कुमारसरांनी सुरू केलेल्या 'मराठी लेखन घडते कसे' या उपक्रमामुळे आणि त्यात वाचायला मिळालेल्या हृद्य मनोगतांमुळे मलाही माझ्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावासा वाटला.
कुमारसरांचे आणि उपक्रमात लिहिणार्या सर्वांचे त्याबद्दल अनेक आभार.
हा मागोवा म्हणजे बहुधा एक आभारप्रदर्शनाची मालिकाच ठरेल , कारण हा प्रवास अनेक आधारवडांच्या सावलीतून झाला आहे.
उत्तम लेखनाची सुरुवात सहसा उत्तम वाचनापासून होते, आणि माझ्या सुदैवाने मला वाचनाची गोडी लागण्याला पोषक वातावरण घरी मिळालं. लहानपणी वडील वाढदिवस, परीक्षेतील यश, दिवाळी वगैरे प्रसंगी भेट म्हणून बरेचदा पुस्तकंच द्यायचे असं आठवतं. अजूनही त्यांच्या वळणदार अक्षरांतील 'चि. स्वातीस दुसरीच्या सहामाही परीक्षेतील प्रथम क्रमांकानिमित्त' अशा प्रकारच्या 'अर्पणपत्रिका' आठवतात.
आईवडिलांनी तेव्हा जाणीवपूर्वक मला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं होतं, त्यामुळे मी दहावीपर्यंत सगळे विषय (गणित आणि शास्त्रदेखील) मराठी भाषेतूनच शिकले. एक भाषा म्हणून मराठीचा आवाका आणि मर्यादा या दोन्ही बाबी मला त्यामुळे नीट लक्षात आल्या. ज्यांच्या जिभांवरून 'प्रमस्तिष्क अनुलंब विदर', 'प्रकाशाची व्युत्क्रमणीयता', 'लघुत्तम साधारण विभाज्य', 'संपृक्त आणि असंपृक्त द्रावणं', 'इष्टिकाचिती' यांसारख्या शब्दांचे बैदुल आपट्या खात घरंगळले असतील त्यांना मी काय म्हणते आहे ते चांगलंच लक्षात येईल. एकूण गोडीत अमृताते पैजा जिंकत असली, तरी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर ही भाषा हरलेली आहे हे तेव्हाच उमगलं.
त्याने काही बिघडलं असं नाही, आई अशिक्षित असली तरी आईच असते. (टडोपा वाक्यांनी शेवट करणं हा ठोकळेबाजपणा ठरल्यामुळे ती अशी अधूनमधून पेरणं अनिवार्य आहे.)
त्यात माझं शिक्षणाचं माध्यम मराठी असलं तरी शाळा एका ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असल्यामुळे रोज सकाळी प्रार्थनेच्या तासाला आम्ही आकाशातील कोमट काळजाच्या बापाची आळवणी करत असू.
'देव माझा जणु मेंढपाळ आहे | दयादृष्टीने मला पाहताहे ||' अशा प्रकारच्या 'फारिन' कल्पनांनी नटलेल्या ओव्या/भक्तिगीतं त्यात असायची. खरंतर देव गोपाळ असू शकतो तर मेंढपाळ का नाही? पण तेव्हा ते फारिन वाटायचं खरं.
तर अशा त्या शाळेत लेखन, गायन, पाठांतर, वक्तृत्व इत्यादी (बहुतांशी बैठ्या) उपक्रमांत आपल्याला रस आणि गती दोन्ही आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं. मराठीच्या प्रश्नपत्रिका सोडवतानाही मला आधी निबंधाचे विषय बघायची सवय होती. अभ्यासक्रमावरचे प्रश्न सोडवताना निबंधावर विचार सुरू झालेला असायचा. मग सुचलेल्या मजकुराची आकर्षक मांडणी करणं इतकंच काम निबंधाशी येईतो उरलेलं असायचं.
साहित्यप्रेमी मंडळांचं सचिवपद निभावताना पाहुण्यांची ओळख, मुलाखत किंवा आभार मानावे लागतील याची कल्पना होती, पण 'पाहुण्यांना यायला उशीर होतो आहे, तर व्यासपीठावरून काहीतरी - काहीही - सादर करून समोर जमलेल्या मुलींना गुंतवून ठेव जा' अशा कामगिर्या अंगावर पडतील हे माहीत नव्हतं. पण आपल्याला असं उत्स्फूर्त वक्तृत्वही बर्यापैकी जमतं असं त्यामुळे लक्षात आलं. शिक्षिका होत्या म्हणून 'सादर कर' वगैरे प्रमाणभाषेत सांगायच्या. चाळीत शेजारचे दादा-ताया 'पाहुणे येईस्तोवर जाऊन माइकला लटक जा’ अशा खड्या बोलीत पिटाळायचे. असो.
