श्रीमती कविता गाडगीळ यांनी भारतीयांना उद्देशून लिहिलेलं पत्र

Submitted by चिनूक्स on 28 April, 2025 - 00:27

२१ सप्टेंबर २००१ रोजी फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांचा मिग - २१ हे विमान चालवत असताना मृत्यू झाला. कॅप्टन अनिल आणि कविता गाडगीळ यांच्यासाठी हा मोठा आघात होता. सरकारनं अभिजीत गाडगीळ यांच्यावर अपघाताची जबाबदारी ढकलली. पुत्रवियोगाच्या दु:खात असूनही गाडगीळ दांपत्यानं तीन वर्षं सरकारशी लढा दिला. सरकारनं शेवटी मान्य केलं की चूक अभिजीत गाडगीळ यांची नसून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. ’रंग दे बसंती’ या चित्रपटाची ही प्रेरणा होती.

गाडगीळ दांपत्याचा लढा केवळ त्यांच्या मुलासाठी नसून मिग - २१ विमानांच्या अपघातात बळी गेलेल्या दोनशेहून अधिक वैमानिकांसाठी होता.

यापुढे अधिक बळी जाऊ नयेत, म्हणून गाडगीळ पतीपत्नी सरकारदरबारी खेटे घालत राहिले.

२००६ साली त्यांनी भारतातलं पहिलं एव्हिएशन सिम्यूलेटर खडकवासल्याजवळ सुरू केलं. त्या काळी या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च आला. हा बहुतेक सगळा खर्च गाडगीळ कुटुंबानं केला. अभिजीत यांचे बंधू केदार यांनी पंचवीस लाख रुपये दिले.

पण आत्ता मुद्दा हा नाही.

कॅप्टन अनिल भारतीय वायुसेनेत वीस वर्षं कार्यरत होते. त्यांनी बांगलादेशाच्या युद्धात भाग घेतला होता.

काही दिवसांपूर्वी पहलगाम इथे अतिरेक्यांनी केलेल्या नृशंस हत्याकांडानंतर देशभर पाकिस्तानाशी युद्ध करावं, ही मागणी जोर धरू लागली. मुसलमानांवर आर्थिक बहिष्काराची भाषा तर हल्ल्यानंतर पाचेक मिनिटांत सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर कविता गाडगीळ यांनी भारतीयांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं. तुमच्यापैकी अनेकांनी ते आतापावेतो इतरत्र वाचलंही असेल.

कविता यांनी सांगितल्यानुसार केदार यांनी ते इंग्रजीत लिहिलं. त्या पत्राचा अनुवाद भक्ती बिसुरे यांनी केला आहे.

हे पत्र मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करायला परवानगी दिल्याबद्दल भक्ती बिसुरे यांचे मन:पूर्वक आभार.

***

माझ्या प्रिय भारतीय बंधुभगिनींना,
सप्रेम नमस्कार!

आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. माझा मुलगा म्हणजे फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ! अभिजित आज असता तर ५१ वर्षांचा झाला असता… पण माझ्यासाठी मात्र तो २७ वर्षांचाच आहे अजूनही.

कुठल्याही आईसाठी तिचं मूल कितीही मोठं झालं तरी ते कायम लहानच असतं म्हणून नाही… पण अभिजित २७ वर्षांचा असताना घडलेल्या घटनेने जणू काळ गोठला आणि सगळं जिथल्या तिथे थांबलं.

२००१ मध्ये सप्टेंबरच्या त्या रात्री अभिजितने त्याच्या ‘मिग -21’ मधून टेकऑफ केलं. त्यानंतर अवघ्या ३३ सेकंदांमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं. अभिजितचं ‘मिग-21’ क्रॅश झालं. काही म्हणजे काही हाती लागलं नाही. फक्त रिकामं भकास आकाश आणि जीवघेणी शांतता तेवढी मागे राहिली…
त्या तसल्या जीवघेण्या शांततेचं ओझं अनेक वर्षं मनावर आहे, म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांशी बोलायचं ठरवलंय.

एखाद्या हिंसक प्रसंगानंतर येणारी शांतता मोठी भीषण असते. भूतकाळातली सुखदुःखं, श्वास, जगणं हे सगळं नाहीसं झाल्यामुळे निर्माण झालेली ती एक पोकळी असते. ही पोकळी उरावर घेऊन जगण्याच्या यातनांची कल्पनाच न केलेली बरी…

ती तसली भीषण पोकळी आता मला परत जाणवू लागली आहे… आणि त्यातच युद्ध हवं म्हणणाऱ्या आवाजांचे सूरही टिपेला पोहोचले आहेत.

मी १२ वर्षांची होते तेव्हा १९६२चं युद्ध झालं. आमच्या जगण्यातलं सगळं निरागसपण त्या युद्धानं हिरावून घेतलं.

आपली तरणीताठी मुलं गमावलेल्या, मोडून पडलेल्या आयांना बघत मी लहानाची मोठी झाले. नुकतंच लग्न झालेल्या आणि नवरा युद्धात कामी आल्यावर सर्वस्व गमावलेल्या कितीतरी तरुण मुली पाहिल्या आहेत मी. पुढे माझंच लग्न हवाईदलातल्या एका धडाडीच्या अधिकाऱ्याशी झालं. त्यानंतरची किती तरी युद्धं आम्ही दोघांनी एकत्र पाहिली.

