थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन आणि नैतिक प्रश्न

Submitted by कुमार१ on 29 July, 2022 - 02:36

नुकताच घडलेला एक किस्सा.
माझ्या मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मला फोन केला. तो म्हणाला," माझ्या मुलासाठी मुलीचे एक स्थळ आलेले आहे. त्या मुलीला नुकताच कोविड होऊन गेला होता आणि त्यादरम्यान तिला रक्तगुठळी होण्याची तक्रारही उद्भवली होती. त्या अनुषंगाने त्या मुलीच्या अन्य काही रक्तचाचण्या केल्या गेल्या. त्यात तिला हिमोग्लोबिनच्या संदर्भात बीटा-थॅलसिमिया ट्रेट हा दोष असल्याचे आढळले होते".

संबंधित मुलीच्या वडिलांनी माझ्या मित्राला ते सर्व रिपोर्ट्स दाखवले. आता त्या मुलीतील तो रक्तदोष पाहता काय करावे असा पेच त्याला पडला. मग त्याने मला सर्व रिपोर्टस् पाठवून माझा सल्ला विचारला.

थॅलसिमिया हा मुळात ( लिंगभेदविरहित) आनुवंशिक आजार असून तो दोन प्रकारे दिसू शकतो:
१. जन्मापासूनच प्रत्यक्ष आजार होणे अशा बालकांचे हिमोग्लोबिन कायमच कमी राहते आणि त्यांची शारीरिक वाढ प्रचंड खुंटते.

२. संबंधित व्यक्तीला आजार नसतो परंतु ती त्या दोषाची वाहक असते. जर अशा व्यक्तीची विशिष्ट रक्तचाचणी कधी केलीच नाही तर तो दोष असल्याचे समजणार देखील नाही.

भारतात दरवर्षी हा आजार असलेली सुमारे 10,000 बालके जन्माला येतात. तसेच निव्वळ हा दोषवाहक असलेल्या व्यक्तींचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण 3-17 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

या लेखाचा उद्देश या आजाराची सखोल माहिती देणे हा नाही. परंतु त्याचे गांभीर्य समजण्यासाठी अजून थोडी माहिती.
या आजाराचे उपचार खूप कटकटीचे आहेत.
सतत निरोगी माणसाचे रक्त संक्रमणाद्वारे घेणे इथपासून ते मूळ पेशी आणि जनुकीय उपचार इथपर्यंत त्यांची व्याप्ती आहे.
वारंवार रक्त संक्रमण घेतल्याने शरीराच्या मेंदू सकट सर्व महत्त्वाच्या इंद्रियांमध्ये लोह जमा होऊ लागते. ते काढण्यासाठी अजून औषधे घ्या....
एकंदरीत अशा रुग्णांचे आयुष्य दुःसह असते.
हे सर्व पाहता या आजाराची बालके जन्माला न येणे हे फार महत्त्वाचे आहे. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ.
....

तूर्त आपण माझ्या मित्राचा किस्सा पुढे नेऊ आणि त्या अनुषंगाने जे सामाजिक प्रश्न उपस्थित होतात त्यावर चर्चा करू.

त्या मुलीचे सर्व रिपोर्ट्स मी वाचले आणि त्यावर मनन केले. त्यानंतर मी माझ्या मित्राला अशी माहिती दिली :

१. त्या मुलीला जरी प्रत्यक्ष हा आजार नसला तरी ती त्या आजाराची वाहक आहे .
समजा, तिचा संभाव्य नवरा पण थॅलसिमियाचा दोषवाहक असेल, तर मग त्यांना होणाऱ्या मुलांमध्ये प्रत्यक्ष तो आजार होण्याची शक्यता असते. ती शक्यता प्रत्येक गरोदरपणात 25% राहते.

२. म्हणजेच, इथे आपल्याला मित्राच्या मुलाचीही हिमोग्लोबिन संदर्भातली ती विशिष्ट चाचणी करून बघावी लागेल. त्याचा जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार वैद्यकीय समुपदेशन घेता येईल.
जर जोडीदारांपैकी एकच वाहक असेल आणि दुसरा पूर्ण निरोगी, तर मग लग्न करायला हरकत नाही.
अशा जोडप्याला जन्मणाऱ्या मुलांमध्ये कोणालाच प्रत्यक्ष (मेजर) आजार नसतो. दोषवाहक संतती जन्मण्याची शक्यता 50% राहते.

