व्यसन आणि मुक्ती : अनुभव

Submitted by DJ....... on 4 October, 2021 - 07:53

माणसाला जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टिंचं व्यसन हे असतंच. एखाद्याला वाचनाचं, लिहिण्याचं, गाण्याचं, खाण्याचं, खाऊ घालण्याचं, खरेदीचं, हॉटेलिंगचं, सहलीचं, वाहन वेगाने चालवण्याचं, जीमचं व्यसन लागतं.. तर एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागतं.

वाचण्याचं, लिहिण्याचं, गाण्याचं व्यसन लागलं तर शारिरीक तोटा होत नाही... त्यामुळे या कॅटेगरीतील व्यसनं लागलेली माणसं प्रतिभासंपन्न होत जातात असा माझा तरी समज.

खाण्याचं, खाऊ घालण्याचं, हॉटेलिंगचं व्यसन लागलं तर जीभ आणि मन अत्यंत आनंदी होतं परंतू खिसा रिकामा होऊ लागतो अन योग्य व्यायाम न केल्यास वजन किलो-किलोने वाढण्याची तसेच आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते असं मला वाटतं.

सहलीचं व्यसन लागलं तर मन आनंदित, प्रफुल्लीत होतं परंतू खिशाला चाट बसू लागते हे माझे मत.

वेगाने वाहन चालवण्याचं व्यसन लागलं तर अपघात होण्याची, कोर्टकचेर्‍या अन दवाखाने मागे लागण्याची शक्यता अधिक बळावते असा माझा तर्क.

तरिही वर उल्लेख केलेली काही व्यसने प्रत्येकात थोड्याफार फरकाने असतातच.. त्याने घरातल्यांच्या कपाळावर निदान आठ्या तरी पडत नाहीत.

परंतु एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर मात्र तो घरच्यांच्या तसे समाजाच्या नजरेत उतरू लागतो. समाज त्यांना चांगलं समजत नाही असे आजुबाजुचे काही अनुभव बघितल्यावर लक्षात आलं (कदाचित मध्यम वर्गीय मानसिकतेच्या वस्तीत राहिल्यामुळे हे अनुभव आलेले असू शकतात****)

एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर शरिराची हानी तर होतेच वर भरपूर पैसाही त्यात वाया जातो.

-----------------------------------------------
मला स्वतःला एका टॉफीचं भयंकर व्यसन लागलेलं अजुनही स्मरतंय. ४ वर्षांपुर्वीची गोष्ट. मला ऑफिसने क्लएंट लोकेशनवरील एका प्रोजेक्टसाठी क्लाएंट ऑफिसमधे पाठवलं. तिथं आमच्या कंपनीतील इतरही कलिग् माझ्या आधीपासून कामं करायचे. त्यातल्या काहींना सिगारेटचं भयंकर व्यसन. दिवस्भरात ते कमीतकमी ८-१० सिगारेट्स ओढायचे अन त्यांच्या सोबतीला आम्हाला नुसते बोलायला/चहा प्यायला घेउन जायचे. ऑफिस मधे जवळ जवळ ६-७ हजार एम्प्लोयी असतील. ६ व्या मजल्यावर प्रशस्त कॅटीन अन तिथेच एका बाजुला भव्य गॅलरी मधे सिगारेटचं आउटलेट. शेजारीच चहाचं आउटलेट. मी त्यांच्यासोबत जाऊन कधीतरी चहा घ्यायचो परंतु एकदा एकाने मला पल्स नावाची कँडी दिली. त्या आधी मी कधीही ती कँडी खाल्ली नव्हती. पहिल्यांदा चव घेतली तर मला ती आजिबात आवडली नाही.. पण दुसर्‍याने दिलेली कँडी अशी फेकुन तरी कशी द्यायची ना? त्याला वाईट वाटेल म्हणुन मी ती तशीच अनिच्छेने चघळत राहिलो एका क्षणी त्या गोडसर कँडीतून चटकदार तिखट्+खारट्+आंबट्+तुरट अशा चविंचं भन्नाट मिश्रण जिभेवर पसरलं अन मी अंतर्बाह्य शहारून गेलो. मला खुप भारी काहीतरी वाटलं. त्या आधी मी कधीही अशा चवीची भन्नाट कँडी कधीही खाल्ली नव्हती. झालं.. मी पुन्हा एकदा नाव विचारून घेतलं. घरी जाताना काही कारण नसताना सिगारेट ऑटलेटवर गेलो अन ५ रुपयांच्या ५ पल्स कँडी खरेदी केल्या. बस मधे बसल्यावर घर येईपर्यंत २ संपवल्या. उरलेल्या बायको अन मुलांना दिल्या.
तो पहिला दिवस.
त्यानंटर मी रोज सिगारेट आउटलेटवर जाऊन तीच कँडी घेऊ लागलो. रोज १० रुपयांच्या दहा कँडीज घेऊन जेवणाच्या आधी २.. जेवल्या नंतर २.. बस मधून घरी जाईपर्यंत २ अन घरी गेल्यावर रात्रीच्या जेवणानंतर सर्वांसोबत १ असं करु लागलो. त्या कँडीला गिर्हाईकही फार. कधी कधी ती त्या सिगारेट ऑटलेटवर मिळायचीच नाही. मग ऑफिसमधून मेनगेट मधून तंगडतोड करत रोड साईड टपर्‍या धुंडाळात फिरायचो. २-३ महिन्यापर्यंत हे व्यसनच लागलं. शनिवार-रविवार ऑफिसला सुट्टी म्हणुन शुक्रवारी २०-२५ रुपयांच्या कँडीज घेऊ लागलो. हे असं वाढत जाणारं व्यसन बघून घरातल्यांच्या भुवया वर जाऊ लागल्या अन माझी चूक मला उमजू लागली.