१९७१चा तो कडाक्याचा हिवाळा मी फक्त हेडलाईन्समधून बघितलेला नाही, तर प्रत्यक्ष अनुभवलाय. माझा नवरा तेव्हा जोरहाटवरुन सतत मोहिमांवर जात असे. कधी युद्धभूमीवर लढणाऱ्यांसाठी राशन पोहोचवायचं म्हणून, तर कधी पूर्व पाकिस्तानातून जखमी किंवा मृत सैनिकांना परत आणायचं म्हणून त्याच्या अविश्रांत फेऱ्या सुरु असत. जीव धोक्यात घालणाऱ्या मोहिमांसाठी तो टेकऑफ करायचा तेव्हा मागे एकाकी धावपट्टीवर उभी राहून कित्येकदा मी त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केलीये. युद्धासारखी वाटणारी शांतता आणि शांतता ढवळून टाकणारी युद्ध हे सगळं मी जवळून पाहिलंय.

ज्यांनी कधी ना कधी युद्धावर गेलेल्या कुणाच्या तरी वाटेकडे डोळे लावून बसणं काय असतं हे अनुभवलंय, त्यांनाच युद्ध हे कुठल्याही समस्येवरचं उत्तर नाही याची जाणीव असते, याची मला पुरेपूर कल्पना आहे.

युद्ध म्हणजे विनाश. युद्ध म्हणजे नांदत्या कुटुंबांचे लचके तोडणं. युद्ध हा त्याग आहे, आणि त्या त्यागाची अपेक्षाही सहसा अशाच लोकांकडून केली जाते, ज्यांच्याकडे मुळातच फार काही नसतंच…

युद्धात बहुतेकवेळा सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, नोकरदारांची आणि शिक्षकांची मुलंच कामी येतात. श्रीमंतांची मुलं तिथपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. त्यामुळेच कर्त्यासवरत्या मुलाच्या बदल्यात मिळणारा तिरंगाही सर्वसामान्य आयांच्याच वाट्याला येतो.
युद्धाची खरी किंमत नेहमी बायकांनाच मोजावी लागते. ती किंमत काय असते? आपली तरुण मुलं गमावल्यावर त्यांच्या मागे कुढत जगत राहणं, नवरा गमावल्यावर आपलं दुःख बाजूला ठेवून एकटीने मुलांना वाढवणं, युद्धात भाऊ गेल्यानंतर उरलेलं आयुष्य भावाची उणीव घेऊन सैरभर जगत राहणं…

परवा पहलगाममध्ये जे झालं त्यानंतर देशात उफाळून आलेला संताप मला दिसतो आहे. मला तो कळतोही आहे. पण म्हणूनच मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, आपल्या तरुण तडफदार मुलांना वृथा अभिमान आणि सूडाच्या तोंडी देण्यापूर्वी थांबा आणि सारासार विचार करा. मोठमोठ्या व्यासपीठांवर, न्यूज चॅनल्सच्या चर्चांमध्ये किंवा अगदी सोशल मीडियावरच्या चर्चेत ‘युद्ध हाच उपाय’ म्हणून कंठशोष करणाऱ्यांना युद्धाची किंमत मोजायची नाहीये, नसते. वेळ आलीच तर तुमचीआमची मुलं, विद्यार्थी, शेजारी, प्रियजन - पर्यायाने तुम्हीआम्ही त्या युद्धाची किंमत मोजतो. आणि किंमत म्हणजे फक्त तिरंग्यात लपेटून आलेले आपल्या माणसांचे मृतदेह नव्हे… युद्धात झालेली सर्व प्रकारची हानी भरुन यायला कितीतरी वर्ष जावी लागतात. कितीतरी पिढ्या मातीमोल होतात तरी युद्धाच्या जखमा भरत नाहीत आणि भविष्य म्हणजे फक्त अंधकार असतो!

अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमधल्या युद्धाचा अर्थ, त्याची भीषणता, गांभीर्य आपल्यापैकी किती लोकांना कळतं मला माहिती नाही. पाकिस्तान अत्यंत अस्थिर आणि आततायी देश आहे. ‘नो फर्स्ट यूझ’ हे धोरण त्या देशाला मान्य नाही. अण्वस्त्राचा वापर झाला तर अवघ्या काही तासांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय (आणि पाकिस्तानीही!) नागरिक मरतील. आपल्या जमिनी आणि नद्या तहहयात विषारी होतील. साडेतीन कोटी लोक आयुष्यभर ‘मरण आलं असतं तर बरं’ अशा वेदना घेऊन जगतील आणि त्या वेदनांवर कुठलीही औषधं कधीही पुरे पडणार नाहीत.

तुम्हाला माहितीये, ८० कोटी भारतीय रेशनच्या धान्यावर जगतात. तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. भारतीय सैन्यदलांच्या धाडसाबद्दल दुमत नाही, पण आपल्याकडे एक लाख सैनिक आणि १२,००० अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. आपल्या हवाईदलाला ४२ स्क्वाड्रन्सची गरज आहे, पण आपल्याकडे आहेत कशाबशा ३१, त्यातलीही बहुतेक विमानं आता खूप जुनी आहेत. नौदलाकडे १५ पेक्षा कमी पाणबुड्या काम करण्याच्या अवस्थेत आहेत आणि चीनकडे मात्र सुमारे ७० पाणबुड्यांचा ताफा आहे… उद्या खरंच युद्ध सुरु झालं तर आपण कसेबसे दोन आठवडे लढू शकू, याची कल्पना आहे आपल्याला?

सैनिकांचे बूट, जॅकेट्स, रेडिओ, रायफल्स, टेंट्स, औषधं… आणि माफ करा, मला हा शब्द लिहिणंही जड जातंय, पण अगदी शवपेट्यांसाठीही आपण इतरांवर अवलंबून आहोत हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? आणि आपण युद्धाचे मनोरथ रचत असताना तिकडे चीन मात्र अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम आणि आपल्या हातून निसटू शकेल असं सगळं सगळं गिळंकृत करायला बसलाय, हे दिसतंय का कुणाला? अमेरिका आपल्याला सहानुभूती देईल, भाषणं देईल, महागडा शस्त्रसाठा देईल, पण त्यांची मुलंबाळं आपल्याला देणार नाही, हे लक्षात असुदे ‘युद्ध हवं’ म्हणणाऱ्या सगळ्यांच्याच.

