लहान मुलांना फटके मारावेत का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 September, 2022 - 12:30

लहान मुलांना फटके मारावेत का?

गेले चार वर्षे या प्रश्नाचे उत्तर शोधतोय.

मी स्वत: एकेकाळी लहान मुलांना मारू नये या मताचा होतो. सोशल साईटवरील चर्चात मी या माझ्या मताला बरेचदा डिफेंडही केले. एकेकाळी जैसे बोलावे तैसे वागावे म्हणत कधी मुलांवर हात उचलला नव्हता. पण पुढे जाणवले हे काम करत नाहीये. त्यामुळे सध्या आमच्या घरात गरजेनुसार मुलांना मारणे अलाऊड केले आहे.

मुलांना धाक राहावा असे मारणे मला जमत नाही. म्हणून आम्ही मध्यंतरी बाथरूममध्ये बंद करणे हा प्रकार सुरू केलेला. पण नंतर तो चुकीचा वाटला. मुलांच्या मनात त्याने भिती राहतेय असे वाटले. म्हणून ते बंद केले. सध्या तशीच गरज पडलीच तर मारायचे काम त्यांची आई करते. मुलांवर कोणाच्या तरी माराचा (वा कुठल्याही प्रकारचा) धाक असावा असे वाटते.

शेवटी एक पालक म्हणून आपण काय बघतो, तर मुलांना योग्य वळण लागावे, त्यांची मानसिक जडणघडण योग्य व्हावी, चांगले शिस्त आणि संस्कार त्यांच्या अंगी बाणवावेत. विचार नेहमी त्यांच्या हिताचाच असतो. फक्त प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. जे प्रत्येक मुलानुसार बदलू शकतात. तरी आपण जे करतो ते योग्य वा अयोग्य हे कुठेतरी पडताळून घेणे गरजेचे आहे.

लहान मुलांचे मानसशास्त्र हा फार गहन विषय आहे. पण तरीही तो आपल्या सर्वांना माहीत असणे, याबद्दल जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. यावर विविध दृष्टीकोनातून आणि आपापल्या अनुभवांतून चर्चा झालेली आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना मारायची वेळ येवू नये. >>> ती वेळ तेच आणतात Wink

@ कोवळ्या मनावरील घाव,
तर मला वाटते हे आपण कुठल्या समाजात, वातावरणात राहतो त्यावर फार अवलंबून असावे. जिथे शेजारच्या पाजारच्या सर्वच मुलांना त्यांचे आईबाप थोडेफार मारत असतील तिथे मुलांना हे आसपास बघायची सवय असल्याने आपल्याशी काही वेगळे विपरीत घडतेय असे वाटत नसावे. पण आपण तो बेंचमार्क ऊंचावून फटकेबाजी करत असू तर मात्र हे आपल्याच नशिबी का असा विचार मुलांच्या मनात येऊ शकतो.

मुला च्या मुळ स्वभावा वर हे अवलंबून आहे. माझा पहिला मुलगा ७ वर्षांचा होईतो मी "मी स्वत: एकेकाळी लहान मुलांना मारू नये या मताचा होतो" ह्याच्च्च्च्च मताची होते. तो मवाळ स्वभावाचा आहे आणि ओबेडीयेंट (मराठी शब्द टाईपता येत नाहिये) असल्याने मारायची वेळ आली नाही. ओरडून किंवा थोडं रागाऊन काम भागत होतं.
आमची ही गोड गोड मतं माझ्या मुलीने पार धुळीस मिळवलीत Sad
तिला अधून मधून पाठीवर धपाटे द्यावे लागतात उलट बोलणे, उलट मारणे ह्यावर काय करावे कळत नाही, मार हा लास्ट पर्याय ठेवते. चूक आहे हे कळते पण मोस्टली मोबाईल सवय नियंत्रणात ठेवण्यासाठी हे करावेच लागते.
अभ्यासा साठी मार खात नाही. Happy

हो.
दीड तासाच्या व्याख्यानानं होणार नाही असं काम एका फटक्यात होतं.

