मराठी भाषा गौरव दिन- लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया- वावे- चित्रपट वास्तुपुरुष

Submitted by वावे on 25 February, 2023 - 13:26

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीने जे अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले, त्यांपैकी एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट म्हणजे ’वास्तुपुरुष’. यातले प्रमुख कलाकार आहेत उत्तरा बावकर, सदाशिव अमरापूरकर, अतुल कुलकर्णी, रविंद्र मंकणी, रेणुका दफ्तरदार आणि सिद्धार्थ दफ्तरदार.

डॉ. भास्कर नारायण देशपांडे (महेश एलकुंचवार) यांना ’प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन’ या क्षेत्रात त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीत केलेल्या कामासाठी मॅगसेसे पुरस्कार जाहीर होतो, या बिंदूवर हा चित्रपट सुरू होतो आणि मग डॉ. भास्कर देशपांड्यांच्या स्मृतींमधून या चित्रपटाची कथा उलगडत जाते.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदगाव या लहान गावातलं देशपांडे हे परंपरागत इनामदार घराणं. चित्रपटाचं मुख्य कथानक हे भास्कर इंटर सायन्सला असतानाच्या वर्षातलं आहे. (या वयातलं भास्करचं काम सिद्धार्थ दफ्तरदारने केलं आहे.) पन्नासचं दशक संपतानाचा काळ. भास्करचे वडील अण्णा (सदाशिव अमरापूरकर), हे स्वातंत्र्यसैनिक. स्वातंत्र्यचळवळीमध्ये भाग घेऊन तुरुंगवास भोगलेले. कट्टर गांधीवादी. भास्करचा मोठा भाऊ निशिकांत (अतुल कुलकर्णी), काका माधव (रवींद्र मंकणी), बाईआजी (रेखा कामत), भास्करचा मित्र सोपान, नात्याची नसलेली पण जवळची अशी कृष्णाताई (रेणुका दफ्तरदार), घरातला गडी गोटूराम आणि भास्करची आई सरस्वती (उत्तरा बावकर) ही या कथेतली प्रमुख पात्रं. ही कथा भास्करची असली तरी या कथेची खरी नायिका आहे त्याची आई, भास्करने डॉक्टर व्हावं या एकमेव इच्छेचा ध्यास घेतलेली. भास्कर डॉक्टर होऊ शकतो तो केवळ त्याच्या आईच्या जिद्दीमुळे.

