात असले तरी आशा न सोडलेली आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवणारी,
अभिजितची आई
आणि अनेक ‘मिग-21’ पायलट्सची माँ!
————
मूळ इंग्रजी पत्र - कविता गाडगीळ
अनुवाद - भक्ती बिसुरे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार करायला लावणारे पत्र आहे.
पण आमच्या ग्रुपमध्ये यावर ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्या सांगण्यासारख्या नाहीत. अशा हिडीस विचारांना अनुल्लेखाने मारले पाहिजे.

युद्धात बहुतेकवेळा सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, नोकरदारांची आणि शिक्षकांची मुलंच कामी येतात. श्रीमंतांची मुलं तिथपर्यंत कधीच पोहोचत नाहीत.
आणि हा वर्ग अग्निवीरसारख्या योजनांना विरोधही करू शकत नाही इतका बुद्धिभेद उजव्या विचाराच्या पक्षाने आणि त्याच्या संघटनांनी केला आहे.

माफ करा पण काहिच्या काही फोर्वर्ड्स मधे शोभेल अशी पोस्ट आहे.

नवीन Submitted by आकाशानंद on 28 April, 2025 - 00:42

स ह म त

माफ करा पण काहिच्या काही फोर्वर्ड्स मधे शोभेल अशी पोस्ट आहे.

नवीन Submitted by आकाशानंद on 28 April, 2025 - 00:42

स ह म त

कविता गाडगीळ यांचा त्याग आणि त्यांचे पती श्री. अनिल यांनी भारतातर्फे बजावलेल्या कार्याचा मान आणि त्याबद्दल पूर्ण भान राखून लिहिते आहे. कविता यांचा अपमान करायचा कोणताही उद्देश नाही. त्यांच्या उद्देशाबद्दलही शंका नाही. युद्ध हाच रामबाण उपाय आहे असेही मी मानत नाही. फक्त एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह म्हणून लिहिते आहे.

शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री श्रीमती अनुराधा गोरे यांनी लिहिलेले पुस्तकही वाचा. कॅप्टन गोरे वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी कुपवाडा येथे अतिरेक्यांचा सामना करताना शहीद झाले. अनुराधा यांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की भारतातल्या अनेकांना काश्मिरी, पाकिस्तानी लोकांचा उत्तम अनुभव आहे. कला, चित्रपट, संगीत इत्यादी क्षेत्रातील लोक म्हणतात की आपले पाकिस्तानशी वैर नाही, मग आमची मुलं कुणासाठी लढत शहीद झाली. त्यांचेही अतिरेक्यांशी किंवा समोरच्या सैनिकांशी वैयक्तिक वैर नव्हते ना?

भारत सरकारने युद्ध घोषित केले आहे किंवा करणार आहे असे सुचित केले का? सध्याच्या जगात युद्ध कोणाला परवडणार?

भारत पाक युद्ध जर कधी पेटलेच तर नुकसान भारताचेच आहे. पाकिस्तानकडे आता हरायलाही काही शिल्लक नाही. सगळ्या जगाकडुन कर्ज घेऊन बसलेला देश, युद्ध हवेच म्हणेल.

भारत सरकार युद्ध पुकारेल असे मला तरी वाटत नाही. पण काहीतरी धक्का द्यायला हवा हेही खरे आहे.

कविता गाडगिळ यांची कळकळ समजण्याजोगी आहेच. त्यांच्या घरात दोन सैनिक असल्यामुळे युद्धाची दहशत जवळुन पाहिली असणार. पती सैनिक असताना युद्धे लढली, निदान मुलाला तरी सैन्यात पाठवायला नको होते.

काश्मीरला जा. तिथल्या लोकांच्यात मिसळा. त्यांची हॉटेल्स, बागा, बाजार हे तुमच्या अस्तित्वाने भरून टाका. त्यांची सफरचंदं, त्यांचे जर्दाळू, केशर, गालिचे, शाली विकत घ्या. तिथे व्यवसाय सुरु करा. दुकानं उघडा. तिथे रेल्वे स्टेशन्स, विमानतळ येऊ देत. धरणं, पूल उभे राहूदेत. त्यासाठी तुमची मनं आणि तुमच्या खिशातला पैसा हे माध्यम होऊ द्या!>>>>>>

हे सगळे होतच होते की. उर्वरीत भारत तिकडे जातोय गेली कित्येक वर्षे. कितीसा उपयोग झाला? स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय पहलगाम घडले का. आणि आता जिवावर उदार होऊन जायचे का?

