ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही

Submitted by कुमार१ on 19 February, 2018 - 00:30

आपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत:
ग्लुकोज
मेदाम्ले

ग्लिसेरॉल
किटोन बॉडीज
अमिनो आम्ले
यांपैकी कशाचा वापर उर्जानिर्मितीसाठी करायचा हे पेशीचा प्रकार आणि त्यातली परिस्थिती यानुसार ठरते.
बहुसंख्य पेशींच्या बाबतीत ग्लुकोज हे महत्वाचे इंधन आहे. काही पेशी त्याव्यतिरीक्त इतर इंधनेही वापरू शकतात. पण, रक्तातील लालपेशी मात्र फक्त ग्लुकोजच वापरतात. म्हणजे त्या ‘खाईन तर तुपाशी’ या प्रकारच्या पेशी आहेत. मेंदू सुद्धा शक्यतो ग्लुकोजचीच मागणी करतो पण आणीबाणीच्या परिस्थितीत तो इतर इंधन वापरू शकतो.

आहार आणि ग्लुकोजचा पुरवठा

आता एक नजर टाकूया आपल्या रोजच्या आहारावर. आहाराचा ६०-७०% भाग हा कर्बोदकांच्या रुपात असतो. पोळी, भाकरी आणि भात हे आपले पोट भरायचे मुख्य पदार्थ. त्या सगळ्यांत असतो ‘स्टार्च’. तर मांसाहारातून ‘ग्लायकोजेन’ हे कर्बोदक मिळते. मुळात स्टार्च आणि ग्लायकोजेन हे ग्लुकोजचे polymers आहेत. त्यांचे पचनसंस्थेत पूर्ण विघटन झाल्यावर आपल्याला भरपूर ग्लुकोज मिळते. तसेच आपण आहारात अनेक गोड पदार्थ, दूध व फळेही घेतो. त्यातून आपल्याला ग्लुकोजची भाईबंद असलेली अन्य काही कर्बोदके मिळतात. ती पचनसंस्थेतून शोषून जेव्हा पेशींत पोचतात तेव्हा त्यांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात कुठलेही कर्बोदक आहारात घेतले तरी पेशींमध्ये शेवटी त्याचे ग्लुकोज बनवले जाते. त्यामुळे ग्लुकोज हेच आपल्या शरीराचे मुख्य इंधन ठरते.
कर्बोदकांच्या पचनातून निर्माण झालेला ग्लुकोज नंतर रक्तात शोषला जातो. रक्तप्रवाहातून तो शरीराच्या सर्व अवयवांना पोचवला जातो. आता तो प्रत्यक्ष पेशीत शिरणे ही एक महत्वाची पायरी असते. यकृताच्या पेशींमध्ये तो अगदी सहज शिरतो पण स्नायू आणि मेदपेशींमध्ये मात्र तसे होत नाही. या दोन्हीकडे शिरण्यास त्याला इन्सुलिनची मदत लागतेच.

पेशींमध्ये ग्लुकोजचा वापर तीन प्रकारे होतो:
१. ५०% लगेचच ऊर्जानिर्मितीसाठी वापर. उरलेला ५०% हा पेशींना लगेच लागणार नसतो. म्हणून त्याचा ‘साठा’ खालील रूपांमध्ये होतो
२. १०% ग्लुकोजचे ‘ग्लायकोजेन’ मध्ये रुपांतर होते आणि
३. ४०% चे रुपांतर मेदात होते.

ग्लुकोजचा साठा करण्याचे मार्ग

आता ग्लुकोजचे जे दोन साठे होतात त्यांचा हेतू समजून घेऊ. इथे मला बँकेत पैसे ठेवण्याच्या ज्या नेहमीच्या पद्धती आहेत त्यांची उपमा द्यावी वाटते. समजा, मला रोज १०० रु. मिळतात. त्यातले ५० मला रोजच्या खर्चासाठी लागतात, म्हणून मी ते घरीच ठेवतो. उरलेल्या ५० मधले १० रु. मला त्या आठवड्यात कधीही लागू शकतात. पण, मला ते घरी ठेवायचे नाहीत कारण ते लगेच खर्च होण्याची भीती वाटते. मग मी ते माझ्या बचत खात्यात ठेवतो. शेवटी जे ४० उरले आहेत ते मला कधीतरी अडीअडचणीतच लागतात. म्हणून मी त्यांची मुदत ठेव बनवतो.

