माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
* hippopotomonstrosesquipedal
* hippopotomonstrosesquipedal-
ian
>>> भारीच !
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/sampadkiya/ulata-chashma/loksatta-ulta-chashma-...
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
Hippopotomonstrosesquipedaliophobia
या शब्दाबद्दल इथे आधी वाचले होते. त्यात आणखी काही शब्द आहेत..
ऋतुराज
ऋतुराज
या शब्दाबद्दल इथे आधी वाचले होते.>>>असे आहे का? मला कल्पना नव्हती. Sorry. दुर्दैवाने आता प्रतिसाद उडवू शकत नाही. एक डाव माफ करा.
अरे,
अरे,
सॉरी कशाला केकूजी.
तो शब्द वाचून मला तो लोकसत्तेतील लेख आठवला.
लोकसत्तेने मला म्हणजे माझ्या
लोकसत्तेने मला म्हणजे माझ्या ब्राउझरला ब्लॉक केले आहे. मी ब्राउझर बदलून तो लेख वाचला. ठीक वाचला. एकूण तीन शब्द दिले आहेत, पैकी एक शब्द तर जगप्रसिद्ध आहे.
अर्थात लोकसत्ता हा माझा स्रोत नाही. पहा असा एक शब्द which makes even supercalifragilisticexpialidocious look tame!
the chemical name for tryptophan synthetase A protein, a 1,913-letter enzyme with 267 amino acids
http://worldwidewords.org/qa/qa-imm1.htm
worldwidewords वरून Immense chemical names हा लेख पहा. आणि हिम्मत असेल तर तो शब्दही वाचा.
अबब!
अबब!
ouch
ouch
१. याचा नेहमीचा परिचित अर्थ म्हणजे अचानक वेदना किंवा दुःख झाल्यानंतर काढलेला उद्गार (ouch!)
२. दुसरा अर्थ मौल्यवान खडा बसविलेला दागिना हा देखील आहे.
वेदनादर्शक उदगार यासंदर्भात o u c h चे एक मजेशीर दीर्घरूप आहे. अर्थात ती रचलेली कथा आहे पण रोचक आहे. आमच्या वैद्यकीय शिक्षणादरम्यान एका नामवंत प्रसूतीतज्ञांनी आम्हाला ती सांगितली होती.
एका अनाथ मुलीला एक जोडपे दत्तक घेते आणि मोठे होईपर्यंत वाढवते. त्यामुळे ती त्यांना अंकल आणि आंटी या नावाने हाक मारायची. दरम्यान ती लग्नाच्या वयात येते. पण त्यापूर्वीच तिची आंटी मरण पावते. आता तिचा एकमेव आधार असतो तो म्हणजे हे अंकल. ते प्रयत्नांती तिचे लग्न जमवून देतात आणि निरोप देताना हसत हसत म्हणतात,
“आता करा मजा ! पहिली रात्र म्हणजे अगदी छान छान गंमत असते बरंका !”
आता खरी गंमत पुढे आहे.
जेव्हा तिचा पहिला शरीरसंबंध येतो तेव्हा तो सुखकारक होण्याऐवजी बऱ्यापैकी वेदनादायकच ठरतो आणि मग ती वैतागून तिच्या अंकलना फोन करून म्हणते, “ouch !”
त्याचा अर्थ असा :
“Oh Uncle, Can't you be Honest ?”
ouch!
ouch!
ह्यावरून आठवले. आम्ही मित्र जेव्हा Godforsaken जागी ट्रेनिंगला होतो तेव्हाची गोष्ट. आयुष्य वैराण असल्याने सगळे जणखच्चून सिगारेट पीत असू. तेव्हा Wills हा एक ब्रांड होता. त्याच्या पाकिटावर W D & H O Wills लिहिलेले असे. बहुतेक कंपनीचे नाव असावं.
त्या वरून एकाने डोकं लढवले आणि सांगितलं ह्याचा अर्थ असा आहे कि,
"Wife Demands & Husband Offers Wills"
CAPSTAN ह्या ब्रांड चा पण long form आहे. पान तो इथे लिहिण्याजोगा नाही.
छान आवडला.
छान आवडला.
CAPSTAN मी कॉलेज जीवनात ऐकलेले आहे पण आता विसरलो आहे !
हे बहुदा सगळ्यांना माहित असेल
हे बहुदा सगळ्यांना माहित असेल. तरीही लिहितो.
Wiki = What I Know Is...
डुकरांना उडताना कोणी पाहिलंय
डुकरांना उडताना कोणी पाहिलंय ? अर्थातच नाही.
परंतु इंग्लिशमध्ये
"when pigs fly" हा एक मजेशीर वाक्प्रचार आहे.
त्याचा अर्थ, एखादी घटना घडण्याची शक्यता जवळजवळ शून्य असणे.
