
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीने जे अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले, त्यांपैकी एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट म्हणजे ’वास्तुपुरुष’. यातले प्रमुख कलाकार आहेत उत्तरा बावकर, सदाशिव अमरापूरकर, अतुल कुलकर्णी, रविंद्र मंकणी, रेणुका दफ्तरदार आणि सिद्धार्थ दफ्तरदार.
डॉ. भास्कर नारायण देशपांडे (महेश एलकुंचवार) यांना ’प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन’ या क्षेत्रात त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीत केलेल्या कामासाठी मॅगसेसे पुरस्कार जाहीर होतो, या बिंदूवर हा चित्रपट सुरू होतो आणि मग डॉ. भास्कर देशपांड्यांच्या स्मृतींमधून या चित्रपटाची कथा उलगडत जाते.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदगाव या लहान गावातलं देशपांडे हे परंपरागत इनामदार घराणं. चित्रपटाचं मुख्य कथानक हे भास्कर इंटर सायन्सला असतानाच्या वर्षातलं आहे. (या वयातलं भास्करचं काम सिद्धार्थ दफ्तरदारने केलं आहे.) पन्नासचं दशक संपतानाचा काळ. भास्करचे वडील अण्णा (सदाशिव अमरापूरकर), हे स्वातंत्र्यसैनिक. स्वातंत्र्यचळवळीमध्ये भाग घेऊन तुरुंगवास भोगलेले. कट्टर गांधीवादी. भास्करचा मोठा भाऊ निशिकांत (अतुल कुलकर्णी), काका माधव (रवींद्र मंकणी), बाईआजी (रेखा कामत), भास्करचा मित्र सोपान, नात्याची नसलेली पण जवळची अशी कृष्णाताई (रेणुका दफ्तरदार), घरातला गडी गोटूराम आणि भास्करची आई सरस्वती (उत्तरा बावकर) ही या कथेतली प्रमुख पात्रं. ही कथा भास्करची असली तरी या कथेची खरी नायिका आहे त्याची आई, भास्करने डॉक्टर व्हावं या एकमेव इच्छेचा ध्यास घेतलेली. भास्कर डॉक्टर होऊ शकतो तो केवळ त्याच्या आईच्या जिद्दीमुळे.
या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा एकरंगी, एकमितीय नाहीत. अण्णा स्वातंत्र्यसैनिक, पण स्वतंत्र भारतात त्यांना स्वतःचं स्थान सापडलेलंच नाही. ज्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी जिवाचं रान केलं होतं, ते स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचं नेमकं काय करायचं हेच बर्याच जणांना उमगलेलं नसण्याचा हा काळ आहे. स्वतंत्र भारताच्या आदर्श, काहीशा भाबड्या कल्पना विरून जाण्याचा हा काळ. काहीजणांनी स्वातंत्र्यसैनिक असण्याचे (गैर)फायदे स्वतंत्र भारतात उपटले. भास्करच्या वडिलांसारख्या सरळमार्गी माणसांना हे पटलं नाही आणि जमलं नाही. सुनीता देशपांड्यांनी ’आहे मनोहर तरी’ मध्ये ’ स्वातंत्र्य मिळालं आणि चिंध्या होऊन ते फाटूनही गेलं... स्वातंत्र्यसैनिक म्हणून काही जणांनी या काळात जे फायदे मिळवले, त्याची आठवण झाली तरी मला मळमळतं.’ अशा शब्दात या काळाचं वर्णन केलं आहे.
वास्तुपुरुष चित्रपटातले अण्णा आदर्शवादी, सरळमार्गी, सुस्वभावी. पण गांधीवादी असले, जातपात मानत नसले, तरी घरात परजातीची सून करून आणण्याचं धैर्य न दाखवू शकलेले, परंपरा, चालीरीतींमधून बाहेर येऊ न शकलेले. कूळकायद्यात जमिनी गेल्या असल्या, उत्पन्न रोडावलं असलं, तरी स्वतःच्या बुद्धीने, कष्टाने पैसे कमवायची तयारी नसलेले. अलिप्त. आपल्या मुलाच्या बुद्धीचं, कष्टाचं चीज व्हावं, यासाठी स्वतःहून काही करण्याची इच्छा नसलेले.
भास्करचा काका माधव हा विधुर. स्वभावाने चांगला, पण थोडा रंगेल, वाड्यात गुप्तधनाचा हंडा सापडेल यावर विश्वास ठेवणारा, मोठमोठ्या बाता करणारा.
निशिकांत (भास्करचा मोठा भाऊ) मुळात हरहुन्नरी, कविमनाचा, हळवा. पण आयुष्यातला आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसलेला, नेभळट, भित्रा बनलेला, काकाबरोबर सतत राहणारा, कदाचित वडिलांबरोबर सूर न जुळू शकल्यामुळे.
कृष्णा ही निशिकांतची प्रेयसी. पण निशिकांतशी लग्न न होऊ शकल्यामुळे कठीण काळातून गेलेली. तिचं आता लग्न झालं आहे, पण संसार सुखाचा नाहीच. नर्स म्हणून ती पुन्हा गावात येते आणि देशपांडे कुटुंबाशी, विशेषतः भास्करशी तिचा परत ऋणानुबंध जुळतो.
