लहान मुलांना फटके मारावेत का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 September, 2022 - 12:30

लहान मुलांना फटके मारावेत का?

गेले चार वर्षे या प्रश्नाचे उत्तर शोधतोय.

मी स्वत: एकेकाळी लहान मुलांना मारू नये या मताचा होतो. सोशल साईटवरील चर्चात मी या माझ्या मताला बरेचदा डिफेंडही केले. एकेकाळी जैसे बोलावे तैसे वागावे म्हणत कधी मुलांवर हात उचलला नव्हता. पण पुढे जाणवले हे काम करत नाहीये. त्यामुळे सध्या आमच्या घरात गरजेनुसार मुलांना मारणे अलाऊड केले आहे.

मुलांना धाक राहावा असे मारणे मला जमत नाही. म्हणून आम्ही मध्यंतरी बाथरूममध्ये बंद करणे हा प्रकार सुरू केलेला. पण नंतर तो चुकीचा वाटला. मुलांच्या मनात त्याने भिती राहतेय असे वाटले. म्हणून ते बंद केले. सध्या तशीच गरज पडलीच तर मारायचे काम त्यांची आई करते. मुलांवर कोणाच्या तरी माराचा (वा कुठल्याही प्रकारचा) धाक असावा असे वाटते.

शेवटी एक पालक म्हणून आपण काय बघतो, तर मुलांना योग्य वळण लागावे, त्यांची मानसिक जडणघडण योग्य व्हावी, चांगले शिस्त आणि संस्कार त्यांच्या अंगी बाणवावेत. विचार नेहमी त्यांच्या हिताचाच असतो. फक्त प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. जे प्रत्येक मुलानुसार बदलू शकतात. तरी आपण जे करतो ते योग्य वा अयोग्य हे कुठेतरी पडताळून घेणे गरजेचे आहे.

लहान मुलांचे मानसशास्त्र हा फार गहन विषय आहे. पण तरीही तो आपल्या सर्वांना माहीत असणे, याबद्दल जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. यावर विविध दृष्टीकोनातून आणि आपापल्या अनुभवांतून चर्चा झालेली आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मारायची तीव्र इच्छा होण्या. मागे मुलांचे हे वर्तन कारणीभूत असते
१) मोबाईल टीव्ही चा अतिशय जास्त प्रमाणात वापर सूचना देवून पण पालकांकडे दुर्लक्ष.
२) सकाळी वेळेवर न उठणे आणि रात्री खूप उशिरा झोपणे.
३) पालकांना ,किंवा जवळच्या लोकांना प्रतेक वेळेस प्रती उत्तर देणे त्यांचे बिलकुल नाही ऐकणे.
४) अभ्यास करण्याच्या वेळेत दुसरेच काही तरी करणे.
५) शाळेत चुकीचं वर्तन करणे.
६) विनाकारण हिंसक होणे.
७) शाळा क्लास मधून वेळेवर घरी न येणे
अशी अनेक .
८) योग्य आहार न घेणे आणि फास्ट फूड साठी हट्ट करणे.
मुलाने मारले जाते ते त्यांच्या हितासाठी. त्यांचे भविष्य चांगले व्हावे म्हणून.
काही पालक विनाकारण पण मारतात.
मुल चुकीचे वागण्याचे सर्वात मोठे कारण असते .
पालक मधील तीव्र मतभेद.
बघावे तेव्हा मुलांसमोर च आई वडील मध्ये भांडण,मतभेद,.
व्यसनी पालक,मुलांना वेळ न देणारे पालक.

ते ही मुलांइतकेच ऐकत नाहीत. प्रसंगी हेकट बनतात. त्यांना ही मारायला सुरुवात केली पाहिजे. >>>>> आवडलं.आई म्हणते की म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण!असं म्हणून आपलेच खरं करायला बघते.एकदोनदा हे म्हणून झाले आहे.

@ सीमा
मुलांना मारणे आणि वृद्ध आईवडिलांना मारणे यांची आपापसात जी तुम्ही तुलना केली आहे यावरून असे लक्षात येतेय की मुलांना पालक का मारतात हे अजूनही आपल्या लक्षात आले नाहीये. केवळ ते आपले ऐकत नाहीत वा त्रास देत आहेत वा पलटून मारू शकत नाही म्हणून त्यांना मारले जाते हेच अजूनही आपल्या डोक्यात आहे.

तसेच मुलांचेच नियम आपण वृद्ध आईवडीलांना लावत आहात म्हणजे चाईल्ड सायकॉलॉजी म्हणून काही वेगळे असते यावर आपण काट मारली आहे. आपण सगळे एकाच तागडीत घेतले आहे.

