माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
हा खाद्यपदार्थ चॉकलेटयुक्त
हा खाद्यपदार्थ चॉकलेटयुक्त बिस्किटासारखा असून त्याचे नाव रोचक आहे
. .
. .
smore
आणि
त्याची व्युत्पत्ती पण मजेशीर आहे :
some more >>> s'more >>> smore.
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम तारीख ८ मार्च २०२५ आहे..
खालील लिंक वर मतदान करावे.
https://www.maayboli.com/node/86433
१ मार्च २०२५ पासून अमेरिकेने
१ मार्च २०२५ पासून अमेरिकेने इंग्लिश ही त्यांची अधिकृत राष्ट्रभाषा असल्याचे जाहीर केले आहे.
https://www.whitehouse.gov/presidential-actions/2025/03/designating-engl...
. . .
अन्य एक गमतीचा भाग म्हणजे युनायटेड किंगडममध्ये प्रत्यक्षात बोलली जाणारी (De facto) इंग्लिश ही प्रमुख भाषा असली तरीही अद्याप त्यांनी तिला अधिकृत भाषा (De jure) म्हणून जाहीर केलेले नाही.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_and_territories_where_En...
. . .
जागतिक पटलावर आतापर्यंत 180 देशांनी त्यांची अधिकृत भाषा (एक किंवा अधिक) जाहीर केलेली आहे :
https://www.bbc.com/news/articles/c2kgq5pzpllo
"mukbang"
"mukbang"
हा कोरियाच्या भाषेतून इंग्लिशने स्वीकारलेला शब्द आहे. मुळात तो संयोग शब्द असून त्याचा इंग्लिश अर्थ
eating broadcast असा आहे.
अलीकडे आंतरजालावर बकाबका खात लोकांशी गप्पा मारण्याचे व्हिडिओ बऱ्यापैकी प्रसारित होत असतात त्यासाठी हा शब्द.
नुकतेच अशा एका अतिलठ्ठ सादरकर्त्याचे वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी निधन झाले आहे :

चित्रसौजन्य : https://www.msn.com/en-in/news/other/tiktok-star-s-sudden-death-at-24-hi...
Grokking the Grok.
Grokking the Grok.
सध्या Grok शब्द गाजत आहे. एलन मस्क ह्याने ChatGPTच्यां तोडीस तोड म्हणून Grok AI मार्केट मध्ये आणली आहे.
ह्या शब्दाचा उगम मोठा मनोरंजक आहे.
Robert A. Heinlein ह्या सुप्रसिध्द विज्ञान कथा लेखकाने १९६१ साली Stranger in a Strange Land नावाची कादंबरी लिहिली. कादंबरीचा विषय असा आहे की मंगळ ग्रहावरचे वरचे लोक पृथ्वीवरच्या एका बालकास सांभाळतात,मोठा झाल्यावर तो पृथ्वीवर परततो. त्याच्या नजरेतून पृथ्वीचे समाज जीवन त्याला कसे वाटते त्यावर ही कथा आहे.
ग्रोक हा शब्द ह्या कथेत प्रथम अबतरला. तर हा शब्द मंगळवासीयांच्या भाषेतला आहे. ह्या शब्दाच्या अर्थाला अनेक छटा आहेत. मुख्य अर्थ असा आहे की एखादा विषय अगदी मनापासून समजणे. तसा हा शब्द १९७० नंतर मागे पडला. पण संगणक शास्त्राने जसा वेग पकडला तसा हा शब्द पुन्हा प्रचारात आला. तुम्ही कदाचित Grokking The GIMP नावाचे पुस्तक आपण वाचले असेल.
The "hacker dictionary" Jargon File मध्ये ह्याचा अर्थ असा दिला आहे.
“When you claim to "grok" some knowledge or technique, you are asserting that you have not merely learned it in a detached instrumental way but that it has become part of you, part of your identity.”
