संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत 195 ते 249 असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.
देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :
1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांमध्ये विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.
१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.
या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत.
Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते.1984 मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.
Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे 851 भाषा प्रचलित आहेत.
२. भौगोलिक प्रकार
जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.
Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालियन पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली !
Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.
3. भूगोलातील दिशा
सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी
आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे.
४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.
बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.
मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene
अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.
या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत.
त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.
५. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.
माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.
सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :
a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार
असे हे व्युत्पत्तीपुराण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस अनेक मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.
“नावात काय आहे?” हा शेक्सपियर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न.
त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !
प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली.
ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !
>>खरं तर आता काही काळाने अशी
>>खरं तर आता काही काळाने अशी फारच कमी क्षेत्रं उरतील ज्यामध्ये तुम्ही वैचारिक अवगाहन केलेलं नाही.>>>
अतिशय समर्पक प्रशंसा.
आणि खरोखरच कुमार सरांचा व्यासंग वाखाणण्याजोगा आहे.
रे व्यु, धन्यवाद
रे व्यु, धन्यवाद
व्यासंग शब्द माझ्यासाठी जडभारी वाटतो.
माहिती आणि रंजन यांची सांगड घालणे जमते इतपत ठीक.
तुमच्यासारख्या अभ्यासू व उत्साही लोकांबरोबर झालेल्या चर्चेमुळे समाधान मिळते.
सिंगापुरातील एका मेट्रो
सिंगापुरातील एका मेट्रो स्टेशनचे नाव 'धोबी घाट' आहे.
रोचक माहिती आहे सगळीच!
रोचक माहिती आहे सगळीच!
>>>>१. दिल्ली एकूण १५ आहेत
>>>>१. दिल्ली एकूण १५ आहेत
२. मद्रास ८ ( अमेरिका, द. आफ्रिका इ )
३. लखनऊ ७ ( भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ )>>>>> भारीच !
>> रोचक माहिती आहे सगळीच!
>> रोचक माहिती आहे सगळीच!
+१
फारच सखोल माहिती संकलित केली आहे सरांनी.
मला गावांच्या नावाबद्दल असे वाटत आले आहे. प्रत्येक नावात त्या त्या भागातला खूप सारा इतिहास दडलेला असतो.
>> सिंगापुरातील एका मेट्रो स्टेशनचे नाव 'धोबी घाट' आहे.
होय अगदी अगदी. मलाही तिथे असताना हे फार आश्चर्य वाटले होते. पण त्याला इतिहास आहे म्हणे. इंग्रज लोक भारतातून धोब्यांना घेऊन गेले होते. सध्या जिथे मेट्रो आहे तिथे पूर्वी छोटी नदी होती व हे धोबी तिथे कपडे धूत असंत
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांचे आभार !
धोबी घाट' >>> रोचक !
...............................
देशांचे नावबदल हा एक रोचक विषय आहे. काही देशांनी अनेक वेळा नामांतर केलेले दिसते. उदाहरणार्थ,
कंबोडियाने चार वेळेस नामांतर करत पहिल्या नावापाशीच वर्तुळ पूर्ण केले !
Kingdom of Cambodia >> Khmer Republic >> Democratic Kampuchea >> State of Cambodia>>> Kingdom of Cambodia.
चलनाचे पुनर्मूल्यांकन
चलनाचे पुनर्मूल्यांकन
एखाद्या गरीब देशाच्या चलनाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सतत ढासळत राहिला तर काही काळाने त्या चलनाचे पुनर्मूल्यांकन करतात.
लेखात उल्लेख असलेल्या Sierra Leone या देशाने नुकतेच तसे केले आहे. हे करताना त्यांनी सध्याच्या चलनाच्या किमतीला 1000 ने भागायचे ठरवले आहे.
आता त्यांच्याकडील सर्वाधिक किमतीची १०,००० Le ची नोट फक्त १० Le ची होईल.
गेल्या काही वर्षांत झिंबाब्वे आणि तुर्किये सकट अन्य काही देशांनी अशी कृती केलेली आहे.
https://sierraloaded.sl/feature/insight-into-sierra-leone-currency-reden...
