पचनविज्ञान : ढेकर आणि पादनिर्मिती

Submitted by कुमार१ on 9 January, 2022 - 09:38

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.
………………………………………………………………………………….

अन्न ही आपली जगण्यासाठीची प्राथमिक गरज. आपण जे अन्न खातो ते जसेच्या तसे शरीर पोषणासाठी वापरता येत नाही. प्रथम त्याचे पचन करून ते सुलभ स्वरूपात आणावे लागते, जेणेकरून ते पेशींपर्यंत पोचते. त्या महत्त्वाच्या कामासाठी आपली पचनसंस्था कार्यरत असते. त्या संस्थेचे प्रमुख भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठी आतडी. आपल्या खाण्याच्या क्रियेबरोबर काही प्रमाणात हवा सुद्धा पोटात जाते. तसेच अन्नपचनाच्या दीर्घ प्रक्रियेत आतड्यांमध्ये काही वायू तयार होतात. साधारणपणे प्रौढांच्या पचनसंस्थेत रोज ७०० मिली. वायू तयार होतो आणि कोणत्याही वेळेस त्यातील सुमारे १०० ते २०० मिलिलिटर वायू तिथे अस्तित्वात असतो. वायूच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तो फार साठून न राहता शरीराबाहेर पडतो. त्याचे बाहेर पडण्याचे दोन मार्ग म्हणजे तोंड आणि गुदद्वार. अशाप्रकारे शरीरातून जे वायू उत्सर्जन होते ते मुळातून समजून घेण्यासाठी हा मर्यादित लेख.

पोटातील वायूनिर्मितीची कारणे :
पचनसंस्थेत वायू तयार होण्याचे दोन स्त्रोत असे आहेत:
१. तोंडातून जठरात गिळली गेलेली हवा आणि
२. मोठ्या आतड्यांमध्ये अन्नपचनपदार्थांवर सूक्ष्मजंतूंच्या झालेल्या प्रक्रियेतून निर्माण होणारे वायू.

वरील पहिल्या प्रकारे जी हवा जठरात जाते तो बाहेर टाकण्याचा प्रमुख मार्ग म्हणजेच ढेकर देणे. याउलट आतड्यांमध्ये तयार झालेले वायू बाहेर टाकण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे पाद सुटणे.
आता या दोन प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे सविस्तर समजून घेऊ.

ढेकरनिर्मिती
आपण तोंड उघडले की काही प्रमाणात हवा आत शिरतेच. पण ती जर मोठ्या प्रमाणात ‘गिळली’ गेली तर ती जठरात जाऊन बसते. असे होण्यासाठी खालील घटक कारणीभूत ठरतात :
१. भरभर खाणे व पिणे
२. च्युईंगम चघळणे
३. धूम्रपान
४. फसफसणाऱ्या शीतपेयांचे सेवन (बिअर, इ.)

यातील १ ते ३ मध्ये ढेकर आली असता त्यातून मुख्यत्वे नायट्रोजन व ऑक्सिजन बाहेर पडतात. पण चौथ्या कारणाचे बाबतीत बाहेर पडणारा मुख्य वायू हा कार्बन-डाय-ऑक्‍साईड असतो. गिळलेल्या हवेपैकी बरीचशी हवा ढेकरेच्या स्वरूपात बाहेर निघून जाते. परंतु थोड्या प्रमाणात जठरातील ती हवा पुढे आतड्यांमध्ये सरकते.

burping.jpgपादनिर्मिती
जेवणानंतर जठर विस्तारते आणि लहान आतडी उत्तेजित होतात. त्यामुळे जठरात उरलेला वायू पुढे सरकतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन व शोषण होते. परंतु अन्नातील अर्धवट किंवा न पचलेले घटक पुढे मोठ्या आतड्यात शिरतात. इथे अनेक उपयुक्त सूक्ष्मजंतूंचे वास्तव्य असते. या जंतूंच्या एन्झाइम्सची या अन्नघटकांवर रासायनिक प्रक्रिया होते. त्यातून काही प्रकारचे वायू तयार होतात. त्यांमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि मिथेन या वायूंचा समावेश होतो. हायड्रोजन सल्फाइड व अन्य काही सल्फरयुक्त पदार्थांमुळे या वायुस दुर्गंधी येते.