आणि आता तर एलन मस्कने Grok AI केल्यामुळे हा शब्द जनसामान्यात पोहोचला आहे.
असा हा ग्रोकचा मनोरंजक इतिहास आहे.
स्मोर्स फारच आवडतात. ते सम
स्मोर्स फारच आवडतात. ते सम मोअर चे लघुरुप आहे माहित न्हवतं. ग्रॅम क्रॅकर्स आणि मार्शमेलो गॅसवर शेकुन पण केलेले आहेत. फार गोड असतात पण यम्म!
*ग्रोकचा मनोरंजक इतिहास >>>
*ग्रोकचा मनोरंजक इतिहास >>> छानच !
..
*मार्शमेलो >>> छान !
छान माहिती, केशवकूल
छान माहिती, केशवकूल
चांगली माहिती, केशवकूल.
चांगली माहिती, केशवकूल.
>>> “When you claim to "grok" some knowledge or technique, you are asserting that you have not merely learned it in a detached instrumental way but that it has become part of you, part of your identity.”
म्हणजे 'आत्मसात' होणं की!
veep
veep
हा खास अमेरिकी इंग्लिश शब्द अर्थात
vice president चे लघुरुप ;
Alben W. Barkley (1877-1956) या त्यांच्या उपाध्यक्षांनी रुढ केलेला.
पुढे त्याला अनुसरून ‘टाईम’ ने खालील लघुरुपे सुचवली आहेत :
President : Peep,
Secretary of State : Steep, &
Secretary of Labor : Sleep !
https://www.etymonline.com/word/veep
Peep मजेदार आहे. दुसऱ्यांच्या
Peep मजेदार आहे. दुसऱ्यांच्या घरात भोचकपणे बघणाऱ्याला( खास करून स्त्रियांना लंपटपणे बघणाऱ्याला) peeping Tom म्हणतात तसं प्रेसिडेंट दुसऱ्या देशात बघतो असंही म्हणता येईल.
केकू, मस्त पोस्ट. आपण माहितीच्या, कंडिशनिंगच्या भेंडोळ्यात बांधलेले grok च आहोत ऑलरेडी.
* प्रेसिडेंट दुसऱ्या देशात
* प्रेसिडेंट दुसऱ्या देशात बघतो >>>
* * * **
* * *
happenstance
एक छान संयोगशब्द !
= happening + circumstance.
Grok >>> छान माहिती, केशवकूल.
Grok >>> छान माहिती, केशवकूल.
मध्यंतरी एका शब्दकोड्यात
मध्यंतरी एका शब्दकोड्यात draft असे सूत्र देऊन बारा अक्षरी शब्द विचारला होता.
बऱ्याच वेळ झुंजल्यानंतर त्याचे उत्तर आले : conscription.
मुळात draft ला अनेक अर्थ आहेत. परंतु वरील दोन शब्द लष्करी कारभारासंदर्भात समानार्थी ठरतात.
सक्तीच्या लष्करी सेवेसाठी समाजातून ठराविक उमेदवारांची निवड (enrollment ) करणे असा त्यांचा अर्थ आहे.
https://www.etymonline.com/word/conscription
https://www.etymonline.com/word/draft
प्रवासासंबंधी खालील शब्दांचा
प्रवासासंबंधी खालील शब्दांचा उगम आणि मूळ अर्थ रंजक आहेत
म्हणजे अंगणात जाऊन नाचले तरी ती ट्रीप झाली !
वरील शब्दांना कालौघात सुधारित अर्थ प्राप्त झाले.