त्यापेक्षा तुम्ही वयामुळे हट्टी झालेल्या पालकांशी कसे वागावे हा वेगळा धागा काढा. तिथे त्यानुसार प्रतिसाद देता येतील. सरमिसळ करू नका. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

झाल्यास त्रास देणाऱ्या बॉसशी कसे डील करावे याचाही वेगळा धागा काढा. त्यावरचे प्रतिसादही आणखी वेगळे असतील.

आणखी एक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - मुलांना धपाटा घालणारे आईवडील म्हणजे क्रूर, आणि न मारणारे आदर्शवादी असे काही नसते. हा गैरसमज आधी डोक्यातून काढून टाका Happy

ऋनमेष

" मुल त्रास देतात म्हणून त्यांना पालक मारतात हे पहिले डोक्यातून काढून टाका "
हे वाक्य एकदम परफेक्ट वर्णन केले आहे.

on 21 September, 2022 - 01:29 > अभिषेक , माझ्या मनातले लिहिलेस. मला एवढ्या चांगल्या पद्धतीने लिहिता आले नसते .
मुल त्रास देतात म्हणून त्यांना पालक मारतात हे पहिले डोक्यातून काढून टाका > +९९९९९९९

मुलांना धपाटा घालणारे आईवडील म्हणजे क्रूर, आणि न मारणारे आदर्शवादी असे काही नसते. हा गैरसमज आधी डोक्यातून काढून टाका >>
ॠ ला अनुमोदन देण्याचे दिवस आलेत Happy

मुलांना धपाटा घालणारे आईवडील म्हणजे क्रूर, आणि न मारणारे आदर्शवादी असे काही नसते. हा गैरसमज आधी डोक्यातून काढून टाका >> +७८६

मी तर मुलीला म्हणते की तेव्हा तुझे गाल किती मस्त गोरे गोबरे आणि टेम्टींग होते. साॅलिड मजा वाटायची एक ठेऊन देताना. Wink

ॠ ला अनुमोदन देण्याचे दिवस आलेत Happy >>> हे आवडलंय Happy

आठ वर्षाच्या मुलाला गरम तव्याला हात नको लावूस हे समजत नाही. हाssय आहे समजत नाही. बाऊ होईल समजत नाही. पण हातावर एक हलकीशी चापट आणि मग नssको ची खूण पटकन समजते.

तसंच...फटका देणं ही साधी गोष्ट आहे. पण मुलांशी अबोला धरणं हे जास्त क्रूर आहे. आणि फटका किंवा धपाटा हा हलका, गमतीत ते जीवघेणा अशा ब-याच कॅटॅगरीज आहेत. मुलांना समजावून सांगताना लेव्हल वन फटकाच असतो नाॅर्मली.

असो...मी दुर्बलांना शारीरीक मारहाण नको ह्याच मताची आहे पण मुलांना जरूर फटका/धपाटा द्यावा.

पूर्वी आम्ही म्हणायचो,

साने गुरूजी म्हणतात मुलं म्हणजे फुलं,
आमची आई म्हणते, मुलं म्हणजे धुणं.

अशी आमची आई आम्हाला तरीही खूप खूप आवडते. Wink

धन्यवाद सर्वांना

पण मुलांशी अबोला धरणं हे जास्त क्रूर आहे. >>> मेधावि +७८६ .. अगदीच. किंबहुना हे फार मोठे शस्त्र आहे. हे जपून ठेवावे. मुलं मोठी झाल्यावर एखादी मोठी चूक करतील तेव्हासाठी. आपण ही चूक केलेली तेव्हा आईवडीलांनी आपल्याशी अबोला धरलेला हे मुलांच्या मनात ठसून राहावे आणि त्यांनी पुन्हा तसे करू नये यासाठी.

लहान वयाच्या मुलांसाठी मात्र हे जास्त ताणले तर ईमोशनल हॅरासमेंट ठरू शकते. त्यापेक्षा छानसा धपाटा द्यावा. ते आपल्यालाच बिलगून रडतात. ते रडणे मारलेल्याच्या दुखण्यामुळे नसून ती त्यांची भावनिक गरज असते. अबोला धरताना तीच आपण नाकारतो. त्यापेक्षा धपाटा मारून पाठीवरून हात फिरवून मॅटर क्लोज करावा. लहान मुलांच्या मनात काही राहत नाही हेच तर त्यांचे वैशिष्ट्य असते.

