जळगाव स्टाईल घोटलेली वांग्याची भाजी

Submitted by जेम्स वांड on 2 July, 2022 - 04:17
भाजी, घोटलेली, हिरवी वांगी
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शाकाहारी सिरीज मध्ये काहीतरी रांधायचे ठरत होते पण काय ते नक्की ठरत नव्हते, अश्यावेळी एकदम ही भाजी आठवली अन फक्कड बेत जमला एकदम.

तर नमनाला घडाभर तेल न घालता कृती पाहूया :- प्रमाण माझ्या भुकेप्रमाणे एका माणसासाठी

साहित्य

१. २५० ग्राम वांगी, काटेरी हिरवी जळगावी असल्यास उत्तम नसल्यास आहेत ती, पण काटेरी, भरताची नाहीच.
२. एक इंच आले
३. १० लसूण पाकळ्या
४. ७ जहाल हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे अन स्टॅमिनाप्रमाणे कमीजास्त)
५. गोडलिंबाची पाने चार पाच
६. धणेपूड एक छोटा चमचा
७. हळद अर्धा छोटा चमचा (अतिशय केअरफुली नाहीतर भाजीचा रंग बदलेल)
८. अगदीच बिन मसाल्याची भाजी मानवत नसल्यास एक छोटा चमचा किचन किंग मसाला (मी वापरलेला नाही)
९. फोडणीसाठी जिरे मोहरी, एक एक छोटा चमचा १०. तेल दीड पळी (वांग्याच्या भाजीस तेल जास्त लागते)
११. बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीत घालणे अन गर्निश करायला बचकाभर

क्रमवार पाककृती: 

कृती

प्रथम वांगी बारीक फोडी चिरून मिठाच्या पाण्यात भिजत घालाव्या (काळी न पडावी म्हणून). आता आलं लसूण मिर्ची ह्यांचा सरबरीत ठेचा करून रेडी ठेवावा.

आता एका कढईत दीड पळी तेल गरम करावे, तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी घालून तडतडू द्यावी, मोहरी तडकली का जिरे घालावे, जिरे तडतडले की त्यात गोडलिंबाची पाने घालावीत,
त्यानंतर लगेच आलं लसूण मिर्ची ठेचा घालून त्याचा कचवट वास जाईपर्यंत साधारणतः २५ सेकंद तो परतून घ्यावा (ह्यावेळी जर घरभर ठसका पसरून कुटुंबीयांनी सटासट शिंका मारल्या तर तुम्ही मैदान मारलेले आहे)

आता गॅस हाय ठेऊन त्यात वांग्याच्या फोडी निथळून टाकाव्यात, आणि वांग्याला परतलेला ठेचा कोटिंग होईस्तोवर वांगी नीट परतून घ्यावी, वांग्यांना चाहुबाजूने उत्तम मसाला लागला की त्यात हळद व धणेपूड घालावी व परत एकदा नीट मिक्स करून घ्यावे,

आता ह्याच्यात अडीच वाट्या गरम पाणी (स्वानुभव - गरम पाण्याने चव खुलून येते, काही लोक वांगी भिजवून ठेवलेले पाणी पण वापरतात, ते वापरायचे असल्यास मीठाचे प्रमाण ऍडजस्ट करावे कारण वांगी भिजवताना पाण्यात चमचाभर मीठ घातलेले असते)

तर, गरम पाणी घालून चवीनुसार मीठ वरती सांगितल्याप्रमाणे घालावे, हे सगळे प्रकरण एकदा नीट ढवळून गॅस मंद करून त्यावर झाकण टाकून वांगी जवळपास १५ ते २० मिनिटे (फोडींच्या आकाराप्रमाणे) शिजू द्यावीत.

१५ मिनिटांनी वांगी शिजलेली पळीने चेक करून त्यात चिरलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी घालावी अन उत्तम मिक्स करावे, नंतर गॅस बंद करून कढई खाली उतरवून पळीने किंवा घरी असल्यास थेट पावभाजी मॅशरने भाजी एकजीव घोटून घ्यावी (कोथिंबीर, गोडलिंब, अन वांग्याची देठं मोडणार नाहीत ते चालेल)

घोटलेली भाजी पुन्हा गॅस वर चढवून झाकण घालून मंद आचेवर ५ मिनिटे (तेल सुटेपर्यंत) शिजवून घ्यावी, खाली उतरवून उरलेली चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करावी, खालील फोटोप्रमाणे कळण्याची भाकरी, तुरीचे साजूक तूप घातलेले साजूक वरण दाण्याची चटणी अन पानाला काहीतरी गोड हवे म्हणून भाकरीचेच तूप गूळ घालून केलेला चुरम्याचा लाडू ह्यांच्यासोबत मजबुत हाणावी.

Screenshot_20220628-131553_Gallery.jpg

वाढणी/प्रमाण: 
माझ्या तत्कालीन भुकेप्रमाणे एका माणसासाठी
अधिक टिपा: 

टिप्स :-

१. मटन असो वा वांगी "मांसल भाज्या" करताना गरम पाणी घालावे ही आमची शिकवण आईनं दिलेली आहे

२. हळद जास्त झाल्यास भाजीचा रंग पिवळा होतो, तो हिरवा अपेक्षित आहे रंग बदलल्यास भाजीचे खान्देशी इसेन्स जाते ही आमचीच वैयक्तिक श्रद्धा

३. देठं अजिबात काढू नये, पूर्ण वांग्याची चव जाईल, देठांचा अर्क भाजीत उतरायला हवाच, नंतर खाताना देठं चोखून हाडे माश्याच्या काट्या प्रमाणे बाजूला काढून ठेवता येतील

माहितीचा स्रोत: 
कार्यालयातील सहकारी सौ. निशा सोनवणे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार,

लंपन - बरोबर आहे पण ती शाळू किंवा पंढरपुरी ज्वारीची गोड भाकरी असल्यासच.

