असे देश, अशी नावे !

Submitted by कुमार१ on 2 June, 2022 - 03:30

संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत 195 ते 249 असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.
world-map.jpg

देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :
1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती

वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांमध्ये विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.

१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.
या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत.
Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते.1984 मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.

Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे 851 भाषा प्रचलित आहेत.

२. भौगोलिक प्रकार
जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.

Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालियन पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली !

Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

3. भूगोलातील दिशा

सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी

आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे.

४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.

बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.

मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene
अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.

या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत.
stlucia.jpg

त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.

५. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.
माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.

सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :

a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार

असे हे व्युत्पत्तीपुराण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस अनेक मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.

“नावात काय आहे?” हा शेक्सपियर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न.
त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !

प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली.
ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगातील तीन देशांचे (San Marino, Vatican City व Lesotho ) एक समान भौगोलिक वैशिष्ट्य आहे.
या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला आहे.
या तिघांना enclave असे म्हणतात.

Enclave व वेढणारे देश कंसात असे :
San Marino (इटली)
Vatican City (रोम, इटली )
Lesotho (द. आफ्रिका)

>>>>या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला आहे.
या तिघांना enclave असे म्हणतात.>>>>
छान माहिती.

जसे enclave असतात त्याच्या बरोबर उलट exclave असतात. म्हणजे एका देशाचा प्रांत जो देशाच्या मुख्य भुभागापासून तुटलेला आहे आणि दुसऱ्या देशाने वेढला आहे. पण यात बेटे धरत नाहीत. (अंदमान आणि निकोबार भारताची exclaves नाहीत.) उदा. कलिनिंग्राद ओबलास्त (Kaliningrad Oblast) हे रशियाचे exclave पोलंड आणि लिथुएनिया यांना खेटून बाल्टिक समुद्रावर वसले आहे. त्याचे ठिकाण नकाशात बघा. रशियासाठी त्याचे व्यापारी आणि सामरिक महत्व लगेच लक्षात येईल. खास करून युक्रेन युध्दासाठी तर खूपच.

Enclave आणि exclave तसेही खूप fascinating असतात. पण त्यातही दोन प्रांत weird आहेत.

पहिला म्हणजे भारत - बांगलादेश यांचे एकमेकांमध्ये असलेले एकूण 162 enclaves. 162 - विश्वास बसत नाही ना! आता ते अस्तित्वात नाहीत. 2015 साली दोन्ही देशांनी enclaves ची अदलाबदल केली. फक्त भूभाग नाही तर नागरिकांची सुद्धा अदलाबदल केली. त्यांचा super weirdness जाणून घ्यायचा असेल तर हे वाचा -
https://www.migrationpolicy.org/article/india-and-bangladesh-swap-territ...
या बातमीत fig 1 बघा. अदलाबदलीच्या आधी तिथे राहणाऱ्या लोकांना काय काय अडचणींना तोंड द्यावे लागत असेल? इतकी विचित्र परिस्थीती इतर कुठे असेल का?

हेसुद्धा पाहा
https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/08/01/say-goodbye...

दुसरा विचित्र किस्सा आहे ऑस्ट्रियाच्या  Jungholz या exclave चा. याची खासियत म्हणजे हा भाग ऑस्ट्रियापासून पूर्ण तुटलेला नाही. अगदी चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्याने ऑस्ट्रियाशी जोडला आहे. चिंचोळी किती? ही पट्टी 1 मीटरपेक्षा कमी रुंद आहे. पण हे काहीच नाही. Jungholz चा विचित्रपणाची ही फक्त सुरवात आहे. हे बघा -
https://www.bbc.com/travel/article/20220214-jungholz-a-ski-town-stuck-in...

"Bagmen would arrive with suitcases handcuffed to their wrists, enter their room, lock the door and never leave until the banks opened. It happened all the time." थेट आपले अजित, रणजित, जीवन वगैरेंचे चित्रपट आठवले Lol

१६२ >>>भारत-बांगलादेशची माहिती सुंदर !
enclaves मध्ये पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या ऑर्डरची enclaves असेही प्रकार आहेत.

