व्यसन आणि मुक्ती : अनुभव

Submitted by DJ....... on 4 October, 2021 - 07:53

माणसाला जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टिंचं व्यसन हे असतंच. एखाद्याला वाचनाचं, लिहिण्याचं, गाण्याचं, खाण्याचं, खाऊ घालण्याचं, खरेदीचं, हॉटेलिंगचं, सहलीचं, वाहन वेगाने चालवण्याचं, जीमचं व्यसन लागतं.. तर एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागतं.

वाचण्याचं, लिहिण्याचं, गाण्याचं व्यसन लागलं तर शारिरीक तोटा होत नाही... त्यामुळे या कॅटेगरीतील व्यसनं लागलेली माणसं प्रतिभासंपन्न होत जातात असा माझा तरी समज.

खाण्याचं, खाऊ घालण्याचं, हॉटेलिंगचं व्यसन लागलं तर जीभ आणि मन अत्यंत आनंदी होतं परंतू खिसा रिकामा होऊ लागतो अन योग्य व्यायाम न केल्यास वजन किलो-किलोने वाढण्याची तसेच आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते असं मला वाटतं.

सहलीचं व्यसन लागलं तर मन आनंदित, प्रफुल्लीत होतं परंतू खिशाला चाट बसू लागते हे माझे मत.

वेगाने वाहन चालवण्याचं व्यसन लागलं तर अपघात होण्याची, कोर्टकचेर्‍या अन दवाखाने मागे लागण्याची शक्यता अधिक बळावते असा माझा तर्क.

तरिही वर उल्लेख केलेली काही व्यसने प्रत्येकात थोड्याफार फरकाने असतातच.. त्याने घरातल्यांच्या कपाळावर निदान आठ्या तरी पडत नाहीत.

परंतु एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर मात्र तो घरच्यांच्या तसे समाजाच्या नजरेत उतरू लागतो. समाज त्यांना चांगलं समजत नाही असे आजुबाजुचे काही अनुभव बघितल्यावर लक्षात आलं (कदाचित मध्यम वर्गीय मानसिकतेच्या वस्तीत राहिल्यामुळे हे अनुभव आलेले असू शकतात****)

एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर शरिराची हानी तर होतेच वर भरपूर पैसाही त्यात वाया जातो.

-----------------------------------------------
मला स्वतःला एका टॉफीचं भयंकर व्यसन लागलेलं अजुनही स्मरतंय. ४ वर्षांपुर्वीची गोष्ट. मला ऑफिसने क्लएंट लोकेशनवरील एका प्रोजेक्टसाठी क्लाएंट ऑफिसमधे पाठवलं. तिथं आमच्या कंपनीतील इतरही कलिग् माझ्या आधीपासून कामं करायचे. त्यातल्या काहींना सिगारेटचं भयंकर व्यसन. दिवस्भरात ते कमीतकमी ८-१० सिगारेट्स ओढायचे अन त्यांच्या सोबतीला आम्हाला नुसते बोलायला/चहा प्यायला घेउन जायचे. ऑफिस मधे जवळ जवळ ६-७ हजार एम्प्लोयी असतील. ६ व्या मजल्यावर प्रशस्त कॅटीन अन तिथेच एका बाजुला भव्य गॅलरी मधे सिगारेटचं आउटलेट. शेजारीच चहाचं आउटलेट. मी त्यांच्यासोबत जाऊन कधीतरी चहा घ्यायचो परंतु एकदा एकाने मला पल्स नावाची कँडी दिली. त्या आधी मी कधीही ती कँडी खाल्ली नव्हती. पहिल्यांदा चव घेतली तर मला ती आजिबात आवडली नाही.. पण दुसर्‍याने दिलेली कँडी अशी फेकुन तरी कशी द्यायची ना? त्याला वाईट वाटेल म्हणुन मी ती तशीच अनिच्छेने चघळत राहिलो एका क्षणी त्या गोडसर कँडीतून चटकदार तिखट्+खारट्+आंबट्+तुरट अशा चविंचं भन्नाट मिश्रण जिभेवर पसरलं अन मी अंतर्बाह्य शहारून गेलो. मला खुप भारी काहीतरी वाटलं. त्या आधी मी कधीही अशा चवीची भन्नाट कँडी कधीही खाल्ली नव्हती. झालं.. मी पुन्हा एकदा नाव विचारून घेतलं. घरी जाताना काही कारण नसताना सिगारेट ऑटलेटवर गेलो अन ५ रुपयांच्या ५ पल्स कँडी खरेदी केल्या. बस मधे बसल्यावर घर येईपर्यंत २ संपवल्या. उरलेल्या बायको अन मुलांना दिल्या.
तो पहिला दिवस.
त्यानंटर मी रोज सिगारेट आउटलेटवर जाऊन तीच कँडी घेऊ लागलो. रोज १० रुपयांच्या दहा कँडीज घेऊन जेवणाच्या आधी २.. जेवल्या नंतर २.. बस मधून घरी जाईपर्यंत २ अन घरी गेल्यावर रात्रीच्या जेवणानंतर सर्वांसोबत १ असं करु लागलो. त्या कँडीला गिर्हाईकही फार. कधी कधी ती त्या सिगारेट ऑटलेटवर मिळायचीच नाही. मग ऑफिसमधून मेनगेट मधून तंगडतोड करत रोड साईड टपर्‍या धुंडाळात फिरायचो. २-३ महिन्यापर्यंत हे व्यसनच लागलं. शनिवार-रविवार ऑफिसला सुट्टी म्हणुन शुक्रवारी २०-२५ रुपयांच्या कँडीज घेऊ लागलो. हे असं वाढत जाणारं व्यसन बघून घरातल्यांच्या भुवया वर जाऊ लागल्या अन माझी चूक मला उमजू लागली.