या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा एकरंगी, एकमितीय नाहीत. अण्णा स्वातंत्र्यसैनिक, पण स्वतंत्र भारतात त्यांना स्वतःचं स्थान सापडलेलंच नाही. ज्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी जिवाचं रान केलं होतं, ते स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचं नेमकं काय करायचं हेच बर्‍याच जणांना उमगलेलं नसण्याचा हा काळ आहे. स्वतंत्र भारताच्या आदर्श, काहीशा भाबड्या कल्पना विरून जाण्याचा हा काळ. काहीजणांनी स्वातंत्र्यसैनिक असण्याचे (गैर)फायदे स्वतंत्र भारतात उपटले. भास्करच्या वडिलांसारख्या सरळमार्गी माणसांना हे पटलं नाही आणि जमलं नाही. सुनीता देशपांड्यांनी ’आहे मनोहर तरी’ मध्ये ’ स्वातंत्र्य मिळालं आणि चिंध्या होऊन ते फाटूनही गेलं... स्वातंत्र्यसैनिक म्हणून काही जणांनी या काळात जे फायदे मिळवले, त्याची आठवण झाली तरी मला मळमळतं.’ अशा शब्दात या काळाचं वर्णन केलं आहे.
वास्तुपुरुष चित्रपटातले अण्णा आदर्शवादी, सरळमार्गी, सुस्वभावी. पण गांधीवादी असले, जातपात मानत नसले, तरी घरात परजातीची सून करून आणण्याचं धैर्य न दाखवू शकलेले, परंपरा, चालीरीतींमधून बाहेर येऊ न शकलेले. कूळकायद्यात जमिनी गेल्या असल्या, उत्पन्न रोडावलं असलं, तरी स्वतःच्या बुद्धीने, कष्टाने पैसे कमवायची तयारी नसलेले. अलिप्त. आपल्या मुलाच्या बुद्धीचं, कष्टाचं चीज व्हावं, यासाठी स्वतःहून काही करण्याची इच्छा नसलेले.
भास्करचा काका माधव हा विधुर. स्वभावाने चांगला, पण थोडा रंगेल, वाड्यात गुप्तधनाचा हंडा सापडेल यावर विश्वास ठेवणारा, मोठमोठ्या बाता करणारा.
निशिकांत (भास्करचा मोठा भाऊ) मुळात हरहुन्नरी, कविमनाचा, हळवा. पण आयुष्यातला आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसलेला, नेभळट, भित्रा बनलेला, काकाबरोबर सतत राहणारा, कदाचित वडिलांबरोबर सूर न जुळू शकल्यामुळे.
कृष्णा ही निशिकांतची प्रेयसी. पण निशिकांतशी लग्न न होऊ शकल्यामुळे कठीण काळातून गेलेली. तिचं आता लग्न झालं आहे, पण संसार सुखाचा नाहीच. नर्स म्हणून ती पुन्हा गावात येते आणि देशपांडे कुटुंबाशी, विशेषतः भास्करशी तिचा परत ऋणानुबंध जुळतो.
देशपांड्यांच्या घरातली बाईआजी ही त्यांच्या सख्ख्या नात्यातली नसली, तरी सख्खी असल्यासारखीच, या घरासाठी कष्ट उपसलेली. म्हातारपणामुळे भ्रम होत असला, तरी प्रसंगी शहाणपणाचे आणि अनुभवाचे चार शब्द सांगणारी.
भास्करची आई ही तसं पहायला गेलं तर त्या काळातली सर्वसामान्य गृहिणी. नवरा, धाकटा दीर, मुलं यांचं मायेने करणारी, आजारी सासूची काळजी घेणारी. पुरुषप्रधान संस्कृतीतले, पारंपरिक घरातले सणवार, कुळाचार, सोवळं-ओवळं, सगळं पाळणारी. पण आतून मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारी. इनामदारीच्या पोकळ कल्पनांमधून बाहेर पडून, हातपाय हलवून माणसाने स्वतः कष्ट करावेत या मताची. भास्करने तरी डॉक्टर होऊन या भोवर्‍यातून बाहेर पडावं , यासाठी जिवाचं रान करणारी. रीतिरिवाजांचं अटळ जोखड खांद्यांवर वागवणारी, पण मुलाच्या शिक्षणासाठी प्रसंगी सर्व शक्तीनिशी ते जोखड भिरकावून देण्याची तयारी मनात बाळगणारी. आपल्या पूर्वजांनी गरिबांवर अन्याय करून पैसा कमावला, आता आपल्या मुलाने डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करावी, तरच आपल्या वास्तुपुरुषाची शांत होईल, असा ठाम विश्वास असणारी.

भास्करच्या आईच्या व्यक्तिरेखेकडे बघताना मला कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांनी रंगवलेल्या दोन व्यक्तिरेखा आठवतात. ’तुंबाडचे खोत’मधली गोदावरी आणि ’रथचक्र’ कादंबरीची नायिका. ’रथचक्र’च्या नायिकेला नावच नाही. ती तशी सामान्यच स्त्री आहे, सामान्य स्त्रीचे गुणावगुण तिच्यात आहेतच. पण तिच्यातलं असामान्यत्व हे, की एकत्र कुटुंबातल्या गुंतागुंतीतून बाहेर पडून आपल्या मुलाने शिकावं, यासाठी ती कितीही खस्ता खायला, घरच्यांचा, समाजाचा विरोध पत्करायला, मुलाशी कठोरपणे वागायलाही तयार होते आणि शेवटपर्यंत आपल्या उद्दिष्टापासून ढळत नाही . ’तुंबाडचे खोत’मधली गोदावरी रूपागुणांनी असामान्य. पण तिच्या रूपाला आणि गुणांनाही मागे टाकते ती तिची अदम्य जिद्द. प्रचंड प्रतिकूल परिस्थिती अंगावर कोसळलेली असताना स्वतःच्या बुद्धिमान मुलाला या खाईतून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण, हे ती जाणते आणि त्यासाठी एकटीच्या बळावर धोकादायक निर्णय घेऊन ते यशस्वी करून दाखवते. ’एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते’ हे वाक्य प्रसिद्ध आहे. त्यात थोडा बदल करून म्हणायचं तर ’ एका स्त्रीला शिक्षणाचं महत्त्व कळलं तरी ती कुटुंबाचं भविष्य बदलून दाखवते’ असं म्हणायला हवं.

