व्यसन आणि मुक्ती : अनुभव

Submitted by DJ....... on 4 October, 2021 - 07:53

माणसाला जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टिंचं व्यसन हे असतंच. एखाद्याला वाचनाचं, लिहिण्याचं, गाण्याचं, खाण्याचं, खाऊ घालण्याचं, खरेदीचं, हॉटेलिंगचं, सहलीचं, वाहन वेगाने चालवण्याचं, जीमचं व्यसन लागतं.. तर एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागतं.

वाचण्याचं, लिहिण्याचं, गाण्याचं व्यसन लागलं तर शारिरीक तोटा होत नाही... त्यामुळे या कॅटेगरीतील व्यसनं लागलेली माणसं प्रतिभासंपन्न होत जातात असा माझा तरी समज.

खाण्याचं, खाऊ घालण्याचं, हॉटेलिंगचं व्यसन लागलं तर जीभ आणि मन अत्यंत आनंदी होतं परंतू खिसा रिकामा होऊ लागतो अन योग्य व्यायाम न केल्यास वजन किलो-किलोने वाढण्याची तसेच आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते असं मला वाटतं.

सहलीचं व्यसन लागलं तर मन आनंदित, प्रफुल्लीत होतं परंतू खिशाला चाट बसू लागते हे माझे मत.

वेगाने वाहन चालवण्याचं व्यसन लागलं तर अपघात होण्याची, कोर्टकचेर्‍या अन दवाखाने मागे लागण्याची शक्यता अधिक बळावते असा माझा तर्क.

तरिही वर उल्लेख केलेली काही व्यसने प्रत्येकात थोड्याफार फरकाने असतातच.. त्याने घरातल्यांच्या कपाळावर निदान आठ्या तरी पडत नाहीत.

परंतु एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर मात्र तो घरच्यांच्या तसे समाजाच्या नजरेत उतरू लागतो. समाज त्यांना चांगलं समजत नाही असे आजुबाजुचे काही अनुभव बघितल्यावर लक्षात आलं (कदाचित मध्यम वर्गीय मानसिकतेच्या वस्तीत राहिल्यामुळे हे अनुभव आलेले असू शकतात****)

एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर शरिराची हानी तर होतेच वर भरपूर पैसाही त्यात वाया जातो.

-----------------------------------------------
मला स्वतःला एका टॉफीचं भयंकर व्यसन लागलेलं अजुनही स्मरतंय. ४ वर्षांपुर्वीची गोष्ट. मला ऑफिसने क्लएंट लोकेशनवरील एका प्रोजेक्टसाठी क्लाएंट ऑफिसमधे पाठवलं. तिथं आमच्या कंपनीतील इतरही कलिग् माझ्या आधीपासून कामं करायचे. त्यातल्या काहींना सिगारेटचं भयंकर व्यसन. दिवस्भरात ते कमीतकमी ८-१० सिगारेट्स ओढायचे अन त्यांच्या सोबतीला आम्हाला नुसते बोलायला/चहा प्यायला घेउन जायचे. ऑफिस मधे जवळ जवळ ६-७ हजार एम्प्लोयी असतील. ६ व्या मजल्यावर प्रशस्त कॅटीन अन तिथेच एका बाजुला भव्य गॅलरी मधे सिगारेटचं आउटलेट. शेजारीच चहाचं आउटलेट. मी त्यांच्यासोबत जाऊन कधीतरी चहा घ्यायचो परंतु एकदा एकाने मला पल्स नावाची कँडी दिली. त्या आधी मी कधीही ती कँडी खाल्ली नव्हती. पहिल्यांदा चव घेतली तर मला ती आजिबात आवडली नाही.. पण दुसर्‍याने दिलेली कँडी अशी फेकुन तरी कशी द्यायची ना? त्याला वाईट वाटेल म्हणुन मी ती तशीच अनिच्छेने चघळत राहिलो एका क्षणी त्या गोडसर कँडीतून चटकदार तिखट्+खारट्+आंबट्+तुरट अशा चविंचं भन्नाट मिश्रण जिभेवर पसरलं अन मी अंतर्बाह्य शहारून गेलो. मला खुप भारी काहीतरी वाटलं. त्या आधी मी कधीही अशा चवीची भन्नाट कँडी कधीही खाल्ली नव्हती. झालं.. मी पुन्हा एकदा नाव विचारून घेतलं. घरी जाताना काही कारण नसताना सिगारेट ऑटलेटवर गेलो अन ५ रुपयांच्या ५ पल्स कँडी खरेदी केल्या. बस मधे बसल्यावर घर येईपर्यंत २ संपवल्या. उरलेल्या बायको अन मुलांना दिल्या.
तो पहिला दिवस.
त्यानंटर मी रोज सिगारेट आउटलेटवर जाऊन तीच कँडी घेऊ लागलो. रोज १० रुपयांच्या दहा कँडीज घेऊन जेवणाच्या आधी २.. जेवल्या नंतर २.. बस मधून घरी जाईपर्यंत २ अन घरी गेल्यावर रात्रीच्या जेवणानंतर सर्वांसोबत १ असं करु लागलो. त्या कँडीला गिर्हाईकही फार. कधी कधी ती त्या सिगारेट ऑटलेटवर मिळायचीच नाही. मग ऑफिसमधून मेनगेट मधून तंगडतोड करत रोड साईड टपर्‍या धुंडाळात फिरायचो. २-३ महिन्यापर्यंत हे व्यसनच लागलं. शनिवार-रविवार ऑफिसला सुट्टी म्हणुन शुक्रवारी २०-२५ रुपयांच्या कँडीज घेऊ लागलो. हे असं वाढत जाणारं व्यसन बघून घरातल्यांच्या भुवया वर जाऊ लागल्या अन माझी चूक मला उमजू लागली.