आपल्या इंटेलिजन्सचा दर्जा सुधारायला हवा. संरक्षण अधिक काटेकोर हवं. अपयश समोर यायला हवं आणि त्याची दुरुस्तीही व्हायला हवी. >> हे सगळ्यात महत्वाचं. दहशतवाद आम्ही अलमोस्ट नष्ट केला हे सांगून तो संपत नाही; इतिहास बघता तो कधी संपणार नाही, किंबहुना अधे मधे डोके वर काढायचा प्रयत्न करेल.... त्यासाठी आपलं इंटेलिजन्स आणि सुरक्षा यंत्रणा, दोन्ही भक्कम पाहिजे.

या पत्राला इथे समर्थन मिळते ही मूळ समस्या आहे.

आपण जेमतेम दोन आठवडे युद्ध करू शकू - मग युक्रेन, रशिया, इस्राईल, हमास हे वाडगा घेऊन फिरायला हवे होते

UAE, इराण यांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे, याची संत गाडगीळ यांनी दखल घेतली आहे का?

तुमचे काय पाच पंचवीस मेले ते सोडा अन काश्मिरी व्यापाराला चालना द्यायला धावून जा! व्वा, काय सल्ला आहे. अजून पाच पंचवीस मेले तरी हेच बोलणार का?

त्यांच्या वैयक्तिक दुःखात आपण व तमाम भारतीय सहभागी आहोतच

अन्नावरून रस्त्यावर मुडदे पाडणारा भिकारी देश असल्या हत्याकांडांना फायनान्स करत आहे आणि आपण संत गाडगीळ यांचे विचार फॉलो करायचे

युद्धात जिंकणाऱ्याचेही भले होत नसते हे शेंबड्या पोरालाही कळते, पण म्हणून काहीही सहन करायचे काय?

विमानाच्या तांत्रिक घोटाळ्यामुळे झालेला अपघाती मृत्यू आणि निरपराध नागरिकांना बायका पोरांसमोर मारणे हे समानच का?

असे संदेश इकडे तिकडे पसरवणे ही मूळ समस्या आहे

या पत्राला इथे समर्थन मिळते ही मूळ समस्या आहे.>>>
+१
असे संदेश इकडे तिकडे पसरवणे ही मूळ समस्या आहे>>>
वॉर टाईम प्रोपोगंडा सुरु झालाय. बरेच स्लीपर सेल्स आता अ‍ॅक्टीव्हेट होतील. भावनांना हात घालणारी पत्रे, करुण कहाण्या लिहितील. आणि भोळीभाभडी लोकं भावनीक होउन असे संदेश इकडे तिकडे पसरवतील.

UAE, इराण यांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे, याची संत गाडगीळ यांनी दखल घेतली आहे का?
हा कशात मोडते?

- माझे पत्र - स्वतःलाच (प्रत्येकाने आपापले ठरवावे म्हणून स्वतःलाच)

दहशतवाद कधीच संपणार नाही.
प्रत्यक्ष युद्धात भारताचे नुकसान जास्त होईल म्हणून भारत ते कधी करणार नाही.
प्रत्यक्ष युद्धात पाकिस्तान बेचिराख होईल म्हणून पाकिस्तान ते कधी करणार नाही.
पण अध्येमध्ये दहशतवादी हल्ले कायम होत राहणार.
त्यांना तेव्हाच्या तेव्हा उत्तरे द्यावी लागणार. दिली जाणार.
यामागे दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करणे हा उद्देश नसून लोकक्षोभ शांत करणे यासाठी ते होणार.
राजकीय पक्ष आणि नेते अश्या घटनांचा आपल्या स्वार्थासाठी फायदा उचलत राहणार.
या नेत्यात भारत, पाकिस्तान, सत्ताधारी, विरोधक सारेच आले.

युद्धात शहीद होणाऱ्यांना सलाम करतो. या सगळ्याची प्रत्यक्ष झळ त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसते. ती तशी बसू नये हे त्यांच्या हातीही नसते.
पण सामान्य माणूस म्हणून मी माझे आणि माझ्या जवळच्यांचे हित ओळखून त्यानुसार वागणे गरजेचे आहे हे जाणतो.

काश्मीरला जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे, तर तो मी घालणार नाही. मी काश्मीरला जाणार नाही.
कारण माझ्या जीव धोक्यात घालण्याने कोणाचे फार काही भले होणार नाही की परिस्थिती काही कायमची बदलणार नाही, की दहशतवाद संपणार नाही.

मी भावनांवर कंट्रोल ठेवेन. प्रक्षोभक आवाहनांना बळी पडणार नाही. धार्मिक दंगली झाल्या तर त्यात समोरच्या धर्मातील चार अनोळखी लोकांना मारून मला कुठल्याही बदल्याचे समाधान मिळणार नाही. पण माझ्या घरातील एक जरी नाहक यात बळी गेला तर ते नुकसान कशानेही भरून येणार नाही.

पण म्हणून मी कोणाला उगाचच समधर्मसमभाव अंतर्गत मिठ्या मारायला जाणार नाही.
माझा जीव, माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे कायम लक्षात ठेवेन.
जसे आयुष्य कालपर्यंत जगत होता शक्यतो तसेच उद्याही जगायचा प्रयत्न करेन.

