चिक्की

Submitted by तृप्ती आवटी on 17 January, 2013 - 21:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तीळ किंवा दाण्याचा कूट, १ वाटी गूळ, १ टे स्पून साजूक तूप

क्रमवार पाककृती: 

तीळ मंद आचेवर रंग न बदलू देता भाजून घ्यावेत. एका पसरट ताटात गार करायला ठेवावेत. दाण्याची चिक्की करायची असल्यास भाजलेल्या दाण्यातले १०-१२ दाणे सालं काढून अर्धे करुन घ्यावेत. उरलेल्याचा जरा भरड कूट करावा.

teeL4.jpg

एका थाळ्याला आणि वाटीच्या तळाला (बाहेरुन) तूपाचा हात लावून ठेवावे. कढईत अथवा जरा खोलगट पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात गूळ घालावा. आंच एकदम मंद ठेवावी. गूळ किसलेला नसल्यास कढईतच खडे जरा मऊ करुन फोडावेत. गुळाचा पाक होऊन फसफसायला लागेल. पाक सतत ढवळत रहावा.

teeL3.jpg

एका वाटीत गार पाणी घेऊन त्यात थेंबभर पाक घालावा. पाक लगेच कडक होउन छान खुटखुटीत झाला तर तयार झाला समजायचा (हो, खाऊन बघावा). पाक-चाचणी फेल गेल्यास आणखी थोडा वेळ फसफसु द्यावा. पाक झाल्यावर आंच बंद करावी. आता पाकात भाजलेले तीळ अथवा दाण्याचा कूट घालून भराभरा हलवावे आणि लगेच मिश्रण थाळ्यात घ्यावे. वाटीच्या तळाने सरसर पसरवावे. आपल्या (खाण्याच्या/देण्याच्या) कुवतीप्रमाणे जाडी ठेवावी. गरज पडल्यास थोडा तुपाचा हात लावून एक सारखे करुन घ्यावे. वड्या पाडायच्या असतील त्याप्रमाणे सुरीने थोड्या खाचा करुन घ्याव्यात म्हणजे नंतर वड्या तुटत नाहीत.

teeL11.jpg

पाचेक मिनिटात वड्या बर्‍यापैकी गार होउन निघायला लागतात. थाळ्याला चिकटल्याच तर थाळा अगदी पाच सेकंद गरम करावा. चिक्की तय्यार!

603151_594775723871687_892435503_n_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
नक्की आठवत नाही पण साधारण २०-२५ पातळ वड्या होतात
अधिक टिपा: 

मी पॉलिश्ड तीळ वापरलेत पण अशा चिक्कीसाठी साधे- गावराण हावरी- तीळ घ्यावेत. मस्त खमंग लागतात ते तीळ.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे
गजक बोलतो आम्ही यालाच.

शक्य असेल तर धाग्याचे नांव एडिट करून तिळाची चिक्की / तिळाच्या वड्या असे करावे असे सुचवितो.

**
गजक बोलतो आम्ही यालाच.
<<
गजक हा स्पेसिफिकली वेगळा पदार्थ आहे. तीळ व गूळ एकत्र कुटून तयार केलेला तो इंदोरी पदार्थ आहे.

या पद्ध्तीने यावेळी चिक्की करुन पाहिली एक वाटीची. पाकाची टेस्ट केलीच नाही बहुतेक त्यामुळे सॉफ्ट झाल्यात चिक्क्या. बच्चेकंपनीला त्यामुळेच आवडल्या Proud

या सीझनमध्ये 2 वेळा केल्या. मस्तं झाल्या. एकदम फुलप्रूफ रेसिपी आहे.
भराभर पसरवणे आणि वड्या नीटपणे निघणे यासाठी अजून प्रॅक्टिस लागेल.

हो, तसेच केले पण नाही आले भरभर पसरवायला. वाटीच्या बुडाला चिकटायला लागले. नंतर ताटातून ती निघेना. थोडे गरम केले, थोडे सुरीने उचकटून काढले. पातळ पसरणे जमले पाहिजे, काढणेही थोडे सोपे होईल.

थोडी जाड झाली चिक्की पण तरीही एकदम खुसखुशीत छान झाली.

Pages