त्यानंतर मला कँडी खाण्याची सवय सोडण्यासाठी खूप मनोनिग्रह करावा लागला. इतका की मी कँटीन मधे जेवायला जाणंच बंद केलं. पँट्रीत एक-दोन मित्रांसोबत जेवण करू लागलो. प्रसंगी एकटाच जेवत राहिलो परंतु दीड-दोन महिने कँटीन कडे फिरकलोच नाही. त्यामुळे कॅंडीज घेताच आल्या नाहीत. नेमकं मूळ कंपनीने मूळ ऑफिसला दुसर्‍या एका प्रोजेक्टसाठी परत बोलावल्याने थोडा ब्रेक मिळाला. या परिस्थितीचा फायदा घेत मी त्या तसल्या चंट कँडीच्या व्यसनातून मुक्त झालो. आता आठवलं तरी हसु येतं. Bw
------------------------

तुम्हाला कधी कोणते व्यसन लागले आहे का..? त्यावर कशी मात केली..??

Group content visibility: 
Use group defaults

कॉफीबाईट्चे व्यसन लागले होते.ट्रेन येईपर्यंत वेळ जायला तसेच संध्याकाळी भूकही लागलेली असायची.प्रथम २रुपयाच्या ४, नंतर ५ रुच्या १० असे प्रमाण वाढत गेले.जाडेपणही वाढले.नंतर दुसर्‍या ऑफिसला ट्रान्सफर झाल्यावर ट्रेनने जायचे नव्हते.मग कॉफीबाईट बंद झाले.
कधी कधी कॅडबरीचा अक्खा मोठा बार खात असायचे.तेही तसेच बंद झाले.

मला कॉम्प्युटर वर age of empires खेळायचं व्यसन होते
रात्र रात्र जागून खेळत असे, दिवसभर पण डोक्यात तेच
मी कागदावर मग अशी आर्मी करता येईल, तसा अटॅक करता येईल याची चित्रे काढायचो आणि कधी एकदा खेळायला मिळतोय याची वाट बघत बसायचो
डोक्यात सतत तेच विचार घोळत असत
शेवटी मग एकदा मनोनिगग्रह करून काढून टाकला, सेट अप फाईल पण डिलीट केली
पाहिले काही दिवस फार कसेतरी होत होते पण हळुहळु कमी झालं

मला कॉम्प्युटर वर age of empires खेळायचं व्यसन होते
रात्र रात्र जागून खेळत असे, दिवसभर पण डोक्यात तेच

सेम हियर. मॅप टाईप ब्लॅक फॉरेस्ट किंवा आयलंड हे माझे फेवरेट. व्यसन अजूनही आहे.

हो ब्लॅक फॉरेस्ट आणि सिविलायझेशन ब्रिटन आणि त्यांचे एलिट लॉंगबोमेन Happy
समव्यसनी मिळाला
मी नंतरचे 2, 3 पण खेळून पाहिले गेम्स,पण ओरिजनल व्हर्जन ला आजही तोड नाही

DJ, कॅण्डी सिरीज पाहिली का? तसं तर काही नव्हतं ना? Wink पण खरं आहे, क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचंही व्यसन लागतं आणि मग सोडवणं अवघड होतं.
कधी कधी कॅडबरीचा अक्खा मोठा बार खात असायचे. >>> सेम पिंच देवकी. मी सुद्धा आख्खेच्या आख्खे चॉकोलेट बार्स संपवायचे. अर्थात तेव्हा प्रचंड फिजिकल ऍक्टिव्हिटी करायचे (डॉग वॉक, झुंबा, जिम, डान्स क्लासेस, महिन्यातुन 2 वेळा सिंहगड). वजन वाढत नव्हतं, त्यामुळे कधी चिंता केली नाही. पण पहिल्या लॉक डाऊनमध्ये अचानक सगळ्या ऍक्टिव्हिटीज बटण बंद केल्यासारख्या एक रात्रीत थांबल्या आणि मग व्यायाम करणाऱ्या माणसाचं होतं तेच झालं. वजन झपकन वाढायला लागलं आणि मग चॉकोलेट बार्सचं व्यसन सुटलं.

सेम स्मोकिंग बद्दल, रोज रात्री एक सिगरेट अशी वर्षानुवर्ष स्मोक करायचे. पण लॉक डाऊनमध्ये बाहेर जायला स्कोप नाही आणि मुलासमोर स्मोक करायचं नाही या नियमामुळे स्मोकिंग थांबलं आणि लॉक डाऊन संपलं तरी 'बस्स आता' म्हणुन व्यसन सुटलं ते सुटलंच. नवरा स्मोकिंग करत नाही त्यामुळे मोह व्हायची शक्यता नाही.
शेवटचं व्यसन सतत स्वच्छता ( OCD चा परिणाम) हे सद्गुण मानलं जात असल्याने त्रास झाला तरी सुटत नाही. कौंसेलिंगने थोडं आटोक्यात आणता आणता, करोना उगवला आणि मग आरोग्य नियमांच्या नावावर पुन्हा रीलॅप्स. पण आता ते लपलं जातं.