त्यानंतर मला कँडी खाण्याची सवय सोडण्यासाठी खूप मनोनिग्रह करावा लागला. इतका की मी कँटीन मधे जेवायला जाणंच बंद केलं. पँट्रीत एक-दोन मित्रांसोबत जेवण करू लागलो. प्रसंगी एकटाच जेवत राहिलो परंतु दीड-दोन महिने कँटीन कडे फिरकलोच नाही. त्यामुळे कॅंडीज घेताच आल्या नाहीत. नेमकं मूळ कंपनीने मूळ ऑफिसला दुसर्‍या एका प्रोजेक्टसाठी परत बोलावल्याने थोडा ब्रेक मिळाला. या परिस्थितीचा फायदा घेत मी त्या तसल्या चंट कँडीच्या व्यसनातून मुक्त झालो. आता आठवलं तरी हसु येतं. Bw
------------------------

तुम्हाला कधी कोणते व्यसन लागले आहे का..? त्यावर कशी मात केली..??

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतं मला सवय लागलीये आळसपणाची>> सकाळी ५.५३ वाजता उठून आकाशवाणीचे कोणतेही एफ. एम. केंद्र लावा अन् कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीची धून ऐका.. नंतर ५.५५ वाजता वंदे मातरम् ऐका.. नंतर ६ वाजेपर्यंत ३-४ मिनिटं मस्तपैकी सनई वादन ऐका. ते संपल्यावर मात्र तुम्ही फ्रेश होऊन बाहेर जोगिंगला जा. अर्धातास चाला..फिरा.. पळा.. अन् परत घरी या. बघा दिवस कसा फ्रेश जातो ते. Bw

मी लिहिलंही असेन इथे तिथे, मला सुपारी खाण्याचे व्यसन लागलेलं, बरेचदा गावाहून घरच्या सुपाऱ्या आलेल्या असायच्या, नाहीतर कच्ची तुकडा सुपारी विकतही घ्यायचे, सुटलं एकदाचं 2004 साली. त्याआधी 3 ते 5 वर्ष असेल.

माझ्या बाबांना तंबाखूचं होतं, मी लहानपणापासून सांगायची नका खाऊ, मी सातवीत असताना बाबांना एकदा तंबाखू खाऊन चक्कर आल्यासारखं वाटलं, बास त्यानंतर कधीही नावही नाही घेतलं. बाबांना व्यसनाबद्दल बोलणारी मी, मला सुपारीचं व्यसन कसं लावून घेतलं याचं मागे वळून बघताना आश्चर्य वाटतं.

मला बिस्किटाचं व्यसन लागलं होतं. एकदा मी श्रावणात बिस्कीट सोडलं होतं (तसा मी एरवी श्रावण वगैरे काही पाळत नाही, पण निमित्त आहेच तर काहीतरी करून बघू म्हणून हे केलं) आणि त्यानंतर ते खाणं जरा कमी झालं होतं.

Hypothyroidism आहेच पण आता तो कंट्रोल मध्ये आहे असं doctor म्हणालेत पण तरी झोप आणि कंटाळा संपत नाहीये. मला वाटतं मला सवय लागलीये आळसपणाची

शिल्पा नाईक >>> कंट्रोलमध्ये असला तरी लेथार्जिक वाटत राहतं दिवसभर. सकाळी उठल्यावर व्यायाम करा किमान ३० मिनिटं. थोडा घाम येइल मग दिवसभर फ्रेश वाटेल. ज्या दिवशी इतर काही जमणार नाही तेव्हा १० सूर्यनमस्कार घाला.