या निरनिराळ्या जलाशयांत ढकलून देणार्या सर्वांचीच मी ऋणी आहे, कारण तशा वेगवेगळ्या पाण्यांत पोहायचा सराव मला त्यांच्यामुळे झाला.
त्या काळात गंमत म्हणून ‘प्राचीला गच्ची’ छापाच्या काही कविता लिहिल्याचं आठवतं, पण ते तितपतच. कविता वाचायची आवड मात्र लागली होती.
अर्थात या सगळ्यात 'बघा बघा, मी किती मस्त लिहिते की नाही!' अशी एक बालिश दिखाऊगिरी होती. तंत्र थोडंफार अवगत झालं होतं, पण मंत्र सापडायलाच काय, शोधायलाही सुरुवात झाली नव्हती.
पुढे महाविद्यालयीन काळात ललित लेखनाचा घरगुती पत्रांपलीकडे फारसा पाठपुरावा केला गेला नाही. या दरम्यात इंग्रजी बेस्टसेलर्स (तीच ती फोर्टात रस्त्यावर पेपरबॅक मिळायची ती!) वाचण्यापर्यंत मजल गेली होती. स्पेलिंगांपलीकडेही त्या भाषेत काही मजा आहे याची चुणूक तेव्हा प्रथम मिळाली.
अनोळखी भाषेतलं साहित्य वाचताना एका नवीन संस्कृतीचा अवकाश खुला होतो, आणि मातृभाषेच्या प्रेमावर पोसलेले पंख त्या नव्या अवकाशांतही भरार्या घ्यायला मग घाबरत नाहीत हे जाणवलं. (टडोपा वाक्यांनी शेवट करणं हा इ. इ.)
मानवी भावभावना या जगभरात कुठेही गेलं तरी सारख्याच असतात हे (मुक्तपीठीय) वाक्य एका चौकटीत खरं आहे, मात्र विनोद हा त्याला सणसणीत अपवाद आहे! प्रत्येक भाषेतल्या विनोदाची जातकुळी निराळी असते. त्या भाषेच्या, आणि पर्यायाने त्या संस्कृतीच्या स्वभावाचा अर्क त्यात उतरलेला असतो. त्यात केवळ शाब्दिक कोट्या की उपरोध की अतिशयोक्ती की ग्राम्यता हे वर्गीकरणच नव्हे, तर कशावर विनोद केलेला खपतो हाही भाग आला.
'No one is above the law' म्हणतात तसं अमेरिकेत स्थायिक झाल्यावर 'nothing is above humor' अशी एक नवीनच खिडकी डोक्यात उघडली. ही अमेरिकन विनोदाची जातकुळी. नाहीतर उदाहरणार्थ पुलंचा विनोद निर्विष होता असं आपण म्हणतो, पण विनोद केला म्हणजेच उपमर्दच केलाच असं मानणारेही मानवसमूह असतात.
असो. विषयांतर करायचं म्हणजे किती!
त्यापुढे एका वळणावर आयुष्यात अतिशय खडतर काळ आला. परिस्थितीच्या अक्राळविक्राळ लाटा श्वाससुद्धा घेण्याची उसंत न देता चहूबाजूंनी एकामागून एक येऊन अंगावर आदळायला लागल्या, आणि त्यात आपण एकट्याच सापडलो आहोत, किती चाचपडावं, धडपडावं तरी हाताला आधार सापडत नाही आणि बुडायचीदेखील मुभा नाही अशी अवस्था झाली. मनःस्वास्थ्य हरवलं होतंच, सकारात्मकता आणि शहाणपणही हरवलं असतं कदाचित.
कुठल्यातरी शुभंकर योगायोगामुळे तेव्हाच मायबोलीचा शोध लागला. मी काडीचा आधार शोधत होते, मला नवीन प्रतिसृष्टीची किल्ली सापडली!
गुलमोहरात आधी चारोळ्या, मग कविता लिहायला लागले. कालांतराने कथा, ललित लेख इत्यादी गद्यातही मुशाफिरी केली.