मीरा खूप छान वाटलं तुमचा अनुभव ऐकून. धन्यवाद.
मला माझ्या मते चतत चरण्याचे व्यसन आहे. मी त्यातून बाहेर आलेले नाही.

अरे वा dj , खास धागा Happy
म्हणून तिकडचा प्रतिसाद इथेही चिटकवतो !
व्यसनाच्या बेड्या तोडण्यात यशस्वी झालो हे सांगून !
कदाचित कोणालातरी स्मोकिंग बंद करायला मदत होईल असा विचार करून माझ्याच इज्जतीचे खोबरं करून घेतोय !
नाहीतरी इथे मला कोण ओळखतय ? Happy

कंपनीत मित्रांच्या संगतीने सुरुवातीला सिगरेट नंतर दारू च्या नादी लागलो .
गावाला आई वडिलांना वाटायचं आपला मुलगा निर्व्यसनी , पण इथे पुण्यात बायको पासून लपवू शकतच नव्हतो .
छोटी कंपनी असल्यामुळे स्मोकिंग झोन हा प्रकारच नव्हता , ऑफिस साठी निघालो की सकाळी सकाळी रस्त्यातील दोन तीन टपऱ्यावाल्या भय्या लोकांचे खिसे भरल्या शिवाय पुढे जात नव्हतो . टपरीवाल्याला माझ्या बद्दल गैरसमज होऊ नये म्हणून ऐका टपरीवर एकच सिगरेट ओढायचो !

नंतर जाता येता चार चाकी पार्क करून सिगरेट चा आनंद घेता येईल अशा टपऱ्या शोधल्या .
सिनेमातील सिगरेट स्मोकिंग चे दृश्य पाहताना गळ्यात ऑक्सिडंट स्रावायला लागले .दिवस भरात एक पॅकेट वरून दोन पॅकेट कधी संपायला लागले ते कळले नाही . ब्रिस्टॉल , विल्स , गोल्ड फ्लॅक, लाईट नंतर परदेशी ब्रँड पर्यंत मजल जायला लागली होती . अगदी अमेरिकन आणि सौदी च्या मार्लबोरो मधील फरक कळायला लागला होता . मला आठवतंय सिगरेट सोडल्याच्या शेवटच्या महिन्यात नऊ / दहा हजार रुपये फक्त धुरकांड्या साठी उधळले होते .

सुट्टीच्या दिवशी वॉकिंग च्या बहाण्याने बाहेर पडून कुठे तरी आडोसा शोधून अर्ध्या तासात पाच सहा सिगरेट निर्लज्जपणे संपवणे आणि ते पाकीट आणि माचीस तिथेच कुठेतरी प्लास्टिक पिशवीत टाकून दुसऱ्या दिवसासाठी दगडाच्या कोपचित लपवून ठेवण्या पर्यंत खालच्या पातळीवर उतरलो !
सिगरेट बरोबर दारूचे ही व्यसन ही होते पण मुलं मोठी झाली तशी कधीतरी अमावस्या पौर्णिमेला प्यायचो , पण सिगरेट मात्र सखी झाली होती .

पण नंतर मन सिगरेट विरुद्ध बंड करायला लागले , सोडण्याची इच्छा प्रबळ व्हायला लागली . कंपनीतील व्यसनाचे भागीदार देखील व्यसन सोडण्यासाठी तडफडत होते , पण मार्ग सापडत नव्हता .
आतल्या आत मन कुरतडत होते , शरीराच्या हानीची भीती वाटतं होती , माझ्या नंतर कुटुंबाच्या होणाऱ्या हलाखीच्या काळजीने मन ग्रासून जायचे पण सिगरेट काही केल्या सुटत नव्हती !!

वारंवार होणारी सर्दी खोकल्यारूपाने महिनाभर टिकून राहायची , छातीचा पिंजरा काळवंढल्या मुळे खोकताना किळसवाणे द्रव थुंकत बसायचो , डॉक्टर ला टाळण्यासाठी मेडिकल मधून कफ सिरप ची अलोपॅथी / आयुर्वेदिक औषधे आणून ढोसायचो पण सिगरेट सुटत नव्हती !!!!
उद्यापासून सिगारेट सोडायचीच असा दृढ निश्चय करून आज 20 / 25 सिगरेट ओढायचो
शेवटी एक दिवस ठाम निर्णय घेऊन जालीम उपाय करण्याचे ठरवले , ऑफीसमधून आठ दिवसांची सुट्टी घेतली.
घराचे कंपाउंड ही सीमारेषा ठरवून कोणत्याही परिस्थिती ओलांडायची नाही ठरवून घरी वावरायला सुरवात केली . पहिल्याच दिवशी सिगारेट च्या तलफ ने गळ्यात निर्माण झालेल्या केमिकल्स चे पुर वाहायला लागले , सिगरेट ची आठवण बैचेन करत होती पण माझा निश्चय ठाम होता . दिवसभर जेवणात तिखट भाज्या , लसणाचा खर्डा , गोड पदार्थांचा मारा सुरू केला , आणि पहिला दिवस कसा तरी जिंकल्यावर आत्मविश्वास वाढला .
दुसऱ्या दिवशी गळ्यातील केमिकल्स चा त्रास खूपच वाढला , ऍसिडिटी त्रास व्हायला लागला , सिगरेट च्या आठवणीने आवंढा गिळून गिळून वैतागलो होतो , पोटाचे त्रास व्हायला लागले पण जेवणातील पदार्थ बदलले नाही , दुसरा दिवसही जिंकला ! घरातून बाहेर पडलोच नाही !!
नंतर तिसऱ्या दिवसांपासून नॉर्मल जेवण करून कोंडून घेणे हा प्रकार चालूच ठेवला , घरातील एकही सदस्याला निर्व्यसनी होण्यासाठी करत असल्याच्या जालीम उपायांची कल्पना नव्हती , मी 24 तास त्यांच्या बरोबर काढतोय याचाच त्यांना अमाप आनंद झालेला .