देशपांड्यांच्या घरातली बाईआजी ही त्यांच्या सख्ख्या नात्यातली नसली, तरी सख्खी असल्यासारखीच, या घरासाठी कष्ट उपसलेली. म्हातारपणामुळे भ्रम होत असला, तरी प्रसंगी शहाणपणाचे आणि अनुभवाचे चार शब्द सांगणारी.
भास्करची आई ही तसं पहायला गेलं तर त्या काळातली सर्वसामान्य गृहिणी. नवरा, धाकटा दीर, मुलं यांचं मायेने करणारी, आजारी सासूची काळजी घेणारी. पुरुषप्रधान संस्कृतीतले, पारंपरिक घरातले सणवार, कुळाचार, सोवळं-ओवळं, सगळं पाळणारी. पण आतून मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारी. इनामदारीच्या पोकळ कल्पनांमधून बाहेर पडून, हातपाय हलवून माणसाने स्वतः कष्ट करावेत या मताची. भास्करने तरी डॉक्टर होऊन या भोवर्यातून बाहेर पडावं , यासाठी जिवाचं रान करणारी. रीतिरिवाजांचं अटळ जोखड खांद्यांवर वागवणारी, पण मुलाच्या शिक्षणासाठी प्रसंगी सर्व शक्तीनिशी ते जोखड भिरकावून देण्याची तयारी मनात बाळगणारी. आपल्या पूर्वजांनी गरिबांवर अन्याय करून पैसा कमावला, आता आपल्या मुलाने डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करावी, तरच आपल्या वास्तुपुरुषाची शांत होईल, असा ठाम विश्वास असणारी.
भास्करच्या आईच्या व्यक्तिरेखेकडे बघताना मला कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांनी रंगवलेल्या दोन व्यक्तिरेखा आठवतात. ’तुंबाडचे खोत’मधली गोदावरी आणि ’रथचक्र’ कादंबरीची नायिका. ’रथचक्र’च्या नायिकेला नावच नाही. ती तशी सामान्यच स्त्री आहे, सामान्य स्त्रीचे गुणावगुण तिच्यात आहेतच. पण तिच्यातलं असामान्यत्व हे, की एकत्र कुटुंबातल्या गुंतागुंतीतून बाहेर पडून आपल्या मुलाने शिकावं, यासाठी ती कितीही खस्ता खायला, घरच्यांचा, समाजाचा विरोध पत्करायला, मुलाशी कठोरपणे वागायलाही तयार होते आणि शेवटपर्यंत आपल्या उद्दिष्टापासून ढळत नाही . ’तुंबाडचे खोत’मधली गोदावरी रूपागुणांनी असामान्य. पण तिच्या रूपाला आणि गुणांनाही मागे टाकते ती तिची अदम्य जिद्द. प्रचंड प्रतिकूल परिस्थिती अंगावर कोसळलेली असताना स्वतःच्या बुद्धिमान मुलाला या खाईतून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण, हे ती जाणते आणि त्यासाठी एकटीच्या बळावर धोकादायक निर्णय घेऊन ते यशस्वी करून दाखवते. ’एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते’ हे वाक्य प्रसिद्ध आहे. त्यात थोडा बदल करून म्हणायचं तर ’ एका स्त्रीला शिक्षणाचं महत्त्व कळलं तरी ती कुटुंबाचं भविष्य बदलून दाखवते’ असं म्हणायला हवं.
चित्रपटाचं कथानक भास्करच्या इंटरच्या वर्षाबरोबर पुढे सरकत जातं. अभ्यास, मेडिकलला प्रवेश मिळवण्याची घरच्यांची अपेक्षा, फीच्या पैशांची होत नसलेली सोय, त्यावरून घरात होणारे वादविवाद, निर्माण होणारे तणाव या ओझ्याने भास्कर गंभीर, अबोल झालेला आहे. निखळ आनंदाचे क्षण त्याला फारसे मिळतच नाहीत, कृष्णाताईबरोबरचा वेळ सोडल्यास. शेवटी शेवटी अशा काही अकल्पित घटना घडतात की कॉलेजसाठी म्हणून भास्कर जो घराबाहेर पडतो, तो थेट चाळीस वर्षांनी मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यावर परत येतो.
चित्रपटातले संवाद, पात्रांच्या तोंडची भाषा, कलाकारांची देहबोली, वाडा आणि गावाचं चित्रण अतिशय सुरेख आहे. भास्करच्या लहानपणचा वाडा आणि चाळीस वर्षांनंतरचा पडझड झालेला वाडा यांचं चित्रण अगदी खरं वाटतं.