इथले काही सूक्ष्मजंतू हायड्रोजन व कार्बन-डाय ऑक्‍साईड हे वायू वापरुन टाकतात. त्यामुळे वायूसाठा काहीसा कमी होतो. या सर्व दीर्घ प्रक्रियेनंतर जो काही वायू उरतो तो सगळा गुदद्वारामार्गे पादरूपात बाहेर पडतो. या वायूचे दर 24 तासातले प्रमाण हे जेवणातील अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. निरोगी अवस्थेत ते साधारणपणे 200 ते 700 मिलिलिटर या दरम्यान राहते. इतका वायू बाहेर पडण्यासाठी 24 तासात सुमारे 14 ते 18 वेळेस पाद सोडला जातो.

आतड्यातील वायूनिर्मितीचे प्रमाण अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. असे अन्नघटक आणि त्यातील विशिष्ट रासायनिक पदार्थ यांचा आता विचार करू. समतोल आहारात पोळी/भाकरी, भात, भाज्या, डाळी, उसळी, तेल, दूध, तूप, अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो. या सगळ्यामधून आपल्याला मुख्यत्वे कर्बोदके, मेद आणि प्रथिने ही मूलभूत पोषणद्रव्ये मिळतात. यातील काही ठराविक प्रकारच्या द्रव्यांपासून अधिक वायूनिर्मिती होते. त्याची काही उदाहरणे आता पाहू.

अधिक वायूनिर्मितीस उत्तेजन देणारे विविध अन्नपदार्थ आणि त्यातील संबंधित रसायने अशी आहेत :
१. बटाटा, मका व गहू : यातील कर्बोदके (Starches) ‘जड’ प्रकारची असतात.

२. कडधान्ये (चवळी, वाटाणा इत्यादी) : यात stachyose व raffinose ही जड कर्बोदके असतात. कडधान्यांना भिजवून मोड आणताना त्या भांड्यातील पहिले पाणी फेकून दिले असता ही बऱ्यापैकी निघून जातात. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये ही साध्या कडधान्यांपेक्षा कमी वायूनिर्मिती करतात.

३. विविध प्रकारचे बीन्स : यातले काही तंतुमय पदार्थ पचत नाहीत. तसेच त्यांच्यात अन्य एक रसायन (AI) असते जे आपल्या आतड्यातील कर्बोदक पचविणाऱ्या एंझाइमला विरोध करते. बऱ्याच बीन्समध्ये TI नावाचे एक प्रथिन असते. या प्रथिनामुळे आपल्या अन्य एका पाचक एंझाइमला विरोध होतो. या कारणास्तव बीन्सच्या पचनाचे प्रमाण काहीसे कमी राहते.
जर आपण बीन्स व्यवस्थित शिजवून घेतले तर ते विरोधक प्रथिन बर्‍यापैकी नष्ट पावते.

४. शीतपेयातील गोड पदार्थ : अशा बऱ्याच पेयांत ‘साखरमुक्त’ या नावाखाली अन्य गोड पदार्थ घातलेले असतात उदाहरणार्थ : xylitol, mannitol, sorbitol. ही रसायने आतड्यातील जंतूसाठी मोठे ‘खाद्य’ ठरतात.
५. दूध व दुग्धजन्य पदार्थ : यातील Lactose या शर्करेचे पचन आशियाई वंशात प्रौढपणी बर्‍यापैकी कमी असते.