अखेर ते आठ दिवस असेच काढल्यानंतर आत्मविश्वास वाढलाच होता , आता ऑफिस ला जाताना प्रत्यक्षात प्रयोग करण्याची वेळ आली होती .
ऑफिस ला जाताना रस्त्यावरील एकाही टपरीवर न थांबलो नाही , दिवसभर मित्रांना माझ्या पराक्रमाची कहाणी ऐकवली , काहींनी माझी इच्छा शक्ती तोडण्याचा प्रयत्न केला पण मीच जिंकलो !

आता त्या गोष्टीला बरेच वर्ष होऊन गेलेत .
कोणतेही औषधोपचार न करता फुफसे बऱ्यापैकी ठणठणीत झाली आहेत , वॉकिंग किंवा सायकलिंग रोज करण्याचा प्रयत्न असतो .
इतरांना सिगरेट ओढताना पाहतो तेंव्हा तिथे जाऊन त्यांना समजवण्याची इच्छा होते , पण समोरच्याचा रिप्लाय काय येईल हे समजत नाही .
पण या करोना मूळे मास्क चा भरपूर फायदा मी घेतो ,
कोणी सिगरेट ओढताना दिसले की जवळ जाऊन त्याच्याकडे पाच दहा सेकंद निरखून पाहायचं आणि त्याचा प्रश्नांकित चेहरा तसाच ठेवून निघून जायचं . सिगारेट पिताना मला पाहणारा कोण होता ? याचा विचार करून करून त्याच्या डोक्याची मंडई होत असेल Happy

नवीन धागा काढला बरे केले डीजे. तुम्ही न काढता तर आज रात्री मीच काढणार होतो.

@ नगरवाले,
कदाचित कोणालातरी स्मोकिंग बंद करायला मदत होईल असा विचार करून माझ्याच इज्जतीचे खोबरं करून घेतोय !
>>>
छे हो, उलट आदर वाढला हे वाचून. असे ठरवून घरात कोंडून आपले आपण सिगारेट सोडवणे ग्रेट आहे. आणि हा छान ऊपाय आहे कुटुंबासोबत राहणे. ज्यांच्यासाठी सोडतोय त्यांचे चेहरे डोळ्यासमोर. बाहेर कितीही हितचिंतक असले तरी चार उकसवणारेही असतात. असो, अभिनंदन !

DJ, कॅण्डी सिरीज पाहिली का? तसं तर काही नव्हतं ना? Wink पण खरं आहे, क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचंही व्यसन लागतं आणि मग सोडवणं अवघड होतं.>> Bw मी नव्ह्तं पाहिलं ते कँडी सीरीज. पण जाम व्य्सन लागलं होतं हे मात्र नक्की.

@नगरवाले : तुमचा अनुभव ऐकुन खूप भयंकर वाटलं. आता तुम्ही सिगारेट सोडली हे खूप प्रेरणादायी आहे. इथे कुणाला असं व्यसन सोडावसं वाटत असेल त्यांना तुमचा अनुभव नक्कीच त्यातुन बाहेर पडण्यासाठी उपयोगी ठरेल. सिगारेट सोडताना तुम्ही दर महिन्याला ८-९ हजार खर्च करत होता हे ऐकुन डोळे पांढरे झाले. सिगारेट सोबत चहाही होत असेलच... त्याचा खर्च वेगळा. शिवाय स्मोकिंगचा वास येऊ नये म्हणुन मेंथॉल वगैरे कँडी आल्याच. परंतु तो आता भूतकाळ झाला याचं समाधान वाटलं. भविष्यात त्या वाटेला पुन्हा जाउ नका हीच गोड जबरदस्ती समजा..!! Bw

@ऋन्मेष : तुमचा ताप वाचवला म्हणा की मी Wink

दर महिन्याला ८-९ हजार खर्च करत होता हे ऐकुन डोळे पांढरे झाले. सिगारेट सोबत चहाही होत असेलच... त्याचा खर्च वेगळा. शिवाय स्मोकिंगचा वास येऊ नये म्हणुन मेंथॉल वगैरे कँडी आल्याच. >>>>>>>>>>>>>>
खरं आहे !
स्मोकिंग चा वास लपवण्यासाठी विविध कंपन्यांची केमिकल्स मिसळून बनवलेल्या गोळ्या मुळे आणि सतत च्या स्मोकिंग मुळे वारंवार तोंड यायचे !
मला तोंडातील अल्सर झाल्यासारखे फील यायला लागले होते .
फळे खरेदी करणे म्हणजे फालतू खर्च अशी ही मानसिक अवस्था झाली होती .
म्हणून पूर्वी किती पैसा बरबाद झाला याचा विचार न करता माझे आयुष्य वाढले यातच मला आनंद आहे Happy