लहान मुलांना मारायचं की नाही हे त्यांच्या वयावर अवलंबून आहे.
पाच वर्षांपुढील मुलांना मारू शकतो, या मताची मी आहे. कारण त्याखालील वयाच्या मुलांच्या अंगी तेवढी शक्ती नसते.
माझी मोठी कन्या जेव्हा पाच वर्षाची झाली, तेव्हा तिला मी सांगून ठेवले होते की तुझ्या चुका झाल्या किंवा मला राग अनावर झाला तर मी मार देऊ शकते. तिला ते व्यवस्थित कळले. तशी ॲडव्हान्स कल्पना मी तिला दिली होती. पण मारायची वेळ फारच कमी वेळ आली.
पण मारताना मी ठराविक जागीच मारते की जेणेकरून तिला त्रास होणार नाही. उगा कानफाडात किंवा डोक्यात मारत नाही, वस्तू घेऊनही मारत नाही.
शारीरिक सुरक्षा बद्दल एक दोन प्रश्न झाले तेव्हा मी तिला फटके दिले होते. गरजेचे असतात कधी कधी. आणि लहान मुलांना एक जरब बसणे गरजेचे असते.

एखादा धपाटा आणि हिंसाचार या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत हे प्रत्येक पालकाला समजतं. पण आगाऊपणा ची, हट्टीपणाची आणि चिडखोरपणाची साखळी कुठेतरी तुटावी म्हणून एक फटका दिला जातो. मग थोडावेळ भोकाड (वयानुसार बदल होऊ शकतो) आणि मग बराच वेळ कोपर्यात पडून असलेलं खेळणंसुद्धा घेऊन मजेत वेळ जातो. आठवत पण नाही आधीचं काही.
माझी २ वर्षाची चिमुरडी दिवसातून १ तरी चापटी खातेच. पण मग ५०-६० पाप्या आणि १-२ चापट्या असा बॅलन्स्ड डाएट आहे आमच्याकडे.

माझी २ वर्षाची चिमुरडी दिवसातून १ तरी चापटी खातेच.
>>> दोन वर्षाच्या मुलीला काय कळते चापट्या मारून? This is horrible ...

त्यात काय आहे horrible? आणि चापटी अशी किती जोरात बसत असेल असं वाटतं तुम्हाला? २ वर्षाच्या मुलाला सांगून फार गोष्टी कळत नाहीत. तिथे चापटी works. Eg. दिव्याची ज्योतीला हात लावू नको, सुरी हातात घेऊ नको, मोबाईलला डोळे चिकटवू नको etc. etc.

दोन वर्षाच्या मुलापासून सुरी, जळते दिवे, मोबाईल दूर ठेवावे एवढी साधी अक्कल जर पालकांना नसेल आणि त्यांना मार देणे हाच 'उपाय' वाटत असेल ते शेखी मारुन सांगत त्याचं ही समर्थन करणारी समानशील लोकं असतील तर आनंद आहे. बेजबाबदारपणाला सीमा नसते हे जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद!

मला वाटतं सगळ्या द्वाड मुलांच्या आईबापांनी आपली मुलं इथल्या आदर्शवादी पेरेंट्स कडे बेबीसिटिंगला पाठवावी म्हणजे सगळेच खूष Wink

दोन वर्षाच्या मुलापासून सुरी, जळते दिवे, मोबाईल दूर ठेवावे एवढी साधी अक्कल जर पालकांना नसेल आणि त्यांना मार देणे हाच 'उपाय' वाटत असेल ते शेखी मारुन सांगत त्याचं ही समर्थन करणारी समानशील लोकं असतील तर आनंद आहे. बेजबाबदारपणाला सीमा नसते हे जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद!>>> अरे ब्बाप्परे... असं आहे होय! आता चंद्रावर राहणार्या लोकांशी माझ्यासारखी साधी अक्कल नसणारी बेजबाबदार बाई काय वाद घालणार?
ता. क. आमच्या मिरवणार्या 'शेखी'कडे दुर्लक्ष करण्याचा उपाय आहे हो तुमच्याकडे. तुमचा बहुमुल्य वेळ आमच्यासारख्या पामरांवर वाया घालवू नका.

बाकी वर मारण्याचं समर्थन करणार्‍यांपैकी... मारणारे नाही, तर कृतीचं समर्थन करणार्‍यांपैकी किती लोकांना दोन वर्षांच्या खालच्या मुलांना फटके मारण्याचं ही समर्थन करायचं आहे? आय होप एकही व्यक्ती या अत्याचाराचं समर्थन करणार नाही. बघुया तुमचं कोणी समर्थन करतं का ते.

