पचनविज्ञान : ढेकर आणि पादनिर्मिती

Submitted by कुमार१ on 9 January, 2022 - 09:38

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.
………………………………………………………………………………….

अन्न ही आपली जगण्यासाठीची प्राथमिक गरज. आपण जे अन्न खातो ते जसेच्या तसे शरीर पोषणासाठी वापरता येत नाही. प्रथम त्याचे पचन करून ते सुलभ स्वरूपात आणावे लागते, जेणेकरून ते पेशींपर्यंत पोचते. त्या महत्त्वाच्या कामासाठी आपली पचनसंस्था कार्यरत असते. त्या संस्थेचे प्रमुख भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठी आतडी. आपल्या खाण्याच्या क्रियेबरोबर काही प्रमाणात हवा सुद्धा पोटात जाते. तसेच अन्नपचनाच्या दीर्घ प्रक्रियेत आतड्यांमध्ये काही वायू तयार होतात. साधारणपणे प्रौढांच्या पचनसंस्थेत रोज ७०० मिली. वायू तयार होतो आणि कोणत्याही वेळेस त्यातील सुमारे १०० ते २०० मिलिलिटर वायू तिथे अस्तित्वात असतो. वायूच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तो फार साठून न राहता शरीराबाहेर पडतो. त्याचे बाहेर पडण्याचे दोन मार्ग म्हणजे तोंड आणि गुदद्वार. अशाप्रकारे शरीरातून जे वायू उत्सर्जन होते ते मुळातून समजून घेण्यासाठी हा मर्यादित लेख.

पोटातील वायूनिर्मितीची कारणे :
पचनसंस्थेत वायू तयार होण्याचे दोन स्त्रोत असे आहेत:
१. तोंडातून जठरात गिळली गेलेली हवा आणि
२. मोठ्या आतड्यांमध्ये अन्नपचनपदार्थांवर सूक्ष्मजंतूंच्या झालेल्या प्रक्रियेतून निर्माण होणारे वायू.

वरील पहिल्या प्रकारे जी हवा जठरात जाते तो बाहेर टाकण्याचा प्रमुख मार्ग म्हणजेच ढेकर देणे. याउलट आतड्यांमध्ये तयार झालेले वायू बाहेर टाकण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे पाद सुटणे.
आता या दोन प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे सविस्तर समजून घेऊ.

ढेकरनिर्मिती
आपण तोंड उघडले की काही प्रमाणात हवा आत शिरतेच. पण ती जर मोठ्या प्रमाणात ‘गिळली’ गेली तर ती जठरात जाऊन बसते. असे होण्यासाठी खालील घटक कारणीभूत ठरतात :
१. भरभर खाणे व पिणे
२. च्युईंगम चघळणे
३. धूम्रपान
४. फसफसणाऱ्या शीतपेयांचे सेवन (बिअर, इ.)

यातील १ ते ३ मध्ये ढेकर आली असता त्यातून मुख्यत्वे नायट्रोजन व ऑक्सिजन बाहेर पडतात. पण चौथ्या कारणाचे बाबतीत बाहेर पडणारा मुख्य वायू हा कार्बन-डाय-ऑक्‍साईड असतो. गिळलेल्या हवेपैकी बरीचशी हवा ढेकरेच्या स्वरूपात बाहेर निघून जाते. परंतु थोड्या प्रमाणात जठरातील ती हवा पुढे आतड्यांमध्ये सरकते.

burping.jpgपादनिर्मिती
जेवणानंतर जठर विस्तारते आणि लहान आतडी उत्तेजित होतात. त्यामुळे जठरात उरलेला वायू पुढे सरकतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन व शोषण होते. परंतु अन्नातील अर्धवट किंवा न पचलेले घटक पुढे मोठ्या आतड्यात शिरतात. इथे अनेक उपयुक्त सूक्ष्मजंतूंचे वास्तव्य असते. या जंतूंच्या एन्झाइम्सची या अन्नघटकांवर रासायनिक प्रक्रिया होते. त्यातून काही प्रकारचे वायू तयार होतात. त्यांमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि मिथेन या वायूंचा समावेश होतो. हायड्रोजन सल्फाइड व अन्य काही सल्फरयुक्त पदार्थांमुळे या वायुस दुर्गंधी येते.