>>>>अगदी चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्याने ऑस्ट्रियाशी जोडला आहे. चिंचोळी किती? ही पट्टी 1 मीटरपेक्षा कमी रुंद आहे. पण हे काहीच नाही. Jungholz चा>>>> भन्नाट प्रकार आहे.
चौबेजी मस्त.

माझ्याकडे रोमन साम्राज्याचा इतिहास एक छान ऑडिओ बुक आहे. त्यात हेड्रिअन रोमन सम्राटाच्या काळात त्यांनी डाकिआ/ देशिआ ह्या युरोपातील भागावर आक्रमण केले त्यांना जिंकून त्याचे नावच रोमेनिया करुन टाकले. त्यातल देशिआ म्हणजे देश असे असेल का असे उगीच वाटले.

देशिआ म्हणजे देश असे असेल का असे उगीच वाटले.
>>>
रोचक. शोधायला पाहिजे.
.........
ज्या देशनावाचे इंग्लीश स्पेलिंग काहीसे मजेदार आहे तो म्हणजे रवांडा ( Rwanada). या देशाची तीन ठळक वैशिष्ट्ये आहेत :

१. एका बाबतीत त्यांनी जगात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या संसदेत स्त्री खासदारांचे बहुमत आहे. सध्या एकूण खासदारांपैकी ६१ % खासदार स्त्रिया आहेत. असे होण्यामागे अंशतः एक भीषण घटना कारणीभूत आहे. 1994 मध्ये तिथे एका वंशाच्या दहा लाख लोकांच्या अवघ्या तीन महिन्यात ठरवून हत्या करण्यात आल्या. त्यानंतर राहिलेल्या लोकसंख्येमध्ये स्त्रियांचे प्रमाण 60 ते 70 टक्के असे राहिले.

२. प्लास्टिक-बंदीची कठोर अंमलबजावणी
३. गोरिला माकडांची १० कुटुंबे उद्यानात ठेवलेली आहेत. ही जगातील सर्वाधिक आहेत.

Yes i have followed this news in 1994 . Hutu and Tutsi tribes fought. Horrified at the genoside.

+१
Tutsi ची वंशहत्या झाली.
......
देशाच्या संसदेतील स्त्रियांच्या अधिक प्रमाणासंदर्भात पहिले तीन क्रमांक असे आहेत :

१. रवांडा ( 61%)
२. क्युबा ( 53 %)
३. निकाराग्वा (51%)

आजचा एन्क्लेव्ह शोधता आला नाही >>>
मी ५ व्या प्रयत्नात ९८% पर्यंत आलोय.
पुढे गोंधळ होतोय खरा ...
जरा दमाने बघतोय Happy

हुतु आणि तुतसी नरसंहार विषयावर हॉटेल रवांडा नावाचा एक सुंदर चित्रपट बघितल्याचे आठवते डॉन शिडल/ चिडल ह्याचा अत्युत्तम अभिनय होता

रवांडा बद्दल अजून रोचक माहिती म्हणजे, रवांडा ही मूलतः फ्रेंच वसाहत होती, स्वातंत्र्य मिळून हुतु तुतसी युद्ध अन नरसंहार होऊन आता सत्तेवर आलेत पॉल कागमे, त्यांना फ्रेंच गुलामीचा भयानक तिटकारा असल्यामुळे त्यांनी सत्तेत आल्या बरोबर पहिले प्रथम तर हुतू अन तुतसी समझोते घडवून आणले, त्यानंतर विरोधक भयानक चिरडले, त्यानंतर फ्रेंच अस्तित्व असणाऱ्या खुणा मिटवायला सुरुवात केली, ह्या कामात विध्वंस कमी अन दुसरे बोट लांब करणे हा प्रकार त्यांनी केला, फ्रेंच ऐवजी इंग्रजीला सरकारी आश्रय देणे, पन्नास हजार क्षमतेचे क्रिकेट स्टेडीयम बांधून क्रिकेट हा खेळ प्रमोट करणे, कॉमनवेल्थ मध्ये प्रवेशासाठी अर्ज भरणे इत्यादी इत्यादी त्यांनी केले,

पण एकेकाळी नरसंहार अन युद्धाने ग्रस्त हा देश आज आफ्रिकेतील काही निवडक विकसनशील देशांत मोडतो, पायाभूत सुविधा, शिक्षण, कायदा सुव्यवस्था इत्यादींवर ते झपाट्याने पुढे गेलेले आहेत.

