अन् कळ्या झाल्या कधीच्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 March, 2024 - 21:42

कुमारसरांनी सुरू केलेल्या 'मराठी लेखन घडते कसे' या उपक्रमामुळे आणि त्यात वाचायला मिळालेल्या हृद्य मनोगतांमुळे मलाही माझ्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावासा वाटला.
कुमारसरांचे आणि उपक्रमात लिहिणार्‍या सर्वांचे त्याबद्दल अनेक आभार.

हा मागोवा म्हणजे बहुधा एक आभारप्रदर्शनाची मालिकाच ठरेल , कारण हा प्रवास अनेक आधारवडांच्या सावलीतून झाला आहे.

उत्तम लेखनाची सुरुवात सहसा उत्तम वाचनापासून होते, आणि माझ्या सुदैवाने मला वाचनाची गोडी लागण्याला पोषक वातावरण घरी मिळालं. लहानपणी वडील वाढदिवस, परीक्षेतील यश, दिवाळी वगैरे प्रसंगी भेट म्हणून बरेचदा पुस्तकंच द्यायचे असं आठवतं. अजूनही त्यांच्या वळणदार अक्षरांतील 'चि. स्वातीस दुसरीच्या सहामाही परीक्षेतील प्रथम क्रमांकानिमित्त' अशा प्रकारच्या 'अर्पणपत्रिका' आठवतात.

आईवडिलांनी तेव्हा जाणीवपूर्वक मला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं होतं, त्यामुळे मी दहावीपर्यंत सगळे विषय (गणित आणि शास्त्रदेखील) मराठी भाषेतूनच शिकले. एक भाषा म्हणून मराठीचा आवाका आणि मर्यादा या दोन्ही बाबी मला त्यामुळे नीट लक्षात आल्या. ज्यांच्या जिभांवरून 'प्रमस्तिष्क अनुलंब विदर', 'प्रकाशाची व्युत्क्रमणीयता', 'लघुत्तम साधारण विभाज्य', 'संपृक्त आणि असंपृक्त द्रावणं', 'इष्टिकाचिती' यांसारख्या शब्दांचे बैदुल आपट्या खात घरंगळले असतील त्यांना मी काय म्हणते आहे ते चांगलंच लक्षात येईल. एकूण गोडीत अमृताते पैजा जिंकत असली, तरी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर ही भाषा हरलेली आहे हे तेव्हाच उमगलं.
त्याने काही बिघडलं असं नाही, आई अशिक्षित असली तरी आईच असते. (टडोपा वाक्यांनी शेवट करणं हा ठोकळेबाजपणा ठरल्यामुळे ती अशी अधूनमधून पेरणं अनिवार्य आहे.)

त्यात माझं शिक्षणाचं माध्यम मराठी असलं तरी शाळा एका ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असल्यामुळे रोज सकाळी प्रार्थनेच्या तासाला आम्ही आकाशातील कोमट काळजाच्या बापाची आळवणी करत असू.
'देव माझा जणु मेंढपाळ आहे | दयादृष्टीने मला पाहताहे ||' अशा प्रकारच्या 'फारिन' कल्पनांनी नटलेल्या ओव्या/भक्तिगीतं त्यात असायची. खरंतर देव गोपाळ असू शकतो तर मेंढपाळ का नाही? पण तेव्हा ते फारिन वाटायचं खरं.

तर अशा त्या शाळेत लेखन, गायन, पाठांतर, वक्तृत्व इत्यादी (बहुतांशी बैठ्या) उपक्रमांत आपल्याला रस आणि गती दोन्ही आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं. मराठीच्या प्रश्नपत्रिका सोडवतानाही मला आधी निबंधाचे विषय बघायची सवय होती. अभ्यासक्रमावरचे प्रश्न सोडवताना निबंधावर विचार सुरू झालेला असायचा. मग सुचलेल्या मजकुराची आकर्षक मांडणी करणं इतकंच काम निबंधाशी येईतो उरलेलं असायचं.

