जळगाव स्टाईल घोटलेली वांग्याची भाजी

Submitted by जेम्स वांड on 2 July, 2022 - 04:17
भाजी, घोटलेली, हिरवी वांगी
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शाकाहारी सिरीज मध्ये काहीतरी रांधायचे ठरत होते पण काय ते नक्की ठरत नव्हते, अश्यावेळी एकदम ही भाजी आठवली अन फक्कड बेत जमला एकदम.

तर नमनाला घडाभर तेल न घालता कृती पाहूया :- प्रमाण माझ्या भुकेप्रमाणे एका माणसासाठी

साहित्य

१. २५० ग्राम वांगी, काटेरी हिरवी जळगावी असल्यास उत्तम नसल्यास आहेत ती, पण काटेरी, भरताची नाहीच.
२. एक इंच आले
३. १० लसूण पाकळ्या
४. ७ जहाल हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे अन स्टॅमिनाप्रमाणे कमीजास्त)
५. गोडलिंबाची पाने चार पाच
६. धणेपूड एक छोटा चमचा
७. हळद अर्धा छोटा चमचा (अतिशय केअरफुली नाहीतर भाजीचा रंग बदलेल)
८. अगदीच बिन मसाल्याची भाजी मानवत नसल्यास एक छोटा चमचा किचन किंग मसाला (मी वापरलेला नाही)
९. फोडणीसाठी जिरे मोहरी, एक एक छोटा चमचा १०. तेल दीड पळी (वांग्याच्या भाजीस तेल जास्त लागते)
११. बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीत घालणे अन गर्निश करायला बचकाभर

क्रमवार पाककृती: 

कृती

प्रथम वांगी बारीक फोडी चिरून मिठाच्या पाण्यात भिजत घालाव्या (काळी न पडावी म्हणून). आता आलं लसूण मिर्ची ह्यांचा सरबरीत ठेचा करून रेडी ठेवावा.

आता एका कढईत दीड पळी तेल गरम करावे, तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी घालून तडतडू द्यावी, मोहरी तडकली का जिरे घालावे, जिरे तडतडले की त्यात गोडलिंबाची पाने घालावीत,
त्यानंतर लगेच आलं लसूण मिर्ची ठेचा घालून त्याचा कचवट वास जाईपर्यंत साधारणतः २५ सेकंद तो परतून घ्यावा (ह्यावेळी जर घरभर ठसका पसरून कुटुंबीयांनी सटासट शिंका मारल्या तर तुम्ही मैदान मारलेले आहे)

आता गॅस हाय ठेऊन त्यात वांग्याच्या फोडी निथळून टाकाव्यात, आणि वांग्याला परतलेला ठेचा कोटिंग होईस्तोवर वांगी नीट परतून घ्यावी, वांग्यांना चाहुबाजूने उत्तम मसाला लागला की त्यात हळद व धणेपूड घालावी व परत एकदा नीट मिक्स करून घ्यावे,

आता ह्याच्यात अडीच वाट्या गरम पाणी (स्वानुभव - गरम पाण्याने चव खुलून येते, काही लोक वांगी भिजवून ठेवलेले पाणी पण वापरतात, ते वापरायचे असल्यास मीठाचे प्रमाण ऍडजस्ट करावे कारण वांगी भिजवताना पाण्यात चमचाभर मीठ घातलेले असते)

तर, गरम पाणी घालून चवीनुसार मीठ वरती सांगितल्याप्रमाणे घालावे, हे सगळे प्रकरण एकदा नीट ढवळून गॅस मंद करून त्यावर झाकण टाकून वांगी जवळपास १५ ते २० मिनिटे (फोडींच्या आकाराप्रमाणे) शिजू द्यावीत.

१५ मिनिटांनी वांगी शिजलेली पळीने चेक करून त्यात चिरलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी घालावी अन उत्तम मिक्स करावे, नंतर गॅस बंद करून कढई खाली उतरवून पळीने किंवा घरी असल्यास थेट पावभाजी मॅशरने भाजी एकजीव घोटून घ्यावी (कोथिंबीर, गोडलिंब, अन वांग्याची देठं मोडणार नाहीत ते चालेल)

घोटलेली भाजी पुन्हा गॅस वर चढवून झाकण घालून मंद आचेवर ५ मिनिटे (तेल सुटेपर्यंत) शिजवून घ्यावी, खाली उतरवून उरलेली चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करावी, खालील फोटोप्रमाणे कळण्याची भाकरी, तुरीचे साजूक तूप घातलेले साजूक वरण दाण्याची चटणी अन पानाला काहीतरी गोड हवे म्हणून भाकरीचेच तूप गूळ घालून केलेला चुरम्याचा लाडू ह्यांच्यासोबत मजबुत हाणावी.