हरचंद्र पालव, मलाही १० वर्षांपुर्वी बिस्किटांचे व्यसन लागले होते.. मला सर्वात प्रथम पार्लेच्या क्रीम बिस्किटांचं व्यसन लागलं. इतकं की मी रोज ऑफिस मधे असताना ५-५ रुपयांचे ३ वेगवेगळ्या फ्लेवरचे पॅक संपवायचो.. त्यानंतर महिनाभराने गुड्डे बिस्किटांनी मोहिनी घातली अन पार्ले क्रीमचं व्यसन सुटलं.... ते गुड्डेचं व्यसन पण असंच दीड-दोन महिने सुरु होतं. कसंबसं सावरलं स्वतःला.

इथ सांगितल तर फनी वाटेल पण मध्यंतरी सहा महिने चक्क मोबाईल गेम ...सबवे सर्फ, बौन्सिंग बॉल्स खेळण्याचे व्यसन लागले होते. एक्च्युअली, मुलगा सतत खेळायचा, त्याचे हे खेळणे कसे कमी करता येइल, काय असते एवढे या खेळात एवढ? अश्या उत्सुकतेने पहाय्ला गेले तर गोडी लागुन सतत खेळायला लागले. भारी वाटायच, एकेक लेव्हल पार केली की, अन नाही झाली कि मनाची उद्विग्नता... केव्हा एकदा पार करु त्यासाठी आटापिटा. अगदी इरिटेट होईपर्यंत खेळाय्चे. मग मधेच गेम डिलिट करुन २-३ दिवस स्वस्थ बसले की परत ये रे माझ्या मागल्या. स्टाफ बसमधे, ऑफिसमधे रिकामा वेळ असला की, घरी गेल्यावरही सतत हातात मोबाईल.

मग मनाचा निश्चय करुन दुसर्‍या गेमकडे वळले. पण त्यात रमले नाही. तेव्हा एकदाचे सुटले ते व्यसन.

फार पुर्वी ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट पिसी मॉनिटरवर 'प्रिन्स ऑफ पर्शिया' गेम खेळाय्चो ते आठवल, या निमित्ताने! Happy

फार पुर्वी ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट पिसी मॉनिटरवर 'प्रिन्स ऑफ पर्शिया' गेम खेळाय्चो ते आठवल, या निमित्ताने! Happy
>>>>>
माझी कॉम्प्युटर शिकायची सुरुवात याच गेमने झालेली Happy

मला मोबाईल गेम्सचे व्यसन म्हणाल तर एकदाच. कँडी क्रश चिक्कार खेळायचो. स्वप्नातही तेच खेळायचो. मग मला समजले की त्या गेमच्या आहारी गेलेले खूप जण आहेत. मग घाबरून छे छे आपण कसे कश्याच्या आहारी जाऊ शकतो म्हणून लागलीच सोडून दिला खेळायचा. आता तर हसायला येते किती बालिश गेमचे व्यसन लागलेले हे आठवून.

