दिवाळी अंक 2022

Submitted by अल्पना on 20 October, 2022 - 02:53

यावर्षीचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे. कोणते अंक घेतले, घ्यायचे आहेत आणि वाचले याबद्दल चर्चा करायला हा धागा.
नेहेमीप्रमाणे यावर्षी सुद्धा बऱ्याच मायबोलीकरांचे साहित्य दिवाळी अंकांमध्ये असेल / आहे. त्याची सुद्धा इथे माहिती द्यावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बोबो निलेश, नवल मधल्या कथा आवडल्या.
त्या बेडकाचे आणि राक्षसाचे वाईट वाटले..

आज लोकप्रभा आणलाय. BBC वर लेख आहेत.

< बोबो निलेश, नवल मधल्या कथा आवडल्या.> आवर्जून अभिप्राय दिलात त्यासाठी मनापासून आभार - धनवन्ती

अक्षरमुद्रा
संपादक डॉ. चिद्दरवार, उदगीर
व्यक्तीचित्रणं आणि पुस्तक समिक्षा असलेला दोनशे पानी दिवाळी अंक. जाहिराती पुढे मागे सहा फक्त. जाड पांढरा कागद. माहीत नसलेल्या लोकांची ओळख आवडली.
***
लोकसत्ता
पाने २००, जाहिराती भरपूर. किंमत १७५
झपुर्झा कथासंग्रहालय , पुणे, ओळख.
अनाटॉमी विद्यापीठ आणि जोवान्नी तसेच ॲना मंझोलिनी ओळख लेख आवडले.

बीबीसी ,जीए, हबीब तन्वीर,नंदा खरे माहिती लेख चांगले.
चार कथा ठीक.
'कावळ्याची अंडी आणि गडगडलेले सरकार' ही प्रवीण बांदेकर लिखीत कथा ओढून ताणून जमवलेली वाटली.
बाकी अंक ठीक.
__________________

<<मायबोलीकर निलेश यांच्या नवल मधील तीन लघुकथा आवडल्या.>>
वाचून आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून आभार, मामी

हेमांआणि: देदिप्यमान कलावारसा : जतन आणि संवर्धन -सुहास बहुळकर. भारतीय पुरातत्वशास्त्राचा ?_) मागोवा घेत त्याला इंग्रजी अमदानीत आलेलं ठोस रघेथा लेखाचा विषय. या विषयाला स्पर्श करणारी त्यांची भारतविद्या ही लोकसत्तेतील लेखमाला वाचली असल्याने आता अचंबित झालो नाही.वॉशिंग्टन डीसीचे सी एफ ओ म्हणून काम केलेले नटवर गांधी यांच्या आत्मचरित्राच्या अनुवादाचा अंश बरीच नवी माहिती देतो. दुसर्‍या कोणी ते सगळं किती नाट्यमय करून लिहिलं असतं, असं वाटून गेलं. न्यायाचा शोध - नरेंद्र चपळगावकर यांच्या लेखात माझ्यासाठी काही नवं नव्हतं. रूपा रेगे नित्सुरेंच्या डॉ शंकर आचार्य या अर्थ शास्त्रज्ञाच्या आत्मचरित्राचं परीक्षण वाचून ते वाचावंसं वाटतंय.
पंकज कुरुलकरांची कथा वाचली नसती तरी चाललं असतं. नौशाद अलींवरच्या मनोज आचार्य यांच्या लेखातून लेखकाचं नौशादवरचं प्रेम दिसतंय . लेखात चक्क मुगल ए आजमचं नावही नाही. स्वेतलाना अलेक्झेविच आणि सारा करिमी यांच्यावरचे लेख मला मन लावून वाचता आले नाहीत. Sad फेसबुकबद्दलच्या उदय कुलकर्णींच्या लेखातही माझ्यासाठी नवं काही नव्हतं. मुंबई पोलिस आयुक्तांबद्दलचा निशांत सरवणकरांचा लेख फारच धावता आहे.
शैलेंद्र शिर्के यांच्या सी आय ए च्या दोन महत्त्वाच्या भारतीय व्यक्तींच्या मृत्यूशी असलेल्या कथित संबंधांबद्दल लिहिलेल्या लेखा साठीचे संदर्भ स्रोत वाचून भुवया उंचावल्या.
भारतीय इतिहाअसाच्या पुन र्मांडणीचा अट्टाहास कितपत योग्य या परिसं वादातले तब्बल १२ लेख वाचताना दम लागला. कोण काय लिहील याचा अंदाज असतो, आणि ते तसंच निघतं, लहानमोठे तपशील माहितीत भर घालतात इतकंच. रवींद्र साठेंनी कम्युनिस्ट शासित राज्यातील - काळातील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतील दाखले दिले आहेत. पण काँग्रेस शासित राज्य- काळाचे नाही. सुधीर पाठक यांच्या 'अभिमानाच्या मानसिकतेची गरज' या लेखात फाळणीसंदर्भात लिहिलेलं "इतिहासातून शिकलो त्या वेदना ठसठसत ठेवल्या तर इतिहास घडवता येतो" हे वाक्य वाचून थबकलो. पण मग ते सध्या प्रत्ययास येते आहे, हे लक्षात आलं. म्हणजे विचार, योजना फार स्वच्छ, स्पष्ट, पूर्वतयारीने आहेत हे पुन्हा एकदा जाणवलं. बौद्ध धम्म आणि आंबेडकरी विचारांचे अभ्यासक भि म कौसल यांच्या लेखातले तपशील आजवर उडत उडतच ऐकले होते.

