अन् कळ्या झाल्या कधीच्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 March, 2024 - 21:42

कुमारसरांनी सुरू केलेल्या 'मराठी लेखन घडते कसे' या उपक्रमामुळे आणि त्यात वाचायला मिळालेल्या हृद्य मनोगतांमुळे मलाही माझ्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावासा वाटला.
कुमारसरांचे आणि उपक्रमात लिहिणार्‍या सर्वांचे त्याबद्दल अनेक आभार.

हा मागोवा म्हणजे बहुधा एक आभारप्रदर्शनाची मालिकाच ठरेल , कारण हा प्रवास अनेक आधारवडांच्या सावलीतून झाला आहे.

उत्तम लेखनाची सुरुवात सहसा उत्तम वाचनापासून होते, आणि माझ्या सुदैवाने मला वाचनाची गोडी लागण्याला पोषक वातावरण घरी मिळालं. लहानपणी वडील वाढदिवस, परीक्षेतील यश, दिवाळी वगैरे प्रसंगी भेट म्हणून बरेचदा पुस्तकंच द्यायचे असं आठवतं. अजूनही त्यांच्या वळणदार अक्षरांतील 'चि. स्वातीस दुसरीच्या सहामाही परीक्षेतील प्रथम क्रमांकानिमित्त' अशा प्रकारच्या 'अर्पणपत्रिका' आठवतात.

आईवडिलांनी तेव्हा जाणीवपूर्वक मला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं होतं, त्यामुळे मी दहावीपर्यंत सगळे विषय (गणित आणि शास्त्रदेखील) मराठी भाषेतूनच शिकले. एक भाषा म्हणून मराठीचा आवाका आणि मर्यादा या दोन्ही बाबी मला त्यामुळे नीट लक्षात आल्या. ज्यांच्या जिभांवरून 'प्रमस्तिष्क अनुलंब विदर', 'प्रकाशाची व्युत्क्रमणीयता', 'लघुत्तम साधारण विभाज्य', 'संपृक्त आणि असंपृक्त द्रावणं', 'इष्टिकाचिती' यांसारख्या शब्दांचे बैदुल आपट्या खात घरंगळले असतील त्यांना मी काय म्हणते आहे ते चांगलंच लक्षात येईल. एकूण गोडीत अमृताते पैजा जिंकत असली, तरी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर ही भाषा हरलेली आहे हे तेव्हाच उमगलं.
त्याने काही बिघडलं असं नाही, आई अशिक्षित असली तरी आईच असते. (टडोपा वाक्यांनी शेवट करणं हा ठोकळेबाजपणा ठरल्यामुळे ती अशी अधूनमधून पेरणं अनिवार्य आहे.)

त्यात माझं शिक्षणाचं माध्यम मराठी असलं तरी शाळा एका ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असल्यामुळे रोज सकाळी प्रार्थनेच्या तासाला आम्ही आकाशातील कोमट काळजाच्या बापाची आळवणी करत असू.
'देव माझा जणु मेंढपाळ आहे | दयादृष्टीने मला पाहताहे ||' अशा प्रकारच्या 'फारिन' कल्पनांनी नटलेल्या ओव्या/भक्तिगीतं त्यात असायची. खरंतर देव गोपाळ असू शकतो तर मेंढपाळ का नाही? पण तेव्हा ते फारिन वाटायचं खरं.

तर अशा त्या शाळेत लेखन, गायन, पाठांतर, वक्तृत्व इत्यादी (बहुतांशी बैठ्या) उपक्रमांत आपल्याला रस आणि गती दोन्ही आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं. मराठीच्या प्रश्नपत्रिका सोडवतानाही मला आधी निबंधाचे विषय बघायची सवय होती. अभ्यासक्रमावरचे प्रश्न सोडवताना निबंधावर विचार सुरू झालेला असायचा. मग सुचलेल्या मजकुराची आकर्षक मांडणी करणं इतकंच काम निबंधाशी येईतो उरलेलं असायचं.