चांगला धागा. नगरवाले, मीरा, प्रतिसाद आवडले.
अच्युत गोडबोले यांचा व्यसन सोडण्याच्या बाबतीतला अनुभव मुलाखतीत ऐकला होता (बहुतेक आत्मचरित्रात पण आहे) तो लक्षात आहे. तेव्हा ते आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणीत सापडलेले होते आणि व्यसनांच्या बाबतीत तर रसातळाला गेलेले होते. अखेर असाच एक दिवशी मनाचा निर्धार केला. सकाळी चहानंतर सिगारेटची जबरदस्त तलफ यायची पण एकदा तिच्यावर मात केली आणि त्यांना आत्मविश्वास आला. शेवटी एकदाचे व्यसनांमधून मोकळे झाले. मुळातून ऐकण्या/वाचण्यासारखा अनुभव आहे.

पूर्वी कुठेतरी (कदाचित मिपावर किंवा ऐसीवर लिहिले होते, आता माझ्या ब्लॉगवर आहे ते परत लिहितो.

१. तुम्हाला सिगरेट,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
मुळात मी सिगरेट का प्यायला लागलो, इथून सुरुवात करावी लागेल. माझे वडील गेले अनेक वर्षे तंबाखू खातात, पण मला ते कधीच आवडले नाही. त्यामुळे चघळायचे प्रकार मी कधीच केले नाहीत म्हणजे पान, तंबाखू-चुना, गुटखा, पानमसाला वगैरे.

माझा असा स्वभाव आहे, की एखादी गोष्ट करावी वाटली की मी ती करतो. मरताना असं वाटायला नको की अरे, आपण हे करायला हवे होते आणि ते केले नाही. निव्वळ त्या कल्पनेतून मी पहिली सिगरेट प्यायलो, अजून आठवतंय VJTI च्या वार्षिक संमेलनात, मित्राबरोबर. मला कधीही, कुणीही सिगरेट पी म्हणून सांगितले नाही, मित्र पित होते तरी त्यांनीपण कधी ऑफर केली नाही, तरीही. पहिली वेळ होती म्हणून मेंथॉलची सिगरेट प्यायलो, घाबरत घाबरत झुरका घेतला, खोकला वगैरे काही आला नाही, अर्ध्या मिनिटात डोके मंद गरगरले (मित्र म्हणाला तुला “किक” बसली). आणि ती आयुष्यातली पहिली चूक झाली. दुसऱ्या दिवशी पानवाल्याकडे जाऊन “पूर्ण” सिगरेट स्वतः प्यायलो आणि मित्रासमोर फुशारकीने सांगितले. ती आयुष्यातली दुसरी चूक झाली. हळूहळू दिवसाला १-२-५ असे प्रमाण वाढत होते. पण तरी वाटायच की हॅ, आपल्याला काही व्यसन नाही, मी कधीही सोडू शकतो. ती आयुष्यातली तिसरी चूक झाली. हळूहळू ते प्रकार वाढत गेले, नोकरीला लागल्यावर स्वतःचा पैसा आला आणि मग all hell broke loose.

२. हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
खूप केले. सांगतो पुढे.

३. पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरुवातच करू नका. पण जर लागले, तर पाण्याच्या सहवासात रहा. जमले तर रोज पोहायला जा. ते नाही जमले तर दिवसातून दोनदा गार पाण्याने आंघोळ करा. तेपण नाही जमले तर तलफ येईल तेव्हा घोटभर पाणी प्या. जास्त नाही, फक्त १ घोट, केवळ तोंड ओलसर करायला. कारण क्रेविंग आले की तोंडाला कोरड पडते, सिगरेट प्यावीशी वाटते. ते क्रेविंग आपल्याला मारायचे आहे. त्यासाठी तोंड ओले पाहिजे.

४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते? – माहीत नाही.

५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
बरेच आहेत. पैशाची नासाडी होत नाही, आयुष्याचे मातेरे होत नाही, तब्बेत चांगली राहाते, लपूनछपून सिगरेट प्यावी लागत नाही, कपड्यांना वास येत नाही, दात पिवळे होत नाहीत. (मी सिगरेट सोडून जवळपास २० वर्ष झाली पण अजूनही माझे दात पिवळे पडले आहेत. लंग्ज तर मला बघता येत नाहीत तिथे किती वाटोळं झालं आहे ते. एकदा नुकसान झाले की ते कधीच भरून येत नाही.)

जेव्हा तुम्ही १ आठवडा यशस्वी व्हाल, तेव्हा वाचलेल्या पैशातून स्वतःला गिफ्ट द्या (सिनेमा बघा, पुस्तक घ्या, पर्फ्युम घ्या, बायको/प्रेयसी/मुलांसाठी गिफ्ट घ्या वगैरे). मी वाचलेल्या पैशातून एका अनाथ मुलीच्या शिक्षणाचा खर्च करायचो. त्यातून तुमचा हुरूप अजून वाढेल. तुम्ही प्रयत्न करत रहा. तुमचे व्यसन नक्की सुटेल. जर मला जमले तर तुम्हाला पण नक्की जमेल. धीर सोडू नका. Keep trying and marching towards your goal. तुम्हाला शुभेच्छा.