त्यानंतर मला कँडी खाण्याची सवय सोडण्यासाठी खूप मनोनिग्रह करावा लागला. इतका की मी कँटीन मधे जेवायला जाणंच बंद केलं. पँट्रीत एक-दोन मित्रांसोबत जेवण करू लागलो. प्रसंगी एकटाच जेवत राहिलो परंतु दीड-दोन महिने कँटीन कडे फिरकलोच नाही. त्यामुळे कॅंडीज घेताच आल्या नाहीत. नेमकं मूळ कंपनीने मूळ ऑफिसला दुसर्‍या एका प्रोजेक्टसाठी परत बोलावल्याने थोडा ब्रेक मिळाला. या परिस्थितीचा फायदा घेत मी त्या तसल्या चंट कँडीच्या व्यसनातून मुक्त झालो. आता आठवलं तरी हसु येतं. Bw
------------------------

तुम्हाला कधी कोणते व्यसन लागले आहे का..? त्यावर कशी मात केली..??

Group content visibility: 
Use group defaults

एकदा रुमाल सिगरेट फिल्टरवर ठेवून त्यातून कश घेतला की रुमालावर निकोटिनचे पिवळे डाग पडतात. रुमाल कितीही धुतला तरी ते डाग जात नाहीत. मी तो रुमाल मुद्दाम वापरायचो, तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या फुफुसावरचे ते निकोटिनचे डाग दिसायचे.>>>>
टाळ्या. खरंच कमाल आहे आणि कौतुक पण! ग्रेट.

माती आणि पाटिची पेन्सिल खाण्याच्या पोस्ट्स वाचून खूप हसू आले..सॉरी. एखाद्याची मजबुरी आणि मला हसू येतय, असं वाटलं.
बडिशेप खण्याचं पण व्यसन असू शकतं???? Uhoh
मग ते मला शाळेत होतं, ओली बडिशेप खाण्याचं Sad
आवळा सुपारीचं पण. म्हणजे रविवार नॉरमल जायचा, पण शाळेत येताच काहि केल्या आधी आ.सु. तोंडात गेलीच पाहिजे असं झालं ते. पण यथावकाश ती सुटली सवय, काहिच नं करता. कॉलेज मधे इंडो-चायनिज गाडिवरच्या नुडल्स ची सवय लागली होती पण पैसे प्रमाणात च मिळत घरून, त्यामुळे ती सवय कन्ट्रोल मधे होती.
माझ्या मावसभावा ला ह्या चायनिज फूड सवयी मुळे आतड्यांचा आजार झाला होता Sad फार वाईट आणि गंभीर परीस्थिती होती, सुदैवाने तो बरा झाला.