पचनसंस्थेमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन ढेकर व पाद यांच्यातर्फे होते हे आपण पाहिले. कधीकधी जेवणानंतर २-३ ढेकरा येणे हे नैसर्गिक आहे. एक प्रकारे ते पोट भरल्याचेही लक्षण असते. तीच गोष्ट ठराविक प्रमाणातील पादालाही लागू होते. मात्र जेव्हा काही कारणांमुळे पचनसंस्थेत बिघाड होतो तेव्हा वायूनिर्मिती आणि त्यांचे उत्सर्जन खूप प्रमाणात होते. अशी काही महत्त्वाची कारणे किंवा आजार आता थोडक्यात पाहू.

अतिरिक्त ढेकर
दिवसाकाठी वारंवार ढेकर येणे हे खालील आजारांचे/बिघाडांचे लक्षण असू शकते :
१. जठरदाह किंवा पेप्टिक अल्सर : यामध्ये ढेकरांच्या जोडीने मळमळ, छातीत जळजळ आणि अपचन ही लक्षणे दिसतात.
२. पित्ताशयाचे आजार
३. काही गोळ्यांचे दुष्परिणाम : यामध्ये मधुमेह उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर दिली जाणारी गोळी metformin हिचा समावेश आहे.

पाद उत्सर्जन समस्या
गुदद्वारातून वायु सुटत राहणे हे नैसर्गिक आहे. काही व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत वायूनिर्मिती जास्त होते. नक्की किती मर्यादेच्या पुढे अतिरिक्त वायूनिर्मिती म्हणायची याची ठोस व्याख्या नाही. आतड्यांच्या काही आजारांमध्ये वायू उत्सर्जन नीट न झाल्यामुळे संबंधित रुग्णास वारंवार पोट फुगल्याची भावना होत राहते. अशा आजारांमध्ये बद्धकोष्ठता, आतड्यांच्या हालचालींचे बिघाड(IBS), पचनात बिघाड करणारे काही ऑटोइम्युन आजार, दुग्धशर्करेचे अपचन आणि काही जंतुसंसर्ग यांचा समावेश होतो. वैद्यकात वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे (ibuprofen, statins) सुद्धा अशा वायुसमस्या निर्माण होतात. अशा विविध आजारांमध्ये सुटणाऱ्या पादास बर्‍यापैकी दुर्गंधी असते.

जेव्हा ढेकर अथवा पाद यांचे प्रमाण त्या व्यक्तीस सहन होण्यापलीकडे असेल तेव्हा वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. पचनसंस्थेसंबंधी अन्य जी लक्षणे दिसत असतील त्यानुसार डॉक्टर योग्य त्या तपासण्या सुचवतात. त्यानुसार योग्य ते निदान आणि उपचार करता येतात. संबंधित आजारांवरील विस्तृत विवेचन हे स्वतंत्र विषय असून या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत.

सामाजिक संकेत व मनोरंजन
ढेकर व पाद या दोन्ही क्रियांदरम्यान विविध छटांचे आवाज येतात. त्यामुळे त्या लक्षवेधी ठरतात. एखाद्या समूहात त्यांच्या आवाजा/वासानुसार ज्या काही प्रतिक्षिप्त क्रिया उमटतात त्यातून संबंधितास लाजल्यासारखे व नकोसे वाटते. त्यामुळे समूहात असताना या नैसर्गिक क्रियांची ऊर्मी दाबण्याकडे कल राहतो. वेळप्रसंगी त्यात यशस्वी होण्यासाठी बरीच कसरत करावी लागते.

त्यातल्या त्यात ढेकर हे प्रकरण काही संस्कृतींत समूहमान्य असते. पोटभर जेवणानंतर आलेली ढेकर हे तृप्तीचे लक्षण मानले जाते. लहान मुलांच्या जडणघडणीत या क्रियांच्या आवाजांचा चेष्टा आणि मनोरंजनासाठी भरपूर वापर केला जातो. साहित्यक्षेत्रात या क्रियेला विनोद, म्हणी, वाक्प्रचार आणि सुभाषितांमध्ये बर्‍यापैकी स्थान मिळालेले आहे.