DJ आणि ज्यांनी ज्यांनी व्यसनावर मात केलीय त्यांचे सर्वांचे अभिनंदन

मलाही सिगरेटच व्यसन होत. अनेक वर्षे. रोज दोन पाकिटांपर्यंत पोहोचलो होतो. तेंव्हा ऑफिसमधे आता इतकी सिगरेट विरोधी जागृती/जाणीव नव्हती. त्यामुळे अगदी बंद मिटींग रूममधे सर्रास लोक सिगरेट प्यायचे. म्हणजे बिचार्‍या न पिणार्‍याला पण एक दोन सिगरेट प्यायल्या इतकी किक बसत असेल.
एकदा १ वर्ष सिगरेट सोडलीही होती. पण पुनः एकदा परदेशात गेलो असताना सुरु झाली. पण सिगरेट सोडलीच पाहिजे हे कुठ तरी डोक्यात होत. बरोबर तंबाखूच्या पानाचही व्यसन लागल होत. पण ते परदेशी रहायला गेल्यावर सुटल. सिगरेटच मात्र वाढल, पटतय पण वळत नव्हत अशी परिस्थिती. मुलगा दर वाढदिवशी सिगरेट सोडिन अस वचन माझ्या कडून घ्यायचा. दरवर्षी मे ते न चुकता मोडायचो. पण सोडायची होतीच. एकदा एक मित्र म्हणाला, तू मानसिक दृष्ट्या कुमकुवत आहेस म्हणून तुझी सिगरेट सुटत नाही. मला प्रचंड राग आला.
मग नीट अभ्यास केला. काय काय कराव लागेल याचा. पाणी प्यायची ट्रिक माहित नव्हती. पण तोंडात काहितरी पाहिजे तल्लफ आल्यावर हे वाचल होत. लवंग वेलदोडा वगैरे. पण शेवटचा हातोडा बसला एका हॉस्पिटल मधे.
ऑफिसच्या अ‍ॅन्युअल चेक अप मधे स्ट्रेस टेस्ट पॉझिटीव आली. मी दोन दिवसांनी परदेशी जाणार होतो. डॉक्टर बाईंनी बायकोला घाबरवून सोडल. ट्रीप रद्द करावी लागली. अँजिओग्राफी करायच ठरल. मला दम वगैरे लागायचा नाही. नियमीत खूप व्यायाम करायचो. मी डॉकटरांना सांगत होतो मला काही झाल नाही. शेवटी तसच निघाल. कुठेही ब्लॉक नव्हता. फॉल्स पॉझिटीव. डॉक्टटरना सांगितल मला माहित होत. तर ते म्हणाले , अस होत कधी कधी, तुम्ही स्मोकर व तब्येत जास्तच सुदृढपणाकडे झुकणारी, म्हणून आम्हालाही आश्चर्य वाटल तुम्हाला काहिच कस नाही ते. आता एक करा, तुम्ही सिगरेट बंद करा आणि बाकी जे काय करताय ते चालू ठेवा.
पण या सगळ्यापेक्षा मी हादरलो होतो जेंव्हा स्ट्रेचरवरून ऑपरेशन थेटर मधे जाताना. वरचा पांढरा सिमेंटचा आढा सरसर सरत होता. वाटल हे काय आहे. आपल जगण पण असच संपतय. हे नकोय आपल्याला. मग घरी आल्यावर पुनः निग्रह केला. आधी सिगरेट सोडण्यासाठी पूर्वी काय काय केल हे आठवल.
मुख्य म्हणजे तो घसरायचा क्षण न घसरता पार पाडायचा. तल्लफ आल्यावर काय करायच हे आधीच ठरवायच आणि तसच कारायच.
सुरुवातीचा पहिला दिवस, मग नंतरचे दोन, मग आठवडा अस टप्प्या टप्प्याने जिंकायचे. एकदा एक महिना झाला की तुम्ही जिंकलात. मग तसेच अजून दोन महिने रिपीट करायचे. मग तुम्हाला आठवण पण येणार नाही. सिगरेट ओढू अशा शक्यता असलेल्या जागा आणि कंपनी पहिले सहा महिने तरी टाळायची. मी काही महिने मित्रांबरोबरच्या पार्ट्या पण टाळल्या. तो पर्यंत ऑफिस नो स्मोकिंग झाल होत त्याचाही फायदा झाला.
सुरूवातीला एक दोन वर्षे स्पप्नात यायच सिगरेट ओढतोय. तेंव्हा आनंद व्हायचा पण नंतर गिल्टी वाटायच. मग दचकून जाग यायची. आणि स्वप्नच होत या जाणीवेने अजूनच आनंद व्हायचा.
आता सिगरेट सोडून दहा वर्षे झाली आहेत.

पण आता दुसरी लढाई. दारूही सोडायचीय. हो मला व्यसन लागलय हे कबूल करतोय ही पहिली पायरी. पण मला दारू प्यायला आवडते हा तोटा. आता मनाला पटवल पाहिजे फायद्यापेक्षा तोटे जास्त. अस वाटत एखादा पेग घेतल्याने काय होत.( अस वाचलही असत की एखादा पेग किंवा, वाइन चा एक ग्लास प्रकृती साठी उत्तम). सिगरेटच्या अनुभवाने कमी करण हा उपाय नाही हे माहितीय. It is either zero or one. पेग कधी एकच प्याला रहात नाही. फक्त रविवार असे होत नाही. बायकोला माहितीय मला दारू आवडते त्यामुळे तीही बिचारी बोलत नाही. (काय विचार करते कोणास ठाउक, फक्त वाढत चाललय बर का, येवढाच लटका वाटावा असा किरकोळ राग व्यक्त करते). पण वाटत आता बास, पण ते येवढही स्ट्राँग नाही. व्हाय चे स्ट्राँग उत्तर पाहिजे. ठरवायलाच पाहिजे. बघू काय होत ते.

अभिनंदन विक्रमसिंह!

