थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन आणि नैतिक प्रश्न

Submitted by कुमार१ on 29 July, 2022 - 02:36

नुकताच घडलेला एक किस्सा.
माझ्या मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मला फोन केला. तो म्हणाला," माझ्या मुलासाठी मुलीचे एक स्थळ आलेले आहे. त्या मुलीला नुकताच कोविड होऊन गेला होता आणि त्यादरम्यान तिला रक्तगुठळी होण्याची तक्रारही उद्भवली होती. त्या अनुषंगाने त्या मुलीच्या अन्य काही रक्तचाचण्या केल्या गेल्या. त्यात तिला हिमोग्लोबिनच्या संदर्भात बीटा-थॅलसिमिया ट्रेट हा दोष असल्याचे आढळले होते".

संबंधित मुलीच्या वडिलांनी माझ्या मित्राला ते सर्व रिपोर्ट्स दाखवले. आता त्या मुलीतील तो रक्तदोष पाहता काय करावे असा पेच त्याला पडला. मग त्याने मला सर्व रिपोर्टस् पाठवून माझा सल्ला विचारला.

थॅलसिमिया हा मुळात ( लिंगभेदविरहित) आनुवंशिक आजार असून तो दोन प्रकारे दिसू शकतो:
१. जन्मापासूनच प्रत्यक्ष आजार होणे अशा बालकांचे हिमोग्लोबिन कायमच कमी राहते आणि त्यांची शारीरिक वाढ प्रचंड खुंटते.

२. संबंधित व्यक्तीला आजार नसतो परंतु ती त्या दोषाची वाहक असते. जर अशा व्यक्तीची विशिष्ट रक्तचाचणी कधी केलीच नाही तर तो दोष असल्याचे समजणार देखील नाही.

भारतात दरवर्षी हा आजार असलेली सुमारे 10,000 बालके जन्माला येतात. तसेच निव्वळ हा दोषवाहक असलेल्या व्यक्तींचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण 3-17 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

या लेखाचा उद्देश या आजाराची सखोल माहिती देणे हा नाही. परंतु त्याचे गांभीर्य समजण्यासाठी अजून थोडी माहिती.
या आजाराचे उपचार खूप कटकटीचे आहेत.
सतत निरोगी माणसाचे रक्त संक्रमणाद्वारे घेणे इथपासून ते मूळ पेशी आणि जनुकीय उपचार इथपर्यंत त्यांची व्याप्ती आहे.
वारंवार रक्त संक्रमण घेतल्याने शरीराच्या मेंदू सकट सर्व महत्त्वाच्या इंद्रियांमध्ये लोह जमा होऊ लागते. ते काढण्यासाठी अजून औषधे घ्या....
एकंदरीत अशा रुग्णांचे आयुष्य दुःसह असते.
हे सर्व पाहता या आजाराची बालके जन्माला न येणे हे फार महत्त्वाचे आहे. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ.
....

तूर्त आपण माझ्या मित्राचा किस्सा पुढे नेऊ आणि त्या अनुषंगाने जे सामाजिक प्रश्न उपस्थित होतात त्यावर चर्चा करू.

त्या मुलीचे सर्व रिपोर्ट्स मी वाचले आणि त्यावर मनन केले. त्यानंतर मी माझ्या मित्राला अशी माहिती दिली :

१. त्या मुलीला जरी प्रत्यक्ष हा आजार नसला तरी ती त्या आजाराची वाहक आहे .
समजा, तिचा संभाव्य नवरा पण थॅलसिमियाचा दोषवाहक असेल, तर मग त्यांना होणाऱ्या मुलांमध्ये प्रत्यक्ष तो आजार होण्याची शक्यता असते. ती शक्यता प्रत्येक गरोदरपणात 25% राहते.

