थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन आणि नैतिक प्रश्न

Submitted by कुमार१ on 29 July, 2022 - 02:36

नुकताच घडलेला एक किस्सा.
माझ्या मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मला फोन केला. तो म्हणाला," माझ्या मुलासाठी मुलीचे एक स्थळ आलेले आहे. त्या मुलीला नुकताच कोविड होऊन गेला होता आणि त्यादरम्यान तिला रक्तगुठळी होण्याची तक्रारही उद्भवली होती. त्या अनुषंगाने त्या मुलीच्या अन्य काही रक्तचाचण्या केल्या गेल्या. त्यात तिला हिमोग्लोबिनच्या संदर्भात बीटा-थॅलसिमिया ट्रेट हा दोष असल्याचे आढळले होते".

संबंधित मुलीच्या वडिलांनी माझ्या मित्राला ते सर्व रिपोर्ट्स दाखवले. आता त्या मुलीतील तो रक्तदोष पाहता काय करावे असा पेच त्याला पडला. मग त्याने मला सर्व रिपोर्टस् पाठवून माझा सल्ला विचारला.

थॅलसिमिया हा मुळात ( लिंगभेदविरहित) आनुवंशिक आजार असून तो दोन प्रकारे दिसू शकतो:
१. जन्मापासूनच प्रत्यक्ष आजार होणे अशा बालकांचे हिमोग्लोबिन कायमच कमी राहते आणि त्यांची शारीरिक वाढ प्रचंड खुंटते.

२. संबंधित व्यक्तीला आजार नसतो परंतु ती त्या दोषाची वाहक असते. जर अशा व्यक्तीची विशिष्ट रक्तचाचणी कधी केलीच नाही तर तो दोष असल्याचे समजणार देखील नाही.

भारतात दरवर्षी हा आजार असलेली सुमारे 10,000 बालके जन्माला येतात. तसेच निव्वळ हा दोषवाहक असलेल्या व्यक्तींचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण 3-17 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

या लेखाचा उद्देश या आजाराची सखोल माहिती देणे हा नाही. परंतु त्याचे गांभीर्य समजण्यासाठी अजून थोडी माहिती.
या आजाराचे उपचार खूप कटकटीचे आहेत.
सतत निरोगी माणसाचे रक्त संक्रमणाद्वारे घेणे इथपासून ते मूळ पेशी आणि जनुकीय उपचार इथपर्यंत त्यांची व्याप्ती आहे.
वारंवार रक्त संक्रमण घेतल्याने शरीराच्या मेंदू सकट सर्व महत्त्वाच्या इंद्रियांमध्ये लोह जमा होऊ लागते. ते काढण्यासाठी अजून औषधे घ्या....
एकंदरीत अशा रुग्णांचे आयुष्य दुःसह असते.
हे सर्व पाहता या आजाराची बालके जन्माला न येणे हे फार महत्त्वाचे आहे. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ.
....

तूर्त आपण माझ्या मित्राचा किस्सा पुढे नेऊ आणि त्या अनुषंगाने जे सामाजिक प्रश्न उपस्थित होतात त्यावर चर्चा करू.

त्या मुलीचे सर्व रिपोर्ट्स मी वाचले आणि त्यावर मनन केले. त्यानंतर मी माझ्या मित्राला अशी माहिती दिली :

१. त्या मुलीला जरी प्रत्यक्ष हा आजार नसला तरी ती त्या आजाराची वाहक आहे .
समजा, तिचा संभाव्य नवरा पण थॅलसिमियाचा दोषवाहक असेल, तर मग त्यांना होणाऱ्या मुलांमध्ये प्रत्यक्ष तो आजार होण्याची शक्यता असते. ती शक्यता प्रत्येक गरोदरपणात 25% राहते.