साहित्यप्रेमी मंडळांचं सचिवपद निभावताना पाहुण्यांची ओळख, मुलाखत किंवा आभार मानावे लागतील याची कल्पना होती, पण 'पाहुण्यांना यायला उशीर होतो आहे, तर व्यासपीठावरून काहीतरी - काहीही - सादर करून समोर जमलेल्या मुलींना गुंतवून ठेव जा' अशा कामगिर्‍या अंगावर पडतील हे माहीत नव्हतं. पण आपल्याला असं उत्स्फूर्त वक्तृत्वही बर्‍यापैकी जमतं असं त्यामुळे लक्षात आलं. शिक्षिका होत्या म्हणून 'सादर कर' वगैरे प्रमाणभाषेत सांगायच्या. चाळीत शेजारचे दादा-ताया 'पाहुणे येईस्तोवर जाऊन माइकला लटक जा’ अशा खड्या बोलीत पिटाळायचे. असो.
या निरनिराळ्या जलाशयांत ढकलून देणार्‍या सर्वांचीच मी ऋणी आहे, कारण तशा वेगवेगळ्या पाण्यांत पोहायचा सराव मला त्यांच्यामुळे झाला.

त्या काळात गंमत म्हणून ‘प्राचीला गच्ची’ छापाच्या काही कविता लिहिल्याचं आठवतं, पण ते तितपतच. कविता वाचायची आवड मात्र लागली होती.

अर्थात या सगळ्यात 'बघा बघा, मी किती मस्त लिहिते की नाही!' अशी एक बालिश दिखाऊगिरी होती. तंत्र थोडंफार अवगत झालं होतं, पण मंत्र सापडायलाच काय, शोधायलाही सुरुवात झाली नव्हती.

पुढे महाविद्यालयीन काळात ललित लेखनाचा घरगुती पत्रांपलीकडे फारसा पाठपुरावा केला गेला नाही. या दरम्यात इंग्रजी बेस्टसेलर्स (तीच ती फोर्टात रस्त्यावर पेपरबॅक मिळायची ती!) वाचण्यापर्यंत मजल गेली होती. स्पेलिंगांपलीकडेही त्या भाषेत काही मजा आहे याची चुणूक तेव्हा प्रथम मिळाली.
अनोळखी भाषेतलं साहित्य वाचताना एका नवीन संस्कृतीचा अवकाश खुला होतो, आणि मातृभाषेच्या प्रेमावर पोसलेले पंख त्या नव्या अवकाशांतही भरार्‍या घ्यायला मग घाबरत नाहीत हे जाणवलं. (टडोपा वाक्यांनी शेवट करणं हा इ. इ.)

मानवी भावभावना या जगभरात कुठेही गेलं तरी सारख्याच असतात हे (मुक्तपीठीय) वाक्य एका चौकटीत खरं आहे, मात्र विनोद हा त्याला सणसणीत अपवाद आहे! प्रत्येक भाषेतल्या विनोदाची जातकुळी निराळी असते. त्या भाषेच्या, आणि पर्यायाने त्या संस्कृतीच्या स्वभावाचा अर्क त्यात उतरलेला असतो. त्यात केवळ शाब्दिक कोट्या की उपरोध की अतिशयोक्ती की ग्राम्यता हे वर्गीकरणच नव्हे, तर कशावर विनोद केलेला खपतो हाही भाग आला.

'No one is above the law' म्हणतात तसं अमेरिकेत स्थायिक झाल्यावर 'nothing is above humor' अशी एक नवीनच खिडकी डोक्यात उघडली. ही अमेरिकन विनोदाची जातकुळी. नाहीतर उदाहरणार्थ पुलंचा विनोद निर्विष होता असं आपण म्हणतो, पण विनोद केला म्हणजेच उपमर्दच केलाच असं मानणारेही मानवसमूह असतात.
असो. विषयांतर करायचं म्हणजे किती!

त्यापुढे एका वळणावर आयुष्यात अतिशय खडतर काळ आला. परिस्थितीच्या अक्राळविक्राळ लाटा श्वाससुद्धा घेण्याची उसंत न देता चहूबाजूंनी एकामागून एक येऊन अंगावर आदळायला लागल्या, आणि त्यात आपण एकट्याच सापडलो आहोत, किती चाचपडावं, धडपडावं तरी हाताला आधार सापडत नाही आणि बुडायचीदेखील मुभा नाही अशी अवस्था झाली. मनःस्वास्थ्य हरवलं होतंच, सकारात्मकता आणि शहाणपणही हरवलं असतं कदाचित.