आता वळूया ग्लुकोजकडे. त्याचा १०% साठा हा ग्लायकोजेनच्या रुपात केला जातो. हे संयुग मुख्यतः यकृत व स्नायूंमध्ये साठवले जाते.यापैकी यकृतातील ग्लायकोजेनचे गरजेच्या वेळी अत्यंत वेगाने ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात हे झाले ग्लुकोजचे बचत खाते! आता त्याचा उपयोग बघा. रोज रात्रीचे जेवणानंतर ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या न्याहारीपर्यंत आपण ‘उपाशी’ असतो. तेव्हा मध्यरात्र ते सकाळ या काळात यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. मग सर्व पेशी ते वापरू लागतात. म्हणजेच, रोज दिवसभरात आपण आहारातला ग्लुकोज थेट वापरतो तर रात्रीत हा ‘बचत’ केलेला ग्लुकोज वापरात आणतो.

शेवटी जो ४०% ग्लुकोज उरलाय त्याचे मेदात रुपांतर केले जाते आणि ते मेद (fat) शरीराच्या मेदसाठ्यांमध्ये( adipose tissue) साठवले जाते. हे साठे खर्या अर्थाने ‘fixed deposits’ असतात! जेव्हा काही कारणाने दीर्घकाळ उपोषण घडते, त्या काळात त्यांचे विघटन करून त्यातून काही प्रमाणात ग्लुकोज मिळवला जातो. तसेच त्यातून मिळालेली मेदाम्लेही इंधन म्हणून वापरली जातात.
आपण साठवलेला मेद ही एका अर्थी आपली ‘संपत्ती’च असते. ज्याप्रमाणे व्यवहारातील कुठलीही संपत्ती निर्माण करण्यास मुळात आपल्याकडे भरपूर ‘चलन’ असावे लागते, तद्वत शरीरात जेव्हा ग्लुकोजचा पुरवठा भरपूर असतो तेव्हाच आपण मेदरुपी संपत्ती निर्माण करतो. ज्याप्रमाणे गरजेहून अधिक संपत्ती आयुष्यात कटकटी निर्माण करू शकते त्याप्रमाणे मेदाचे साठेही नको इतके झाल्यास काही व्याधी उत्पन्न होतात.

शरीरातील ग्लुकोजचे कार्य
१. सर्व पेशींमध्ये इंधन म्हणून ऊर्जानिर्मितीत वापर
२. ग्लुकोजपासून ribose तयार होते, जे DNA व RNA यांच्या उत्पादनासाठी लागते.
३. पुरुषाच्या जननेंद्रियात ग्लुकोजपासून fructose तयार होते, जे शुक्राणूंना उर्जा पुरवते.
४. स्तनांमध्ये स्तनपानाच्या काळात जे Lactose तयार होते त्यासाठी ग्लुकोज आवश्यक असते
५. ग्लुकोज हा अन्य मेद व प्रथिनांशी संयोग पावतो आणि त्यातून काही महत्वाची संयुगे तयार होतात, जी पेशींच्या बळकटीसाठी आवश्यक असतात.
या विवेचनातून लक्षात येईल की ग्लुकोज हा शरीरातील अनेक रासायनिक घटनांचा मूलाधार आहे.

ग्लुकोजचा चयापचय आणि हॉर्मोन्सचे कार्य

जेव्हा आपण नियमित पुरेसा आहार घेतो तेव्हा ग्लुकोजचा ग्लायकोजेन व मेदांच्या रुपात साठा केला जातो. या दोन्ही कामांत इन्सुलिनचा वाटा मोठा आहे. हे हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडात तयार होते. जेवणानंतर जेव्हा आपली ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते तेव्हा इन्सुलिनही अधिक प्रमाणात रक्तात सोडले जाते. ते पेशींमध्ये ग्लुकोजचा व्यवस्थित वापर आणि साठा करण्यात मोलाची मदत करते. त्याच्या या महत्वाच्या क्रियेमुळेच ग्लुकोजची वाढलेली रक्तपातळी अल्पावधीत पूर्ववत केली जाते. तेव्हा पुरेसा आहार आणि इन्सुलिनचे कार्य यांचा मिलाफ होऊनच ग्लुकोजपासून मेदनिर्मिती होते.