या वाक्प्रचाराच्या उगमबाबत मतभिन्नता आहे. त्यामध्ये स्कॉटलंड व अमेरिकेच्या वेगवेगळ्या थेअरीज आहेत. अमेरिकी थेअरी रोचक आहे. पूर्वी तिथले शेतकरी डुकरांची कत्तल करण्यासाठी त्यांना नदीकाठी घेऊन जात. जेव्हा हवामान धुक्याने भरलेले असे तेव्हा त्या डुकरांची डोकी धुक्याच्या वर दिसत आणि ती जणू काही उडत आहेत असा भास होई.
https://www.google.com/search?q=when+pigs+fly+idiom+origin&sca_esv=458dc...
"when pigs fly"
"when pigs fly"
रोचक, नवीन माहिती.
आम्हाला शाळेत बा सी मर्ढेकरांची "पितात सारे गोड हिवाळा" ही कविता होती. माझ्या आवडत्या कवितांपैकी एक.
हिवाळ्यातील मुंबईचे पहाट ते सकाळ याचे वर्णन यात आहे. आमच्या मराठीच्या बाई खूप जीव ओतून कविता शिकवत.
त्यात एक ओळ आहे.
डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
म्हणजे रात्री घरे काळोखात झोपली. जणू काळोखाच्या उशीवर त्यांनी आपली डोकी ठेवली. आणि मग पहाट झाल्यावर हळूहळू उजळू लागते. काळोखातून धुक्यातून हळूहळू घरांची छप्पर दिसू लागते. जणू ती उशीवरून आपली डोकी उचलतात आणि उठतात.
वरील अमेरिकी थियरी वाचून हे आठवले.
अवांतरा बद्दल क्षमस्व.
* बा सी मर्ढेकरांची >> आ हा
* बा सी मर्ढेकरांची >> आ हा !
त्यांच्या उपमा तर भन्नाटच !!
(पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी
तरी पंपतो कुणी काळोख. . .)
(स्वतंत्र धाग्याचा विषयच तो)

>>>>>>रात्री घरे काळोखात
>>>>>>रात्री घरे काळोखात झोपली. जणू काळोखाच्या उशीवर त्यांनी आपली डोकी ठेवली. आणि मग पहाट झाल्यावर हळूहळू उजळू लागते. काळोखातून धुक्यातून हळूहळू घरांची छप्पर दिसू लागते. जणू ती उशीवरून आपली डोकी उचलतात आणि उठतात.
वाह वाह!
प्रत्येकाच्या आयुष्यात काही
प्रत्येकाच्या आयुष्यात काही अडचणी किंवा संकटे अशी येतात की ज्यांना धीराने तोंड देण्याशिवाय गत्यंतर नसते आणि त्या निभावून न्याव्याच लागतात.
या अर्थाचा हा एक इंग्लिश वाक्प्रचार :
"Cross to bear"
(The loss was a heavy cross for her to bear)
याचा उगम येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशी (Cross) निगडित आहे.
मराठीतील आद्य कोश बनवणारे
मराठीतील आद्य कोश बनवणारे मोल्सवर्थ साहेबांच्या बद्दल सविस्तर माहिती देणारा हा लेख.
संग्रही ठेवावा असा अत्यंत वाचनीय.
https://www.marathisrushti.com/articles/james-moleworth-and-his-marathi-...
क्रॉस टु बेअर वरुन एक मस्त
क्रॉस टु बेअर वरुन एक मस्त कार्टुन आठवले.
- एका रांगेत बरीच माणसे चालताहेत. प्रत्येकाच्या खांद्यावरती लहान व मध्यम आकाराच एक्रॉस आहेत.
- एका माणसाकडे मात्र अवजड आणि बराच जड, लांब क्रॉस आहे. तो माणूस पार थकुन गेलेला आहे.
- चालता चालता पुढे एक दरी येते.
- अन्य कोणीही ती दरी पार करुन जाऊ शकत नाही पण हा माणूस त्याच्या क्रॉसचा पूलासारखा उपयोग करुन ती दरी ओलांडू शकतो.
*मस्त कार्टुन >>> छान कल्पना.
*मस्त कार्टुन >>> छान कल्पना.
Casablanca
Casablanca
हे मोरोक्कोमधील सर्वात मोठे शहर आणि आर्थिक केंद्र. त्याचा शब्दशः अर्थ white house असून या शब्दाच्या अंतरंगात डोकावले असता रोचक माहिती मिळते
Casa ( अरबी >> लॅटिन) = लहान खोली व
blanc (जुने फ्रेंच) = शुभ्र ; चकाकते
casa वरुनच casino हा शब्द आलेला आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ ‘छोटेसे घर’. सन 1820 नंतर इटालिय संदर्भात त्याचा ‘श्रीमंतांच्या जुगाराचा अड्डा’ हा अर्थ प्रचलित झाला.
the Queen’s English
the Queen’s English
हे शब्दकोशातले रीतसर नाम आहे. त्याचा उगम दक्षिण इंग्लडमधला असून ते प्रमाण इंग्लिश आहे. त्याला दोन पर्यायी नावे देखील आहेत :
अर्थातच ही भाषा व्याकरणशुद्ध आणि ‘स्लँग’रहित असते.