कुठल्यातरी शुभंकर योगायोगामुळे तेव्हाच मायबोलीचा शोध लागला. मी काडीचा आधार शोधत होते, मला नवीन प्रतिसृष्टीची किल्ली सापडली!
गुलमोहरात आधी चारोळ्या, मग कविता लिहायला लागले. कालांतराने कथा, ललित लेख इत्यादी गद्यातही मुशाफिरी केली.

लिखाण 'प्रकाशित' करत असले तरी यावेळी त्यात तो तांत्रिक कौशल्य मिरवायचा हेतू किंवा अभिनिवेश उरला नव्हता.
हा निचरा होता, थेरपी होती, मदतीसाठी धावा होता!
आणि ती मिळाली. भरभरून मिळाली. लिखाणावरच्या प्रतिसादांतून मिळाली, गप्पांतून जुळलेल्या मैत्रातून मिळाली, उपक्रमांच्या संयोजनांतून मिळाली.

व्यक्तिगत अडचणींचे तपशील जाहीरपणे लिहायचा माझा स्वभाव नाही, आणि तशी आवश्यकताही भासली नाही. माझ्या मनाभोवती समानशीलांचं एक भक्कम जाळं विणलं गेलं होतं आणि आता आयुष्याच्या सर्कशीत मला कुठूनही अचानक समोर आलेल्या कुठल्याही झोक्यावर झेपावण्याइतका धीर आला होता.

या काळात मी प्रथम कवितेकडेच का वळले हे माझं मलाही माहीत नाही. ठरवून आखून काही लिहिलं नाही. सुचत गेलं तसं उतरवत गेले.
माझ्या कवितांनी वाचणार्‍यांना काही आनंद मिळाला असेल तर तो बोनस. माझं डोकं त्या काळात ताळ्यावर राहिलं यात भरून पावलं मला!

आता वादळ काहीसं ओसरलं आहे. बहुधा त्यामुळेच लेखनही थंडावलं आहे.

हा वैयक्तिक अनुभव झाला, पण एकूणच कोणत्याही कलेचा आविष्कार कुठल्या ना कुठल्या मंथनातून होत असावा असं मला वाटतं. 'काय आहे' आणि 'कसं असायला हवं आहे' या दोन्हींतलं अंतर कलाकार आपल्या कल्पनासृष्टीत भरून काढू पाहातो तेव्हा कलाकृती घडते. जे आहे त्याने मुळापासून हादरवलेलं असणं आणि कसं असायला हवं आहे त्याचं चित्र मनात तयार होण्याइतकी त्यापासून तटस्थता साधणं हे दोन्ही त्यात अंतर्भूत असतं. नाहीतर दु:खातिरेकाने माणूस रडेल आणि कालांतराने शांत होईल. नंतर तो त्याबद्दल कविता का लिहितो? लिहितो तर लिहितो, तीत 'सुधारणा' करतो, ज्या दु:खाने छळलं होतं, ते पुरेशा परिणामकारकरीत्त्या मांडलं गेलं याची खातरजमा करतो - त्यासाठी शब्दांत फेरबदल करतो, त्या कवितेच्या अंगाखांद्यावर भाषेचे अलंकार चढवतो! दु:ख लपवतो, पण कलाकृतीचं प्रदर्शन मांडतो!
त्या दु:खाच्या रेघेशेजारी त्याच्या कलाकृतीची त्याहून मोठी आणि देखणी रेघ वाळूत ओढतो. मग दु:खाची रेघ लहान दिसायला लागते, तिची धार बोथट होते! वाळूतल्या कुठल्याच रेघा टिकण्यासाठी ओढलेल्याच नसतातच नाहीतरी, आणि तेव्हा त्याची पर्वाही नसते. गंमत आहे सगळी!