जेव्हा बऱ्याच तासांसाठी आपण आहार घेत नाही तेव्हा शरीरातील घडामोडी बघू. सुरवातीस रक्तातील ग्लुकोज पेशींकडून वापरले जाते. ते बऱ्यापैकी वापरल्यावर त्याची रक्तपातळी कमी होऊ लागते. आता हा ‘संदेश’ अन्य काही हॉर्मोन्सकडून टिपला जातो आणि ती अधिक प्रमाणात स्त्रवू लागतात. या हॉर्मोन्समध्ये प्रामुख्याने ‘ग्लुकॅगॉन’ व ‘एपिनेफ्रीन’ चा समावेश आहे. मुळात ही दोन्ही ‘इन्सुलिन-विरोधी’ गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व कृती या बरोबर इन्सुलिनच्या विरुद्ध असतात. आता ती कार्यरत झाल्यावर यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. जोपर्यंत पुढील अन्नग्रहण होत नाही तोपर्यंत हे ग्लायकोजेन ग्लुकोजची रक्तपातळी टिकवते. जास्तीतजास्त १६ तासांच्या उपासापर्यंत हा ग्लायकोजेनचा साठा टिकतो.

समजा, आता एखाद्याने त्याहीपुढे उपोषण करायचे ठरवले तर काय होते ते पाहू. आपण वर पाहिले आहे की लालपेशी आणि मेंदू यांना सतत ग्लुकोज लागतेच.त्यामुळे आता ती पातळी टिकवण्यासाठी एक नवीन प्रक्रिया यकृतात होते. तिला ‘नव-ग्लुकोज निर्मिती’ असे म्हणतात. ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये शरीरातील प्रथिने आणि मेद यांच्या विघटनातून ग्लुकोज तयार होतो आणि मग रक्तात सोडला जातो. किंबहुना या अनोख्या क्रियेमुळेच माणूस( मर्यादित काळाचे) उपोषण करूनही जिवंत राहतो. या प्रक्रियेस गती देण्याचे काम
ग्लुकॅगॉन व एपिनेफ्रीन ही हॉर्मोन्स करतात.

रक्तातील ग्लुकोजची योग्य पातळी
आपले खाणे आणि ही पातळी यांचा थेट संबंध आहे. सकाळी उपाशी पोटी ही सर्वात कमी असते( ७० – १०० mg/dL ). जेवणानंतर ती वाढू लागते आणि एक तासाने ती सर्वोच्च असते. दरम्यान जे वाढीव इन्सुलिन स्त्रवलेले असते त्याच्या प्रभावाने ती पुढील तासाभरात बऱ्यापैकी खाली येते. निरोगी अवस्थेत जेवणानंतर दोन तासाने ती १४० mg /dL चे आत असते. ज्या लोकांचा जेवणानंतरचा ‘इन्सुलिन-प्रतिसाद’ अत्युत्तम असतो, त्यांचे बाबतीत तर ती उपाशी-पातळी इतकी खाली येते.
आपण आहारातील कर्बोदकांचे प्रमाण जेवढे वाढवू त्याच प्रमाणात स्वादुपिंड अधिक इन्सुलिन सोडते. ग्लुकोजची पातळी खाण्यानंतर बेफाम वाढू नये यासाठीच इन्सुलिनचा लगाम आपल्याला निसर्गाने दिला आहे. इन्सुलिन आणि इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वयाने संपूर्ण २४ तासांत ग्लुकोज-पातळी नियंत्रित राहते.

बिघडलेल्या ग्लुकोज-पातळीचे परिणाम

जेव्हा ग्लुकोज, इन्सुलिन आणि त्याविरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वय बिघडतो तेव्हा अर्थातच ग्लुकोजची रक्तपातळी जास्त वा कमी होते. या दोन स्थिती अशा:
१. ग्लुकोज अधिक्य(hyperglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) इन्सुलिनची कमतरता
आ) इन्सुलिनचा पेशींवर प्रभाव न पडणे (resistance)
इ) इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्सचे अधिक्य
यापैकी (अ) आणि (आ) मिळून जो आजार होतो तोच ‘मधुमेह’. मधुमेह हे अवाढव्य प्रकरण असून तो एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्याबद्दल लिहिणे हा या लेखाचा उद्देश नाही.