इथले काही सूक्ष्मजंतू हायड्रोजन व कार्बन-डाय ऑक्‍साईड हे वायू वापरुन टाकतात. त्यामुळे वायूसाठा काहीसा कमी होतो. या सर्व दीर्घ प्रक्रियेनंतर जो काही वायू उरतो तो सगळा गुदद्वारामार्गे पादरूपात बाहेर पडतो. या वायूचे दर 24 तासातले प्रमाण हे जेवणातील अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. निरोगी अवस्थेत ते साधारणपणे 200 ते 700 मिलिलिटर या दरम्यान राहते. इतका वायू बाहेर पडण्यासाठी 24 तासात सुमारे 14 ते 18 वेळेस पाद सोडला जातो.

आतड्यातील वायूनिर्मितीचे प्रमाण अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. असे अन्नघटक आणि त्यातील विशिष्ट रासायनिक पदार्थ यांचा आता विचार करू. समतोल आहारात पोळी/भाकरी, भात, भाज्या, डाळी, उसळी, तेल, दूध, तूप, अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो. या सगळ्यामधून आपल्याला मुख्यत्वे कर्बोदके, मेद आणि प्रथिने ही मूलभूत पोषणद्रव्ये मिळतात. यातील काही ठराविक प्रकारच्या द्रव्यांपासून अधिक वायूनिर्मिती होते. त्याची काही उदाहरणे आता पाहू.

अधिक वायूनिर्मितीस उत्तेजन देणारे विविध अन्नपदार्थ आणि त्यातील संबंधित रसायने अशी आहेत :
१. बटाटा, मका व गहू : यातील कर्बोदके (Starches) ‘जड’ प्रकारची असतात.

२. कडधान्ये (चवळी, वाटाणा इत्यादी) : यात stachyose व raffinose ही जड कर्बोदके असतात. कडधान्यांना भिजवून मोड आणताना त्या भांड्यातील पहिले पाणी फेकून दिले असता ही बऱ्यापैकी निघून जातात. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये ही साध्या कडधान्यांपेक्षा कमी वायूनिर्मिती करतात.

३. विविध प्रकारचे बीन्स : यातले काही तंतुमय पदार्थ पचत नाहीत. तसेच त्यांच्यात अन्य एक रसायन (AI) असते जे आपल्या आतड्यातील कर्बोदक पचविणाऱ्या एंझाइमला विरोध करते. बऱ्याच बीन्समध्ये TI नावाचे एक प्रथिन असते. या प्रथिनामुळे आपल्या अन्य एका पाचक एंझाइमला विरोध होतो. या कारणास्तव बीन्सच्या पचनाचे प्रमाण काहीसे कमी राहते.
जर आपण बीन्स व्यवस्थित शिजवून घेतले तर ते विरोधक प्रथिन बर्‍यापैकी नष्ट पावते.

४. शीतपेयातील गोड पदार्थ : अशा बऱ्याच पेयांत ‘साखरमुक्त’ या नावाखाली अन्य गोड पदार्थ घातलेले असतात उदाहरणार्थ : xylitol, mannitol, sorbitol. ही रसायने आतड्यातील जंतूसाठी मोठे ‘खाद्य’ ठरतात.
५. दूध व दुग्धजन्य पदार्थ : यातील Lactose या शर्करेचे पचन आशियाई वंशात प्रौढपणी बर्‍यापैकी कमी असते.

पचनसंस्थेमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन ढेकर व पाद यांच्यातर्फे होते हे आपण पाहिले. कधीकधी जेवणानंतर २-३ ढेकरा येणे हे नैसर्गिक आहे. एक प्रकारे ते पोट भरल्याचेही लक्षण असते. तीच गोष्ट ठराविक प्रमाणातील पादालाही लागू होते. मात्र जेव्हा काही कारणांमुळे पचनसंस्थेत बिघाड होतो तेव्हा वायूनिर्मिती आणि त्यांचे उत्सर्जन खूप प्रमाणात होते. अशी काही महत्त्वाची कारणे किंवा आजार आता थोडक्यात पाहू.