गॅसलाईट
गॅसलाईट
एखाद्या व्यक्तीला गॅसलाईट करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात स्वतःच्या भावनांबद्दल किंतु निर्माण करणे. आपल्याला वेड तर लागले नाही ना असा संशय त्या व्यक्तीच्या मनात निर्माण करणे. त्या व्यक्तीच्या भावना मॅन्युप्युलेट करणे. १९४४ साली George Cukor ने दिग्दर्शित केलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या
“गॅसलाईट” नावाच्या पिक्चरमध्ये ह्या शब्दाचे मूळ आहे. हा सिनेमा १९४०साली बनलेल्या Thorold Dickinson वर आधारित होता. मुळात Dickinsonचा सिनेमा १९३८ एका ब्रिटीश नाटकावर आधारित होता. पण George Cukorचा पिक्चर हिट झाल्यामुळे ह्या शब्दाचे श्रेय त्याला जाते.ह्यां सिनेमाला तीन अकेडमी अवार्ड्स मिळाली. पैकी दोन सर्वोत्कृष्ट सिनेमा, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून इंग्रीड बर्गमन ह्यासाठी होती.
सिनेमाची कथा अशी होती की खलनायक (Charles Boyer)ने खून केलेला आहे. तो खून कव्हर-अप करण्यासाठी तो आपल्या पत्नीला वेडी ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. तिला भास होत आहेत असे तिच्या मनावर ठसवण्यासाठी तो मधून मधून भगभगणाऱ्या गॅस बत्तींचा उपयोग करतो.
ही film तुम्ही https://archive.org/details/gaslight-1944 इथे बघू शकता.
मात्र gaslight treatment हा शब्द समुच्चय प्रथम Miami Daily News of 16 September 1948 वापरण्यात आला.
From the Miami Daily News of 16 September 1948:
GASLIGHT—Divorce petitions filed in Dade circuit court in recent weeks reveal an influence traceable to the current run of movies dealing with psychiatric plots, especially those in which the husband tries to convince the wife she is crazy. Several complainants have charged husbands with actions designed to produce fear of mental unbalance, and one suit, filed the other day, claimed the husband “gave her the Gaslight treatment.”
सध्या हा शब्द पुन्हा प्रचारात आला आहे. आता त्याचा अर्थ थोडा व्यापक झाला आहे, तरीपण पतीने पत्नीची केलेली फसवणूक आणि तिला वेडी ठरवण्याचा प्रयत्न हे अर्थ अध्याहृत आहेत.
'सजन रे फिर झूठ मत बोलो " ही web सीरिअल तुम्ही पाहिली आहे का? ही पूर्ण सीरिअल Gaslight वर आधारित आहे. अर्थात ह्या कथेचा हेतू चांगला आहे तरीपण ...
छान ! माहिती आवडली.
* गॅसलाईट *
छान ! माहिती आवडली.
पुढे त्याला अनुसरून ‘टाईम’ ने
पुढे त्याला अनुसरून ‘टाईम’ ने खालील लघुरुपे सुचवली आहेत : President : Peep
अमेरिकेच्या प्रेसिडेंट्चे POTUS (President Of The United States) असे पण लघुरूप होते.
केशवकूल , सजन रे झूठ मत बोलो
केशवकूल , सजन रे झूठ मत बोलो ही टीव्ही मालिका पाहिली होती. सुमीत राघवन, टिकू ताल्सानिया होते. वेब सिरीज वेगळी आहे का?
तुम्ही गॅसलाइटिंग या संज्ञेच्या अर्थाचं जे स्पष्टीकरण डकवलं आहे, त्यावरून हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट आठवला. यात आशा काळेचा सावत्र मामा राजा गोसावी तिला भुताचे भास करवून वेडी करू किंवा ठरवू पाहत असतो.
सॉसो, मला TV मालिकाच
सॉसो, मला TV मालिकाच अभिप्रेत होती. दोन मालिका होत्या.
सजन रे झूठ मत बोलो आणि सजन रे फिर झूठ मत बोलो.
सजन रे फिर झूठ मत बोलो मध्ये नायक श्रीमंत असतो आणि नायिका ध्येयवादी वडिलांची मुलगी असते. त्यामुळे नायकाला गरीबीचे नाटक करावे लागते. पण एकूण उद्देश प्रेमासाठी सबकुछ.