२. म्हणजेच, इथे आपल्याला मित्राच्या मुलाचीही हिमोग्लोबिन संदर्भातली ती विशिष्ट चाचणी करून बघावी लागेल. त्याचा जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार वैद्यकीय समुपदेशन घेता येईल.
जर जोडीदारांपैकी एकच वाहक असेल आणि दुसरा पूर्ण निरोगी, तर मग लग्न करायला हरकत नाही.
अशा जोडप्याला जन्मणाऱ्या मुलांमध्ये कोणालाच प्रत्यक्ष (मेजर) आजार नसतो. दोषवाहक संतती जन्मण्याची शक्यता 50% राहते.

झालं ! इथे माझे सल्ला देण्याचे काम संपले. तूर्त हे प्रकरण माझ्या नजरेआड आहे. माझा मित्र पुढे काय करणार आहे याची मला सध्या तरी कल्पना नाही.

चर्चेसाठी म्हणून आपण अशा प्रकरणातील संभाव्य शक्यता पाहू:
त्या मुलाची रक्तचाचणी केली गेली तर दोन शक्यता आहेत :
१. त्याचा रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल येईल किंवा
२. त्याच्यातही तोच दोष निघेल.

समजा, तोच वाहकदोष या मुलात आढळलाय. आता प्रश्न असा आहे, की संबंधित मुलगा व मुलीने या विवाहाबाबत काय निर्णय घ्यावा?

१. निव्वळ थियरीनुसार पाहता या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर, त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करू नये असे देता येईल पण…..
२. समजा, मुलगा व मुलीला एकमेकांच्या बाकीच्या गोष्टी खूप आवडलेल्या आहेत आणि ते एकमेकाला पसंत आहेत. तर मग आजाराचे समान दोषवाहक या मुद्द्यावरून त्यांनी लग्न करू नये का ?

नैतिकदृष्ट्या आपण त्यांना एकमेकांशी लग्न न करण्याचा सल्ला देऊ शकत नाही !

माझ्या वाचनानुसार भारतात विवाहपूर्व समुपदेशन आणि हा दोष आढळल्यास विवाहप्रतिबंध या संदर्भात कायदे नाहीत. थॅलसिमियाच्या संदर्भात सौदी अरेबियासारख्या देशात विवाहपूर्व चाचण्या करणे आणि समुपदेशन सक्तीचे आहे. परंतु समान दोषवाहक असूनही अनेक विवाहेच्छु मुले मुली एकमेकांशी लग्न करतातच.

या विषयाला एक महत्त्वाचा सामाजिक पदर देखील आहे. समजा, एखाद्या तरुण किंवा तरुणीमध्ये तो वाहकदोष आहे. त्याने किंवा तिने तो विवाहपूर्व उघड केला आणि तो पाहून अनेक जणांनी जर प्रथमदर्शनीच त्यांच्याशी लग्न करायला नकार दिला, तर त्याचे मानसिक परिणाम वाईट होतात. असे जर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले तर त्याचे सामाजिक दुष्परिणामही होतील.

वरील उदाहरण आपण कल्पनेने पुढे नेऊ. त्या दोघांमध्येही समान दोष आढळला परंतु त्याची फिकीर न करता त्यांनी एकमेकांशी लग्न केलंय.
आता पुनरुत्पादन या संदर्भात त्यांना काय करता येईल ?

१. डोक्याला कुठलाच त्रास नको असेल तर मुले होऊ न देणे हा एक उपाय आहे ! समजा, तशीही त्यांची "डिंक" पद्धतीने सुखात राहायची तयारी असेल तर मग प्रश्नच मिटला. सुंठेवाचून खोकला गेला.

२.पण समजा तसे नाहीये. त्यांना स्वतःचीच मुले हवी आहेत. मग संबंधित स्त्री गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तिमाहीत गर्भावरील काही गुंतागुंतीच्या चाचण्या कराव्या लागतील. त्यातून जर लक्षात आले की गर्भाला तो आजार नाही, तर चांगलेच. परंतु तो आजार असल्याचे लक्षात आले तर मग पुन्हा एकदा निर्णयाची गुंतागुंत निर्माण होईल- गर्भपात करण्यासंबंधी.