आपल्यावर झालेल्या अन्यायाला पोटात घ्या, असं मी अजिबात म्हणत नाही. पहलगामचा बदला घ्यायला हवाच. या सगळ्याला जबाबदार असलेल्यांना सुळावर चढवून आपल्याला न्याय मिळायलाच हवा. आपल्या इंटेलिजन्सचा दर्जा सुधारायला हवा. संरक्षण अधिक काटेकोर हवं. अपयश समोर यायला हवं आणि त्याची दुरुस्तीही व्हायला हवी. वरपासून खालपर्यंत जे जे दोषी आहेत त्यांची गच्छंतीही व्हायलाच हवी.

पण सुडाच्या वारुवर उधळताना आपल्यातलं शहाणपण हरवतां नये. त्यातून आपला प्रवास विनाशाकडे होता नये. ते होऊ नये म्हणून, या देशावर जीवापाड प्रेम करणारी एक नागरिक म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हे कळकळीचं आवाहन करते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या रक्षणार्थ मी माझा मुलगा दिला आणि तो मला परत मिळाला नाही. एक वीरमाता म्हणून माझं तुम्हाला हे आवाहन आहे. भारताला आत्ता नेमक्या कशा नेतृत्वाची गरज आहे ते ओळखून तुम्ही वागावं, अशी माझी अपेक्षा आहे. क्रोधाचे ढग गडद होतात तेव्हा आरडाओरडा करणं म्हणजे ताकद नव्हे, तर स्थिर राहाणं ही ताकद आहे हे, तुम्ही सगळ्यांना दाखवून द्यावं, असं मला वाटतं. मृतांना न्याय मिळवून द्यायचा आहे, पण त्यासाठी हयात असलेल्यांच्या भविष्याशी खेळायचं नाही, हे तुम्ही जमवायला हवं. ‘स्टेट्समनशिप’ चा अर्थ तुम्ही इतरांना दाखवून देण्याची गरज आहे. या परिस्थितीत तुम्ही क्रोधाने नाही, तर सहानुभूतीने नेतृत्व कराल, अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे असलेल्या सैन्यदलांमधल्या माणसांची मोजदाद करताना ती फक्त एक माणसांची संख्या नाही तेवढ्या कुटुंबांची, स्वप्नांची आणि त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जगाची संख्या आहे, हे विसरु नका. या देशाचे प्रमुख म्हणून तुम्ही हे सगळं कसं जमवणार, याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत, आणि मुख्य म्हणजे आपल्या देशातली मुलंही मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे पहातायेत, हे लक्षात असू द्या. खरा नेता कसा असतो, कसा असायला हवा, हे त्यांना दाखवून द्या, प्लीज!

आणि आता पुन्हा जरा भारतीयांकडे वळते.

बंधूभगिनींनो, तुम्ही म्हणताय तसं, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना काही मूठभर स्थानिक काश्मिरींकडून मदत मिळते, आसरा दिला जातो, हे खरंच.
पण काश्मीरकडे पाठ फिरवणं, हा त्यावरचा उपाय नाही. उलट हीच वेळ आहे त्या मूठभर काश्मिरींकडे दुर्लक्ष करुन मोठ्या संख्येने शांतता हवी असलेल्या काश्मिरींसाठी आपला हात पुढे करण्याची. दहशतवाद हा तिरस्काराला खतपाणी घालतो. इतरांपासून तुटलेले, दुरावलेले, एकटे पडलेले किंवा पाडलेले यांना गाठून त्यांचे कान भरणं, त्यांना आपल्या बाजूला वळवणं दहशतवादाला सहज जमतं. काश्मीरच्या ट्रिप्स कॅन्सल करुन, तिथल्या व्यवसायांवर बहिष्कार घालून किंवा तिथल्या लोकांकडे पाठ फिरवून तुम्ही दहशतवाद्यांना अद्दल घडवत नसता, तर त्यांना बळ देत असता, हे लक्षात असूदे. एरवी ज्या तरुण मुलांनी शेती केली असती, लहानमोठा नोकरीधंदा केला असता, ते तरुण आपण काश्मीरकडे पाठ फिरवल्यामुळे हाताला काम नसलेले, अस्वस्थ, रिकामे बसणार आहेत. त्यामुळे त्यांची माथी भडकवून त्यांना आपल्याकडे खेचून घेणं दहशतवाद्यांना सोपं जाणार आहे.

काश्मीरबद्दल खरंच तुमच्या मनात प्रेम असेल, तो भारताचा अविभाज्य भाग आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काश्मिरी लोकांना परकं करुन चालणार नाही. तुम्हाला काश्मीरची जमीन हवी, निसर्ग हवा, पण तिथली माणसं नकोत हे कसं काय जमेल?

अर्थातच, काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणायला हवं. त्यांना न्याय मिळायला हवा. भूतकाळातल्या चुका सुधारायला हव्यात. लोकसंख्येचा समतोल साधायला हवा. पण हे सगळं स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या साथीने व्हायला हवं, त्यांना डावलून नाही! कारण सर्वसामान्य काश्मिरी लोक तुमच्याबरोबर असतील तर दहशतवादी काहीच करु शकणार नाहीत. कुठेही जरा खुट्ट झालं तरी स्थानिक काश्मिरींना त्याची जाणीव सगळ्यात आधी होते, हा इतिहास आहे. १९४७ला घुसखोरी झाली तेव्हा, नंतर कारगिल घडलं तेव्हाही काश्मिरी मेंढपाळ, गुज्जर, बकरवालांनीच त्याबद्दल सैन्यदलांना पहिली माहिती देत सावध केलं होतं, याची तुम्हाला कल्पना आहे का?