हा खेळ सावल्यांचा हे चपखल उदाहरण ठरेल.
* POTUS >> छान.
* POTUS >> छान.
. . .
आपल्याकडे इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रेसिडेंटचे Prez केलेले आहे.
गॅसलाईटिंग साठी 'हा खेळ
गॅसलाईटिंग साठी 'हा खेळ सावल्यांचा' पर्फेक्ट उदाहरण आहे. तीव्र मतभेद किंवा रागाने भांडणं किंवा खोटं बोलणं सुद्धा गॅसलाईटिंग होणार नाही. समोरच्याला तू भ्रमिष्ट आहेस, तुला जे वास्तव वाटतंय तो भास आहे म्हणून वेगळ्या रिॲलिटीत नेऊन सोडणं व स्वतः च्या सत्याबद्दल, पर्सनॅलिटी बद्दल प्रश्न पडावेत अशी वातावरणनिर्मिती करणं म्हणजे गॅसलाईटिंग.
दुसरीकडे दिलेला प्रतिसाद इथे
दुसरीकडे दिलेला प्रतिसाद इथे डकवतो.
"कृपाया विकीचे हे पान पहा.
https://en.wikipedia.org/wiki/Gaslighting
According to Robin Stern, PhD, co-founder of the Yale Center for Emotional Intelligence, "Gaslighting is often used in an accusatory way when somebody may just be insistent on something, or somebody may be trying to influence you. That's not what gaslighting is.""
छान माहिती केकू.
छान माहिती केकू.
माझा समज मध्यात कुठेतरी होता, आपल्या फायद्यासाठी जाणुन बुजून एखाद्या व्यक्तीच्या विचारांना/भावनांना त्या किती चुकीच्या, हास्यास्पद आहे असे सतत दाखवत , वागवत रहाणे. असे मॅनिप्युलेशन बरेच दिसते. ते सुद्धा गॅसलाइटिंग नाही तर.
honeymoon
honeymoon
हा अगदी प्रिय आणि बहुपरिचित शब्द. त्याची व्युत्पत्ती मजेशीर आहे. लग्नानंतर पहिले काही दिवस प्रेम हे उत्कट आणि मधाप्रमाणे मधुर असते. पण काही दिवसातच ते हळूहळू कमी होत जाणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ओसरते. तेव्हा जेवढ्या झपाट्याने प्रेम वाढत जाते तेवढ्याच वेळात ते ओसरते !
https://www.etymonline.com/word/honeymoon
https://www.worldwidewords.org/qa-hon1.html
छान माहिती दिली आहे,
छान माहिती दिली आहे,
रोचक आहे. यावरून मधु इथे
रोचक आहे. यावरून मधु इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
हे गाणे आठवले
* मधु इथे अन् चंद्र तिथे >>>
* मधु इथे अन् चंद्र तिथे >>>
वा ! मस्त गाणं. गदिमांचे आहे
केशवकूल ग्रोक आणि गॅसलाईट
केशवकूल ग्रोक आणि गॅसलाईट बद्दल छान माहिती.
A-OK (A-okay )
A-OK (A-okay )
OK हा सहमती दर्शवणारा शब्द सर्वपरिचित. त्याचीच वरची आवृत्ती म्हणजे A-OK, अगदी नक्की या अर्थी.
याचा उगम मनोरंजक. हा शब्द प्रथम अमेरिकेतील ‘नासा’च्या अभियंत्यांनी वापरात आणला. त्यांच्या रेडिओ प्रक्षेपण चाचण्यांच्या दरम्यान त्यांना असे जाणवले की A चा उच्चार Oच्या उच्चारापेक्षा अधिक स्पष्ट व कर्कश असतो, जो त्यांना उपयुक्त होता.
https://en.wikipedia.org/wiki/A-okay
Pages