कवठाच्या/कौठाच्या वड्या

Submitted by तृप्ती आवटी on 19 December, 2009 - 16:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मध्यम आकाराची दोन कवठं (कौठं), अर्धा कप दूध, साधारण दोन ते अडीच वाट्या नारळाचा चव, साधारण दोन ते अडीच वाट्या साखर, पाव वाटी पिठीसाखर.

क्रमवार पाककृती: 

कवठांचा गर काढुन घ्यावा. त्यात अर्धा कप दूध मिसळुन घ्यावे. त्यातल्या बिया मोडल्या जातील पण अगदी वस्त्रगाळ होणार नाही अशा बेताने मिक्सरमधे वाटून घ्यावे. तयार झालेल्या मिश्रणाच्या समप्रमाणात प्रत्येकी नारळाचा चव आणि साखर घ्यावे. हे सर्व एकत्र करुन कढईत मध्यम आचेवर ठेवावे. एकसारखे हलवत अटवावे. शेवटी शेवटी अगदी मंद आचेवर ठेवावे नाहीतर जळते. चांगला घट्ट गोळा तयार झाला की तुपाचा हात लावलेल्या ताटात/ट्रेमधे वड्या थापाव्यात. वरुन शोभेसाठी पिठीसाखर भुरभुरावी.

वाढणी/प्रमाण: 
एक ताटभर वड्या होतात
अधिक टिपा: 

१. कधी कधी कवठात अजिबातच गर निघत नाही. तसे झाल्यास तीन कवठं घ्यावीत. नाहीतर अगदीच थोड्या वड्या होतात.
२. कप म्हणजे भारतात मिळणारा चहाचा कप. भारताबाहेर कवठं मिळतात की नाही शंकाच आहे त्यामुळे हेच माप दिले आहे Happy
३. प्रमाणापेक्षा जास्त अटल्यास खलबत्ता तयार ठेवावा पण फेकुन देऊ नये. खूप मस्त खमंग हार्ड कँडीज तयार होतात Proud

माहितीचा स्रोत: 
मातोश्री
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरात कवठाची चटणी फक्त आई-बाबा खातात. म्हणुन आईने हा वड्यांचा प्रकार सुरु केला. कवठाची जेली/जॅम पण करते आई. जॅम तर इतका सह्ही लागतो.

जानेवारीत कुरुन्दवाडला गेलो की कवठांवर संक्रांत आणणार ! आटवणे किती वेळ करायचे?

( घरात खलबत्ता तर आहेच, पाटा-वरवंटा आणि उखळ-पहारसुद्धा आहे! नो टेन्शन!! Proud )

सही..... कवठ हा प्रकार मला फार आवडतो. पिकले कवठ नुसते खायला पण खूप आवडते. भारतात गेल्यावर हे नक्की करून बघणार.

हा कवठ प्रकार नक्की आहे तरी काय? मला डोळ्यासमोर उंबरं आली, कोहळा आला तेव्हा लाल भोपळा वगैरे डोळ्यासमोर येण्यापूर्वी फोटो असेल कुणाकडे तर तो टाका.

नाही आर्च त्या बिया छान शिजतात शेवटी. मला तर वडीतल्या बिया शोधुन खायची सवय आहे.

सायो, कडक पांढुरके आवरण असलेले साधारण टेनिस बॉलच्या आकाराचे फळ असते. आत ब्राउनिश रंगाचा गर असतो. महाशिवरात्रीला खातात हे फळ.

http://www.passion4fruit.com/uploads/pics/woodapple.jpg

मस्तच ग सिंडी. मला फार्रर आवडतं कौठ. फक्त गुळ घालुन चटणी करायची. मस्त आंबट गोड चटणी होते. इथे अमेरिकेत मिळतं का कुठे कौठ ??

अनवट राग आहे आज सिंडीबाइंचा. ही कवठे उपासाला खातात ना मुद्दामून? जीएंची एक सुन्दर कथा आहे
कवठे नावाची. त्यानंतर आज संदर्भ आला. सिन्डी तू एक खाद्यजीवन नावाचा लेख लिही ना. अश्या अनोख्या
चीजांवर.

सिन्डी तू एक खाद्यजीवन नावाचा लेख लिही ना. अश्या अनोख्या
चीजांवर.
>>
हो हो! मग, आम्हिही येवु मग झब्बु द्यायला..smiley2.gif

सांगलीजवळ नृसिंहवाडी ला दत्ताचा प्रसाद म्हणुन मिळते कवठाची वडी. अप्रतिम. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

मला तर काही केल्या कवठ आठवत नाहिये Sad नवरा प्रयत्न करतोय आठवुन द्यायचा पण मला वाटत मी पाहिलच नाहिये कधी.