एखाद्या घराचे स्वयंपाक घर एका देशात तर त्याच घराचे शयनगृह दुसऱ्या देशात, हे ऐकायला कसे वाटते ?
पण असे उदाहरण आहे...

नागालँड मधील लोंगवा या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाव भारत व म्यानमार या दोघांनी वाटून घेतलेले आहे. इथे
या दोन देशांदरम्यानची सीमारेषा या गावच्या सरपंचांच्या घरामधून जाते.

https://www.outlookindia.com/outlooktraveller/explore/story/70646/did-yo...

जनपद = देश (community, nation, people)
हा शब्द वाचनात आला.
या संस्कृत शब्दाचा उगम इथे दिल्याप्रमाणे दिसतो आहे (https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A...).
थोडक्यात, समूह असे त्यातून अभिप्रेत असावे.

मराठीत आपण देशासाठी ‘देश’ हा एकच शब्द सहसा वापरतो. परंतु इंग्लिशमध्ये खालील प्रकारचे वेगवेगळे शब्द आहेत आणि त्यांच्या आपापल्या व्याख्या आहेत :
• Country
• Nation
• Nation-State (उदा. नेपाळ)
• Sovereign State ( UN सदस्य + अन्य)
• Non Sovereign State (e.g. Hong Kong)

(https://www.thoughtco.com/country-state-and-nation-1433559#:~:text=When%....)

सध्या अंटार्टिकावर सलग संपूर्ण रात्र चालू आहे.
परंतु तेथून ७००० किमी दूर असलेल्या टोंगामधील ज्वालामुखीच्या प्रकाशामुळे तिथे आसमंत उजळून निघत आहे. त्याचे काही सुंदर फोटो इथे पाहता येतील.:

https://i.stuff.co.nz/national/300638089/antarcticas-midwinter-darkness-...

जर्मनी देशात Stadtstatt(शहर हेच राज्य) अशी संकल्पना आहे. बर्लिन, ब्रेमेन आणि हॅम्बुर्ग ही ३ Stadtstatt आहेत.

(शहर हेच राज्य) अशी संकल्पना आहे >>>

वा ! छान माहिती दिलीत.

आपल्याकडेही दिल्ली आणि पुदुच्चेरी यांचा दर्जा “अर्ध-राज्य” असा असतो. म्हणजे मुळात ते केंद्रशासित प्रदेश असून त्यांना स्वतंत्र विधानसभा दिलेली आहे.

या विधानसभा अन्य पूर्ण राज्यांच्या तुलनेत ‘ब’ दर्जाच्या मानल्या जातात. तेथील काही बाबींवरचे अधिकार केंद्र सरकारने राखून ठेवलेले असतात.

Germany हे "इंग्लिश" नाव असून मूळ जर्मन भाषेतील नाव Deutschland आहे.

Germany : exonym
Deutschland : endonym

जर्मनीला अन्य भाषक लोक काय काय म्हणतात ?
एका जर्मनीस्थिताकडून समजले :

स्पॅनिश लोक : अलेमानिया
फ्रेंच लोक : अलेमान्ये,

पोलिश लोक : नीम्सी
हाँगकाँगमध्ये : दं क्वॉक्

चीनमध्ये : दं ग्वो,
जपान मध्ये : दोइत्सं.

>>>>अतिशय सुरेख आहे, परग्रहावरील आसमंत किंवा ध्रुवीय प्रकाश वाटतोय.>>>> +९९९
जर्मनीची नावे पण भारी आहेत

खूप मस्त मस्त माहिती.

भारताला आपण मातृभूमी म्हणतो तर जर्मन त्यांच्या देशाला पितृभूमी समजतात. असे इतर देशांतही आहे का? इतर कोणते देश मातृभूमी समजले जातात का?

Pages