त्याहून मोठी गंमत म्हणजे याचं काही गणित नसतं. आज घटना घडली आणि उद्याच्या मॉर्निंग एडिशनच्या आत कविता - असं घडेलच असं नाही. मनाच्या मातीत कधी काय रुजलं, आणि त्यातलं शब्दांत किती फुललं हे कवीलादेखील नेमकं सांगता येणार नाही.

काही असेही दिवस असतात
की माती पांघरून
निवांत रुजत असतो आपण
ऊन म्हणतं, प्रतारणा केली
पावसाला वाटतं, फसवणूक झाली..

आणि काही असेही दिवस असतात
की पानाफुलांनी लगडून येतो आपण
पण तोवर ऊनतरी भडकायच्या बेतात असतं,
किंवा पाऊस तरी झोडपायच्या..

असं झालं तर
शहाणपणानं तापल्या झुळुकांच्या नावे करायचा सुगंध
पावसात वाहवून द्यायचे आपले अमृताचे पाझर..
मात्र हळूच
दोघांचाही डोळा चुकवून
मातीच्या पोटी दडवून टाकायचं रुजण्याचं रहस्य..

फार तर काय होईल?
ऊन म्हणेल प्रतारणा केली..
पावसाला वाटेल फसवणूक झाली..!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मात्र विनोद हा त्याला सणसणीत अपवाद आहे! प्रत्येक भाषेतल्या विनोदाची जातकुळी निराळी असते. >>> +१

पण एकूणच कोणत्याही कलेचा आविष्कार कुठल्या ना कुठल्या मंथनातून होत असावा असं मला वाटतं. 'काय आहे' आणि 'कसं असायला हवं आहे' या दोन्हींतलं अंतर कलाकार आपल्या कल्पनासृष्टीत भरून काढू पाहातो तेव्हा कलाकृती घडते. >>> वा !

त्याचं चित्र मनात तयार होण्याइतकी त्यापासून तटस्थता साधणं >>> सहमत.

कविताही सुंदर.

तुमचं नाव वाचून उघडला धागा. छान मांडणी केली आहे. आटोपतं घेतलंय असं वाटलं.
या विषयावर तुम्ही अजून लिहू शकाल याची खात्री आहे.

खूप आवडलं.
मधला अडचणीच्या काळातला पॅरा एकदम पटला.
मीही इष्टीकाचीती, कर्णिका,जवनिका,हे सर्व मराठी माध्यमात शिकलेय.

छान लिहिलंय.. आवडेश
मीही पदावली, प्रमेय आणि घनफळ समजू शकते. मराठीतल्या गणिती आणि वैज्ञानिक संज्ञा कशा वजनदार वाटतात नाही! काहीतरी भारी शिकतोय असं वाटतं.

सुंदर लिहिले आहे. कविताही आवडली. 'अर्पणपत्रिका' किती गोड प्रकरण आहे.

विनोदाबाबत किंवा एकुणच विचारपद्धतीबाबत मलाही अमेरिकेनं साफ बदलून टाकलं आहे. अक्षरशः माझ्या विश्वात खरोखरच कायम संपूर्ण विश्वच असतं.

पण एकूणच कोणत्याही कलेचा आविष्कार कुठल्या ना कुठल्या मंथनातून होत असावा असं मला वाटतं. >>>> खरंच.
मंथन हाच कलाकृतीचा आत्मा. लेखन तर फक्त टायपिंग वाटतं कधीकधी, चर्निंगचं लोणी.

नेहमीच असंच छान- छान लिहित रहा, नाही तर मी कुणाचं वाचू ! Happy

प्रत्येक भाषेतल्या विनोदाची जातकुळी निराळी असते >> +१ . या दुधाने तोंड पोळून घेतलेलं आहे. आता ताकही पीत नाही.

शिक्षणाचं माध्यम मराठी असलं तरी शाळा एका ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची >> आश्चर्य वाटलं. मला वाटायचं की अश्या शाळा फक्त स्वातंत्र्यपूर्वकाळातच होत्या की काय! भो पंचम जॉर्ज भूप वगैरे. मी त्या 'आकाशातल्या बापा'सारख्या मराठी प्रार्थना ऐकलेल्या आहेत, पण त्या मराठी ख्रिश्चन मंडळींच्या लग्नसमारंभात. शाळांबद्दल कल्पना नव्हती.