अतिरिक्त ढेकर
दिवसाकाठी वारंवार ढेकर येणे हे खालील आजारांचे/बिघाडांचे लक्षण असू शकते :
१. जठरदाह किंवा पेप्टिक अल्सर : यामध्ये ढेकरांच्या जोडीने मळमळ, छातीत जळजळ आणि अपचन ही लक्षणे दिसतात.
२. पित्ताशयाचे आजार
३. काही गोळ्यांचे दुष्परिणाम : यामध्ये मधुमेह उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर दिली जाणारी गोळी metformin हिचा समावेश आहे.

पाद उत्सर्जन समस्या
गुदद्वारातून वायु सुटत राहणे हे नैसर्गिक आहे. काही व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत वायूनिर्मिती जास्त होते. नक्की किती मर्यादेच्या पुढे अतिरिक्त वायूनिर्मिती म्हणायची याची ठोस व्याख्या नाही. आतड्यांच्या काही आजारांमध्ये वायू उत्सर्जन नीट न झाल्यामुळे संबंधित रुग्णास वारंवार पोट फुगल्याची भावना होत राहते. अशा आजारांमध्ये बद्धकोष्ठता, आतड्यांच्या हालचालींचे बिघाड(IBS), पचनात बिघाड करणारे काही ऑटोइम्युन आजार, दुग्धशर्करेचे अपचन आणि काही जंतुसंसर्ग यांचा समावेश होतो. वैद्यकात वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे (ibuprofen, statins) सुद्धा अशा वायुसमस्या निर्माण होतात. अशा विविध आजारांमध्ये सुटणाऱ्या पादास बर्‍यापैकी दुर्गंधी असते.

जेव्हा ढेकर अथवा पाद यांचे प्रमाण त्या व्यक्तीस सहन होण्यापलीकडे असेल तेव्हा वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. पचनसंस्थेसंबंधी अन्य जी लक्षणे दिसत असतील त्यानुसार डॉक्टर योग्य त्या तपासण्या सुचवतात. त्यानुसार योग्य ते निदान आणि उपचार करता येतात. संबंधित आजारांवरील विस्तृत विवेचन हे स्वतंत्र विषय असून या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत.

सामाजिक संकेत व मनोरंजन
ढेकर व पाद या दोन्ही क्रियांदरम्यान विविध छटांचे आवाज येतात. त्यामुळे त्या लक्षवेधी ठरतात. एखाद्या समूहात त्यांच्या आवाजा/वासानुसार ज्या काही प्रतिक्षिप्त क्रिया उमटतात त्यातून संबंधितास लाजल्यासारखे व नकोसे वाटते. त्यामुळे समूहात असताना या नैसर्गिक क्रियांची ऊर्मी दाबण्याकडे कल राहतो. वेळप्रसंगी त्यात यशस्वी होण्यासाठी बरीच कसरत करावी लागते.

त्यातल्या त्यात ढेकर हे प्रकरण काही संस्कृतींत समूहमान्य असते. पोटभर जेवणानंतर आलेली ढेकर हे तृप्तीचे लक्षण मानले जाते. लहान मुलांच्या जडणघडणीत या क्रियांच्या आवाजांचा चेष्टा आणि मनोरंजनासाठी भरपूर वापर केला जातो. साहित्यक्षेत्रात या क्रियेला विनोद, म्हणी, वाक्प्रचार आणि सुभाषितांमध्ये बर्‍यापैकी स्थान मिळालेले आहे.

समाजात काही जणांनी या क्रियांची भीड आणि संकोच कमी व्हावा यासाठी काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले दिसतात. याचे काही मजेशीर किस्से जालावर वाचण्यास उपलब्ध आहेत. अधूनमधून मोठ्यात मोठी ढेकर काढण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात त्या आवाजाची तीव्रता उपकरणाद्वारे मोजली जाते. आतापर्यंत अशा मोठ्या आवाजाच्या तीव्रतेचा जागतिक विक्रम ११० डेसिबल या तीव्रतेचा असून त्याची गिनीज बुकात नोंद झालेली आहे !