लिखाण 'प्रकाशित' करत असले तरी यावेळी त्यात तो तांत्रिक कौशल्य मिरवायचा हेतू किंवा अभिनिवेश उरला नव्हता.
हा निचरा होता, थेरपी होती, मदतीसाठी धावा होता!
आणि ती मिळाली. भरभरून मिळाली. लिखाणावरच्या प्रतिसादांतून मिळाली, गप्पांतून जुळलेल्या मैत्रातून मिळाली, उपक्रमांच्या संयोजनांतून मिळाली.
व्यक्तिगत अडचणींचे तपशील जाहीरपणे लिहायचा माझा स्वभाव नाही, आणि तशी आवश्यकताही भासली नाही. माझ्या मनाभोवती समानशीलांचं एक भक्कम जाळं विणलं गेलं होतं आणि आता आयुष्याच्या सर्कशीत मला कुठूनही अचानक समोर आलेल्या कुठल्याही झोक्यावर झेपावण्याइतका धीर आला होता.
या काळात मी प्रथम कवितेकडेच का वळले हे माझं मलाही माहीत नाही. ठरवून आखून काही लिहिलं नाही. सुचत गेलं तसं उतरवत गेले.
माझ्या कवितांनी वाचणार्यांना काही आनंद मिळाला असेल तर तो बोनस. माझं डोकं त्या काळात ताळ्यावर राहिलं यात भरून पावलं मला!
आता वादळ काहीसं ओसरलं आहे. बहुधा त्यामुळेच लेखनही थंडावलं आहे.
हा वैयक्तिक अनुभव झाला, पण एकूणच कोणत्याही कलेचा आविष्कार कुठल्या ना कुठल्या मंथनातून होत असावा असं मला वाटतं. 'काय आहे' आणि 'कसं असायला हवं आहे' या दोन्हींतलं अंतर कलाकार आपल्या कल्पनासृष्टीत भरून काढू पाहातो तेव्हा कलाकृती घडते. जे आहे त्याने मुळापासून हादरवलेलं असणं आणि कसं असायला हवं आहे त्याचं चित्र मनात तयार होण्याइतकी त्यापासून तटस्थता साधणं हे दोन्ही त्यात अंतर्भूत असतं. नाहीतर दु:खातिरेकाने माणूस रडेल आणि कालांतराने शांत होईल. नंतर तो त्याबद्दल कविता का लिहितो? लिहितो तर लिहितो, तीत 'सुधारणा' करतो, ज्या दु:खाने छळलं होतं, ते पुरेशा परिणामकारकरीत्त्या मांडलं गेलं याची खातरजमा करतो - त्यासाठी शब्दांत फेरबदल करतो, त्या कवितेच्या अंगाखांद्यावर भाषेचे अलंकार चढवतो! दु:ख लपवतो, पण कलाकृतीचं प्रदर्शन मांडतो!
त्या दु:खाच्या रेघेशेजारी त्याच्या कलाकृतीची त्याहून मोठी आणि देखणी रेघ वाळूत ओढतो. मग दु:खाची रेघ लहान दिसायला लागते, तिची धार बोथट होते! वाळूतल्या कुठल्याच रेघा टिकण्यासाठी ओढलेल्याच नसतातच नाहीतरी, आणि तेव्हा त्याची पर्वाही नसते. गंमत आहे सगळी!
त्याहून मोठी गंमत म्हणजे याचं काही गणित नसतं. आज घटना घडली आणि उद्याच्या मॉर्निंग एडिशनच्या आत कविता - असं घडेलच असं नाही. मनाच्या मातीत कधी काय रुजलं, आणि त्यातलं शब्दांत किती फुललं हे कवीलादेखील नेमकं सांगता येणार नाही.
काही असेही दिवस असतात
की माती पांघरून
निवांत रुजत असतो आपण
ऊन म्हणतं, प्रतारणा केली
पावसाला वाटतं, फसवणूक झाली..
आणि काही असेही दिवस असतात
की पानाफुलांनी लगडून येतो आपण
पण तोवर ऊनतरी भडकायच्या बेतात असतं,
किंवा पाऊस तरी झोडपायच्या..
असं झालं तर
शहाणपणानं तापल्या झुळुकांच्या नावे करायचा सुगंध
पावसात वाहवून द्यायचे आपले अमृताचे पाझर..