'प्रमस्तिष्क अनुलंब विदर', 'प्रकाशाची व्युत्क्रमणीयता', 'लघुत्तम साधारण विभाज्य', 'संपृक्त आणि असंपृक्त द्रावणं', 'इष्टिकाचिती' >> ज्जे बात! माझं संयुक्त माध्यम असल्यामुळे पहिल्या दोन संज्ञा आठवल्या नाहीत, पुढच्या आठवल्या.

शेवटची कविता आणि त्याआधीचे दोन परिच्छेद फारच सुंदर!

लेखनाने अडचणीच्या काळात तारून नेलं अश्या अर्थाचं तू आणि अन्य काहींनीही लिहिलं आहे. ते वाचताना लेखन घडते कसे - याचप्रमाणे लेखन घडवते कसे याचीही प्रचीती येते.

सुंदर लिहीले आहे! मी तुझ्या कविता फारशा वाचलेल्या नाहीत. यातली मात्र वाचली आणि आवडली.

का कोणास ठाऊक हा लेख भाग-१ वाटत आहे. कारण गेल्या काही वर्षांत तू माबोवर जे लिहीलेले वाचले आहे त्याचे प्रतिबिंब या लेखात फार दिसले नाही.

विनोदाच्या जातकुळीबद्दल - टोटली.

जियो
आवडलच. खरं तर तुला (टिपापाकर सगळ्यांनाच) जरा घाबरून असायचे, आहे. तुम्हा सर्वांचे अनुभव विश्व केव्हढं विस्तीर्ण आहे हे जाणवत रहायचं. ते विस्तीर्ण होत असतानाची धडपड, त्यातले खाचखळगे, अक्रारविक्राळ रूप माहिती नव्हतं, नाही; पण अंदाज होता. लेकाच्या निमित्ताने थोडं कळत गेलं. पण तुमची तर आधीची पिढी, जास्त तीव्र अनुभव असतील तुमचे. तपशीलात नाही गेलीस तरी अगदी जाणवले. अन त्यातून तरून जाताना साहित्याची कास धरलीस म्हणून जियो!
कविता तर आवडलीच. 'सुधारणा' वर लिहिलस ते जास्त आवडलं.
लहानपणाबद्दल, आईबाबांबद्दल, शाळेबद्दल जे लिहिलस फार आवडलं, हृद्य एकदम.
अन हो, रुजण्याचं रहस्य दडवलयस तर त्याला पुन्हा कोंब फुटोत Happy
शुभेच्छा!

तुमची चिंतनशीलता अतिशय उच्च कोटीची आहे हे जाणवलं...
एक दादा मनोगत...
तुम्ही मायबोली जुन्या पिढीतील आणि नव्या पिढीतील समृद्ध दुवा आहात....तुमचा प्रतिसाद नसेल तर लिखाणात काही तरी कमी पडलो असं मला नेहमी वाटतं ‌.
तुमची कविताही अप्रतिम आहे.

तुमच्या लेखावर छान लिहिता असे म्हणणे म्हणजे पुनरावृत्ती होईल . तरीपण हे जरूर सांगावेसे वाटते की दरवेळी तुमच्या लिखाणातून काही वेगळे जरूर गवसते .
या लेखातही कलेचा अविष्कार याबाबत वाचायला मिळाले ते ही सुस्पष्ट .
तुमची लेखणी अशीच बहरत राहो .

आणखी एक म्हणजे

एकूण गोडीत अमृताते पैजा जिंकत असली, तरी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर ही भाषा हरलेली आहे हे तेव्हाच उमगलं. >>>>>>

संपूर्ण अनुमोदन !