२. म्हणजेच, इथे आपल्याला मित्राच्या मुलाचीही हिमोग्लोबिन संदर्भातली ती विशिष्ट चाचणी करून बघावी लागेल. त्याचा जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार वैद्यकीय समुपदेशन घेता येईल.
जर जोडीदारांपैकी एकच वाहक असेल आणि दुसरा पूर्ण निरोगी, तर मग लग्न करायला हरकत नाही.
अशा जोडप्याला जन्मणाऱ्या मुलांमध्ये कोणालाच प्रत्यक्ष (मेजर) आजार नसतो. दोषवाहक संतती जन्मण्याची शक्यता 50% राहते.

झालं ! इथे माझे सल्ला देण्याचे काम संपले. तूर्त हे प्रकरण माझ्या नजरेआड आहे. माझा मित्र पुढे काय करणार आहे याची मला सध्या तरी कल्पना नाही.

चर्चेसाठी म्हणून आपण अशा प्रकरणातील संभाव्य शक्यता पाहू:
त्या मुलाची रक्तचाचणी केली गेली तर दोन शक्यता आहेत :
१. त्याचा रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल येईल किंवा
२. त्याच्यातही तोच दोष निघेल.

समजा, तोच वाहकदोष या मुलात आढळलाय. आता प्रश्न असा आहे, की संबंधित मुलगा व मुलीने या विवाहाबाबत काय निर्णय घ्यावा?

१. निव्वळ थियरीनुसार पाहता या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर, त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करू नये असे देता येईल पण…..
२. समजा, मुलगा व मुलीला एकमेकांच्या बाकीच्या गोष्टी खूप आवडलेल्या आहेत आणि ते एकमेकाला पसंत आहेत. तर मग आजाराचे समान दोषवाहक या मुद्द्यावरून त्यांनी लग्न करू नये का ?

नैतिकदृष्ट्या आपण त्यांना एकमेकांशी लग्न न करण्याचा सल्ला देऊ शकत नाही !

माझ्या वाचनानुसार भारतात विवाहपूर्व समुपदेशन आणि हा दोष आढळल्यास विवाहप्रतिबंध या संदर्भात कायदे नाहीत. थॅलसिमियाच्या संदर्भात सौदी अरेबियासारख्या देशात विवाहपूर्व चाचण्या करणे आणि समुपदेशन सक्तीचे आहे. परंतु समान दोषवाहक असूनही अनेक विवाहेच्छु मुले मुली एकमेकांशी लग्न करतातच.

या विषयाला एक महत्त्वाचा सामाजिक पदर देखील आहे. समजा, एखाद्या तरुण किंवा तरुणीमध्ये तो वाहकदोष आहे. त्याने किंवा तिने तो विवाहपूर्व उघड केला आणि तो पाहून अनेक जणांनी जर प्रथमदर्शनीच त्यांच्याशी लग्न करायला नकार दिला, तर त्याचे मानसिक परिणाम वाईट होतात. असे जर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले तर त्याचे सामाजिक दुष्परिणामही होतील.

वरील उदाहरण आपण कल्पनेने पुढे नेऊ. त्या दोघांमध्येही समान दोष आढळला परंतु त्याची फिकीर न करता त्यांनी एकमेकांशी लग्न केलंय.
आता पुनरुत्पादन या संदर्भात त्यांना काय करता येईल ?

१. डोक्याला कुठलाच त्रास नको असेल तर मुले होऊ न देणे हा एक उपाय आहे ! समजा, तशीही त्यांची "डिंक" पद्धतीने सुखात राहायची तयारी असेल तर मग प्रश्नच मिटला. सुंठेवाचून खोकला गेला.

२.पण समजा तसे नाहीये. त्यांना स्वतःचीच मुले हवी आहेत. मग संबंधित स्त्री गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तिमाहीत गर्भावरील काही गुंतागुंतीच्या चाचण्या कराव्या लागतील. त्यातून जर लक्षात आले की गर्भाला तो आजार नाही, तर चांगलेच. परंतु तो आजार असल्याचे लक्षात आले तर मग पुन्हा एकदा निर्णयाची गुंतागुंत निर्माण होईल- गर्भपात करण्यासंबंधी.