हो मला व्यसन लागलय हे कबूल करतोय ही पहिली पायरी. पण मला दारू प्यायला आवडते हा तोटा
>>
आणि याबद्दलही अभिनंदन. ही पहिली पायरी असली तरी ही सगळ्यात उंच पायरी आहे. यातही यशस्वी व्हाल.

हे एक माहिती करता:
https://www.npr.org/2018/08/24/641618937/no-amount-of-alcohol-is-good-fo...

विक्रमसिंह, चांगला अनुभव.
पिण्या बद्दल मिश्र मतं आहेत ना?आर्मी वाल्याना झेपतं म्हणतात(म्हणजे ते इतकी कठीण ट्रेनिंग्स करून पिक्चर मध्ये आणि प्रत्यक्षात आनंदाने वरी फ्री पिताना दाखवतात म्हणजे ते अल्कोहोल न्यूट्रल करायला काही चांगलं करत असतील.कमी प्रमाणात पिणे, जेवण झाल्यावर पिणे,प्यायल्यावर लगेच झोपणे, 2-3 तासांनी कोरी कॉफी पिणे असे काही.)मला इथे वाद चालू करायचा नाहीये आणि विषयही भरकटवायचा नाहीये पण हे नेहमीचं कुतूहल आहे.

विक्रमसिंह, तुमचा प्रवास वाचून माझ्या प्रवासाची आठवण झाली. सिगरेट पितोय अशी स्वप्ने मलाही पडली आहेत. फरक इतकाच असेल की मी त्यामानाने लवकर सोडली - तिशीच्या आत. पण असेच कोल्ड टर्की पद्धतीने एके दिवशी. त्याआधी तयारी पूर्ण केली. २००८मध्ये फिलिप मॉरिसच्याच वेबसाइटवर सिगरेट कशी सोडावी याबद्दल काही लिटरेचर होते. सिगरेट सोडल्यावर पहिल्या काही महिन्यात सिगरेट ज्यांच्याबरोबर ओढायचा ते मित्र, जिथे ओढायचा त्या जागा हे टाळणे सर्वात महत्वाचे. सिगरेट सोडण्यासाठी एक माइलस्टोन किंवा महत्वाचा दिवस निवडा. उदा. मी नेदरलँड या देशातील माझे वास्तव्य आटोपून भारतात परतत होतो तो दिवस निवडला. सिगरेट संबंधित वस्तू फेकून द्या त्या दिवशी. मी फ्रँकफर्ट एअरपोर्टवर ५० युरोचा झिप्पो लायटर एका पाठोपाठ एक अश्या कदाचित ५-१० सिगरेटी ओढून कचर्‍यात टाकून दिला. त्याबरोबर अर्धे भरलेले
सिगरेटचे पाकिटपण कचर्‍यात टाकले. ते माझ्यासाठी फार सिम्बॉलिक होते. कारण त्या पुर्वी कधीच मी एक सुद्धा सिगरेट वाया घालवलेली नव्हती, अगदी पावसात कधी भिजली तर वाळवून ती पीत असे. भारतात परतल्यावर कंपनीच्या आवारतच असलेल्या गेस्टहाउसमधे राहिलो आणि २ आठवडे कंपनीच्या आवाराच्या बाहेरच पडलो नाही. कंपनीच्या आवारात आत सिगरेट मिळत नव्हती. सर्वात महत्वाचे म्हणजे दारू पार्ट्यांपासून ४-५ महिने दूर राहिलो कारण दारू प्यायल्यावर स्वतःवरचा ताबा कमी होतो आणि सिगरेट पिण्यास पुन्हा सुरुवात होऊ शकते. आता जितके वर्ष सिगरेट प्यायलो त्यापेक्षा जास्त वर्षे सोडून झाली या गणिताने मनाला बरे वाटते.
या विषयावर बोलत होतो तेव्हा एका पन्नाशीतल्या गृहस्थांनी सांगितले होते की ते २० वर्षांनंतर पुन्हा लॅप्स झाले. तेव्हा ठरवले की कधीही लॅप्स होऊ शकतो त्यामुळे आपण यावर विजय मिळवला अशी भावना कधीच ठेवायची नाही.

तुमच्या दुसर्‍या लढाई बद्दल - सिगरेट अगदी कधीही ओढली जाते त्यामुळे तिचे व्यसन लागले आहे हे ठामपणे जाणवते. दिवस रात्र दारू पिऊन झिंगून पडत नसू तर दारूचे व्यसन लागले आहे हे मनाला पटत नाही. पण संध्याकाळी पिणारा, कधीतरी पिणारा, फक्त वाइन पिणारा, बीअर पिणारा वगैरे काही नसते. व्यसन असते. त्याचे परिणाम दुष्परिणाम व्यक्तिपरत्वे बदलतात. तुम्ही मान्य केले आहे ही पहिली पायरी. उरल्या नऊ पायर्‍या - सुज्ञास अधिक सांगणे गरजेचे नाही. जवळ गट शोधा आणि सहभागी व्हा.