An economist at home and abroad हेच ना शंकर आचार्यांचे आत्मचरित्र? बरंच चांगलं ऐकून आहे या पुस्तकाबद्दल.

हो

मौज अंक( शंभरावे वर्ष,. ३५०रु,२४०पाने) वाचला. श्री. पु. भागवतांची माहिती मोनिका गजेंद्रगडकरने ( माजी संपादिका) लिहिली आहे मौजचे तीन संपादक मालिकेत. ती चांगली आहे.
मौजचा आढावा रणधीर शिंदे यांनी घेतला तो आवडला. कोणत्या लेखक,कवी,कलाकारांचे किती लेखन आले ते कळले. शर्मिला फडके (मायबोलीकर?)यांची एक सिनेजगत आणि फाळणीनंतरचे कलाकार आणि जुन्या आठवणी याबद्दलची आहे. आशा बगे यांची अपेक्षित शेवट असलेली कथा. एकूण अंक बरा आहे.

इतिहासातून शिकलो त्या वेदना ठसठसत ठेवल्या तर इतिहास घडवता येतो" हे वाक्य वाचून थबकलो. पण मग ते सध्या प्रत्ययास येते आहे, हे लक्षात आलं.
>>>>अरे देवा , म्हणजे हे आता विश्वाच्या अंतापर्यंत नवा इतिहास (?) घडवतील. वेदनेऐवजी जाज्वल्यं का नाही बाळगता येत. द्वेषाग्नि धगधगता ठेवायला व पुढच्या पिढीत मुरवायला आयुष्य वेचताहेत काही लोक. द्वेषाची, इतिहासाची आणि न्यायाची व्याख्या एकचं झाली आहे. पंचतंत्रातली दुतोंडी पक्षाच्या गोष्टीसारखं कुठल्याही एका तोंडाने विषारी फळ खाल्लं तरी विनाश त्याच एका शरीराचा झाला, हे अगदी तसं चाललंय. कुणाला कळत कसं नाहीये , निशःब्द !!

बाकी पोस्टही वाचली पण हे फार लागलं.

> भारतीय इतिहाअसाच्या पुन र्मांडणीचा अट्टाहास कितपत योग्य या परिसं वादातले तब्बल १२ लेख
हे कोणत्या दिवाळॅए अंकात आहे ?

>इतिहासातून शिकलो त्या वेदना ठसठसत ठेवल्या तर इतिहास घडवता येतो
धन्य !

असंच होतं हल्ली. टाईप केलेले शब्द फिरतात.
सुचवणी बंद ठेवली कीबोर्डावर तर तसे होत नाही बहुतेक. पण आपण ती सोय चालू ठेवतो सर्व अक्षरे टंकायला नको म्हणून.

खरा अक्षर अंक सापडला.
अक्षर
पाने २४०,३००रु, जाहिराती पाच.
नाही वाचला तरी चालेल. (माझे मत.)
सोशल मिडिया वर लेख सहा.
सिनेमा माध्यमांवर , राजकीय नेहमीचेच जुने लेख.
कथा चार. नेहमीचाच फॉर्म्युला - लग्न मोडलेली किंवा न झालेले तरुण तरुणी. नंतर कधीतरी जुनी 'प्रेमा' ( मालवणी शब्द, अंकिता वालावलकर,कोकणहार्टेडगल चानेल)भेटतात.
दीर्घकथा -पंकज भोसले. पाचसहा पाने उलटली तरी पकड घेतच नाही.