काही ’अनफोर्स्ड एरर्स’ मात्र आहेत, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. पन्नासच्या दशकातली म्हणून दाखवलेली एसटीची बस नवीन काळातली दिसते, अगदी एम एच १२ नंबरप्लेटसह! हे खूपच खटकतं. दुसरं म्हणजे एक शेतकरी भास्करच्या आईला चौथाई म्हणून पाचशे रुपये काढून देतो. त्या काळाच्या मानाने पाचशे रुपये बरेच जास्त झाले, ते असे काढून देणं पटत नाही. ग्रामपंचायतीच्या इमारतीवर एका घोषणेत १९९९ असं वर्ष लिहिलेलं स्पष्ट दिसतं, त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीवर पोलिओ लसीकरणाच्या घोषणा लिहिलेल्या दिसतात. पन्नासच्या दशकात हेही नसलं पाहिजे. या चुका टाळता येण्यासारख्या आहेत असं मला वाटतं. शिवाय, बाकी इतका खणखणीत असलेला चित्रपट पाहताना त्या जास्तच खटकतात!
उत्तरा बावकरांनी भास्करची आई अक्षरशः जिवंत उभी केली आहे. सदाशिव अमरापूरकर, अतुल कुलकर्णी, रवींद्र मंकणी, सगळ्यांचेच अभिनय उत्कृष्ट आहेत. संवाद, पार्श्वसंगीत, विशेषतः पार्श्वभूमीवर ऐकू येणारं ध्रुपदगायन तर फारच परिणामकारक आहे. एकंदरीतच हा चित्रपट पाहणं हा एक दीर्घकाळ लक्षात राहणारा अनुभव आहे.
(हा चित्रपट ओटीटीवर जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.)
छानच लिहिले आहे.
छानच लिहिले आहे.
माझ्या मोजक्या आवडत्या मराठी चित्रपटांपैकी एक
जमले असते तर याच चित्रपटावर लिहायला आवडले असते.
मैत्रेयीच्या संपुर्ण प्रतिसादाला मम
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
सुमित्रामावशींना ही कथा त्यांच्या मामांच्या कुटुंबावरून सुचली. मग नंतर अनेक पात्रं आली. गोष्ट तयार झाली. सिनेमाच्या गोष्टीचा आणि मामांच्या कुटुंबाचा थेट संबंध काही राहिला नाही. गोटुराम मावशींच्या लहानपणी त्यांच्या घरी होता. त्याचे अनेक किस्से मावशींकडून ऐकले आहेत. वास्तुपुरुषचा बाज कादंबरीचा आहे. त्यांनी घाटावरच्या देशस्थ ब्राह्मण, सरंजामी कुटुंबावर कादंबरी लिहावी म्हणून बरीच वर्षं मी त्यांच्या मागे लागलो होतो.
हा चित्रपट बर्याच अडचणी सोसून तयार झाला आहे. आज प्रसिद्ध असलेले उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, मिलिंद जोग या चित्रपटासाठी साहाय्यक होते.
चिनूक्स, हर्पेन, मीरा, झेलम,
चिनूक्स, हर्पेन, मीरा, झेलम, धन्यवाद
उमेश कुलकर्णी, मिलिंद जोग, सचिन कुंडलकर>>
मिलिंद जोग हे नाव माहिती नव्हतं. गूगल केल्यावर कळलं की cinematographer आहेत. त्यांच्या चित्रपटांपैकी आम्ही दोघी, अस्तु, वजनदार, निरोप हे चित्रपट बघितले आहेत. वजनदार हा चित्रपट म्हणून धन्यवाद असला आणि cinematography मधलं मला फारसं कळत नसलं तरी ती सुंदर असल्याचं जाणवतं यात शंका नाही. आम्ही दोघी आणि अस्तु या चित्रपटांचा प्रश्नच नाही! 'निरोप' इतका कंटाळवाणा वाटला होता की cinematography चांगली असली तरी जाणवली नसणार.
उमेश कुलकर्णींंचे चित्रपट खूपच आवडतात!
वावे,
वावे,
सुमित्रा भावे यांचे इतर साहाय्यक -
वरुण नार्वेकर (मुरांबा)
सारंग साठ्ये (भाडिपा)
ओंकार गोवर्धन (घो मला असला हवा)
मंगेश जोशी (लेथ जोशी, कारखानीसाची वारी)
आलोक राजवाडे
खूप छान लिहिले आहे.
खूप छान लिहिले आहे.
माझाही आवडता सिनेमा. अनेकदा पाहिला तरी प्रत्येक वेळी एखादा नवा कंगोरा लक्षात येतो.
धन्यवाद चिनूक्स
धन्यवाद विकु!
धन्यवाद विकु!
घो मला असला हवा अलीकडे परत बघितला तेव्हा सारंग साठ्येचं नाव वाचलं होतं आणि त्याला ओळखलाही चित्रपटात. कारखानीसांची वारी नाही बघितलेला. मध्यंतरी प्रवाह पिक्चरवर प्रचंड प्रमाणात जाहिरात करत होते. पण प्रत्यक्षात मात्र नाही बघितला.
कारखानिसांची वारी मस्त आहे.
कारखानिसांची वारी मस्त आहे. मराठीत अशा जातकुळीतील चित्रपट नसतात तसा आहे.
Pages