झालं ! इथे माझे सल्ला देण्याचे काम संपले. तूर्त हे प्रकरण माझ्या नजरेआड आहे. माझा मित्र पुढे काय करणार आहे याची मला सध्या तरी कल्पना नाही.

चर्चेसाठी म्हणून आपण अशा प्रकरणातील संभाव्य शक्यता पाहू:
त्या मुलाची रक्तचाचणी केली गेली तर दोन शक्यता आहेत :
१. त्याचा रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल येईल किंवा
२. त्याच्यातही तोच दोष निघेल.

समजा, तोच वाहकदोष या मुलात आढळलाय. आता प्रश्न असा आहे, की संबंधित मुलगा व मुलीने या विवाहाबाबत काय निर्णय घ्यावा?

१. निव्वळ थियरीनुसार पाहता या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर, त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करू नये असे देता येईल पण…..
२. समजा, मुलगा व मुलीला एकमेकांच्या बाकीच्या गोष्टी खूप आवडलेल्या आहेत आणि ते एकमेकाला पसंत आहेत. तर मग आजाराचे समान दोषवाहक या मुद्द्यावरून त्यांनी लग्न करू नये का ?

नैतिकदृष्ट्या आपण त्यांना एकमेकांशी लग्न न करण्याचा सल्ला देऊ शकत नाही !

माझ्या वाचनानुसार भारतात विवाहपूर्व समुपदेशन आणि हा दोष आढळल्यास विवाहप्रतिबंध या संदर्भात कायदे नाहीत. थॅलसिमियाच्या संदर्भात सौदी अरेबियासारख्या देशात विवाहपूर्व चाचण्या करणे आणि समुपदेशन सक्तीचे आहे. परंतु समान दोषवाहक असूनही अनेक विवाहेच्छु मुले मुली एकमेकांशी लग्न करतातच.

या विषयाला एक महत्त्वाचा सामाजिक पदर देखील आहे. समजा, एखाद्या तरुण किंवा तरुणीमध्ये तो वाहकदोष आहे. त्याने किंवा तिने तो विवाहपूर्व उघड केला आणि तो पाहून अनेक जणांनी जर प्रथमदर्शनीच त्यांच्याशी लग्न करायला नकार दिला, तर त्याचे मानसिक परिणाम वाईट होतात. असे जर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले तर त्याचे सामाजिक दुष्परिणामही होतील.

वरील उदाहरण आपण कल्पनेने पुढे नेऊ. त्या दोघांमध्येही समान दोष आढळला परंतु त्याची फिकीर न करता त्यांनी एकमेकांशी लग्न केलंय.
आता पुनरुत्पादन या संदर्भात त्यांना काय करता येईल ?

१. डोक्याला कुठलाच त्रास नको असेल तर मुले होऊ न देणे हा एक उपाय आहे ! समजा, तशीही त्यांची "डिंक" पद्धतीने सुखात राहायची तयारी असेल तर मग प्रश्नच मिटला. सुंठेवाचून खोकला गेला.

२.पण समजा तसे नाहीये. त्यांना स्वतःचीच मुले हवी आहेत. मग संबंधित स्त्री गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तिमाहीत गर्भावरील काही गुंतागुंतीच्या चाचण्या कराव्या लागतील. त्यातून जर लक्षात आले की गर्भाला तो आजार नाही, तर चांगलेच. परंतु तो आजार असल्याचे लक्षात आले तर मग पुन्हा एकदा निर्णयाची गुंतागुंत निर्माण होईल- गर्भपात करण्यासंबंधी.

३. वरील परिस्थिती येऊ द्यायची नसल्यास कृत्रिम गर्भधारणा हा एक मार्ग सुचवता येतो. यामध्ये प्रयोगशाळेत गर्भनिर्मिती केली जाते. मग तंत्रज्ञानाच्या मदतीने, जेव्हां तो गर्भ दोषविरहित असल्याची खात्री होते तेव्हाच तो स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. अर्थात हे उपचार बरेच खर्चिक, कटकटीचे आणि मानसिक ताण वाढवणारे असतात. ते सर्वांनाच ते पसंत पडत नाहीत किंवा परवडत नाहीत.