पण सरकारकडून सुरक्षा मात्र कडेकोट करायची अपेक्षा धरेन. जे झाले त्याची कसून चौकशी व्हावी आणि कारवाई होत दोषींना कडक शिक्षा मिळावी याबाबत आग्रही राहीन.

असे किमान मी माझ्यापुरते तरी ठरवले आहे.

वॉर टाईम प्रोपोगंडा सुरु झालाय. बरेच स्लीपर सेल्स आता अ‍ॅक्टीव्हेट होतील. भावनांना हात घालणारी पत्रे, करुण कहाण्या लिहितील. आणि भोळीभाभडी लोकं भावनीक होउन असे संदेश इकडे तिकडे पसरवतील.

>>>> फिअर मॉंगरिंगचा नवा खुळखुळा आहे हा. नेहमीचेच यशस्वी useful idiots हा सगळीकडे फिरवतायत.

कविता गाडगीळ ह्यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत.

फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ ह्यांचा उल्लेख मी प्रथम वाचला होता तो एका उजव्या विचारसरणीच्या टु बी मोअर प्रिसाइज राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असलेल्या व्यक्तिच्या लोकसत्ता मध्ये लिहिलेल्या अनावृत्त पत्रातुन. लेखकाचे नाव आठवत नाही त्याबद्दल क्षमस्व. संजय दत्त जेव्हा टाडा अंतर्गत तुरुंगात होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या केसांच्या वाढीसाठी त्याला एक विशिष्ट प्रकारचे तेल वापरु द्यावे असा अर्ज प्रशासनाकडे केला होता. त्यासंदर्भात हे पत्र होते. त्यामध्ये लेखकाने उल्लेख केला होता की विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात आल्यावर पॅराशूट च्या सहाय्याने विमातुन तत्काळ बाहेर पडुन स्वतः चा जीव वाचवण्याचा पर्याय अभिजीत गाडगीळ ह्यांच्या कडे होता. पण तसे केल्यास विमान कुठे कोसळेल ह्याची शाश्वती नव्हती आणि त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता होती. ती टाळण्यासाठी ते विमान लोकवस्ती पासुन दुर निर्जन जागी कोसळेल ह्याची काळजी घेत श्रीयुत गाडगीळ ह्यांनी स्वतः च स्वतःच्या मृत्युचा पर्याय स्वीकारला. ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत इतरांच्या जीवाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल लिहिताना किमान संवेदनशीलता दाखवणे हे आपले घटनादत्त कर्तव्य आहे, ह्याची कृपया जाणीव ठेवा.

त्यांनी त्यांचे विचार मांडणे आणि त्याबद्दल त्यांना समर्थन देणे ह्यात नक्की चुकीचे काय आहे ते समजले नाही. ज्यांनी हे हत्याकांड घडवून आणले त्यांना कठोर शिक्षा व्हावी, इथुन पुढे असे हल्ले होऊ नयेत म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न केले जावेत. हे त्यांनी पत्रात म्हटले आहे. पण त्यासाठी आत्ता पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारु नये कारण सध्याच्या परिस्थितीत ते भारतीय लष्कराला जास्त नुकसान कारक ठरेल असे त्यांचे आणि त्यांच्या भारतीय वायुसेनेतुन निवृत्त झालेल्या पतींचे म्हणणे आहे. त्यांना असे का वाटते ह्याबद्दल त्यांनी कारणे दिलेली आहेत. त्यापैकी कुठलाही मुद्दा चुकीच्या माहितीवर आधारित असेल तर तसे विश्वासार्ह स्त्रोतांच्या आधारे इथे लिहा. मुद्दा खोडून काढताना तो तर्काच्या आधारे सोडण्याचा प्रयत्न अपेक्षित आहे.
घाउक प्रमाणात काश्मिरी लोकांना ह्यासाठी जबाबदार धरु नका हे त्यांचे म्हणणे चुकीचे कसे काय? काश्मीरी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच तर कलम ३७० हटविले गेले होते ना? मग काश्मिरी लोकांवर बहिष्कार म्हणजे त्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रयत्नांना विरोध नाही का? ही घटना घडली तेव्हा सुरक्षा यंत्रणेत कुठे चुक झाली, ह्या पुढे असे काही होऊ नये म्हणून सरकार काय करणार आहे? हे प्रश्न विचारण्याऐवजी काश्मिरी पर्यटनावर बहिष्कार टाका असे आवाहन करण्यात नक्की कुणाचा फायदा होणार आहे? मग फिअर मॉंगरिंग नक्की कोण करत असेल?, हे प्रश्न मला ह्या संदर्भात पडले.