>>>१०,००० Le ची नोट फक्त १०
>>>१०,००० Le ची नोट फक्त १० Le ची होईल.>>>> फारच अवमूल्यन झाले.
जगातील कुठल्याही भूभागापासून
जगातील कुठल्याही भूभागापासून दूर असणारे आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या जवळपास मध्यात वसलेला चिमुकला २५१ +/- लोकसंख्या असणारा ट्रिस्टन द कून्हा द्विपसमूह ! , जवळपास ३८ वर्ग मैल इतकं छोटं बेट आहे मुख्य
ब्रिटिश ओवरसीज टेरीट्रीचा भाग असणारे ट्रिस्टन द कून्हा द्विपसमूह
केप टाऊन किनाऱ्या पासून २७८७ किलोमीटर
सेंट हेलेना बेटांपासून २४३७ किलोमीटर
आणि
फॉकलंड बेटांपासून ४००२ किलोमीटर अंतरावर आहे, इथं एअरस्ट्रीप नाही, त्यामुळे सगळ्यात जवळचा अन लवकर होणारा प्रवास म्हणजे सहा दिवसांचा केप टाऊन पर्यंतचा बोटीचा प्रवास होय.
गर्दी अन जगापासून दूर कुठंतरी जायची ईच्छा असणाऱ्या लोकांसाठी आयडियल डेस्टिनेशन ??
ट्रिस्टन द कून्हा चे जमिनीपासून असलेले ढोबळ अंतर आणि त्याचे दक्षिण अटलांटिक मधील स्थान
ट्रिस्टन द कून्हाचा जुना नकाशा
जेम्स
जेम्स
छान सविस्तर माहिती. धन्यवाद !
।।श्री यूपीएससी अप्रसन्न।।
।।श्री यूपीएससी अप्रसन्न।।
सिलेबस देवाच्या कृपेने मिळालेलं ज्ञान होय हे हे हा हा हा हा, कुठं नाही तर मिपा माबोवर एका धाग्यात गंमत म्हणून लिहायला तरी कामी आलं, ज्ञान कधीच वाया जात नाही ते असं लॉल
आज 21 जून. वर्षातील सर्वात
आज 21 जून. वर्षातील सर्वात मोठा दिवस.! पृथ्वीवरील खालील देशांत काही ठिकाणी तो तब्बल 21 तासांहून अधिक काळ असणार आहे:
Iceland, Greenland, Alaska, Canada, Norway, Sweden, Finland, Northern Russia, and the North and South Poles
साउथ पोल ला उलटे ना? मोठी
साउथ पोल ला उलटे ना? मोठी रात्र.
कुमारजी अतिशय रंजक व उत्तम
कुमारजी अतिशय रंजक व उत्तम लेख . माझेही चार शब्द .
सियेरा लिऑन ( Landof Lion )मधे खरोखरच बसलेल्या सिंहासारखा डोंगर आहे . समृद्र किनाऱ्यावरून दिसतो मी पाहिला आहे .
तिमोर म्हणजे भाषा इंडोनेशियात East .
अजून एक गंमत म्हणजे बहासा इंडोनेशीयात west यासाठी बारात हा शब्द आहे . बारात म्हणजे भारत . भारत इंडोनेशियाच्या पश्चिमेला आहे . म्हणजे देशाच्या नावावरून दिशा मिळाली
फाए
फाए
बरोबर. फक्त उत्तर ध्रुव हवे होते
चुकीने दक्षिण पण लिहिले गेले.
...
विक्रम
छान रंजक माहिती.
आभार !
दोन मोठ्या देशांच्या सीमेवर
दोन मोठ्या देशांच्या सीमेवर जर एखादा भूभाग असेल तर दोन्ही देश तो बळकावण्यासाठी उत्सुक असतात. पण या वृत्तीला अपवाद म्हणून Bir Tawil (= उंच विहीर) चे उदाहरण पाहता येईल.
इजिप्त व सुदान यांच्या सीमेवरील हा छोटासा भूभाग ( वरच्या चित्रातील छोटीशी पांढरी जागा). परंतु या दोन्ही देशांपैकी कोणीही त्याच्यावर हक्क सांगायला तयार नाही ! (अर्थात यामागे काही अन्य कारणे आहेत).