अशा प्रकरणांमध्ये सुवर्णमध्य निघेल असा सल्ला काय देता येईल?
१. गरज पडल्यास वरील २ व ३ या गोष्टी करायच्या नसतील तर पुनरुत्पादनाच्या फंदात न पडता मूल दत्तक घेणे.

२. स्वतःचेच मूल हवे असल्यास अपत्यांची संख्या एकदम मर्यादित ठेवणे- शक्यतो एकच.

वैद्यकीय समुपदेशकांचा सल्ला ही या प्रश्नाची एक बाजू आहे. परंतु दुसऱ्या बाजूस पाहता समाज, संस्कृती, चालीरीती, रक्ताच्या नात्यांमधील विवाह, मानवी हक्क आणि व्यक्तीस्वातंत्र्य असे असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत. या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार करून कायदे तयार करणे हे काम सोपे नसते.
……………..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील दोन्ही प्रतिसादांतील विषय प्रस्तुत धाग्याच्या कक्षेत येत नाहीत.
त्यावरील चर्चा इथे अस्थानी ठरेल.
इच्छुकांनी त्यावर स्वतंत्र धागा जरूर काढावा

जगाच्या निर्मिती पासून डास आहेत .
जागतिक आहेत.
भारतात पण मलेरिया सर्रास होत होता.
भिंती रंगवलेल्या मी पण बघितल्या आहेत.
त्या मुळे आफ्रिकेत मलेरिया जास्त होता म्हणून त्यांची च जनुक उत्क्रांत झाली .
ही निव्वळ थाप आहे.
कारण वेगळीच असतील.
आणि तो पण माहिती चा डेटा लपवून ठेवला
असेल.

सारांश
दोन प्रकारच्या नवरा-बायकोच्या जोड्या असल्यानंतर खालील प्रकारे संतती जन्मास येते. त्याचे चित्ररूप :

AR both views.gif

* दोन वाहकांचे मीलन झाल्यास एक मेजर आजाराचे मूल होण्याची शक्यता २५%.

<< दोन वाहकांचे मीलन झाल्यास एक मेजर आजाराचे मूल होण्याची शक्यता २५%. >>
सोपा उपाय. दोघांपैकी किमान एक जण वाहक नको.

धन्यवाद !
.....
या प्रकारे मुलांमध्ये येणारे >>>>
थॅलेसेमियाप्रमाणे संक्रमित होणारे आजार बरेच आहेत.

१. त्यापैकी भारतातील महत्त्वाचा म्हणजे सिकल सेल आजार
२. एक प्रकारचा मुडदूस.
३. जन्मतः पेशींमध्ये एखादे प्रथिन किंवा एंझाइम नसण्याचे चयापचयाचे अनेक आजार.

सिकल सेल चं प्रमाण चंद्रपूर गडचिरोली मध्ये जास्त आहे असं वाचलं होतं.यामागे काही विशिष्ट कारण आहे का?आहार कमतरता वगैरे?

आहार कमतरता वगैरे? >>> नाही.

सिकल सेल हा पूर्णपणे जनुकीय बिघाडाचा आजार आहे; आहाराचा काही संबंध नाही.

भारतातील एकंदरीत अनुसूचित जमातीमध्ये (ST) हा बिघाड मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात विदर्भ, सातपुडा,व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये भिल्ल, मडाई, इ. लोक भरपूर आहेत.
तिथे दोषवाहकांचे प्रमाण तब्बल 35 टक्क्यांपर्यंत आहे.

पण मग याला पर्याय काय?त्या लोकांनी वेगळ्या जातीधर्मात लग्न करायची वगैरे असं असेल का?वहन कमी करायला.

होय, त्याच धर्तीवर विचार करावा लागेल.
वरील चर्चेत आल्यानुसार :

1. मोठ्या प्रमाणावर चाळणी चाचण्या करून घेणे. म्हणजे वाहक समजतात
2. दोन वाहकांनी एकमेकांशी लग्न न करणे
3. शक्य असल्यास लग्नांची व्याप्ती विविध प्रदेश आणि समुदायांपर्यंत वाढवणे. अर्थात याचा एकूण सामाजिक परिणाम कसा होतो यासाठी दीर्घकालीन अभ्यास करावा लागेल.