Screenshot_20220628-131553_Gallery.jpg

वाढणी/प्रमाण: 
माझ्या तत्कालीन भुकेप्रमाणे एका माणसासाठी
अधिक टिपा: 

टिप्स :-

१. मटन असो वा वांगी "मांसल भाज्या" करताना गरम पाणी घालावे ही आमची शिकवण आईनं दिलेली आहे

२. हळद जास्त झाल्यास भाजीचा रंग पिवळा होतो, तो हिरवा अपेक्षित आहे रंग बदलल्यास भाजीचे खान्देशी इसेन्स जाते ही आमचीच वैयक्तिक श्रद्धा

३. देठं अजिबात काढू नये, पूर्ण वांग्याची चव जाईल, देठांचा अर्क भाजीत उतरायला हवाच, नंतर खाताना देठं चोखून हाडे माश्याच्या काट्या प्रमाणे बाजूला काढून ठेवता येतील

माहितीचा स्रोत: 
कार्यालयातील सहकारी सौ. निशा सोनवणे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी छान आहे.
सामो मी हाच प्रश्न विचारणार होते गोडलिंबाचा.

आपले आभार, नक्की ट्राय करून बघा, सोपी झटपट अन झणझणीत मसालेदार भाजी बेस्ट होते, चपाती भाकरी किंवा अगदी भातात कुस्करून खायला.

वांगी व पाणी हे एकत्र जरा डेन्जर वाटतेय् पण तुम्ही म्हनताय तर करुन पाहते. बाकी इथे जळगाव वांगी मिळायची नाहीत, काटेरी पण सहसा दिसत नाहीत. जी मिळतील त्यावर प्रयोग करुन पाहिन.

@साधना जी,

वांगी अन पाणी ह्यात डेंजर काय वाटलं ? कारण वांग्याची रस्साभाजी पण जबरदस्त होते की एकदम, भंडाऱ्यात वगैरे खाल्ली आहे मी समक्ष मराठवाड्यात दोनतीन वेळा.

तुमच्याकडे काटेरी वांगी नसली तर हरकत नाही तुम्ही जी सापडतील ती वापरा, पण शक्यतो बारकी किंवा लांबडी भाजीची वांगी वापरा भरताची वांगी कदाचित टेस्ट प्रोफाइल बदलतील.

वांगे तेलात शिजवायचे असा काहितरी मेंटल ब्लॉक आहे, पाण्यात शिजवुन चव जाते असे डोक्यात फिक्स आहे. बहुतेक वेगवेगळ्या प्रकारे केलेली वांगी खाल्लेली नाहीत त्यामुळे असावे. म्हणुनच करुन पाहायची आहे.

कोणतेही वरण चालते. तुरीचे साधे वरण, बट्टी, वांग्याची घोटेल भाजी हा भांडाऱ्याचा फिक्स आयटेम. पण आजकाल फोडणीचे वरण सर्रास सुरू आहे.
- एक माजी जडगावकर

जेम्स वांड, ही भाजी छोट्या जांभळ्या रंगाच्या वांग्याची करून बघीतली. पाणी बिचकत घातले कारण वांग्याच्या परतून भाजीला पाणी कधी घातलेले नाही. पण चवीला मस्तच झाली. रंग छान नाही आला वरच्या सारखा जांभळ्या वांग्यामुळे. आता ही वरचेवर केली जाईल. धन्यवाद.

धन्यवाद मनमोहन,

ब्लॅक कॅट मूळ रेसिपीत नाही काही असं दाणे कूट घालण्याबद्दल, बाकी आपापल्या चवी अन आवडी

मस्त रेसीपी आणि ताट वांडोबा.
मी बरेचदा भरीतासाठी वांगी ग्रील करायचा कंटाळा आला कि मोठ्या वांग्याची अशी भाजी करते. पाणी घालत नाही. तेलावर शिजविते. इथली वांगी चवीला चांगली नसतात फारशी. पण ह्या मेथडने बरी लागतात.

खानदेशी भरीताची रेसीपी मिनोतीच्य वदनी कवळ घेता ब्लॉगवर आहे. पर्फेक्ट आहे ती एकदम. फार छान भरीत होते त्यांने.

Pages