३. वरील परिस्थिती येऊ द्यायची नसल्यास कृत्रिम गर्भधारणा हा एक मार्ग सुचवता येतो. यामध्ये प्रयोगशाळेत गर्भनिर्मिती केली जाते. मग तंत्रज्ञानाच्या मदतीने, जेव्हां तो गर्भ दोषविरहित असल्याची खात्री होते तेव्हाच तो स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. अर्थात हे उपचार बरेच खर्चिक, कटकटीचे आणि मानसिक ताण वाढवणारे असतात. ते सर्वांनाच ते पसंत पडत नाहीत किंवा परवडत नाहीत.

अशा प्रकरणांमध्ये सुवर्णमध्य निघेल असा सल्ला काय देता येईल?
१. गरज पडल्यास वरील २ व ३ या गोष्टी करायच्या नसतील तर पुनरुत्पादनाच्या फंदात न पडता मूल दत्तक घेणे.

२. स्वतःचेच मूल हवे असल्यास अपत्यांची संख्या एकदम मर्यादित ठेवणे- शक्यतो एकच.

वैद्यकीय समुपदेशकांचा सल्ला ही या प्रश्नाची एक बाजू आहे. परंतु दुसऱ्या बाजूस पाहता समाज, संस्कृती, चालीरीती, रक्ताच्या नात्यांमधील विवाह, मानवी हक्क आणि व्यक्तीस्वातंत्र्य असे असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत. या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार करून कायदे तयार करणे हे काम सोपे नसते.
……………..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मुलीच्या वडिलांनी माझ्या मित्राला ते सर्व रिपोर्ट्स दाखवले. >>
व्यक्तिशः मला हा प्रामाणिकपणा आवडला.

दरवर्षी सहा हजार बालके ही सरासरी अगदीच किरकोळ आहे.

या दोषाचे निदान लग्नानंतर झाले असते तर काय केले असते? झालेले लग्न मोडले असते का?

हा दोष Thalassemia minima, Thalassemia intermedia किंवा Beta thalassemia major यापैकी कुठल्या प्रकारचा आहे, ते डॉक्टरचे मत विचारणे गरजेचं आहे, असे वाटते.

धन्यवाद.
वडिलांचा प्रामाणिकपणा खरंच छान.
..
या मुली संबंधात लेखात हे ठळकपणे दिलेलेच आहे:
बीटा-थॅलसिमिया ट्रेट
म्हणजेच मायनर, म्हणजेच फक्त वाहक असणे.
...
***दरवर्षी सहा हजार बालके ही सरासरी अगदीच किरकोळ आहे. >>>

या आजाराचे उपचार खूप कटकटीचे आहेत.
सतत निरोगी माणसाचे रक्त संक्रमणाद्वारे घेणे इथपासून ते मूळ पेशी आणि जनुकीय उपचार इथपर्यंत त्यांची व्याप्ती आहे.
वारंवार रक्त संक्रमण घेतल्याने शरीराच्या मेंदू सकट सर्व महत्त्वाच्या इंद्रियांमध्ये लोह जमा होऊ लागते. ते काढण्यासाठी अजून औषधे घ्या....

एकंदरीत अशा रुग्णांचे आयुष्य दुःसह असते.
हे सर्व पाहता या आजाराची बालके जन्माला न येणे हे फार महत्त्वाचे आहे. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा निर्विवादपणे श्रेष्ठ.

तो प्रतिबंध आपण कुठल्या पातळीवर विचार करणार आहोत हा चर्चेचा मुद्दा आहे.

भारतात सिंधी कम्युनितीत बहुतेक प्रमाण अधिक आहे,
कृपया कन्फर्म करावे

आताच गुगलवर पाहिले , अमिताभ बच्चंनलापण आहे म्हणून

म्हणजेच,
प्रतिबंधाचा विचार...
१. विवाहपूर्व ,का
२. विवाहोत्तर प्रजनन निर्णयापूर्वी ,का
३. गर्भपात.?