साहित्यप्रेमी मंडळांचं सचिवपद निभावताना पाहुण्यांची ओळख, मुलाखत किंवा आभार मानावे लागतील याची कल्पना होती, पण 'पाहुण्यांना यायला उशीर होतो आहे, तर व्यासपीठावरून काहीतरी - काहीही - सादर करून समोर जमलेल्या मुलींना गुंतवून ठेव जा' अशा कामगिर्‍या अंगावर पडतील हे माहीत नव्हतं. पण आपल्याला असं उत्स्फूर्त वक्तृत्वही बर्‍यापैकी जमतं असं त्यामुळे लक्षात आलं. शिक्षिका होत्या म्हणून 'सादर कर' वगैरे प्रमाणभाषेत सांगायच्या. चाळीत शेजारचे दादा-ताया 'पाहुणे येईस्तोवर जाऊन माइकला लटक जा’ अशा खड्या बोलीत पिटाळायचे. असो.
या निरनिराळ्या जलाशयांत ढकलून देणार्‍या सर्वांचीच मी ऋणी आहे, कारण तशा वेगवेगळ्या पाण्यांत पोहायचा सराव मला त्यांच्यामुळे झाला.

त्या काळात गंमत म्हणून ‘प्राचीला गच्ची’ छापाच्या काही कविता लिहिल्याचं आठवतं, पण ते तितपतच. कविता वाचायची आवड मात्र लागली होती.

अर्थात या सगळ्यात 'बघा बघा, मी किती मस्त लिहिते की नाही!' अशी एक बालिश दिखाऊगिरी होती. तंत्र थोडंफार अवगत झालं होतं, पण मंत्र सापडायलाच काय, शोधायलाही सुरुवात झाली नव्हती.

पुढे महाविद्यालयीन काळात ललित लेखनाचा घरगुती पत्रांपलीकडे फारसा पाठपुरावा केला गेला नाही. या दरम्यात इंग्रजी बेस्टसेलर्स (तीच ती फोर्टात रस्त्यावर पेपरबॅक मिळायची ती!) वाचण्यापर्यंत मजल गेली होती. स्पेलिंगांपलीकडेही त्या भाषेत काही मजा आहे याची चुणूक तेव्हा प्रथम मिळाली.
अनोळखी भाषेतलं साहित्य वाचताना एका नवीन संस्कृतीचा अवकाश खुला होतो, आणि मातृभाषेच्या प्रेमावर पोसलेले पंख त्या नव्या अवकाशांतही भरार्‍या घ्यायला मग घाबरत नाहीत हे जाणवलं. (टडोपा वाक्यांनी शेवट करणं हा इ. इ.)

मानवी भावभावना या जगभरात कुठेही गेलं तरी सारख्याच असतात हे (मुक्तपीठीय) वाक्य एका चौकटीत खरं आहे, मात्र विनोद हा त्याला सणसणीत अपवाद आहे! प्रत्येक भाषेतल्या विनोदाची जातकुळी निराळी असते. त्या भाषेच्या, आणि पर्यायाने त्या संस्कृतीच्या स्वभावाचा अर्क त्यात उतरलेला असतो. त्यात केवळ शाब्दिक कोट्या की उपरोध की अतिशयोक्ती की ग्राम्यता हे वर्गीकरणच नव्हे, तर कशावर विनोद केलेला खपतो हाही भाग आला.

'No one is above the law' म्हणतात तसं अमेरिकेत स्थायिक झाल्यावर 'nothing is above humor' अशी एक नवीनच खिडकी डोक्यात उघडली. ही अमेरिकन विनोदाची जातकुळी. नाहीतर उदाहरणार्थ पुलंचा विनोद निर्विष होता असं आपण म्हणतो, पण विनोद केला म्हणजेच उपमर्दच केलाच असं मानणारेही मानवसमूह असतात.
असो. विषयांतर करायचं म्हणजे किती!

त्यापुढे एका वळणावर आयुष्यात अतिशय खडतर काळ आला. परिस्थितीच्या अक्राळविक्राळ लाटा श्वाससुद्धा घेण्याची उसंत न देता चहूबाजूंनी एकामागून एक येऊन अंगावर आदळायला लागल्या, आणि त्यात आपण एकट्याच सापडलो आहोत, किती चाचपडावं, धडपडावं तरी हाताला आधार सापडत नाही आणि बुडायचीदेखील मुभा नाही अशी अवस्था झाली. मनःस्वास्थ्य हरवलं होतंच, सकारात्मकता आणि शहाणपणही हरवलं असतं कदाचित.

कुठल्यातरी शुभंकर योगायोगामुळे तेव्हाच मायबोलीचा शोध लागला. मी काडीचा आधार शोधत होते, मला नवीन प्रतिसृष्टीची किल्ली सापडली!
गुलमोहरात आधी चारोळ्या, मग कविता लिहायला लागले. कालांतराने कथा, ललित लेख इत्यादी गद्यातही मुशाफिरी केली.

