शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत .लेख तात्काळ वाचून काढला. Charles Lutwidge Dodgson, लेविस कॅरोल (अलीस अडवेंचर इन वंडरलंँड)ची आठवण झाली. ह्या महान लेखकानेही असे बरेच अनवट शब्द बनवले होते. आम्ही पण काही कमी नाही! आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला जर आपण म्हणालो. कि "अहो बाई, तुमचा भ्रमणध्वनी विसरला आहे." तर तिला काय वाटेल?
"अग्निरथगमनागमनताम्र्लोहपट्टीका."
chaptique= chapter+ fatigue
अश्या शब्दाना portmanteau word असे म्हणतात. उदा. brunch!

*लेख तात्काळ वाचून काढला +१ . उत्तम !
हे विशेष आवडले :

थरूर यांच्या मते शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. पुस्तके ‘ऐकणे’ हा नवीन पर्याय सध्या उपलब्ध आहे पण तो शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी प्रभावी नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

Fat Tuesday
महाराष्ट्रात जसे कांदेनवमी आणि गटारी अमावस्या हे साजरे करण्याचे दिन आहेत त्याचप्रमाणे ख्रिस्ती लोकांमधील हा मंगळवार !
Lent या निर्बंध कालावधीची सुरुवात Ash Wednesday ने होते. म्हणून त्या आधीचा मंगळवार एकूणच कल्ला, जोश आणि बक्कळ खाण्यापिण्याचा.
हा शब्द ही फ्रेंचांची देणगी; Mardi Gras चे भाषांतर

इंग्रजांनी त्या दिवसाला Pancake Tuesday असे म्हटले आहे

presstitute = press + prostitute

या शब्दाचे जनकत्व Gerald Celente या अमेरिकी संशोधकांकडे जाते.
पैशांसाठी आपली बुद्धी विकलेले पत्रकार, हा त्याचा अर्थ

(हा शब्द ताश्कंद फाइल्स या चित्रपटात वापरला आहे).

भारतात हा शब्द निवृत्त जनरल आणि तेव्हा केंद्रीय मंत्री असलेले व्ही के सिंग यांनी वापरल्यावर चलनात आला. मला वाटायचं त्यांनीच घडवला की काय!

भाषेत नवनवीत शब्द येत रहातात. ते शब्द तात्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थितिचे प्रतिबिंब असते. इंग्लिश मधल्या अशा शब्दांची जंत्री एकदा हाती लागली होती. ती मी जपून ठेवली होती. शोधावी लागेल. अगदी सहज सुचणारी म्हजे १९९० च्या दशकात इंटरनेट अवतीर्ण झाले आणि कित्येक शब्द निर्माण झाले. byte, cursor, mouse, floppy disk, PC, http, HTML, URL, blog, blogger, blogging, webcam, webcast, webcasting, webliography, webmaster, webmeister, webmistress, webzine ...
अजून एक आठवते बीटनिक हा शब्द स्पुटनिक वरून बेतला आहे.

आपल्याला माहित असेलच तरीही
मराठीतील शब्द कोशाला अभूतपूर्व इतिहास आहे . जुन्या काळी श्री राजवाडे यांनी अठरा शब्द कोशांची यादी आणि काही परिचय ही दिला होता. आता अर्थातच यादी बरीच मोठी होईल. त्या यादीतून मराठीतील पहिला कोश मध्य युगात महानुभाव ग्रंथकारांनी रचला. नंतर मात्र अंधायुग होते. त्यानंतर हेमाद्री पंडितांनी एक कोश तयार केला शके ११६०. किंवा इ.स. १२०० -१३०० मध्ये .
मोल्स वर्थ चा कोश यायच्या आधी हि चार पाच कोश झाले.

नवीन शब्द असे तयार होतात.
atmosphere हा शब्द आपल्या सर्वांना माहित आहे.
आता स्पेलिंग बदलून लिहिलेला हा शब्द,
atmosFear.
हवा प्रदूषण , क्लायमेट चेंज. ह्या सगळ्याच्या भीतीची आठवण करून देणारा शब्द!

रोचक आहे !
अजून काही मजेदार उदा. :

जुन्या इंग्लिशमधील मूळ शब्द चुकीचा ऐकल्याने निर्माण झालेले नवे शब्द :
a napron >>> an apron.
a nompere >>> an umpire
nadder >>> adder (साप)

Teenager सारखा Screenager.
आपण सगळेच Screenager झालो आहोत.

Alcoholic किंवा Workaholic सारखा Screenoholic.

तुम्हाला CEO माहित असेलच. येता जाता ज्ञानाचे अमृत डोस पाजणारा तोच तो. मग woman lib वाले मागे कसे राहणार?
SHE- EO, सीइओ पासून शीइओ . हा शब्द अजून एव्हढा रुळला नाही. Very Cleaver word. मला आवडला.

woman lib वाले मागे कसे राहणार? >>
थांबा थोडे दिवस. LGBTQ वाले आले की ते THEY-EO आणतील.

मुळात SHE- EO हा मूर्खपणा आहे. CEO म्हणजे Chief Executive Officer. यात Chief कुणीही असू शकतो. (स्त्री, पुरुष, transgender)

IT-EO!
आता अर्थात बदल होत आहे.
म्हणजे Actor हा शब्द. Unisex.
सर्व स्त्रियांसाठी Miss!
SHE- EO हा शब्द २००० साली प्रचारात आला. पण असे दिसतंय कि टिकला नाही.

*टिकला नाही. >> नव्हता ऐकला.
* * *
मराठीत भाषेत सुद्धा मुळात पदवाचक नामांची स्त्रीलिंगी रूपे करू नयेत असे काही भाषा अभ्यासकांचे मत आहे आणि ते पटते. प्राध्यापक द दि पुंडे यांच्या पुस्तकात यावर चांगला उहापोह आहे.