३. वरील परिस्थिती येऊ द्यायची नसल्यास कृत्रिम गर्भधारणा हा एक मार्ग सुचवता येतो. यामध्ये प्रयोगशाळेत गर्भनिर्मिती केली जाते. मग तंत्रज्ञानाच्या मदतीने, जेव्हां तो गर्भ दोषविरहित असल्याची खात्री होते तेव्हाच तो स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. अर्थात हे उपचार बरेच खर्चिक, कटकटीचे आणि मानसिक ताण वाढवणारे असतात. ते सर्वांनाच ते पसंत पडत नाहीत किंवा परवडत नाहीत.

अशा प्रकरणांमध्ये सुवर्णमध्य निघेल असा सल्ला काय देता येईल?
१. गरज पडल्यास वरील २ व ३ या गोष्टी करायच्या नसतील तर पुनरुत्पादनाच्या फंदात न पडता मूल दत्तक घेणे.

२. स्वतःचेच मूल हवे असल्यास अपत्यांची संख्या एकदम मर्यादित ठेवणे- शक्यतो एकच.

वैद्यकीय समुपदेशकांचा सल्ला ही या प्रश्नाची एक बाजू आहे. परंतु दुसऱ्या बाजूस पाहता समाज, संस्कृती, चालीरीती, रक्ताच्या नात्यांमधील विवाह, मानवी हक्क आणि व्यक्तीस्वातंत्र्य असे असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत. या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार करून कायदे तयार करणे हे काम सोपे नसते.
……………..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवळच्या नात्यांमध्ये किंवा ठराविक समुदयामध्येच विवाह करणे हे अनेक आनुवंशिक आजारांचे एक सर्वसाधारण कारण आहे.
त्यावर बराच वैज्ञानिक खल झालेला आहे. या मुद्द्यावर भरपूर मतभेद आहेत.
परंतु थॅलेसिमिया च्या बाबतीत अजून एक खास कारण आहे
ते जरा वेळाने लिहितो

हा आजार मोठ्या प्रमाणात असणारे जे भौगोलिक प्रदेश आहेत त्यांचे हवामान उष्ण व दमट असते. तिथे पाऊसही चांगल्यापैकी पडतो. पावसाळ्यात डबकी साठतात. त्यातून डासांची उत्पत्ती होते. यातून त्या भागांमध्ये मलेरिया स्थिरावला आणि फोफावला.

१. तिथल्या माणसांच्या अनेक पिढ्यांना वारंवार मलेरिया झाल्यानंतर शरीरात जनुकांच्या पातळीवरील उत्क्रांती हळूहळू सुरू झाली.

२. मलेरियाचा जंतू लाल पेशींवर हल्ला करतो. निरोगी माणसातील लाल पेशींपेक्षा थॅलेसेमिया ( व सिकल सेल आजार) या रुग्णांच्या लाल पेशींचे विशिष्ट गुणधर्म असतात( ते अजून पूर्णपणे समजलेले नाहीत). त्यामुळे मलेरियाच्या जन्तूला या पेशींवर हल्ला करणे अवघड जाते. जरी त्याने हल्ला करून तो आत शिरला तरी तिथे त्याची वाढ रोखली जाते आणि त्याचे आयुष्यही कमी राहते.

३. या सर्व कारणांमुळे संबंधित व्यक्तीला तीव्र मलेरिया होण्यापासून चांगल्यापैकी संरक्षण मिळते.

४. कायमस्वरूपी मलेरियामुळे इथल्या बऱ्याच जनतेला थॅलसिमियाची नैसर्गिक “भेट” मिळाली. तिचे अन्य काही तोटे असले तरी मलेरीयापासून बऱ्याच प्रमाणात संरक्षण हा फायदाही मिळाला.
T. minor च्या बाबतीत तर हे विशेष उपयुक्त ठरले.

उत्तम लेख आणि चर्चा.
ह्या रोगाचे प्रमाण कच्छी समाजात जास्त आहे असे ऐकलेय.