बाकी फितुरी ची परंपरा आपल्याकडे फार जुनी आहे. ऐतिहासिक जयचंद राठौड, बाजी घोरपडे पासुन अर्वाचीन रविंद्र कौशिक पर्यंत. कुठल्याही राज्यातील किंवा धर्माच्या लोकांची त्यावर मक्तेदारी नाही. एक उदाहरण म्हणून, तामिळनाडू सरकारने नेमलेल्या सुरक्षेचे कडे भेदुन जाण्यासाठी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनी एका महिला हवालदाराला लाच दिली होती हे नंतरच्या चवकशी मध्ये निष्पन्न झाले होते. मग त्यांच्या समर्थकांनी तामिळ लोकांवर बहिष्कार घालायला हवा होता काय?

इथले प्रतिसाद वाचून अन्यत्र वाचलेल्या काही प्रतिक्रिया आठवल्या.

जिच्या वडिलांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या अशा महिलेने तिला टुरिस्ट ड्रायव्हर व अन्य एका काश्मिरी माणसाने कशी मदत केली ते सांगितले. आता मला काश्मीरमध्ये दोन भाऊ आहेत, अशी भावना तिने व्यक्त केली.
या बातमीच्या व्हिडियोवर हिने वडिलांना गमावलंय तरी लिपस्टिक कशी लावून आली?
हो ना! हिला सुतक आहे, असं अजिबात वाटत नाही.
अशा दोन प्रतिक्रिया दोन स्त्रियांच्या आहेत. या दोघी ब्लु टिकवाल्या हिंदुत्ववादी ट्रोल्स आहेत.

अन्य अशाच एका महिलेच्या बातमीवर - आपल्या नवर्‍याला वाचवण्यासाठी ती दहशतवाद्यांशी का लढली नाही? अशी एक प्रतिक्रिया दिसली.

ही घटना घडली तेव्हा सुरक्षा यंत्रणेत कुठे चुक झाली, ह्या पुढे असे काही होऊ नये म्हणून सरकार काय करणार आहे? हे प्रश्न
विचारले जाऊ नयेत म्हणूनच तर बाकीचा गदारोळ चालला आहे.

<त्यांचेही अतिरेक्यांशी किंवा समोरच्या सैनिकांशी वैयक्तिक वैर नव्हते ना?> पहलगाम दहशतवादी किंवा त्यांना मदत करणारे स्थानिक यांना माफ करा, आपलं म्हणा, असं कविता गाडगीळ यांनी लिहिलंय किंवा सुचवलंय का?

मला गाडगिळांचे पत्र सेन्सिबल वाटले.
ज्यांनी हे हत्याकांड घडवून आणले त्यांना कठोर शिक्षा व्हावी, इथुन पुढे असे हल्ले होऊ नयेत म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न केले जावेत. हे त्यांनी पत्रात म्हटले आहे. >>>> पर्णिका +१

स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय पहलगाम घडले का. >> साधना, कुठेही दहशतवादी हल्ला होतो तेव्हा "काही" स्थानिक लोकांची मदत घेऊनच हे सत्य आहे. म्हणजे तिथले जे स्थानिक ते सगळे च तसे करतात हे म्हणणे चूक आहे.
मुंबई बॉम्बस्फोटांच्या वेळी एकाही स्थानिकाने मदत केली नव्हती का? दहशतवाद्यांना लपवायल, आरडीएक्स उतरवऊन घ्यायला कोणीच मुंबईचे लोक सामील नव्हते का? त्या अनुषंगाने कुणी "मुंबईकर दहशतवाद्यांना सामील असतात" असे ब्लॅंकेट स्टेटमेन्ट केले तर अनफेअर होईल ना? तुझे वरचे स्टेटमेन्ट वाचून पहा. तसेच वाटते की नाही?
मात्र आता सामान्य लोकांनी काश्मीर ला सुरक्षेच्या कारणामुळे जाण्याचे टाळले तर मला त्यात काही चूक वाटत नाही. अ‍ॅक्चुअली मला वरचे ऋन्मेष चे पोस्ट ही सेन्सिबल वाटले.

विचारले जाऊ नयेत म्हणूनच तर बाकीचा गदारोळ चालला आहे.>>>>>>

भारतात लोकशाही आहे आणि लोकसंख्या भरपुर आहे. त्यामुळे काही गदारोळ करणारे सगळे आवाज बंद करु शकणार नाहीत. म्हणुन भिती सोडा आणि तुमचा गदारोळही उच्चरवात सुरु ठेवा.

हो. ना. नीतीवाले बाबू म्हणाले होते, भारतात टु मच ऑफ डेमोक्रेसी असल्याने विकास होत नाही. तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल आभार.

मुलाला हवाई दलात पाठवताना गाडगिळांचं चुकलंच असं म्हणायचा हक्क लोकशाहीने दिलाय की कसं ते तुमचं तुम्ही बघा.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा