ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही

Submitted by कुमार१ on 19 February, 2018 - 00:30

आपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत:
ग्लुकोज
मेदाम्ले

ग्लिसेरॉल
किटोन बॉडीज
अमिनो आम्ले
यांपैकी कशाचा वापर उर्जानिर्मितीसाठी करायचा हे पेशीचा प्रकार आणि त्यातली परिस्थिती यानुसार ठरते.
बहुसंख्य पेशींच्या बाबतीत ग्लुकोज हे महत्वाचे इंधन आहे. काही पेशी त्याव्यतिरीक्त इतर इंधनेही वापरू शकतात. पण, रक्तातील लालपेशी मात्र फक्त ग्लुकोजच वापरतात. म्हणजे त्या ‘खाईन तर तुपाशी’ या प्रकारच्या पेशी आहेत. मेंदू सुद्धा शक्यतो ग्लुकोजचीच मागणी करतो पण आणीबाणीच्या परिस्थितीत तो इतर इंधन वापरू शकतो.

आहार आणि ग्लुकोजचा पुरवठा

आता एक नजर टाकूया आपल्या रोजच्या आहारावर. आहाराचा ६०-७०% भाग हा कर्बोदकांच्या रुपात असतो. पोळी, भाकरी आणि भात हे आपले पोट भरायचे मुख्य पदार्थ. त्या सगळ्यांत असतो ‘स्टार्च’. तर मांसाहारातून ‘ग्लायकोजेन’ हे कर्बोदक मिळते. मुळात स्टार्च आणि ग्लायकोजेन हे ग्लुकोजचे polymers आहेत. त्यांचे पचनसंस्थेत पूर्ण विघटन झाल्यावर आपल्याला भरपूर ग्लुकोज मिळते. तसेच आपण आहारात अनेक गोड पदार्थ, दूध व फळेही घेतो. त्यातून आपल्याला ग्लुकोजची भाईबंद असलेली अन्य काही कर्बोदके मिळतात. ती पचनसंस्थेतून शोषून जेव्हा पेशींत पोचतात तेव्हा त्यांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात कुठलेही कर्बोदक आहारात घेतले तरी पेशींमध्ये शेवटी त्याचे ग्लुकोज बनवले जाते. त्यामुळे ग्लुकोज हेच आपल्या शरीराचे मुख्य इंधन ठरते.
कर्बोदकांच्या पचनातून निर्माण झालेला ग्लुकोज नंतर रक्तात शोषला जातो. रक्तप्रवाहातून तो शरीराच्या सर्व अवयवांना पोचवला जातो. आता तो प्रत्यक्ष पेशीत शिरणे ही एक महत्वाची पायरी असते. यकृताच्या पेशींमध्ये तो अगदी सहज शिरतो पण स्नायू आणि मेदपेशींमध्ये मात्र तसे होत नाही. या दोन्हीकडे शिरण्यास त्याला इन्सुलिनची मदत लागतेच.

पेशींमध्ये ग्लुकोजचा वापर तीन प्रकारे होतो:
१. ५०% लगेचच ऊर्जानिर्मितीसाठी वापर. उरलेला ५०% हा पेशींना लगेच लागणार नसतो. म्हणून त्याचा ‘साठा’ खालील रूपांमध्ये होतो
२. १०% ग्लुकोजचे ‘ग्लायकोजेन’ मध्ये रुपांतर होते आणि
३. ४०% चे रुपांतर मेदात होते.

ग्लुकोजचा साठा करण्याचे मार्ग

आता ग्लुकोजचे जे दोन साठे होतात त्यांचा हेतू समजून घेऊ. इथे मला बँकेत पैसे ठेवण्याच्या ज्या नेहमीच्या पद्धती आहेत त्यांची उपमा द्यावी वाटते. समजा, मला रोज १०० रु. मिळतात. त्यातले ५० मला रोजच्या खर्चासाठी लागतात, म्हणून मी ते घरीच ठेवतो. उरलेल्या ५० मधले १० रु. मला त्या आठवड्यात कधीही लागू शकतात. पण, मला ते घरी ठेवायचे नाहीत कारण ते लगेच खर्च होण्याची भीती वाटते. मग मी ते माझ्या बचत खात्यात ठेवतो. शेवटी जे ४० उरले आहेत ते मला कधीतरी अडीअडचणीतच लागतात. म्हणून मी त्यांची मुदत ठेव बनवतो.

आता वळूया ग्लुकोजकडे. त्याचा १०% साठा हा ग्लायकोजेनच्या रुपात केला जातो. हे संयुग मुख्यतः यकृत व स्नायूंमध्ये साठवले जाते.यापैकी यकृतातील ग्लायकोजेनचे गरजेच्या वेळी अत्यंत वेगाने ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात हे झाले ग्लुकोजचे बचत खाते! आता त्याचा उपयोग बघा. रोज रात्रीचे जेवणानंतर ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या न्याहारीपर्यंत आपण ‘उपाशी’ असतो. तेव्हा मध्यरात्र ते सकाळ या काळात यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. मग सर्व पेशी ते वापरू लागतात. म्हणजेच, रोज दिवसभरात आपण आहारातला ग्लुकोज थेट वापरतो तर रात्रीत हा ‘बचत’ केलेला ग्लुकोज वापरात आणतो.

शेवटी जो ४०% ग्लुकोज उरलाय त्याचे मेदात रुपांतर केले जाते आणि ते मेद (fat) शरीराच्या मेदसाठ्यांमध्ये( adipose tissue) साठवले जाते. हे साठे खर्या अर्थाने ‘fixed deposits’ असतात! जेव्हा काही कारणाने दीर्घकाळ उपोषण घडते, त्या काळात त्यांचे विघटन करून त्यातून काही प्रमाणात ग्लुकोज मिळवला जातो. तसेच त्यातून मिळालेली मेदाम्लेही इंधन म्हणून वापरली जातात.
आपण साठवलेला मेद ही एका अर्थी आपली ‘संपत्ती’च असते. ज्याप्रमाणे व्यवहारातील कुठलीही संपत्ती निर्माण करण्यास मुळात आपल्याकडे भरपूर ‘चलन’ असावे लागते, तद्वत शरीरात जेव्हा ग्लुकोजचा पुरवठा भरपूर असतो तेव्हाच आपण मेदरुपी संपत्ती निर्माण करतो. ज्याप्रमाणे गरजेहून अधिक संपत्ती आयुष्यात कटकटी निर्माण करू शकते त्याप्रमाणे मेदाचे साठेही नको इतके झाल्यास काही व्याधी उत्पन्न होतात.

शरीरातील ग्लुकोजचे कार्य
१. सर्व पेशींमध्ये इंधन म्हणून ऊर्जानिर्मितीत वापर
२. ग्लुकोजपासून ribose तयार होते, जे DNA व RNA यांच्या उत्पादनासाठी लागते.
३. पुरुषाच्या जननेंद्रियात ग्लुकोजपासून fructose तयार होते, जे शुक्राणूंना उर्जा पुरवते.
४. स्तनांमध्ये स्तनपानाच्या काळात जे Lactose तयार होते त्यासाठी ग्लुकोज आवश्यक असते
५. ग्लुकोज हा अन्य मेद व प्रथिनांशी संयोग पावतो आणि त्यातून काही महत्वाची संयुगे तयार होतात, जी पेशींच्या बळकटीसाठी आवश्यक असतात.
या विवेचनातून लक्षात येईल की ग्लुकोज हा शरीरातील अनेक रासायनिक घटनांचा मूलाधार आहे.

ग्लुकोजचा चयापचय आणि हॉर्मोन्सचे कार्य

जेव्हा आपण नियमित पुरेसा आहार घेतो तेव्हा ग्लुकोजचा ग्लायकोजेन व मेदांच्या रुपात साठा केला जातो. या दोन्ही कामांत इन्सुलिनचा वाटा मोठा आहे. हे हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडात तयार होते. जेवणानंतर जेव्हा आपली ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते तेव्हा इन्सुलिनही अधिक प्रमाणात रक्तात सोडले जाते. ते पेशींमध्ये ग्लुकोजचा व्यवस्थित वापर आणि साठा करण्यात मोलाची मदत करते. त्याच्या या महत्वाच्या क्रियेमुळेच ग्लुकोजची वाढलेली रक्तपातळी अल्पावधीत पूर्ववत केली जाते. तेव्हा पुरेसा आहार आणि इन्सुलिनचे कार्य यांचा मिलाफ होऊनच ग्लुकोजपासून मेदनिर्मिती होते.