BC
सिंधी समाजात तो बऱ्यापैकी आहे परंतु त्या लोकांच्या उपजातीनुसार त्यामध्ये बऱ्यापैकी फरक दिसून येतो:

A large study done among the Sindhis of Nagpur in Maharashtra had shown the prevalence of β-thalassemia trait to be 16.81 % (Mulchandani et al. 2008). However the prevalence was found to be extremely variable among the subcastes of Sindhis, Larkhana Sindhis showed the highest prevalence (17 %) while Dadu Sindhis showed the lowest prevalence (8 %) of β-thalassemia (Jawahirani et al. 2007).

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3537975/

छान लेख.
त्यांना स्वतःचीच मुले हवी आहेत. मग संबंधित स्त्री गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तिमाहीत गर्भावरील काही गुंतागुंतीच्या चाचण्या कराव्या लागतील. त्यातून जर लक्षात आले की गर्भाला तो आजार नाही, तर चांगलेच. परंतु.>>>> गर्भ राहील्यावर चाचण्या करण्यापेक्षा आधीच जेनेटीक चाचण्या, समुपदेशन करून पुढे होणारी गुंतागुंत टाळता येऊ शकेल ना.
तिचा संभाव्य नवरा पण थॅलसिमियाचा दोषवाहक असेल, तर मग त्यांना होणाऱ्या मुलांमध्ये :
१. प्रत्यक्ष तो आजार होण्याची शक्यता असते. ती शक्यता प्रत्येक गरोदरपणात 25% राहते.
२. तसेच दोषवाहक संतती जन्माला घालायची शक्यताप्रत्येक गरोदरपणात 50% राहते.>>>> असे असेल तर IVF करून दोषमुक्त embryo निवडता येतो आणि तो पुढे वाढवता येतो.
या आजाराबद्दल मला माहीत नाही पण जेनेटीक समुपदेशन आणि IVF च्या उपचाराने दोषमुक्त बाळ जन्माला घालणारे एक दांपत्य ओळखीत आहे.

सर्व प्रतिसादकांचे आभार !
***समुपदेशन आणि IVF च्या उपचाराने
>>>
होय ,हाही उपाय आहे.
तो लिहिणे मी टाळले होते.
सर्वांनाच तो पसंत पडतो असे नाही

>>>>>>>>.असे असेल तर IVF करून दोषमुक्त embryo निवडता येतो आणि तो पुढे वाढवता येतो.
अरे वा!!! हे काहीही माहित नव्हते.

ठरवुन लग्न करत असतील तर अर्थात करू नये. ज्या लग्नात प्रेम अजुन अस्तित्वात नाही, किमान आकर्षण ही असेल का नाही याबाबत वरील माहिती वरुन शंका आहे... पण दोष म्हणता येतील अशा गोष्टी माहित आहेत, त्या संबंधात कशाला पडा?
आता त्या मुलीला ठरवुनच लग्न करायचं असेल तर अशा ब्लड टेस्ट करू नयेत. आणि केल्यातर ही माहिती लपवुन ठेवावी. हे फेअर नाही, आणि मोरली साफ चूक आहे. पण इट इज व्हॉट इट इज! ठरवून लग्न ही माल बघुन सौदा करायची पद्धत आहे. तुमच्या मालातील एका वैगुण्यावर डोळेझाक करायला दुसरं काही जोरकसं असेल तर सौदा होईल. (हे मुलगा मुलगी दोन्हीना लागू. या केस मध्ये मुलगी आहे आणि सौदा शब्द वापरला म्हणून मनात वेगळ्या तारा झंकारल्या जातील म्हणून स्पष्ट केलं)
स्वतः पुढाकार घेऊन आपला जोडिदार शोधणे हा पर्याय आहेच.