सांगलीजवळ नृसिंहवाडी ला दत्ताचा प्रसाद म्हणुन मिळते कवठाची वडी

होय. नरसोबावाडी कवठाची बर्फीसाठी प्रसिद्ध आहे. Happy

जामोप्या.
कोल्हापूरला आता शुद्ध भाषा बोलावी लागते नरसोबाची वाडी नाही तर नृसिंह वाडी म्हणायचे, अंबाबाई नाही तर महालक्ष्मी म्हणायचे. असो नरसोबाच्या वाडिला मिळणारी बर्फी भडक केशरी रंगाची आणि अति गोड असते.
कवठाला वूड अ‍ॅपल असा शब्द आहे. फिलिपिन्स, मलेशिया भागात खाल्ली जातात ती. त्याचा जॅम मिळतो तिथे.

पुण्यात, बडोद्याला, नासिकला झाडे बघितली आहेत मी.

कोल्हापूरला आता शुद्ध भाषा बोलावी लागते नरसोबाची वाडी नाही तर नृसिंह वाडी म्हणायचे, अंबाबाई नाही तर महालक्ष्मी म्हणायचे >>
ऐकावे ते नवलच ... अम्ही अजुनही अंबाबाई आणि नरसोबाची वाडीच म्हणतो..

बर्फी भडक केशरी रंगाची आणि अति गोड असते. >> अनूमोदन

वाडीच्या बर्फीत खोबरे नसते.... या पाककृतीत खोबरे घालायला सांगितले आहे. त्यामुळे बर्फीची कन्सिस्टन्सी आणि चव बदलेल, त्याचं अप्रूप आहे. म्हणून करुन बघणार. वाडीला नृसिंहवाडी, नरसोबावाडी दोन्ही नावे आहेत. 'नरसोबाच्या वाडीला जाऊ चला हो, गुरुचरणी दंग होऊया' असे अजित कडकडेंचे एक गाणे आहे.

छान रेसिपी. कवठाची चटणी आणि जाम / जेली हे नेहेमीचे पदार्थ बर्‍याचदा खाल्ले आहेत. वड्या नवीन आहेत माझ्या साठी.
पुण्यात आमच्या घराशेजारच कवठाचं झाड वठलं म्हणून कॉर्पोरेशनने तोडुन टाकलं. तेव्हा ह्या वेळी बाजारात शोधाशोध करावी लागणार कवठासाठी.

कवठाची झाडं नगर बाजुला भरपूर दिसतात. आमच्या मूळ गावी- मालुंज्याला तर जवळ जवळ प्रत्येकाच्या मळ्यात एक तरी झाड दिसते.

मला ती वाडीला मिळणारी बर्फी अजिबात आवडली नव्हती. ही एकदम मस्त खमंग लागते. मागल्यावेळी आईने पाठवल्या तेव्हा मी रोज देऊन देऊन इशानला पण आवडायला भाग पाडले आहे Wink

वाडीला देवळाजवळ मिळणार्‍या वड्या खरोखर अती गोड असतात. पण तिथे अजुन कुठेतरी एक दुकान आहे कमी गोड वड्या मिळतात तिथे.

वाडीच्या वड्या फक्त 'मिठाई' नाहीत. त्या सगळ्या वातावरणाची एक छान आठवण असते. अर्थात मी १५-२० वर्षांपुर्वीच्या गोष्टी सांगतीय. सद्यपरिस्थिती वेगळी असेल कदचित.

कवठाच्या झाडाखाली बसून मी माझे १० वी १२ वी काढले आहे. तेंव्हा कवठं अगदी वारेमाप खाल्ले आहे. कवठाची कोवळी पाने बडीशेपीच्या चवीसारखी लागतात आणि बहुतेक वेळा ही पाने बुंद्यातून वर येतात तेंव्हा सहज तोडता येतात. संध्याकाळ झाली की पोपटं कवठं पाडायचीतं आणि बागेत अभ्यासाला येणार्‍या मुलांना संध्याकाळी ही कवठं म्हणजे आनंद देणारी गोष्ट झाली होती.

कवठाच्या एक उपयोग असा की पित्त अंगावर उमळले की अंगाला गुंथा येतात. त्या खूप खाजवतात आणि आठवडाभर जात नाहीत. त्यावर रामबाण उपाय म्हणजे गुळ-कवठाची चटणी.

सद्यपरिस्थिती वेगळी असेल कदचित

वाडी अजुन तसेच आहे. थोडे कमर्शियल झाले आहे. पण मिठाईची चव तशीच आहे.

Pages