>>मुलांना धपाटा घालणारे आईवडील म्हणजे क्रूर, आणि न मारणारे आदर्शवादी असे काही नसते. हा गैरसमज आधी डोक्यातून काढून टाका >> असं कोण कधी म्हणालं? स्ट्रोमन आहे हा! हे तूच म्हणतो आहेस.

रोज दिसणारी दृश्य.
शाळेत सोडताना मुलांना अशा हात नी पकडले जाते मुल वाहतूक चालू असणाऱ्या बाजूला असतात
आणि पालकांचा ग्रुप मस्त गप्पा मारत चालत असतो(पालक म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही)
दोन चाकी वाहनावर अतिशय लहान मुलांना मागे बसवले जाते ती पेंगत असतात ..
खूप भीतीदायक वाटते बघायला.
अतिशय लहान मूल ह्या घरात आहे तिथे नको त्या वस्तू हाताला येतील अशा ठिकाणी असतात...
जे दिसेल ते तोंडात घालणे मुलांचा स्वभाव असतो.
त्या मुळे अनेक अपघात घडलेल्या घटना आहेतं.
१३ ते १४ वर्षाच्या लहान मुलांना गाडी चालविण्यास देणे हा प्रकार पण पालक करतात .
आणि दुःख दायक घटना घडते.
पालकांनी जबाबदारी नी कसे वागावे असा धागा असावा
ऋनमेष तुझ्यासाठी नवीन विषय

बाप रे! इथल्या पोस्टी भयंकर आहेत! मुलांना मारण्याचे इतके सरसकट समर्थन?
मला राग अनावर झाला तर मी मार देऊ शकते. >>> तुमचेच वाक्य वाचा पुन्हा. "मला राग आवरला नाही तर ... " यात प्रॉब्लेम तुमचा आहे हे खरंच लक्षात येत नाही का?
एखादा धपाटा आणि हिंसाचार या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत हे प्रत्येक पालकाला समजतं >>> हे कशावरून? केवळ पालक आहेत म्हणजे त्याना सगळे समजते? "राग अनावर" होणारे पालक इथेच दिसताहेत! व्यक्ती तितक्या प्रकृती! एकदा का मारणे ओके हे म्हटले की चापट मारणे पण योग्य , चिमटा घेणे, चटका देणे, लाथा घालणे सगळेच बरोबर ठरते मग. पालक झाले म्हणजे सगळे अ‍ॅडल्ट्स प्रेमळच असे गृहित धरताय तुम्ही हाच सर्वात मोठा भाबडेपणा आहे. बघा विचार करून.
अमितव ला अनुमोदन. लहान मुले ऐकत नसली, चुकीचे वागत असली तर सोपा मार्ग - मारून आपले फ्रस्ट्रेशन काढणे. ती उलट मारू शकत नाहीत! . अवघड मार्ग - त्यांना त्या क्रियेपासून परावृत्त करणे, पण पालकांना इतके कष्ट घ्यायचे नसतात!
न मारणे यात आदर्श वगैरे काही नाही. साधी माणुसकी आहे.

इथे टिपिकल इंडियन Vs. अमेरिकन पालक सुरू झालयं.
हे जे आम्ही मुलांना बोटही लावत नाही म्हणतायत ते मुलांबरोबर रोज किती वेळ घालवतात?
का ६ तास डे केअर-६ तास स्कुल आणि ८ तास वेगळ्या बेडरूममध्ये झोपणं ?

६ तास डे केअर-६ तास स्कुल आणि ८ तास वेगळ्या बेडरूममध्ये झोपणं >>> पुन्हा तेच. हे पुन्हा स्टिरिओटाइपिंग झालं ना Happy सगळे पालक कळकळीनेच मारतात , सगळे अमेरिकन पालक वेळ देत नाहीतच हे जजमेन्ट कशावरून?आणि वेगळे झोपण्याचा काय संबंध ?
मूळ टॉपिक बद्दल बोला की. लहान मुलांना न मारणे ही इतकी अशक्य , एलियन कॉन्सेप्ट वाटते आहे का?

अमेरिकन आणि इंडीअनचा संबंध कसा आणि कुठे आला? अमेरिकेत चाईल्ड अब्युज होत नाही असं वाटतंय का? तर तसं अजिबात नाही. अमेरिकेत चिक्कार चाईल्ड अब्युझ होतो.
पण म्हणून तो आपण करायचा का नाही. किमान त्याचं समर्थन तरी करायचं का नाही हा आपला आपला विचार!