आपल्या कुणाचा ही डीएनए अ‍ॅनलाईझ केला तर ज्ञात अज्ञात अनेकोनेक त्रुटी असणारच आहेत. पण हे संबंध याच एंपरिकल माहितीच्या आधारे पुढे न्यायचे आहेत, ज्यात निसर्गाने दिलेले प्रेम आकर्षण बिलकुल नाही आणि मानव निर्मित वधूवर सूचक मंडळ, आऊ चा काऊ मंडळ आहे तिकडे निदान जे माहित आहे त्यातून योग्य निर्णय घ्यावा.

सगळ्यात महत्त्वाचं: प्रेम असेल तर सगळं नक्की पार होतं. मुल होऊ न देणे, गर्भावर चाचण्याकरुन गर्भपात करणे, आयव्हीएफ असेल तर आणखी उत्तम असे अनेक उपाय वर दिलेले आहेतच.

सर्वांना धन्यवाद.
या मुलीच्या बाबतीत थॅलसिमियासाठी ठरवून चाळणी चाचणी अजिबात केलेली नाही.

मुळात तिला झालेल्या कोविडनी रक्तवाहिन्यांमधील गुठळी हा प्रकार खूप गुंतागुंतीचा झाला. तिचे Hb कमीच राहू लागले. त्यामुळे तिच्या इतरही अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या गेल्या.
त्यात योगायोगाने ती थॅलसिमियाची दोषवाहक असल्याचे सापडले आहे.

दोघे वाहक असले तर लग्न करू नये.
एकच जण वाहक असेल तर परिस्थिती ची नीट कल्पना देऊन दोन्ही बाजूनी संमती असेल तर लग्न करावं.

बेटा थॅलेसेमियासाठी CRSIPR टेक्नॉलॉजीचे परिणाम चांगले आढळले आहेत. ह्या मुलीला आता उपयोग नाही झाला तरी अन्य रूग्णांसाठी - येत्या १० वर्षात हा आजार बरा होणार्‍यातला आजार ठरू शकतो.

G6PD , antimalarials
यात प्रॉब्लेम येतात का ?

चांगली चर्चा. सर्वांना धन्यवाद !

**एकच जण वाहक असेल तर परिस्थिती ची नीट कल्पना देऊन>>>

जर जोडीदारांपैकी एकच वाहक असेल आणि दुसरा पूर्ण निरोगी, तर मग लग्न करूनच घ्यावे.

अशा परिस्थितीत होणाऱ्या मुलांमध्ये कोणालाच प्रत्यक्ष (मेजर) आजार नसतो. दोषवाहक संतती जन्मण्याची शक्यता 50% राहते.

CRSIPR टेक्नॉलॉजीचे परिणाम >>>>

मानवी जनुकीय संपादन व दुरुस्तीचे हे नवे क्रांतिकारी संशोधन आहे. ते प्रस्थापित व्हायला बरीच वर्षे जातील. सध्या त्याचे विविध प्रयोग चालू आहेत. त्याचे स्वागत.
या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे, निसर्गदत्त जनुकांमध्ये मानवी ढवळाढवळ केल्याने अन्य काही समस्या उद्भवतील का , ही आहे.
नुकतेच हे इसराएली संशोधन वाचण्यात आले :
https://www.haaretz.com/israel-news/2022-07-27/ty-article-magazine/.prem...

या उपचारांचे दुष्परिणाम म्हणजे, गुणसूत्रे तुटणे आणि कर्करोग उद्भवणे असे असू शकतील अशी भीती काही वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
सवडीने सविस्तर वाचावे लागेल.

G6 PD defi. यात प्रॉब्लेम येतात का ?
>>>
हा एक लालपेशींच्या एंजाइम न्यूनतेचा अनुवंशिक आजार आहे. सर्वसाधारणपणे स्त्रिया या आजाराच्या दोषवाहक असतात तर पुरुषांना प्रत्यक्ष आजार होतो.