हंस -
तसा जी.ए. आणि हंस (अंतरकर) संबंध जुना आहे. हेमलता अंतरकर यांनी त्यांच्या कथांची समीक्षा आणि व्यक्ती विशेष यावर एक दीर्घ लेख दिला आहे. इतर दोन अंकांत ही जी.ए. यांच्यावर लेख आहेत पण हा लेख फार आवडला. २४० पानांत वाचनीय भरपूर साहित्य आहेच, त्यांच्या धोरणाप्रमाणे अंकात जाहिराती नाहीत. चित्रकारांची रेखाटनेही आवडली.

आतापर्यंत वाचलेल्या अंकांत राजकीय व्यंगचित्रे दिसली नाहीत. चार हात दूर राहाणे ठरवलेलं असावं. तसे राजकारणी नेते जाहिरपणेच एकमेकांची खेचतात तर आणखी चित्रांची गरजही उरली नाहीच.

मौज, लोकमत, मिळून साऱ्याजणी आणि अक्षर हे अंक परवाच मिळाले. त्याआधी लहान मुलांसाठी चा नवा कुल्फी हा अंक घेतला होता.
अक्षर मधली नीरजाची कथा आवडली. असाही सोशल मिडिया ही लेखमाला चाळून झाली. ठीक आहे. त्यातले बरेच लेख ओळखीचे वाटले. नवे काही जाणवले नाही.

कुल्फी चा अंक खूप आवडला. मुलगा आता इतक्या लहान मुलांचे काही वाचत नाही, मराठी तर त्याला फारसे कळत ही नाही, पण तरी त्यालासुद्धा अंक आवडला. मुखपृष्ठ खूप सुरेख आहे. प्रत्येक पानावर पृष्टसंख्या चित्रं आहेत श्रीनिवास बाळकृष्ण आणि शुभांगी चेतन या माझ्या दोन आवडत्या कलाकारांनी काढलेली. खूप मस्त आहेत ती सगळी छोटी चित्र. एकूणच अंक खूप आवडला. आमचा अंक हातात आल्यानंतर अजून चार अंक भेट देण्यासाठी घेवून झालेत. या अंकाचा कागद पण खूप चांगला आहे.

बाकी अंक वाचायचे आहेत. गेली २-४ वर्षे फारसे दिवाळी अंक वाचले नव्हते. बहूतेक वेळा जानेवारी मध्ये सुट्टीसाठी गेल्यावर घरी जे दिसायचे तेवढेच १-२ अंक वाचून व्हायचे. इतक्या वर्षांनी दिवाळी अंक वाचताना सगळ्यात जास्त जाणवणारी गोष्ट म्हणजे जाहिराती आणि अंकाचे कागद. पूर्वी जरा बरा कागद असायचा असं वाटतेय मला. जाहिराती पण इतक्या नसायच्या.

सगळ्यात जास्त जाणवणारी गोष्ट म्हणजे जाहिराती आणि अंकाचे कागद>>कागद खुपच खराब. पैसे बचत Happy बाकी दिल्लीत असताना जेवढे दिवाळी अंकाचे अप्रुप वाटायचे तेवढे ठाण्यात वाटत नाही Happy

जाहिरातींचे प्रमाण आणि कागचा दर्जा हे समप्रमाणात बदलतात.
ऋतुरंगमध्ये जाहिराती कमी. त्यात तो गरीब कागद. एकाच लेखाला ग्लॉसी पेपर वापरलाय. चित्रकला की फोटोग्राफीबद्दल आहे.

मुक्त शब्दमध्ये अर्धे ग्लॉसी अर्धे पातळभरडे.

TV माध्यमाने दिवाळी अंकांची हवाच काढली आहे. लेख आणि मुलाखती अगोदरच झालेल्या असतात. चित्रकारांच्या मुलाखती झाडून सर्व सह्याद्री चानेलवर रंगा येई वो कार्यक्रमात झाल्या आहेत. शिवाय ते एपिसोड यूट्यूबवर कायमच आहेत. त्या नंतर आणखी एक कार्यक्रम असतो तेही उपलब्ध आहेत.