हे एक भारीच ....
2019 मध्ये सुरतमध्ये मोठ्याने पादण्याची स्पर्धा आयोजित केली होती (https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/gujarat-fart-competit....) त्यासाठी आधी ६० जणांनी नाव नोंदवले होते. परंतु आयत्या वेळेस अनेकांनी लाजून माघार घेतल्याने शेवटी फक्त तीन स्पर्धक उरले ! एकंदरीत ही स्पर्धा म्हणजे फुसका बार निघाली. तरीदेखील संबंधित संयोजक आशावादी असून भविष्यात त्यांचा अशा स्पर्धा पुन्हा घेण्याचा मानस आहे.

आणि हे तर भलतेच ...
अमेरिकेची टीव्ही अभिनेत्री स्टेफनी हिचा ‘उद्योग’ तर भन्नाट आहे; अगदी आचरटपणाच. ती स्वतःचा पाद बाटल्यांत भरून ऑनलाईन विकते ! त्यावर तिला लाखोंची कमाई झाली ( https://www.loksatta.com/trending/viral-news-tv-star-earn-rs-38-lakh-in-... ). हे ‘उत्पादन’ विकत घेणारेही धन्यच.
पण हाय रे ! हा उद्योग करताना तिच्या तब्बेतीवर विपरीत परिणाम झाला आणि तिचा हा उद्योग बंद पडला https://www.loksatta.com/trending/viral-news-stephanie-matto-made-rs-37-...).

असे हे पादपुराण !
आपल्या पचनसंस्थेत दररोज वायूनिर्मिती होते. एका प्रमाणाबाहेर तो वायू साठू लागला की त्याचे ढेकर व पाद अशा दोन्ही प्रकारे उत्सर्जन होते. त्यातून आपल्याला मोकळेपणाची भावना येते. अशा या दोन प्रक्रियांविषयी काही मूलभूत माहिती इथे लिहिली. समाजात या नैसर्गिक क्रियांबद्दल चारचौघात बोलणे हे काहीसे निषिद्ध मानले जाते. परंतु त्याच बरोबर या क्रियांचा उपयोग करमणूक आणि मनोरंजनासाठीही काही क्षेत्रात केलेला आढळतो.

नेहमीप्रमाणेच उत्साही चर्चेचे स्वागत आहे.
……………………………………………………………………………………………………..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबो... आधी कुमार सरांना धन्यवाद देत आहे की इतका 'नाद-गंधात्मक' व प्रचलित, तरीही संकोच वाटल्याने अव्यक्त (शब्दात) असलेला अनुभव त्यांनी सहजपणे व नेहमीप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने मांडला आहे.
आणि प्रतिसाद तर सगळे एकापेक्षा एक.. विशेषतः ह. पा. चा प्रतिसाद वाचून त्यांनी म. भा. दिनाचे संयोजन करण्यासाठी औत्सुक्य दाखवले, ते योग्यच आहे हे पटलं. Happy विशिष्ट शब्दाचा इतका वैविध्यपूर्ण वापर करून लिहिलंय ना..
एक शंका आहे डॉक्टर. पादण्याचा अनुवंशिकतेशी संबंध आहे का?
आणि आम्हाला लहानपणी 'नाद' युक्त वायुमोचन म्हणजे पादणे व) दु)र्गंधयुक्त वायुमोचन म्हणजे वरती कुणीतरी लिहिल्याप्रमाणे **कुली असे वाटायचे. कारण पहिल्या विभागात तितके नाकातले केस जळत नाहीत.
आणखीन काही शंका व किस्से आहेत. सवडीने लिहेन.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
...
प्राचीन, चांगले मुद्दे उपस्थित केले आहेत.

१. पादण्याचा अनुवंशिकतेशी संबंध आहे का?
पादणे या प्रत्यक्ष क्रियेचा अनुवंशिकतेशी संबंध नाही. निरोगी स्वयंसेवकांवर जे प्रयोग झालेले आहेत त्यांचे निष्कर्ष बऱ्यापैकी मोठ्या रेंजमध्ये असतात. 24 तासात 14 ते 18 वेळा पादणे असते असे लेखात दिलेले आहे. परंतु काही अभ्यासामध्ये ३० वेळा पर्यंत सुद्धा ती क्रिया होत असल्याचे लक्षात आलेले आहे. जर कुठला आजार नसेल, तर निव्वळ पादण्याच्या वारंवारितेचा आणि आरोग्याचा तसा संबंध नाही लावता येत.