जनुकीय बिघाड झाल्या मुळे होणारे विविध आजार बघून असे नेहमी वाटतं जनुक ही शरीरातील खूप महत्वाचे घटक आहे.
प्रतेक अवयव ची वाढ,प्रतेक अवयव चे कार्य,शरीराचे प्रतेक ज्ञान इंद्रिय, त्याचे कार्य, रोग प्रतिकार शक्ती,औषधांना प्रतिसाद देण्याची कुवत सर्व सर्व काही जनुक वर अवलंबून आहे
त्यांच्यात बिघाड झाला तर उपचार नक्की कुठे आणि काय करायचे हे ठरवणे खरोखर खूप अवघड आहे.
आभाळ च फाटले तर ठिगळ कुठे कुठे लावणार अशी अवस्था होते.
कर्क रोग पासून ,मधुमेह आणि असे अनंत आजार आहेत.
माणसाच्या नशिबात ते येवू नयेत.

Dr. तुम्ही जनुक आणि शरीराचे कार्य ह्या वर एक लेखमाला चालू करा.
जनुकीय बिघाड होवू नये म्हणून काय सावधानता बाळगली पाहिजे ह्या वर पण लिहा.

छान लिहिले आहे.
एखाद्या तरुण किंवा तरुणीमध्ये तो वाहकदोष आहे.>>> प्रत्येक व्यक्ती कुठल्यानकुठल्या आजारांची वाहक असतेच! फक्त समान दोषवाहकासोबत विवाह होण्याची शक्यता अत्यल्प असते. शंभरात एक दोष वाहक असलेल्या व्यक्तीचे तशाच समान दोषवाहक व्यक्तीशी संकर होणे. (०.१%?) तसं होऊनही निसर्ग सुप्रजा निर्मितीसाठी जास्तीत जास्त सहकार्य करतच असतो. मुलं फक्त कॅरिअर असणं वगैरे. तरीही मुलाला गंभीर कंडिशनचे निदान झाल्याशिवाय आपण वाहक आहोत आणि असे काही असते याबाबत पूर्ण अनभिज्ञता असू शकते. सर्वच जेनेटिक कंडिशनचा हाच अल्गोरिदम आहे, म्युटेशन सोडून. आजारापेक्षा कंडिशन किंवा अवस्था शब्द चपखल आहे, कारण आजार बरे होऊ शकतात.

याकरता कझिन मॅरेज, पदरालापदर लागून , गोत्र, नाड, शाखा, पोटशाखा, दुरून पण नात्यात, सजात, पिढ्यानपिढ्या एकाच गावात राहिलेल्या कुटूंबांमधे विवाह हे जीनपूलसाठी अत्यंत हानिकारक आहे.(डबके झाले आहे) तरीही विश्वाच्या अंतापर्यंत निसर्ग काही प्रजेची निर्मिती अशीच सदोष करत राहणारच. हे आपण टाळूच शकत नाही. नवनवीन सदोष जनुकं तयार होत राहणार. याची काळजी गर्भधारण होईपर्यंतच, एकदा जीव जन्माला आला की मेडिकल सायन्सला मर्यादा येतात.
(यामुळे अमेरिकन जीन पूल सर्वांत समृद्ध वाटतो मला )

माझी एक सिंधी मैत्रीण व तिचा महाराष्ट्रीय नवरा दोघेही थालसेमियाचे वाहक आहेत , प्रेमविवाह असल्याने व माहिती नसल्याने त्यांना पहिले बाळ झाल्यावर कळाले, दुसऱ्यावेळी मात्र गर्भजल परिक्षा केली, सुदैवाने दोन्ही मुली सुदृढ़ आहेत.

बंगाली लोकांमधे थालसेमिया चाचणी विवाहापूर्वी करतातच असे एका बंगाली मैत्रिणीने सांगितलेले, त्यातही मुलीचीच करतात, ती वाहक असलीच तर मग मुलाचीही करतात.

सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !
...
१. ह्या रोगाचे प्रमाण कच्छी समाजात जास्त आहे असे ऐकलेय. >>
बरोबर. कच्छी पटेल या जमातीमध्ये त्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.
परंतु भारतात सर्वात जास्त प्रमाण (17 टक्के) हे लारखाना सिंधी या जमातीमध्ये आहे.
...
२. Dr. तुम्ही जनुक आणि शरीराचे कार्य ह्या वर एक लेखमाला चालू करा.
>>> सवडीने विचार करतो.

