असे देश, अशी नावे !

Submitted by कुमार१ on 2 June, 2022 - 03:30

संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत 195 ते 249 असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.
world-map.jpg

देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :
1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती

वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांमध्ये विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.

१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.
या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत.
Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते.1984 मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.

Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे 851 भाषा प्रचलित आहेत.

२. भौगोलिक प्रकार
जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.

Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालियन पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली !

Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

3. भूगोलातील दिशा

सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी

आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे.

४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.

बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.

मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene
अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.

या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत.
stlucia.jpg

त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.

५. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.
माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.

सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :

a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार

असे हे व्युत्पत्तीपुराण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस अनेक मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.

“नावात काय आहे?” हा शेक्सपियर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न.
त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !

प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली.
ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ....

हा माझाही छंद होता. नवीन एखादे नाव आवडले की मग त्या देशाचा/ शहराचा भूगोल, इतिहास वगैरे वाचणे Happy

लेख छान, देशांच्या नावांच्या व्युत्पत्तीचा खेळ झकास.

रोचक लेख आहे. भारत = भा + रत बरोबर. भा हा धातू म्हणजे जसे आभा वगैरे शब्दांमधील, तेज दर्शवितो. तर रत म्हणजे मग्न. असे आहे ना?

आपल्या सर्वांचे मनापासून आभार !

* नाव आवडले की मग त्या देशाचा/ शहराचा भूगोल, इतिहास वगैरे वाचणे >>
अगदी ! Worldle खेळण्यासाठी मी पसरून ठेवायचा मोठा छापील नकाशा आणल्याने पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा आनंद मिळत आहे. Happy

भारत = भा + रतem> >>>
बरोबर.

भारतच्या दोन व्युत्पत्ती आहेत :
१ . भरतभूमी
२. भा + रत >> आंतरिक प्रकाशात लीन

रोचक लेख.

आवडला

शाळेत देशाचं नाव घेऊन नकाशात शोधायचा खेळ खेळायचो ते आठवलं

दोन खांबावर उभा असलेला एक देश पण आहे. जगातला सर्वात छोटा देश.
https://www.bbc.com/marathi/international-53777671
एका छोट्या बेटावर अकरा माणसं आहेत. हा ही स्वतंत्र देश आहे. या देशाचा राजा प्रजेसाठी होडी चालवतो.
https://www.bbc.com/marathi/international-57458397

रोचक लेख, कुमार सर.
Happy
नवीन माहिती मिळाली.
आपण त्याच त्या विश्वात जगत राहतो....
जग केव्हढे मोठे आहे..असे जाणवले!

आपल्या सर्वांचे मनापासून आभार !

वरील सर्व दुवे पाहिले. रंजक आहेत
आंतरराष्ट्रीय मान्यता नसलेली अनेक बेटे किंवा चिमुकले देश आहेत. ते सगळे मोजल्यावरच तो 249 आकडा येतो.

बनाना रिपब्लिक >>>
असे राज्य आणि मॅंगो पीपल (आम आदमी) अशी जोडी काही वेळेस राजकारण-चर्चेत वापरतात.

भा + रत ही व्युत्पत्ती सर्वमान्य नाही. ती ओढून ताणून आणलेली वाटते. मुळात ह्या द्वीपकल्पाचा मोठा भूभाग हा भरतवर्ष म्हणून ओळखला जात असे तो भरत नावाच्या राजामुळे. दुष्यंत राजा आणि शकुंतला ह्यांचा पुत्र सर्वदमन उर्फ भरत हा महापराक्रमी होता. त्याचा राज्यविस्तार म्हणजे भरतवर्ष. हा भरताचा भूभाग म्हणून पुढे भारत झाला.

आभार !
...
सिंहपुर होते पण ते सिंहावरून आलेले नाही >>>

२ प्रवाद आहेत :
१. सिंह = ताकद, सत्ता. हे प्रतीक
२. राजा एका अपरिचित पशूला सिंह समजला.

भा + रत ही व्युत्पत्ती सर्वमान्य नाही >>> +१

भरतवर्ष हे इतिहासाशी सुसंगत वाटते.

भारताचे नाव भारत कोणत्या कालखंडात होते ?
अगदी प्राचीन काळात जांबुद्वीप होते. पाटलीपुत्र ते पंजाब हा नद्यांचा प्रदेश आर्यावर्त नावाने होता.
अफगाणिस्तानातल्या मोठ्या भागाला गांधार देश म्हणत. दक्षिणेला मद्रदेश म्हणत होते. ही वर्णने तर महाभारतातच आहेत. देशोदेशींच्या राजांची वर्णने आहेत त्यात.

