दिवाळी अंक 2022

Submitted by अल्पना on 20 October, 2022 - 02:53

यावर्षीचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे. कोणते अंक घेतले, घ्यायचे आहेत आणि वाचले याबद्दल चर्चा करायला हा धागा.
नेहेमीप्रमाणे यावर्षी सुद्धा बऱ्याच मायबोलीकरांचे साहित्य दिवाळी अंकांमध्ये असेल / आहे. त्याची सुद्धा इथे माहिती द्यावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कचरा विषयी लेख देताना कचरा करायचे उदाहरणही आहे.
संस्थळावर लेख का लिहायचे? छापील लेखांपेक्षा वेगळे काय आहे? तर पहिले डिजिटल लेख नंतरही अनेकदा वाचले जातात आणि प्रतिक्रिया,उत्तरे येतात. तसं छापील लेखांचे होत नाही. कथा कादंबऱ्या छापील ठीक.

पण ऐसीवरचे बरेच लेख { दिवाळी अंकातले विशेषतः } 'आणून टाकलेले' असतात आणि त्यातला जीवंतपणाच हरवतो. तो लेखक कधीही ऐसीवर फिरकत नाही आणि प्रतिक्रियांना उत्तरे देत नाही.

ऐसी अक्ष रे दिवाळी अंकातला खूप सारा पसारा लेख वाचला. समृद्ध प्रिव्हिलेज्ड जीवन जगलेली बाई= डिक्लटरिंग / मिनिमलिझम तत्वज्ञान ही थीम म्हणजे आपण साइडने निघून जाणार आता. ही एका वयोगटातील स्त्रियांची मानसिक गरज झालेली दिसत आहे. पण ते वापरलेले ब्रँडेड अंतर्वस्त्रे विकायला काढतात ते वाचून इउ झाले. दान दिलेअसते तरी चालले असते. खूप समृद्धी झाली की मग ट्रेकिन्ग ला जातात. मन रिकामे करायला. सो लाइक बिग डील.

अवांतर - लोकसत्ता चतुरंग पुरवणीत मंगला गोडबोलेंचा दिवाळीनिमित्त पसारा आवरण्यावरचा लेख आला होता. त्या नेहमी लिहितात तसाच आहे. पण एक जाणवतं म्हणजे त्या स्वतः:ला अपडेट ठेवतात. तपशील बदलत्या काळ आणि परिस्थितीनुसार बदलतात.
आमचा काळ म्हणून उसासे सोडत नाहीत. तेव्हाचंही खुपणारं लिहितात.

हो हो भरत., मीपण वाचला होता तो लेख. छान होता.

एक जाणवतं म्हणजे त्या स्वतः:ला अपडेट ठेवतात. तपशील बदलत्या काळ आणि परिस्थितीनुसार बदलतात.
आमचा काळ म्हणून उसासे सोडत नाहीत. तेव्हाचंही खुपणारं लिहितात.

सहमत आहे तुमच्याशी.

'महा-अनुभव' दिवाळी अंकातला डॉ. शंतनू अभ्यंकरा़चा लेख वाचून त्यांच्याबद्दलचा आदर वाढला.
त्याच अंकातली गणेश मतकरींची कथा छान आहे.
'साधना' दिवाळी अंकातली शांता गोखले यांचीही मुलाखत आवडली. (त्यांची मुलगी रेणुका शहाणे हे मला माहिती नव्हतं. )

ललित -(२५०रु)
शिळ्या कढ्यांना ऊत . समिक्षा,मुलाखती खूप जुन्या वाटतात. कथा,लघुकथा,खमंग काही नाही.

पूर्वी किती अगत्याने वाचायचो.
(दिवाळी अंकही नासले की काय?)

पद्मगंधा अंक चांगला वाटला.फक्त मळक्या रंगाचा कागद वापरला आहे त्यामुळे वाचायला नको वाटतं होते.
यात जास्त लेख आहेत.पण एकूण छान आहे.

लोकसत्ताचा दिवाळी अंक वाचायला घेतलायं अजून पूर्ण वाचला नाही. चांगला वाटतोय अंक.
' दिलशाद खालाची न्हाणी' ही दिर्घकथा आवडली. 'जी.ए. एका गूढामागील आभा ' हा रामदास भटकळ यांनी जी.ए कुलकर्णीं च्या जन्मशताब्दी निमित्त लिहलेला लेख आवडला. त्या लेखानिमित्ताने त्यांच्या कथासारखंच त्यांच्याविषयी अजून गूढ कुतूहल वाटलं.