मधुमेह या ‘कादंबरी’चा ग्लुकोज हा नायक तर इन्सुलिन ही नायिका आहे! निरोगी अवस्थेत या दोघांचा कसा सुंदर मिलाफ होतो ते आपण पाहिले आहे. किंबहुना ही पूर्वपीठीका समजून घेणे हे मधुमेहाबद्दल वाचण्यापूर्वी आवश्यक आहे. इन्सुलिनच्या कार्याअभावी गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात साठून राहतो कारण तो पेशींमध्ये शिरू शकत नाही. मग हा साठून राहिलेला ग्लुकोज ‘बिनकामाचा’ ठरतो आणि तो कटकटीही निर्माण करतो.

२. ग्लुकोज-कमतरता (hypoglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) जे मधुमेही इन्सुलिनचे उपचार घेत असतात त्यांच्यात कधीकधी त्याचा ‘ओव्हरडोस’ होतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज जास्त प्रमाणात पेशींत शिरते आणि त्याची रक्तपातळी नको इतकी कमी होते.
आ) अतिरिक्त मद्यपान : जर एका बैठकीत फाजील मद्यपान केले आणि त्यानंतर अन्न खायची शुद्धी राहिली नाही तर हा बाका प्रसंग ओढवतो. अल्कोहोलच्या प्रभावाने पेशींमधील नव-ग्लुकोजनिर्मितीस मोठा अडथळा होतो.

जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होत होत ४० mg/dL इतकी उतरते तेव्हा रुग्णात लक्षणे (चक्कर, आकलन न होणे) दिसू लागतात. याहीपुढे जर पातळी २० mg/dL चे खाली उतरली तर मात्र रुग्ण बेशुद्ध पडतो. ही स्थिती धोकादायक असते आणि तेव्हा रुग्णास तातडीने ग्लुकोज पुरवावे लागते.

.....तर असे हे ग्लुकोज – आपले महत्वाचे इंधन. आपल्याला क्षणोक्षणी लागणारे. तसेच आपल्या पेशींचा रासायनिक मूलाधार. मात्र त्याची रक्तपातळी योग्य प्रमाणातच हवी. ती फार जास्त झाल्यास कटकटीची तर फार कमी झाल्यास धोकादायक ठरणार. आपणा सर्वांची ती कायम आटोक्यात राहो या सदिच्छेसह लेख संपवतो.
**************************************************************************************************
टीप: आरोग्य लेखमालेतील या १०व्या लेखाबरोबरच ही माला आता थांबवत आहे. यादरम्यान वाचकांनी जे अजून काही विषय सुचवले आहेत त्यावर आता चिंतन व मनन करेन. कालांतराने त्यावर स्वतंत्र लेख लिहीता येतील. आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनापासून आभार!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नॉर्मल पातळी
उपाशीपोटी 70- 100 mg/dL
जेवणानंतर दोन तासांनी 140 च्या आत

यकृत इन्सुलिन,कंट्रोल ठेवणारे हार्मोन्स.
हे व्यवस्थित कार्य करायचे सोडून देतात तेव्हा रक्तातील glucose चे प्रमाण वाढते किंवा कमी होते असे साध्या शब्दात सांगता येईल ना?
बिघाड कधीच दुरुस्त करता येत नाही पण सिस्टीम मधील कमतरता औषध नी भरून काढता येते.
म्हणजे उपचार.
असे म्हणता येईल का?

रक्तातील ग्लुकोज वाढण्याची दोन मूलभूत कारणे असतात:

१. स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्मिती बरीच कमी होणे
आणि/किंवा
२. इन्सुलिनचे स्त्रवणे नॉर्मल असले तरीही आपल्या शरीरातील पेशींनी त्याच्या कार्याला दाद न देणे (रेजिस्टन्स)

वरील दोघांच्या एकत्रित परिणामातून मधुमेह होतो.

त्याच्यावरील विविध प्रकारची औषधे ही वरीलपैकी एक किंवा दोन्ही घटनांना सुधारतात.
ती सुधारणा किती प्रमाणात होईल हे व्यक्ती आणि आजारसापेक्ष राहील.

. इन्सुलिनचे स्त्रवणे नॉर्मल असले तरीही आपल्या शरीरातील पेशींनी त्याच्या कार्याला दाद न देणे (रेजिस्टन्स)

ह्याला कोणता मधुमेह म्हणतात.
प्रकार 1 की प्रकार 2

Resistance = प्रकार 2
अलीकडील संशोधनानुसार प्रकार 2 होण्यामागे कमतरतेपेक्षा Resistance चाच भाग अधिक आहे.