परंतु बादरायण संबंध असा जोडता येईल. पचनसंस्थेच्या काही आजारांमध्ये पादनिर्मिती खूप असते. त्यापैकी काही आजारांमध्ये अनुवंशिकतेचा भाग असतो.
आवाज आणि वास यासंबंधी काही विवेचन जरा वेळाने…

२.
पादाचा आवाज आणि वास यांचे प्रमाण एकमेकांशी व्यस्त असते असा एक समज आहे. परंतु तो दरवेळेस खरा नाही.
या दोन्ही गोष्टींचा कार्यकारणभाव समजून घेऊ :

१. वास : जेव्हा त्या वायूमध्ये हायड्रोजन सल्फाइड आणि अन्य सल्फरयुक्त संयुगांचे प्रमाण जास्त असते त्यानुसार वासाची तीव्रता वाढते.
२. आवाज : हा गुदद्वाराचे भागात असलेल्या एका नियंत्रक स्नायूच्या (sphincter) कार्यावर अवलंबून असतो. त्यानुसार वायू सुटण्याची गति आणि परिणामी आवाज ठरतो.
……

एक शालेय विनोद आठवला. एकदा एका शिक्षकांना वर्गातच जोराचा पाद येऊ पाहतो. तेव्हा ते त्यांचे टेबल जमिनीवर जोराने ओढतात आणि त्या आवाजात पाद उरकतात !
त्यावर पहिल्या रांगेतल्या विद्यार्थी म्हणतो, “गुरुजी, आवाजाचे ठीक पण वासाचे काय ? Happy

>>>>जेव्हा त्या वायूमध्ये हायड्रोजन सल्फाइड आणि अन्य सल्फरयुक्त संयुगांचे प्रमाण जास्त असते >> उपयुक्त.
जेवणात कोणते पदार्थ जास्त खाल्ले असता हे प्रमाण वाढेल ?

आहारातील पदार्थ >>>

उच्च प्रथिनयुक्त आहारामध्ये सल्फरने युक्त अमिनो आम्ले भरपूर असतात. असे काही पदार्थ म्हणजे मासे, चिकन, अंडी व बीफ.
तसेच भाज्यांमध्ये रताळे, कांदा व लसूण. या पदार्थांच्या पचनानंतर हायड्रोजन सल्फाइड वायूचे प्रमाण वाढते.

>> वायूमध्ये हायड्रोजन सल्फाइड आणि अन्य सल्फरयुक्त संयुगांचे

वाह... कुमार सरांनी धाग्यात आणि प्रतिसादांत क्लिष्ट प्रक्रिया किती सोप्या शब्दांत सांगितली आहे. अन्नापासून उर्जानिर्मिती हा नेहमीच माझ्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. खाल्लेल्या अन्नातील प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, मेद आदींपासून Adenosine Triphosphate (ATP) आणि त्यातून स्नायुंना मिळणाऱ्या उर्जेची निर्मिती हे सगळे जितके रोचक तितकेच खूप जटील आहे. किती क्लिष्ट प्रक्रिया आपल्या प्रत्येक छोट्यामोठ्या स्नायूंच्या हालचालीसोबत घडतात, आपल्याला त्याची जाणीव देखील नसते. पादवायूनिर्मिती हा बायप्रोडक्ट. (कुमार सर, Please correct me if I am wrong). हे सगळे खूप अचंबित करणारे आहे.

अतुल
अगदी बरोबर आहात ! खूप छान मुद्दा.
शरीरामध्ये कितीतरी महत्त्वाच्या कृती आपल्या नकळत होत असतात. त्याहून पुढचे म्हणजे, पेशींच्या पातळीवर कित्येक जनुकीय चुका होतात आणि त्यापैकी 99% चुका आपोआप दुरुस्त (ऑटो करेक्ट) केल्या जातात.
हे प्रचंड अचंबित करणारे आहे......