लिखाण 'प्रकाशित' करत असले तरी यावेळी त्यात तो तांत्रिक कौशल्य मिरवायचा हेतू किंवा अभिनिवेश उरला नव्हता.
हा निचरा होता, थेरपी होती, मदतीसाठी धावा होता!
आणि ती मिळाली. भरभरून मिळाली. लिखाणावरच्या प्रतिसादांतून मिळाली, गप्पांतून जुळलेल्या मैत्रातून मिळाली, उपक्रमांच्या संयोजनांतून मिळाली.

व्यक्तिगत अडचणींचे तपशील जाहीरपणे लिहायचा माझा स्वभाव नाही, आणि तशी आवश्यकताही भासली नाही. माझ्या मनाभोवती समानशीलांचं एक भक्कम जाळं विणलं गेलं होतं आणि आता आयुष्याच्या सर्कशीत मला कुठूनही अचानक समोर आलेल्या कुठल्याही झोक्यावर झेपावण्याइतका धीर आला होता.

या काळात मी प्रथम कवितेकडेच का वळले हे माझं मलाही माहीत नाही. ठरवून आखून काही लिहिलं नाही. सुचत गेलं तसं उतरवत गेले.
माझ्या कवितांनी वाचणार्‍यांना काही आनंद मिळाला असेल तर तो बोनस. माझं डोकं त्या काळात ताळ्यावर राहिलं यात भरून पावलं मला!

आता वादळ काहीसं ओसरलं आहे. बहुधा त्यामुळेच लेखनही थंडावलं आहे.

हा वैयक्तिक अनुभव झाला, पण एकूणच कोणत्याही कलेचा आविष्कार कुठल्या ना कुठल्या मंथनातून होत असावा असं मला वाटतं. 'काय आहे' आणि 'कसं असायला हवं आहे' या दोन्हींतलं अंतर कलाकार आपल्या कल्पनासृष्टीत भरून काढू पाहातो तेव्हा कलाकृती घडते. जे आहे त्याने मुळापासून हादरवलेलं असणं आणि कसं असायला हवं आहे त्याचं चित्र मनात तयार होण्याइतकी त्यापासून तटस्थता साधणं हे दोन्ही त्यात अंतर्भूत असतं. नाहीतर दु:खातिरेकाने माणूस रडेल आणि कालांतराने शांत होईल. नंतर तो त्याबद्दल कविता का लिहितो? लिहितो तर लिहितो, तीत 'सुधारणा' करतो, ज्या दु:खाने छळलं होतं, ते पुरेशा परिणामकारकरीत्त्या मांडलं गेलं याची खातरजमा करतो - त्यासाठी शब्दांत फेरबदल करतो, त्या कवितेच्या अंगाखांद्यावर भाषेचे अलंकार चढवतो! दु:ख लपवतो, पण कलाकृतीचं प्रदर्शन मांडतो!
त्या दु:खाच्या रेघेशेजारी त्याच्या कलाकृतीची त्याहून मोठी आणि देखणी रेघ वाळूत ओढतो. मग दु:खाची रेघ लहान दिसायला लागते, तिची धार बोथट होते! वाळूतल्या कुठल्याच रेघा टिकण्यासाठी ओढलेल्याच नसतातच नाहीतरी, आणि तेव्हा त्याची पर्वाही नसते. गंमत आहे सगळी!

त्याहून मोठी गंमत म्हणजे याचं काही गणित नसतं. आज घटना घडली आणि उद्याच्या मॉर्निंग एडिशनच्या आत कविता - असं घडेलच असं नाही. मनाच्या मातीत कधी काय रुजलं, आणि त्यातलं शब्दांत किती फुललं हे कवीलादेखील नेमकं सांगता येणार नाही.

काही असेही दिवस असतात
की माती पांघरून
निवांत रुजत असतो आपण
ऊन म्हणतं, प्रतारणा केली
पावसाला वाटतं, फसवणूक झाली..

आणि काही असेही दिवस असतात
की पानाफुलांनी लगडून येतो आपण
पण तोवर ऊनतरी भडकायच्या बेतात असतं,
किंवा पाऊस तरी झोडपायच्या..

असं झालं तर
शहाणपणानं तापल्या झुळुकांच्या नावे करायचा सुगंध
पावसात वाहवून द्यायचे आपले अमृताचे पाझर..
मात्र हळूच
दोघांचाही डोळा चुकवून
मातीच्या पोटी दडवून टाकायचं रुजण्याचं रहस्य..