लेख बावनकशी सोन्याचे बिस्किट आहे.
तुझं बहुआयामी व्यक्तीमत्व वाचनातून, वक्तृत्वातून, शाळेत कसे घडत गेले, रुजत गेले त्याचा विलक्षण तटस्थ आणि सविस्तर आढावा घेतलेला आहेस. हे म्हणजे फुलपाखराचा सोनवर्खी पंख मायक्रोस्कोपखाली धरुन त्याचे विच्छेदन केल्यासारखे झाले आहे, प्रिसाइझ आणि तरी पंखाला धक्का न लावता.
तुला, कविता कशी होत गेली, ती कशी रुजत गेली, हे अजिबात माहीत नव्हते. तुझ्या कविता वाचलेल्या नाहीत. आता नक्कीच वाचेन. लेखाच्या शेवटी दिलेली कविता मनस्वी आहे. फार आवडली. ब्लॉग असल्यास प्लीज लिंक दे. कारण माबोवर सर्व सापडतील का, ते माहीत नाही.
>>>>>> कलेचा आविष्कार कुठल्या ना कुठल्या मंथनातून होत असावा
हा संपूर्ण उतारा फार आवडला.

मी पण >>>> वाट बघत होते की तुम्ही कधी लिहाल. अप्रतिम सुंदर लिहिले आहे. कविता फार फार आवडली, पोचली.>>+११११.

ज्यांच्या जिभांवरून 'प्रमस्तिष्क अनुलंब विदर', 'प्रकाशाची व्युत्क्रमणीयता', 'लघुत्तम साधारण विभाज्य', 'संपृक्त आणि असंपृक्त द्रावणं', 'इष्टिकाचिती>>> अगदी अगदी . पण खरं सांगू मला प्रमस्तिष्क अनुलंब विदर आठवत नाही. बाकी आठवतंय. ( आमच्या ऑफिसमधल्यांनी मला चिडवलं असतं " बहुतेक दुपारनंतर शाळेत गेली नाही" Lol )
वरचे सगळे प्रतिसाद पण मस्त. तुझ्या कविता मी मायबोली वर वाचल्या नाहीयेत. कसं काय?

खूपच सुंदर लिहिलं आहे! शेवटची कविता आवडली! मीही तुमच्या इतर कविता वाचल्या नाहीयेत.
कोणत्याही कलेचा आविष्कार कुठल्या ना कुठल्या मंथनातून होत असावा यानंतरचा परिच्छेद अतिशय आवडला.

सुंदर लिहिलंय स्वाती...शेवटची कविताही आवडली.
जे आहे त्याने मुळापासून हादरवलेलं असणं >> अगदी अगदी.

आकाशातल्या कोमट काळजाचा बाप - अरेरे...त्यापेक्षा इंग्लिश ओव्या ऐकवल्या असत्या तरी चाललं असतं.

बाकी व्युत्क्रमणीयता आणि इष्टिकाचितीवर मीही धडपडले आहे.ज्यावेळी त्या कन्सेप्ट खरंच वापरायची गरज पडली तेव्हा एक डिसोनन्स होता मनात. तरी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर ही भाषा हरलेली आहे हे पटत नाही. ज्यांनी हे शब्द निर्माण केले त्यांना पर्याय सुचला नसेल कदाचित किंवा संस्कृतप्रचुर शब्द वापरणे ही मानसिक गरजही असेल. पण आता आपण काहीतरी करू शकतो त्यावर. किती उपयोग होईल माहित नाही. पण प्रयत्न करायला हरकत नाही.

तुझी भाषा चांगली समृद्ध आहे, ते या लेखावरून लगेच लक्षात आलं. मी तुझ्या कविता किंवा लेख वाचल्याच आठवत नाही. इथे लिहीलेलं मात्र नक्कीच आवडलं.

फार सुरेख स्वाती! तू लिहिलेले काहीही वाचताना पुन्हा मागे जाऊन जाऊन तुझ्या भाषासौंदर्याला आणि शब्द संपत्तीला दाद दिली जाते. ( हल्ली दुर्मिळ झालेली गोष्ट!) हा लेखही अपवाद नाही.