अर्थात आजार झालेल्या बहुसंख्य रुग्णांना फारशा उपचारांची गरज पडत नाही. काही खाद्यपदार्थ व औषधे टाळणे पुरेसे असते.

ठराविक देशांमध्ये याची चाळणी चाचणी नवजात बालकात किंवा विद्यार्थीदशेत केली जाते तर काही देशांमध्ये गरोदरपणात करतात. बहारीनमध्ये या संदर्भात कायदा केल्याचे वाचण्यात आले.

जनुकी य आजार हे वेगळेच फील्ड आहे. काल हा लेख वाचून हीमोफिलीआची पण आठवण आली. रशियाचा शेवटाचा झार ह्याचा एकुलता एक मुलगा झारकीचा वारस( झारेविच) ह्यालच हा असाध्य जनुकीय आजार झालेला असतो. व झार झारीण अगदी उध्वस्त झालेले मनानी. काही ही उपाय करतात. त्यातून रासपुतीनचा प्रवेश होतो व्गैरे. ह्या सर्व राजकीय फॅमिलीज एक मेकांत लग्ने करत. हाप्स बर्ग, जर्मन रॉयल्स, हे रशिअन्स, आपले ब्रिटि श रॉयल्स हे एक मेकां त लग्न करतात. ह्यामुळे जीन पूल रेस्ट्रिक्ट होतो व जे जनुकीय डिफेक्ट असतात ते मॅग्निफाय होतात. विश्वाचा नियम हा डायवर्सिटी. जीन पूल जितका विस्तारत जाईल तितके त्यातले डिफेक्ट पुढे पुढे विरळ होतील. ( सामान्य ज्ञान आहे जेनेटिक्स ची पदवी नाही मजकडे काही चुकले तर जरूर दुरुस्त करा.)

तशी तर कॅन्सर व इतर रोगांची पण जनुकीय चाचणी लग्ना आधी व्हायला हवी. नाहीतर होणार्‍या परिणामांना सामोरे जावे लागेलच. एकमेकांवरील प्रेम व समजुतदार पणा असल्यास सांसरिक प्रश्न सुटतील. त्या चि सौ कांला अनेक उत्तम आशीर्वाद.

तशी तर कॅन्सर व इतर रोगांची पण जनुकीय चाचणी लग्ना आधी व्हायला हवी. नाहीतर होणार्‍या परिणामांना सामोरे जावे लागेलच.

>>>> जनुकीय चाळणी चाचण्यांची यादी पाहता एक तारतम्य ठेवणे महत्त्वाचे. सर्व चाचण्या सर्वजणांमध्ये करायला नकोतच.
वंश, कौटुंबिक इतिहास किंवा आजाराचे धोके वाढवणारे घटक ज्या लोकांमध्ये असतात त्यांच्यापुरत्या ठराविक चाचण्या करता येतात.

>>>>>>>ह्या सर्व राजकीय फॅमिलीज एक मेकांत लग्ने करत. हाप्स बर्ग, जर्मन रॉयल्स, हे रशिअन्स, आपले ब्रिटि श रॉयल्स हे एक मेकां त लग्न करतात. ह्यामुळे जीन पूल रेस्ट्रिक्ट होतो व जे जनुकीय डिफेक्ट असतात ते मॅग्निफाय होतात.
पारसी समाज.

मुळामध्ये इंटरमॅरेज जरा धोक्याचे आहे. जनुकीय रोगांच्या बाबतीत. प्रॉबाबिलिटी वाढते नं.

+१
..
रच्याकने...
थॅलसेमिया या शब्दाची व्युत्पत्ती रोचक आहे.
ग्रीक भाषेत Thalassa = समुद्र.

हा आजार प्रथम भूमध्य समुद्रा भोवती राहणाऱ्या वसाहतींमध्ये आढळला होता. याव्यतिरिक्त तो आफ्रिका खंड, आखाती देश आणि भारतासह सार्क देशांमध्ये बर्यापैकी आढळतो.

Pages