फार तर काय होईल?
ऊन म्हणेल प्रतारणा केली..
पावसाला वाटेल फसवणूक झाली..!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द.सा.दादा, लाजवताहात तुम्ही!
शर्वरीही परवा ‘आवडत्या बाई’ म्हणाल्या. मला नाही म्हटलं तरी जरा कानकोंडंच वाटलं. तेव्हा त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेना, म्हणून आज इथेच आभार मानते.

खरंच खूप मनापासून सर्वांनाच धन्यवाद!

सुंदर लिहिलें आहे. काय काय कोट करावे?
आणि भाषेवर किती प्रभुत्व आहे तुमचे याची कितव्यांदातरी प्रचीती आली.

सुंदर लिहिलंय. कालच वाचलं होतं, आज प्रतिसाद देतेय.
शेवटची कविता खासच.

कविता हा माझा प्रांत नव्हे, (परागचं वाक्य इथे कोट करते- कविता आपल्याला कळल्यात की नाही हेच मला कळत नाही Lol ) पण माबोवर मी फक्त तुझ्याच कविता वाचतेच वाचते.
त्यातली भाषा, गेयता, शब्दयोजना खूप भिडते. जंगलातल्या शांततेत, छान गारव्यात एखाद्या लहानशा ओढ्यातल्या दगडगोट्यांमधून वाहणार्‍या निर्मळ पाण्याचा मंजूळ आवाज जसा भिडतो, तसा काहीसा अनुभव.
(उपमा देण्याच्या बाबतीत मी मोस्टली शून्य आहे, त्यामुळे समजून घ्यावे.)
मागे तू काही बंगाली कवितांचा अनुवाद करून टाकला होतास, ते सुद्धा असंच झुळझुळ पाण्यासारखं आवडलं होतं.

तुझा ब्लॉग मात्र आजवर पाहिलेला नाही, आता बघते.

मायबोलीवर सुरुवातीला आलो त्यानंतर इथे ज्यांना वाचायला यावं असं वाटत राहिलं त्यात तुझाही एक महत्वाचा वाटा आहे. लिहिती राहा असेच म्हणेन. शेवटची कविता खुप आवडली .

अप्रतिम लिखाण.

दु:खाच्या रेघेशेजारी त्याच्या कलाकृतीची त्याहून मोठी आणि देखणी रेघ वाळूत ओढतो. मग दु:खाची रेघ लहान दिसायला लागते, तिची धार बोथट होते!>>> घडणारी प्रक्रिया किती सुंदर शब्दात मांडलीत.

अप्रतिम लिखाण!! एखाद्या गोष्टीचा इतका सुंदर प्रवास उलगडून दाखवता येणं, तो ग्राफ इतक्या रंजकतेनं मांडणं ह्यासाठी सुद्धा तुमचं खूप कौतुक वाटलं.

"मात्र विनोद हा त्याला सणसणीत अपवाद आहे! " - सहमत. तुम्ही ह्या अनुशंगानं विनोदाविषयी जे लिहिलंय, ते मला कवितेविषयी सुद्धा तितकंच खरं वाटतं. कवितेत येणारी प्रतिकं, त्यातल्या भाव-भावना हे भाषेत आणि तदनुशंगानं त्या संस्कृतीत रुतलेलं असतं असं मला वाटतं. म्हणूनच कदाचित, एखाद्या कवितेचा भावानुवाद जितका भावतो, तितका नुसता नुवाद अर्थहीन वाटतो. (ज्ञानेश्वरी भावते. नुसतंच, 'मनुष्य मनमें पैदा होनेवाली वासनाओंको त्याग देता हैं, और आत्माद्वारा आत्मामें ही संतृष्ट रहता हैं' ह्यातून फक्त विनोदनिर्मिती होते).

शीर्षकातली ओळ ओळखीची होती, पण नेमकी आठवत नव्हती. शोधावी लागली.

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा

भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो;
अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा

समर्पक आणि अर्थगर्भ!

--
ब्लॉग वाचतो.

सर्व नवीन प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार! Happy

ललिता, तुझं लक्ष दगडगोट्यांवरून उडून मंजुळ आवाजाकडे वेधलं गेलं ही भलतीच मोठी achievement झाली की! Proud
(कोणाला संदर्भ माहीत नसल्यास, ललिता Pebble Art फार सुंदर करते. Happy )

फेफ, खरं आहे.
>>> मनुष्य मनमें पैदा होनेवाली
Lol

भरत Happy
(मला वाटतं ते 'सोशिल्या ज्या ज्या कळा' असं आहे.)
कविवर्य सुरेश भटांची गझल आहे.
देवकी पंडितांनी फार सुंदर गायली आहे - या वरच्याच दुव्यावर ऐकता येईल.