मात्र हळूच
दोघांचाही डोळा चुकवून
मातीच्या पोटी दडवून टाकायचं रुजण्याचं रहस्य..
फार तर काय होईल?
ऊन म्हणेल प्रतारणा केली..
पावसाला वाटेल फसवणूक झाली..!
>>>>>गवयाला आपल्या कडे उगीचच
>>>>>गवयाला आपल्या कडे उगीचच एक किंचित खालचा स्तर अभिप्रेत आहे.... Happy
ही माहीती किंवा हा समज मला तरी नवीन आहे.
असे धागे सतत निघावेत, र आ,
असे धागे सतत निघावेत, र आ, भरत, वावे, अस्मिता. आणि नावं न लिहिलेले पण त्याच जातकुळीतली शहाणीव असलेले असे सगळेे मायबोलीकर नेहमीच व्यक्त व्हावेत आणि आम्हा वाचकांना समृद्ध होत असल्याचा आनंद मिळावा यासाठी आमेन!!
शैथिल्य आल्याने म्हणा किंवा
शैथिल्य आल्याने म्हणा किंवा आपला स्वतःचाच बार लो असल्यामुळे मिडिऑकर लिहीणार्या सर्वांना एक रिमांडर म्हणुन तरी असे धागे निघत रहावेत. नक्कीच माबो
चावरील लिखाणाचा स्तर उंचावेल.स्वाती, you caught me काल ते
स्वाती, you caught me
काल ते वाक्य लिहिताना दगडगोट्यांकडे सपशेल दुर्लक्ष झालं होतं खरं...
स्वातीच्या मनोगताच्या
स्वातीच्या मनोगताच्या निमित्ताने जे नवीन प्रतिसाद आलेत तेही अप्रतिम.
नितांत सुंदर लिखाण
नितांत सुंदर लिखाण
शेवटची कविता वाचून ग्रेस यांच्या कवितेतली 'झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया' ही ओळ आठवली
छानच लिहीलय.. एक्दम ओघवतं.
छानच लिहीलय.. एक्दम ओघवतं.
असे धागे सतत निघावेत, र आ,
असे धागे सतत निघावेत, र आ, भरत, वावे, अस्मिता. आणि नावं न लिहिलेले पण त्याच जातकुळीतली शहाणीव असलेले असे सगळेे मायबोलीकर नेहमीच व्यक्त व्हावेत आणि आम्हा वाचकांना समृद्ध होत असल्याचा आनंद मिळावा यासाठी आमेन!!>>अगदी खरे. सुंदर आणि उत्तुंग लिखाण.
लेखाचं शीर्षक देवकी
लेखाचं शीर्षक देवकी पंडितांच्या आवाजातच ऐकू आलं. तिने ती कविता फार सुंदर गायली आहे. लेख खूप आवडला. अजुन हवा होता.
कलेचा अविष्कार कसा होतो वाला भाग तर फारच जमुन आलेला आहे. दु:ख, त्याचे कलेत रुपांतर, त्या दु:खाला सौंदर्याच्या कोंदणात बसवायला आटापिटा, यात मूळ रेघेपेक्षा नवी ओढलेली रेघ मोठी होणं, आणि इतकं करुन ते सगळं वाळूत क्षणभंगूर असणे. असा इतका सॉर्टेड विचार केलाच न्हवता. कविता छान आहे!
तू कविता जशी वाचतेस, त्याचा भळाभळा अर्थ न सांगता फक्त दोन एक शब्दांचा अर्थ जाणवून देतेस आणि मग परत ती ओळ वाचतना, 'अरे! हे तर किती अर्थवाही आहे! आपल्याला ही छटा इतके दिवस समजली होती? का आपण लक्षच दिलं न्हवतं या शब्दाकडे. पण हे सोपं तर आहे' असं एकदा नाही दोनदा नाही अनेकदा तुझे लेख वाचताना, पँडेमिक मध्ये तू खानोलकरांच्या कवितेवर रसग्रहणात्मक एक कार्यक्रम केलेलास तेव्हा... अनेकदा जाणवलं आहे. काहीतरी एक गोल्डन टच आहे इतकं नक्की. असंच माझी आत्या वाचते तेव्हा मला झालेलं आहे. शब्दफेक असेल, मघले चढउतार असतील, विराम असतील... मग आहे ते जादुई आहे. हे कधीतरी सांगायचं होतं.