आम्हाला आमच्या आईनं पुरतं कुटून काढलेलं आहे लहानपणी. तरी त्यासाठी तिच्याबद्दल मुळीच राग मनात नाही. मजाच वाटते.

मी पण लेकीला फटका ठेऊन द्यायचे. बरं झालं आई तू मला शिस्त लावलीस ते असं म्हणते आता Happy

मी लहानपणी बाबांच्या हात चा मार खाल्ला आहे पण जराही कटू भावना नाहित त्यांच्या विषयी. उलट आदर आणि कौतुक च आहे. जडण घडणी वर असतं बरंचसं. पण आई बाबा सोडून बाकी बाहेरच्या कुणा/कुणी ला मार द्यायचा अधिकार दिलेला नाही. Wink

फटके मारणे हा अगदी शेवटचा आणि नाईलाजाने करायचा उपाय. माझा मुलगा १० वर्षाचा झाल्यावर जवळजवळ बंद केलयं.आणि फटके नाहीच. एखादाच फटका.

@ मानव,
तुम्ही म्हणता तसे मलाही हे वाटलेले की हा विषय चाचाचो असेल पण यावर फार चर्चा झालेली आढळली नाही.
कदाचित आपल्या जनरेशपर्यंत लहान मुलांना मारणे हे ईतके कॉमन असेल की यावर चर्चा करावी असा हा विषयच नसेल.

पण आता पालकांची एक वेगळी पिढी उदयास येतेय जी काही नवे विचार आणतेय. पॅरेंटींग बदलतेय. आपल्याला त्यासोबतच चालायला हवे. अन्यथा आपण आपल्या मुलांना मारतोय, पण त्यांच्या मित्रांकडे वेगळी परीस्थिती आहे असे नको व्हायला.

दीड तासाच्या व्याख्यानानं होणार नाही असं काम एका फटक्यात होतं.
>>>>>
A picture is worth a thousand words सारखे वाटले. पिक्चरच्या जागी फटका टाका Happy

एखादा दणका द्यावा लागतोच. द्यावाच. मुलांची आई करतेय ना ते काम मग बस. अजुन तु नको मारामार करू.
एकाचा धाक पुरेसा आहे. आणि आईने मारलं धोपटलं तर बरंच असतं हा माझा अनुभव.
आमच्याकडे मुलांचा पप्पा कधीही न मारणारा आहे. चिडतो रागवतो. पण मारणार नाहीच कधी. मी ती कसर भरुन काढते.
एखादा फटका देना तो बनता है यार.

आम्हा भावंडांना आईने लहानपणी व्यवस्थित मारले आहे. कदाचित वाईट वाटले असेल त्यावेळी. पण या बाबतीत तिचा राग नाही आला तिचा. कारण चूक कुणाची आहे हे स्पष्ट होते.
आत्ता "आज्जी भयंकर रागीट आहे. आम्हाला कुटून काढायची. तुला मारत नाहीये तर तिचे ऐक किंवा आज्जीला विचार, ती हो म्हणाली तर ठीक." असा त्याचा वापर केला जातो. आज्जीही आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना कसे मारायचो याची एक्झॅगरेटेड उदाहरणे सांगून शिस्त लावायच्या कामी हातभार लावते.

जवळच्या नात्यात मात्र एका आईने मुलांची चूक नसताना किंवा अगदीच मायनर कारण असताना बाहेरचा राग घरात मुलांवर काढला आणि मुलांच्या मोठेपणी संबंध वाईट झाले हे उदाहरण आहे.

दोन मुलींना बोट देखिल न लावता वाढवलेले कपल माहित आहे. मुली खरंच गुणी आहेत. माझ्यात एवढा पेशन्स नाही. एखाद फटका जातोच.