विक्रमसिंह आणि टवणे सर, तुम्हा दोघांचेही अभिनंदन की तुम्ही निग्रहाने व्यसनापासून दूर झालात.
विक्रमसिंह यांनी सांगितलेल्या दुसर्‍या व्यसनातुन देखील लवकरच दूर जातील हा आशावाद वाटतो. टवणे सरांनी २० वर्षांनंतरही व्यसन पुन्हा लागू शकते हे गर्भित इशारावजा केलेली टिप्पणी ठराविक परिस्थितीतच उद्भवत असतील असं वाटतं.

सिगरेट सोडल्यावर पहिल्या काही महिन्यात सिगरेट ज्यांच्याबरोबर ओढायचा ते मित्र, जिथे ओढायचा त्या जागा हे टाळणे सर्वात महत्वाचे.>>>>> मला याचाच उपयोग झाला. रोज रात्री झोपण्यापूर्वी मी आणि नवरा मित्रमंडळीबरोबर एका कॅफेमध्ये जमायचो. कोणताही सिझन, कोणताही दिवस, सणवार, दुःख आनन्द, बॅचलर, मग लग्न, पुढे मुलं या कशामुळेही या नियमात खंड पडला नाही. ग्रुप जमायचाच. मी दिवसातली एकमेव सिगरेट आणि नवरा दिवसातील एकमेव कॉफी शॉट घेऊनच दिवस संपवायचो. लग्न झाल्यानंतर ग्रुपमध्ये नवीन आलेले नवरे किंवा बायका आनंदाने / नाईलाजाने सामील झाले/झाल्या पण 'कॉफी जार' मधले एक्सप्रेसो शॉट्स आणि सिगरेट्स कोणी कधीही चुकवले नाही. ग्रुपचा आयुष्यभरासाठी केलेला नेम मोडला तो एका रात्रीत.
करोनामुळे कॅफे बंद ठेवण्यात आला आणि घरी स्मोक करायचं नाही या शिस्तीमुळे सवय सुटली. एक वर्ष कॅफेमध्ये बसणं बंद झालं (नेहमीची जागा) आणि सुदैवाने मित्रमंडळी (नेहमीची स्मोकिंग कम्पनी) खरेखुरे मित्र असल्यामुळे कोणी कधी आग्रह करत नाही, रादर कधी तरी आलेला मोहाचा क्षण जोरदार विरोध करून टाळायला मदतच केली आहे.

व्यसन सोडल्यावरही परत लागू शकते
मला रात्री जेवण झाल्यावर पान खायचे व्यसन आहे
साधे नाही किमाम घातलेले
मग लॉक डाऊन मध्ये दुकाने बंद झाली तशी पान खायची सवय पण सुटली
जवळपास सहा महिने पान खाल्ले नाही बहुदा
तो काहीतरी 21 दिवसांचा नियम आहे ना, मला वाटलं आपण जिकलो
पण दुकाने रीतसर सुरू झाली तसे परत येरे माझ्या मागल्या

आता त्यावर उपाय म्हणून तल्लफ घालवायला अर्धेच पान किंवा त्याचा एक तुकडा कुरतडून चावत बसतो
हा काही फुलप्रूफ उपाय नाही पण सध्या तरी तोच आहे
गंमत म्हणजे बाहेरगावी गेल्यावर तल्लफ नाही येत, दुपारच्या जेवनानंतर नाही, घरच्या कोझी वातावरणात रात्री मस्त जेवण झालं की पुस्तक घेऊन वाचताना पान पाहिजे राव असे एक समीकरण बनले आहे

सिगरेट पितोय अशी स्वप्ने मलाही पडली आहेत. >>>>>>>
मी काल रात्रीच स्वप्नात गुंडांग गरम ओढली Happy
सिगरेट सोडून बरीच वर्षे झाली , तरीही स्वप्नात सिगरेट ओढायला मजा आली ..

@ विक्रमसिंह,
सिगारेट यशस्वीपणे सोडल्याबद्दल अभिनंदन. तुम्ही नक्कीच मानसिकदृष्ट्या स्ट्राँग आहात.
मिटींगरूममध्ये सिगारेट ओढायचे हे रोचक वाटले. जो ओढत नाही त्याचे बिचार्‍याचे काय होत असेल असेही वाटले ..