व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न:
खूप केले. सांगतो. मी कामानिमित्त वरचेवर दौऱ्यावर जायचो. तिथे घरचे कुणी नसायचे, त्यामुळे कुणाला कळेल, कपड्याना वास येईल ही भिती नसायची. त्यामुळे सिगरेट पिणे खूप वाढले. तेव्हा ऑफिसमध्ये पण सेंट्रलाएज्ड एसी होते, हुद्दा मोठा होता त्यामुळे कुणाला भीक न घालता सिगरेट प्यायचो. दौऱ्यावर असताना एक दिवस मला उठल्या-उठल्या दात घासायच्या आधीच सिगरेट प्यावीशी वाटली आणि तेव्हा पहिल्यांदा साक्षात्कार झाला की आपल्याला व्यसन लागले आहे. ही फार मोठ्ठी गोष्ट आहे की आपल्याला स्वतःला हे कळले पाहिजे.

मग मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सगळे म्हणतात तसे कोल्ड टर्कीने सुरुवात केली. १ दिवस बरा गेला मग परत येरे माझ्या मागल्या. मग पाकिट बाळगणे बंद केले. म्हणजे सिगरेट प्यायची तर झक्कत बाहेर जावे लागायचे. त्रास व्हायचा. कमी जायचो, पण तरीपण जायचो. मग खिशात पैसे ठेवणेच बंद केले. पण मग त्यामुळे ऑफिसात इतरांकडे सिगरेट मागायला लागलो. एक दिवस कानावर पडले की “साला, इतना बडा समझता है, लेकिन भिकारी की तरह सिगरेट मांगता है”. ते खूपच मनाला लागले आणि मग सिगरेट मागणे पण बंद केले. रादर बंद झाले, पण पूर्ण नाही झाले. बाहेर कधीतरी प्यायचोच, पण २ सिगरेटच्या दरम्यानचे अंतर वाढले. नंतर मला स्वतःच जाणवले की मी कधीच चालता-चालता सिगरेट पीत नाही. एकाजागी शांत बसून झुरके घ्यायलाच मला आवडते. त्यामुळे सिगरेटची तलफ आली की मी उठून चालू पडायचो, पण पानटपरीपासून दूर. तेव्हा मला अतिशय महत्वाचा शोध लागला. सिगरेट प्याविशी वाटली की तोंड कोरडे पडते. मग मी पाणी प्यायला सुरुवात केली. त्याने खूप फायदा झाला. इतके झाले तरी अजून १००% यश न्हवते. त्याच्यासाठी कोल्ड टर्की लागते. आमच्या ओळखीचे १ गृहस्थ होते (माझी आई त्यांच्या ऑफिसात काम करत असे, मी त्यांना आजोबा म्हणायचो). ते अतिशय श्रीमंत आणि यशस्वी होते. माझी आई सांगायची की ते २२ वर्षे रोज “५५५” चा ५० सिगरेटचा एक डबा (बहुदा त्याकाळी डबे होते, मला माहित नाही) आणि कधीकधी वर अजून १० प्यायचे. त्यांची बोटेपण निकोटिनने पिवळी पडली होती. ते एकदा पावसात घरी चालले होते आणि नेमकी काड्यापेटी संपली. तेव्हा मित्र त्यांना हिणवून काहीतरी बोलला तर त्यांनी तिथल्या तिथे “५५५” चा डबा फेकला आणि म्हणाले की मी आजपासून सिगरेट सोडली. ते आयुष्यात कधीच सिगरेट प्यायले नाहीत. मी तर त्यांना कधीच सिगरेट पिताना बघितले न्हवते, ते एकेकाळी सिगरेट प्यायचे याच्यावर पण माझा विश्वास न्हवता. पण एक हुरूप आला की हा माणूस २२ वर्षांनी जर सिगरेट सोडू शकतो, तर मी पण करू शकतो. नंतर मी जे.आर.डी. टाटा यांच्या एका पुस्तकात वाचले की त्यांनी पण एका दिवशी अशीच सिगरेट थांबवली. शेवटी मी पण एक दिवस कोल्ड टर्कीने सिगरेट थांबवली. कुठलाही विशेष दिवस निवडला नाही, कारण जर रिलॅप्स झाला तर मग पुढचा “विशेष दिवस” दिसला असता आणि मला ते नको होते. तुम्हाला हे सगळे पटकन झाले असे वाटेल, पण ही फार मोठी प्रोसेस होती.

मी एकेकाळी इतका कट्टर व्यसनाधीन होतो, हे माझ्या जवळच्या बऱ्याच लोकांना माहीतही नाही आणि माहीत झाले तरी त्यांचा विश्वास बसणार नाही, अशी परिस्थिती आहे. आता जवळपास २० वर्ष झाली. आज लिहिताना पण अंगावर काटा आला आहे, इतका तो प्रवास खडतर होता. पण आज मिळणारे समाधान नक्कीच अनमोल आहे.

एज ऑफ एमपायर आम्ही अजूनही खेळतो... बाप गेम आहे... अर्धे मित्र अमेरिकेतून असतात आणि अर्धे भारतातून...
महिन्यात एकदा असते मॅच.