अगदी परवा पहलगाम झालं तेव्हाही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेत न जाऊ देणारे, त्यांना खाऊपिऊ घालणारे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीव देणारे तेच स्थानिक काश्मिरी होते हे आपण विसरुन चालणार नाही. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यांचा आदर करायला हवा. आपल्याला जर खरंच दहशतवादाचा बिमोड करायचा असेल, पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, संपूर्ण काश्मीर आपलं असावं-ते आपल्याला परत मिळावं असं वाटत असेल तर माझ्याकडे एक योजना आहे. त्या योजनेत बळाचा वापर करण्याची गरज नाही.

काश्मीरला जा. तिथल्या लोकांच्यात मिसळा. त्यांची हॉटेल्स, बागा, बाजार हे तुमच्या अस्तित्वाने भरून टाका. त्यांची सफरचंदं, त्यांचे जर्दाळू, केशर, गालिचे, शाली विकत घ्या. तिथे व्यवसाय सुरु करा. दुकानं उघडा. तिथे रेल्वे स्टेशन्स, विमानतळ येऊ देत. धरणं, पूल उभे राहूदेत. त्यासाठी तुमची मनं आणि तुमच्या खिशातला पैसा हे माध्यम होऊ द्या!

ही योजना राबवताना कुणाचे जीव जाणार नाहीत. विनाशही होणार नाही. युद्धापेक्षा हे बरंच नाही का?

काश्मीर हे भारताचं अविभाज्य, तेजस्वी अंग व्हावं पण ते तेज विश्वासाचं हवं… रणधुमाळीच्या आगीचं नाही. त्यासाठी आधी काश्मिरी लोक आपला अविभाज्य भाग असायला हवेत मात्र…

काश्मीरच्या गोष्टीचा उत्तरार्ध तिरस्काराने नाही, तर प्रेमाने लिहिला जाऊ शकतो हे जगाला दाखवून देण्याची ही वेळ आहे. हे घडलं तर पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरलाही फरक दिसेल, जाणवेल आणि तिथले लोक स्वतःच पाकिस्तानचं वर्चस्व नाकारतील!

बंदुकीची एक गोळीही न झाडता आपण काश्मीर राखू… पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीरही परत मिळेल. हे सगळं फक्त काश्मीर आणि काश्मिरींना आपलंसं केल्यामुळे साध्य होईल.

काश्मिरी लोकांनी आम्हाला वाचवलं, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत हे पहलगाममधला दहशतवादी हल्ला अनुभवलेले पर्यटक आपल्याला जीव तोडून सांगतायेत.. सर्वसामान्य काश्मिरी माणूस कष्टाळू आहे. कुटुंबवत्सल आहे. त्यांनाही वाटतं आपल्या मुलाबाळांनी शिकूनसवरुन, सर्वसामान्य भारतीयांसारखं शांत स्थिर आयुष्य जगावं…

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला नृशंस हिंसाचार पाहिलेली, अनुभवलेली, त्यातून स्वतःचं सर्वस्व गमावलेली माणसं मानवतेवर विश्वास ठेवू शकतात तर आपणही तो ठेवायला हवा.

लक्षात ठेवा, युद्ध सुरू करणं सोपं, पण ते संपवणं अशक्य असतं. तिरस्काराची आग शत्रुला भस्मसात करेलच, पण ती लावणाऱ्याला तरी ती कुठे मोकळं सोडणार आहे? फक्त सैन्यदलं ही भारताचं एकमेव बलस्थान नाहीत, न संपणारी स्वप्न, दुर्दम्य आशावाद आणि प्रेम या आपल्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. त्यांचा विसर पडू देऊ नका.

निवडण्याची वेळ येईल तेव्हा प्रेम निवडा. धैर्य निवडा. बुद्धीमत्ता निवडा. भारतमातेला निवडा.

माझ्या बोलण्याचा विचार करा.

दुःखात असले तरी आशा न सोडलेली आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवणारी,
अभिजितची आई
आणि अनेक ‘मिग-21’ पायलट्सची माँ!
————
मूळ इंग्रजी पत्र - कविता गाडगीळ
अनुवाद - भक्ती बिसुरे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण सोशल मीडियावर एका बाजूला आवेशाने 'घरात घुसून मारा' वगैरे म्हणणारे (आणि मग हे पोस्ट करून झाल्यावर सहजतेने दैनंदिन व्यवहारांना लागणारे)>>> मग सामान्य लोकानी काय करण अपेक्षित आहे?
खरतर भारताने तशी आगळीक कधिच केली नाही नेहमी सगळे हल्ले पलिकडुनच झाले..एकही सामजस्य करार न मानणारा शत्रु असताना आणी भारताकडुन युद्धाची तशी काही घोषणाही नाही उगाच काहितरी नसलेले फियर मॉन्गरिन्ग करण्यात काय पॉइन्ट आहे?
मुबैत आतापर्यत किती हल्ले झाले लोक दुसर्या दिवशी कामाला लागतातच, गाडगिळाना जर पत्र लिहौन व्यक्त व्हावस वाटल तर सामान्य लोक सोमीवर व्यक्त होतायत...घरात घुसुन मारा हे तिव्र भावनेचे प्रतिक नाही का? पण रोजची पोटाची खळगी भरणारे लोक आपल्या कामाला लागणार नाहित तर काय करणार? त्यानी निषेध म्हणुन सोमिवरच व्यक्त होण चान्गल नाही का? रस्त्यावर उतरले तर अजुन प्रॉब्लेम आहेत.
गाडगिळाच्या बलिदानाचा आदर आहेच पण या परिस्थितीत जेव्हा विरोधी पक्ष सुद्धा कधि नव्हे ते सरकारच्या बरोबर उभा आहे त्यावेळेस...भारत कसा कमजोर आहे आनी युद्ध लढु शकत नाही टाइप पोस्ट्/पत्र पुर्णतः चुकिच आणी अस्थानी वाटतय...हे विरमातेकडून याव हे दुर्दैवी.