आजिबात नाही.
लहान मुले प्रतिकार करू शकत नाहीत म्हणून त्यांना मारले जाते. हे घाव विसरले जात नाहीत. काही एकलकोंडी बनतात तर काही कोडगी. मुलांना देखिल मारणे, बळ वापरून प्रश्न सोडवणे हाच न्याय्य आणि एकमेव मार्ग वाटू लागतो. अशी हिंसा सहन करावी लागलेली मुले मोठेपणी गुन्हेगारी मार्गाला लागतात असे दिसते. शिस्त महत्वाची आहेच पण त्यासाठी मारणे गैर असे मावैम.

माझी मुलगी बाळ असताना मी हि ठरवलेलं कि हिच्यावर हात उगारायचा नाही. (लहानपणीची बऱ्याच पट्ट्या मी आणि बहिणीने लपवून ठेवलेल्या आईला मारताना मिळू नयेत म्हणून ) माझे उच्च विचार कि हि बिचारी लहान आहे आपल्याला मारू शकत नाही म्हणून आपण का तिच्यावर हात उगारावे, प्रेमाने हि समजवता येते वैगरे वैगरे . पण आता कळलं कि असं काहीही नसत, एक धपाटा द्यावाच लागतो.
मेधा म्हणाली तस ' दीड तासाच्या व्याख्यानानं होणार नाही असं काम एका फटक्यात होतं.' तरीही मी तिला इजा होईल असं मारत नाही फक्त धाक बसावा एवढंच. (तिला किती धाक बसतो माहीत नाही :-))

माझा एक कलीग म्हणालेला ' पहिल्या मुलीच्या वेळी ठरवलेले कि हिच्यासोबत मित्रासारखे रहायचे , मारायचे नाही वैगरे , दुसरी मुलगी होईपर्यँत चुका सुधरत गेलो आणि फटके दिल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आले.

काही बायका मुलांना चटका देतात हातावर ते मला अघोरी वाटतं . माझ्या मैत्रिणीच्या आईने तिला लहानपणी हातावर चटका दिलेला. मला तेव्हाही खूप आच्छर्य आणि वाईट हि वाटले होते. आई आम्हाला मारायची तेव्हा राग यायचा पण तेवढ्या पुरत. बाबांनी कधीही हात उगारला नाही

काही बायका मुलांना चटका देतात हातावर ते मला अघोरी वाटतं >>> +७८६

जेवण बनवताना हातातला गरम काविलता दाखवून चटका देऊ का म्हणून भिती घालणे वेगळे, ती टेंडेंन्सी बरेचदा आढळते.. अगदी चहा पितानाही कपाचा चटका देऊ का म्हणून हूल दिली जाते.
पण खरेच चटका देणे फार क्रूर आहे.

मुळात धपाटा काय किती जोरात मारावा आणि कुठे नेमका मारावा हे सारे आपल्या कंट्रोलमध्ये असते. चटका देणे, हात पिरगाळणे, डोक्यात मारणे, लांबून काहीतरी फेकून मारणे, जवळून पट्ट्याने मारणे हे सगळेच प्रकार वाईट वाटतात. त्याचे परीणामही बरेचदा आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. काही कमी जास्त झाले तर कोण जबाबदार..
तसेच थोबाडीतही कधी मारू नये. आणि लाथेने मारू नये. हे दोन्ही प्रकार ईन्सल्ट केल्यासारखे वाटतात. पोरांचाही सेल्फ रिस्पेक्ट जपायला हवा.