टर्की या देशाने त्याचे नाव आजपासून टर्कीये केले आहे.
नेदरलँडसने २०२० सालापासून हॉलंड हे नाव कायमचे टाकून दिले आहे.
झिंबाब्वेचे नाव पूर्वी होंडुरास होते.
म्याममारचे पूर्वीचे नाव ब्रह्मदेश तर श्रीलंकेचे पूर्वीचे नाव सिलोन होते.

झिंबाब्वेचे नाव पूर्वी होंडुरास होते. >>> नाही.
होंडुरास अमेरिका खंडात आहे.

विकिपीडियानुसार...

ऱ्होडेशिया हा दक्षिण आफ्रिके चा भाग होता.
पुढे त्याचे विभाजन झाले :
उत्तर ऱ्होडेशियाचा झाला झांबिया तर दक्षिणेचा झाला झिंबाब्वे.

टर्की या देशाने त्याचे नाव आजपासून टर्कीये केले आहे. >>> आभार !
>>>>
‘Türkiye’ इंग्लिशमध्ये लिहिताना या नावातील ü वेगळाच आहे !

हे अक्षर इंग्लिश भाषक देशात संगणकाने कसे लिहिणार ?

छान , माहिती कुमार सर !! वेगवेगळ्या विषयांवरचे तुमचे लेख म्हणजे नवीन माहितीचा खजिना च असतो .

जर्मन भाषेत लिहिताना एखाद्या स्वरावा दोन टिंबे दिलेले असली तर त्याचा उच्चार बदलतो. ह्या चिहनाला umlaut ( साधारण उच्चार उमलौठ ) म्हणतात. U ह्या स्वरावर हे चिहन असले तर त्याचा उच्चार उ असा न होता यु असा होतो. उदाहरणार्थ Max Muller ह्या नावात U वर umlaut आहे म्हणून शब्दाचा उच्चार माक्स म्युलर असा होईल. म्युलर मधला ल किंचित लांबवायचा आणि र किंचित अनुच्चारित. अनेक germanic भाषांमध्ये हे उच्चार आहेत.
तुर्की भाषेतही हाच नियम असेल तर उच्चार ट्यू (ऱ्हस्व ) होईल.

भारताचे नाव भारत कोणत्या कालखंडात होते ?
>>>
चांगला प्रश्न आहे.
इथे दिलेल्या माहितीनुसार https://en.wikipedia.org/wiki/Names_for_India#:~:text=Bh%C4%81rata%20has....
वायुपुराणात भारतवर्ष असा उल्लेख आहे.

आपल्या देशाचे संस्कृतमधील अधिकृत नाव भारत गणराज्य असे स्वीकारण्यात आले आहे.

मागे एकदा मी स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या दिवशी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम ऐकला होता. त्यात सांगितलेली माहिती अशी होती :
“ब्रिटिशांनी इंडियाची फाळणी केली आणि दोन देश निर्माण झाले. त्यांची अधिकृत नावे अशी ठेवण्यात आली :
१. इंडिया that is भारत व
२. इंडिया that is पाकिस्तान.

यातून असे सुचवायचे आहे की, भारत हा पूर्णपणे स्वतंत्र नवा देश आहे. त्याच्या नावाला फाळणीचे जोखड नको.
फाळणी झाली ती इंडियाची !"

यातून असे सुचवायचे आहे की, भारत हा पूर्णपणे स्वतंत्र नवा देश आहे. त्याच्या नावाला फाळणीचे गालबोट नको.
फाळणी झाली ती इंडियाची !>> ठराविक कावेबाज संघटनांच्या विचार करण्याच्या पद्धतीशी मिळताजुळता विचार आहे Wink

ठराविक कावेबाज संघटनांच्या विचार करण्याच्या पद्धतीशी मिळताजुळता विचार आहे >>> शेरेबाजी टाळून तथ्य लिहा. या आयडीने फक्त कुचाळक्या करत राहता, मूळच्या खुनशी स्वभावाचे प्रदर्शन करता. फॅक्ट लिहा.

कुमार सर, उदयगिरी इथल्या डोंगरात २२०० वर्षांपूर्वीचा एक शिलालेख सापडला आहे त्यात भारतवर्ष हा शब्द असल्याचा दावा आहे. पण हा शब्द भारत या राजाच्या नावावरून आला असेल किंवा भारतयुद्धावरून आला असेल यावर मतभेद आहेत.
कारण वेदांमधे अशा कोणत्याही युद्धाचा उल्लेख नाही. वायुपुराण, विष्णूपुराणात महाभारताचा उल्लेख येतो. पण असे युद्ध झालेच नाही असे इतिहासकार सरकार म्हणतात.

Pages