धन्यवाद भरत,
मनातल्या मनात हेच शीर्षक का दिलं असावं याचा विचार केला होता. पण शोधायचा कंटाळा केला आणि नंतर विसरून गेले. समर्पक आणि अर्थगर्भ आहे खरंच..!

हो. ते कोणाच्या तरी ब्लॉगवर मिळालं तिथून कॉपी पेस्ट केलं.

ती गझल प्रथम दूरदर्शनवर गायली गेली होती. कोणीतरी रेकॉर्ड करून यु ट्यूबवर टाकलं आहे.

कविता वाचायचा अलिकडे भयंकर कंटाळा आहे.
कविता उभी वाचायला वेळ नाही लागत. ती आडवी वाचताना थांबत थांबत जो वेळ लागतो, त्यामुळे कंटाळा करतो.
आधी लेखासोबत उभी वाचली. आता एकेका ओळीवर थबकत आस्वाद घेतला.
खूप दिवसांनी अशी कविता वाचली.
ती वाचाविशी वाटली आणि चीज झालं वेळेचं.
सर्व सौंदर्यस्थळं लिहून काढावीत असे झाले.
पण तुमच्या प्रतिभेपुढे काजवा चमकला असे वाटेल ( हे जरा सखाराम गटणे टाईप झालं).

भरत यांची माहिती नेहमीच दिपवून टाकते.
इतकं वाचन कधी करतात ते ?

>>> चीज झालं वेळेचं
धन्यवाद. Happy

>>> सर्व सौंदर्यस्थळं लिहून काढावीत असे झाले. पण तुमच्या प्रतिभेपुढे
आता आली का पंचाईत! माझ्या कवितेवर 'लिहा' म्हणावं तरी आढ्यता ठरेल आणि 'नका लिहू' म्हणावं तरी! Lol

रघू आचार्य, मी एका मायबोली उपक्रमाचं लिहिलं होतं. कॉलेजात असताना कवितासंग्रहांतून आवडलेल्या कविता वहीत उतरवून काढायचो. गोंदण, रंग माझा वेगळा, नक्षत्रांचे देणे, धृपद, मृगजळ यातल्या पाव - निम्म्या कविता उतरवल्या होत्या. मग कमवता झाल्यावर पुस्तकं विकत घेतली. पण ते कागद अजून आहेत आणि कविता डोक्यात.
माझ्या कपाटातली बरीच गद्य पुस्तकं मी त्यांना कधी वाचेन म्हणून वाट बघताहेत. पण बहुतेक कवितासंग्रह किमान नजरेखालून घातले आहेत. काहींची पारायणे केली. म्हणजे आठवलं की काढा आणि त्यातलं काहीतरी शोधून वाचा.
पण स्वातींसारखं त्या कवितांत अवगाहन करून मिळालेली रत्नमाणकं आपल्या शब्दांत मांडायला जमतंच असं नाही.

असो. फार अवांतर झालं

>>>>>>> कॉलेजात असताना कवितासंग्रहांतून आवडलेल्या कविता वहीत उतरवून काढायचो.
डि-ट्टो!!! मीसुद्धा. शाळेत असल्यापासुन.

वर कुणी प्रतिसादात रसास्वाद लिहीला असेल तर माफ करा.

शब्दकळांशिवायही आवडलेली ही एक मनस्वी कविता आहे.
या कवितेचं सौंदर्य तिच्या प्रतिमांमधे, उपमांमधे आहे. अर्थ लिहीत नाही.
कारण जीवनाचं रहस्य किंवा प्रतिभेच्या रूजण्यापासून प्रगल्भतेचा प्रवास दोन्हीही या कवितेने दाखवला.
अन्य कुणाला आणखी काही दिसेल. ज्याची जशी अनुभूती असे दर्शन.

जीवनाचे असेच टप्पे.
माती पांघरलेली बाल्यावस्था सुरक्षित वाटते. नुकतेच ते छप्पर गमावल्याने फारच रिलेट झाली कविता.
ऊन पाऊस झेलणारे कवच गेल्यानंतर त्याच्या पंखाखाली रूजलेले आपण.
किती प्रगल्भ विचार आहे आणि किती सहजतेने मांडणी केली आहे.