या वर्षी माझ्या(निलेश मालवणकर) कथा धनंजय, नवल, मोहिनी, आवाज, झपुर्झा, कथाश्री आणि मैत्र या आंतरजालीय दिवाळी अंकांमध्ये वाचता येतील
मैत्र दिवाळी अंकाचा दुवा -

https://maitrabmm.blogspot.com/2022/10/blog-post_50.html

अक्षर अंक चांगला आहे.
असाही सोशल मिडिया मधील मेधा कुलकर्णी आणि मीना कर्णिक यांचे लेख आवडले.नीरजा (नीधप) यांची कथा सुरेख आहे.

'उद्याचा मराठवाडा’ या दैनिकाच्या दिवाळी अंकातील एक चांगला लेख :

डिजिटल युगा’तले कौटुंबिक सहजीवन ‘सही’ जीवन होईल?
https://www.aksharnama.com/client/article_detail/6417
त्यातील हे रंजक :

कामाच्या ठिकाणांचा व कामाच्या स्वरूपाचा आदिम काळापासून आजपर्यंतचा प्रवास दाखवणारे ‘एफ’ हे आद्याक्षर असलेले इंग्रजी शब्द :
Forest, Farm, Fishery, Fairground, Forces, Field, Foundry, Firm, Factory, Fleets, Facility, Flat, Freelancing Portals, (& Facebook!!)

दिलशाद खालाची न्हाणी' ही दिर्घकथा आवडली >>> हो. छान आहे.

माहेर बेकार आहे.घेऊ नका. <<<>>>>>> पहिलीच गोष्ट चक्क अर्धवट आहे. पुढचा भाग जानेवारीच्या अंकात वाचायचा म्हणे. हे असं पहील्यांदाच पाहीलं.
>>>>
हो ना....किती रसभंग होतो.
ऋतुरंग आणि लोकसत्ता घेतला आहे. लोकसत्ता जाहिरात विशेष अंक आहे की काय असे वाटायला लागावे इतक्या जाहिराती आहेत. ऋतुरंग वाचायचा आहे अजून. तो घेताना चाळला होता तर इंटरेस्टिंग वाटला. इथल्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया बघून मौज घेणार होते. तर आता संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत.

चांगला/वाईट असा शेरा न देता अंकात काय आहे हे देणार आहे. कारण सिनेमा/नाटक /संगीत कलाकारांच्या कारकीर्द यावर लेख असतात ते मी गाळतो. पण आहेत ते कुणाला आवडत असतील.
कालनिर्णय - तिसावे सांस्कृतिक वर्षं चालू आहे.
मुखपृष्ठ तिसऱ्या पानावर घेतले आहे आणि zee मराठी'ची जाहिरात मुखपृष्ठ म्हणून टाकली आहे. जाहिराती २५,पाने २२०.किंम२५०रु.
हंसा वाडकर,बेबी नंदा,कृष्णराव,देविका राणी , गुजराती लोककलावंत धनबाई कारा - कारकीर्द. , चित्रकार सुझा, नीमन, न्युयॉर्करचा विल्यम शॉन यांवर लेख. दोन तीन लेख . गोव्याचे २०२१चे ज्ञानपीठ विजेते मावजो यांची ओळख- हा लेख नवीन वाटतोय.
सर्व लेखांना समर्पक जुने फोटो दिले आहेत हे आवडले. शेवटी जयराज साळगावकर यांचे राशिभविष्य हवेच.
एकूण चांगला अंक.

हेमांगी नावावरून तो अंक कथाश्री , सुगंध टाइप असेल असं वाचायचं म्हणून कधीच पाहत नसे. काल दिवाळी झाल्यावर पहिल्यांदाच लायब्ररीत गेलो, तेव्हा माझी आवड माहीत असलेल्या तिथल्या ताईंनी हा चांगला आहे, असं म्हटलं म्हणून पाहिला आणि आणला.
भारतीय इतिहासाच्या पुनर्लेखनाचा आग्रह कितपत योग्य ? यावर परिसंवाद आहेत.
ज्यांचं लेखन दिसलं तर मी वाचतो, अशी नरेंद्र चपळगावकर, पंकज कुरुलकर ही नावं दिसली. संजीवनी खेर अजूनही लिहित्या आहेत. मी कॉलेजात असताना त्या लोकप्रभेत होत्या, टीव्हीवर दिसायच्या. हेमंत देसाईंच्या राजकारणावरच्या लेखात माझ्यासाठी नवं काही वाटलं नाही.
मुखपृष्ठ अगदीच अमॅच्युअर वाटलं. अनुक्रमणिकेशेजारी दिलेली त्याबद्दलची माहिती वाचून ते तसं का आहे हे कळलं.
अख्खा अंक ग्लॉसी कागदावर छापलाय आणि जाहिरातीही फार नाहीत, तरी किंमत २५० आहे. हेमांगी हे मासिक आहे का? मासिकांच्या दिवाळी अंकांची किंमत कमी असते. त्यांचे वर्गणीदार, वाचनालये हे ठरलेले ग्राहक असतात.