३. त्यातही मुलीचीच करतात, ती वाहक असलीच तर मग मुलाचीही करतात.
>>>
मुलाचीही आधी करायला हरकत नाही किंवा दोघांची एकदम सुद्धा Happy
मुळात हा लिंगभेदविरहित आजार आहे.

*** तरीही विश्वाच्या अंतापर्यंत निसर्ग काही प्रजेची निर्मिती अशीच सदोष करत राहणारच.
>>> अ ग दी ! +१११

मुळात हा लिंगभेदविरहित आजार आहे.>>> तेच ना कुमार सर, पण तुमच्या या आणि अशा लेखामुळे (नुसते थालसेमिया म्हणून नाही तर जनरलच) विवाहपूर्व समुपदेशनाबाबत सजगता येत असेल, तर हे असे लेख सर्वांसाठीच महत्त्वाचे आहेत. Happy

एक छोटी दुरुस्ती सुचवतो :-

ते ‘लारकाना’ सिंधी आहे, हे लारकाना म्हणजे प्रसिद्ध भुट्टो कुटुंबाचे मूल स्थान, सर्व भुट्टो तिथेच चिरनिद्रेत आहेत.

वर या आजाराच्या भौगोलिक प्रदेशाबद्दल विवेचन केले आहे. त्यात थोडी भर.
ग्रीसमध्ये शतकापूर्वी मलेरिया भरपूर होता त्या अनुषंगाने थॅलेसेमियाचे सहअस्तित्व होते. पुढे 1970 च्या दरम्यान ग्रीसने मलेरिया निर्मूलनात यश मिळवले. पण पुढे आंतरराष्ट्रीय प्रवास वाढल्याने आशिया व आफ्रिकेतून तिथे मलेरिया पुन्हा पसरला.

पण त्याच बरोबर हळूहळू नागरिकांमध्ये थॅलेसेमियाची जागरूकता आणि विवाहपूर्व चाचणी, समुपदेशन या गोष्टींना यश आले. गेल्या काही वर्षांमध्ये ग्रीस आणि इटलीमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण जाणवण्याइतके कमी झालेले आहे.

लारकाना’>>> होय,
मलाही ते माहीत होते. परंतु शोधनिबंधातील Larkhana या इंग्लिश स्पेलिंगचा मी आपला अनुवाद करून टाकला Happy

Thalsimiya
स्त्री आणि पुरुष दोन्ही त्या रोगाने ग्रस्त असतील आणि त्यांचे लग्न झाले तर होणारे मुल १०० टक्के त्या रोगाने ग्रस्त असते .
असे लेखात आहे.
अगोदर रक्त चाचणी करून एक पार्टनर आपण निरिगी शोधून पुढच्या पिढी मधील त्या रोगाचे अस्तित्व कमी करू शकतो.
पण तरी ५० टक्के शक्यता असतेच.
निसर्ग नियमानुसार .
स्त्री आणि पुरुष जे रोग ग्रस्त आहेत त्यांना अनेक मुल होणे गरजेचे आहे.
अपघात म्हणून त्या मधील एक निरोगी निघेल ,
त्याचे जनुक वेगळी असतील. रोगाला प्रतिकार करणारी असतील.
जसे मलेरिया लं प्रतिकार करण्यासाठी लाल पेशीत बदल झाला तसे.
आणि हळू हळू हा जनुकीय दोष नाहीसा होईल .
हा च शस्वत मार्ग आहे.
गर्भात असताना च त्या रोगाची लागण मुलाला झाली आहे का हे माहीत पडत असेल तर दोन तीन गर्भपात करण्यास काहीच अडचण नसावी.