समाजात काही जणांनी या क्रियांची भीड आणि संकोच कमी व्हावा यासाठी काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले दिसतात. याचे काही मजेशीर किस्से जालावर वाचण्यास उपलब्ध आहेत. अधूनमधून मोठ्यात मोठी ढेकर काढण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात त्या आवाजाची तीव्रता उपकरणाद्वारे मोजली जाते. आतापर्यंत अशा मोठ्या आवाजाच्या तीव्रतेचा जागतिक विक्रम ११० डेसिबल या तीव्रतेचा असून त्याची गिनीज बुकात नोंद झालेली आहे !

हे एक भारीच ....
2019 मध्ये सुरतमध्ये मोठ्याने पादण्याची स्पर्धा आयोजित केली होती (https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/gujarat-fart-competit....) त्यासाठी आधी ६० जणांनी नाव नोंदवले होते. परंतु आयत्या वेळेस अनेकांनी लाजून माघार घेतल्याने शेवटी फक्त तीन स्पर्धक उरले ! एकंदरीत ही स्पर्धा म्हणजे फुसका बार निघाली. तरीदेखील संबंधित संयोजक आशावादी असून भविष्यात त्यांचा अशा स्पर्धा पुन्हा घेण्याचा मानस आहे.

आणि हे तर भलतेच ...
अमेरिकेची टीव्ही अभिनेत्री स्टेफनी हिचा ‘उद्योग’ तर भन्नाट आहे; अगदी आचरटपणाच. ती स्वतःचा पाद बाटल्यांत भरून ऑनलाईन विकते ! त्यावर तिला लाखोंची कमाई झाली ( https://www.loksatta.com/trending/viral-news-tv-star-earn-rs-38-lakh-in-... ). हे ‘उत्पादन’ विकत घेणारेही धन्यच.
पण हाय रे ! हा उद्योग करताना तिच्या तब्बेतीवर विपरीत परिणाम झाला आणि तिचा हा उद्योग बंद पडला https://www.loksatta.com/trending/viral-news-stephanie-matto-made-rs-37-...).

असे हे पादपुराण !
आपल्या पचनसंस्थेत दररोज वायूनिर्मिती होते. एका प्रमाणाबाहेर तो वायू साठू लागला की त्याचे ढेकर व पाद अशा दोन्ही प्रकारे उत्सर्जन होते. त्यातून आपल्याला मोकळेपणाची भावना येते. अशा या दोन प्रक्रियांविषयी काही मूलभूत माहिती इथे लिहिली. समाजात या नैसर्गिक क्रियांबद्दल चारचौघात बोलणे हे काहीसे निषिद्ध मानले जाते. परंतु त्याच बरोबर या क्रियांचा उपयोग करमणूक आणि मनोरंजनासाठीही काही क्षेत्रात केलेला आढळतो.

नेहमीप्रमाणेच उत्साही चर्चेचे स्वागत आहे.
……………………………………………………………………………………………………..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मध्यंतरी खूप त्रास होत होता गॅसेस चा पण नंतर लक्षात आले की ते दातामुळं होतं
दातांच्या दुखण्याने मी बहुदा नीट चावून खात नव्हतो कारण नंतर जेव्हा दोन्ही दाढा रूट कॅनाल करून घेतल्या तेव्हा गॅसेस चे प्रमाण खूप कमी झाले
तसेच आमच्यासारखे बैठे काम करणार्यांनी नियमित व्यायाम केला तरी खूप फरक पडतो हाही अनुभव

पचनसंस्थेत बिघाड होतो तेव्हा वायूनिर्मिती आणि त्यांचे उत्सर्जन खूप प्रमाणात होते. ==> ++
माहितीत भर टाकणारा लेख !!