चित्रपटाचं कथानक भास्करच्या इंटरच्या वर्षाबरोबर पुढे सरकत जातं. अभ्यास, मेडिकलला प्रवेश मिळवण्याची घरच्यांची अपेक्षा, फीच्या पैशांची होत नसलेली सोय, त्यावरून घरात होणारे वादविवाद, निर्माण होणारे तणाव या ओझ्याने भास्कर गंभीर, अबोल झालेला आहे. निखळ आनंदाचे क्षण त्याला फारसे मिळतच नाहीत, कृष्णाताईबरोबरचा वेळ सोडल्यास. शेवटी शेवटी अशा काही अकल्पित घटना घडतात की कॉलेजसाठी म्हणून भास्कर जो घराबाहेर पडतो, तो थेट चाळीस वर्षांनी मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यावर परत येतो.
चित्रपटातले संवाद, पात्रांच्या तोंडची भाषा, कलाकारांची देहबोली, वाडा आणि गावाचं चित्रण अतिशय सुरेख आहे. भास्करच्या लहानपणचा वाडा आणि चाळीस वर्षांनंतरचा पडझड झालेला वाडा यांचं चित्रण अगदी खरं वाटतं.
काही ’अनफोर्स्ड एरर्स’ मात्र आहेत, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. पन्नासच्या दशकातली म्हणून दाखवलेली एसटीची बस नवीन काळातली दिसते, अगदी एम एच १२ नंबरप्लेटसह! हे खूपच खटकतं. दुसरं म्हणजे एक शेतकरी भास्करच्या आईला चौथाई म्हणून पाचशे रुपये काढून देतो. त्या काळाच्या मानाने पाचशे रुपये बरेच जास्त झाले, ते असे काढून देणं पटत नाही. ग्रामपंचायतीच्या इमारतीवर एका घोषणेत १९९९ असं वर्ष लिहिलेलं स्पष्ट दिसतं, त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीवर पोलिओ लसीकरणाच्या घोषणा लिहिलेल्या दिसतात. पन्नासच्या दशकात हेही नसलं पाहिजे. या चुका टाळता येण्यासारख्या आहेत असं मला वाटतं. शिवाय, बाकी इतका खणखणीत असलेला चित्रपट पाहताना त्या जास्तच खटकतात!

उत्तरा बावकरांनी भास्करची आई अक्षरशः जिवंत उभी केली आहे. सदाशिव अमरापूरकर, अतुल कुलकर्णी, रवींद्र मंकणी, सगळ्यांचेच अभिनय उत्कृष्ट आहेत. संवाद, पार्श्वसंगीत, विशेषतः पार्श्वभूमीवर ऐकू येणारं ध्रुपदगायन तर फारच परिणामकारक आहे. एकंदरीतच हा चित्रपट पाहणं हा एक दीर्घकाळ लक्षात राहणारा अनुभव आहे.

(हा चित्रपट ओटीटीवर जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमा पाहीन की नाही ते माहीत नाही. पण परीक्षण एकदम छान केले आहे. विशेषतः व्यक्तीरेखांचे वर्णन. एकंदरच मेहनत घेउन लेख लिहीलेला आहे.