जेव्हा बऱ्याच तासांसाठी आपण आहार घेत नाही तेव्हा शरीरातील घडामोडी बघू. सुरवातीस रक्तातील ग्लुकोज पेशींकडून वापरले जाते. ते बऱ्यापैकी वापरल्यावर त्याची रक्तपातळी कमी होऊ लागते. आता हा ‘संदेश’ अन्य काही हॉर्मोन्सकडून टिपला जातो आणि ती अधिक प्रमाणात स्त्रवू लागतात. या हॉर्मोन्समध्ये प्रामुख्याने ‘ग्लुकॅगॉन’ व ‘एपिनेफ्रीन’ चा समावेश आहे. मुळात ही दोन्ही ‘इन्सुलिन-विरोधी’ गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व कृती या बरोबर इन्सुलिनच्या विरुद्ध असतात. आता ती कार्यरत झाल्यावर यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. जोपर्यंत पुढील अन्नग्रहण होत नाही तोपर्यंत हे ग्लायकोजेन ग्लुकोजची रक्तपातळी टिकवते. जास्तीतजास्त १६ तासांच्या उपासापर्यंत हा ग्लायकोजेनचा साठा टिकतो.

समजा, आता एखाद्याने त्याहीपुढे उपोषण करायचे ठरवले तर काय होते ते पाहू. आपण वर पाहिले आहे की लालपेशी आणि मेंदू यांना सतत ग्लुकोज लागतेच.त्यामुळे आता ती पातळी टिकवण्यासाठी एक नवीन प्रक्रिया यकृतात होते. तिला ‘नव-ग्लुकोज निर्मिती’ असे म्हणतात. ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये शरीरातील प्रथिने आणि मेद यांच्या विघटनातून ग्लुकोज तयार होतो आणि मग रक्तात सोडला जातो. किंबहुना या अनोख्या क्रियेमुळेच माणूस( मर्यादित काळाचे) उपोषण करूनही जिवंत राहतो. या प्रक्रियेस गती देण्याचे काम
ग्लुकॅगॉन व एपिनेफ्रीन ही हॉर्मोन्स करतात.

रक्तातील ग्लुकोजची योग्य पातळी
आपले खाणे आणि ही पातळी यांचा थेट संबंध आहे. सकाळी उपाशी पोटी ही सर्वात कमी असते( ७० – १०० mg/dL ). जेवणानंतर ती वाढू लागते आणि एक तासाने ती सर्वोच्च असते. दरम्यान जे वाढीव इन्सुलिन स्त्रवलेले असते त्याच्या प्रभावाने ती पुढील तासाभरात बऱ्यापैकी खाली येते. निरोगी अवस्थेत जेवणानंतर दोन तासाने ती १४० mg /dL चे आत असते. ज्या लोकांचा जेवणानंतरचा ‘इन्सुलिन-प्रतिसाद’ अत्युत्तम असतो, त्यांचे बाबतीत तर ती उपाशी-पातळी इतकी खाली येते.
आपण आहारातील कर्बोदकांचे प्रमाण जेवढे वाढवू त्याच प्रमाणात स्वादुपिंड अधिक इन्सुलिन सोडते. ग्लुकोजची पातळी खाण्यानंतर बेफाम वाढू नये यासाठीच इन्सुलिनचा लगाम आपल्याला निसर्गाने दिला आहे. इन्सुलिन आणि इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वयाने संपूर्ण २४ तासांत ग्लुकोज-पातळी नियंत्रित राहते.

बिघडलेल्या ग्लुकोज-पातळीचे परिणाम

जेव्हा ग्लुकोज, इन्सुलिन आणि त्याविरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वय बिघडतो तेव्हा अर्थातच ग्लुकोजची रक्तपातळी जास्त वा कमी होते. या दोन स्थिती अशा:
१. ग्लुकोज अधिक्य(hyperglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) इन्सुलिनची कमतरता
आ) इन्सुलिनचा पेशींवर प्रभाव न पडणे (resistance)
इ) इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्सचे अधिक्य
यापैकी (अ) आणि (आ) मिळून जो आजार होतो तोच ‘मधुमेह’. मधुमेह हे अवाढव्य प्रकरण असून तो एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्याबद्दल लिहिणे हा या लेखाचा उद्देश नाही.

मधुमेह या ‘कादंबरी’चा ग्लुकोज हा नायक तर इन्सुलिन ही नायिका आहे! निरोगी अवस्थेत या दोघांचा कसा सुंदर मिलाफ होतो ते आपण पाहिले आहे. किंबहुना ही पूर्वपीठीका समजून घेणे हे मधुमेहाबद्दल वाचण्यापूर्वी आवश्यक आहे. इन्सुलिनच्या कार्याअभावी गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात साठून राहतो कारण तो पेशींमध्ये शिरू शकत नाही. मग हा साठून राहिलेला ग्लुकोज ‘बिनकामाचा’ ठरतो आणि तो कटकटीही निर्माण करतो.

२. ग्लुकोज-कमतरता (hypoglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) जे मधुमेही इन्सुलिनचे उपचार घेत असतात त्यांच्यात कधीकधी त्याचा ‘ओव्हरडोस’ होतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज जास्त प्रमाणात पेशींत शिरते आणि त्याची रक्तपातळी नको इतकी कमी होते.
आ) अतिरिक्त मद्यपान : जर एका बैठकीत फाजील मद्यपान केले आणि त्यानंतर अन्न खायची शुद्धी राहिली नाही तर हा बाका प्रसंग ओढवतो. अल्कोहोलच्या प्रभावाने पेशींमधील नव-ग्लुकोजनिर्मितीस मोठा अडथळा होतो.

जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होत होत ४० mg/dL इतकी उतरते तेव्हा रुग्णात लक्षणे (चक्कर, आकलन न होणे) दिसू लागतात. याहीपुढे जर पातळी २० mg/dL चे खाली उतरली तर मात्र रुग्ण बेशुद्ध पडतो. ही स्थिती धोकादायक असते आणि तेव्हा रुग्णास तातडीने ग्लुकोज पुरवावे लागते.

.....तर असे हे ग्लुकोज – आपले महत्वाचे इंधन. आपल्याला क्षणोक्षणी लागणारे. तसेच आपल्या पेशींचा रासायनिक मूलाधार. मात्र त्याची रक्तपातळी योग्य प्रमाणातच हवी. ती फार जास्त झाल्यास कटकटीची तर फार कमी झाल्यास धोकादायक ठरणार. आपणा सर्वांची ती कायम आटोक्यात राहो या सदिच्छेसह लेख संपवतो.
**************************************************************************************************
टीप: आरोग्य लेखमालेतील या १०व्या लेखाबरोबरच ही माला आता थांबवत आहे. यादरम्यान वाचकांनी जे अजून काही विषय सुचवले आहेत त्यावर आता चिंतन व मनन करेन. कालांतराने त्यावर स्वतंत्र लेख लिहीता येतील. आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनापासून आभार!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माननीय डॉ. शिंदे
आपण आस्थेने दिलेल्या अभिप्रायाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभारी आहे.

तुम्ही दाखविलेली साम्यचित्रे सुंदर आहेत. आता शांतपणे बघतो
धन्यवाद !

>>>दर १० व्यक्तींमागे १ व्यक्ती मधुमेही आहे.>>> हे चिन्ताजनक आहे.
शिंदे सरांशी सहमत.
सरांनी दिलेली चित्रे छान आहेत . पण त्यातील PS, DG हे काय ते नाही समजले

भविष्यकाळात या आजारात जागतिक वाढ होणार असून ती प्रामुख्याने आफ्रिका, जागतिक मध्यपूर्व आणि दक्षिणपूर्व आशियात होणार आहे

>> या ठराविक भागात प्रामुख्याने होण्याचे कारण काय असावे?

साद,
DG, PS >>>
ते मलाही जाणून घ्यायचे आहे. संबंधित तंत्रज्ञाने सांगितल्यास बरे होईल.
....
मानव
तुमच्या प्रश्नाचे उत्तर बरेच गुंतागुंतीचे आहे. जरा वेळाने स्वतंत्र परिच्छेद लिहितो

मानव,
आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न घेतो. एकंदरीत मधुमेहाचे प्रमाण सर्व जगातच वाढते राहणार आहे. तरीसुद्धा वर उल्लेख केलेल्या ठिकाणी ते अधिकतर असणार आहे. याची कारणे गुंतागुंतीची आहेत. कुठलेही. एक कारण पुरेसे स्पष्टीकरण देऊ शकत नाही.