भवताल
सडे पठारे विशेषांक
पुणे.
मालक,संपादक ,प्रकाशक -अभिजित वसंत घोरपडे
१४० पानी आर्ट पेपरवर भरपूर फोटोंसह लेख असलेला विशेषांक.
सडे पठारे (महाराष्ट्र) -प्राणी, वनस्पती, कातळशिल्पे, शोध यांवरचे लेख.
सुंदर अंक.
लिंक
https://bhavatal.com/connectus/masik-nondani-information

bhavatal डॉट com/connectus/masik-nondani-information

ऋतुरंग दिवाळी अंकातले बहुतेक लेख ज्यांच्याबद्दल सहजी वाचायला मिळत नाही, अशा लोकांबद्दल आहेत. काहीं बद्दल बातम्या झालेल्या आहेत. त्या कानावर पडल्या होत्या. पण तेवढंच. त्यांचं निवेदन - त्याचं अन्य कोणी केलेलें शब्दांकन. हे एकरेय नाही. मधले काळाचे टप्पे गायब झाल्या सारखे वाटतात. पण त्यामुळे फार फरक पडत नाही. या लोकांबद्दल आणखी वाचायला , समजून घ्यायला आवडेल .
याशिवाय शर्मिला टागोर, जावेद अख्तर, अंबरीश मिश्र , किशोर मेढे (सविता -माई आंबेडकरांबद्दल), संजय आवटे , मुकुंद टाकसाळे यांचे लेख आवडले. वसंतदादांचं व्यक्तिचित्र छान उतरलं आहे. त्यांच्याबद्दल फार काही वाचलं नव्हतं. काँग्रेसचं हाय कमांड कल्चर, अविश्वास हे काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याच्या किंवा त्याच्याबद्दलच्या लिखाणात येतातच. वसंतरावजी , यशवंतरावजी आहे या लेखात.
सुशीलकुमार शिंदेंचा लेख आणि शीर्षकाचा संबंध नसल्यात जमा आहे.
पाटोदा या आदर्श गावा बद्दलच्या २५ वर्षे सरपंच राहिलेल्या भास्करराव पेरे पाटील यांनी सांगितलेल्या गोष्टी अविश्वसनीय वाटाव्या इतक्या अद्भुत आहेत. फक्त मागच्या निवडणुकीत त्यांच्या कन्या उभ्या होत्या आणि पडल्या हे त्यांनी सांगितलेलं नाही.
वैभव जोशींचा इस मोड से जाते है हा ललित लेख, गुलजार यांचा बाउल, सूफी आणि आपण, मिन्तल मुखिजा यांच्या गुलजार यांच्या कवितांवर काढलेल्या चित्रांबद्दलचा शर्मिला फडके यांनी अनुवाद केलेला लेख सध्या तरल काही पोचत नसल्याने नुसतेच चाळले. ललित लेखही वाचले नाहीत. शिवराम भंडारी ( ठाकरे परिवाराचा हेअर स्टाइलिस्ट) यांचा लेख लांबला आहे. भाग्यश्री पाटील यांचा चेहरा शेवटच्या पानावरच्या जाहिरातीत आहे. त्यांचाही लेख फक्त चाळला. मुकुंद संगोराम यांच्या लेखात नवीन काही नाही

अंकातल्या काही जाहिराती, चित्रां बद्दलचा लेख आणि भाग्यश्री पाटील यांचा लेख एवढेच ग्लॉसी पेपरवर आहेत.

ऋतुरंग?
सिनेमांसंबंधी खूप कमी आहे यात.
मला अनुक्रमणिका द्यायची होती पण इमेज अपलोड होत नाहीये.

Ok.
बघतो. आतापर्यंत नावाजलेले बरेच अंक पाहून झाले. ( आवाज आणि जत्रा सोडून. जत्रेत हरवायचे वय टळून गेलंय. )

@भरत, फोटो काढून तो स्क्रीनवर पाहा आणि त्याचा स्क्रीन शॉट घ्या. हा साधारणपणे दोन एमबीपेक्षा कमी साईजचा असतो. तो अपलोड होऊ शकतो मायबोलीवर खाजगी जागेत. ( अपलोड लिमिट २एमबी आहे.)

IMG_20221207_105332~2.jpgIMG_20221207_105336~2.jpg

क्रॉप करून टाकले. यापूर्वी अनेकदा फोनवरून फोटो अपलोड केलेत. पहिल्यांदाच असं झालं.

Pages