https://www.oxfordlearnersdictionaries.com/definition/english/the-queen-....
https://dictionary.cambridge.org/dictionary/english/queen-s-english
नवीन अंतर्वस्त्र परिधान केले
नवीन अंतर्वस्त्र परिधान केले की आठवडाभर कसा नवा उत्साह अंगात संचारतो ! पण त्याचबरोबर नव्या वस्त्राचे काचणे देखील सहन करावे लागते. या ‘काचण्या’साठी हा आहे एक खास यॉर्कशायरच्या बोलीतून उगम पावलेला इंग्लिश शब्द :
shivviness
= the uncomfortable feeling of wearing new underwear.
मूळ शब्द shiv = खरबरीत लोकर किंवा लिनन
https://www.collinsdictionary.com/submission/20711/Shivviness
इंग्लिश मध्ये काही शब्द
इंग्लिश मध्ये काही शब्द समुच्चय acronym असे आहेत की ज्यांना खरतर काही अर्थ नाही. त्यापैकी एक आहे SOS.
SOS आपण समजतो तसा काहीही अर्थ नाही.
उदा.
• Save Our Souls
• Save Our Ship
• Stop Other Signals
• Sure of Sinking
हे चुकीचे समज आहेत.
The combination of three dots followed by three dashes followed by three dots (. . . – – – . . . ) ह्या मोर्स कोडची निवड करण्यात आली ती अश्यासाठी की हे कोड ध्यानात ठेवायला आणि समजायला सोपे आहे म्हणून.
SOSची कुळकथा अशी आहे.
जादुगार जादू करताना जादुई
जादुगार जादू करताना जादुई शब्दांचा वापर करतात. अश्या magic words ना स्वतःचा इतिहास आहे. dictionary.com ह्या पैकी काही शब्दांची जंत्री त्यांच्या इतिहासासह इथे दिली आहे.
ही मनोरंजक माहिती आपण इथे वाचू शकता.
https://www.dictionary.com/e/magic-words/
*magic words >>>
*magic words >>>
वरील दुवा छान आहे. त्यांचे बरेच उपक्रम चांगले असतात; मी पाहत असतो.
shivviness>>>> रोचक
shivviness>>>> रोचक
magic words >>>
वरील दुवा छान आहे.
Onomatopoeia is a word which
Onomatopoeia is a word which mimics the sound it represents
आवाजाची आठवण करून देणारे असे शब्द. अश्या इंग्लिश शब्दांची यादी इथे मिळेल.
https://literarydevices.net/a-huge-list-of-onomatopoeia-examples/
मराठीत बोलायचे झाले तर
झुक झुक
दिडदा दिडदा
धडाम धाडकन
टप टप
पुटपुटणे
बुडबुडा
दणादण
किणकिण
किर्र
तबल्याचे बोल इत्यादि...
अजूनही असतील. पहा आठवून
Close, but no cigar
Close, but no cigar
हा एक रोचक वाक्प्रचार आहे. एखाद्या स्पर्धेत जेव्हा स्पर्धक जवळजवळ विजेतेपदापर्यंत पोचतो पण ते त्याला हुलकावणी देते, तेव्हा हा वापरतात. याचा उगम मनोरंजक आहे.
अमेरिकेत 1920 च्या दरम्यान विविध फिरत्या जत्रांमधून/ उत्सवांमधून काही खेळ खेळले जायचे. त्याकाळी अशा खेळांमध्ये प्रौढ व्यक्तींनाच घेतले जायचे. त्या काळी एखाद्या स्पर्धेतील विजेत्याला सिगार बक्षीस दिले जायचे. त्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला.
Close, but no cigar >>>>>
Close, but no cigar >>>>> मस्त 🤍
lexicon & dictionary
lexicon & dictionary
ढोबळमानाने पाहता वरील दोन्ही शब्दांचा अर्थ सामान्य व्यवहारात शब्दकोश असा घेतला जातो. आता त्यातील सूक्ष्म फरक पाहू.
lexicon चा उगम ग्रीक भाषेतून आहे तर dictionary चा उगम लॅटिनमधून.
सध्या lexicon हा शब्द Greek, Syriac, Hebrew किंवा Arabic या प्राचीन भाषांच्या शब्दकोशांसाठी वापरला जातो. तसेच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील शब्दसंग्रहासाठीही तो वापरतात.
उदाहरणार्थ, baseball lexicon.
true blue
true blue
= (विशेषण ) एकनिष्ठ, इमानदार.
निळ्या रंगाचा आणि एकनिष्ठतेचा काय संबंध असे वाटेल. याची काही स्पष्टीकरणे सापडतात. त्यापैकी एक असे आहे, की ज्याप्रमाणे आकाशाचा रंग कायम निळाच असतो तद्वत नेहमी एकाशीच इमान राखणारा.
म्हणून निळा रंग हे प्रतीक.
Pages