या दृश्य प्रतिमा सुद्धा मोहक आहेत.
नुसत्या या प्रतिमा पाहतानाही अर्थाला मागे टाकून कविता आपल्याला चित्र दाखवते.
ओळीगणित बदलणारी चित्राची भाषा मोहवून टाकते.

चाल लावून म्हणता आली नाही.
पण स्टेजवरून म्हणताना गद्याचा छंद , नाद घुमला.
मंचीय कविता म्हणून थोडी गहन पण अवाक करणारी.
इतपतच मती चालली.

धन्यवाद, आचार्य.
माझी लिहिताना भूमिका थोडीशी निराळी होती, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे > ज्याची जशी अनुभूती तसे दर्शन.

>>> नुकतेच ते छप्पर गमावल्याने
सॉरी, मला कल्पना नव्हती.

अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा... याचा अर्थ काय नेमका?
Happy सॉरी..म्हणजे.. तुम्हा सगळ्या प्रतिभावंतांच्या मांदियाळीत..मी असा अगदीच बेसिक प्रश्न विचारत असल्यास..
पण मला नीट कळत नाहीये......

>>> अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा

वेदनेला कलेतून वाट देता येण्याचं (channelize करता येण्याचं) भाग्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
त्या वेदना प्रसववेदना ठरल्या कारण त्यांतून कविता(न्च्या कळ्या) जन्माला आल्या.

ग्रेसदेखील असंच म्हणाले होते :
मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदिपरि खोल
दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल

<आता अवांतर लिहितोच आहोत तर>

नटराजाची मूर्ती कलाविष्काराचं प्रतीक म्हणून मला अतिशय भावते. त्याच्या गतिमान नृत्यातला, एका पावलावर तोल सावरलेला एक क्षण त्या मूर्तीत बंदिस्त केला आहे. टेकवलेल्या पावलाने तो वेदनेच्या राक्षसाचं दमन करू पाहतो आहे, तर दुसरं पाऊल त्यातून अलिप्त होत वर उचललेलं आहे. तो असमतोल आणि ती अलिप्तता यांच्या संयोगातून, नव्हे संयोगामुळेच नृत्याविष्कार मूर्त होतो. आणि त्या सौंदर्यात भर पडते ती त्यातल्या अनिश्चिततेमुळे. उचललेलं पाऊल कधी आणि कुठे टेकेल याचा कदाचित अंदाज बांधता येईल, पण खात्री देता येत नाही. गायकाने अचानक अनवट तान घेऊन सम गाठली की कसा अलौकिक आनंद होतो - तशा आनंदाचं सूचन त्यात आहे. त्या अनिश्चिततेमुळे त्यातलं अप्रूप जिवंत आहे!
सृजन असं असतं!

छान वाटतंय चर्चा वाचायला. मलापण एक कविता आठवली यावरून. कवींचं नाव खलील मोमीन आहे. शाळेत/अकरावी-बारावीत कधीतरी होती. मला आवडते त्यामुळे लक्षात राहिली आहे अजून.

जे उरात उरते

जो गंध फुलांतुन झरतो, वाऱ्याच्या मनी उतरतो
होऊन लेखणी वारा, तो भवतालावर लिहितो

जी वाफ जळाची होते, ती मनी नभाच्या शिरते
बेधुंद सरींनी गाणे, धरणीवर उपडे होते

नभ, वाऱ्याचेच असे हे, औदार्य असावे थोर
निस्संग किती घेताना, देताना नसतो घोर

मी भरून घेतो सारे हृदयाच्या काठोकाठ
शब्दांतुन देताना का, पाझरता होतो माठ?

शब्दांतुन देऊन थोडे, जे उरात उरते काही
ती प्रेरक शक्ती मजला जगण्याची देते ग्वाही

Happy किती सुरेख शब्द..किती सहजतेने वापरतेस! सूचन सारखे...
तेवढं ते..गवयाने च्या ऐवजी...गायकाने वापरले असते तर अधिक बरे झाले असते. गवयाला आपल्या कडे उगीचच एक किंचित खालचा स्तर अभिप्रेत आहे.... Happy

वा! सुंदर आहे कविता! आधी वाचली नव्हती. धन्यवाद.
आता खलील मोमिन शोधते.

बाकी वावे, तू मला अचानक अहोजाहो का करायला लागलीस? Happy

आंबटगोड, बदललं. Happy

Pages