माझ्या मावसभावा ला ह्या चायनिज फूड सवयी मुळे आतड्यांचा आजार झाला होता Sad फार वाईट आणि गंभीर परीस्थिती होती, सुदैवाने तो बरा झाला. >> बापरे..! आतड्यांचा आजार...!!. भयंकर आहे हे. भाऊ आता बरा झाला हे वाचून हायसं वाटलं.

नगरवालेंच्या डांगित असंख्य तलवारी घुसवलेल्या दिसतायत त्यांनी... तरीच इतका टरकून असतो. Biggrin

Submitted by DJ....... on 14 October, 2021 - 06:32 >>>>>>>>>

Dj , अमिरखान तुझा दाजी लागतो हे आम्हाला माहीत नव्हते Happy

मी दारू कमी आणि नंतर बंद करण्यासाठी तयारी करत आहे. या विकेंडला पहिली परीक्षा. घरी आणायची नाही.
वर्ल्ड कप चालू झाल्यावर दररोज परीक्षा. घरी आणायची नाही.
इथे मुद्दाम जाहीर करतोय. त्याने माझी कमिटमेंट राहिल असे वाटतेय.

<< मी दारू कमी आणि नंतर बंद करण्यासाठी तयारी करत आहे. या विकेंडला पहिली परीक्षा. घरी आणायची नाही.
वर्ल्ड कप चालू झाल्यावर दररोज परीक्षा. घरी आणायची नाही.
इथे मुद्दाम जाहीर करतोय. त्याने माझी कमिटमेंट राहिल असे वाटतेय. >>

------- घरी आणायची नाही, आणि बाहेर पण घ्यायची नाही... Happy

छान निर्णय, आणि त्यात यश मिळण्यासाठी शुभेच्छा...

इथे मुद्दाम जाहीर करतोय. त्याने माझी कमिटमेंट राहिल असे वाटतेय.>> चांगल्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा..!! यासाठी आमचा सर्वांचाच पाठिंबा आहे..!! तुम्ही जरूर कमिटेड रहाल Bw .

इथे मुद्दाम जाहीर करतोय. त्याने माझी कमिटमेंट राहिल असे वाटतेय.
>>>>
अपडेटही द्या. एकेक टप्पा यशस्वीपणे पार पडल्यावर. याचा कमिटमेंट राखायला तुम्हाला फायदा होईलच. तसेच ते बघून आणखीही एखाद्याला सोडायची ईच्छा होईल. शुभेच्छा.

शुभेच्छा विक्रमसिंह

एकदा मनाने ठरवलं आहे यशस्वी व्हाल
अनेकदा कोणाच्या तरी सांगण्यावरून आपण ठरवतो आणि तो फोल होतो
मनाने एकदा घेतलं की होईल बघा

संध्याकाळी तल्लफ आली की थोडी कळ काढून - अर्धा तास वगैरे - लगेच जेवून घ्यावे.

तसेच बंद केल्या मुळे संध्याकाळी वेळ मिळतो त्याचं काय करावं माहीत नसेल तर मानसिक तल्लफ अजून वाढते. तेव्हा झोपेच्या वेळे पर्यन्त वेळ कसा घालवायचा याचे नीट प्रयोजन करून ठेवावे.

साधारण पाच सहा दिवसांनी शारीरिक तल्लफ येणे बंद किंवा खूप माईल्ड होते पण मानसिक तल्लफ सांगता येत नाही.
झाले की पाच दिवस आज घेतो म्हटले की मग दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा शारीरिक तल्लफ सुरू.

रोजचे व्यसन मोडून लगेच फक्त विकांताला एक दिवस थोडीशी घेणे बऱ्याच जणांना शक्य होत नाही. वर्षभर ब्रेक दिल्यास उत्तम.

तुम्हाला जे अचिव्ह करायचे आहे त्याला शुभेच्छा.

Pages