औषधांमुळे (ibuprofen, statins) सुद्धा अशा वायुसमस्या निर्माण होतात. ==>
पुर्वी ibuprofen घरात ठेवत होतो , हा दुष्परिणाम माहित झाला , धन्यवाद !!

'पादणे' या विषयावर एवढा महितीप्रद आणि रंजक लेख होऊ शकेल असे कधी वाटले नव्हते.
कुठेतरी ऐकलेली एक छोटीशी कथा येथे देण्याचा मोह आवरत नाही.
कुठच्या तरी एका समारंभात एका स्त्रीला जोरात पद येते. उपस्थित सर्व प्रतिष्ठितांना राग येतो. त्या स्त्रीला सर्वांनी दगड मारावेत. अशी शिक्षा सुनावण्यात येते. शिक्षेची अंमल बजावणी करणार एवढ्यात तेथील एक वयोवृद्ध सांगतो, 'पहिला दगड त्याने मारावा जो आता पर्यन्त कधीच पादला नाही'. प्रत्येकजण दुसऱ्याकडे पाहायला लागतो, आणि अखेर ती शिक्षा रद्द होते. असो...
नेहमी प्रमाणेच अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे.

आघाडीच्या तिन्ही प्रतिसादकांचे आभार !
१. दातांच्या दुखण्याने मी बहुदा नीट चावून खात नव्हतो >>> +११

२. पुर्वी ibuprofen घरात ठेवत होतो , हा दुष्परिणाम माहित झाला , +१

. कुठच्या तरी एका समारंभात एका स्त्रीला जोरात पाद येते. उपस्थित सर्व प्रतिष्ठितांना राग येतो.
>>>
लेखात दिलेल्या माहितीत, सुरतमध्ये ज्याने पादण्याची स्पर्धा आयोजित केली होती त्यामागचे कारणही पेपरात आले होते.
तो माणूस एकदा चित्रगृहात गेला असता त्याचा मोठ्याने पाद सुटला. त्यावर आजूबाजूस खूप हशा झाला. त्याला ते लागले. आणि मग त्याने अशा गोष्टीची जाहीरपणे स्पर्धा घेण्याचे ठरवले !

लेख अजून वाचायचा आहे. एरवी मी इतरांना लेखाला मुख्यचित्र लावा असा फुकाचा सल्ला देत असते. पण कुमारसर... हे फारच ग्राफिक झालं की हो... Lol

वरील व्यंगचित्र मुक्तस्त्रोतातून घेतलेले आहे.
लेखाचा हेतू आरोग्यमाहिती आणि मनोरंजन असा दुहेरी आहे.
त्यादृष्टीने मला ते चित्र अनुरूप वाटले.

अर्थात मतभिन्नतेचे स्वागत आहे... Happy
सर्वांचे आभार !

रेव्यु
ती चित्रफित ब्लॉक केलेली दिसतेय

छान लेख...
चित्र पाहून हे रॉकेट चंद्रावर निघायलय असे वाटले.. Happy

लेखविषय एकदम वेगळा !

हा विषय काव्यनिर्मितीसाठी कुणी वापरेल असे वाटले नव्हते (शाळेतली मुले सोडून Happy पण एक आहे :-

न तू जमीं के लिये है ना आसमां के लिये है
तेरा वजूद जो है सिर्फ दास्तां के लिये है

ह्याची प्रेरणा म्हणे उंटांचा पाद Happy

शालेय जीवनात असताना आम्ही मित्र एकत्र च झोपायचो अंगणात .एक च कॉमन मोठी गोधडी असायची पांघरून म्हणून.
ज्याला पाद आला आहे तो
सर्वांनी तोंडावरून ओढून घ्या गोधडी खूप गार लागत आहे .
असा आग्रह करायचा .
आणि तोंडावरून ओढून घेतली सर्वांनी गोधडी(.पाद येणार फक्त तोंड बाहेर ठेवायचा.)
की तो पाद सोडायचा.
मग काय धमाल यायची.