आधुनिक उद्योग जगतातील अनेक इंग्लिश लघुरूपे धमाल आहेत. त्यांची भली मोठी यादी जालावर सहज मिळते. त्यापैकी शब्दकोड्यात वारंवार येणारी तीन मला आवडतात :
* PDQ = pretty damn quick (ASAP चा एक पर्याय)

* TGIF= thank God it's Friday (पाच दिवसांचा कामाचा आठवडा असलेला ठिकाणी प्रचलित)

* KISS= keep it short & simple.

४ ऑक्टोबर १९५७ साली मानवी इतिहासात एक क्रांती झाली. रशियाने उपग्रह अंतराळात सोडला होता. अमेरीकेतले टीवी आणि रेडीओ वरचे कार्यक्रम थांबवून ह्या उपग्रहावरून येणारे संदेश -पिंग- लोकाना ऐकवण्यात आले. नंतर रशियाने जाहीर केले कि त्यांनी अंतराळात २२ इंच व्यासाचा आणि १८४ पाउंड वजनाचा एक कृत्रिम उपग्रह सोडला आहे.
त्याला म्हणायचे "स्पूटनिक"! या स्पूटनिकने इंग्लिश भाषेतही खळबळ उडवली.
आता ह्या गोळ्याचे नामकरण करायला पाहिजे.पेपर वाल्यांनी man-made earth satellite, artificial moon, artificial satellite, artificial earth satellite.अशी नावे सुचवली. पैकी satellite हे नाव आजतागायत टिकून आहे. पण रशियन भाषेत ह्याला "स्पूटनिक" म्हणतात त्याचा अर्थ आहे ‘something that is traveling with a traveler.’
In Russian, the s of sputnik means “together,” put means “path or road,” nik means “someone who.” To-gether, therefore, they mean “one who travels along”
हा शब्द जरी फार काळ चालला नाही तरी ह्याच्या पासून बनवलेले बीटनिक, नीटनिक शब्द आजही वापरात आहेत.
त्याकाळी ह्या शब्दांचीही निर्मिती झाली. kaputnik, flopnik, stayputnik, and dudnik.
dudnik जेव्हा अमेरिकेने आपला स्वतःचा उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने तो फसला म्हणून dudnik!

KISS= keep it short & simple.
माझ्यासासाठी
KISS= keep it simple sweetheart!

* kaputnik, flopnik, stayputnik, and dudnik.
>>> वा ! मस्तच . . .

Michael Quinion
हे साहेब WWW म्हणजे world wide words नावाच्या साईट चे संस्थापक आणि webmaster होते. मी त्याचा सदस्य Subscriber होतो. दर आठवड्याला ते newsletter पाठवत असत. त्यात वाचकांनी इंग्लिश भाषेतील शब्दांविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे असत.
२०१७ साली त्यांनी अखेर ती साईट बंद करण्याचा निर्णय घेतला. ह्यांच्या विषयी जास्त माहिती इथे वाचा https://en.wikipedia.org/wiki/Michael_Quinion
रच्याकने - Btw- ( हाही एक शॉर्टफॉर्म) WIKI म्हणजे What I Know Is . खरे खोटे देव जाणे खखोदेजा अजून एक शॉर्टफॉर्म!
आताच बघितले तर साहेबाने ही साईट आर्काइव करून ठेवलेली दिसते आहे. ग्रेट!
https://www.worldwidewords.org/index.htm

www
छान आहे ते संस्थळ !
मी ते आधीच वाखुसा केलेले असून त्याला अधूनमधून भेट देत असतो.
Happy

KISS principle = Keep it simple, stupid!

KISS, an acronym for "Keep it simple, stupid!", is a design principle first noted by the U.S. Navy in 1960. First seen partly in American English by at least 1938, KISS implies that simplicity should be a design goal.

मायबोलीवरील लेखकांनी पण KISS principle वापरून साध्या, सरळ सोप्या भाषेत लेखन केले तर अनंत उपकार होतील. पण शक्यता कमी दिसते कारण मग बोजड शब्द वापरून, तत्त्वज्ञानावर किंवा आध्यात्मिक लेख लिहून आणि रसग्रहण करून स्वतःच्या मराठी ज्ञानाची प्रौढी मिरवता येणार नाही.

शेठजी, बडे सयाने कहते है "जैसी जिसकी सोच."
-------इति बाघा महाराज.

Urban Dictionary
हा on लाईन शब्दकोश Aaron Peckham नि चालू केलेला प्रकल्प. त्यांचा मूळ उद्देश प्रस्थापित शब्दकोशांची चेष्टा करण्याची होती. येथे कोणीही यावे. नव्या/जुन्या शब्दांची एन्ट्री आणि व्याख्या करावी, म्हणजे ही काही शब्द शास्त्रींनी बनवलेली डिक्शनरी नाही. मूळ उद्देश बाजूला राहिला आणि जनतेने उत्साहाने प्रतिसाद दिला, वाढता वाढता Aaron Peckham ह्यांच्या मते आता ६० लाख शब्द समुच्चय झाला आहे. Crowd Funding सारखे काही तरी. प्रत्येक तीस सेकंदाला नवीन व्याख्येची भर पडत आहे.
https://www.urbandictionary.com/

*Urban Dictionary
हा हा ! भारी आहे
एकदम धमाल. . .

adder (साप)>>>
यावरून आठवले. बहुतेक The Telegraph किंवा NY Times मध्ये १५ वर्षांपूर्वी cryptic crossword मध्ये आलेले कोडे.

Summer snake? (5)
याचे उत्तर होते adder. इथे summer चा अर्थ sum करणारा, आणि त्या अर्थाने adder आणि addedr हा साप सुद्धा.

Pages