यातील काही महत्त्वाचे मुद्दे असे :
१. आशियाई व आफ्रिकी वंशात मधुमेह (प्रकार 2) होण्याचे गुणधर्म अधिक आहेत.
२. अतिकर्बोदक आहारशैली व नियमित व्यायामाचा अभाव, इत्यादी

३. लठ्ठपणा : इथे एक तुलना रोचक आहे. आपण एक युरोपीय व एक आशियाई व्यक्तीची तुलना करू. जसे या दोघांचे शरीराचे वजन प्रमाणाबाहेर वाढू लागते तसा मधुमेह होण्याचा धोका वाढतो. पण दोघांमध्ये तुलना करता, आशियाई व्यक्तीमध्ये हा धोका वाढीव वजनाच्या लवकरच्या टप्प्यातच सुरू होतो (lower levels of overweight). तोच धोका युरोपियच्या बाबतीत काहीशा उशिराने लागू होतो.

४. आर्थिक व सामाजिक मुद्दे : समाजातील गरिबी-श्रीमंती मधील दरी खूप मोठी असणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांचा अभाव, तपासण्यांची उपलब्धता , शैक्षणिक मागासलेपण, आहारविषयक अंधश्रद्धा, इत्यादी.

>>>>, आशियाई व्यक्तीमध्ये हा धोका वाढीव वजनाच्या लवकरच्या टप्प्यातच सुरू होतो (lower levels of overweight). >>>
महत्वाची माहिती.
धन्यवाद !

काल एका व्हिडिओ मध्ये Kraft test विषयी माहिती मिळाली. या चाचणीने तुम्ही pre-diabetic आहात का हे तपासता येते. मी या चाचणीबद्दल पहिल्यांदा ऐकलं. ही चाचणी कितपत ग्राह्य धरली जाते?
व्हिडिओची लिंक

जिज्ञासा
दुव्यामध्ये दिलेली चाचणी हा गेल्या पाच वर्षातील बऱ्यापैकी चर्चेचा विषय आहे.
त्याची उपयुक्तता आणि मर्यादा यावर बऱ्याच काथ्याकूट होत आहे.
जरा सवडीने त्यासंबंधी लिहितो

जिज्ञासा,

Kraft चाचणी >>
• या चाचणीत ग्लुकोज-रक्तपातळीच्या जोडीने इन्सुलिनची पातळीही मोजली जाते.
• मुळातील या चाचणीत काही त्रुटी होत्या. नंतर अन्य वैज्ञानिकांनी त्यात सुधारणा केल्या.

• परंतु प्रयोगशाळेत ग्लुकोजची मोजणी जेवढी सरळ आणि सोपी आहे तेवढी इन्शुलिनची नाही. इन्शुलिनच्या मोजणीमध्ये रुग्णाचे वय, प्रयोगशाळा पद्धती आणि वांशिक भेद हे घटक बऱ्यापैकी प्रभाव पाडतात.

• या चाचणीचे abnormal निष्कर्ष आणि मधुमेहाची भावी शक्यता हा मुद्दा अद्याप पुरेसा सिद्ध झालेला नाही
• तूर्त या चाचण्या संशोधन अवस्थेत आहेत असे म्हणता येईल

इतक्या सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद कुमार सर! मला हीच शंका होती की इन्सुलिन मोजणे आणि त्याचे insulin resistance शी correlation ठरवणे कसे करत असतील. अर्थात तत्वतः रक्तातली इन्सुलिनची पातळी आणि इन्सुलिन रेझिस्टन्सची सुरूवात याचा परस्परसंबंध असू शकतो हे पटते आहे. येत्या काळात ही चाचणी अधिक अधिक निर्दोष आणि standardize झाली तर तिची उपयुक्तता वाढेल असे वाटते.

मधुमेह (प्रकार1) असलेल्या रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन उपचार घेत राहावे लागतात. अशा दीर्घकालीन इंजेक्शन्स पासून सुटका होण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन केली काही वर्षे चालू आहे. त्यातील अलीकडे चालू असलेले संशोधन म्हणजे मूळ पेशींचा वापर.

यामध्ये शरीरात त्वचेखाली विशिष्ट मूळ पेशी रोपित केल्या जातात. शरीरात पुढे त्यांचे रूपांतर स्वादुपिंडाच्या विशिष्ट बी पेशींमध्ये होते आणि मग ह्या नव्या पेशी इन्शुलिन निर्मिती करू लागतात. सध्या या अभ्यासाचे दुसऱ्या टप्प्यातील प्रयोग चालू आहेत.

