असे देश, अशी नावे !

Submitted by कुमार१ on 2 June, 2022 - 03:30

संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत 195 ते 249 असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.
world-map.jpg

देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :
1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती

वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांमध्ये विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.

१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.
या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत.
Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते.1984 मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.

Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे 851 भाषा प्रचलित आहेत.

२. भौगोलिक प्रकार
जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.

Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालियन पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली !

Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

3. भूगोलातील दिशा

सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी

आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे.

४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.

बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.

मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene
अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.

या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत.
stlucia.jpg

त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.

५. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.
माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.

सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :

a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार

असे हे व्युत्पत्तीपुराण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस अनेक मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.

“नावात काय आहे?” हा शेक्सपियर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न.
त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !

प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली.
ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील सर्वांना धन्यवाद !

मातृभूमी की पितृभूमी हा मुद्दा रंजक आहे
वरील माहिती सवडीने वाचेन

देशांच्या नावांना लिंग (जेंडर) ही लावलं जातं.
भारत पुल्लिंगी तर इंडिया स्त्रीलिंगी.
अमेरिका , जर्मनी , रशिया स्त्रीलिंगी. इंग्लंड , फ्रान्स पुल्लिंगी किंवा नपुं.
हे पुष्कळसं नावाच्या उच्चारावरून ठरतं.

देश लिंग >>>बरोबर.
शाळेत शिकवलेले आठवते.
….
Vatican City बद्दल नेहमी कुतुहल वाटते.
त्या नावाच्या अनेक उगम कथा आहेत.
१. va हा बालकाने उच्चारलेला पहिला शब्द

२. vātēs = प्रेषित व
canō = गाणे.

पृथ्वीचा ८वा खंड Zealandia मानला जातो. अर्थात तो 94% पाण्याखाली बुडालेला आहे. उरलेला सहा टक्के जमिनीवर असून त्याचा न्यूझीलंड हा एक भाग आहे.
अशा देशांच्या सागरी हद्दीवरून बराच खल झालेला आहे. त्या संदर्भात काही आंतरराष्ट्रीय नियमही आहेत.

न्यूझीलंडबाबत एक रंजक माहिती वाचली. जर का त्यांनी सिद्ध केलं, की ते या आठव्या खंडाचेच एक भाग आहेत, तर मग त्यांना त्यांची सागरी हद्द सध्याच्या सहा पट मंजूर होईल !

https://www.bbc.com/future/article/20210205-the-last-secrets-of-the-worl...

रवांडाला 'आफ्रिकेचे सिंगापूर' म्हणतात.

रवांडाने २००८ पासून प्लास्टिक पिशव्या बंदीचे धोरण कसे कडकपणे राबवले आणि त्याचे दिसणारे सुपरिणाम :
https://www.channelnewsasia.com/world/plastic-bag-ban-charge-waste-rwand...

आज काहीतरी वाचून पहिल्यांदा अंगावर काटा आला एकदम
खालील फोटोज म्हणजे कदाचित जगातील १.२ बिलियन (आजच्या) लोकांचे पूर्वज असणाऱ्या लोकांचा "हिंदू" म्हणून झालेला पहिला उल्लेख असावा, ह्या उल्लेखाच्या पूर्वी हिंदुधर्माचे "नाव" काय होते ते मला तरी माहिती नाही, सनातन धर्म असे पण म्हणले जाते पण उल्लेख मला तरी सापडलं नाही.

Screenshot_20220723-221234_Chrome.jpg220px-DNA_inscription_Hidush.jpg

ही(न)दाऊस - हिंदूष - सिंधू नदीच्या प्रांतातील...अकमेनिड पर्शियन राज्याच्या काळात, ओल्ड पर्शियन कुनेईफॉर्म मध्ये "आपला" आढळलेला पहिला उल्लेख ! "हिदाऊस"

हिदाऊस">>>
वा, वेगळीच माहिती मिळाली.
छान

"इंडियन" हा शब्द अमेरिका खंडात वेगळ्या लोकसमूहासाठी वापरतात.

northern Andean Indian या प्रकारचे लोक ग्वाटेमाला देशात बऱ्यापैकी आहेत. या देशाच्या नावाचा उगमही विविध अंगी आहे :
१. इंडियन उगमानुसार त्याचा अर्थ फुलझाडांचा प्रदेश असा आहे. तर

२. अन्य एका गृहीतकानुसार त्याचा अर्थ "पाणी ओकणारा पर्वत " आहे (तिथल्या ज्वालामुखी वरून दिलेले नाव)

मला वाटतं

आदिवासी लोकल जमाती दर्शवायला नेटिव्ह इंडियन म्हणतात आणि भारतीय लोकांना दर्शवायला ईस्ट इंडियन किंवा इंडियन अमेरिकन म्हणत असावेत

बाकी अमेरिकावासी भारतीय डिटेल सांगू शकतील.