ऑफिस मध्ये स्वतः च्या जबाबदारी वर वाचा असा वैधानिक इशारा द्यायला हवा होता कुमार सर, मला "पादणे" हा शब्द न हसता वाचताच येत नाही. Uncontrollable हसू येत.
व्यंगचित्र पण छान, आणि वरती सदासुखी यांनी म्हंटल्यप्रमाणे ह्या विषयावर एवढा अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख प्रथमच वाचतेय.

वरील सर्व प्रतिसादकांचे आभार !
तुम्हा सर्वांचे किस्सेही खूप धमाल आहेत
मलासुद्धा त्यामुळे छान हहपुवा झालेले आहे Happy

डॉ कुमार नवीन वर्षाची छान सुरवात. छान माहितीपूर्वक आणि मनोरंजक माहिती. पादस्पर्धा वाचून हसता हसता पोटावर प्रचंड ताण आला. हेमंत यांच्या आठवणीने बालवयातील खोड्या आठवल्या. आम्ही पादच्या आवाजावरुन प्रत्येकाला फटाक्यांची नावे लावून बोलवायचो.

छान.. रोचक आणि माहितीपुर्ण लेख नेहमीप्रमाणेच. विषयही भन्नाट Happy

पादणारी व्यक्ती आजूबाजुच्यांना मानसिक आणि नासिक त्रास देत असल्याने कुठल्याही समाजात अप्रियच असते.
पण आपल्याकडे पादावर कविताच नाही तर संस्कृत श्लोकही रचले गेले आहेत.
संदर्भ - थ्री ईडियटस
तसेच हिंदी भाषेत पादाला "समीर - हवा का झोंका" असे सुंदर नाव देण्यात आले आहे.
संदर्भ - हम दिल दे चुके सनम

शिंकताना लोकं नाकावर हात ठेवून शिंकतात आणि नंतर अदबशीरपणे सॉरी बोलतात. पादताना मात्र हात ठेवणे तर दूर, आवाज झाला नसल्यास लपवायला बघतात. अश्यावेळी मग शास्त्रोक्त पद्धतीने छडा लावायचा झाल्यास आदामादा कोण पादा करून ते शोधावे लागते. किंवा थंबरूलनुसार ज्याला पहिला वास येतो, त्याच्यापासून सर्वात जवळ अंतरावर असलेली व्यक्ती पादली आहे असे घोषित केले जाते Happy

वरील सर्व प्रतिसादकांचे आभार !
छान पूरके !
..
बालवयातील खोड्या आठवल्या >>> ++११
..
संस्कृत श्लोकही रचले गेले आहेत. >> हे घ्या :

उत्तमम दधददात पादम,
मध्यम पादम थुचुक थुचुक,
घनिष्ठः थुड़थुडी पादम,
सुरसुरी प्राण घातकम
Happy

आणखी एक जोक,

होस्टेल मध्ये कोणाचा बघण्याचा कर्यक्रम असेल तर आम्ही नेहमीच एक प्रश्ण सुचवायचो.
मुलगा/मुलगी धार्मिक आणि खुप बोलका/बोलकी आहे का?
हॉस्टेल मध्ये एक मुलगी, नेहमी रात्रीच सुरु करायची. मग आम्ही तिला म्हणायचे, तुझी अजानची वेळ सुरु झाली( म्हणून धार्मिक).
बहुधा तिला ग्लुटेनचा त्रास असायचा. आणि भारतात तेव्हा ग्लुटेन वगैरे त्रास असु शकतो असे डॉक ना पण माहित न्हवते.
बिचारीने हॉस्टेलम्ध्ये मिळणारी चपाती बरोबर राजमा किंवा तत्सम कडधान्य खाल्ले की, रात्री सुरु जोरात. आणि ते सुद्धा ५-६ मिन्निटे नॉनस्टॉप. आम्ही मिनिटं मोजायचो.
कधी कधी तर तारसप्तक असायचे.