छान लिहिलेय. माझ्याही अतिशय लक्षात राहिलेला सिनेमा. उत्तरा बावकर चे काम सर्वात अप्रतिम आहे. मुलाच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेली सामान्य गरीब आई . एकेकाळचं श्रीमंत इनामदार घराणं आता लयाला जाऊन नुसते पोकळ वासे उरलेले असले तिची पूर्वीचीच खानदानी देहबोली तिने इतकी पर्फेक्ट दाखवली आहे की बस. तिची भाषा, घरात लहान सहान कामं करताना दिसते तेव्हा त्यातली सफाई, सगळेच अस्सल एकदम.
शेवटी सगळे मार्ग संपतात तेव्हा अंगावरचे शेवटचे गुंजभर सोने, मंगळसूत्र विकते आणि मुलाची पुण्याला जायची सोय करते, त्याला स्टँड वर सोडायला आलेली असताना तिथेच कोणीतरी येऊन सांगते की वाड्याला आग लागली आहे. होते नव्हते तेही सगळे संपले. भास्कर ची चलबिचल होतेय हे बघताच निग्रहाने ती त्याला बजावते "आता मागे वळून बघायचं नाही. इकडे जे होईल ते होईल. तू डॉक्टर झाल्याशिवाय गावात परत यायचं नाही!" तिच्या कॅरेक्टर चा, त्या सिनेमाचाच हायलाइट आहे तो सीन!

सुरेख लिहिलंयस.
‘तुंबाडचे खोत’ आणि ‘रथचक्र’ची सांगडही नेमकी! Happy

अरे वा! वावे, सुरेखच लिहिलंयस, अगदी सविस्तर आणि बारीकसारीक तपशीलवार वर्णन लिहिले आहेस. मी चित्रपट पाहिलेला नाहीय, तरीही त्यातल्या पात्रांची, त्यांच्या स्वभावाची किंवा एकंदरीतच परिस्थिती समजतेय कशी दाखवली असेल..!

चित्रपटातील चुका किंवा अनावधानाने लपवायच्या किंवा बदलायच्या राहिलेल्या गोष्टी बघायला/ शोधायला मलाही आवडतात.. हाहा!! तुला बऱ्याच गोष्टी सापडल्यात की यात!
मस्त परीक्षण , आवडलं! आता चित्रपट बघायला केव्हा मुहूर्त मिळतोय बघते..! Happy

छान परीक्षण....
चित्रपट पाहिला नाही पण आता पाहतो....

छान लिहिले आहे. कुटुंबातील एकूण एक व्यक्तीरेखा डोळ्यासमोर आल्या.
मैत्रेयी यांच्या प्रतिसादातील सीन वाचून हा कुठेतरी पाहिलाय असे वाटले. चेक करायला हवे.

वावे, वाचून म्हणावंसं वाटलं की तुझ्यामधील हीही कला उपक्रमानिमित्ताने समजली. किती बारकाईने लिहिलंयस. विशेषतः मिती वगैरे वाचल्यावर क्षणभर वाटलं की एखाद्या व्यावसायिक समीक्षकाने लिहिलेलं वाचतेय. उत्तरा बावकर माझी जशी आवडती अभिनेत्री तशीच खोताघरची गोदावरीही.

रेणुका आणि देविका दफतरदार या बहिणी रूढार्थाने सुंदर नसल्या तरी दोघींच्या व्यक्तिमत्वात समोरचा गुंतून जाईल असं नक्कीच काहीतरी आहे....

धन्यवाद सर्वांना!
हे रसग्रहण आहे! Happy गेल्या पंधरावीस वर्षांत चार ते पाच वेळा हा चित्रपट बघितल्यावर मनात आलेल्या या गोष्टी आहेत.

सुंदर रसग्रहण केले आहे, वावे. हा माझाही खुप आवडता चित्रपट आहे. तुंबाड मधली धनाची हाव आणि वास्तुपुरुष मध्ये रविंद्र मंकणी आणि अतुल कुलकर्णीची (characters ची नावे आठवत नाहीत.) गुप्तधनाची हाव एकाच जातकुळीतील आहे. फार अस्सल मातीतील चित्रपट आहे.

धन्यवाद मॅगी, नताशा आणि एमराल्ड.
एमराल्ड, तुंबाडसारखी धनाची हाव नाही मला तरी वाटत. तुंबाड बघताना त्या लालसेची शिसारी येते. इथे माधव आणि निशिकांतची कीव येते. ते भोळे वाटतात, लोभी नाही.
पण अर्थात, प्रत्येकाचा दृष्टिकोन.

अतिशय सुंदर रसग्रहण..
अन्य साहित्यातील व्यक्तिरेखांच्या समर्पक उल्लेखांमुळे ह्या लेखाला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे.