चुभुदेघे

कोलंबसाला इंडिया शोधता शोधता अमेरिका गवसली म्हणून त्यांना तसं म्हणत असावेत.
----
वसईचे ख्रिश्चन लोक स्वतः:ला ईस्ट इंडियन म्हणवतात

बरोबर.
ऑक्सफर्ड शब्दकोशात दोन्ही अर्थांचा उहापोह केलेला आहे : https://www.oxfordlearnersdictionaries.com/definition/english/indian_1

त्या "दुसऱ्या" ( indigenous) अर्थाला असे म्हटलेले आहे:
old-fashioned, sometimes offensive)

आजच्या भूगोल खेळातील देशाचे नाव मजेदार असून त्यामागे तीन भिन्न वैशिष्ट्ये आणि व्युत्पत्ती आहेत.

मासे, झाडे आणि फुलपाखरांनी समृद्ध असलेला हा देश आहे.

हंगेरी देशाची राजधानी असलेली बुडापेस्ट नगरी ही मुळात बुडा आणि पेस्ट अश्या दोन जुळ्या शहरांपासून बनलेली आहे असे वाचण्यात आले हल्लीच, बुडा पश्चिम भाग अन् पेस्ट पूर्वभाग आहे म्हणतात अन् ही दोन शकले danube नदीने केली आहेत.

छान.
बुडा व पेस्ट या दोन्ही नावांचा रंजक इतिहास वाचला.

तसेच टोकिओचा इतिहास पण छान आहे
Edo>>>Tokyo.

आजच्या Globle आणि Worldle च्या संदर्भात -
जगाच्या या भागात खूपच देश असे आहेत ज्यांच्या राजधान्या देशांच्या नावावरून आहेत. पनामा, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला, मेक्सिको असे हारीने देश आहेत ज्यांच्या राजधान्या देशाच्या नावावरून आहेत. बेलिझ देश जेव्हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता तेव्हा राजधानी बेलीझ सिटी हीच होती. आता राजधानी नसली तरी ते अजूनही देशातलं सगळ्यात मोठं शहर आहे. जगाच्या या भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर असे का झाले असेल?

*हारीने >>हा शब्द खूप दिवसांनी वाचल्याने भलताच आवडला आहे !

**जगाच्या या भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर असे का झाले असेल?
>>>
छान विचार करण्याजोगा मुद्दा आहे.
बघूया कुठे काही सापडते का.

पनामा /मेक्सिको सिटी इ.>>>
अशा देशांच्या बाबतीत राजधानीचे नाव देशावरून दिले, की देशाचे नाव मूळच्या शहरावरून पडले, असा एक प्रश्न उपस्थित होतो. तो काही अंशी, आधी कोंबडी की आधी अंडे यासारखा आहे. थोडेफार वाचले असता अशी माहिती मिळाली:

१.काही देशांच्या बाबतीत मूळ शहराचे नाव देशाला दिले गेले. हा मुद्दा पटू शकतो कारण -

टोळी >> वसाहत>> शहर>> साम्राज्यविस्तार >>देश असा क्रम लक्षात घेतल्यावर ही बाजू पटते.

२. अन्य काही देशांच्या बाबतीत आधी देशाचे नाव होते तेच नाव (किंवा अगदी थोडासा फरक करून) राजधानीला दिले गेले. इथे ब्राझील हे ठळक उदाहरण आहे. कारण त्यांची मूळ राजधानी जेव्हा बदलली तेव्हा ब्राझीलिया केली गेली.
काही देशांना एकाहून अधिक राजधान्या देखील आहेत.

अर्थात हे अजून स्पष्ट होण्यासाठी भूगोलाचे काही खात्रीशीर संदर्भ मिळवावे लागतील.

होय. हे जरा गुंतागुंतीचे आहे. खात्रीशीर संदर्भ मिळवावे लागतील.

एक देश आणि त्याला असलेल्या राजधान्या बोलायचे झाले तर एकही अधिकृत राजधानी नसलेले देशसुद्धा आहेत.
स्वित्झर्लंडला अधिकृत राजधानी नाही. बर्न शहरात जरी त्यांची संसद आणि अनेक देशांचे दूतावास असले तरी बर्न ही देशाची Hauptstadt (capital city) नाही. ती Bundestadt (federal city) आहे. दुसऱ्या भाषेत बोलायचे तर बर्न de facto राजधानी आहे, पण de jure नाही.
ओशियानिया खंडामधल्या नौरू या देशालासुद्धा अधिकृत राजधानी नाही. Yaren District मध्ये सरकारी इमारती आहेत पण ती अधिकृत राजधानी नाही. नौरुचा झेंडा नक्की बघा. देश खूपच छोटा आहे आणि अनेकांना माहितीच नसतो कुठे आहे. त्यामुळे त्यांनी झेंड्यावर त्यांना शोधण्याचा नकाशाच दिला आहे. पिवळी रेषा म्हणजे विषुववृत्त. त्याच्या थोडंसं खाली असलेला तारा म्हणजे देशाचे स्थान.