>>>>>>त्यावर पहिल्या रांगेतल्या विद्यार्थी म्हणतो, “गुरुजी, आवाजाचे ठीक पण वासाचे काय ? Happy
काय वात्रट असतात ना पोरे Lol Lol लाज काढतात.

समारोप

काही महिन्यांपूर्वी इथे उचकीवर लेख लिहिला होता. तो आवडल्याचे वाचकांनी लिहिले होते. त्यातूनच प्रस्तुत लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. ढेकर व पाद या प्रत्येकाच्या जीवनातील दैनंदिन अटळ क्रिया आहेत. त्यांच्या निर्मितीमागचे आरोग्यविज्ञान समजून द्यावे हा लेखाचा प्राथमिक उद्देश होता. या विषयाला मनोरंजनाचीही झालर होती. त्यानुसार आपण सर्वांनी आपापले बालपणापासूनचे अनुभव आणि अनेक किस्से लिहिलेत. त्यामुळे सर्वांचेच रंजन झाले.

गेली दोन वर्षे आपल्यावर सामाजिक अनारोग्याचे सावट आहे. कधी एकदा ते सर्व संपते आहे असं आपल्याला वाटतंय. अशा परिस्थितीत मनाला उभारी येण्यासाठी हास्यविनोद आणि मनोरंजन यांचे महत्त्व नक्कीच आहे. प्रस्तुत चर्चा वाचताना अनेकांना नैसर्गिकरीत्या भरपूर हसू आलेले दिसते. ते आरोग्यासाठी उत्तमच आहे. Happy

सर्व वाचक व प्रतिसादकांचे छान चर्चेबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार !

पाद चा वास येतो म्हणून आपल्याला नकोस वाटत.
पण पाद येणे ही नैसर्गिक क्रिया माणसाच्या शरीरासाठी योग्य च काम करत असावी.
पोटात गॅस तयार झाला तर तो बाहेर निघणे खूप गरजेचे अत्यावशक्य च आहे.
गॅस साठून राहिला तर त्रास पण खूप होतो.

>>अन्नापासून उर्जानिर्मिती >>>अतुल सर, लिहा तुम्ही याच्यावर

धन्यवाद @साद. हो, या विषयवार लिहायची इच्छा आहे. पण त्यामध्ये बऱ्याच क्लिष्ट क्रियांचा (जैविक व रासायनिक) समावेश आहे. अजून मला स्वत:लाच काही गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत. काही शंका आहेत. त्यांचे निरसन होईतो लिहिणे योग्य होणार नाही. दरम्यानच्या काळात शक्य झाल्यास कुमार सरांनी यावर लिहिले तर उत्तमच. मग माझ्या शंका त्याच धाग्यावर विचारेन.

धाग्याचा समारोप तर झाला. पण एक किस्सा काल आठवला. तो यासंदर्भात सांगितल्याशिवाय राहवत नाही. साधारणपणे बारा ते पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक नातेवाईक माझ्याकडे सहकुटुंब आले होते. पुण्यात ज्ञानेश्वर पादुका चौक आणि तुकाराम पादुका चौक असे दोन चौक आहेत. त्यांना या दोन्हीपैकी एका चौकात जायचे होते. थोडा वेळ माझ्याकडे थांबून विश्रांती घेऊन ते निघाले. रिक्षा बोलावली. त्यांना निरोप द्यायला आम्ही सुद्धा खाली रिक्षा पर्यंत गेलो. रिक्षा आली. कुठे जायचे हे त्याला सांगताना ह्यांना नक्की त्या दोन पैकी कोणता चौक पट्कन आठवेना. कोणतातरी पादुका चौक आहे इतकेच बहुतेक त्यांना आठवले कि काय माहित नाही. पण रिक्षावाल्याकडे बघून ते नुसतेच "पादुका..." म्हणाले आणि आठवू लागले, कोणता चौक? आणि इथे रिक्षावाल्याच्या विनोदबुद्धीला दाद द्यायलाच हवी. कारण एकही क्षण न दवडता तो पट्कन म्हणाला, "पादा की..." Lol

"पादुका?"
"पादा की..."