नवे भारतीय संशोधन

मधुमेह (प्रकार २) नियंत्रित करण्यासाठी 21 प्रकारच्या वनस्पतींवर नुकतेच भारतात संशोधन झालेले आहे.
या उपयुक्त वनस्पतींमध्ये विजयसार, जांभूळ, जिरे, दारूहरीद्र, तोंडली, बेल, मेथी, लिंबू, आवळा आणि हळद यांचा समावेश आहे.
यातील काही वनस्पतींपासून BGR 34
हे औषध तयार करण्यात आलेले आहे.

सदर संशोधन JIPMER - पुदुच्चेरी आणि AIIMS -कल्याणी या संस्थांमध्ये झाले. संबंधित शोधनिबंध "वर्ल्ड जर्नल ऑफ डायबिटीस" मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

https://europepmc.org/article/med/37122430

मधुमेह( प्रकार २) बरा होऊ शकतो का किंवा अशा रुग्णांची औषधांपासून मुक्तता होऊ शकते का?
हे नेहमी विचारले जाणारे प्रश्न.

या संदर्भात एका आंतरराष्ट्रीय समितीने असे सुचवले आहे :
१. या आजारासंदर्भात cure/ reversal या शब्दांचा वापर टाळण्यात यावा. त्याऐवजी remission हा शब्द सुयोग्य आहे.

२. Remission ची व्याख्या अशी आहे :
मधुमेही रुग्णाची संबंधित औषधे किमान तीन महिने बंद केल्यानंतर,

A1c < 6.5% असावे, किंवा
उपाशीपोटीचे ग्लुकोज < 126 mg/dL असावे.

गव्हाचे पदार्थ खाल्ल्यानंतर वाढणारा ग्लुकोज निर्देशांक हा मधुमेहींच्या दृष्टीने कळीचा मुद्दा.

अलीकडेच पंजाब कृषी विद्यापीठाने गव्हाची एक नवी जात (PBW RS1) विकसित केली आहे. या गव्हात रेझीस्टंट स्टार्चचे प्रमाण जास्त आहे. हा गहू आतड्यांमध्ये सावकाश पचतो आणि त्यामुळे ग्लुकोज निर्देशांक नियंत्रणात राहतो.

तसेच या गव्हाच्या पदार्थांमुळे पोट भरण्याची भावना लवकर येते.
( बातमी : छापील इंडियन एक्सप्रेस, १० जुलै 2023).

खपली गहू पण असेच काहीतरी करतो ना?
हा rs1 गहू बाजारात कधी येईल?की सफोला बिफोला कोणत्यातरी कंपनीचा आटा म्हणूनच हातात पडेल?(हे आपले मनातले प्रश्न.इथे कोणी उत्तर द्यावे अपेक्षित नाही.)

नव्या गव्हाचे बियाणे यंदाच्या सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांना दिले जाईल. त्या रब्बी हंगामात पीक येईल.

पूर्वीच्या गव्हाच्या तुलनेत याचे हेक्टरी उत्पादन कमी असणार आहे. त्यामुळे सुरुवातीस तरी त्याची किंमत जास्त राहू शकेल.

खपली गहू >>> याबद्दल माहित नाही.

मधुमेहावर वनौषधींचे पूरक उपचार : भारतातील संशोधन
यासंदर्भात झालेल्या एकूण 44 संशोधन अभ्यासांचा सारांश निबंधरूपाने प्रसिद्ध झाला आहे. सदर अभ्यास AIIMS या आधुनिक वैद्यकाच्या संस्थेमध्ये करण्यात आलेला आहे.

एकूण सहा वनस्पतींचा अभ्यास झाला : अ‍ॅपल साइडर विनेगर (ACV), मेथी, हळद, दालचिनी, आले आणि केशर.
वरीलपैकी ACV आणि मेथी यांचा वापर सर्वोत्तम ठरतो असा निष्कर्ष आहे.

अशा संशोधनांचा दीर्घकालीन पाठपुरावा करण्याची गरज आहे.
https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S1871402123001224?...

मुंबई महापालिकेकडून १३ लाख नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी, ९ महिन्यांत १० लाख ४५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण

https://www.loksatta.com/mumbai/diabetes-and-blood-pressure-door-to-door...
उत्तम !