मी पाटी पेन्सिली खायचे.अगदी एखादी डेलिकसी खाल्यासारखं निवांत बसून वाचता वाचता पाकीट शेजारी ठेवून खायचे.वेगवेगळ्या स्टेशनरी दुकानातून खरेदी करायचे.नंतर एकदा कावीळ झाली तेव्हा हिमोग्लोबिन 6 वर आहे कळलं.(या पेन्सिली कॅल्शियम थोडं देत असल्या तरी त्यात आणि बराच गाळ असतो. शरीरातलं आयर्न शोषतात.)योग्य आयर्न, व्हिटामिन बी12, कॅल्शियम आहारात वाढवलं.आणि पेन्सिल खायची इच्छा सोडवली.

सुप्रभात, खूप मस्त चर्चा. मनातले काही लिहायचे आहे पण जाम भीती वाटतेय, सगळे खरे खरे लिहायची खूप भीती वाटतेय, पण थोडा प्रयत्न करीन. कारण मृत्यूच्या दारातून जस्ट परत आलोय.

@उपाशी बोका, तुम्ही इतक्या महत्प्रयासाने वाईट व्यसनांपासून मुक्त झाला याबद्दल अभिनंदन. तुमचा अन् नगरवाले यांचा अनुभव बऱ्याच जणांना प्रेरणादायी ठरू शकतो.

@Sharadg, तुम्ही आता बरे झालात त्याबद्दल अभिनंदन. तुमचे अनुभव लिहिताना तुम्हाला त्रास होऊ नये असे वाटते. कधी कधी वाईट भूतकाळ आठवला तरी त्रास होतो. तसा त्रास होणार नसेल तरच अनुभव लिहा अन्यथा राहू द्या. काळजी घ्या. आनंदी राहा.

सुप्रभात, खूप मस्त चर्चा. मनातले काही लिहायचे आहे पण जाम भीती वाटतेय, सगळे खरे खरे लिहायची खूप भीती वाटतेय, पण थोडा प्रयत्न करीन. कारण मृत्यूच्या दारातून जस्ट परत आलोय.>>>>>>>>
बिनधास्त लिहा !
मनावरील हजार टन चे ओझे कमी झाल्याची जाणीव होईल .

DJ....... , नगरवाले, उपाशी बोका -

छान अनुभव सांगितला आहे. अभिनंदन बाहेर पडलात आणि घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहिलांत. जे व्यसनात अडकले आहेत आणि बाहेर पडण्याची धडपड करत आहेत त्यांना नक्कीच मदत / प्रेरणा मिळेल.

छान, वेगवेगळे अनुभव सगळ्यांचे.
सिगरेट व्यसनावर कसे ही करून मात करणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन व कौतुक.

सिगरेट खरेच सोडायची आहे आणि ती ही लगेच अशी इच्छा असणाऱ्यांचीच आपण सिगरेट सोडवू शकतो.
सोडायची तर आहेच, पण आता नको, तुम्ही टिप्स मात्र देऊन ठेवा असे म्हणणाऱ्यांची सुटत नाही.

आता तुम्ही म्हणाल की ज्यांना खरेच इच्छा आहे सोडायची आणि ती ही लगेच ते स्वतःहुन सोडूनच देतील ना? त्यात आपण काय मदत करणार?
तर ते तसे नसते. कारण तेव्हाच व्यसनाचा खरा प्रॉब्लेम सुरू होतो. माणुस सोडायचा प्रयत्न करतो आणि मग सुटतही नाही, हतबल होऊन जातो. सोडण्याचे असे अनेक अयशस्वी प्रयत्न करून कित्येक लोक सिगरेट सोडण्याचा नादच सोडून देतात.
नगरवाले, उबो, मीरा यांच्या सारखे काही यशस्वी होतात.
च्रप्स यांचे व्यसन नाहीय सिगरेटचे. मीरा रोज एक ओढायच्या हे माईल्ड म्हटले तरी व्यसन होतेच.

सरप्राईजिंगली सिगरेट सोडायला फक्त पक्का निर्णय लागतो, प्रचंड इच्छाशक्तीची गरज लागत नाही. पण ते निकोटिन व्यसनाबद्दलचे सगळे ब्रेन वॉशिंग दूर केले तरच. अन्यथा इच्छाशक्ती पणाला लावावी लागते, तरीही कित्येकांची सुटत नाही.
इच्छाशक्ती वापरून सोडण्याच्या अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर मी आता आयुष्यभर धूम्रपान करत रहाणार हे जवळजवळ स्वीकारले होते. पण मग शेवटी सुटली, आणि त्यात फारशी इच्छाशक्तीही लागली नाही. हसत हसत सुटली.
त्यासाठी एक गोष्ट मात्र हवी. मी सिगरेट केवळ व्यसनापायीच ओढतो/ओढते, याची मनापासून जाणीव हवी, मला यासाठी सिगरेट लागते, त्यासाठी ओढतो/ते असे नसते जस्टीफिकेशन स्वतःच स्वतःच्या मनात बिंबवलेले नसावे. (मनातून माहीत आहे असे काही नाही, पण इतरांना केवळ सांगायला ते जस्टीफिकेशन वापरत असाल तर हरकत नाही.)

मी ही लिहेन माझा अनुभव इथे.
तसे थोडेफार सिंथेटिक जिनियस यांच्या धाग्यावर मी लिहिले होते याबद्दल.
पोस्ट फार मोठी होईल, यथावकाश वेळ मिळेल तेव्हा लिहीन.