कोणत्या वयातील मुलांना धाक रहावा म्हणून मारावे ह्याचा पण विचार करावा लागतो.
वय वर्ष दहा पर्यंत अगदीच इलाज नसेल तर एक दोन फटके द्यायला हरकत नाही.
मुलांना मारा किंवा रागवा पण घरात चार भिंती च्या आत.
शेजारी,नातेवाईक ह्यांच्या समोर दहा वर्ष वरील मुलांना रागवू किंवा मारू नये ते त्यांना insulting वाटते.
आणि मोठ्या मुलांना मारूच नये.
रागाच्या भरात ती मुल तुम्हाला उलट मारण्याची शक्यता असते.
18 ते वीस वर्षाच्या मुलांशी तर खूप जपून वागावे.
असे वागावे की धाक पण राहील आणि नात्यात कटू पना पण येणार नाही

मुलांच्या बाबतीत फटाक्यांमुळे किती दुखले हा प्रश्न गौण असतो. आपण अगदी आवेशाने हात उगारून त्यांच्या पाठीला नुसता स्पर्श केला तरी त्यांना ते अपमानास्पद आणि गुन्हेगारास द्यावी तशी वागणूक दिल्यासारखे वाटते. मारण्यामागचा क्रोध, संताप, बडबड, मोठ्याने बोलणे, त्यांच्यावर ओरडणे हे त्यांना आवडत नाही.

मी 6 महिन्यापूर्वी पर्यंत हे कसोशीने पाळले.
मध्ये एकदा frustrate होउन मुलीला फटका दिला तर थोड्या वेळाने ये ऊन ती म्हणाली, आ ई आत्ता कसा तू मला मी xyz करत नाहीये म्हणून फटका दिलास तसा गरज पडल्यास फटका देउन माझा अभ्यास करून घेशील का ... Total ROFL moment होती माझ्याकरता.

मी आपलं प्रत्येक गोष्टीत लॉजिक लावून चूक बरोबर सांगत बसत होते, पण तिला फटका पसंत पडला.. Proud

शाळेत अनेक शिक्षक मारायचे. त्यात तेव्हाही रागच यायचा. आज इतकी वर्षे झाल्यावर त्यांची कीवच येते. मारुन.शिस्त.लागत. नाही.
तेव्हा इतकी अक्कल न्हवती. पण आज वाटतं त्या रांगेने २०-२५ मुलांच्या हातावर पट्टी मारणार्‍या बाईंच्या हातावर एकाने जरी शाब्दिक का होईना पट्टी मारली असती तरी त्या अ.जि.बा.त. सुधारल्या नसत्या. उलट उत्तर देणार्‍याला आणखी मारलं असतं, त्याच्या पालकांना बोलावून आणखी तमाशा केला असता. परत शाळेत मुलं कायम चूक शिक्षक काय ते सद्गुणाचे पुतळे असलं सगळं वातावरण. त्यामुळे कोणा मुलाला न्याय मिळणे दुरापास्त!
थोडक्यात, मोठ्यामाणसांना क्रोध बाहेर काढायचं आऊटलेट म्हणजे जे रिटॅलिएट करू शकत नाहीत त्यांना मारणे.
मी काही सद्गुणाचा पुतळा नाही, कधीमधी फटका मारलाच असेल पण तो शिस्त लावावी इ. लार्जर दॅन लाईफ कारणासाठी आवश्यक होता असा मुलामा अजिबात देणार नाही. इट्स डिसगस्टिंग! माझा रागावर ताबा राहिला नाही. त्यात फक्त आणि फक्त माझी चूक होती. ती चूक परत होणार नाही याची काळजी घेतो. शारीरिक इजा न करता प्रत्येक परिस्थितीत मार्ग काढणे शक्य असलेच पाहिजे.

अमितव + 1

भारतात हे टेकन फॉर ग्रांटेड आहे.. सब मारते है..अपने पेरेंट्स भी मारते थे.. चला आपण पण मारूया...

माझ्या मते टाईम आउट देणे हा बेस्ट पर्याय आहे मारण्याला...