तूर्त अशा रुग्णांना हे उपचार केल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती दाबणारी काही औषधे द्यावी लागतात. हा तोटा आहे. परंतु भविष्यात यावरही मात करायचा विचार चालू आहे.
त्यासाठी अशा मूळ पेशींची निर्मिती केली जाईल की, ज्या रोपित केल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे द्यावी लागणार नाहीत.

येत्या काही वर्षात हे संशोधन यशस्वी होऊ शकेल.

असे सरसकट नाही म्हणता येणार. इन्सुलिन सुरू केल्यानंतर संबंधित रुग्णासाठी डोस योग्य होईपर्यंत ग्लूकोज पातळी एकदम खाली जाण्याचा धोका संभवतो, कारण हे तसे ताकदवान औषध आहे.
गोळ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यानुसार व डोसनुसार दुष्परिणाम होता. मुळात मधुमेहाचा प्रकार, आजाराची तीव्रता हे सगळे लक्षात घेऊन इन्सुलिन की गोळ्या हा निर्णय घ्यावा लागतो.

कुमारजी, आपल्या लेखनाने फार माहिती व तीही साध्या भाषेत कळली.
मी ही मधुमेहाचा नवीन शिकार आहे. गेले सहा महिने रक्तातील साखर १४५/२४० पर्यंत गेली. प्रथम गोड खाणे बटाटे, भात फळे वर्ज्य केले, पोळ्या ही कमी केल्या. तरीही कमी होत नव्हते. मग मी डिसेंबरच्या १३ तारखेपासून कामावर सायकलने जाणे येणे (६ किमी प्रत्येकी व एक फ्लाय ओव्हर ओलांडून), कामावर रोज ७-८ किमी चालणे, जेवण दोनवेळा तीन पोळ्या व पालाभाजी, साधे वरण. सकाळसायंकाळ ३०० मिली दूध २ चमचे नाचणीसत्वासह,व शुद्ध गाईच्या तुपासह, सायंकाळी भुक लागते म्हणून मोड आलेली कच्ची मटकी ५० ग्राम घेतोय. १ जानेवारीला रक्ताची साखरपातळी १०६/१२१ आलीय. वय ५९, ५'४",६५ किग्रा.
माझे प्रश्न : १) गाय का घी (४-५ चमचे)/ मोड आलेली मटकी घातक आहे का?
२) घी सेवनामुळे मी सायकल वापरताना होणार्या सांध्यांच्या हालचालींना वंगण मिळेल काय? तूप, तेल यांचा माणसाला काय फायदा होतो व कुठल्या अवयवात?
नाचणीसत्व व दूध बंद करून बघितले चार दिवस(दिक्षीत डाएट) पण सायकलींगमध्ये थकवा आल्याने सुरू केलेय.

बापू,
१.मोड आलेली मटकी घातक नाही. पौष्टिक आहे.
आहारातील 30 ते 40 टक्के भाग हा कच्चा स्वरूपातील असावा. थोड्या प्रमाणात मोड आलेली कडधान्य कच्ची खायलाही हरकत नाही.

२. माफक प्रमाणात तेल व तूप हे शरीरासाठी आवश्यक आहेत. दोन्हीमधून आपल्याला वेगळ्या प्रकारची मेदाम्ले मिळतात. तसेच काही जीवनसत्त्वांचा स्त्रोत म्हणूनही मेद खाणे आवश्यक.

३. तुपाचे प्रमाण हे संबंधित मधुमेही व्यक्तीने आपापल्या आहारतज्ञांशी चर्चा करून ठरवावे हे उत्तम.
४. व्यवस्थित तूप खाल्ल्याने सांध्यांना वंगण मिळते हा पारंपरिक आरोग्यशास्त्रातील विचार आहे. मला त्याचे स्पष्टीकरण माहित नाही. संबंधित तज्ञाने सांगितल्यास बरे होईल.

छान.
>>>आहारातील 30 ते 40 टक्के भाग हा कच्चा स्वरूपातील असावा>>> हे अमच्या घरी पाळले जाते.

मधुमेही रुग्णांसाठी रक्तातील ग्लुकोजची तपासणी वारंवार करावी लागते. त्यासाठी बोटाला सुई टोचण्याचा अप्रिय उद्योग करावा लागतो. यापासून सुटका करण्यासाठी विविध प्रकाचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे.