पत्र 'एक एज्युकेटेड ओपिनियन' म्हणून अ‍ॅक्सेप्ट करता येतं की. मतभेद असू शकतात, असावेत, पण एकदम संतपद किंवा कुशंका ही टोकं कशाला? >>> सिरीयसली.

त्या सरकारकडे फक्त नेतृत्वाची अपेक्षा करत आहेत. त्यात काय चुकीचे आहे. बाकी संदेश देशातील नागरिकांना आहे.

>>> बाकी संदेश देशातील नागरिकांना आहे

त्या कोण देशातील नागरिकांना संदेश देणाऱ्या?

नागरिकांना स्वतःला काही समजत नाही का?

युद्ध दोन्ही बाजूंना बेचिराख करते हे कोणालाही कळते. काही वेगळा विचारही सुरू असू शकतो ना?

राजकीय घडामोडींबद्दल मत मांडणे, व्यक्त होणे ह्याबद्दल वेळोवेळी तुच्छता आणि तिरस्कार व्यक्त केला जातो. पण आजच्या युगात सोशल नेटवर्क हे वर्तमानपत्र, टीव्ही इतकेच प्रभावी माध्यम आहे. सामान्य माणसाला व्यक्त व्हायला एक मार्ग आहे. त्यातून समाजाची नाडी तपासता येते. जे कोणी नेते, सरकार, सैनिकी अधिकारी प्रत्यक्ष निर्णय घेतात त्यांना लोकांची भावना काय आहे हे कळायला हा एक मार्ग आहे. एकमेव नाही पण नक्कीच एक माध्यम आहे. पूर्वीसारखे निव्वळ काही मूठभर सेलेब्रिटी संपादक, पत्रकार, विचारक ह्यांनीच योग्य अयोग्य सांगावे आणि बाकीच्यांनी ऐकावे असे राहिलेले नाही.
प्रत्येक सोशल नेटवर्क पोस्टचा जोरदार परिणाम होईलच असे नाही पण लोकशाहीत खारीचा वाटा उचलला पाहिजे. करदाता म्हणून, मतदाता म्हणून, आपल्या नातेवाईकांची काळजी वाटते म्हणून अशा वेगवेगळ्या कारणाने लोक व्यक्त होत असतात.
सैन्यात भरती होऊन युद्ध करणार्यांनीच युद्धाबद्दल मत द्यावे हे मत चूक आहे. लोकशाहीत मत देताना झाडूवाला आहे की कंप्युटर प्रोग्रामर आहे की न्हावी आहे की डॉक्टर आहे हे बघितले जात नाही. ते सर्व नागरिक सरकार निवडतात ज्यात युध्द, दळणवळण, कर, आरोग्य, शिक्षण अशा विविध खात्याचा कारभार बघितला जातो.
आपले मत देऊन दैनंदिन व्यवहाराला लागले हे जणू काहीतरी लान्छन आहे असे मांडले गेले आहे. पण लोकशाहीत हे लांछन नाही. लोकांनी लोकांसाठी लोकांचे सरकार म्हणजे लोकशाही असेल तर प्रत्येकाला मत बाळगण्याचा आणि मांडण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल तुच्छता वाटत असेल, निरर्थक वाटत असेल तर पहिल्यांदा अशा लोकांनी मत मांडणे बंद करावे. कारण त्यांचेही मत त्याच जातकुळीत आहे.

>>> त्या कोण देशातील नागरिकांना संदेश देणाऱ्या?
कोण म्हणजे? त्या नागरिक नाहीत का? इन्टरनेट हातात आहे म्हणून युद्धाची भाषा करणं हे लोकशाहीतलं कर्तव्य, आणि त्यांनी जवळून पाहिलेली परिस्थिती सांगणं हा काय देशद्रोह आहे?
तुम्हीआम्ही 'वेगळा' विचार म्हणजे काय करतो, बेफी? (मला तर आत्ताचे तुमचे प्रतिसाद विचारापेक्षा भावनेवर आधारित आहेत असंही वाटतंय, आणि ते स्वाभाविकच आहे, पण) तो विचार नक्की कुठल्या माहितीवर आधारित असतो?! तुम्हाला आत्ताच खात्रीनेच हे हल्लेखोर कोण होते, त्यांचा कर्ताकरविता कोण होता, त्याचा नक्की युद्धाने निकाल लागेल का, हे सगळं माहीत आहे का? गाडगिळांवर चिडून काय होणार?

'तावातावाने लिहिणारे दैनंदिन कामांना लागतात' यात तुम्हाला तुच्छता दिसते, आणि 'गाडगीळ कोण आम्हाला शिकवणार' या प्रश्नात नाही दिसत?

तुच्छता हा शब्द मी वापरलेला नाही आणि अभिप्रेतही नाही.