वेगळी अधिकृत राजधानी नसलेले obvious देश म्हणजे city-states - सिंगापोर, व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको. तीनही देश city-states असल्यामुळे त्यांना वेगळी राजधानी अस्तित्वात नाही.

दक्षिण आफ्रिका बहुतेक एकमेव देश आहे ज्याला तीन राजधान्या आहेत.

ओशीयानियावरून अजून एक आठवले.
पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण दोन्ही गोलार्धात असलेले देश आहेत. म्हणजे विषुववृत्त ज्या देशांमधून जाते ते सगळे देश. तसेच पूर्व आणि पश्चिम गोलार्धात असलेले देश आहेत. म्हणजे 0 अंश आणि 180 अंश रेखावृत्ते ज्या देशांमधून जातात ते देश.
पण एकच देश असा आहे जो चारही गोलार्धात आहे - Kiribati (उच्चारी किरीबास किंवा किरीबाती). हा सुद्धा ओशियानीया मध्ये आहे. याचे पूर्वीचे नाव Gilbert's Island. स्थानिक भाषेत गिल्बर्टचे झाले किरिबाती. या देशांच्या बेटांमधल्या समुद्रात विषुववृत्त आणि 180 अंश रेखावृत्त एकमेकांना छेदतात. त्यामुळे देशाची बेटे चारही गोलार्धात आहेत.

या निमित्ताने विषुववृत्त आणि 0 अंश रेखावृत्त कुठे छेदतात ते नक्की बघा. त्या बिंदूला नाव आहे Null Island. जे बेट अस्तित्वातच नाही ते बेट Happy

छान माहिती चोबेजी
de facto व de jure या संदर्भात अजून एक गंमत पहा.
अमेरिकेची केंद्र सरकारच्या पातळीवरील 'अधिकृत ' ( de jure) अशी कोणतीच भाषा नाही !
त्यांची राष्ट्रीय भाषा de facto इंग्लिश आहे.

याच्या कारणमीमांसेबाबत बरेच काही वाचनात येते.

मस्त चर्चा चाललीय
स्वित्झर्लंडच्या राजधानीबद्दल नव्याने समजले

**पण एकच देश असा आहे जो चारही गोलार्धात आहे - Kiribati>>>

किरिबाती हा चारही गोलार्धात असलेला एकमेव देश ही माहिती भन्नाट आहे. या देशाला काहींच्या मते अजून एक मान आहे. तो म्हणजे, वर्षाच्या ठराविक कालावधीतील "उगवत्या सूर्याचा देश".
….

उगवत्या सूर्याचा देश कोणता?
याचे एकच असे उत्तर दिसत नाही.
यासंदर्भात जालावर वाचले असता बरीच उलट-सुलट आणि घोळदार माहिती मिळते.

जपानची तशी नोंद खूप प्राचीन काळी झालेली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा वगैरे गोष्टी अस्तित्वात आल्या आणि संदर्भ बदलले.

काहींच्या मते वर्षाच्या पहिल्या सहामाहीत न्युझीलंड हा प्रथम सूर्याचा मानकरी आहे तर दुसऱ्या सहामाहीत Samoa.
अन्य काहींच्या मते किरिबातीचा पहिला नंबर आहे वगैरे.

भूगोल अभ्यासकांनी अधिक सांगावे

जर्मनीला अन्य भाषक लोक काय काय म्हणतात ?
एका जर्मनीस्थिताकडून समजले :

स्पॅनिश लोक : अलेमानिया
फ्रेंच लोक : अलेमान्ये,

पोलिश लोक : नीम्सी
हाँगकाँगमध्ये : दं क्वॉक्

चीनमध्ये : दं ग्वो,
जपान मध्ये : दोइत्सं.

Submitted by कुमार१ on 18 July, 2022 - 16:43 <<<

Germany (Deutschland) : Often Heard People Pronounce It As डॉईशलँड, Its actually डॉईचलँत

Happy

Uruk, Ur, Meggido, Babylon, व Nineveh यांना आधुनिक जगातील सुरवातीची महानगरे मानतात. त्या संबंधी एक लेख :

https://www-nationalgeographic-co-uk.cdn.ampproject.org/v/s/www.national...

त्यापैकी Uruk >>>> ʿIrāq ( शहरावरून देशाचे नाव)
सुमेरिअन संस्कृतीत Urug = शहर.
इराकच्या अन्य व्युत्पती पण आहेत.

Pages