नुकतेच एका कॅनेडियन उद्योगाने एक नवे उपकरण बनवले आहे ज्यात रुग्णाच्या बोटाला सुई टोचण्याचा प्रकार नाही. रुग्णाने फक्त उपकरणाच्या भागावर एक मिनिट बोट ठेवायचे आहे. या उपकरणात ईसीजी तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला नवप्रज्ञेची जोड दिलेली आहे.

या उपकरणाचे प्रारूप नुकतेच एका परिषदेत सादर झाले. यथावकाश ते औषध प्रशासनाच्या मान्यतेसाठी दाखल होईल.
https://www.businessinsider.com/device-measures-blood-glucose-by-touch-c...

रक्तातील ग्लूकोज पातळी जाणून घेण्यासाठी आता सुई थेट रक्तवाहिनीत जाण्याची गरज नाही. यासंदर्भात नुकतेच जाहीर झालेले कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन इथे आहे :

https://scitechdaily.com/compact-wearable-lab-on-the-skin-continuously-m...

यामध्ये काही सूक्ष्म सुया एका पापुद्र्यावर लावतात आणि तो एका छोट्याशा इ- डबीत ठेवून ती डबी दंडावर सतत लावून ठेवता येते. सूक्ष्म सुयांच्या मदतीने त्वचेखालील पेशीद्रवामध्ये ठराविक रसायनाची पातळी मोजता येते. सध्या या उपकरणात त्यांनी ग्लूकोज, अल्कोहोल आणि लॅक्टेट या तिघांची पातळी सतत समजत राहील अशी योजना केली आहे.

त्यासाठी या छोट्या उपकरणाला मोबाईलमधील ॲपची जोड द्यावी लागते. आता हे तीन घटक एकत्र का, असा प्रश्न पडेल. ज्या मधुमेहींना बऱ्यापैकी मद्यपानाचे व्यसन असते, त्यांच्यात ग्लूकोज पातळी एकदम कमी होण्याचा धोका असतो. त्यानंतर जे काही बदल शरीरात होतात त्यात लॅक्टेट हा नकोसा घटकही वाढतो. या तिन्ही पातळ्या एकत्रित समजल्याने अशा रुग्णांना मद्यपान नियंत्रणात ठेवता येईल.

अगदी बरोबर! परवाच माझ्या एका मैत्रीणीच्या दंडावर हे लावलेले बघितले कारण सध्या तिचा ए वन सी खूप वाढला आहे.

अंजली
अरे वा ! काय पण योगायोग.
त्या छोट्या उपकरणाला त्यांनी त्वचेवर लावलेली प्रयोगशाळा असे म्हटले आहे !

मधुमेह उपचारांची नवी दिशा
या आजारावर साध्या गोळीपासून ते इन्शुलिनच्या विविध पंपांपर्यंत अनेक प्रकारचे उपचार सध्या उपलब्ध आहेत. तरीदेखील सर्व रुग्णांना समाधानकारक वाटेल अशा उपचारांची गरज कायम आहे.

अलीकडे संशोधकांनी अल्ट्रासोनिक लहरींचा शरीरावर ठराविक भागात मारा करून काही प्रयोग केले आहेत. यामध्ये पोटावरील यकृताचा भोवतालच्या भागामध्ये ठराविक प्रकारच्या लहरींचा बाहेरून मारा केला जातो. त्यातून ग्लुकोजचा चयापचय आणि इन्शुलिनचे कार्य सुधारते असे प्राण्यांमध्ये दिसून आले आहे.
नुकताच एक प्रयोग मानवी स्वयंसेवकांरही करण्यात आलेला आहे त्याचे निष्कर्ष अद्याप प्रसिद्ध व्हायचे आहेत.

https://clinicaltrials.gov/ct2/show/NCT04502212

अत्यंत चुकीची माहिती इथे दिली आहे :
तुमच्या वयानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण किती असायला हवे? पाहा ‘हा’ तक्ता

https://www.loksatta.com/lifestyle/what-should-be-your-blood-sugar-level...

वय वर्षे 2 ते 60 वर्षापर्यंत रिकाम्या पोटी ग्लुकोजचा टप्पा ७० -१०० mg/dL असा असतो.

.... कुठून कॉपी करतात असले तक्ते कुणास ठाऊक ?