लेखातील प्रकरणात प्रगती आहे.
मित्राच्या मुलाने तीच चाचणी करून घेतली. त्यात कोणताही दोष नाही.
आता ते दोघे लग्न करणार आहेत.
त्यांना शुभेच्छा !

छान अपडेट!!
नवदांपत्याच्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा

काल माझ्या भाच्याने रक्तदान केले. तिथे त्याची Thalassemia टेस्ट झाली. त्याला मायनर असल्याचे समजले आहे. तिथल्या डॉक्टरांनी कुटुंबातल्या बाकीच्यां चेही बघा असे सांगितले आहे
त्याला ही लिंक पाठवली.

साद
चांगली गोष्ट आहे की रक्तदात्यांची नियमित चाळणी चाचणी होत आहे.
तुमच्या भाच्याला शुभेच्छा.!

सिकलसेल अनिमियासाठी आयुर्वेदिक औषध :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातल्या प्राध्यापक डॉक्टर पूजा दोशी व त्यांचे विद्यार्थी नितीन कदम, युवराज काळे यांनी संशोधन करून डिजाइन इनोवेशन सेंटरच्या माध्यमातून 'हिमआधार' या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात आली.

https://www.esakal.com/health/pune-university-ayurvedic-medicine-sickle-...

जागतिक Thalassemia दिनानिमित्त (८ मे) सर्व संबंधित बंधू-भगिनींना उत्तम आरोग्यपूर्ण शुभेच्छा !

काल माझ्या मित्राचा फोन आला. तो त्याच्या मुलीसाठी स्थळ बघतो आहे.
एका मुलाच्या बाबतीत त्यांने शंका विचारली की या दोघांचेही एबी आणि आरएच प्रकारातील रक्तगट पूर्ण वेगळे आहेत. तर मग पुढे जाऊ का ?

मी त्याला सांगितले,
“ ते रक्तगट वेगळे असणे हा स्थळ नाकारण्यातील मुद्दा अजिबात नाही (त्याची सर्व वैद्यकीय तरतूद आता झालेली आहे). परंतु जर तुझ्या मुलीने कधीच रक्तदान केलेले नसेल तर आता थॅलसिमिया वाहकाची चाचणी जरूर करून घे. ते अधिक महत्त्वाचे आहे”.

पाहून लग्न करणाऱ्या दोन्ही बाजूंनी आता या मुद्द्याकडे लक्ष द्यायची गरज आहे..

कोणाचे मानवी हक्क जपायचे.
जे लग्न करणारे आहेत त्यांचे की .
की जे मुल जन्माला येणार आहे त्या मुलाचे हक्क
कोणाचे हक्क जपायचे हा प्रश्न संवेदनशील आहे .
एकाचे हक्क जपताना दुसऱ्या वर अन्याय करणे ठीक नाही.
आणि ह्या बाबत माझे स्पष्ट मत आहे
कॅन्सर पासून मधुमेह,हाडांचे आजार,अनेक बाकी आजार जे आनुवंशिक आहेत ह्याचे स्पष्ट पुरावे आहेत
विदा आहे,अभ्यास आहे
तेच प्रमाण मानून मुल जन्माला घालण्याचा हक्क दिला पाहिजे.
मग कोणाशी लग्न करायचे हा तुमचा प्रश्न आहे
पण मुल जन्माला घालण्याची परवानगी मात्र योग्य अभ्यास करूनच दिली जावी

मुंबई महापालिकेच्या comprehensive thalassemia उपचार केंद्रांमध्ये ( महागडे) स्टेम सेल्स उपचार निशुल्क केले जातात. या संदर्भात या केंद्रांनी केलेले प्रशंसनीय कार्य :

https://www.marathi.hindusthanpost.com/social/bone-marrow-transplantatio...

लेखामध्ये जो प्रसंग दिला आहे त्या संदर्भातील एक गोड बातमी काल समजली.

गेल्या वर्षी मित्राच्या मुलाचे लग्न झाले होते. नुकतीच त्यांना एक गोंडस मुलगी झालेली आहे. जन्मताच तिची थॅलसीमिया चाचणी करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आहे !

अरे वा! किती छान बातमी.
बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद.

Pages