दारू सोडण्याबद्दल शुभेच्छा. दारू असो वा सिगारेट, शेवट तोच असतो ज्याची तुम्हाला कल्पना आलेली.

दारूबाबत दारू पिणारे बरेच मिथ फिरवतात. यात त्यांचा काही दोष नसतो. एक गिल्ट असते पिणार्‍यांच्या मनात. ते कमी व्हायला ते अशी मनाची समजूत काढत असतात. आपण त्यांनाही सत्य स्विकारण्यासाठी शुभेच्छा देऊया. पण तुम्हाला जाणीव झाली आहे तर तुम्ही या दारू समर्थक आणि दारू विरोधक यांच्यातील वादाच्या पोस्ट बिलकुल वाचू नका. अगदी मानव यांनी वर लिंक दिली आहे ती वाचून जर एखाद्याला त्यावर विश्वासच ठेवायचा नसेल तर तो नाहीच ठेवणार. कारण आपले बाह्य मन आपल्याला नेहमी आपल्याच सोयीचा मार्ग दाखवते. त्यामुळे तुम्ही आपल्या अंतर्मनाचे ऐका. त्याने एकदा तुम्हाला वाचवलेय. दुसर्‍यांदाही त्याच्यासोबतच जा. आणि हो, चार पावले त्या दिशेने टाकाल तर तुमचे कुटुंबीय देखील तुम्हाला त्याच बाजूला सापडतील. आणि याची हिंट तुम्हाला आली आहे हे तुमच्याच पोस्टमध्ये समजतेय Happy

मी पाटी पेन्सिली खायचे.अगदी एखादी डेलिकसी खाल्यासारखं निवांत बसून वाचता वाचता पाकीट शेजारी ठेवून खायचे.वेगवेगळ्या स्टेशनरी दुकानातून खरेदी करायचे.
---
Same.. मीही असं करायचे
आपोआप कमी झालं आणि माती खाण्याचं व्यसन लागलं (वागण्यात तर अजूनही खातेच आहे, असो Proud )
खाण्याची तपकिरी माती दुकानात मिळते.
मी शाळेत असताना घेऊन खात असे. एक रुपयाला बरीच येई. ते मला सुरुवातीला आठवडाभर पुरत असे. नंतर जास्त खाणं सुरु झालं. आठवड्याचे ५रुपये होऊ लागले.
पण मग शाळा संपली आणि clg सुरु झालं आणि हेही कमी झालं कारण ते दुकान clg पासून दूर होतं.
थोडं थोडं खाणं सुरु होतं.
Engg ला पुण्याला येताना मी १०₹ ची खूप माती घेऊन आले.
आणि homesick पणा मध्ये सगळी संपवली.
ते २ दिवस अशक्य पोट दुखलं. खूप त्रास झाला.
तुम्हाला funny वाटेल.
त्या त्रासातच मी देवाला promise केलं की पुन्हा अशी माती खाणार नाही पण आता हे दुखणं थांबव. थोड्या वेळाने
दुखणं थांबलं. मीही अजातगायत वचन पाळलं आहे.
हे मी आज प्रथमच जाहीर करतीये.
माझं एकटीचं secret व्यसन होतं ते असं.
कुणालाच माहिती नाही.

हे अजब आहे, कधीच ही अशी खायची माती विकत मिळते माहिती नव्हते
पण धैर्याने इथे कबूल केलेत आणि त्यापासून सुटका मिळवली याबद्दल मनापासून अभिनंदन

खाण्याची तपकिरी माती दुकानात मिळते >>> कशी असते नक्की? गूगलवर सापडेल का?

यावरून आठवले. एक खाण्याची आंबट गोडसर पावडर मिळायची. चिंच बोरे विकणारा असायचा त्याकडे. ज्याला ब्राऊन शुगर नाव होते. त्याचे व्यसन असे नाही. पण तो फालतू पदार्थ खायची आम्हा तीन मित्रांना सवय लागलेली शाळेत असताना. आठाण्याची पुडी मिळायची. एकावेळी तीन चार पुड्या फस्त करायचो प्रत्येकी. बोट बोट बुडवून खाणे. अर्धा पाऊण तास खातच राहायचो.