ओह रिकाम्या पोटी १८० ओके दिलंय त्यात तरुण वयापर्यंत!
आणि ते रात्रीच्या जवेणानंतरच्या ग्लुकोज बद्दल काय?
असा नविन विदा तयार होतो आहे का?.
ती मोजायला सांगितल्याचे पाहिले/ऐकले नाही कधी.

**असा नविन विदा तयार होतो आहे का?.
>>
नाही त्याची काही गरज नाही
त्याचा निदानासाठी काही वेगळा उपयोग नसतो.
त्यांच्या तक्त्यामध्ये काही वाटेल ते लिहिले आहे.

माझ्या घरच्यांना तर असे विनोदी डॉक्टर भेटलेत की सगळं खा अगदी मिठाई सुद्धा. १४० साखर (रिकाम्या पोटी नॉरमल आहे.

अगदी वरच्या लिंक मधील लिहिलेल्या चुकीच्या माहितीतलाच तो डॉक्टर असावा जो माझ्या घरच्यांना भेटलेला.

आणि ह्याच कारणाने, मी साबा, आई आणि साबु ह्यांच्याशी भांडत बसायचे. कोण हा डॉक्टर की तुम्ही ३ -४ मधुमेहाच्या गोळ्या खावून १४० रिकाम्या पोटीची साखर ठिक आहे सांगतात?
आणि, साबु रोज काहीतरी गोड खायला मागायचे .. आणि मी उगीच कजाग सून गटात Proud
बरं हि पिढी, डॉक्टर म्हणेल तेच खरं अश्या गटातील. मी म्हणत नाही, माझं एका पण एखादी माहिती चुकीची आहे हे त्यांना आमच्यासारख्यांकडून एकायचेच नसते , मग भले योग्य संशोधन दाखवा तरीही.

झंपी+१
चुकीची माहिती आणि गैरसमज प्रश्न पसरवणाऱ्या लोकांमुळे समाजाचे नुकसान होते.
…..

रिकाम्या पोटीची ग्लुकोज पातळी आणि नॉर्मल पासून बिघाड/आजाराचे विविध टप्पे असे आहेत :

१) ७० ते १०० mg: निरोगी अवस्था

२) १०१ ते १२५. : ग्लुकोजचा बिघडलेला (impaired) चयापचय

३) १२६ पेक्षा अधिक : मधुमेह

Aic टेस्ट,जेवण अगोदर,नंतर सुगर टेस्ट ह्या मधुमेह च्या टेस्ट च एकमेक विरुद्ध रिझल्ट देतात.
सायन्स च स्वतः गोंधळेकर आहे.
मधुमेह ची कन्फर्म टेस्ट कोणती आहे.
हा माझा प्रश्न आहे

बीपी विषयी पण हीच अवस्था आहे योग्य बीपी अनेक डॉक्टर ना घेताच येत नाही.किंवा ते योग्य पद्धत बीपी मोजताना वापरत नाहीत .
असा अभ्यास आहे.
बीपी मोजणार ह्या भीती नीच काही लोकांचा बीपी वाढतो.
आणि चुकीचे निष्कर्ष निघतात
त्या वर काही च उपाय नाही

मधुमेहाच्या पहिल्या प्रकारासंदर्भात (T 1) काही महत्त्वाची माहिती प्रकाशित झालेली आहे. सुमारे 201 देशातील अशा रुग्णांचा अभ्यास करून एक महाविदा तयार केलेला आहे :
https://www.t1dindex.org/

या आजाराची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातली वाटचाल अशी असणार आहे:

१. या आजाराची सुरुवात लहान वयात होते असे आता राहिलेले नाही. या आजाराने.बाधित रुग्णांचे जागतिक सरासरीचे (median) वय 37 झाले आहे.
२. सध्या या आजारामुळे बाधित असलेल्या सुमारे ८४ लाख रुग्णांपैकी सुमारे वीस टक्के रुग्णांचा मृत्यू वयाच्या 25 वर्षांच्या आत होतो. आजाराचे वेळीच निदान न होण्यामुळे ही परिस्थिती उद्भवते.

३. सन २०४० पर्यंत एकूण रुग्णांची जागतिक संख्या दुप्पट होण्याचा अंदाज आहे. ही वाढ मुख्यत्वे गरीब देशांमध्ये होईल.

Pages