Alastair Bonnett यांच्या मते पृथ्वीवरील राहण्यायोग्य पण अद्याप बिलकूल वस्तीविरहित असा हा भाग असून कुठल्याच देशाने त्यावर हक्क सांगितलेला नाही.
पृथ्वीवरील राहण्यायोग्य असा
पृथ्वीवरील राहण्यायोग्य असा हा एकच भाग असून
>>>> मग बाकी भाग योग्य नाही का?
जरा उलगडून सांगाल का प्लीज
आबा
आबा
मूळच्या वाक्यात सुधारणा केली आहे:
..राहण्यायोग्य पण अद्याप बिलकूल वस्तीविरहित असा हा भाग ...
इंग्लंड मध्ये Stonehenge हे
इंग्लंड मध्ये Stonehenge हे एक जागतिक वारशाचे ठिकाण आहे. इथे दरवर्षी लोक 21 जून ला सूर्योदय पाहण्यासाठी जमतात आणि मोठा उत्सव असतो कोविड काळात तो होऊ न शकल्याने यंदाचा उत्साह जोरदार होता:
https://www.euronews.com/2022/06/21/summer-solstice-celebrated-at-stoneh...
कुमार सर
कुमार सर
समर सॉलस्टिसच्या वेगवेगळ्या
समर सॉल्स्टिसच्या वेगवेगळ्या देशातील प्रथा
नेटफ्लिक्सवर मॉर्गन फ्रिमनचा 'The Story of God ' नावाचा माहितीपट आहे, त्यात मेक्सिकन समर सॉल्स्टिस उत्सव व तेथील संस्कृतीचा निसर्गाशी खास करुन सूर्याचा ईश्वराशी लावलेला संबंध फार छान समजावून सांगितला आहे.
तो संपूर्ण माहितीपटच(सिझन १) सुरेख आहे. वेगवेगळ्या संस्कृतीतल्या/देशातल्या ईश्वरी संकल्पनांचा व त्यांच्या परंपरांच्या मूळाशी असलेल्या शक्यतांचा सुरेख आढावा घेतलाय.
तुमच्या प्रतिसादावरुन आठवले.
अस्मिता
अस्मिता
छान माहिती दिलीत.
होय, वेगवेगळ्या देशातील प्रथा अगदी रंजक आहेत थोड्याफार वाचल्या.
21 जून चा भूगोलही शांतपणे वाचल्यावर मजेदार वाटला. शाळेत असताना या सगळ्याची निव्वळ घोकंपट्टी करत असल्याने तेव्हा मजा येत नाही.
मस्त धागा
मस्त धागा
छान माहिती देत आहेत सर्वजण
द स्टोरी ऑफ गॉड निव्वळ
द स्टोरी ऑफ गॉड निव्वळ अमेझिंग आहे
छान
छान
.....
राष्ट्रकुल एक मोठा देशसमूह आहे. 1952 मध्ये जेव्हा एलिझाबेथ राणी त्याची प्रतिकात्मक अध्यक्ष झाली तेव्हा त्यात फक्त ८ देश होते.
आज ही संख्या ५६ झाली आहे. त्यापैकी Togo व Gabon हे दोन देश नुकतेच सभासद झालेले आहेत.
अन्य काही देश या समूहातून पूर्वी बाहेर पडले आहेत.
आज Dijibouti या देशाचा
आज Dijibouti या देशाचा स्वातंत्र्य वर्धापन दिन असल्यामुळे गुगल डुडल त्यांचे आहे:
https://www.google.com/doodles/djibouti-independence-day-2022
होय, दुपारी बघितला तो
होय, दुपारी बघितला तो Dijibouti डूडल
खाली त्या देशात Sabaayad नामक ब्रेड खातात असं लिवलंय. ब्रेड कसला, तो तर आपला आलू / खिमा पराठा
आलू / खिमा पराठा >>> लय भारी
आलू / खिमा पराठा
>>> लय भारी
>>>>Sabaayad नामक ब्रेड खातात
>>>>Sabaayad नामक ब्रेड खातात>>>
सोमालियात याला Kimis म्हणतात
इंग्लिश मध्ये सगळ्याचेच Flatbread होतात
Pages