बाकी गणित शास्त्राबद्दल, मी ही गणित शास्त्र सगळं दहावी पर्यंत मराठीतच शिकलो. प्रमस्तिष्क, व्युत्क्रमणीयता, इष्टिकाचिती इ. संस्कृतप्रचुर दररोजच्या वापरात न येणारे शब्द पुस्तकात होते म्हणून शास्त्र काट्याच्या कसोटीवर हरलेली असं म्हणत असलीस तर ते फार पटलं नाही.
पूर्ण मराठी वातावरणात आणि मराठी शाळेत असल्याने जेव्हा अकरावीला जीव, भौतिक, रसायन सगळं इंग्रजी मध्ये आल्याने ते इंग्रजी शब्दही तितकेच किंबहुना व्युत्पत्ती न स्मजल्याने आणि एकुणच इंग्रजी शब्दसंग्रह सीमित असल्याने कठिण गेलं असावं. आता तिककंस लक्षात नाही, पण शब्द वाचुन तो कशा बद्दल असेल हे व्युत्क्रमणीयता शब्दात जरासं पटकनच कळातचं. तेव्हा रिफ्लेक्शन, रिफॅक्शन, डिस्पर्शन, डिफ्रॅक्शन इ. शब्दांशी कुस्ती खेळावी लागत असे. ते नंतर सोपं वाटू लागलं कारण रोजच्या इंग्रजी वापरात (आपण प्रकाशाबद्दल बोलत नसतानाही) ते शब्द सहज समाविष्ट झालेले होते. पण भाषाच माहित नसताना सगळंच समान प्रकारे सोपं किंवा कठिण होतं. मराठीची मुख्य अडचण हे सारे शब्द आपण दैनंदिन वापरात तितके आणले नाहीत ही आहे. जे फ्रेंचने आणले आहेत. आता प्रमस्तिष्क म्हणजे प्र ...डोक्याच्या आधी/ मेंदूच्या आधी-सुरुवातीला असं काही असणार ही व्युत्पत्ती जितकी सोपी आहे तितकेच फ्रंटल लोब. स्पायनल कॉर्ड आणि मज्जारज्जू. थोडक्यात नवे शब्द तयार करण्याचा आणि वापरण्याचा काऱखाना आपण तयार करू शकलो नाही, ही खरी खंत असावी. आणि मग रोजच्या वापरात मळलेले शब्द नसल्याने त्यापेक्षा इंग्रजी बरे असं होऊ लागलं असावं. शब्दांची निवडही संस्कृत प्रचुर करुन फायद्याऐवजी नुकसानच झालं असावं. असो!
सर्व नवीन प्रतिसादकांचे अनेक
सर्व नवीन प्रतिसादकांचे अनेक आभार!
>>> आहे ते जादुई आहे. हे कधीतरी सांगायचं होतं
धन्यवाद, अमित. देवाशप्पथ माझ्या स्वतःसाठीही ते जादुईच आहे, आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
(ग्रेस यांच्या कवितांवर केला होता कार्यक्रम.)
आता यापुढे अवांतरावर दहापट अवांतर:
>>> मराठीची मुख्य अडचण हे सारे शब्द आपण दैनंदिन वापरात तितके आणले नाहीत ही आहे
'आणले' नाहीत की ते रोजच्या वापरात आणण्याइतके सोपे मुळातच नव्हते? मी याबद्दल साशंक आहे. माझेमन म्हणाल्या तसं कदाचित नवीन शब्द जुळवावे लागतील त्यासाठी, पण तो अट्टहास तरी करावा का? म्हणजे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका सामान्यांना गीता कळावी म्हणून लिहिली तेव्हा 'त्यापेक्षा संस्कृत दैनंदिन व्यवहारात आणू' असं का म्हटलं नसेल? कारण ते प्रवाह उलटा फिरवणं ठरलं असतं.
माझ्या मते एकतर तांत्रिक विषयांच्या बाबतीत संकल्पना कळणं हे भाषेच्या आग्रहापेक्षा जास्त महत्त्वाचं असायला हवं. आणि दुसर्या बाजूने भाषा प्रवाही हवी. तिने 'आजचं' ज्ञान ज्या शब्दांतून सहज दिलं घेतलं जाऊ शकेल ते शब्द आत्मसात करायला हवेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीत जर 'जुगाड' शब्द येऊ शकतो, तर मराठीत रिफ्रॅक्शन का नाही?