ते मुलांबरोबर रोज किती वेळ घालवतात?
का ६ तास डे केअर-६ तास स्कुल आणि ८ तास वेगळ्या बेडरूममध्ये झोपणं ?>>>>मग जे जास्त वेळ मुलांबरोबर असतात त्यांनी मुलांना मारावे का? बाकिच्यांनी सुट्टीच्या दिवशी मारावे.

जे पालक आपल्या मुलांना वेळप्रसंगी फटका, चापटी, धापाटा द्यावा असे समर्थन करत आहेत त्यांच्या घरी मोठ्या भावंडाने लाहान भावंडाला फटका, चापटी, धापाटा, ढकलून देणं होतें का?
म्हणजे मोठ्या भावंडाला लहान्याची चूक दिसली किंवा त्याचा राग अनावर झाला तर त्याने लहान्याला घातलेला धपाटा ग्राह्य आहे हे तुम्ही त्या लहान भावंडाला सांगाल की लहान भावंडाला मारले म्हणून मोठ्याला पुन्हा फटका, चापटी, धापाटा द्याल.?
लहान्याला मारायचे नाही हे मोठ्याला फटका मारून समजावे लागत असेल तर आपल्या मारण्यातला फोलपणा कळणे अवघड नाही.
आणि लहान्याला मारू नये हे तुम्ही मोठ्याला समजावणीच्या सुरात सांगत असाल तर तो आपला समजावणीचा सूर आपल्याला का लागू होत नाही हे तपासून पहाण्याची गरज आहे असे वाटते.

मी मुलांबरोबर वेळ घालवला म्हणजे मी त्यांना मारू शकतो/शकते हे खतरनाक लॉजिक आहे... हे डिस्कशन होत राहिलंच पण दोन वर्षाच्या मुलीला सुरीला हात लावते, जळत्या ज्योतीला हात लावते.. मोबाईल जवळ धरून बघते म्हणून मारणे अती होतंय... एक तर इतक्या लहान मुलाला मोबाईल तुम्हीच लावून दिला.. सवय तुम्हीच लावली... दोन वर्षाचे पोर स्वतः मोबाईल चालू करून बघत असेल असे मला तरी वाटत नाही...
सूरी आणि दिवा तिला ऍक्सेसिबल ठेवला तर तिला कुतूहल वाटणारच.. असे मारत राहिला तर क्युरिओसिटी कशी डेव्हलप होणार याचा विचार करा...
मारणे हाच उपाय आहे का? स्वतःलाच विचारा...

बाकी गेली २.५ वर्षे आणि आता कायमच.... शाळेचा वेळ सोडला तर रोज १८ तास मुलांबरोबरच घालवतो.
हो, झोपेचे तास ते त्यांच्या खोलीत झोपतात. माझ्या बेडवर झोपली तर तीच मला मारतात. लाथा. पण तेव्हा त्यांना ओरडलो तरी उलटी लाथ घालत नाही. पण तुम्ही झोपेत मारत नसाल ना? का मारता? मी तरी झोपेत स्वप्न वगैरे पडलं आणि ते रडत उठून आले तर न मारता न ओरडता त्यांना परत झोपवतो. कधी तिकडेच लाथा खात झोपतो कधी माझ्या बेडवर येऊन झोपतो.

मारणे हेच समस्येचे समाधान ज्यांना वाटते त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर द्याल का ?
मुलाला चापट मारून, धपाटा मारून जर ऐकले नाही तर? तर काय करावे ?
ही काही परग्रहावरची, अमेरिकेतली वगैरे केस नसून अगदी कॉमन गोष्ट आहे. तुम्हाला सोपा पेपर आला असेल तर तुम्ही लकी आहात. पण काही पालकांना अवघड पेपर येतो! एखाद्या मुलाला लर्निंग डीसेबिलिटी असू शकते, काहींना खरोखरच बिहेवियर इश्यूजही असू शकतील. तर मग आता पुढे ? मारूनही ऐकले नाही तर काय ? अजून जोरात मारणे?पालक म्हणून हे ऐकायला कसे वाटते, किती लॉजिकल वाटते याचा पुन्हा विचार करा!
आपल्यावेळी अमूक असं होतं आमचं काय वाकडं झालं असा ठोकळेबाज विचार होतो आहे का? "हॅ! मारल्याशिवाय मुले सुधारत नाहीत, हे न मारणे वगैरे अमेरिकन थेरं " असे आपण स्वस्तात रुल आउट करत आहोत का ? न मारता शिस्त लावता येईल का या विचाराला थारा तर द्या की ओपन माइंड ठेवून ! ( इथे मान्य नका करू हवं तर Happy )
या विषयावर खूप वाचन करा असे सुचवेन. "positive discipline" गुगल करा.

Pages