>>> काय आहे' आणि 'कसं असायला हवं आहे' या दोन्हींतलं अंतर कलाकार आपल्या कल्पनासृष्टीत भरून काढू पाहातो तेव्हा कलाकृती घडते. जे आहे त्याने मुळापासून हादरवलेलं असणं आणि कसं असायला हवं आहे त्याचं चित्र मनात तयार होण्याइतकी त्यापासून तटस्थता साधणं हे दोन्ही त्यात अंतर्भूत असतं. नाहीतर दु:खातिरेकाने माणूस रडेल आणि कालांतराने शांत होईल. नंतर तो त्याबद्दल कविता का लिहितो? लिहितो तर लिहितो, तीत 'सुधारणा' करतो, ज्या दु:खाने छळलं होतं, ते पुरेशा परिणामकारकरीत्त्या मांडलं गेलं याची खातरजमा करतो - त्यासाठी शब्दांत फेरबदल करतो, त्या कवितेच्या अंगाखांद्यावर भाषेचे अलंकार चढवतो! दु:ख लपवतो, पण कलाकृतीचं प्रदर्शन मांडतो!

मस्त मस्त! खूप आवडले हे!

चिमटे घेत, कोपरखळ्या मारत मारत तितक्याच सहजतेने पुढचा तरल तरीही गहिरा विचार , तोही नेमक्या शब्दांत.
मायबोलीने काय दिलं हे वाचताना 'अगदी अगदी' झालं.
कवितानिर्मितीची प्रक्रिया नेमकी उतरली आहे, असं वाटतं.
मी वाचलेलं तुमचं बहुतांश लिखाण आस्वादकाच्याच लेखणीतून उतरलेलं आहे. तुमची निर्मिती अशी फार वाचलेली नाही.
शेवटची कविताही खूप आवडली.

फार सुरेख व्यक्त केलंय, स्वाती.
तुझ्या अर्घ्य ब्लॉग ची मी आधीपासूनच चाहती आहे.
तुझ्या संवेदनशील मनाची प्रचिती ठायीठायी जाणवते.
उन्हापावसाला काहीही वाटू दे, तुझं रुजणं आणि सृजन महत्त्वाचे आहे...
Happy
शुभेच्छा!

नितांत सुंदर असं काही लिखाण माबोवरती आलं की कसे दिवस मस्त जातात. माबोवरचा वावर स्पिल्स ओव्हर रेस्ट ऑफ लाइफ. लिहीत जा जरा ही विनंती.
>>>अर्घ्य ब्लॉग
वाह!! जर सर्वांसाठी खुला असेल तर जरुर शेअर कर. मघा आणि अर्घ्य Happy

Happy तुझ्या ब्लॉगवर शबाना आझमीबद्द्ल लिहिले आहे, ते फार आवडले. या खालच्या ओळी किती चपखल आहेत. तिचं प्रसन्न असणं तर आहेच पण आम्हाला बुद्धिमान लोक नेहमीच आवडत आलेली आहेत.
>>>>>

जावेद अख्तर एकदा तिच्याबद्दल म्हणाला होता,

'खुशशक्ल भी है वो ये अलग बात है मगर
हम को ज़हीन लोग हमेशा अज़ीज़ थे'

सर्व प्रतिसाददात्यांचे अनेक आभार!

भरत यांच्या प्रतिसादात फारएन्डच्या प्रश्नाचं उत्तर आहे. अलीकडच्या काळात केलेलं लेखन हे बहुतांशी रसग्रहणात्मक किंवा (या लेखासारखंच) उपक्रमांच्या निमित्ताने - ‘प्रॉम्प्ट्स’वरून झालेलं आहे, म्हणून त्याबद्दल लिहिलं नव्हतं.

ब्लॉगची लिंक कवितेच्या पहिल्या ओळीत दिली होती - जाहिरात म्हणून नव्हे, तर हे किती प्राचीन लिखाण आहे त्याचा कबुलीजबाब म्हणून. Happy

त्यानंतर काही कविता फेसबुकवर पोस्ट केल्या होत्या, त्या मायबोलीवर आणेन हळूहळू.

ब्लॉगचं नाव ‘अर्घ्यं’ ठेवण्यामागे हा विचार होता :

ही अर्घ्यं आहेत..
ओढाळ प्रवाह पायांना खुणावत असताना
कंबरभर जीवनात घट्ट उभं राहून
मन आणि बुद्धी बुडून वाहून जाऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत
त्यानेच दिलेल्या अनुभवांची
ओंजळी ओंजळींनी केलेली परतफेड..

ह्या कविता नाहीत..
ही अर्घ्यं आहेत...

Pages