ज्याला ब्राऊन शुगर नाव होते.>> त्याला बोरकुट असं दुसरे नाव होतं का? पण आता खरंतर चवही आठवत नाही. चवीची आठवण तेवढी रावळगाव आणि लिंबू श्रीखंडाच्या गोळ्यांचीच शिल्लक राहिली आहे. पार्ले किस्मीचे मोठे बार मिळायचे. कधीकाळी त्याचे फार व्यसन होते. ते पाकीट उघडले की येणाऱ्या वेलचीचा वास अजून लक्षात आहे. कधीतरी तेही व्यसन सुटले.

सर्व सपोर्ट ग्रुपचे आभार. मी व्यसन जरी म्हणल असल तरी दररोज किंवा म्नाचा वा शरिराचा तोल जाइल येवढही नाही, पण झाल ते बास झाल अस वाटतय. १ चे ० करायचा स्विच कधी सापडतोय बघू.

खाण्याची तपकिरी माती दुकानात मिळते. >> त्याला आमच्या लहानपणी आमच्या गावात "काव" म्हणायचे.

बापरे... काव खायच्या का किल्ली तुम्ही...? अहो, काव तर कुंड्या रंगवायला वापरतात आमच्याकडे.

ओके
गेरू.काही लोक हार्डवेअर मध्ये मिळणारा मुलतानी मातीचा खडा पण खातात.(मी पण खाल्लाय, घश्याला कोरड पडते.) हे पिका डिसीज चा एक प्रकार.हे सर्व प्रकार शरीरातलं आयर्न आणि दातातलं कॅल्शियम शोषून घेतात.दात कॅव्हीटी,किडणं वाढतं.

योग्य व्हिटामिन शरीराला मिळालं की हे क्रेव्हिंग थांबतं.(अजूनही कधीकधी पाटी पेन्सिल खावी वाटली तर डी व्हिटामिन चा पाऊच मिळतो मेडिकल मध्ये, तो खाते. पण फारच चिमुकला असतो Happy

खायची मुलतानी माती असं म्हणत त्याला लोक.
.
हो अनु बरोबर, घशाला कोरड पडते, दात पांढरे राहत नाहीत.
Amazon वर मिळते Lol
रमाच्या वेळी pregnant असताना फक्त search केलं, आताही मिळत असेल का असं वाटून.
लोक ex ला stalk करतात ना तसं Lol

ofc कॅन्टीन मध्ये सोयाकटोरी म्हणून एक प्रकार मिळतो.
Amazing स्नॅक आहे.
चिप्स सारखं काहीतरी.
हेही असंच थोडं थोडं करत रोज खाणे सुरु झालं होतं.
ते खाल्लं नाही की boar व्हायचं सतत craving, दोन te तीन आठवड्यानंतर बंद केलं मी.
नाही म्हणजे नाही खायचं असं.
अशी छोट्या कालावधीची बरीच व्यसन येऊन गेली आहेत आयुष्यात!

किल्ली सेम पिंच , मी पण कॉलेजात असताना पाटीवरच्या पेंसिलचे बॉक्स च्या बॉक्स खायचे . पण नतर ते आपोपाच बंद झाले .
सध्या वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयनात आहे, एक वेळ येते कि भयंकर क्रेविंग्स , नॉशिया सुरू होतात आणि वजन येरे माझ्या मागल्या
सकाळी उठल्यावार चहा पिण्याची सवय होती ,दिवसभरात १ कप पित होते. , ती पण ६ महिन्या पासून बंद केली आहे , पण आता ऐखाद्या सुट्टीच्या दिवशी कप भर घेते . कुणाच्या घरी गेल्यावर चहा विचारला तर नाही म्हणत नाही (आता असे प्रसंग कमीच).
ऑफिस अ वर मध्ये WFH असल्याने माबोचे व्यसन आहे, तेहि सोडायचे म्हणते पण सूटत नाही. कामाचा फोकस कमी झालाय

ofc कॅन्टीन मध्ये सोयाकटोरी म्हणून एक प्रकार मिळतो.>> होय होय... याचं पण थोड्या दिवसांसाठी व्यसन केलं होतं मी... कोणी वाटेकरी नको म्हणुन मुद्दाम संध्याकाळी बस मधे बसतानाच कँटीन मधुन घेतलं जायचं अन ते थेट बॅग मधेच टाकलं जायचं. ट्रफिक मधुन वाट काढत बस हायवेला लागे पर्यंत इतरांच्या ब्रम्हानंदी टाळ्या लागायच्या अन मग मी हळूच बॅग उघडून सोयाकटोरीचं पॅक काढुन खात बसायचो. घर येईपर्यंत पुरायचं इतक्या कटोर्‍या त्यात असत. असं बरेच दिवस सुरु होतं अन मग व्यसन लागलंय हे लक्षात आल्यावर एके दिवशी सोडलं.

Pages