मी आजपर्यंत ८ वर्षांत एकदाहि मुलीला मारलं नाहीये. नवऱ्याने पण नाही. मुलांना मारणं चूकच आहे. आम्ही लहान असताना बाबांनी कधी बोट पण लावल नाही आम्हाला. आई क्वचित एखादी चापट मारायची. पण बाबांचा आणि आईचा खूप धाक होता आणि आज पण आहे. मारून कधीच मुलं सुधरत नाहीत.
इथे (अमेरिकेत) तसंही मुलांना मारणं गुन्हा आहे. अर्थात देसी पेरेन्टस मारतातच थोडंफार. मला माझ्या एका मैत्रिणीला मुलाला चापट मारताना पाहून प्रचंड आश्चर्य वाटलं. बाकी पूर्ण अमेरिकन असणारी ही मैत्रीण मुलांना कशी काय मारू शकते हे मला कळतच नाही.

मुलं आपल्यापेक्षा फिजिकली वीक असतात ,प्रतिकार करु शकत नाहीत म्हणुन फटका मारता का? उद्या मुलांनी जसा त्रास दिला तसं बॉसने दिला तर माराल का फटका ?
छोटी मुलं आहेत ती. पालक म्हणुन काय शिकवित आहात कि हताश व्ह्यायला झाल कि फिजिकल फोर्स वापरला तरी चालेल ?
आणि स्वतःच्या आई वडीलांनी मारलं त्याच काही वाटत नाही. योग्यच केल वगैरे वाटत असेल तर मुलांकडूनही तीच अपेक्षा ? अख्ख्या एका पिढीचा फरक आपल्यात आणि त्यांच्यात आहे. किती गृहित धरणार मुलांना ?
मी अजिब्बातच आदर्श पालक नाही. किंबहुना रोज काहीतरी चुका होतच असतील माझ्याकडून. पण कुठेही फिजिकल फोर्स वापरण, आपल्यापेक्षा कमकुवत व्यक्तीला कमी लेखणं (मुलं किंवा कुणीही) फार चुकीचे वाटते.
चुक झालीच तर दुसरे उपाय आहेत कि सुधारण्यासाठी. आपण चुका करतो तेव्हा स्वतःला फिजिकली हर्ट करतो कि सुधरण्याचे उपाय कंसिस्टली करुन त्या चुका न करण्याचा प्रयत्न करतो ?

मुलांना मारणं चूकच आहे. मारून कधीच मुलं सुधरत नाहीत. >>> अगदी बरोबर आहे. पण हि पुढची पिढी प्रचंड स्मार्ट आहे. सगळ्यातच लॉजिकल reasoning लागतं त्याना. आणि मारून तर काही फायदा नाहीच आहे. पण तरी अधे मध्ये छोटासा फटका पडतोच खूप अतीच झालं तर. time out खरोखर चांगला पर्याय आहे पण तितक्या patience ने प्रत्येक वेळी बसले जाईलच असे नाही. Time आऊट, शांत बसून आपण काय केले ह्याचा विचार करणे आणि पुढच्या वेळी हे का करू नये इतके जर समजले तर conquered but may not work always for all.

मी तर सीमा च्या पुढे जाऊन म्हणणार होतो की आता आपले आई -वडील ७०+ चे झाले असतील. ते ही मुलांइतकेच ऐकत नाहीत. प्रसंगी हेकट बनतात. त्यांना ही मारायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे सुधारतील.

बरेच जनरलायझेशन होतेय.
बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या जात आहेत.
जसे की
१) पालक ईतर गोष्टींचा राग वा फ्रस्टेशन मुलांवर काढत असतात.
-- हे कारण असणे जरूरी नाही.

२) मुले वीक असतात, प्रतिकार करू शकत नाही म्हणून त्यांना मारले जाते.
--- हे सुद्धा जरूरी नाही. जगात आजूबाजूला ईतरही कमकुवत घटक असतात. पण ते दुर्बळ आहेत म्हणून आपण त्यांना मारत सुटत नाही. तर आपल्याच पोरांना का उगाचच ते दुर्बळ आहेत म्हणून मारू?