मी दिलेला प्रतिसाद तुम्ही व असामी दोघांना उद्देशून आहे

दैनंदिन कामे - माझे वाक्य लागले बहुधा, पण ते वापरले तुम्ही आधी आहेत

युद्ध दोन्ही बाजूंना लाभदायक नसते हे तिसऱ्यांदा लिहितोय

माझी माहिती:

टीव्ही
फेसबुक
व्हाट्स अँप
पेपर

यावर आधारित असते

हे sources चुकीचे असले तर माहीत नाही

माणसे मेली आहेत, तीही तुमच्या आमच्या सारखी! गाडगीळांचे म्हणणे ऐकत बसलात आणि अनुमोदन देत बसलात तर तुम्हाला काहि होणार नाही

तुमचे इथे लिहिलेले शब्द येणाऱ्या धाग्यागणिक मागे पडत जातील

अभिनंदन व शुभेच्छा

गाडगीळ यांचा मुद्दा गैर आहे. गरीब सैनिक मरतात म्हणून युद्ध करु नका. हा मुद्दा चूक आहे. सैन्यावर पैसा खर्च का केला जातो तर पाकिस्तानसारख्या देशाने आक्रमण केले तर त्याला चोख प्रत्युत्तर देता यावे म्हणून. सैनिक भरती ही अशा संरक्षण विभागासाठी आणि युद्ध सज्ज व्हावे यासाठी असते. कुणालाही धमकावून, बंदुकीची नळी डोक्याला लावून सैन्यात भरती केले जात नाही. सैन्यात भरती होणे ह्यात जीवाचा धोका असतो हे कोणी लपवत नाही. तरी जर सैनिक म्हणून तुम्ही भरती होत असाल तर कधीतरी जीवाची जोखीम पत्करून युद्ध करावे लागणार हे स्वीकारले पाहिजे नाहीतर सैन्य हे तुमचे क्षेत्र नाही हे ओळखून ते टाळावे.
कितीही ग्लोरिफाय केले तरी मिलिटरी म्हणजे देशाचा रखवालदार आहे. मालक जे सांगतो ते त्याला करणे
भाग आहे. रखवालदार घाबरट आहे म्हणून मालकाने चोराला पकडायचा आदेश देऊ नये हे उफराटे लॉजिक आहे.
गरीब बिचारे सैनिक मरतील म्हणून युद्ध टाळा असा विचार सेनापती, संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान करू लागले तर मग संरक्षण कोण करणार? पुढचा हल्ला कसा टळणार? पाकिस्तानसारख्या उन्मत्त शत्रूला वेसण कशी बसणार?
कविता गाडगीळ यांचा मुलगा सैन्यात ड्युटीवर मारला गेला म्हणून त्या युद्धनीतीत जास्त कुशल आहेत हा विचार साफ चूक आहे. त्या सामान्य नागरिकाच्याच तोलामोलाच्या आहेत.
सामान्य नागरिकाचे मत जितके मूल्यवान आहे तितकेच त्यांचे.

हा हल्ला होउन जेमतेम चार दिवस झालेले आहेत, यात पाकिस्तान चा हात असेलही, पण तसे अजून सिद्ध झालेले नाही. एखाद्या हल्ल्यात पाकिस्तान चा हात असे असे जाहीर करणे व नंतर वस्तुस्थिती वेगळी आहे असे दिसणे यापूर्वी झालेले आहे. मग लढाईची इतकी गडबड का ? या प्रकराच्या मुळाशी कोण आहेत हे शोधणे जास्त महत्वाचे वाटत नाही का ?

>>> रखवालदार घाबरट आहे म्हणून
तुम्हाला कॉन्शन्स नावाचा अवयव अगदीच नाही हे पुन्हा नव्याने सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन.

तुम्हाला आत्ताच खात्रीनेच हे हल्लेखोर कोण होते, त्यांचा कर्ताकरविता कोण होता, त्याचा नक्की युद्धाने निकाल लागेल का, हे सगळं माहीत आहे का? >>> सॉरी !! तुला नक्की काय म्हणायचय??हल्लेखोर पाकिस्तान पुरस्क्रुत दहशतवादी होते, कर्ताकरविता पाकिस्तान , युद्ध कुणीही अनाउन्स केलेले नाही... याचे कर्ताकरविता पाकिस्तान नसुन इतर कुणी आहे हे म्हणायच आहे का?

गाडगिळांना मूर्खात काढण्याइतकी युद्ध, गृहमंत्रालयाचा कारभार, परराष्ट्र धोरण या विषयांची माहिती मला नाही असं मला म्हणायचं आहे.
पहलगाममध्ये हल्ला पाकिस्तानने केला असला तरी आपल्याकडून सुरक्षेत हयगय कशी झाली हे मला अजून समजलेलं नाही असं मला म्हणायचं आहे.
तुम्ही आम्ही 'घरात घुसून मारा' म्हणालो म्हणून युद्ध होणार नाही आणि गाडगीळ नको म्हणाल्या म्हणून टळणार नाही, याचं कारणच आपल्यापर्यंत न आलेली कितीतरी माहिती, धोरणं आणि परिणामांचे आडाखे असतात असं मला म्हणायचं आहे.

धन्यवाद!
पहलगाममध्ये हल्ला पाकिस्तानने केला असला तरी आपल्याकडून सुरक्षेत हयगय कशी झाली हे मला अजून समजलेलं नाही असं मला म्हणायचं आहे.>> हो या बद्दल केन्द्र सरकारने निट आणी योग्य उत्तर देण अपेक्षित आहे...ही सुरक्षेची लॅप्स अक्षम्य आहे...याबद्दल काश्मिर राज्य सरकारनेही जरा आत्मपरिक्षण कराव.

हा हल्ला होउन जेमतेम चार दिवस झालेले आहेत, यात पाकिस्तान चा हात असेलही, पण तसे अजून सिद्ध झालेले नाही.>>> स्टॉप इट विकु!! इतके हल्ले शत्रू राष्ट्राकडून आपल्या सार्वभौमत्वावर झाले तरी त्या देशाची भलामण कराविशी वाटतेय हे दुदैवी आहे...प्लिज, एखाद नावडत सरकार देशात आहे म्हणून काहिही स्टेटमेन्ट कराल तेही जेव्हा देश खुद्द मायबोलिकर दु:खात असताना..त्याच्या घरात हा प्रकार घडलेला असताना??
.सॉरी!! धिस इज ट्रुली अहफॉरच्युनेट
मी राजकिय धाग्यावर लिहण टाऴतेच कारण काहिना प्रत्येक घटनेत राजकारणच करायच असत..
यापुढे इथे काहिही न लिहण ईस्ट .

जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे. कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा - नायब राज्यपाल = केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधीन आहेत.

पत्रातील काही मुद्दे ठीकच आहेत, काही कैच्याकैच आहेत. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे इतकी मोठी आणि दु:खदायक घटना घडली त्यापार्श्वभूमीवर लगोलग "युद्ध नको, तरूण मुलं मरतात, तरुण मुली विधवा होतात, आयांना आयुष्यभराचं दु:ख मिळतं, गरीबांचीच मुलं मरतात, सुरू करणं सोपं पण संपवणं कठीण, शत्रूकडे अण्वस्त्रं आहेत .... " असले मुद्दे लिहिलेले पत्र अजिबात झेपलेलं नाही. "१९४७चा दाखला देऊन तेव्हा कसं काश्मिरींनी आपणहून सरकारला माहिती दिली होती" सारख्या वाक्यावरून काश्मिरमधल्या सद्यपरिस्थितीची कितपत कल्पना आहे याचीही शंका येते.

बरं भारतानं याआधी युद्ध केलीच नाहीयेत का? तर तसं नाही.
बरं कॅ. गाडगीळ यांना अलिकडेच वीरगती मिळाली का? तर नाही.
बरं भारतानं सैन्यच बाळगू नये का? तर नाही.
बरं आपल्या सैन्याकडे सामग्री नाहीये का? तर तसं नाही.
बरं भारताकडे अण्वस्त्रं नाहीयेत का? तर तसं नाही.
बरं भारत सरकारनं लगेच युद्धाची घोषणा केलीये का? तर नाही.
बरं काश्मिरमधल्या सगळ्यांना ठार मारा असं कोणी म्हणतयं का? तर नाही.

मग या पत्रात अशा इकडच्या तिकडच्या एकमेकांशी संबंध नसलेल्या अनेक मुद्द्यांची सरमिसळ करण्याची गरज काय? गरीबांची मुलं मारली जातात हे सांगून लोकांचा बुध्दीभेद करायचा आहे का? सैन्याचं मनोधैर्य खच्ची करायचं आहे का? बटबटीत भावनिक आवाहन करून काय साधायचं आहे?

सैनिकांचे बूट, जॅकेट्स, रेडिओ, रायफल्स, टेंट्स, औषधं… आणि माफ करा, मला हा शब्द लिहिणंही जड जातंय, पण अगदी शवपेट्यांसाठीही आपण इतरांवर अवलंबून आहोत हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? आणि आपण युद्धाचे मनोरथ रचत असताना तिकडे चीन मात्र अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम आणि आपल्या हातून निसटू शकेल असं सगळं सगळं गिळंकृत करायला बसलाय, हे दिसतंय का कुणाला? अमेरिका आपल्याला सहानुभूती देईल, भाषणं देईल, महागडा शस्त्रसाठा देईल, पण त्यांची मुलंबाळं आपल्याला देणार नाही, हे लक्षात असुदे ‘युद्ध हवं’ म्हणणाऱ्या सगळ्यांच्याच. >>> हा पूर्ण परिच्छेद अचाट आहे. आपण सामग्री समजा आयात करतोय तर काय बिघडलं? पैसा आहे की देशाकडे. चीन गिळंकृत करायला बसलाय म्हणतायत तर उद्या तो युद्धाला आला तर मग लढायचं कसं बुवा? कारण लढाई केली तर गरीबांची मुलं मारली जाणार. मग काय करायचं?

एका विशिष्ट इकोसिस्टिमला सूट होतील असे मुद्दे मांडल्यामुळे पत्राचा rpm वाढलाय अशी शंका येत आहे. याच ताईंनी नेमके उलट मुद्दे मांडले असते तर त्यांना जातीवरून टोचून बोललं गेलं असतं की काय असाही एक प्रश्न मनात येऊन गेला.

तुम्ही आम्ही 'घरात घुसून मारा' म्हणालो म्हणून युद्ध होणार नाही आणि गाडगीळ नको म्हणाल्या म्हणून टळणार नाही, याचं कारणच आपल्यापर्यंत न आलेली कितीतरी माहिती, धोरणं आणि परिणामांचे आडाखे असतात असं मला म्हणायचं आहे. >>>>> परफेक्ट.

तुम्ही आम्ही 'घरात घुसून मारा' म्हणालो म्हणून युद्ध होणार नाही आणि गाडगीळ नको म्हणाल्या म्हणून टळणार नाही, याचं कारणच आपल्यापर्यंत न आलेली कितीतरी माहिती, धोरणं आणि परिणामांचे आडाखे असतात असं मला म्हणायचं आहे. >>> खरं आहे!

समझौता स्फोट....
सुरुवातीचा संशय, प्रत्यक्षात कोणी केला/घडाविला?

आम्हाला जवानांना नेण्यासाठी विमानाची गरज आहे. फक्त पाच. वारंवार विनंती नाकारली. स्फोटात ३५ सैनिकांचा मृत्यू.

पुलवामा आणि पहेलगाम एकाच मानसिकतेने घडवले गेले.

स्वाती आंबोळे यांनी योग्य ते मत शेवटच्या प्रतिसादात दिले आहे

आधीच्या नव्हे

नाहीतर, येथील परंपरेनुसार एखाद्याचे सगळेच प्रतिसाद योग्य होण्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते

>>> पुलवामा आणि पहेलगाम एकाच मानसिकतेने घडवले गेले.