हे इतके पट्कन घडले कि त्यांच्यासहित आम्ही सगळे खो खो हसत सुटलो. त्यानंतर कित्येक वर्षे जेंव्हा केंव्हा ते आमच्याकडे आले तेंव्हा तेंव्हा ह्या प्रसंगाची आठवण काढून आम्ही हसलो आहोत. विनोद काय, त्यापेक्षा त्याने जे डायलॉगचे अचूक टायमिंग साधले होते त्याला तोडच नाही. "पादुका? पादा की..." Rofl

अतुल,
बरोबर, पादुका चा विनोद इतर वेळेसही मुलांमध्ये केला जातो. पण तुम्ही म्हणता तसे त्या परिस्थितीत अगदी चपखल झाला.

ऊर्जानिर्मिती यावर सावकाशीने का होईना पण तुम्ही जरूर लिहा.
माझ्या यादीत व डोक्यात अन्य काही आरोग्य विषय चालू आहेत.
तसेच, तुम्ही लिहिलेत तर वाचकांना जरा एक वेगळी लेखनाची चव अनुभवायला मिळेल Happy
शुभेच्छा !

>>>>>>>>हा शब्द अनेक म्हणींमध्ये वापरलेला आहे.
पादा पण नांदा
पादर्‍याला पावट्याचे निमित्त

काही लोकांमध्ये चहा किंवा कॉफीचा अतिरेक झाल्यास बद्धकोष्ठतेची प्रवृत्ती निर्माण होते. इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे.
चहा-कॉफी अतिरिक्त प्यायल्याने लघवी सुद्धा जास्त प्रमाणात होते आणि त्यातून पाण्याचे उत्सर्जन वाढते. चहा किंवा कॉफी पूर्ण बंद करायची गरज नाही. दिवसाकाठी दोन कप काही हरकत नाही. जर काही कारणाने त्याचे प्रमाण वाढत असेल आणि त्यामुळे नुसते पाणी पिणे कमी होत असेल तर ते योग्य नाही.

आहारात पाण्याचे प्रमाण चांगल्यापैकी ठेवून चोथायुक्त पदार्थ भरपूर असावेत. म्हणजे मग समतोल साधला जाईल.

आमच्याकडे क्वचित मला भयंकर वास येतो व बोलता बोलता मी नाकावर हाताने वारा घालत, सैरभैर होउन सिन्सीअरली नवर्‍याला विचारु लागते - बाहेरुन कसला वास येतोय? कसला तरी विचित्र येतोय वगैरे आणि हा हसायला लागतो तेव्हा कळतं - हा स्टिल्दी पादलेला आहे.
मग इतके हसतो आम्ही. अर्थात फार वेळा होत नाही Happy

सामो
चालायचंच... Happy
काही वर्षांपूर्वी माबोवरच एक मजेदार प्रश्न-उत्तर झालेले आहे:

प्रश्न : लग्न का करतात?
उत्तर: आपल्या ढेकर व पाद यांना घरचा साक्षीदार असण्यासाठी !

प्रश्न : लग्न का करतात?
उत्तर: आपल्या ढेकर व पाद यांना घरचा साक्षीदार असण्यासाठी !

हाहाहा

काहीतरी गुगल करत असताना खालील लेख सापडला. धाग्याच्या संदर्भात चपखल बसणारा लेख:

१. जुन्या काळातले ते खूप बडे जमीनदार खूप जोरात पादायचे. तो ऐकल्याबरोबर त्यांची बायको, नोकरचाकर चहा-पाणी घेऊन धावत धावत बाहेर यायचे.
२. पादाला म्हणजेच अपानवायूला ‘शर्धा’ असा पर्यायी शब्द आहे
३. प्रसिद्ध लेखक जेम्स जॉयसला त्याच्या बायकोच्या पादाचा वास घ्यायला फार आवडायचं
४. विशिष्ट जातींचे मासे पादून एकमेकांशी संवाद साधतात

https://www.aksharnama.com/client/article_detail/5354

अतुल
होय, तो वाचला होता. श्रद्धा शब्दाचा तो दुसरा अर्थ असल्याने त्यावर भाषेच्या धाग्यावर याआधीच धमाल झाली आहे Happy

जर्दाळू
>>> +११
कारण त्यात sorbitol हे रसायन भरपूर असते.

Pages