मला पण पाटिवरच्या पेन्सिली खाण्याच व्यसन होत. आपोआप बंद झालं, आता एक कंटाळा येण्याच व्यसन लागलेय ते काही केल्या सुटत नाहीये. शारीरिक मेहनतच नको वाटतेय. काय करु.

छान अनुभव आहेत एकेकाचे.
त्रासदायक भूतकाळाचा त्रास होणार नसेल तर जरूर लिहा लिहिणार्यांनी.
मला अगदी लहानपणी पाण्यात भिजलेली माती खायला जाम आवडायची ,खूप ओरडणं प्रसंगी मार खाऊन ती सवय सुटली. पहिलीत वगैरे. नन्तर कॉलेज मध्ये ते चिकलेट च्युइंगम सारख चघळायची सवय लागलेली. जेव्हा हे अति होतय जाणवलं तेव्हा आपोआप सुटलं.
४,५ वर्षांपूर्वी आयुर्वेदिक गोळ्यांचं व्यसन लागलं होतं. आता ते काही प्रमाणात सुटलय पण पूर्ण नाही. त्यात भर म्हणून
आता प्राईम , यु ट्यूब च व्यसन लागल्यासारखं जाणवतंय. म्हणजे दिवसभर नाही मिळाला वेळ काही बघायला तर रात्री उशिर होतोय जाणवून ही डोळे तारवटून काहीबाही बघतेय.

Inspiring अनुभव आहेत इथे सगळे.

माझ्या वडिलांना ४० वर्ष सिगारेट च व्यसन होत. चेन स्मोकर नसले तरी बऱ्याच ओढायचे. शाळेत असताना धूम्रपान वाईट, त्याचे धोके वगैरे वाचून खूप भीती वाटायची, मी रडायचे. पण वडिलांनी सिगारेट सोडली नाही. मला काही होत नाही हेच एक उत्तर असायचं.
एक हार्ट अटॅक, हे लॉकडाऊन आणि जीवा वर बेतलेला कोरोना या enforced factors नंतर सिगारेट पूर्ण बंद झाली.
इथल्या इच्छाशक्तीच्या जोरावर यातून बाहेर पडलेल्या लोकांना सलाम. _/\_

<<मी पाटी पेन्सिली खायचे.अगदी एखादी डेलिकसी खाल्यासारखं निवांत बसून वाचता वाचता पाकीट शेजारी ठेवून खायचे.वेगवेगळ्या स्टेशनरी दुकानातून खरेदी करायचे.<< +१२३४५ . खुप सवय होती. चहानंतर, जेवणानंतर, काहीही गोड खाल्ल्यावर एक तुकडा तरी खायचे. अन गोड खाल्ल्यावर तोंडातला गोडवा जो खुप वेळ रहातो तो घालवण्यासाठी खाते हे कारण पुढे कराय्चे. नंतर नंतर हातापायाची स्कीन ड्राय होउ लागली... खाजवल्यावर कोंडा पडु लागला. मग हे काहीतरी भयंकर आहे असे वाटुन स्वतःहुनच बंद केल.
असेच बडिशेप, सुपारीचे व्यसन. एकदा कच्ची सुपारी खाल्ली ती जरा गुळ्चट लागली. डोकं जरा गरगरले पण चव आवडली. मग काय सुरुच झाले. भाजकी सुपारी आणुन फोडुन पुन्हा घरी तव्यावर भाजुन खाल्ली तर आणखी भन्नाट लागते हा शोध लागला. मग काय, दिवसातुन एक आख्खी सुपारी संपवायला लागले. परिणाम असा झाला की माझे तोंड वरचेवर यायला लागले. मग तोंडाचा कॅन्सर होईल की काय अशी भिती वाटुन ते बंद केले.

>>>>>>>आता एक कंटाळा येण्याच व्यसन लागलेय ते काही केल्या सुटत नाहीये. शारीरिक मेहनतच नको वाटतेय. काय करु.
तसं नसतं शिल्पा. एकदा डॉक्टरांना दाखवा. हे डिप्रेशन असू शकेल.

>>>>>>>सरप्राईजिंगली सिगरेट सोडायला फक्त पक्का निर्णय लागतो, प्रचंड इच्छाशक्तीची गरज लागत नाही.
मानव प्लीज हा मुद्दा विस्ताराने सांगाल का? निर्णय झाल्यानंतर इच्छाशक्ती ही लागणारच ना?

>>>>>>आता एक कंटाळा येण्याच व्यसन लागलेय ते काही केल्या सुटत नाहीये. शारीरिक मेहनतच नको वाटतेय. काय करु.
तसं नसतं शिल्पा. एकदा डॉक्टरांना दाखवा. हे डिप्रेशन असू शकेल. ++111

किंवा रक्तात काही कमतरता. .. थायराॅईड.... vit B or D, electrolyte ची कमतरता इ. इ.
डॉक्टरांना नक्की दाखवून घ्याच. व्यवस्थित बाहेर पडाल यातून.

Hypothyroidism आहेच पण आता तो कंट्रोल मध्ये आहे असं doctor म्हणालेत पण तरी झोप आणि कंटाळा संपत नाहीये. मला वाटतं मला सवय लागलीये आळसपणाची

Pages