भारतीय इतिहासाच्या पुनर्लेखनाचा आग्रह कितपत योग्य ?

इतिहासाची साधने म्हणजे शिलालेख,पोथ्या,परदेशी प्रकाशात आलेली कागदपत्रे ही नवीन सापडतात आणि काही नोंदी पुन्हा लिहितात.

यासाठी नाही हो पुनर्लेखन.
सध्या प्रसारात असणारा इतिहास लिहिणारे डाव्या किंवा पश्चिमी विचारांचे आहेत. त्यामुळे चुकीचं आहे, इ.

३१० पानांच्या धनंजय अंकात (६२वे वर्ष,रहस्य कथांचा बादशहा, ४००रु) फक्त आठ जाहिराती आहेत. ३६ कथा आणि काही लेख आहेत.
लेख आवडले.
दोन कथांचे शेवट वाचले.
बाळ फोंडके यांची एक मृत्युपत्र खटला कथा आहे. संशयीत मृत्युपत्र खोटं ठरवताना एक्सपर्ट कोर्टात सांगतो की पहिले आणि शेवटचे सहीचे पान जुने आहे पण मधली दोन पाने नंतर घुसडली आहेत. पुरावा काय देतो तो बरोबर वाटला तरी खोटेपणा करणारा इतका बावळट असेल वाटत नाही.

आणखी एका खून कथेत त्याची उकल तांत्रिकपणात गंडलेली वाटली. बेकायदेशीर आर्थिक व्यवहार पटला नाही. कच्चेपणा आहे.

'मदतीचा हात' नावाची एक कथा खरोखर विस्मयकारक आहे.

'काही झाले तरी मी तिची आई आहे' ही मायबोलीकर 'बोबो निलेश'ने लिहिलेली (नीलेश मालवणकर) ही गुन्हेगारी आणि माया आणि मानसिक गुंतागुंत प्रकट करणारी पण परिणाम साधणारी गतिमान कथा चांगली जमली आहे.
एकूण अंक आवडला.

Srd - 'काही झाले तरी..' कथेवरील अभिप्रायासाठी खूप खूप आभार. कथा तुम्हाला आवडली याचा आनंद आहे.
'मदतीचा हात' मलादेखील आवडली

अक्षर, मधली नीधप ची कथा छान आहे.
सोमी विषयावर आलेला लेख, आहारपद्धतीवर पूर्वजांपासून कसा आहार होत गेला. जागतिक लठ्ठपणा या समस्येसाठी पॅकेजिंग वर आतल्या पदार्थातील कर्बोदके, प्रोटीन याविषयी कोणते बदल अत्यावश्यक आहेत त्याबद्दल चा लेख ही चाम्गला आहे.

धनंजय मधली पहिली दीर्घकथा जी टाइम मशिनवर आहे ती आवडली.
बोबो निलेश, कथा आवडली.
शेवटच्या दोन अनुवादित कथांचे शेवट मला समजलेच नाहीत.
पानाच्या कोपऱ्यात छोटे छोटे माहितीपर पराग्राफ असतात ते ही रोचक असतात.

टाइम मशिन'वर आधारित कथा वाचायचा कंटाळा आला आहे.
कोणत्याही दोन गोष्टी एकाच वेळी एका ठिकाणी असणे शक्य नाही. तरीही मिशीनी फिरवत राहतात.
कथांचे शेवट प्रथम वाचायची पद्धत सुरू केली आहे. त्यात गंडलेला भाग असला तर सुरुवातीपासूनची पाने उपसायचे कष्ट वाचतात.

'अक्षर' शोधायला गेलो तर 'अक्षर साहित्य', 'अक्षरवेध' असे दोन अंक दिसले. आणखी किती आहेत कोण जाणे.

Pages