ऐकावे जनाचे करावे मनाचे.
हे लक्षात ठेवा.
जगातील प्रतेक वस्तूत, प्रतेक द्रव्य पदार्थ मध्ये,प्रतेक अन्न मध्ये.
एकूण जगातील सर्व वस्तू,सजीव ,निर्जीव मध्ये असणाऱ्या कणा मधील फक्त 1% कणान चे रासायनिक सूत्र माणसाला माहीत आहे
बाकी 99% कणांची रासायनिक संरचना माणसाला माहीत च नाही.

पाण्यात H2O असते ह्याचा अर्थ पाणी पोटात गेले की ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा होतो का?

तर हे कोणालाच माहित नाही.किंवा तशी माहिती मी तरी वाचली नाही.
मानवी शरीरास अनेक घटक लागतात.
क्षार,व्हिटॅमिन,प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, आणि अजून खूप.
हल्ली फॅड आले आहे
पोटभर जेवण करा हजमोला खा.
ह्या व्हिटॅमिन च्या च्य गोळ्या घ्या.
ही प्रोटीन ची powder घ्या.
ह्या मिनरल च्या गोळ्या घ्या.
व्यायाम करू नका हे आमचे केमिकल घ्या.
मानवी शरीरास लागणारे अत्यंत महत्वाचे घटक नैसर्गिक अन्न पदार्थ पासून मिळतात.
एका अन्न पदार्थ मध्ये मिनरल पासून व्हिटॅमिन पर्यंत सर्व प्रकार असतात .

आणि ते एकमेकांशी संबंधित असतात.
एकाध्या अन्न पदार्थ च्या रासायनिक सूत्र मध्ये व्हिटॅमिन सी आहे म्हणजे तो पदार्थ आहारात वापरला की सी व्हिटॅमिन शरीर बाजूला करून वापरेल असे काही नसते.
बाकी अनेक घटक त्या साठी अनुकूल असावे लागतात.
जमाना आर्थिक फायद्या वर चालत आहे.
सर्रास चुकीची माहिती पसरवली जाते.
पारंपरिक आहार हाच सर्वोत्तम आहर आहे .
ह्याची जाणीव ठेवा.

आवाजावरून मधुमेहाचे निदान शक्य >>>

मूळ संशोधन संशोधन इथे वाचले :
https://www.mcpdigitalhealth.org/article/S2949-7612(23)00073-1/fulltext

मधुमेही व्यक्तींमध्ये गळ्यातील स्वरतंतूंना ओली सूज येते असे ते गृहीतक आहे. त्यामुळे झालेल्या आवाजातील बदलाचा चाळणी चाचणी म्हणून वापर करता येऊ शकेल.
( ?? निदान ?? )

सध्या हे संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे. भविष्यात बघूया काय प्रगती होतेय.

सध्या हे संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे. भविष्यात बघूया काय प्रगती होतेय.

प्राथमिक अवस्थेत आहे स्पष्ट निस्कर्ष नाही मग science अलर्ट सारख्या मीडियानं हे प्रसिद्ध का केले?
लोकांना मूर्ख बनवण्यासाठी.?.covid काळात अशा स्वार्थी लोकांनी खूप लोकांना मूर्ख बनवले.
खरेच स्व बुध्दी वापरा.

हो नक्कीच .
कारण सायन्स मॅगझिन असतील किंवा वृत पत्र.
ह्यांचे स्पॉन्सर असतात.
Dr कुमार तुम्हाला धन्यवाद तुम्ही योग्य मार्गदर्शन करता

मधुमेहाच्या उपचारांमध्ये औषधांबरोबरच जीवनशैली सुधारण्याचे प्रयत्न देखील महत्त्वाचे असतात. या संदर्भातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे विनोदबुद्धी आणि हास्य ! गेली काही वर्षे या विषयावर विशेष संशोधन होत आहे. मधुमेही व्यक्तीने जमेल तितके सकारात्मक विनोद करणे आणि खळखळून हसणे यांचा पूरक उपचार म्हणून देखील उपयोग होतो.
(https://journals.sagepub.com/doi/abs/10.1177/15598276231173912)

किंबहुना ज्या दीर्घकालीन आजारांच्या कारणमीमांसेत ताणतणावाचा भाग असतो अशा आजारांच्या पूरक उपचारांमध्ये हास्यविनोदाचे प्रशिक्षण देखील दिले जाते. या संदर्भात हे पुस्तक रोचक दिसते :
https://books.google.co.in/books?id=Esq8QWibTWEC&lpg=PR12&ots=05i1GNjT5A...

Pages