पुरावे नक्की द्या.

विधाने मागे घेऊन माफी मागण्याची अपेक्षा नाहीच.

पुरावे नक्की द्या.

पुरावे देता येत नसतील तर तसे लिहा. येत असतील तर द्या.

काय करणार आहात ते ठरवा,. आरोप तुम्ही करत आहात, उलटे पुरावे विरोधकांकडून मागत बसून हास्यास्पद ठरू नका.

हल्ला झाल्या झाल्या RDX चा आकडा लगेच कसा कळला? तेही जाऊ द्या , इतके RDX देशात आल्याची लाजही वाटत नाही वर शहिदांच्या नावावर निवडणुकीत मतं मागितली. अद्याप सूत्रधार पकडले गेले नाहीत .संशय तर येणारच.

मामींच्या लेटेस्ट पोस्टला अनुमोदन, प्राजक्ताचाही पोस्टना अनुमोदन. गरिबांची मुले मरतात वगैरे मुद्दे काहीच्या काही वाटले. उत्तर भारतातल्या विशेषतः दिल्ली, पंजाब, हरीयाणातले अनेक उच्च मध्यमवर्गीय ते श्रीमंत वर्गातले लोकं सैन्यात जातात असा डेटा हल्ली पाहिला होता. मरू कोणीच नये. पण उगाच भलताच प्रपोगंडा आणि मुद्दा!

मी वाहत्या बाफावर लिहिलं होतं तेच पुन्हा इथे लिहितो...सेक्युलरी ज्ञान वाटणार्‍या (इथे आणि बाकी सोमीवर पण) मंडळींनी झालेल्या घटनेचा कुठल्याही पण परंतु शिवाय अगदी स्पष्ट निषेध नोंदवला का ते बघा आणि मग ज्ञान वाटा.

हा हल्ला होउन जेमतेम चार दिवस झालेले आहेत, यात पाकिस्तान चा हात असेलही, पण तसे अजून सिद्ध झालेले नाही. एखाद्या हल्ल्यात पाकिस्तान चा हात असे असे जाहीर करणे व नंतर वस्तुस्थिती वेगळी आहे असे दिसणे यापूर्वी झालेले आहे. >>>> वा वा ! टाळ्या !

वर्ष २०००, क्लिंटन भेट, छत्तीसिंहपुरा, ३५ निरपराधांची हत्या

वर्ष २०२५, जेडी व्हान्स भेट, पहलगाम, २६ निरपराधांची हत्या

युद्धखोरांना (warmongers) माहित आहे की त्यांना युद्धाची कोणतीही किंमत मोजावी लागणार नाही.

कृपया तत्कालीन राज्यपाल मलिक यांची मुलाखत पहा.

पुलवामा कोणी घडवला? पुलवामामध्ये काय त्रुटी होत्या? काही चौकशी अहवाल आहे का? जवानांना घेऊन जाण्यासाठी विमानाची विनंती का नाकारण्यात आली? ( दक्षिण आफ्रिका, नामिबियाहून चित्ता आणण्यासाठी तुमच्याकडे खास विमाने आहेत. - पण सीआरपीएफ जवानांसाठी नाही. )

अरे त्या काही जागतिक त्रिकालाबाधित सत्ये समजलेल्या व्यक्ती नव्हेत. काश्मीर व युद्ध दोन्ही प्रदीर्घ काळ जवळून पाहिलेल्या व त्याचे परिणाम थेट भोगलेल्या व्यक्तीचे ते वैयक्तिक मत आहे असे समजा. प्रत्येक वाक्य खोडून काढायची गरज नाही. त्यांची मते उजवीकडे झुकणारी असतील, विरूद्ध बाजूला झुकणारी असतील किंवा आणखी तिसरीच असतील. तुम्हाला मते पटली नाहीत तर सोडून द्या. मुद्दा समजून घ्या.

एका विशिष्ट इकोसिस्टिमला सूट होतील असे मुद्दे मांडल्यामुळे पत्राचा rpm वाढलाय अशी शंका येत आहे. याच ताईंनी नेमके उलट मुद्दे मांडले असते तर त्यांना जातीवरून टोचून बोललं गेलं असतं की काय असाही एक प्रश्न मनात येऊन गेला. >>> मामी १००% असू शकेल. पण त्या इकोसिस्टीमवरचा राग यांच्यावर कशाला? लोकांची मते थोडीफार इकडेतिकडे असणारच.

बाय द वे, पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध झालेले नाही हे खरे आहे. कारण आंतरराष्ट्रीय मामल्यांमधे ते कागदोपत्री सिद्ध करावे लागते. ते अजून सरकारने केलेले नाही. पुढे करतीलही. पण अजून केलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यात खालचे काहीही असू शकते.
- पाक हा एक शांतताप्रिय व समजूतदार देश आहे. हा दावा पाकडे पण करणार नाहीत.
- पाकला हे करायची खूप इच्छा आहे पण आता त्यांना पैसा व सपोर्ट नाही. हे सहज शक्य आहे. आता अमेरिका पाठीशी नाही.
- हा सगळा उद्योग स्थानिक लोकांनीच घडवून आणलेला आहे. पाककडून मदत घेतलेलीच नाही. हे खरे नसावे. पण पाक हे नक्की क्लेम करेल. ते खोडून काढता यायला हवे.
- यात पाक मधे पॉकेट्स मधे असलेले अतिरेकी आहेत पण पाक सैन्य किंवा सरकारची यात फूस नाही. हे ही शक्य आहे. पाकने पूर्वी पोसलेला भस्मासूर अजून कोठेतरी डोके वर काढत असू शकतो.
- पाक सरकारने किंवा सैन्याने फंडिंग करून हे घडवले आहे. हे ही शक्य आहे.

Pages