माझ्याकडे हायब्रीड ज्वारीचे पीठ होते त्याच्यात पण उडदाचे कळणे घालून दळले होते, भाकरी पांढरी झाली त्याने पण कळण्याची असल्यामुळे गरमागरम तव्यावरून उतरून शेकून काढलेली जाड कळण्याचा मगज असलेली भाकरीच जास्त प्रेफर केली मी.

भरीत आवडते, हा प्रकार करून पाहिन, माझी addition करून.. एवढा लसुण मिरची ठेचा घालायचा म्हणजे बारीक चिरलेला कांदा फोडणीत घालावा लागेल..

मस्त मस्त...
आजच केलिये.
पण वरण बट्टी सोबत

सगळ्यांचे आभार,

शितलजी, कांदा मूळ रेसिपीत नाही बुआ, बघा घालून कसे जमते अन इथं पण सांगा.

आंबटगोड, नाही, मुळीच नाही, त्रिवार नाही, पण शेवटी तुम्ही तुमची आवड जपली जाईल असे बनवून खा, अजून एक टीप म्हणजे शेंगदाणे घालायचे नसतील, तर हळदीसोबत एक दीड छोटा चमचा धणेपूड घालावी, त्यासाठीच मी ती वरती घटक पदार्थात टाकली आहे.

मस्त वाटतेय रेसिपी. खानदेशी भरीत पण असंच करतात का? म्हणजे वांगी भाजून मॅश करून याच मसाल्यात परतून. की ते वेगळे लागेल चवीला?

मैत्रेयी,
खान्देशी भरीत एक स्वतंत्र संस्थान आहे, हिरवीच पण भरताची वांगी, त्यासोबत तळलेले खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, पातीचा कांदा, खर्डा असे कैक पदार्थ मिसळलेले असतात, दिसायला सारखेपणा असला तरी चवीत मेजर फरक आहे दोन्हीच्या,

पै पाहुणा आल्यावर वेळेवर करायला वांग्याची भाजी बेस्ट, लग्नकार्यात कमी एफर्ट्समध्ये भली मोठी पंगत जेवायला घालताना सही बसतो हिशोब पण, एकंदरीत काय भरताला पूर्वतयारी लागते, भाजीला काही खास नाही लागत

यंदा बागकामातून भरपूर वांगी आली आहेत. शेजारी - पाजारीसुद्धा खाऊन कंटाळले असतील एव्हाना म्हणून नवीन पा कृ च्या शोधात होते. इथे पहिल्याच पानावर कृती दिसली. उपलब्ध आहेत तीच जांभळी वांगी वापरून बघेन. सोपी आणि झटपट दिसतेय कृती. आभार !

images (16).jpegimages (17)_0.jpeg

वावे, होय वरील चित्रांत आहेत तशीच असतात थेट, खानदेश मधील लोकल प्रोड्युस, चव मस्त असते एकदम, भरीत स्पेशल, हिवाळ्यात जास्त मिळतात.

चंद्रा,
थँक्स आणि नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला, पाककृती करून फीडबॅक नक्की द्या.

फार मस्त क्रुती,
प्रामाणीक सल्ला ! जळगाव सोडून इतर वान्गी वापरत असाल तर वान्गी पाण्यात टाकून निट निथळुन धुवून घ्या , जळगावची वान्गिच मुळात पातळ सालीची,कमी बिया असलेली आणि अतिशय चवदार असतात त्यामुळे फार काय कराव लागत नाहि.
अमेरिकेत असलेल्या लोकानी थाई वान्गी हिरवी दिसतात म्हणुन , होल फुडची , ऑरगॅनीक अशी कुठलिही भारितली वान्गी वापरली तरी भाजीला ती चव येत नाही.बेस्ट इज जी काय वान्गी आणाल ती नेहमी प्रमाणे रोस्ट करुन घ्या साल काढुन निथळत ठेवा त्यातल बिटर ज्युस निघुन जाउ द्या मग हिच क्रुती करा.
इटायलियन ऑरगॅनिक वान्ग्यात कमी बिया असतात आणी ते कमी बीटर निघतात.
खान्देशातलाच नवरा असल्याने आठवणीचे कढ येवुन हे सगळे प्रयोग आमचे करुन (पस्तावुन) झालेत.

मला वाटतं काही वांग्यांचे देठ काटेरी असतात. तीच काटेरी वांगी का?
आणखीन एक गोड लिंबाची पाने म्हणजेच कढीलिंबाची पाने का?

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार,

सायो, सामो ह्यांनी लिहिल्याप्रमाणे, काटेरी देठं असणारी वांगी म्हणजेच काटेरी वांगी, रेसिपीत आपल्याला देठं वापरायची आहेत त्यामुळं काटे सुरीनं रगडून काढून टाकले जातात अन चिरताना देठाचे पण दोन तुकडे केले जातात.

@ सामो -

गोडलिंब - कढीलिंब

होय, बरोबर.

@ आर्या जी, आपले आभार मानणे राहूनच गेले, वरण बट्टी म्हणजे आपण खानदेशी दिसताय, त्यामुळे आपलं मत भाजीवर एक ऑथेंटीक मत समजतो मी !

माझा एक प्रश्नही आहे,

वरण बट्टीला वरण तुरीचे साधेच असते का ? की इतर काही रेसिपी असते ? फौजदारी डाळ चालेल का बट्टी सोबत केलेली ? म्हणजे कॉम्बिनेशन असते का तसे ?

Pages