>>> आता प्रमस्तिष्क म्हणजे प्र ...डोक्याच्या आधी/ मेंदूच्या आधी-सुरुवातीला असं काही असणार ही व्युत्पत्ती जितकी सोपी आहे

Thank you for proving my point! कारण ही व्युत्पत्ती चुकीची आहे!
परवाच हर्पाने शब्दवेध धाग्यावर 'प्र' आणि 'परि' उपसर्गांबद्दल लिहिलं होतं. प्रमस्तिष्क म्हणजे मोठा मेंदू. तू ते बहुधा मनातल्या मनात नकळत pre-मस्तिष्क असं वाचतो आहेस. लहान मेंदूला अनुमस्तिष्क म्हणतात.
मग 'मोठा मेंदू'च का नाही म्हणायचं? हो, म्हणायला हवं, पण पुढच्या अनुलंब आणि विदरासाठी शब्दसमूह अॅड करत गेलो की माहितीपेक्षा नाव मोठं होऊ शकतं!
अरे देवा! आता वय झालं म्हणावं
अरे देवा! आता वय झालं म्हणावं का?
प्र -- प्री! ह्म्म... असावं.
बरोबर ग्रेस. यंदा खानोलकरांची काही पुस्तकं घेऊन आलोय, आणि झटतोय. म्हणुन कदाचित तेच डोक्यात असावं.
मराठी माणसाला रिफ्रॅक्शन आणि अपवर्तन आणि अपस्करण यातल्या कुठल्या शब्दाचा अर्थ (विज्ञानाला अभिप्रेत अर्थ) समजेल विचारलं तर मला वाटतं कशाचाच समजणार नाही. तसाच विचार केला तर इंग्रजी भाषा बोलंणार्या सामान्य व्यक्तीला रिफ्रॅक्शन समजेल याची खात्री वाटत नाही. असो. दोन्ही बाजू थोड्याफार पटतात. बाकी प्रवाही आणि शब्द आणण्याबदाल अजिबात दुमत नाही.
शब्दांची निवडही संस्कृत
शब्दांची निवडही संस्कृत प्रचुर करुन फायद्याऐवजी नुकसानच झालं असावं. असो! >>> मलाही असेच वाटते. पण ते ही दुर्बोध आहेत म्हणून आणखी एक सुलभ मराठी प्रतिशब्दकोश तयार करायला कोणाला बंदी केलेली नव्हती/नाही. सुरूवातीला ज्यांनी हे करायला पुढाकार घेतला ते संस्कृत पंडित असावेत म्हणून त्यांनी तेथे आधार शोधला. पण तो ही एक प्रयोगच होता असे समजून त्यात आणखी सुधारणा करायला काय हरकत आहे? ज्यांच्यावर संस्कृतचे संस्कार झालेले नसतील त्यांना हे शब्द जर दुर्बोध आणि उच्चारायला परके वाटत असतील, तर बहुसंख्य लोकांना सहज वापरता येतील असे पारिभाषिक शब्द अजूनही निर्माण करता येऊ शकतात.
इथे "संस्कार" हे स्नॉबिश अर्थाने नाही. लहानपणी ज्यांनी श्लोकांचे पाठांतर केले, रोज म्हंटले किंवा शाळेत जे संस्कृत शिकले त्यांना हे शब्द कसे म्हणायचे व कोठे तोडायचे हे सहसा कळते. इतरांना त्याची सवय नसते. त्यांच्या व्यवसायातील पारिभाषिक शब्द ते वापरतात त्या भाषेतून ऑर्गॅनिकली आलेले असले की आपोआप उचलले जातील.
लेख आणी कविताही आवडल्या !
लेख आणी कविताही आवडल्या !
सुंदर विचारप्रवर्तक मनोगत!
सुंदर विचारप्रवर्तक मनोगत!
प्रतिसादांतून देखील खूप काही गवसते आहे.
कुमार सरांच्या धाग्याच्या निमित्ताने लिहीते झालेल्या लेखकांनी लिहीते रहावे हीच सदिच्छा!
हे आणि हरचंद पालव यांचा लेख
हे आणि हरचंद पालव यांचा लेख वाचून, "खेळ मांडीयेला वाळवंटी घाई" आठवलं.
(माझं अतिशय आवडतं गीत आहे हे )
इथे बरेच जण दर्जेदार लिखाण करणारे आणि त्यावर उत्तमोत्तम प्रतिसाद लिहिणारे आहेत, त्या सर्वांचे आभार,
Pages