मी कॉलेजमध्ये असताना एका रक्तदान शिबिरात रक्तदान केले होते. तिथे थॅलेसेमिया डिटेक्शनपण चालू होतं. त्यामुळे मी थॅलेसेमिया मायनर कॅरियर आहे, हे कळले. तेव्हा ह्याबद्दल फार कमी माहिती वाचायला मिळायची, त्यामुळे काही दिवस आई-बाबांचे अस्वस्थ गेले. मी तेव्हा तासनतास पोहणे, जमेल तसं ट्रेकिंग करत होते. त्यामुळे स्टॅमिना उत्तम होता.
पुढे शिक्षण संपल्यावर लग्नाच्या वेळी नवऱ्याची रक्त तपासणी करून तो कॅरियर नाही, ह्याची खात्री करून घेतली. लग्नानंतर तीन वर्षांनी मुलगा झाला. परमेश्वर कृपेने त्याची प्रकृती छान होती. आता तो सव्वीस वर्षांचा उंचपुरा तरूण आहे. पण ही एक किणकिण डोक्यात असल्याने एकाच अपत्यावर थांबलो.
माझं हिमोग्लोबिन सदैव कमी असतं. मुलांच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांना ती काळजी होती. पण नॉर्मल डिलिव्हरी झाली. तेवढ्याच हिमोग्लोबिन वर मी कैलास मानस सरोवर यात्राही केली. बाकी जनतेइतकी किंवा किंचीत जास्त दमले. मुलाला ही सर्व कल्पना आहे. त्याला पुन्हा एकदा रक्ततपासणी करण्याची आठवण करायला हवी.
इतकं लिहीण्याचा उद्देश इतकाच की तीस वर्षांपूर्वी हा थोडा टॅबू असलेला विषय होता. मुलीच्या चष्म्याच्या नंबरवरूनही लग्न ठरायला अडचण येत असे. हा तर आरोग्यासंबंधीत विषय! आता परिस्थिती बदलली. त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास कॅरियल व्यक्तीला सामान्य आयुष्य जगता येतं.
अवांतर म्हणजे अमिताभ बच्चनही थॅलेसेमिया कॅरियर आहे, असं वाचलं होतं. तेवढंच त्यांच्या -माझ्यातलं साम्य!!

तेवढ्याच हिमोग्लोबिन वर मी कैलास मानस सरोवर यात्राही केली.
>>>
वा, अभिनंदन !!
समाजात ही जागरूकता वाढते आहे हे पाहून बरे वाटते

अश्विनीमावशी, अहो असं काही नाही. मी एक सामान्य, कोमट आयुष्य जगणारी मध्यमवयीन बाई आहे.
अशा गोष्टींबद्दल फारसं बोलू नये, असा दबाव असतो. इथे मोकळेपणाने सांगता आलं, तर मलाच छान वाटतं आहे.
हिमोग्लोबिन कमी असल्याने रक्तदान मात्र करता येत नाही.

@ अनया
प्रतिसाद आवडला.... खूप सकारात्मक आहात....

माझे लग्न झाले तेव्हा hiv एड्स ह्या रोगाने थैमान घातले होते
लग्न केल्या मुळे आणि आजार लपविल्या मुळे अनेक निष्पाप स्त्री पुरुषांच्या आयुष्यात एड्स आला होता.
तेव्हा माझ्या होणाऱ्या बायकोने माझ्या कडे hiv च रिपोर्ट मागितला होता.
आणि मी तो दिलं.
काही वाईट वाटले नाहीं

मला थॅलॅसीमिया minor अहे he pregnancy मध्ये कळ्ले. लहानपणापासून नेहमीच अनेमिक होते मी.पण काहीही लक्षात आल नाही. गेल्या १०-१५ वर्षात आपल्याकडे अवेअरनेस आलाय याबद्दल. पहिले तर माहीतच नव्हत या आजाराबद्दल इव्हन डॉक्टरांना. नशिबाने नवरा नेगेटिव्ह आहे. पण माझ्यामुळे मुलीला पण आहे. प्रेग्नन्ट असताना ७ आयर्न infussions घेतले. डिलिव्हरी झाल्यावरही खूप प्रचंड anemia होता.
हा आजार Mediterranean लोकांमध्ये फार आहे. Greek लोकांमध्ये. कदाचित tithunch aplyakade ala asel.