लहानपणी आम्ही म्हणायचो एका काकाने शिकवलेले,

ढरर्‍रम पादंम शुद्धं!
टाराटीरीची मध्यं!
दुसकुल्लम प्राण्घातं!

तेव्हा एक वेळ, मोठ्याने पादा, मध्यम आवाजात पण चालेल पण गपचुप नकोच. Happy

उत्तमे ढमढमे पादे, टाराटूरीचे मध्यमे पादांनाम फुस्कुली राणी, तस्य घाणी न जायते.., हे मराठीत म्हणायचो आम्ही Rofl
बापरे मला दर वेळेस तेवढंच हसायला येतय हे वाचताना.

वा, दोन्ही पूरके भारीच ! छान.
............................
या विषयावरील अजून एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. चारचौघात असो वा अगदी डॉक्टरकडे स्वतःची पचनविषयक तक्रार घेऊन दाखवायला गेले असो, हे जाणवेल. स्वतःची लक्षणे सांगताना मराठी माणूस ‘पाद’ शब्द उच्चारणे टाळून ‘गॅसेसचा त्रास’ असे म्हणणे पसंत करतो( 99.9% वेळेस).

सामाजिक संभाषणात लैंगिकते खालोखाल जर कुठला विषय निषिद्ध असेल तर तो हा.

असा इंग्लिशचा आधार घेण्यावरून पुलंनी त्यांच्या १९७४मधील लेखात मार्मिक टिपणी केलेली आहे ती अशी :

“.....त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटर्कोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो”.

Legumes contain oligosaccharides known as galactans – complex sugars that the body cannot digest because it lacks the necessary enzyme – alpha-galactosidase.

Because of this, eating legumes, including black beans, is known to cause some people intestinal gas and discomfort.

काळा घेवडा हा फक्त सातारा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये आहारात असतो .
अमेरिकेत सर्रास वापरला जातो
पण हा सर्वांना पचत नाही.
हेल्थ साठी अत्यंत बहुगुणी पण तो पचविण्याची कुवत मानवी शरीरात नसते

चांगली चर्चा. काळा घेवडा >> +११
.....
कडधान्यांच्या बाबतीत कच्चे आणि शिजवलेले यांचा वायूनिर्मितीशी संबंध:
१. कच्ची असल्यास पचायला सर्वात जड
२. मोड आणून कच्ची खाल्ल्यास वरच्यापेक्षा बरी
३. मोड आणून शिजवून खाल्ल्यास पचायला सोपी.
वरील क्रमाने वायूनिर्मिती कमी होत जाते.

मूग व मटकी यांची पचनतुलना :
मूग हे त्यात कमी वातकारक. त्यापेक्षा मटकी पचायला कठीण आहे.

मटकी पचनायोग्य होण्यासाठी ती ६० तास भिजवून ठेवा असे संशोधनात दिलेले दिसते. मात्र दैनंदिन जीवनात प्रत्येकाला इतके करणे जमेलच असे नाही.

मटकीच्या पचनाचे दोन भाग आहेत:
१. जड कर्बोदके : ही भिजवून पाणी फेकून दिल्याने बरीचशी निघून जातात .
२. प्रथिने : मटकीत निसर्गता एक असे द्रव्य आहे जे आपल्या स्वादुपिंडातील एका पाचक एंझाइमला विरोध करते. ते नाहीसे होण्यासाठी मटकीला पुरेशी उष्णता देणे आवश्यक असते. परंतु तरीही ते पूर्णपणे जात नाही.

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख!
मूळ लेखातील मजेदार नोंदी आणि प्रतिक्रियांमधील विनोद यामुळे अजूनच मनोरंजन झाले Lol

बाळाची ढेकर काढणे हे किती महत्वाचे आणि मोठे (कधी कधी वेळखाऊ) काम असते!

Pages