३) मुले त्रास देतात म्हणून पालक त्यांना मारतात. बॉसचा त्रास झाला तर माराल का?
-- मुळात मुलांचा आपल्याला त्रास होतो म्हणूनच त्यांना मारले जाते असे नसते. तर मुलांनी त्रासदायक वागू नये. चांगले वर्तन करावे यासाठी मारले जाते. बॉसला सुधरवायचा ठेका आपण का घ्यावा? त्याचे आईवडील बायकापोरे बघून घेतील Happy

आणि हो. मुलांनाही कोणी ऊठसूठ मारत नाही. आपलीच असतात ती. जेव्हा प्रेमाने, समजूतीने सांगूनही ते त्यांचे वर्तन बदलत नसतील तेव्हा कधीतरी एक धपाटा येतो.
म्हणजे पोराने सोफ्यावर उड्या मारल्या. घातला एक धपाटा. पोरांनी दूध प्यायला नकार दिला. मारली एक थोबाडीत. असे नसते ते. बरेचदा मागे मारलेल्या धपाट्याची आठवण करून देणेही पुरेसे ठरते.

४) आजची जनरेशन स्मार्ट आहे........
-- प्रत्येक जनरेशन याबाबतीत स्मार्ट असते. आमचीही होती. आम्हीही घरच्यांचा थोडाफार का होईना मार खाल्ला. पण त्याने कधी मनात निगेटीव्ह विचार नाही आले. कधी घरच्यांचा राग नाही आला. आपली चुक झाली, मार पडला. ती चूक चुकून झाली नाही, तर हे चुकीचे आहे माहीत असूनही आपण ती केली, त्यामुळे मार पडला. तरीही मारणारे आपलेच आईवडील आहेत, जे आपले हितचिंतकच आहेत. हे त्या वयात समजणे हा स्मार्टनेस नाही का झाला Happy

मुलांनाही मारायला केव्हा सुरुवात होते हे देखील ईथे लक्षात घ्यायला हवे. जर मूल दोनतीन वर्षाचे असेल. त्याला सांगितलेले कळावे ईतकी समजच नसेल तर त्याला मारलेही जात नाही. कारण त्याने समजून घ्यावे अशी अपेक्षाच नसते. त्यावेळी तो आपल्या स्वभावानुसार कमी जास्त दंगा घालणारच, जो आपण झेलायचा असतो.
ज्या वयात मुलांना सांगितलेले समजतेय, तरी ते पुन्हा पुन्हा सांगूनही चुकीचे वागत असतील तेव्हा धपाटा येतो.
मग एक वय येते जेव्हा आईबापालाही कळते की आता या वयाच्या मुलांना मारू नये. आणि मुलांनाही कळते आता आपले मार खायचे वय राहिले नाही. तेव्हा हे धपाटे आपसूक बंद होतात.

-----------

असो,
तर अजून एक सांगायचा मुद्दा हा,
न मारताही मुलांना चारचौघात त्यांच्या मित्रांसमोर ओरडून त्यांचा अपमान करणारे असू शकतात.
तर मारणारे पालकही तो मार गपचूप घरात देतात. पण बाहेर मुलांवर ओरडून चारचौघात त्याला लाजवू नये याची काळजी घेणारेही असतात.

त्यामुळे मारा किंवा नका मारू. पण तो बेसिक सेन्स असणे गरजेचे. मुलांचे मन समजून घेणे आणि त्यांनाही सेल्फ रिस्पेक्ट असतो याची जाण असणे महत्वाचे.

तुर्तास शुभरात्री Happy

अभिषेक भाउ, तुम्ही जर का या धाग्यावर एकही पोस्टस कुठल्याच आयडीने यानंतर लिहिणार नाही अशी शपथ घेत असाल तर नक्की लिहिन तुमच्या पोस्टला उत्तर.
अमित, अगदी तेच लिहिणार होते मी. पप्पा - आई आलेत इथे थोडे दिवसासाठी आणि अज्जिब्बात ऐकत नाहीत माझे. छडीच घेते उद्यापासून. Lol

Pages