मला थॅलॅसीमिया minor अहे he pregnancy मध्ये कळ्ले. लहानपणापासून नेहमीच अनेमिक होते मी.पण काहीही लक्षात आल नाही. गेल्या १०-१५ वर्षात आपल्याकडे अवेअरनेस आलाय याबद्दल. पहिले तर माहीतच नव्हत या आजाराबद्दल इव्हन डॉक्टरांना. नशिबाने नवरा नेगेटिव्ह आहे. पण माझ्यामुळे मुलीला पण आहे. प्रेग्नन्ट असताना ७ आयर्न infussions घेतले. डिलिव्हरी झाल्यावरही खूप प्रचंड anemia होता.
हा आजार Mediterranean लोकांमध्ये फार आहे. Greek लोकांमध्ये. कदाचित tithunch aplyakade ala asel.

मी पण थॅलसिमिया मायनर आहे. कॉलेज मध्ये या विषयावर जनजागृती करायला एक संस्था आली होती त्यांनी त्यावेळी सगळ्यांना टेस्ट करून घ्यायला लावली होती.

नंतर टिव्ही वर त्या लहान मुलीची जाहिरात बघून (जी सगळ्यांना थँक्यू म्हणत असते) आणि क्राय आणि तत्सम फाऊंडेशन कडून येणारे अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या लहान मुलांचे फोटो बघून या विकाराचे गांभीर्य लक्षात आले.

या आजाराचे वाहक असलेल्या वाचकांचे अनुभव वाचून बरे वाटते आहे.
आस्वाद, पियू तुम्हाला शुभेच्छा.

भारतात आजच्या घडीला 4.2 कोटी टी चे वाहक आहेत; त्यापैकीच आपल्या इथले वरील वाचकही.

अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या लहान मुलांचे फोटो बघून >>>

मी परदेशात काम करत असताना माझ्याबरोबर असलेले दोन तंत्रज्ञ या मेजर आजाराने बाधित होते.
खुरटलेली शारिरीक वाढ म्हणजे काय ते त्यांच्याकडे बघुन समजते आणि धक्काही बसतो.
त्या दोघांचे वय 35 च्या आसपास होते, परंतु दिसायला ते आठवीतल्या मुलाएवढे दिसायचे !
जमेल तितक्या आनंदात ते जीवन व्यतीत करत होते.
अर्थात वारंवार रक्तसंक्रमण घेऊन ते बिचारे पिचलेले असायचे.....

माझ्या संपर्कात मेजर वाल्या 2 व्यक्ती होत्या.त्यांना खूप त्रास व्हायचा.सुदैवाने आता त्यांचे आयुष्य, संसार मुले व्यवस्थित चालू आहे.

https://www.sciencealert.com/bulk-data-from-cancer-trials-remains-hidden...

हे वाचून धक्का च बसला.अशी लपवा लपवी करण्या मागे आर्थिक फायदा हे गणित पण नक्कीच असणार .
सुपर कॉम्प्युटर पासून तीव्र बुद्धी असणारे AI उपलब्ध असून पण .
काही रोगांवर ठोस उपचार उपलब्ध नाहीत
ज्या रोगांवर उपचार खर्च हा खूप मोठा आहे
खूप मोठे जागतिक मार्केट आहे.

कॅन्सर,मधुमेह, thalsimiya पण त्या मधील च एक .
अनेक वर्ष खूप मोठा खर्च होतो.
मार्केट खूप मोठं आहे

वैधकिय व्यवसाय,उपचार ,औषध निर्मिती.
हे सर्व फ्री केले पाहिजे.
कोणतेच गुन्हेगारी कलम त्या साठी नको.
कायद्याच्या कक्षेबाहेर हे क्षेत्र ठेवले तर.
जगातील सर्व रोगांवर अगदी कॅन्सर वर पण .
उपचार उपलब्ध होतील. आणि ते पण खात्री चे.

Pages