खूप छान परिक्षण...
वृत्तपत्रात ह्या चित्रपटाबद्दल बरचं वाचलं होतं ...
मात्र चित्रपट अजून पाहिला नाही..

तुंबाडसारखी धनाची हाव नाही मला तरी वाटत. तुंबाड बघताना त्या लालसेची शिसारी येते. इथे माधव आणि निशिकांतची कीव येते. ते भोळे वाटतात, लोभी नाही.
+1
तुंबाडला गडद छटांचे अनेक थर आहेत. इथे दिशाहीनता, कर्तेपणा व आत्मविश्वासाचा अभाव (धमक नसणं ) हे आहे. मी अशी घरं बघितली आहेत, ते सगळं खरं वाटावं असं आहे. हे दाखवणं जास्त अवघड आहे कारण यात काही तीव्र-अद्भुत एलेमेंट नाही.

सुंदर लिहिलंय.
चित्रपट पाहिलाय आधी.
छानच चित्रपट.

वावे, मला पटतयं.
तुंबाडमधील हाव शिसारी आणणारी आहे, हे खरेच. वास्तुपुरुष मध्ये माधव आणि निशिकांत भोळे आहेत. त्यांची कीव येते हेही खरेच. अस्मिता यांनी लिहील्या प्रमाणे त्यात कर्तुत्वशुन्यता ही आहे. पण गुप्तधनाची अतिलोभ/हाव हे पण त्यांचे दुर्गुण आहेत. (असं मला वाटतं)

झकासराव, धन्यवाद Happy

वास्तुपुरुषमधल्या माधवची (रवींद्र मंकणी) व्यक्तिरेखा मला कशी वाटते ते सांगते.
तो 'इनामदार' घराण्यात जन्मलेला आहे आणि त्याचा त्याला अभिमान आहे. (अण्णा जेव्हा म्हणतात की भास्करने माधुकरी मागून शिकावं, तेव्हा माधव म्हणतो की तो माधुकरी कशाला मागेल? इनामदाराचं पोर आहे) त्याची अशी ठाम समजूत आहे की आपल्या पूर्वजांनी, आपल्याला कठीण काळात उपयोगी पडेल म्हणून धनाचा हंडा वाड्यात कुठेतरी पुरून ठेवलेला आहे. यात पैशाचा मोह आहेच, पण पूर्वजांचा (निरुपयोगी) अभिमानही आहे. कष्ट करून पैसे न मिळवण्यामागे आळस आहेच, पण 'आपण इनामदार, आपण का कष्ट करावे?' हाही भाग आहे. त्याऐवजी काही तरी शक्कल काढून श्रीमंत होण्याचा शॉर्टकट तो शोधतोय. भास्करला admission मिळते तेव्हा तो त्याच्यासाठी पैशाची सोय करण्यासाठी म्हणून घाईघाईने खोदायला जातो आणि सुरुंगाची दारू आणण्याचा अविचार करतो. भास्करला मेडिकलला पाठवणं हे त्याचंही स्वप्न आहेच. अर्थात त्यात 'आपला पुतण्या डॉक्टर' असं मिरवणं हा भाग जास्त असेल.
निशिकांत (अतुल कुलकर्णी) हा कमजोर व्यक्तिमत्त्वाचा (झालेला) आहे. त्याला घरात कुणी सीरियसली घेतच नाही. अशावेळी काकाच्या बातांनी तो प्रभावित होणं आणि काकाला साथ देऊन काही तरी महत्त्वाचं काम करत असल्याचं समाधान त्याने मिळवणं साहजिक वाटतं.

वावे, हा चित्रपट पाहिला नाही, पण परीक्षण वाचुन ताबडतोब पहाणार आहे. व्यक्तिरेखा छान लिहिल्या आहेत.

योगायोग - मी आताच दुसऱ्या धाग्यावर तुंबाडचे खोतचा संदर्भ लिहिला.

खूप सुंदर चित्रपट आहे. उत्तरा बावकरांनी काय काम केलय!
वावे परीक्षण चपखल लिहिलं आहेस. प्रतिसादही वाचनीय.

Pages